शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

तोच चंद्रमा…. तूही ‘कामिनी’

 ‘कामिनी’ बालपणी बालाघाटच्या डोंगरात भेटलेले झाड. नंतर बुकेमध्ये भेटायचे पण संकरित वाणांच्या कोवळ्या फांद्यांच्या रूपात. त्याचा गंध मनात साठलेला. तीच या झाडाची खरी ओळख. ते आज पुन्हा भेटले आणि जुन्या स्मृती ताज्या झाल्या. आठवणीतील झाडाची कुंडली शोधण्याचा मोह आवरता आला नाही. तेच रूप, तोच गंध चाळीस वर्ष आठवणीतला… आज पुन्हा भेटला… ‘कामिनी’ वृक्षाच्या रूपात… त्या  झुडुपवर्गीय वनस्पतीबद्दल……


_________________________________________________________

चैत्र महिना सुरू होताच पानांच्या जोडातून गुच्छरूपात कळ्या यायला सुरुवात होते. सुरुवातीला पोपटी रूप धारण करतात. पूर्ण उमलेपर्यंत त्यांचा रंग पोपटीवरून पांढरा होत जातो. चैत्रातील चंद्र कलेकलेने वाढत जातो, तशा कळ्याही वाढत जातात. चैत्र महिन्यातच झाड फुलायला सुरुवात होते. पांढरी पाच पाकळ्यांची फुले तयार होतात. त्यांच्या मध्ये पांढऱ्या दांड्याच्या टोकाला पिवळ्या रंगांचा परागकणांचा पुंजका शोभून दिसतो. कामिनीचा धुंद वास दिवसरात्र सुगंधित करतो. उन्हाच्या तडाख्याबरोबर त्याचा गंध कमी होत जातो, रात्र चढत जाते, तसा गंधही खुलत जातो. आपल्या बेधुंद गंधाने मानवालाच नाही, तर कीटक, मधमाशा आणि लहान पक्ष्यांनाही स्वत:कडे आकर्षित करून घेणारे सध्या फुललेले झाड म्हणजे कामिनी किंवा मधुकामिनी…

मराठीत याला कुंती, पांढरी, असेही म्हणतात. हिंदीमध्ये कामिनी, अंगारकला, मार्चुला, गुजरातीत

जसवंती, कन्नडमध्ये अंगारकण, कडू करीबेवू, मल्याळममध्ये कट्टूकरिवेप्पू, मर्मूला, मणिपुरीमध्ये कामिनी कुसुम, तमिळमध्ये सिमाईकोंची, तेलगूमध्ये नागा-गोलांगा, सिंहलीमध्ये अत्रेय म्हणतात. असामी, बंगालीमध्ये याला कामिनी याच नावाने ओळखले जाते. इंग्रजीमध्ये कॉमन जस्मिन, ऑरेंज जस्मिन, चायनीज बॉक्स, बार्क ट्री, कॉस्मेटिक बार्क ट्री, हनी बुश, मुराया इत्यादी नावांनी ओळखतात. चीनमध्ये जीउ ली झियांग म्हणतात. या झाडाचे शास्त्रीय नाव मुराया पॅनिक्युलाटा आहे. या झाडाचे शास्त्रीय वर्णन १७६७ मध्ये कार्ल लिनियस यांनी केलेले आढळून येते. त्यांनी या झाडाचे नाव चाल्कस पॅनिक्युलाटा असे ठेवले होते. पुढे १८२० मध्ये विल्यम जॅक लिनियस यांचे शिष्य आणि गॉटिन्जन विद्यापीठातील वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक अँडर्स म्युरे यांच्या सन्मानार्थ मुराया पॅनिक्युलाटा असे ठेवले.

या झाडाचे मूळ दक्षिण आशियातील. हे झाड अस्सल भारतीय आहे. भारतासह चीन, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, कंबोडिया, लाओस, म्यनमार, थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांत आढळते. त्याच्या रंग, रूप आणि गंधामुळे इतर देशांनीही त्याला आपलेसे केले. मात्र आपल्याकडे घाणेरी वाढते तसे, फ्लोरिडामध्ये या झाडाने खूपच आक्रमक पद्धतीने वाढायला सुरुवात केल्याने त्याचा समावेश तणांमध्ये केला आहे.

झुडुप वर्गात मोडणारे हे झाड १० ते २० फुटांची उंची गाठते. त्याच्या फांद्यापासून आणि बियांपासून रोपे बनतात. नर्सरीमध्ये मूळ कामिनीपेक्षा संकरित वाणांची रोपे जास्त असतात. त्यांना येणारी फुले लहान असतात आणि त्याचा वासही कमी असतो. पण जंगलात एक वाढलेले झाड असले तरी आसंमत सुगंधित करते. झाडाखाली

  पाकळ्यांचा सडा पडतो. याची पाने कढीपत्त्यासारखी असतात. मात्र ती चमकदार गडद हिरव्या रंगांची असतात. एका पानाला तीन ते नऊपर्यंत पर्णिका असतात. पानामुळे फुले उठून दिसतात. पानाच्या बरोबर देठाजवळून पोपटी सात ते आठ कळ्यांचा गुच्छ बाहेर पडतो. पाकळ्याही सुरुवातीला पोपटी येतात. फुल पूर्ण उमलेले की त्यांचा रंग शुभ्र पांढरा होतो. तसेच पाच पाकळ्या टोकाला देठाकडे वळतात. या पाकळ्यांच्या मध्ये पाच पुंकेसर, स्त्रीकेसर असतात. त्याच्या टोकाला पिवळे परागकण असतात. फुल एक दोन दिवस राहते. नंतर सव्वा ते दोन सेंटिमीटर लांब पाकळ्यांचा जमिनीवर सडा पडतो. अन घंटाकृती फुलांचे फळात रूपांतर होते. या फुलांच्या रंगाने आणि गंधाने वेडावलेले अनेक कीटक, मुंग्या, मधमाशा झाडाभोवती रूंजी घालत असतात. त्या नकळत परागीभवन करतात.

त्याचे मऊ अंडाकृती पोपटी फळ वाढू लागते. पूर्ण वाढलेले फळ १२ मिलीमीटर लांब पाच ते १४ मिलीमीटर व्यासाचे असते. लाल तांबट फळ एक दोन बियांसह वाढते. बियांपासून रूजणारी रोपे मूळ झाडाप्रमाणेच येतात. मात्र त्यांना थोडी उशिरांने फुले येतात. आतील बिया पिवळसर रंगांच्या किंवा हिरवट असतात. काही भागात याची फळे खाली जातात.

झाड वाढताना त्याचे खोड सुरुवातीस हिरवे असते. काही झाडांच्या खोडावर लवही दिसते. लाकूड जून होऊ लागताच रंग करडा होत जातो. खोड अर्धा ते एक फूट व्यासाचे बनते. झाडाची साल खडबडीत असते. याचे लाकूड खूप कठीण असते. शेती आणि बांधकामात ते वापरले जाते. कोवळ्या फांद्याचा वापर पुष्पगुच्छ तयार करताना केला जातो. थायलंड, जावा आणि ब्रम्हदेशात खोड आणि मुळांचा वापर सौंदर्य प्रसाधनामध्ये करतात. चालताना वापरल्या जाणाऱ्या काठ्या, हँडल्स आणि फर्निचर बनवण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो.

कामिनी एक औषधी वनस्पती आहे. मुळात याची पक्व झालेली पिवळी पाने बारीक करून त्वचेला तुकतुकीतपणा आणण्यासाठी लावतात. पिवळसर रंगांच्या कामिनीच्या फुलांचा उपयोग दातांच्या आरोग्यासाठी केला जातो. वेदनाशामक म्हणून झाडांची साल आणि मुळे उपयोगी पडतात. अतिसार, जठराचा दाह, सूज यावर पानांचा उपयोग केला जातो. नायजेरियात मलेरिया, मधूमेह, आणि हाडांच्या दुखण्यावर पानांचा वापर केला जातो. अंगदुखीवर मुळाच्या सालीचे चूर्ण चोळले जाते. सुगंधी तेल, अत्तर बनवण्यासाठीही या झाडांच्या फुलांचा आणि इतर भागांचा उपयोग केला जातो. कामिनीचे झाड शेतीचे रक्षण करण्यासाठी हिरवे कुंपण म्हणूनही लावतात. त्याचप्रमाणे शोभेचे झाड म्हणूनही त्याला शहरातील बागांतून स्थान मिळाले आहे. विद्यापीठातील दूरशिक्षण विभागाजवळ छोटेखानी उद्यान तयार कतांना कामिनीची झाडे आवर्जून लावली. मात्र ती संकरीत वाणांची. कमी पण तोच गंध पसरवणारी. मूळ जंगलात असणारे झाड आज नामशेष होत चाललेल्या वनस्पतींमध्ये समाविष्ट आहे.

बालपणी तिसरीत असताना बालाघाटच्या डोंगरात हे झाड प्रथम पाहिले होते. फुललेले. पांढऱ्या शुभ्र फुलांनी भरलेले. वातावरणाला धुंद करून टाकणारे. पुढे अनेक वर्षे गेली. झाड विस्मृतीत गेले. बुकेमध्ये फांद्या भेटायच्या, मात्र त्याला फुले नसायची, त्यामुळे गंध नसे. आणि या झाडाची ओळख तर गंधामुळे होती. त्यामुळे केवळ फांद्यावरून ओळख पटली नाही. आज कामिनी’चे झाड पुन्हा भेटले. तसेच फुललेले. फुलांच्या गंधावरून ओळख पटली. विद्यापीठातील शिक्षकांपैकी कोणा रसिक शिक्षकाने एका निवासस्थानाबाहेर लावलेले. तेथे आता कोणीच राहत नाही. मात्र त्यांची आठवण असणारे ते झाड फुलले होते, वातावरण गंधीत करत होते.

 कामिनीची फुले फुलली आणि नाकाने गंध टिपला की हमखास शांता शेळके यांनी लिहिलेले आणि बाबुजींच्या सुमधूर आवाजाने अजरामर झालेले गाणे आठवते…

‘तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी,

एकांती मजसमीप, तीच तूहि कामिनी!’

अनेकांना हे प्रेमगीत वाटते. मात्र हे गीत काळजीपूर्वक ऐकल्यानंतर या भावगीतातील विरहाचा भाव लक्षात येतो. पहिल्या कडव्यात वर्तमानातील निसर्गाचे वर्णन येते,

‘नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे,

छायांनी रेखियले चित्र तेच देखणे,

जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी… 

एकांती मजसमीप, तीच तूहि कामिनी’. 

मात्र पुढच्या कडव्यात कवयित्री प्रथम प्रश्न विचारते आणि अखेर मनात ती ओढ आणि डोळ्यात पूर्वीचे ते स्वप्न नसल्याचे सांगताना म्हणते,

‘सारे जरि ते तसेच, धुंदी आज ती कुठे?

मीहि तोच, तीच तूहि, प्रीत आज ती कुठे? 

ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी…

एकांती मजसमीप, तीच तूहि कामिनी’.

तर शेवटच्या कडव्यात मनातील भावनांचे वास्तव मांडले आहे. प्रथम प्रेमाच्या खुणा आठवणे, वाळलेल्या फुलांमधून गंध शोधण्याइतकेच चुकीचे असल्याचे सांगताना त्या म्हणतात,

‘त्या पहिल्या प्रीतीच्या, आज लोपल्या खुणा,

वाळल्या फुलांत व्यर्थ गंध, शोधतो पुन्हा,

गीत ये न ते जुळून, भंगल्या सुरांतुनी… 

एकांती मजसमीप, तीच तूहि कामिनी’

या गाण्याचे लेखन जितके अप्रतिम आहे, तितकाच सुंदर स्वरसाज आहे. यमन रागातील बाबूजींच्या आवाजातील हे गीत मनाला खोल तळाशी नेते, शांत करते. प्रत्यक्षात प्रेयसीच्या विरहाने व्याकुळ प्रियकराचे मन कवयित्रीने शब्दचित्रात बांधले आहे. एका प्रियकराचे मन या काव्यात कवयित्री शांता शेळके यांने मांडले आहे. मात्र हे गाणे ऐकले की मला यात अभिप्रेत असलेल्या कामिनी म्हणजेच प्रिया, स्त्री, किंवा पत्नीपेक्षा कामिनी वृक्षच आठवतो. कदाचित या गाण्याच्या ध्रुपदामध्ये आलेले वर्णन या वृक्षाला तंतोतंत लागू पडणारे आहे म्हणून असेल, पण तसे होते खरे! पाहाना हे झाडही चैत्रातच फुलायला सुरुवात करते. आकाश निरभ्र असल्याने चैत्रातील चांदणे, चंद्रमा स्पष्ट दिसतो. आणि अशा निरव शांततेत, ते फुललेले कामिनीचे झाड आणि त्याचा गंध आठवत, डोळे मिटून हे गाणे ऐकावे आणि मनातील सर्व स्पंदने, आंदोलने शांत व्हावीत, हा अनुभव अनेकदा घेतला आहे.

एक मात्र खरे, हे भावगीत ऐकताना मन शांत होते आणि या फुलांच्या गंधकोशी मन प्रुफुल्लीत होते…  

४५ टिप्पण्या:

  1. अप्रतिम लेख झाला आहे सर! कामिनीचे झाडही कळले अन् गीतही! मन प्रसन्न झाले! धन्यवाद सर!

    उत्तर द्याहटवा
  2. लेख अप्रतिम लिहला आहे. या लेखाला महितीबरोबर लालित्यपूर्ण साज चढला आहे. लेख वाचून झाल्यानंतर टेरेसवर जाऊन चंद्रमा पहिला पण कामिनी तिथे नव्हती ती पुन्हा फोटोत पाहिली. हा वृक्ष लता यांचा प्रवास असाच मनमोहक होत राहो ही शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  3. मस्त! सुंदर फुलांसोबत शांता शेळके यांचे काव्यगंधही अनुभवता आले. साधी, अप्रतीम अन ओघवती भाषाशैली.

    उत्तर द्याहटवा
  4. कामिनीचे आयुर्वेदाप्रमाणे खूपच गुणकारी आपल्या भाषेमध्ये खूपच कामाची आहे सौंदर्य तसेच इतरही आजारावर गुणकारी औषध आहे. खूपच मोह पडावी अशी वनस्पती असून आपण लेखाला साज (लेखन मांडणी) त्याच भाषेचा दिलेले आहे

    आपण प्रत्येक वनस्पती बाबत खूपच सुंदर अप्रतिम विशेष म्हणजे आमच्या वाचकांचा भाषेत मांडतात लिहितात त्याची संपूर्ण माहिती तर मिळतेच कायमस्वरूपी स्मरणात राहते.


    सध्या covid-19 च्या मुळे अनेक जण तणावाखाली कामे करत आहेत. बहुतांश सामान्य लोक खूपच भयभीत झाली आहे

    आपला सर्वच विषयावर सूक्ष्म जबरदस्त अभ्यास आहे. आपल्या लिखा नाणे निश्चितच एक सकारात्मक ऊर्जा मिळेल आपण निश्चितच सामान्या साठी आपल्या वेळेप्रमाणे लिहावे अशी विनंती आहे🙏

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खूप माहितीपूर्ण लेख व शेवटी शांता शेळके यांची कविता तुमच्या लेखाचा सुगंध द्विगुणित करून गेली.

      जे.डी. भुसारे
      खारघर, नवी मुंबई

      हटवा
  5. कामिनी नावाचे झाड असते हे मला पहिल्यांदाच कळले फुले सुंदरच आहेत कधी फुलांच्या दुकानात जाईन तेव्हा पुष्पगुच्छ मध्ये असलेल्या कामिनी च्या पानांची सुद्धा चौकशी कारेन, एकंदर तुमचा या झाडाविषयी चा लेख आवडला

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सुंदर,अप्रतिम,संदर्भबहुल,माहितीपूर्ण व लालित्यपूर्ण लेख लिहिलात सर,धन्यवाद!

      हटवा
  6. अप्रतिम लेख!!आपल्या लिखानाच्या शैलीस विनम्रपणे वदंन.लेख वाचताना आपण वाचकाच्या मनात आनंदघन निर्माण करता ही फार मोठी गोष्ट आहे.मस्तच!!!!

    उत्तर द्याहटवा
  7. कल्पना " विलासाची ' कामिनी
    आजची सकाळ शब्द सुहासने गांधाळली
    विज्ञानाच्या चक्षुशूनी मनी विसावली
    तोच चंद्रमा नभात कव्यानी दिनभरी जिभेवरी रेंगाळली
    तूच ती कामिनी.

    उत्तर द्याहटवा
  8. अप्रतिम लेख झाला आहे सर! कामिनीचे झाडही कळले अन् गीतही! मन प्रसन्न झाले! धन्यवाद सर .....
    मनपूर्वक शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  9. अती सुंदर लिहिले आहे...त्या गंधात हरवून गेले..असाच आनंद ऑक्टोबर मध्ये फुलणारी सातवीण किंवा सप्त पर्णी ही फुले देतात...सकाळ गंधित झाली...अनेक आभार...आता मला हा गंध शोधावा लागेल

    विजयश्री तारे जोशी

    उत्तर द्याहटवा
  10. आदरणीय सर,
    फार सुंदर लेख लिहिला आहे कामिनी चे झाड व त्याला अनुसरून कवी शांता शेळके यांचे गीत अत्यंत सुंदर प्रकारे आपण आपल्या शब्दांमधे हे मांडले आहे. अशाच प्रकारे आपण लिखाण करीत राहा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा, धन्यवाद.!
    डॉ. महेश बाळासाहेब खानविलकर खोपोली रायगड.

    उत्तर द्याहटवा
  11. खूप सुंदर आहे लेख निसर्गाच्या सान्निध्यात राहून गेलं असं नक्कीच वाटतं लेख वाचून. एका वनस्पती बाबत इतकं भरभरून लिहिलात हेही विशेष आहे. अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  12. मी हे झाड पाहिले होते पण यालाच कामिनी म्हणतात हे आज कळले. लिखाणातील सुंदर वर्णन हा बहरलेला वृक्ष परत पाहण्यासाठी उद्युक्त करते.

    उत्तर द्याहटवा
  13. आजवर हे गीत अनेक वेळा ऐकले पण "कामिनी" नावाचे झाड आहे यापलीकडे नेमकं कसं असते हे माहीत नव्हते पण तुमच्या काव्यात्मक शैलीतून केवळ या झडविषयीच नाही तर त्या गीताचाही अर्थ नव्याने कळला. तुमचे वनस्पती, फुलझाडांविषयीचे विशेष आकर्षण भन्नाट आहे. एखाद्या वनस्पतीची विविध अंगांनी माहिती तुमच्या खास शैलीत वाचायचा आनंद वेगळाच... अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  14. व्वा.. गंधीत माहिती.. साग्रसंगीत माहिती..
    -भरत दैनी.

    उत्तर द्याहटवा
  15. Very nice artical and imaginatively related the melodious song and the flower plant. The selection of words is aptly used. Congratulations and thank you very much sir for innovative ideas in your article.

    उत्तर द्याहटवा
  16. कामिनी या फुलझाडाची आणि शांता शेळके यांच्या गीताची ऐतिहासिक पार्श्वभूमी खूपच सुंदर रेखाटली आहे

    उत्तर द्याहटवा
  17. गाव येडशी. रामलिंगचा डोंगर बऱ्याचवेळा मनसोक्त फिरलो. पण ती बऱ्याचवेळा पाहिलेली सुंदर सुगंधी कामिनी आज भेटली,लेखातून. तुही तीच तीही तूच ... अप्रतिम लेख.आभार

    उत्तर द्याहटवा
  18. गुरुजी,
    कामिनी संदर्भातील इतकी सखोल महिती छानच!
    शब्दांकन आणि संकलन अप्रतिमच.
    माझ्या बऱ्याच निसर्गप्रेमीना अग्रेषित केली आहे.

    उत्तर द्याहटवा
  19. कामिनी आपल्या परिसरात लावली ती व्यक्ती खरेच रसिक होती हे आपला लेख वाचून अधिक पटले. गॅलरीत बसून फुलांच्या घमघमटीत बुडाले अशी जागा निवडली आहे. कामिनी दिसली तेव्हा मी सोबत होतो म्हटले....

    उत्तर द्याहटवा
  20. खूपच छानलेख���� आपले लेखन वाचले की पुन्हा पुन्हा निसर्गाशी आपसूकच जोडले जाते

    उत्तर द्याहटवा
  21. छान लेख . निसर्गाविषयी ओढ निर्माण होते . गीताचा समग्र अर्थ समजला . धन्यवाद !

    डॉ . प्रकाश दुकळे

    उत्तर द्याहटवा
  22. सर आपण मूळचे भौतिकशास्त्रज्ञ, रोजचे काम प्रशासकीय परंतु लिखाण मात्र निसर्गातील विविध पैलूंवर असते. वनस्पतीशास्त्र, आयुर्वेद, साहित्य,कवित्व आणि लेखनशैली या सर्वच गोष्टी आपल्या लेखातून प्रतिबिंबित होतात. आपल्या हातून असेच लिखाण होत राहावे आणि विज्ञानाची ज्ञानगंगा तळागाळा पर्यंत पोहचत राहावी

    उत्तर द्याहटवा
  23. कामिनी! सुंदर माहिती आणि ओळख करून दिलीत सर! अप्रतिम लेखनशैली आहे आपली.खूप खूप शुभेच्छा आणि ही ज्ञान गंगा आमच्या पर्यंत पोहचवत आहात मनापासून आभार!😊🙏

    उत्तर द्याहटवा
  24. आदरणीय सर,"कामिनी"या झाडा विषयी मानवी जीवनात औषधी स्वरूपात त्यची उपयुक्तता, झाडाची गुणवैशिष्ट्ये याविषयीची माहिती अगदी सोप्या भाषेत मांडली आहे आपण अशा स्वरूपाचे लेखन करण्यासाठी आपणास शुभेच्छा धन्यवाद सर

    उत्तर द्याहटवा
  25. कामिनीच्या झाडाला देखील आपल्या रूपाला चा हेवा वाटे इतकं सुंदर लिहिले आहे. शांताबाईंचे गीत किती सुंदर उलगडून दाखविले आहे. खूप अप्रतिम

    उत्तर द्याहटवा