(वाचले तर पाहिजेच, मात्र या वाचनामध्ये
चरित्र वाचन फार महत्त्वाचे. शिवाजी महाराज अलौकिक राजे बनले. मात्र त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटापुढे त्यानी हार न मानता, मात केली म्हणून. आपल्या करिअरशी
संबंधीत व्यक्तींची चरित्रे आपणास प्रेरणा देतात.... यावर्षी "बदलते जग"
या वाचन संस्कृती विषयावरील २०१८च्या दीपावली अंकामध्ये मला चरित्र वाचन या
विषयावर व्यक्त होता आले. "चरित्र त्यांचे पही जरा...." हा लेख
"बदलते जग"च्या सौजन्याने आपल्यासाठी प्रसिद्ध करत आहे. धन्यवाद...
व्ही. एन. शिंदे)
--------------------------------------------------------------------------------------------
'वाचाल तर वाचाल' हे वाक्य आपणास शाळेत वारंवार ऐकावयास मिळते. पुढे आपली वाचनकला हळू हळू वाढत जाते. ती ठरावीक
विद्यार्थ्यामध्ये वृद्धींगत होत जाते आणि अगदी थोड्या लोकामध्ये टिकून राहते.
खरंतर शाळेत गेलेल्या प्रत्येकाने ही कला जोपासली आणि टिकवली पाहिजे. मात्र
वस्तूस्थितीत तसे सुशिक्षीत सर्वंचजण वाचत असतात. पण बहुतांश लोक गरजेपुरते
वाचतात. प्रशासकीय सेवेतील लोक खालच्या कर्मचाऱ्याकडून ठेवल्या जाणाऱ्या नोटस
वाचतात. ग्राहक दुकानांचे बोर्ड वाचतो. प्रवास करताना रस्त्यातील फलक वाचन सुरू
असते. काही ना काही प्रत्येकजण वाचत असतो. मात्र गरजेपूरते, गरजेनुसार. यामध्ये
ठरावीक वर्ग आवर्जून साहित्य वाचणारा असतो. त्यामध्ये कथा, कादबंरी वाचणारा वर्ग
मोठा आहे. नाटकाची पुस्तके वाचणारे त्याहून कमी. कविता वाचणारे बोटावर मोजावेत
असे. सध्या जाणिवपुर्वक चिंतनशील लेखन वाचणारा वर्ग वाढत आहे हे विशेष.
वाचन हे मुलत: ज्ञानप्राप्तीसाठी केले जाते.
वेळ जात नाही, म्हणून कांहीजण वाचन करतात. असे वाचन प्रवासात आवर्जून करणारे
अनेकजन आहेत. वाचनातून आनंद मिळावा, या हेतूनेही वाचन केले जाते. ज्ञान प्राप्तीसाठी
वाचन केले जात असताना जर मनामध्ये आनंदतरंग उठत असतील तर वाचकाला ज्ञानप्राप्ती
सहज होते. वाचताना माणूस जर त्या कथेच्या भावविश्वात शिरला, तर, त्याला येणारी
अनुभूती ही अद्भूत असते. वाचनातून आपणास हवे त्या विषयाचे, प्रांताचे, समुहाचे,
देशाचे, धर्माचे, ज्ञान घेता येते. मात्र त्यासाठी आपले वाचन अष्टावधानी असावे
लागते. तसेचं हे वाचन मनापासूनही असावे लागते. अनेकजन वृत्तपत्र दहा मिनीटात वाचून
संपवतात. कांहीजनांचे चार तास वृत्तपत्र वाचन सुरू असते. बरेचंजन त्यातील फक्त
बातम्या बघतात. काहीना चित्रपट जाहिराती पहातात. काहीना ठरावीक वृत्तपत्रातील
आकड्यात रस असतो. आकडे कसले तेवढे विचारू नका. संपादकीय पानाचा समावेश वृत्तपत्रात
का असतो? हे माहित नसणारे किंवा त्या पानाकडे ढुंकूनही न बघणारे अनेक वृत्तपत्र वाचक
भेटतील.
काय वाचावे? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. जे मिळेल ते
वाचावे, हे त्याचे सोपे उत्तर आहे. मात्र जे वाचले त्यातील सकारात्मक, चांगले
तेवढे जवळ बाळगावे बाकी सर्व सोडोनी द्यावे, हे उत्तम. संत तुकडोजी महाराजानी काय
वाचावे? कशासाठी वाचावे? याचे सुंदर उत्तर दिलेले आहे. "भाविक जनासी लावावया
वळणl आकळावया सकळ ज्ञान ‖" वाचन केले पाहिजे. वाचन हे विविधांगी हवे. बाल वाड:मय ते विज्ञान साहित्य, कथा, कादंबरी, नाटक, कविता, ग्रामीण साहित्य,
इतिहास, ललित, नाटक, वृत्तपत्र सारे काही वाचावे. या वाचनातून प्रत्येकवेळी नवीन
गोष्टीचे ज्ञान आपणास होत असते. पुस्तकांच्या सहवासात एकटेपणा कधी येत नाही. ग्रंथ
हे उत्तम मित्र असतात. ते आपणास अनेक प्रश्नांची उत्तरे देत असतात. ते आपणास
भोवतालच्या वातावरणाचा विसर पाडायला लावतात. ऐतहासिक पुस्तके आपल्याला भूतकाळाची
सफर घडवतात, तर विज्ञानकथा आपल्याला भविष्य काय असेल याचे दर्शन देत असतात. प्रवासवर्णनातून
आपणही नकळत त्या ठिकाणाची सफर करत असतो. कथा, कादंबरी आणि नाटकातून रंजन होते. तर
अनेक कविता, पोवाडे आपल्याला प्रेरणा देतात. चरित्र आणि आत्मचरित्र वाचनातून
जीवनाला दिशा आणि प्रेरणा मिळते. आपल्या समस्येवर काय उपाय आहे, हे ही अनेकदा
समजते. ललित साहित्य एखाद्या विषयाचे विविध पैलू आपल्यासमोर घेऊन येते. आपल्या
जीवनाला पैलू पाडण्याचे काम साहित्य करत असते. भाषेवरील प्रभुत्त्व वाचनातून येते.
बोलणे ओघवते बनते. मोठ्याने वाचल्याने उच्चारात स्पष्टता येते. बोलण्यामध्ये
आत्मविश्वास यायला सुरूवात होते.
साहित्याच्या विविध प्रकारात चरित्र आणि
आत्मचरित्र हा फार महत्त्वाचा आहे. चरित्र लेखनाची मराठीत तशी फार जूनी परंपरा
आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनातील घटना आणि
प्रसंगाची विनयपुर्वक नोंद म्हाइंभट यानी करायला सुरूवात केली. त्यातून
"लीळाचरित्र" हा ग्रंथ तयार झाला. हा ग्रंथ म्हणजे श्री चक्रधर स्वामींचे
चरित्र. हे तसे पहिले चरित्रात्मक पुस्तक. त्यानंतर अनेक लोकानी विविध व्यक्तींची
चरित्रे लिहीली. विद्यार्थ्यासमोर विविध मोठ्या व्यक्तींचे चरित्र यावे या
उद्देशाने महादेवशास्त्री कोल्हटकर (कोलंबस), कृष्णशास्त्री चिपळूणकर (सॉक्रेटीस),
रा. गो. करंदीकर (नाना फडणवीस, बेंजामीन फ्रँकलीन) आदिनी चरित्रलेखन केले.
त्यानंतर मात्र मराठीतून चरित्र आणि आत्मचरित्र लेखन विपूल प्रमाणात सुरू झाले. संत
तुकडोजी महाराजांच्या शब्दात
"महाराष्ट्री संत - कवी परंपराl तैसाची चरित्र ग्रंथाचा पसारा‖ वळणी लावावया पसाराl ग्रंथ लिहिले
बहुतानी‖". परिणामी आज अनेक नामवंत व्यक्तींची चरित्रे
उपलब्ध आहेत. विविध लेखकानी आपल्या शैलीनुसार त्या व्यक्तीचे चरित्र शब्दांकित
केलेले आहे. एकाचं व्य्क्तीचे अनेकानी चरित्रलेखन केले आहे आणि करत आहेत.
चरित्र हे एखाद्या व्यक्तीचे जीवन आणि कार्य
दोन्ही सांगत असते. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीवर अमूक एका व्यक्तीचा प्रभाव होता
किंवा आहे, असे आपण म्हणतो. तेंव्हा त्या प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीच्या कार्याचा
त्यामध्ये फार मोठा वाटा असतो. त्या व्यक्तीनी केलेल्या लेखनातून किंवा
त्यांच्यावर झालेल्या लेखनातून हे त्यांचे कार्य जगासमोर आलेले असते. साम्यवादी विचारसरणीमध्ये
हेगेल यांचा मार्टिन ल्यूथर किंग, कार्ल मार्क्स आणि कार्ल मार्क्स यांचा लेनीनवर मोठा प्रभाव होता.
महात्मा ज्योजीबा फुले यांच्यावर थॉमस पेनी यांचा प्रभाव होता. डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या जीवनावर केळूसकर गुरूजी यानी दिलेल्या बुद्ध चरित्राने फार मोठा
प्रभाव टाकला. अनेक थोरांची चरित्रे ही निश्चितच नव्या पिढीला प्रेरणादायी असतात
यात शंका नाही.
प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी बनायचे असते.
कोणतेच उद्दिष्ट डोळयासमोर न ठेवता जगणारा माणूस विरळाचं. समजा असा कोणी असेल, आहे
त्यात समाधान मानणारा, कोणतेही ध्येय नसणारा तरी अशा माणसाच्या जीवनात बदल
घडवण्याचे सामर्थ्य या चरित्रामध्ये असते. आपले दैनंदिन जीवन जगत असताना अनेक चढउताराचे
प्रसंग येत असतात. अनेकदा अशी परिस्थिती येते की, आपण एकदम निराश होतो. अशा वेळी
आपल्याकडे असणाऱ्या कलेत, आवडीच्या छंदात आपण मनाला थोडा वेळ गुंतवले तर मनावरील
मळभ दूर होते. नैराश्य क्षणात दूर करण्याची ताकत त्यामध्ये असते. आपल्याला गाणी
ऐकल्यानंतर प्रसन्न वाटत असेल तर, त्यातून आपण आनंद मिळवू शकतो. एखादी परीक्षा
आपणास कठीण जाऊ शकते. व्यवसायात कठिण प्रसंग येतात. नोकरीमध्ये विविध प्रसंगाना
सामोरे जावे लागते. अशा वेळी आपण थोरांचे चरित्र अभ्यासले, आठवले तरी फार मोठा बदल
घडू शकतो. राजाराम महाराज एकदा किल्ल्याला दिलेल्या वेढ्यात अडकले असताना त्यानी
छत्रपती शिवाजी महाराज अशाप्रसंगी काय करत याची विचारणा केली होती.
जीवन जगताना ऊर्जा टिकवून ठेवायची असेल तर,
चांगल्या पुस्तकांचे वाचन करायला पाहिजे. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण
ज्या क्षेत्रात आहोत किंवा ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या क्षेत्रामध्ये
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे वाचली पाहिजेत.
या चरित्र वाचनातून त्या त्या क्षेत्रांतील व्यक्तींना कोणत्या हालअपेष्टांतून जावे
लागले, ते समजते. नामवंत संशोधक फॅराडे हा जन्मत:चं वैज्ञानिक नव्हता. वयाच्या
तेराव्या वर्षी तो पुस्तक बांधणीच्या कारखान्यात पुस्तक बांधणीचे काम करणारा
कामगार होता. त्याने सहावीत शाळा सोडली होती. तरीही तो संशोधक बनला. आईनस्टाईनही सुरूवातीला पेटंट ऑफिसमध्ये काम करीत
होता. वॉल्ट डिस्नेची कंपनीही बुडाली होती. तरीही तो यशस्वी बनला. चरित्र वाचनाने
ही यशस्वी व्यक्तीमत्त्वे त्यांच्या आयुष्यात किती मोठ्या संकटाना, कशी धैर्याने सामोरी
गेली, ते लक्षात येते आणि मग आपले संकट, आपल्यासमोरील अडचण छोटी वाटू लागते; नैराश्य दूर होते.
एक घटना आठवली. संध्याकाळी कार्यालयीन
वेळेनंतर मी माझे काम संपवत असताना एक वयस्कर महिला एका विद्यार्थ्याबरोबर आली.
त्या महिलेने सांगीतले की "हा माझा मुलगा. विद्यापीठात शिकतोय. मागच्या वर्षी
त्याचे वडील वारले आणि आता हा शिकायचं नाही म्हणतोय. हाच माझ्या जगण्याचा आधार
हाय. त्यानं दोनदा जीव द्यायचा पण प्रयत्न केला. आता असाचं वेड्यासारखा करतोय.
यानं जर जीवाचं काही बरंवाईट करून घेतलं तर मी जगू कोणासाठी?". मी त्या महिलेला
बसायला सांगीतले. त्या मुलाशी बोलायला सुरूवात केली. बी.एस्सी.पर्यंत त्या मुलाचे
गुण चांगले होते. मला त्या मुलाशी संवाद आवश्यक वाटला. त्याच्या आईला बाहेर
थांबायला सांगून त्या मुलाशी मी संवाद वाढवला. त्या मुलाचे म्हणणे असे होते की 'त्याला खुप मोठे व्हायचे
होते, पण वडील गेल्याने आता सारं काही संपलय. मी आता मोठा होऊच शकत नाही. मग जगून काय
करायचं?'
मी त्या मुलाशी अर्धा तास बोलत होतो. त्यावेळी मी वॉल्ट डिस्नेचे चरित्र वाचले
होते. मी वॉल्ट डिस्नेच्या जीवनातील प्रसंग त्या मुलाला सांगीतले. डिस्नेचे वडील त्याला
कसे शिकू देत नव्हते. तो पॉकेटमनीसाठी पेपर टाकायचा. त्याने एक पेपरची लाइन वाढवून
पैसे कसे जमा केले, तो कसा शिकला? धंद्याचे दिवाळे निघाल्यावर तो कोणत्या परिस्थितीत जगला? त्यानंतर त्या मुलाला
चांगला माहित असणारा संशोधक मायकेल फॅराडे याचे जीवन थोडक्यात सांगीतले. संशोधन
सहाय्य्क असणाऱ्या मायकेल फॅराडेना हंफ्रे डेव्हीच्या बायकोने कसे वागवले. फॅराडे
अपमान गिळून संशोधन क्षेत्रात टिकून राहीला म्हणून आपण त्याचे सिद्धांत अभ्यासतो,
हे जाणिवपुर्वक सांगीतले. तसेच तूझी आई तर तूला शिकवायला तयार आहे. तू शिकले
पाहिजे. तू आईच्या स्वप्नांची पुर्तता करण्यासाठी आणि वडिलांचे स्वप्न पुर्ण
करण्यासाठी जास्त जिद्दीने अभ्यास केला पाहिजे. असे बरेचं काही सांगत राहिलो. अर्ध्या तासाच्या
या संभाषणानंतर मुलगा जरा प्रफुल्लित दिसू लागला. त्याने शब्द दिला की तो
आत्महत्येचा विचार करणार नाही. तो अभ्यास करेल आणि काहीतरी बनेल. त्यानंतर त्याच्या
आईला आत बोलावले. आईसमोर त्याने हसत हसत शिकायचे मान्य केले. पुढे काळाच्या ओघात,
दैनंदिन कामात मी हा प्रसंग विसरलो. तीन वर्षानंतर तो मुलगा अचानक पेढ्याचा बॉक्स
घेऊन आला. त्यानेचं हा प्रसंग सांगीतला. त्या दिवसानंतर त्याने मन लावून अभ्यास
केला. मी ज्यांची माहिती थोडक्यात सांगीतली होती, त्यांची चरित्रे वाचली. पदव्यूत्तर
शिक्षण पुर्ण केले. पुढे नेट आणि सेट दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. आता त्याची
एका महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून निवड झाली होती. त्या आनंदात तो पेढे
घेऊन आला होता. तो या सर्व बदलाचे श्रेय मला देत होता. मला मात्र हे श्रेय अनेक
संकटावर मात करून आयुष्यात यशस्वी होणाऱ्या त्या महान विभूतींच्या चरित्राचे वाटत
होते. एक जीवन वाचवण्याचे आणि घडवण्याचे सामर्थ्य त्या चरित्रात असल्याची साक्ष
मला त्या दिवशी मिळाली.
अनेकदा आपली एक अडचण असते, ती म्हणजे आपण
यशस्वी व्यक्तींना मोठेपणाचे लेबल चिकटवतो.
त्याना मोठेपण दिले की, नंतर आपण मोठे नसल्याचा वृथा साक्षात्कार आपणास
होतो. आपण त्यांच्याप्रमाणे मोठे नाही, आपण काही करू शकणार नाही असे वाटते. निराशेचे
ढग मनाला घेरतात. आपण निराश होतो. त्यामूळे चरित्र वाचताना आपण प्रथम ज्यांचे
चरित्र वाचतो ती व्यक्तीही सर्वसामान्याप्रमाणे जन्मली होती, हे लक्षात घेऊन ते
वाचले पाहिजे. याबाबतीत सर्वाना माहित असलेले उदाहरण पाहू या. छत्रपती शिवाजी
महाराज, ज्यांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांना आपण मोठे म्हणतो आणि विषय सोडून
देतो. मात्र त्यांना हे मोठेपण मिळवताना कोणत्या मानसिक आंदोलनांना, संघर्षमय
परिस्थितीला सामोरे जावे लागले असेल, याचा विचार करत नाही. चरित्रवाचन त्या दृष्टीने
विचार करायला शिकवते. छत्रपतींचा जन्म झाला, त्यावेळी त्यांचे पिता शहाजीराजे
त्यांच्यापासून शेकडो मैल दूर आदिलशहाकडे सरदार म्हणून काम करत होते. महाराजांना स्वराज्य
उभा करताना बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरेसारख्या अनेक सुहृदांना
गमवावे लागले. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आणि लाडक्या पत्नीचा मृत्यू झाला. अफजल
खानाची स्वारी, शायीस्तेखानाचा लाल किल्ल्याला वेढा ही स्वराज्यावरील फार मोठी
संकटे होती. स्वराज्य निर्माण होत असताना मोगलांशी तह करावा लागला. मिर्झाराजेंसोबतच्या
तहाची पुर्तता म्हणून महाराज संभाजीराजासमवेत आग्र्याला गेले. तेथून मोठ्या शिताफीने
सुटका करून घेतली. पण परतताना लाडक्या शंभू बाळाला मथूरेसारख्या अनोळखी प्रदेशात
सोडून परतावे लागले. त्यावेळी पिता म्हणून त्याना झालेल्या यातना आपणास कळत नाहीत.
राज्याभिषेक झाल्यानंतर अगदी थोड्याच दिवसांत महाराजांच्या जीवनाच्या शिल्पकार माँसाहेब
जिजाऊंचे निधन झाले. पुढे संभाजी राजाबरोबर दक्षिण स्वारीची तयारी केली आणि त्यांना
वगळून स्वारी पूर्ण करावी लागली. हे आणि असे बरेच प्रसंग पाहताना, त्या प्रसंगाना
धीरोदात्तपणे सामोरे गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाकडे पाहिले की,
आपल्या आयुष्यातील अडचणी, संकटे त्यापुढे कितीतरी छोटी वाटायला लागतात. आपण किती
क्षुल्लक गोष्टींना अनाठायी महत्त्व देतो, हे जाणवायला लागते. अशा अनेक प्रसंगाना
सामोरे जात, त्यावर मात करत, अशी मोठी व्यक्तीमत्त्वे घडलेली असतात. त्यांचे
चरित्र समजून घेणे म्हणजे ऊर्जेचे कुंभ प्राशन करण्यासारखे असते. अशा थोर
व्यक्तींच्या चरित्रातून आपल्याला कायम प्रेरणा मिळते. म्हणूनचं चरित्रे वाचली
पाहिजेत. कुसुमाग्रजांनी तर म्हणूनच ठेवले आहे की, 'इतिहासाचे पान उलटूनी चरित्र
त्यांचे पाहा जरा, त्यांच्यासम आपण व्हावे हाच सापडे बोध खरा!'