सोमवार, १ जानेवारी, २०१८

मूलभूत, उपयोजित संशोधन आणि भारत

      
(कोल्हापूर तरूण भारतने यंदाच्या वर्धापन नि पुरवणीसाठी लिखाणाची संधी दिली. 'मूलभूत, उपयोजित संशोधन आणि भारतया विषयावर लिहीण्यास सांगण्यात आले. यासंदर्भातील लेख दिनांक ३० डिसेंबर २०१७च्या अंकात प्रसिद्ध झाला. तो लेख इथं आपल्यासाठी तरूण भारतच्या सौजन्यानं प्रकाशित करत आहे. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      कांही वर्षापासून भारतातच नव्हे तर जगभर सुक्ष्म-अतिसुक्ष्म विषयातील तज्ज्ञांचा बोलबाला सुरू झाला आहे. सुपर स्पेशलायझेशनचे युग सूरू झाले आहे. विशेषतः वैद्यकिय क्षेत्रातील या बदलामुळे सर्वसामान्यांना त्याची जाणिव जास्त होवू लागली. वीस-पंचवीस वषापूर्वी एकच डाॅक्टर सर्व आजारांवर उपचार करायचे. आता मात्र प्रत्येक अवयवाचे तज्ज्ञ डाॅक्टर उपलब्ध आहेत. मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल्स सूरू झाली आहेत. विविध विषयातील डॉक्टर एकत्र येवून अशी हॉस्पिटल्स सुरू करतात. अशा दवाखान्यात सर्व आजारावर एकत्र उपचार होत असले तरी विविध तज्ज्ञ सल्ला देत असतात, उपचार करत असतात.  वैद्यकिय उपचार हा सर्वांच्या जवळाचा, निकडीचा भाग असल्याने सुपरस्पेशलायझेशन हा विषय सर्वपरिचित झाला.  असाच बदल संशोधनाच्या सर्वच क्षेत्रात येत राहीला. आजचे युग त्यामुळेचं सुपरस्पेशलायझेशनचे युग मानले जाते. मात्र, इसवी सन पूर्व कालखंडात तत्वज्ञ आणि विचारवंत हेच संशोधक मानले जात असत. संशोधकाचे कार्य म्हणजे ज्ञान निर्मिती हे निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे कोण्त्याही विषयातील ज्ञान निर्मीती करणारा हा संशोधक मानला जात असे.
      मानवाच्या विकासासह, विविध क्षेत्रातील संशोधनाची दारे उघडत गेली. पूर्वी एकाच व्यक्तिने अनेक विषयात संशोधन केल्याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. अगदी सुरूवातीला विज्ञानाची निसर्ग विज्ञान ही एकच शाखा होती. मूलतः विज्ञान सुरू होते ते भौतिकशास्त्रातून. भौतिकशास्त्रात घडणाऱ्या अनेक घटनांचा अन्वयार्थ समजून घेताना गणिती सुत्रांचा वापर अनिवार्य ठरतो. तसेच दैनंदिन व्यवहारासाठी अंकगणिताचा विकास होत होता. पुढे गणित आणि भौतिकशास्त्रातून विविध शाखांचा विकास होत गेला. जसजसे संशोधन वाढत होते, ज्ञान वाढत होते, तसतशा नव्या शाखा विकसित होत स्वतंत्र विषय म्हणून ओळखल्या जावू लागल्या. अगदी सुरूवातीला जीव, भौतिक, रसायनशास्त्र हे विषय स्वतंत्र झाले. त्यानंतर विद्युत अभियांत्रीकी हा विषय विकसीत झाला. पुढे इलेक्ट्रॉनिक्सहा विषय आला. त्यानंतर संगणकशास्त्र आले. त्यानंतर इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा विकास झाला आणि आज ते विभाजन नॅनोसायन्स सारख्या विषयापर्यंत आले आहे. गणितातही गणित आणि भूमिती असे विभाजन झाले. रसायनशास्त्रात ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक, फिजिकल केमिस्ट्री असे विषय स्वतंत्र झाले असे प्रत्येक विषयाचे विभाजन होत नवे विषय येत राहिले आहेत आणि आजचे सुपरस्पेशलायझेशनचे युग आले आहे.
     
प्राचिन काळी भारत विज्ञान संशोधनात म्हणजेच ज्ञान निर्मितीमध्ये सर्वात अग्रभागी होता. भारत ज्ञान निर्मितीच्या म्हणजेच संशोधनाच्या प्रांतात अग्रस्थानी असल्याचे अनेक पुरावे मिळत आहेत. भारतातील नालंदा आणि तक्षशिला ही दोन विद्यापीठे आणि त्यांच्याबाबत उपलब्ध पुराव्यातून ही परंपरा किती सक्षम होती याची साक्ष मिळते. या विद्यापीठातून दहा हजारावर विद्यार्थी एकाचवेळी अध्ययन करत. तीन हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय उपलब्ध असल्याचे पुरावे आहेत. त्याचप्रमाणे या विद्यापीठात मोठ‌्या प्रमाणात ग्रंथ संपदा होती. विकसीत झालेल्या तंत्राचे प्रशिक्षण या ठिकाणी दिले जात असे. भारतात या विद्यापीठांच्या स्थपनेपुर्वी कणाद यांनी अणुसंकल्पना मांडली होती. शुन्याचा शोध हा भारताच्या नव्हे तर जगातील सर्व देशातील गणिताला पूर्णत्वाकडे नेणारा ठरला होता-आहे. रसायनशास्त्र आणि आयुर्वेद यांचे अतूट नाते भारतियानी जाणले होते. औषधांची निर्मिती, हस्तकला, वास्तुशास्त्र, स्थापत्यशास्त्र, वनस्पतीशास्त्र, कृषिशास्त्र या सर्व विषयांमध्ये संशोधन करण्यात येत होते आणि हे ज्ञान अत्युच्च दर्जाचे होते. एकचं उदाहरण म्हणजे हजारो वर्षापूर्वी भारण्यात आलेला अशोकस्तंभ वर्षानुवर्ष सर्व ऋतुंचे सोहळे पाहात आजही अभंग उभा आहे. त्यासाठी निवडण्यात आलेल्या दगडाची निवड किती चांगली होती आणि तत्कालीन अभियंत्यांचे या विषयातील ज्ञान किती चांगले होते याची तो साक्ष देतो. अजंठा, वेरूळप्रमाणे अनेक ठिकाणी खोदलेली लेणी ही वास्तू आणि शिल्पकेलेचे ज्ञान किती प्रगल्भ होते याचा पुरावा देतात. अनेक किल्ल्यांच्या रचना अशा आहेत की दरवाज्यात सुरू असणारे संभाषण किल्ल्याच्या सर्वात उंच जागेवर सहज ऐकावयास जात असे. उत्खननात सापडलेल्या अनेक वस्तुंमुळे धातूशास्त्राबाबतची परिस्थिती समजते. या सर्वात आरोग्यशास्त्र आणि शरीर विज्ञान याबाबतचे उपलब्ध दाखले आज जगातील अनेक राष्ट्रात अभ्यासाचा विषय बनले आहेत.
      प्राचीन भारतात वैद्यकशास्त्र हे तत्कालीन परिस्थितीत अत्यंत प्रगत असल्याचे दिसून येते. आयुर्वेद हे ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात मोठ‌्‌या प्रमाणात विकसित झाले होते. अत्रेय पध्दती आणि धन्वंतरी पध्दती या दोन पध्दतींचा किंवा प्रणालींचा प्रामुख्याने यात समावेश होता. त्यानंतर आयुर्वेदात सातत्याने भर पडत गेली. आजार बरा करण्यापेक्षा तो होणारच कसा नाही याचा विचार प्रामुख्याने महर्षी चरक यांनी केला. म्हणजेच कोणता आजार कोणत्या कारणाने होते हे त्या काळी ज्ञात होते. नागार्जून, यांनी रोपण शस्त्रक्रियाचा अभ्यास केला होता. सुश्रुत अनेक शस्त्रक्रिया करत याचे उल्लेख आढळतात. सुश्रुत संहिता या ग्रंथात १८४ प्रकरणे आहेत. त्यात ११२० विविध आजारांची वर्णने आहेत. शस्त्रक्रियांची सविस्तर माहिती दिली आहे. यातील ६४ प्रकरणात विविध औषधांची माहिती दिली आहे. एकूण ७०० वनस्पती, ६४ खनिज पदार्थ, ५७ प्राण्यांची माहिती यात दिली आहे. हाडांचे वर्गीकरणही सविस्तरपणे केले आहे. वाग्भट, माधव यांनीही पुढे या विषयावर लेखन केले. देवी या रोगावरी सविस्तर माहिती या ग्रंथात सापडते. भारतीयांचे प्राचीन काळातील या विषयातील संशोधन आणि ज्ञान अद्यावत व प्रगत होते यात कोणतीही शंका नाही.
      या ज्ञानाचे ज्ञानदान करणाऱ्या संस्था नालंदा, तक्षशिला या विद्यापीठाच्या रूपात स्थापन झाल्या. त्याठिकाणी अनेक गुरू ज्ञानदान करत. अनेक आश्रमातूनही हे कार्य सुरू होते. ज्ञानदानासह नव्या ज्ञानाची निर्मिती करणारे संशोधनही सुरू होते. मात्र शांततामय जीवन पध्दतीचा मोठ्‌या प्रमाणात स्विकार करणाऱ्या तत्कालीन परिस्थितीत शस्त्रास्त्रावर संशोधन झाल्याचे दाखले अपवादानेच आढळतात. संशोधन, ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानदान करत सहजीवन समजून जगणाऱ्या राष्ट्रामध्ये सर्व क्षेत्रातील प्रगतीने अमाप संपत्तीची निर्मिती होत होती. शांततामय सहजिवन हे प्रमुख सुत्र असल्याने खर्च मर्यादित होता. युद्ध हा खर्चाचा मार्ग मर्यादित असल्याने ही भूमी संपन्न झाली होती. ही संपत्ती लुटण्यासाठी या राष्ट्रावर अनेकदा परकिय आक्रमणे झाली. त्यांनी या राष्ट्रातील संपत्तीची लूट केली. हे करत असताना येथील गुरूकुले, विद्यापीठे आणि ज्ञानकेंद्रांचे मोठ‌्या प्रमाणात नुकसान केले. ग्रंथालये जाळली गेली. यामुळे भारतातील संशोधनाची परंपरा मोठ‌्या प्रमाणात खंडीत झाली. ती ब्रिटीश राज्यकर्त्यानी १८५७ मध्ये भारतात विद्यापीठे स्थापन करून मोडली.
      सन १८५७ मध्ये मुंबई, कलकत्ता आणि मद्रास येथे तीन विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. मुलतः भारतात शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यामागे ब्रिटीश शासनास प्रशासकिय सहाय्य करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांची निर्मिती हा उद्देश होता. त्यामुळे या विद्यापीठीय व्यवस्थेतही विज्ञान शिक्षणाचा समावेश नव्हता. उलट मुबलक कच्चा माल उपलब्ध असणाऱ्या भूमित विज्ञान शिक्षण दिल्यास येथेच अनेक उद्योगधंदे निर्माण होतील. आपल्या औद्योगिक उत्पादनास उठाव मिळणार नाही हे ब्रिटीशानी ओळखले होते. भारतीयांना शिक्षणापासून आणि संशोधनापासून पूर्णपणे दूर ठेवण्यासाठी ब्रिटीश प्रशासन प्रयत्नशील होते. एकिकडे देश स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढत असताना दुसरीकडे प्रफुल्लचंद्र राॅ, आशुतोष मुखर्जी अशा मंडळींनी विज्ञान शिक्षण आणि संशोधनाचे महत्व ओळखले होते.
      त्यानी इंडियन असोसिएशन फाॅर कल्टिवेशन फ सायन्स, कलकत्ता सारख्या संस्थांची स्थापना केली. कलकत्ता विद्यापीठ आणि अन्य विद्यापीठात विज्ञान विषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात पुढाकार घेतला. अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर मात्र प्रमुल्लचंद्र राय आणि जगदिशचंद्र बोस यांच्यापासून प्रेरणा घेत भारतात वैज्ञानिकांची फळी निर्माण झाली. यामध्ये प्रमुल्लचंद्र राय यांनी तर बेंगाल केमिकल्ससारख्या उद्योगाची निर्मिती करून ब्रिटीशांची भिती किती रास्त होती हे सिध्द केले. या उद्योगानेच दुसऱ्या महायुध्दात ब्रिटीशांना मोठ‌्या प्रमाणात औषधे पुरवली. मात्र विज्ञान संशोधनाची पेटलेली ज्योत तेवत राहीली. या दोन शिक्षकांच्या प्रेरणेतून पुढे सत्येंद्रनाथ बोस, मेघनाद सहा, प्रशांतचंद्र महालनोबीस, शिशिरकुमार मित्रा आदि वैज्ञानिक घडले. ब्रिटीश सरकारने सुरूवातीला मोठ्या प्रमाणात दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. वेतन आणि सवलतीत भेदभाव करून नाउमेद करण्याचा प्रयत्न केला. मात्र जगदिशचंद्र बोस यांनी सुरूवातीलाच मोठा विरोध केला आणि ही दडपशाही थांबवली. कलकत्तावासीयांच्या या विज्ञान संशोधन प्रयत्नात सी.व्ही. रमण वित्त खात्यातील मानाची नोकरी सोडून सहभागी झाले. त्यांच्या संशोधनातून पुढे २८ फेब्रुवारी, १९२८ रोजी त्यांनी रमण परिणाम जाहीर केला. या शोधाला मिळालेले नोबेल पारितोषिक हे भारताचे पहिले आणि विज्ञानातील एकमेव नोबेल पारितोषिक आहे. असे असले तरी भारतीय संशोधकानी त्याकाळात विज्ञानाच्या प्रांतात खुप मोठे योगदान दिले आहे.
      त्या काळातील बहुतांश संशोधक हे मुलभूत संशोधन करत होते. कलकत्ता विज्ञान संशोधनाचे जरी केंद्र बनले होते तरी भारताच्या इतर प्रांतातही ही विज्ञान संशोधनाची चळवळ मूर्त रूप धारण करू लागली. त्यातून बिरबल साहनी, विक्रम साराभाई, होमी जहांगीर भाभा, डी.एस.कोठारी, राजा रामण्णा असे वैज्ञानिक घडले. त्यातील कांहीजण मूलभूत आणि उपयोजित दोन्ही स्तरावरील संशोधन करत होते. मात्र जनसामान्यांमध्ये प्रामुख्याने उपयोजित संशोधन करणारे वैज्ञानिक लक्षात राहिले. असे होण्याचे कारण म्हणजे मुलभुत आणि उपयोजित संशोधनाच्या वेगवेगळ‌्या पध्दती, हे संशोधन करण्यामागील कारणे हे आहे.
      मुलभूत संशोधन म्हणजेच बेसिक रिसर्चचा मूळ उद्देश हा ज्ञानवृध्दी हा असतो. त्याचा तत्काळ सर्वसामान्यांच्या जीवनावर, सोयी सुविधावर परिणाम होणार असतोच असे नाही. महत्वाचे म्हणजे मुलभूत संशोधन हे संशोधकाला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी असते. काय, केंव्हा आणि कसे हे ते महत्वाचे प्रश्न असतात. यामधून एखादी मुलभूत घटना किंवा प्रक्रिया यामागील गूढ समजून घेण्यासाठी संशोधक कार्य करत असतो. या संशोधनामुळे पुढे या ज्ञानाचा उपयोग समाज जीवन सुखकर होण्यासाठी होणारच असतो असे नाही. अनेक वर्षांनंतर अशा काही संशोधनाचे रूपांतर तंत्रज्ञानात होवून मानवी जीवन सुखकर होते. मात्र सर्वचं मुलभूत संशोधनातून निर्माण झालेल्या ज्ञानाच्याबाबतअसे होते असे नाही. असे मुलभूत संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांचा त्यांच्या संशोधनामागे व्यावसायिक हेतू नसतो. मुलभूत संशोधनातून त्याना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळते. असे उत्तर मिळवणे हाच हेतू असतो. एखाद्या घटनेचा अर्थ समजून घेणे हा मुळ हेतू असल्याने उत्तर मिळाल्यानंतर अशा विषयावरील संशोधन थांबते.
      याउलट उपयोजित संशोधनाचे आहे. उपयोजित संशोधनामागे मुलतः आपले दैनंदिन प्रश्न सोडवून आपले जीवन सुखकर कसे होईल हा मुख्य उद्देश प्राधान्याने असतो. त्यामध्ये नफा मिळवणे, कष्ट कमी करणे हे हेतू असतात. उपयोजित संशोधनाचे मानवी जीवनावर तत्काळ परिणाम दिसून येता. उपयोजित संशोधन हे विशिष्ट प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी होत असते. या संशोधनाचा फायदा थेट जनसामान्यांना होत असल्याने ते लवकर प्रसिध्द पावते. संशोधकाला भरपूर पैसाही मिळवून देते. मात्र त्यापेक्षा चांगले उत्पादन तयार झाले की असे संशोधन विस्मृतीत जाते. तरीही लोकांना हेच संशोधन व्हावे आणि पटकन आपल्या अडचणी सुटाव्यात असे वाटत असते. या संशोधनाचा सर्वसामान्यावर किती पगडा असतो हे न्यूटनच्या गतीविषयक व गुरूत्वाकर्षण संबंधात सादर केलेल्या प्रकल्पाच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.
      न्यूटन यांना बागेतील सफरचंदाच्या झाडावरून फळ जमिनीकडेच पडते हे दिसले. तुटणाऱ्या फळाला जमिनीकडे घेवून येणारी अदृष्य शक्ती आहे आणि ती कशी कार्य करते? हे शोधण्यासाठी त्यानी आपणास अर्थसहाय्य मिळावे. म्हणून राजदरबारी प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावाची संकल्पना सफरचंदाच्या झाडाचे कोणतेही फळ तुटले तर ते खालीच पडते हे पाहून आपणास सुचल्याचे लिहिले होते. प्रस्तावातील सफरचंद, सफरचंदाचे झाड इत्यादी प्रस्तावातील शब्द पाहून प्रस्तावास मान्यता देणाऱ्या समिती सदस्यांचा असा समज झाला की हा संशोधन प्रकल्प सफरचंदाचे उत्पादन वाढविण्यासाठी न्यूटन महाशय संशोधन करणार आहेत. त्यामुळे या अर्थसहाय्यामुळे सफरचंदाचे उत्पादन मोठ‌्या प्रमाणात वाढणार आहे असा समितीचा ग्रह झाला. समितीने ते न्युटनना तात्काळ अर्थसहाय्य मंजूर केले. न्यूटनना दिलेल्या पत्रातही तसे नमूद केले. न्यूटननी मात्र पाठवलेल्या प्रस्तावानुसार गती विषयक नियमांचा अभ्यास करण्यासाठी मंजूर निधी वापरला. संशोधन केले आणि गती विषयक नियम, गुरूत्वाकर्षण याबाबतच्या ज्ञानात भर पडली. त्याचा अहवालही सादर केला. तो पाहिल्यावर समितीच्या लक्षात आले की सफरचंदाचे उत्पादन वाढवण्यासाठी मुळात प्रस्तावच नव्हता.
      तात्पर्य काय तर सामान्य जनाना मुलभूत संशोधनातून होणाऱ्या ज्ञानवृध्दीमध्ये रस नसतो. ते संशोधन म्हणजे तातडीने फायदा देणारी बाब या दृष्टीकोनातून त्याकडे पाहतात आणि त्यामुळे मुलभूत संशोधन करणाऱ्या संशोधकांना म्हणावी तशी प्रसिध्दीही मिळू शकत नाही. अर्थार्जन किंवा आर्थिक लाभ तर दूरच. आईनस्टाईनना नोबेल मिळाले ते उपयोजित संशोधनासाठी. फोटो इलेक्ट्रीक इफेक्टसाठी. त्यांचे जगप्रसिध्द गणिती सूत्र E=mc2 यासाठी किंवा सापेक्षता वादासाठी नाही. त्याचप्रमाणे होमी जहांगीर भाभा आठवतात ते अणूशक्ती कार्यक्रमासाठी अणू प्रकल्प उभारणीसाठी. त्यांनी वैश्विक किरणातील संशोधन केले आहे आणि ते जगप्रसिध्द आहे हे भौतिकशास्त्राच्या अनेक विद्यार्थ्यानाही माहित नसते. संख्याशास्त्राची नवी शाखा निर्माण करणारे संशोधक सत्येंद्रनाथ बोस चर्चेत आले ते देवकण किंवा हिग्ज बोसॉन सापडल्यानंतर. त्याउलट आपल्या प्रक्षेपणास्त्राच्या व अवकाश संशोधन क्षेत्रातील भरारीमुळे विक्रम साराभाई सर्वज्ञात आहेत.
      एकूणच काय मुलभूत संशोधन हे सामान्यापर्यंत पोहोचणे कठिण जाते. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत नसतो. मात्र त्याचे मूल्य हे असाधारण राहाते. कारण या संशोधनातून झालेली निर्मिती ही अक्षय्य असते. बऱ्याच वेळा मुलभूत संशोधनाचा आधार घेत पुढे उपयोजित संशोधन सुरू राहते आणि त्यातून अमुलाग्र बदल घडत असतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर विसाव्या शतकाच्या सुरूवातीला आईनस्टाईन यांनी वस्तूमान आणि उर्जेचा संबंध सांगणारे मुलभूत संशोधन केले. त्यातून E=mc2 हे सूत्र मांडले. त्यातून पुढे अणू विभाजनाची संकल्पना मांडण्यात आली आणि अणूशक्तीचा शोध लागला. अणूशक्ती प्रकल्प बांधण्यात आले आणि पुरेशी वीज उपलब्ध झाली. अणूबाॅंबची निर्मितीही याच सूत्रावर आधारित आहे. भारत या दोन्ही संशोधन प्रकारामध्ये आपले संशोधन करत आहे.
  भारताची संशोधनातील खऱ्या अर्थाने सुरूवात झाली ती स्वातंत्र्यपूर्व काळात. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मोठ‌्या प्रमाणात विज्ञान संशोधन संस्थांची स्थापना झाली. राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, इंडियन इन्स्टिटयूट फ सायन्स, बेंगलोर, टाटा इन्स्टिटयूट फ फंडामेंटल रिसर्च अशा संस्थांना राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांचा दर्जा देण्यात आला. विद्यापीठ अनुदान आयोग, कौन्सिल फाॅर सायंटिफिक अॅंड रिसर्च या संस्थांमार्फत मुलभूत आणि उपयोजित संशोधनासाठी केंद्रिय व राज्य विद्यापीठातील संशोधकाना संशोधनासाठी अर्थ्यासहाय्य देण्यास सुरूवात केली. अपारंपरिक उर्जा मंत्रालय, अणू शक्ती विभाग पर्यावरण मंत्रालय, आयुष मंत्रालय यासारख्या मंत्रालयाकडून व विभागाकडून उपयोजित संशोधनासाठी निधी दिला जातो. विशिष्ट विषयावर संशोधन करणाऱ्या भूशास्त्र, संख्याशास्त्र, गणित, उती संशोधन संस्था, उस संशोधन संस्था, गूळ संशोधन संस्था अशा विशिष्ट विषयातील संस्थांची उभारणी आणि पुनर्बांधणी करण्यात आली. परिणामतः भारतात मोठ‌्या प्रमाणावर विज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू झाले. डिआरडिओ, आय.टी.आय. या संस्था उपयोजित संशोधनात पुढे आल्या. अॅटोमॅटिक एनर्जी कमिशनने अणूशक्ती आणि अण्वस्त्र कार्यक्रमावर मोठ‌्या प्रमाणात संशोधन करून जागतिक पातळीवर आपला ठसा उटवला. इस्त्रोने २०१७ च्या सुरूवातीला सर्वाधिक १०४ उपग्रहांना अवकाशात यशस्वीरित्या सोडून एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. उपयोजित संशोधनातील ही सर्वांना ज्ञात असणारी कांही उदाहरणे आहेत. मात्र अनेक विषयात व क्षेत्रात भारताची घौडदौड अशी सुरू आहे आणि भारत विविध क्षेत्रात पुढे सरकत आहे.
      विज्ञान संशाेधनातच नव्हे तर एकूण संशोधनाच्या क्षेत्रात त्या त्या क्षेत्रातील एखाद्या देशाची कामगीरी मोजण्यासाठी कांही परिमाणे निश्चित करण्यात आली आहेत. एखाद्या देशातून किती संशोधन निबंध प्रसिध्द होतात हे  त्यातील पहिले परिमाण. २००० साली या परिमाणाच्या कसोटीवर अमेरिका अग्रस्थानी होती तर भारत तेराव्या स्थानी होता. मात्र भारताने दहाच वर्षात म्हणजे २०१० साली नवव्या स्थानावर झेप घेतली. मागील वर्षीच्या नोंदीनुसार सर्वाधिक संशोधन निबंध प्रसिध्द करणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत भारताचा क्रमांक हा पाचवा आहे. भारताने इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅन्ड रिसर्च सारख्या संस्थांची निर्मिती करून आणखी एक पाउल पुढे टाकले आहे. इंडियन इन्स्टिटयूट फ स्पेस टेक्नाॅलाॅजी ही संस्था अंतराळ संशोधनातील कुशल मुनष्यबळाच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्वाची ठरत आहे.
      शालेय स्तरावरच विद्यार्थी हेरून त्यांच्यातील संशोधन कलेला वाव देण्यासाठी कॅच देम यंगया उद्देशाने एनस्पायर ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या अनेक हुशार तरूणांना विज्ञान आणि विज्ञान संशोधनात पुढे जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, नॅशनल टॅलेंट सर्च फ सायन्स अशा विविध योजना सुरू झाल्याने अनेक होतकरू तरूण या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. पूर्वीपासून विज्ञान क्षेत्रात करिअरची संधी देणाऱ्या संस्थांमध्ये या नव्या संस्थांची मोठ‌्या संख्येने भर पडली असल्याने तरूणांना या क्षेत्रात कार्य करण्यासाठी सुयोग्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संशोधनाच्या क्षेत्रात कल्पक आणि हुशार विद्यार्थ्याना मोठ्या संधी आहेत. अनेक मानसन्मान त्यांच्यासाठी उपलब्ध झाले आहेत. सी.एन.आर.राव विज्ञान संशोधकास तर भारतरत्न या सर्वौच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या संस्थांच्या बरोबरीने राज्य आणि केंद्रिय विद्यापीठातूनही मोठ‌्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. विद्यार्थी आपल्या आवडीच्या क्षेत्रात संशोधन करू शकतात. मात्र यासाठी विद्यार्थ्यानी त्या संधी शोधून त्यांचा लाभ घेण्याची गरज आहे.
      उपयोजित संशोधकांसाठी यंग इनोव्हेटर्स अॅवार्डसारख्या पारितोषिकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातून अनेक कल्पक तरूण उपयोजित स्वरूपाचे संशोधन करत आहेत. एकूणच भारत मूलभूत आणि उपयोजित स्वरूपाच्या संशोधनामध्ये आपले स्थान बळकट करत आहे. फक्त यामध्ये तरूणांनी सहभागी होण्याची नितांत गरज आहे.
----०---
-

९ टिप्पण्या:

 1. महत्वपुर्ण लेखन, माहिती आणि विश्लेषण,
  धन्यवाद सर

  उत्तर द्याहटवा
 2. विज्ञानावरील सविस्तर आणि संशोधनपूर्ण लेख. खरच उपयोजित संशोधनपेक्षा मूलभूत संशोधन महत्वाचे त्यामुळे पुढे त्या शाखेतील न सोडवलेल्या प्रश्नांना उत्तरे मिळतात आणि त्या शाखेचा विकास होतो. असा अप्रतिम लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद सर.

  उत्तर द्याहटवा
 3. संशोधन हा सर्वच विषयाचा गाभा आहे. आपण लेखामध्ये विज्ञाना बरोबर विशेषतः आयुर्वेद स्पेस सायन्स सह अनेक विषयांना सहज स्पर्श करून लेखाची घनता वाढविली असल्याचे दिसून येते . शिवाय आपले वाचन चौफेर व सखोल असल्याचे जाणीव करून देते . "भारतील युवक मूलभूत आणि उपयोजित स्वरूपाच्या संशोधनामध्ये निश्चितपणे सहभागी होतील त्यामध्ये मौलिक भर घालतील यात कोणतीही शंका असण्याचे कारण नाही. असा मला मोठा आशावाद आहे " आपण आपले लिखाण असेच सुरु ठेवावे त्यास माझ्या शुभेच्छा.
  From-
  A.S. NALAVADE
  DY.REGISTRAR
  Spcial cell,
  ☎ (0231) 2609230 9226076541

  उत्तर द्याहटवा
 4. खूप उपयुक्त लेख आहे , सर तुम्ही यात दिलेली माहिती
  बहुमोलाची आहे.

  उत्तर द्याहटवा