शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

विद्येच्या प्रांगणातील पाच तपे...


प्रा. माणिकराव साळुंखे हे शिक्षणतज्ज्ञ, पाच विद्यापीठांचे कुलगुरू, थोर रसायनशास्त्रज्ञ, अनेक कंपन्यांचे संस्थांचे सल्लागार म्हणून सुपरिचित व्यक्तीमत्व. मला त्यांच्यासमवेत अनेक वर्षे काम करता आले. त्यातील पावणेपाच वर्षे जवळून काम करता आले. त्या अनुभवामध्ये मला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यामुळे माझ्यासाठी ते गुरुस्थानी. त्यांच्यावर मी ‘चैतन्याचा झरा…’ हा लेख माझ्या ब्लॉगवर ( http://drvnshinde.blogspot.com/2022/09/blog-post.html ) प्रकाशित केला. नुकतेच त्यांचे मनोविकास प्रकाशनामार्फत ‘विद्येच्या प्रांगणात’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. या पुस्तकावरील मनोगत, ग्रंथ परीक्षण या सदरात ‘समाज प्रबोधन पत्रिके’च्या एप्रिल-मे-जून २०२३ च्या अंकात प्रकाशित झाला आहे. तो लेख आपल्यासाठी येथे साभार प्रकाशित करत आहे.. 
__________________________________________________

    दरवर्षी अनेक पुस्तके प्रकाशित होतात. मुद्रणतंत्र जसे सोपे झाले, तसे पुस्तक प्रकाशनाचे प्रमाण वाढले. यातील अनेक पुस्तकांचे आयुष्य खूप कमी कालावधीचे असते. अनेकजण तर गौरवग्रंथ छापतात. आप्तस्वकीयांत वाटण्यापुरता त्यांचा उपयोग असतो. याउलट, काही लोकांचे आयुष्य असे असते की त्यांची जीवनकहाणी वाचण्याची, ऐकण्याची च्छा अनेकांना असते. अशा अलौकिक कार्याचे धनी असणाऱ्या व्यक्ती स्वत:चे चरित्र सांगण्याच्या प्रयत्नात पडत नाहीत. त्यांना बोलायला भाग पाडावे लागते. त्यांनी लिहिणे तर आणखी कठीण असते. मात्र पाच विद्यापीठांचे कुलगुरूपद भुषविणाऱ्या डॉ. माणिकराव साळुंखे यांना लिहिते करण्यामध्ये मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यशस्वी झाले आहेत.

      शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, राजस्थान केंद्रिय विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, सिंबायोसिस विद्यापीठ, पुणे आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे या पाच विद्यापीठांचे कुलगुरूपद भुषविण्याची संधी डॉ. माणिकराव साळुंखे यांना मिळाली. ही सर्व विद्यापीठे वेगवेगळ्या प्रकारची आहेत. त्यांना ही संधी नशिबाने मिळालेली नाही; तर, त्यांनी त्यांच्या अथक शिकण्याच्या वृत्तीतून स्वत:चे अनुभवाचे दालन समृद्ध केल्याने आणि त्यांच्या संस्थेप्रती, कामाप्रती असलेल्या निष्ठेतून मिळाली आहे. त्यांनी जेथे कार्य केले, तेथे आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यामुळेच एका संधीतून दुसरी संधी त्यांना मिळाली आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी जे जे शक्य आहे ते पुरेपूर देण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तीचे आत्मचरित्र यावे, असे मनापासून वाटत होते. एक तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली होती. दुसरे त्यांचे शैक्षणिक प्रशासन त्या कालखंडात जवळून पाहिले होते आणि त्याचा प्रभाव कळत-नकळत माझ्यावरही झालेला आहे. तिसरे कारण म्हणजे २०१५ मध्ये माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना द्यावी अशी मी केलेली विनंती त्यांनी मान्य करून दीर्घ प्रस्तावना त्यांनी दिली होती. त्यातून त्यांचे मराठीतील लेखन कौशल्य समजले होते.

      त्यामुळे नेहमी वाटायचे की सरांनी आत्मचरित्र लिहायला हवे. त्यांचे विविध टप्प्यांवरील प्रयत्न, त्यांना सहाय्य करणारे शिक्षक, मार्गदर्शक, त्यांच्या मार्गात पेरले गेलेले काटे आणि त्या अडचणींवर त्यांनी केलेली मात हा सर्व प्रवास वाचनीय असणार, याची खात्री होती. मात्र सर स्वत:बद्दल बोलायला कधी फारसे उत्सुक नसतात. शिवाजी विद्यापीठात केलेल्या कामाचे श्रेय संबधित अधिकाऱ्यास देताना त्यांना पाहिले होते. त्यामुळे अरविंद पाटकर यांनी त्यांना लिहिते केले याबद्दल खरे तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यातून तयार झालेले ‘पाच विद्यापीठांचं कुलगुरू पद भूषविलेल्या ज्ञानयात्रीचे आत्मकथन – विद्येच्या प्रांगणात’ हे पुस्तक मराठी साहित्यातील आत्मचरित्राच्या दालनातील एक समृद्ध पान बनले आहे.

      या पुस्तकाला भालचंद्र मुणगेकर यांची प्रस्तावना आहे. मुणगेकरांनी राजस्थान येथील लेखकाचे कार्य जवळून पाहिले आहे. पुस्तकाची पाठराखण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. राम ताकवले आणि डॉ. अनिल कर्णिक यांचे या पुस्तकाबाबतचे अभिप्रायही सुरुवातीला छापले आहेत. त्यातून या पुस्तकात काय असावे, हे लक्षात येते. मात्र नेमके काय आहे, हे समजून घेण्यासाठी संपूर्ण पुस्तक वाचायला हवे. बालपणापासून ते भारती विद्यापीठाच्या कुलगुरूपदापर्यंतचा कालखंड या पुस्तकात आला आहे. प्रदीर्घ शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द त्यांनी ती नेमकेपणाने शब्दबद्ध केली आहे. मात्र त्यामध्ये त्यांच्या कार्यकौशल्याचे, शैक्षणिक व्यवस्थापनाचे आदर्श उदाहरण ठरू शकणारे अनेक प्रसंग राहिले आहेत, अशी हुरहूर त्यांचे कार्य जवळून पाहणाऱ्यांना जरूर वाटेल.

      पुस्तकाची विभागणी दोन भागांत आहे. पहिल्या भागात आठ प्रकरणे आहेत. या आठ प्रकरणांमध्ये प्रामुख्याने त्यांच्या शिक्षणाचा भाग येतो. दुसऱ्या भागामध्ये त्यांच्या नोकरीतील विविध टप्प्यांचे वर्णन येते. पहिल्या भागाच्या पहिल्या प्रकरणात ते साळुंखे घराण्याचा संक्षिप्त इतिहास देतात. मात्र हा भाग वाचत असताना ते कसे घडले, यासोबत त्या कालखंडात सण कसे साजरे होत, सामाजिक वातावरण कसे होते, लोकांची मानसिकता, शेती, शिक्षण व्यवस्था, तंत्रज्ञानात झालेले बदल, क्रीडासंस्कृती, गावातील परिस्थिती, नातेसंबंध, नात्यातील जिव्हाळा या सर्व बाबींची नकळत माहिती मिळत जाते. त्यांच्या गावात असणारे म.भा. भोसले गुरूजी, त्यांचे कार्य आणि त्यांचा लेखकावर असणाऱ्या प्रभावामागील कारण ‘विद्येच्या प्रांगणात’ हे पुस्तक वाचताना लक्षात येते. या भागात आईबद्दलच्या भावना सहज आल्या आहेत. ‘आमच्या घरातील बहुतेक स्त्रिया काळाच्या मानाने खूपच कर्तबगार होत्या’ (पान क्र.३०), अशा वाक्यातून लेखकाचा स्त्रियांबाबतचा आदरभावही समजतो.

शाळेत नाव घालण्याचा प्रसंग वाचताना पन्नाशी उलटलेला वाचक आपल्या बालपणात गेल्याशिवाय राहात नाही. ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये लेखकाने वर्णन केल्याप्रमाणेच चित्र होते. नव्या शाळेतील प्रथांची माहिती नसल्याने पहिल्या बाकावर कायम बसणारा विद्यार्थी पुढे कायमचा शेवटच्या बाकावर का बसू लागतो, हे प्रत्येक शिक्षकांने समजून घ्यायला हवे (पान क्र.३५). नव्या विद्यार्थ्याला अशा कारणाने मिळालेला मार, त्यावर कसा आघात करू शकतो, याचे ते उत्तम उदाहरण आहे. शाळेत मिळालेला वाचनसंस्कार सरांनी आयुष्यभर जपला. पुस्तकाच्या याच भागात त्यांची वैद्यकीय शिक्षण घेण्याची अपुरी राहिलेली इच्छा, ती पूर्ण करण्यासाठी घरच्यांची जमीन विकण्याचा केलेला विचार, आणि लेखकाने केलेला पक्व विचार करत जमीन विकण्यास केलेला विरोध, त्यातून आलेले नैराश्य आणि त्यावर मात करत शेवटी बी.एस्सी.ला प्रवेश घेण्याचा निर्णय हे प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शक ठरावे. पालकांनीही ते आवर्जून वाचायला हवे. राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेताना ते राजकारणाच्या जवळ आले. महाविद्यालयातील निवडणुकांमध्ये सक्रीय भूमिका वठवली. परिणामी त्यांना स्वत: एम.एस्सी. करत असताना निवडणूक लढवावी, असे वाटले. त्यांनी ती लढवली आणि विद्यार्थी मंडळाचे अध्यक्षही झाले. त्यातून पुढे एन.एस.यु.आय.चे पश्चिम महाराष्ट्राचे सचिवपद त्यांच्याकडे आले. या सर्व घटनांमुळेच पुढे त्यांच्या मनात विद्यार्थी हितास सातत्याने सर्वोच्च प्राधान्य राहिले. पुढे संशोधनामध्ये स्वत:ला समर्पित करत ते राजकारणापासून दूर झाले. असे असले तरी ते राजकारणाकडे अत्यंत सकारात्मकतेने पाहातात. हे वर्णन वाचल्यानंतर वाचकाचा राजकारण वाईट, हा गैरसमज दूर होईल.

शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर लेखकाला अनेक शिक्षक भेटत गेले. यातील ज्या शिक्षकांचा त्यांच्यावर काही ना काही प्रभाव पडला, त्यांचा उल्लेख आवर्जून येतो. त्यामध्ये म.भा. भोसले सरांपासून सुरुवात होते आणि डॉ. पारीख, डॉ. जगदाळे यांच्यापर्यंत जाते. पुढे सर्व पदव्या प्राप्त केल्यानंतर संशोधनामध्ये स्वत:ची जागा निर्माण करताना देश विदेशातील अनेक मार्गदर्शक लेखकाला भेटले. त्यांच्यापासून जे-जे चांगले घेता येईल, ते लेखकाने घेतले. त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख येतो. त्याचप्रमाणे राजाराम महाविद्यालयातील शिक्षक एस.जी. पवार यांना ‘जस्ट हॅव अ लुक’ असे वारंवार म्हणायची सवय होती. एका तासात ते किती वेळा म्हणतात, हे मोजल्याचे वर्णन वाचकालाही महाविद्यालयीन जीवनात नेल्याशिवाय राहात नाही. 

भारतात शिवाजी विद्यापीठ, इन्ड‍ियन इन्स्ट‍िट्यूट ऑफ सायन्स या संस्थांमध्ये त्यांच्या संशोधनाची सुरुवात झाली. संशोधनाला देश विदेशात स्विकृती मिळू लागल्यानंतर त्यांना परदेश खुणावू लागले. इंग्लंड, इस्राईल, ऑस्ट्रिया, अमेरिका या देशात संशोधनाची नवी दिशा घेऊन ते शिवाजी विद्यापीठात परतले. इथंपर्यंत त्यांच्या संशोधनाची आणि खऱ्या अर्थाने त्यांची शिक्षक आणि संशोधक म्हणून कारकीर्द सुरू झाली. यात त्यांनी भारतातील विद्यापीठीय शिक्षणाचा आढावा घेताना शिक्षण कसे आहे आणि कसे असायला हवे, याबाबतचे विचार स्पष्टपणे मांडले आहेत. ‘कुलगुरू हा गुरूकुलाचा आद्य आचार्य असावा,’ अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली आहे (पान क्र.७१). त्याचबरोबर ४७ हजार महाविद्यालयांपैकी केवळ १३ हजार महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेतल्याची शिक्षण क्षेत्राचे भीषण चित्र दाखवणारी आकडेवारीही नमूद केली आहे. विद्यापीठात उच्चपदी कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचे नातेसंबंध असणेही किती त्रासाचे ठरू शकते, हे वाचताना मन सुन्न होते. त्यामुळे लेखकाला विद्यापीठाबाहेर जावे वाटणे आणि त्यांचे जाणे, हे सर्व वाचून शिक्षणक्षेत्रातील कोत्या मनोवृत्तीची चीड येते.

शिवाजी विद्यापीठातून बाहेर पडून डॉ. साळुंखे इन्स्टिट्युट ऑफ सायन्स मुंबई या संस्थेत गेले. तेथे त्यांच्या संशोधनाला आणखी गती मिळाली. संशोधनात सहाय्यकारी व्यक्तीमत्वे जशी भेटली, तशीच त्रास देणारीही भेटली. मात्र अनेकांच्या सहकार्यातून तेथे एक संस्कृती त्यांना निर्माण करता आली. ती कशी निर्माण केली, हे मुळातून वाचायला हवे. या प्रकरणाच्या सुरुवातीला त्यांनी संस्थेची गौरवशाली परंपरा मांडली आहे. याच संस्थेत त्यांना संचालकपद मिळाले. त्यावेळी दुखावली गेलेली माणसं कशी वागतात, हे वर्णन लेखकाने अत्यंत संयतपणे केले आहे. त्यामध्ये कोठेही अशा व्यक्तींना खलनायकत्वाकडे नेले नाही. त्यामुळे हे आत्मचरित्र भावते. त्याचसोबत विविध संस्थांसोबत त्यांनी प्रस्थापित केलेले साहचर्य हे या क्षेत्रात कार्यरत अनेकांना मार्गदर्शक ठरावेत.

इन्स्टिट्यूटमधील संचालकपदाचा अनुभव घेऊन लेखक पुन्हा शिवाजी विद्यापीठात आले, ते कुलगुरू म्हणून. ज्या विद्यापीठात पदोन्नती रखडली, अडवली गेली, त्याच विद्यापीठात कुलगुरू झाल्यानंतर एखाद्याने धडा शिकवण्याचा प्रयत्न केला असता. मात्र लेखकाने विद्यापीठाच्या प्रगतीचा ध्यास घेतला. विद्यापीठाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. एकीकडे विद्यार्थ्यांच्या हिताची सदैव काळजी घेताना, त्यांनी अनेक नवे प्रयोग केले. यातील बहुतांश प्रयोगांचा मी सहभागी साक्षीदार आहे. परीक्षा विभाग, संलग्नता, पात्रता, पीजीबीयुटीआर, पदव्युत्तर प्रवेश अशा विविध विभागात त्यांनी अनेक सुधारणा केल्या. विद्यापीठाच्या जलसंधारणाच्या प्रयोगाला गती दिली. त्यांनी रचलेल्या पायावरच पुढे २०१७ मध्ये शिवाजी विद्यापीठ जलस्वंयपूर्ण झाले. मात्र अनेक प्रयोगांचा या कथनात उल्लेख नाही; तर काहींचा ओझरता उल्लेख येतो. पान. क्र.१२९ वर लेखकाने विद्यापरिषद बैठक वेळेत संपावी म्हणून केलेला प्रयोग लिहिला आहे. ही बैठक ४ एप्रिल रोजी होती. १ एप्रिल रोजी लेखकाचा वाढदिवस. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेल्यानंतर त्यांनी ही बैठक लवकर संपवण्यासाठी नियोजन कसे करता येईल, याबाबत ३५० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा करून निर्णय अंतिम करून ४ एप्रिलची बैठक पाच वाजण्यापूर्वी संपवली. दिवस कोणताही असो, निमित्त कोणतेही असो, संस्थेच्या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. इन्फोसिससोबतच्या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करताना सर्वच शिक्षकानी जबाबदारी स्वीकारायला नकार दिल्यानंतर त्यांनी चक्क प्रशासनामार्फत त्याची अंमलबजावणी केली. तंत्रज्ञान विभाग सुरू झाल्यानंतर तेथील वसतिगृह अधिक्षकाची जबाबदारीही अशीच प्रशासनातील अधिकाऱ्यावर सोपवली. असे अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले. माणसे पारखण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असल्यामुळे कोणाकडे कोणती जबाबदारी द्यावी, याचे निर्णय ते लगेच घेत आणि त्यामुळे त्यांना प्रशासन गतीमान ठेवता आले. त्यामुळे हे आत्मचरित्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत प्रत्येकाने वाचावे आणि संग्रही ठेवावे, असे आहे.

शिवाजी विद्यापीठात त्यांनी केलेले कार्य अद्वितीय होते. शिवाजी विद्यापीठातील कार्यकाल संपण्यापूर्वीच त्यांची नियुक्ती राजस्थानमधील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी झाली. तेथेही अनुभवसमृद्ध आणि ज्ञानसमृद्ध कुलगुरू म्हणून त्यांनी कामाचा झपाटा लावला. एखाद्या नव्या संस्थेची उभारणी करताना येणारे सर्व अडथळे आणि संकटे यावर मात करत एक चांगले विद्यापीठ असा विद्यापीठाचा लौकिक झाला. हे सर्व त्यांनी ठरवले आणि झाले, असे नाही. अगदी सुरूवातीला भाड्याने जागा मिळवण्यापासून ते केंद्रीय विद्यापीठासाठी जागा मिळवेपर्यंत हे प्रयत्न सुरू राहिले. त्यानंतरही बांधकामे आणि प्रशासनाच्या पातळीवरही अनेक अडचणींवर मात करत हे विद्यापीठ उभे राहिले. भरती प्रक्रियेतील अडचणी, त्यामध्ये असणारे हितसंबंध, त्यातून येणारे तणाव याबाबतचे अनुभव वाचनीय आहेत. नव्या संस्थेची उभारणी करताना येणाऱ्या अडचणींवर कशी मात केली, कोणी सहाय्य केले, विद्यापीठ कसे घडले, हे सर्व वाचण्यासारखे आहे. विद्यार्थ्यांचे वागणे, बेशिस्त, अचानक घडणाऱ्या घटना आणि त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याने घ्यावयाचे निर्णय, त्यांचे वर्तन हे अभ्यासण्यासारखे आहे. अनेकांना यात आपले अनुभव दिसतील.

राजस्थानसारख्या नव्या प्रदेशात असे उत्तुंग कार्य केल्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्रात आले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू झाले. येथे मात्र त्यांना मनाप्रमाणे कार्य करता आले नाही. राजकीय दबावाखाली काम करणे, राजकारणी लोकांचे हितसंबंध जपत राहण्याऐवजी त्यांनी राजीनामा देणे पसंत केले. यंत्रणेतून बाहेर पडले. तथापि, या दबावामध्येही त्यांनी आपला संयतपणा आणि निर्णयातील ठामपणा सोडला नाही. तेथेही आपला निर्णय योग्य असल्याची न्यायालयीन मोहोर उमटल्यानंतर ते बाहेर पडले. तत्कालीन कुलपतींनी निर्णयाचा फेरविचार करण्याचा सल्ला देऊनही ते बाहेर पडले. याबद्दल प्रसिद्ध झालेल्या बातम्या त्यांनी पुस्तकात छापल्या आहेत. त्या आणि न्यायालयीन निकाल वाचल्यानंतर चांगले वागणे किंवा नियमाप्रमाणे वागणे कुलगुरूंनाही किती कठीण झाले आहे, हे लक्षात येते.

नाशिकच्या मुक्त विद्यापीठानंतर काही काळ ते काश्म‍िरमध्ये कार्यरत होते. त्यानंतर काही दिवसात त्यांनी सिम्बायोसिस विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी स्विकारली. अर्थात मध्यप्रदेशातील हे विद्यापीठ कौशल्य विद्यापीठ म्हणून उभे करण्याचे स्वाती मुझुमदार यांचे प्रयत्न होते. तेथेही ते फार काळ राहिले नाहीत. त्यानंतर ते भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू झाले आणि २०२२ पर्यंत तेथे राहिले. भारती विद्यापीठामध्ये २०१७ पासून कार्यरत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. या क्षेत्रातील संशोधन, चाचणी यासाठी विद्यापीठाने दिलेले योगदान मोठे आहे. त्याचबरोबर पीएच.डी. प्रबंधांचे मूल्यमापन, त्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च यामध्ये कपात करण्यासाठी केलेल्या उपाययोजना हा सर्व भाग मुळातूनच वाचायला हवा. त्यांचे आणि पतंगराव कदम यांचे संबंध आणि एक राजकीय नेतृत्वही कसे माणूस म्हणून उत्तुंग असते, हे समजून घेण्यासारखे आहे. भारतीय विद्यापीठ संघ आणि राष्ट्रीय पातळीवरील अनुभवाची प्रकरणेही आहेत. त्यातही संशोधनाची फलश्रुती हा भाग प्रत्येक संशोधकाने वाचायलाच हवा.

शेवटच्या काही प्रकरणांमध्ये डॉ. साळुंखे आपले विद्यार्थी, नातेवाईक, कुटुंब याबद्दल मोजक्या शब्दांत व्यक्त झाले आहेत. तरीही लेखकाच्या कार्यात त्यांचे सहकार्य आणि त्याप्रती लेखकाची कृतज्ञता शब्दाशब्दात जाणवत राहते. मागे वळून पाहताना आपली जडणघडण नेमक्या शब्दात लेखकाने साररूपात दिली आहे. शेवटच्या परिच्छेदात गावाच्या बदललेल्या रूपावर भाष्य करतानाच, आपण गावासाठी काही करू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करतात. हा भाग मनाला चटका लावून जातो. पुस्तकाच्या शेवटी लेखकाचा संक्षिप्त परिचय छापण्यात आला आहे. त्यामधून लेखकाच्या जीवनातील शिक्षण आणि नोकरीसंदर्भातील महत्त्वाचे टप्पे वाचकांना समजतात.

केवळ २६८ पानांचे हे आत्मचरित्र अनेक अर्थांनी वेगळे आहे. सर्वसाधारण आत्मचरित्रांमध्ये आढळणारी ‘मी’पणा यामध्ये डोकावत नाही. लेखकाच्या मूळ स्वभावात यशाचे श्रेय सहकाऱ्यांचे आणि अपयशाची जबाबदारी माझी, ही भावना असल्याने ते स्वाभाविकही आहे. मात्र त्यांना सहकार्य केलेल्या प्रत्येकाचे नाव नमूद करून त्यांनी काय सहकार्य केले हे लेखकाने लिहिले आहे. ती भाषा कृतज्ञतेची आहे. एवढ्या प्रदीर्घ अनुभवात वाईट अनुभव नव्हते किंवा लेखकाला आले नाहीत, असे नाही. मात्र ते लिहिताना त्यांची भाषा अशा प्रसंगांत इतरांना खलनायक ठरवणारी नाही. लेखकाने हे आत्मकथन अशा पद्धतीने केले आहे की, ते इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासकांसाठीही महत्त्वाचे ठरावे. बालपण लिहिताना ते सणांबद्दल व्यक्त होतात. शालेय शिक्षणाबद्दल लिहितात. पुस्तक वाचताना शिक्षक कसे होते, हे समजते. आपोआप त्यांच्याशी तुलना करत सद्यस्थितीबद्दलचे चिंतन सुरू होते. महाविद्यालयीन शिक्षणापासून ते उच्च शिक्षणाबद्दल, शैक्षणिक व्यवस्थापनाबद्दल आणि संशोधनाबद्दल लेखक व्यक्त होतो. हा भाग लिहिताना ते प्रत्येक संस्थेचा इतिहास लिहितात. थोडक्यात असलेल्या या निवेदनातून त्या संस्थेबद्दल, विद्यापीठाबद्दल एक चित्र वाचकाच्या डोळ्यांसमोर उभे करण्यामध्ये लेखक यशस्वी झाले आहेत.

लेखकाचे निवेदन ओघवते आहे. अशा आत्मकथनामध्ये संदर्भ पुढे येणे अनिवार्य असते. मात्र ते लिहिताना कोठेही पाल्हाळ नाही. गरजेपुरता, मुद्दा स्पष्ट होण्यापुरता तो संदर्भ येतो. अत्यंत नेटकेपणाने लिहिलेले हे आत्मचरित्र आहे. त्यामुळे वाचकाला वाचन सुरू केल्यानंतर ते ठेवावे असे वाटत नाही. प्रकरणे छोटी आहेत. त्यातही प्रत्येक प्रकरण समेवर जाऊन संपते. त्यामुळे वाचनामध्ये खंड जरी आला तरी पुस्तक पुन्हा हाती घेतल्यानंतर सूर पुन्हा लगेच जुळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक ठिकाणी सुंदर वाक्यांची पेरणी झालेली आढळते. उदाहरणार्थ, पहिल्या परदेशवारीबद्दल लिहित असताना कसलेल्या साहित्यिकाच्या लेखणीतून वर्णन यावे, अगदी तसे वर्णन येते. तेथील वातावरणाचे वर्णन करताना ते लिहितात, ‘तेथील वातावरण अद्भूत होतं. कमालीची शिस्त! गोंधळ गजबजाट अजिबात नव्हता. अंगावर येणारी शांतता जाणवे.’ यातील ‘अंगावर येणारी शांतता’ (पान क्र.५७) ही कल्पनाच वेगळी वाटते. त्याच वर्णनामध्ये ते पुढे लिहितात, ‘कमालीची स्वच्छता, शांतता आणि पशु-पक्षी, रस्ते असं सृष्टीचं विलोभनीय रूप वाटलं.’ अशी अनेक सुंदर वाक्ये जागोजागी सापडतात. परदेश भेटीदरम्यान संशोधनाव्यतिरिक्त इतर प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. त्या भेटीचे वर्णन वाचनीय आहे. त्या स्थळाबाबतचे अनेक तपशील धारावाही वर्णनाच्या माध्यमातून पोहोचवतात. एखादी संस्था सोडतानाचे वर्णन करताना लेखक भावूक झाल्याचे भाषेवरून समजते. तसेच, त्या भागाविषयी, संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करत ते पुढच्या प्रवासाला निघतात. जेथे त्रास झाला, त्या संस्थांविषयीही ते असेच व्यक्त झाले आहेत. यातून लेखकाच्या क्षमाशील स्वभावाचे दर्शन होते. एके ठिकाणी ते खऱ्या भारताच्या चित्रण न करणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन पाहिल्यावर ते तेथे न थांबता निघून जातात. अशा अनेक घटना आणि प्रसंगातून लेखकाचे देश, संस्था, कार्यशैली, मानवता, इत्यादींबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट होत जातो. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे, असे  आहे. अनुभवसंपन्नतेसोबत सहज भाषाशैलीमुळे हे पुस्तक संग्राह्य झाले आहे.

पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मांडणी चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केली आहे. कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर मुखपृष्ठ बनवले आहे. पुस्तकाच्या नावास अनुसरून रांगोळीच्या माध्यमातून पाच दीप घेतले आहेत. पाच विद्यापीठांसाठी हे दीप असावेत, हे सहज लक्षात येते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नऊ शब्द आहेत. त्यातील सात शब्द एका पाच ज्योतीच्या दिव्यावर लहान अक्षरात घेतले आहेत. तर सुवर्णअक्षरात मोठ्या आकारात ‘विद्येच्या प्रांगणात’ ही अक्षरे घेण्यात आली आहेत. दिव्याच्या मध्यातून निघणारी रेषा पुस्तकाच्या शीर्षकाच्या आणि लेखकाच्या नावाच्या मधून जात पूर्णविरामावर थांबते. कलाकाराच्या कलाकृतीमागे आणखीही विचार असू शकतात. मात्र या बाबी अगदी सहज लक्षात येतात आणि पुस्तक घेण्यासाठी वाचकास हे मुखपृष्ठ भाग पाडते.

लेखकाच्या सर्वच अनुभवांची, त्यांनी ज्या घटना आणि प्रसंग अनुभवले, त्यांचा समावेश या पुस्तकात झाला नाही. काही प्रसंग आणखी विस्ताराने लिहिले असते तर ते युवावर्गास उपयुक्त झाले असते. उदाहरणार्थ, कोल्हापुरातील नामवंत सायबर संस्थेमध्ये निर्माण झालेला प्रश्न. हा प्रश्न सोडवताना राजकीय दबाव होता. विद्यार्थ्यांनी आंदोलनेही केली. अनेक प्रकारचे दबाव येऊनही त्यांनी हार मानली नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयापर्यंत गेले. तेथे विद्यापीठाचीच भूमिका मान्य झाली. मात्र यातून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान त्यांना अस्वस्थ करत होते. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी विद्या परिषदेसमोर यासंदर्भातील विषय ठेवून, नियमांची कोठेही तोडमोड न करता, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्य पूर्ण करून घेण्याचा आणि नंतरच त्यांना पदवी देण्याचा मार्ग सांगितला. त्यासाठी अतिरिक्त शुल्कही आकारले. पूर्वी जे लोक या विद्यार्थ्यांना पदवी देता कामा नये, अशा भूमिकेत होते, त्यांनीही या विचाराला पाठिंबा दिला आणि एकमताने विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी देण्याचा निर्णय झाला. यामध्ये त्यांचे विद्यार्थ्यांचे हित जपण्यापासून, नियमांची काटेकोर अंमलबजावणी, राजकीय दबावास बळी न पडणे या बाबींचे दर्शन होते. त्याचप्रमाणे केवळ नियमावर बोट ठेवून विद्यार्थ्यांचे किंवा कोणत्याही घटकाचे नुकसान होऊ न देता प्रशासन कसे चालवता येऊ शकते, हेही समजते. डॉ. डी.एस. कोठारी यांनी सामान्य प्रशासनापेक्षा शैक्षणिक प्रशासन वेगळे असल्याचे सांगितले होते. डॉ. साळुंखे सरांचे प्रशासन हे डॉ. कोठारी यांना अभिप्रेत असणारे शैक्षणिक प्रशासन राहिले. त्यामुळे अशा सर्व घटना यात येणे आवश्यक होते, असे वाटते.

पुस्तकामध्ये आणखी थोडे संपादकीय संस्कार व्हायला हवे होते आणि काही ठिकाणी मुद्रणदोष निराकरण काटेकोरपणे होणे आवश्यक वाटते. अर्थात पुढील आवृत्तीमध्ये हे दोष सुधारून घ्यावेत. एका घटनेमध्ये त्या कुलसचिवांचे नाव सर्वत्र टाळलेले असताना शेवटी एका ठिकाणी ते तसेच राहिले आहे. संघटनेचा उल्लेखही एका ठिकाणी थोडा चुकला आहे. ज्यांनी डॉ. साळुंखे यांचे कार्य, कार्यशैली जवळून पाहिली आहे, त्यांच्याच लक्षात या बाबी येतात. पुस्तक वाचण्यामागे वाचकांचा जो हेतू असतो, तो पूर्ण होण्यात मात्र कोणतीही अडचण येत नाही.

एकूणच एक चांगले आत्मचरित्र वाचावयास मिळाल्याचे समाधान देणारे हे पुस्तक आहे. प्रत्येक शिक्षणप्रेमींने हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे, असे आहे. डॉ. साळुंखे सरांनी यावरच न थांबता आणखी मराठी भाषा आणि वाचकांचे भावविश्व समृद्ध करणारे लेखन करावे, ही अपेक्षा!


पुस्तकाचे नाव - विद्येच्या प्रांगणात

लेखक                - डॉ. माणिकराव साळुंखे

प्रकाशन             - मनोविकास प्रकाशन

पृष्ठे                  - २६८

किंमत              - ₹ ३५०