Biography लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Biography लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४

प्रत्येक मुलीने वाचावेसे…! Finding My Core

 

‘माझ्या अंतरंगाचा शोध’ असे सुंदर नाव देता आले असतानाही ‘Finding My Core’  अशा इंग्रजी नावाचे, इंग्रजी लिपीतच छापलेले विनया गोरे यांचे पुस्तक डॉ. काशीद सरांसोबत आलेल्या वर्षा नाडगोंडे मॅडम यांनी भेट दिले. पुस्तक पाहिल्यानंतर ते मी वाचेन का? असा माझाच मला प्रश्न पडला होता. मोठ्या आकारात, सर्वत्र रंगीत छपाई असलेले पुस्तक, मोठा खर्च करून छापलेले आहे, हे पाहताक्षणी लक्षात येत होते. अशा प्रकारे खूप खर्च करून छापलेल्या अनेक पुस्तकात आत्मप्रौढीचाच भाग जास्त असतो. मुद्रण कला सोपी आणि स्वस्त झाल्यापासून असे अनेक ग्रंथ प्रसिद्ध होतात. ते आत्मप्रौढीपर आणि खास करून लोकांना भेट देण्यासाठी असतात, अशी आता धारणा होत चालली आहे. त्याच परंपरेतील हेही पुस्तक असावे, असे समजून मी ते पुस्तक बाजूला ठेवणार होतो. ते पाहिल्या-पाहिल्या हीच भावना झाली होती, हे प्रामाणिकपणे मान्य करायलाच हवे. तरीही कोणतेही पुस्तक बाजूला ठेवताना, ते थोडेसे चाळायची, आणि त्यात काही सापडते का पहायची सवय आहे. हे पुस्तकही तसेच चाळताना पुस्तकाची प्रस्तावना तारा भवाळकर मॅडमनी लिहिल्याचे दिसले. आता त्या प्रसन्न झाल्या आणि त्यांची प्रस्तावना या पुस्तकाला मिळाली म्हणजे निश्चित काहीतरी वेगळे असणार, म्हणून वाचायला सुरुवात केली... आणि कधी पन्नास पाने संपली, ते समजलेही नाही. पुढे पुस्तक वाचून संपवावे, असा निर्धार केला. तर पुस्तक कोठे ठेवले, तेच सापडत नव्हते. बाकीच्या कामात थोडेसे दुर्लक्षही झाले, पण पुस्तक वाचून पूर्ण करायचे आहे, हे मनात निश्चित होते. शेवटी पुस्तक सापडले आणि अधाशासारखे वाचून संपवले. एक सुंदर चरित्र ग्रंथ लिहिल्याबद्दल लेखिका विनया गोरे आणि तो माझ्यापर्यंत पोहाचवल्याबद्दल वर्षा नाडगोंडे मॅडम आणि काशिद सरांना मन:पूर्वक धन्यवाद!      

पुस्तक वाचताना या पुस्तकावर आपण लिहायला हवे, असे वाटू लागले. त्याला अनेक कारणे आहेत. मात्र त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे विनया यांच्या नावात विनय असला तरी सर्व प्रसंग त्या विनयाने घेत नाहीत. त्या आपल्या अंतर्मनाचा कौल घेऊन पुढे जात राहतात. जीवनात जे काही बरेवाईट घडते, घडले – त्यात गुंतून न राहता कायम नवे काय करता येईल, आपण काय चांगले करू शकतो, याचा शोध घेण्याची त्यांची सवय. कोणतेही नवे तंत्रज्ञान, नव्या ज्ञानाचे दार दिसले आणि आपण ते शिकू शकतो, हे लक्षात आले की ते शिकण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याची त्यांची वृत्ती... संसार मोडण्याची वेळ आल्यावरही तो प्रसंग इतक्या संयमाने घेऊन आकाशाला गवसणी घालण्याची ठेवलेली तयारी आणि मिळवलेले यश हे प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीने वाचायला हवे, असा विचार मनात आला आणि त्यासाठीच या पुस्तकाबद्दल लिहायलाच हवे, असे वाटले.

पुस्तकाच्या नावाखाली दिलेले लेखिकेचे नाव विनया गोरे ते विनया गोर हे पुस्तकाचा विषयप्रवेश करून देते. पहिली पन्नास पाने वाचून होईपर्यंत हे वैशिष्ट्य लक्षात आले होते. पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. तारा भवाळकर यांनी, ‘सामान्यत: स्त्रियांना सासरचा किंवा माहेरचा आधार असल्याशिवाय तरणोपाय नाही, असा समज आहे. या दोन बिन्दुपलीकडे तिसऱ्या बिंदूची निर्मिती करणाऱ्या ज्या अपवादात्मक स्त्रिया आहेत त्यापैकी विनया एक! या तिसऱ्या बिंदूचा शोध मलाही तिच्या विनया गोरे ते विनया गोर च्या वाचनातून लागला’, असे लिहिले आहे. तिसऱ्या बिंदूच्या शोधात’ हे पुस्तक लिहिणाऱ्या ताईंचे हे म्हणने हा त्यांचा मोठेपणा असला तरी पुस्तक वाचताना, ते अगदी खरे असल्याचे जागोजागी जाणवत राहते. लेखिका बालपणी भवाळकर मॅडमच्या शेजारी राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे बालपण त्यांनी पाहिले आहे आणि त्यामुळेच प्रस्तावना आणखी सुंदर झाली आहे. ती निव्वळ पुस्तक वाचनातून आलेली नाही, तर अंतर्मनातून उतरली आहे. पुस्तकाचे मराठी बारसे त्या ‘माझ्या अंत:सत्वाचा शोध’ असे करतात.

लेखिकेच्या जीवनपटाची साधारण तीन भागात विभागणी होते. पहिला भाग बालपणापासून लग्नापर्यंतचा येतो. पुढचा भाग जर्मनीत सुरू होतो तो अमेरिकेतून पतीने परतण्याचा निर्णय घेणे आणि विभक्त होण्याचा निर्णय होईपर्यंतचा भाग आहे. तिसरा भाग हा विभक्त झाल्यानंतर विनया गोरे यांच्या विनया गोरमध्ये रूपांतरित होण्याचा आहे. लेखिकेने हे पुस्तक नातेवाईकांच्या आग्रहास्तव लिहिले आहे. लिहिले आहे, हे महत्त्वाचे कारण साधारण सत्तर पंचाहत्तर वर्षांपूर्वी एका शिक्षक दांपत्याच्या घरी जन्मलेली मुलगी. मुलीवर अनंत बंधने आजही घातली जात असताना, ज्या पद्धतीने स्वत:ला पैलू पाडत जाते, ते वाचनीय आणि प्रेरणादायी आहे. त्याकाळात काळाच्या पुढे जाऊन मुलींना स्वतंत्र विचार करण्याचे आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणारे मातापिता लाभले, हे त्यांचे भाग्य. याची जाणिव ठेवत लेखिकेने पुस्तक आई-वडिलांना अर्पण केले आहे.

शिक्षण क्षेत्रात कार्यरत मातापित्यांच्या संस्कारातून वाचनाची बालपणीच सवय लागली. वाचनातून वक्तृत्व आणि व्यक्तीमत्त्व खुलत गेले. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात एक लक्षात राहावे, अशी शैक्षणिक कारकिर्द लाभलेली ही विद्यार्थीनी. अनेक स्पर्धात यश मिळवणारी. ज्या काळात मुलीने सायकल चालवलेले दिसणे, अवघड त्या काळात सांगलीमध्ये स्कूटर चालवते. विज्ञान शाखेला प्रवेश घेते. पुढे वालचंद अभियांत्र‍िकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेते. अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू असतानाच विवाहाचा प्रस्ताव येतो. सुरुवातीला तिलाही शिक्षण पूर्ण करायचे असते. मनात विरोध असूनही सर्वांच्या इच्छेला मान देवून ही स्वतंत्र विचाराची मुलगी लग्नाला होकार देते. मुलगा जर्मनीत नोकरी करणारा असूनही अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून संसार करण्याच्या प्रयत्न करते. १९७२ मध्ये झालेले लग्न. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडून वयाच्या विसाव्या वर्षी ही मुलगी जर्मनीला जाते. तेथे गेल्यानंतर काही दिवसातच पतीदेव स्वत:चे निर्णय स्वत: घेत नाहीत हे तिच्या लक्षात येते. त्यानंतर नवऱ्याने अमेरिकेत जाऊन एम.एस. पूर्ण करावे, असा निर्णय दोघे घेतात. नवरा अमेरिकेला गेल्यानंतर ही वीस-एकविस वर्षांची मुलगी जर्मनीत एकटी राहते. नव्या तंत्रज्ञानाचे शिक्षण घेत स्वत:च्या तिकीटाचे पैसे जमा झाल्यावर भारतात परत येते. स्वत:चे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करते. तरीही नवऱ्याचे एम.एस. पूर्ण होत नाही. त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत ती मुंबईतच नोकरी करत सासरी राहते. स्वतंत्र विचार करण्याचे संस्कार देणाऱ्या मातापित्यासोबत वाढलेल्या या मुलीला ज्येष्ठांचे निर्णय गुपचूप पाळायचे संस्कार असणाऱ्या घरात गुदमरायला लागते. मात्र एक तडजोड म्हणून ती सहन करते. पुढे नवऱ्याचे एम.एस. पूर्ण व्हायच्या वेळेस ती अमेरिकेला जाते. अमेरिकेला जाण्यासाठी नातेवाईकांकडून पैसे उसणे आणि व्याजाने घ्यावे लागतात.

ती अमेरिकेला जाते. स्वत:ही एम.एस.चे शिक्षण घेण्याचा निर्णय घेते. तिला फेलोशिप मिळवून देण्याचे अभिवचन तेथील शिक्षक रोमर देतात. त्याचवेळी नवरा कोणतीही चर्चा न करता भारतात परतण्याचा निर्णय घेतो. डॉ. रोमर यांनी लेखिकेला फेलोशिप मिळवून देण्याचे ठरवले असताना एम.एस. पूर्ण न करणे तिच्या मनाला पटत नाही. नवराही त्याला होकार भरतो आणि ती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात परतण्याचा निर्णय घेऊन एकटीच अमेरिकेत राहते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघांनी निर्णय घेणे अपेक्षित असताना नवऱ्याचा त्याबाबतचा अनुत्साह पाहून ही मुलगी एटी अँड टी बेलमध्ये नोकरी स्वीकारते. अखेर दोघे लग्नापासून केवळ आठ वर्षांत विभक्त होतात. जर्मनीतील दीड-दोन वर्षांचा कालखंडच ते एकत्र राहतात. तोच काय तो संसाराचा कालखंड.

तेथून पुढे विनया गोरे यांचा विनया गोर होण्यासाठीचा प्रवास सुरू होतो. व्यावसायिक विश्वात पन्नास वर्षांपूर्वी भारतातून अमेरिकेत गेलेल्या एका मुलीने आपले स्वत:चे स्थान निर्माण करणे, हे असाध्य, ही मुलगी साध्य करते. व्यावसायिक चढउताराचा फटका बसून मध्येच नोकरी जाणे, त्यानंतर नव्या कंपनीमध्ये नोकरी मिळवणे, खालच्या पदावरून पुन्हा पुर्ववैभव प्राप्त करणे या सर्व बाबी या पुस्तकात ओघवत्या शैलीत येतात. त्यामुळे वाचकाला कोठेही कंटाळा येत नाही.

पुस्तकामध्ये भरपूर छायाचित्रे आलेली आहेत. पुस्तकाची मांडणी, छपाई आणि एकूणच निर्म‍िती अतिशय सुंदर झाली आहे. पुस्तकातील भाषा मात्र पन्नास वर्षे अमेरिकेत घालवलेल्या व्यक्तीची वाटत नाही. चार-सहा वर्षे परदेशात घालवलेली मंडळी, कशी मराठी भाषेत इंग्रजी शब्दांची भेसळ करून, आपण आता परदेशी संस्कारात वाढलो आहोत, हे सर्वाजनिक जीवनात दाखवण्याचा प्रयत्न करतात, तसे विनया गोरे यांचे झाले नाही, हे मनाला खूपच भावते. गुलाब आणि मोगरा ही दोन्ही फुले भारतीयच. मात्र गुलाबाने पाश्चात्य संस्कार घेऊन तो विदेशी वाटायला लागला आहे. मोगरा मात्र जगाच्या सर्व कोपऱ्यात पोहोचूनही अजून आपले खानदानीपण जपून आहे. गुलाब दिसतो सुंदर, मात्र मोगऱ्याच्या सुगंधापुढे तो फिका पडतो. या पुस्तकाने गुलाबाचे देखणेपण घेताना, मोगऱ्याचा सुगंध जपला आहे, असे म्हणायला हवे.

या पुस्तकातील अनेक प्रसंग बरेच काही शिकवून जातात. त्यातील काही प्रसंगाचा उल्लेख करायलाच हवा. पान क्रमांक १६५/१६६ वरील एका मिटींगचा प्रसंग असाच शिकवण देणारा आहे. विशेषत: मुलगी म्हणून वेगळी वागणूक कदापि खपवून घेऊ नये. त्याचंवेळी आपण बॉस आहोत, याची कोणालाही न दुखावता कशी जाणीव करून द्यावी याचे सुंदर उदाहरण आहे. अर्थात लेखिका किंवा मी सिगार ओढझ्याचे समर्थक नाही, हे लक्षात घेऊन या प्रसंगातील शिकवण समजून घ्यायला हवी.

‘…अशीच एक मिटींग झाली आणि नंतर जेवण. नेहमीप्रमाणे मी एकटीच स्त्री, बाकी सर्व पुरूष होते. डिनरनंतर फ्रेंच पद्धतीनुसार कोनियॅक, ब्रँडी आणि मग आली सिगार बॉक्स. ती टेबलवर पास होता, होता माझ्या डावीकडच्या माणसाकडे आली. त्यानं एक सिगार उचलली आणि मला न विचारताच माझ्या उजवीकडच्या माणसाकडे पास केली, जणू मी अदृश्य होते. मी एकदम स्त‍िमित झाले! विचार आला “I have earned the right to be at this table, earned the right to be asked. I will not let you ignore me.” मी माझ्या उजवीकडच्या माणसाकडून सिगार बॉकस मागितली. सगळेच आता जरा टेंशनमध्ये. माझ्या डावीकडच्या माणसाने आश्चर्याने विचारलं, ‘तुला आवडते सिगार ओढायला?’ मी उत्तर दिलं, ‘माहीत नाही; पण तू मला विचारलं नाहीस, आपलं आपण ठरवलंस आणि मला सोडून पास केलीस.’ त्याच्या मनात विचार आला असणार, ही स्त्री, हिला काय विचारायचं. ……पहिल्यांदाच मी सिगार ओढत होते, जोरात ठसका आला; पण मीच स्वत:ला हसले आणि त्यामुळे वातावरण निवळले. मग मी त्यांना विचारले ‘तुमचा सर्वांचा पहिला अनुभव कसा होता’ आणि बघता बघता आम्ही सगळे मिळून पहिल्या झुरक्याच्या आठवणीने हसायला लागलो. They all understood that I was here to stay and was force to be reckoned with.’  

असाच सुंदर मजकूर पान क्रमांक ११४ वर आहे. लेखिकेने याठिकाणी आज भारतात परवलीचा शब्द बनलेल्या सॉफ्ट स्कील्सबद्दल लिहिले आहे. हा उतारा वाचताना पु.शि. रेगेंची सावित्री कादंबरी, त्यातील लच्छी, तिची आजी आणि मोर आठवला. या ठिकाणी त्या लिहितात, ‘मला लोकांशी वागायचं कौशल्य, सॉफ्ट स्कील्स विकसीत करायची होती. अर्थातच विस्तारीत विचारांचा आणि त्याच्या कम्फर्ट घोनमधून बाहेर पडलेला मेंटोर हवा होता. आजूबाजूचे लोक मी ‘वाचत होते. कोणाची लोकांशी वागायची कौशल्ये मला आवडतात? ‘मला मोर आवडतो’, तर ‘मी मोर कशी होणार’ याचं निरीक्षण करत होते. तेव्हा ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ असा जॉर्ज, प्रोफेशनल मेंटोरच्या रूपात भेटला…..’ पुढे हा जॉर्ज त्यांना खूप छान सहकार्य करतो याचे वर्णन येते. मात्र याठिकाणी आपण ‘मोर व्हायचं आहे’ हे अगोदर ठरवायला हवं. त्यानंतर तुमचा निर्णय पक्का असेल तर पुढे मार्ग सापडतोच. मोर आवडतो आणि तो भेटत नसेल तर आपणच मोर व्हायचं, हा संदेश लेखिकेच्या रक्तात भिनलेला आहे. आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची सवय असते. हा भागही खूपच छान शब्दांकित झालेला आहे.

हे पुस्तक म्हटले तर आत्मचरित्र आहे. मात्र लेखिका जसे जगली, तसे सनावळीनुसार नाही. तिचा जीवनपट जसा चढउतारातून जात राहिला, कधी फुलांचे ताटवे; तर, कधी रखरखते उन पहात पुढे जात राहिला, तसाच मांडला आहे. तो तसा लिहिला असला तरी त्यामुळे वाचनात खंड येत नाही. त्याला साच्यात बांधण्याचा प्रयत्न केलेला नसल्याने हा फुलांचा गुच्छ सुंदर बनला आहे. हे पुस्तक वाचताना धुंद आणि स्वच्छंद जगतानाही जीवनमूल्यांना जपत यशस्वी होण्याचा एक पट उलगडत जातो. वाचक त्यात हरवून जातो. हे पुस्तक केवळ वाचून बाजूला ठेवावे, असे निश्चितच नाही. यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. ते प्रत्येकांने वाचावे आणि शिकावे असे आहे. खास करून महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थीनेने हे पुस्तक वाचायलाच हवे.

पुस्तकाचे नाव – Finding My Core विनया गोरे ते विनया गोर

लेखिका – विनया गोरे

प्रकाशक – विभव प्रकाशन, कोल्हापूर

पृष्ठे – २६२

मूल्ये – रू.५००/-

बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१८

चरित्र त्यांचे पहा जरा...



(वाचले तर पाहिजेच, मात्र या वाचनामध्ये चरित्र वाचन फार महत्त्वाचे. शिवाजी महाराज अलौकिक राजे बनले. मात्र त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटापुढे त्यानी हार न मानता, मात केली म्हणून. आपल्या करिअरशी संबंधीत व्यक्तींची चरित्रे आपणास प्रेरणा देतात.... यावर्षी "बदलते जग" या वाचन संस्कृती विषयावरील २०१८च्या दीपावली अंकामध्ये मला चरित्र वाचन या विषयावर व्यक्त होता आले. "चरित्र त्यांचे पही जरा...." हा लेख "बदलते जग"च्या सौजन्याने आपल्यासाठी प्रसिद्ध करत आहे. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)                                 
--------------------------------------------------------------------------------------------
  
'वाचाल तर वाचाल' हे वाक्य आपणास शाळेत वारंवार ऐकावयास मिळते. पुढे आपली वाचनकला हळू हळू वाढत जाते. ती ठरावीक विद्यार्थ्यामध्ये वृद्धींगत होत जाते आणि अगदी थोड्या लोकामध्ये टिकून राहते. खरंतर शाळेत गेलेल्या प्रत्येकाने ही कला जोपासली आणि टिकवली पाहिजे. मात्र वस्तूस्थितीत तसे सुशिक्षीत सर्वंचजण वाचत असतात. पण बहुतांश लोक गरजेपुरते वाचतात. प्रशासकीय सेवेतील लोक खालच्या कर्मचाऱ्याकडून ठेवल्या जाणाऱ्या नोटस वाचतात. ग्राहक दुकानांचे बोर्ड वाचतो. प्रवास करताना रस्त्यातील फलक वाचन सुरू असते. काही ना काही प्रत्येकजण वाचत असतो. मात्र गरजेपूरते, गरजेनुसार. यामध्ये ठरावीक वर्ग आवर्जून साहित्य वाचणारा असतो. त्यामध्ये कथा, कादबंरी वाचणारा वर्ग मोठा आहे. नाटकाची पुस्तके वाचणारे त्याहून कमी. कविता वाचणारे बोटावर मोजावेत असे. सध्या जाणिवपुर्वक चिंतनशील लेखन वाचणारा वर्ग वाढत आहे हे विशेष.
      वाचन हे मुलत: ज्ञानप्राप्तीसाठी केले जाते. वेळ जात नाही, म्हणून कांहीजण वाचन करतात. असे वाचन प्रवासात आवर्जून करणारे अनेकजन आहेत. वाचनातून आनंद मिळावा, या हेतूनेही वाचन केले जाते. ज्ञान प्राप्तीसाठी वाचन केले जात असताना जर मनामध्ये आनंदतरंग उठत असतील तर वाचकाला ज्ञानप्राप्ती सहज होते. वाचताना माणूस जर त्या कथेच्या भावविश्वात शिरला, तर, त्याला येणारी अनुभूती ही अद्भूत असते. वाचनातून आपणास हवे त्या विषयाचे, प्रांताचे, समुहाचे, देशाचे, धर्माचे, ज्ञान घेता येते. मात्र त्यासाठी आपले वाचन अष्टावधानी असावे लागते. तसेचं हे वाचन मनापासूनही असावे लागते. अनेकजन वृत्तपत्र दहा मिनीटात वाचून संपवतात. कांहीजनांचे चार तास वृत्तपत्र वाचन सुरू असते. बरेचंजन त्यातील फक्त बातम्या बघतात. काहीना चित्रपट जाहिराती पहातात. काहीना ठरावीक वृत्तपत्रातील आकड्यात रस असतो. आकडे कसले तेवढे विचारू नका. संपादकीय पानाचा समावेश वृत्तपत्रात का असतो? हे माहित नसणारे किंवा त्या पानाकडे ढुंकूनही न बघणारे अनेक वृत्तपत्र वाचक भेटतील.
      काय वाचावे? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. जे मिळेल ते वाचावे, हे त्याचे सोपे उत्तर आहे. मात्र जे वाचले त्यातील सकारात्मक, चांगले तेवढे जवळ बाळगावे बाकी सर्व सोडोनी द्यावे, हे उत्तम. संत तुकडोजी महाराजानी काय वाचावे? कशासाठी वाचावे? याचे सुंदर उत्तर दिलेले आहे. "भाविक जनासी लावावया वळणl आकळावया सकळ ज्ञान " वाचन केले पाहिजे. वाचन हे विविधांगी हवे. बाल वाड:मय ते विज्ञान साहित्य,  कथा, कादंबरी, नाटक, कविता, ग्रामीण साहित्य, इतिहास, ललित, नाटक, वृत्तपत्र सारे काही वाचावे. या वाचनातून प्रत्येकवेळी नवीन गोष्टीचे ज्ञान आपणास होत असते. पुस्तकांच्या सहवासात एकटेपणा कधी येत नाही. ग्रंथ हे उत्तम मित्र असतात. ते आपणास अनेक प्रश्नांची उत्तरे देत असतात. ते आपणास भोवतालच्या वातावरणाचा विसर पाडायला लावतात. ऐतहासिक पुस्तके आपल्याला भूतकाळाची सफर घडवतात, तर विज्ञानकथा आपल्याला भविष्य काय असेल याचे दर्शन देत असतात. प्रवासवर्णनातून आपणही नकळत त्या ठिकाणाची सफर करत असतो. कथा, कादंबरी आणि नाटकातून रंजन होते. तर अनेक कविता, पोवाडे आपल्याला प्रेरणा देतात. चरित्र आणि आत्मचरित्र वाचनातून जीवनाला दिशा आणि प्रेरणा मिळते. आपल्या समस्येवर काय उपाय आहे, हे ही अनेकदा समजते. ललित साहित्य एखाद्या विषयाचे विविध पैलू आपल्यासमोर घेऊन येते. आपल्या जीवनाला पैलू पाडण्याचे काम साहित्य करत असते. भाषेवरील प्रभुत्त्व वाचनातून येते. बोलणे ओघवते बनते. मोठ्याने वाचल्याने उच्चारात स्पष्टता येते. बोलण्यामध्ये आत्मविश्वास यायला सुरूवात होते.
      साहित्याच्या विविध प्रकारात चरित्र आणि आत्मचरित्र हा फार महत्त्वाचा आहे. चरित्र लेखनाची मराठीत तशी फार जूनी परंपरा आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनातील घटना आणि प्रसंगाची विनयपुर्वक नोंद म्हाइंभट यानी करायला सुरूवात केली. त्यातून "लीळाचरित्र" हा ग्रंथ तयार झाला. हा ग्रंथ म्हणजे श्री चक्रधर स्वामींचे चरित्र. हे तसे पहिले चरित्रात्मक पुस्तक. त्यानंतर अनेक लोकानी विविध व्यक्तींची चरित्रे लिहीली. विद्यार्थ्यासमोर विविध मोठ्या व्यक्तींचे चरित्र यावे या उद्देशाने महादेवशास्त्री कोल्हटकर (कोलंबस), कृष्णशास्त्री चिपळूणकर (सॉक्रेटीस), रा. गो. करंदीकर (नाना फडणवीस, बेंजामीन फ्रँकलीन) आदिनी चरित्रलेखन केले. त्यानंतर मात्र मराठीतून चरित्र आणि आत्मचरित्र लेखन विपूल प्रमाणात सुरू झाले. संत तुकडोजी महाराजांच्या शब्दात  "महाराष्ट्री संत - कवी परंपराl तैसाची चरित्र ग्रंथाचा पसारा वळणी लावावया पसाराl ग्रंथ लिहिले बहुतानी". परिणामी आज अनेक नामवंत व्यक्तींची चरित्रे उपलब्ध आहेत. विविध लेखकानी आपल्या शैलीनुसार त्या व्यक्तीचे चरित्र शब्दांकित केलेले आहे. एकाचं व्य्क्तीचे अनेकानी चरित्रलेखन केले आहे आणि करत आहेत.
      चरित्र हे एखाद्या व्यक्तीचे जीवन आणि कार्य दोन्ही सांगत असते. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीवर अमूक एका व्यक्तीचा प्रभाव होता किंवा आहे, असे आपण म्हणतो. तेंव्हा त्या प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीच्या कार्याचा त्यामध्ये फार मोठा वाटा असतो. त्या व्यक्तीनी केलेल्या लेखनातून किंवा त्यांच्यावर झालेल्या लेखनातून हे त्यांचे कार्य जगासमोर आलेले असते. साम्यवादी विचारसरणीमध्ये हेगेल यांचा मार्टिन ल्यूथर किंग, कार्ल मार्क्स आणि कार्ल मार्क्स यांचा लेनीनवर मोठा प्रभाव होता. महात्मा ज्योजीबा फुले यांच्यावर थॉमस पेनी यांचा प्रभाव होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर केळूसकर गुरूजी यानी दिलेल्या बुद्ध चरित्राने फार मोठा प्रभाव टाकला. अनेक थोरांची चरित्रे ही निश्चितच नव्या पिढीला प्रेरणादायी असतात यात शंका नाही.
      प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी बनायचे असते. कोणतेच उद्दिष्ट डोळयासमोर न ठेवता जगणारा माणूस विरळाचं. समजा असा कोणी असेल, आहे त्यात समाधान मानणारा, कोणतेही ध्येय नसणारा तरी अशा माणसाच्या जीवनात बदल घडवण्याचे सामर्थ्य या चरित्रामध्ये असते.  आपले दैनंदिन जीवन जगत असताना अनेक चढउताराचे प्रसंग येत असतात. अनेकदा अशी परिस्थिती येते की, आपण एकदम निराश होतो. अशा वेळी आपल्याकडे असणाऱ्या कलेत, आवडीच्या छंदात आपण मनाला थोडा वेळ गुंतवले तर मनावरील मळभ दूर होते. नैराश्य क्षणात दूर करण्याची ताकत त्यामध्ये असते. आपल्याला गाणी ऐकल्यानंतर प्रसन्न वाटत असेल तर, त्यातून आपण आनंद मिळवू शकतो. एखादी परीक्षा आपणास कठीण जाऊ शकते. व्यवसायात कठिण प्रसंग येतात. नोकरीमध्ये विविध प्रसंगाना सामोरे जावे लागते. अशा वेळी आपण थोरांचे चरित्र अभ्यासले, आठवले तरी फार मोठा बदल घडू शकतो. राजाराम महाराज एकदा किल्ल्याला दिलेल्या वेढ्यात अडकले असताना त्यानी छत्रपती शिवाजी महाराज अशाप्रसंगी काय करत याची विचारणा केली होती.   
      जीवन जगताना ऊर्जा टिकवून ठेवायची असेल तर, चांगल्या पुस्तकांचे वाचन करायला पाहिजे. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या क्षेत्रात आहोत किंवा ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या क्षेत्रामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे वाचली पाहिजेत. या चरित्र वाचनातून त्या त्या क्षेत्रांतील व्यक्तींना कोणत्या हालअपेष्टांतून जावे लागले, ते समजते. नामवंत संशोधक फॅराडे हा जन्मत:चं वैज्ञानिक नव्हता. वयाच्या तेराव्या वर्षी तो पुस्तक बांधणीच्या कारखान्यात पुस्तक बांधणीचे काम करणारा कामगार होता. त्याने सहावीत शाळा सोडली होती. तरीही तो संशोधक बनला.  आईनस्टाईनही सुरूवातीला पेटंट ऑफिसमध्ये काम करीत होता. वॉल्ट डिस्नेची कंपनीही बुडाली होती. तरीही तो यशस्वी बनला. चरित्र वाचनाने ही यशस्वी व्यक्तीमत्त्वे त्यांच्या आयुष्यात किती मोठ्या संकटाना, कशी धैर्याने सामोरी गेली, ते लक्षात येते आणि मग आपले संकट, आपल्यासमोरील अडचण छोटी वाटू लागते; नैराश्य दूर होते.
      एक घटना आठवली. संध्याकाळी कार्यालयीन वेळेनंतर मी माझे काम संपवत असताना एक वयस्कर महिला एका विद्यार्थ्याबरोबर आली. त्या महिलेने सांगीतले की "हा माझा मुलगा. विद्यापीठात शिकतोय. मागच्या वर्षी त्याचे वडील वारले आणि आता हा शिकायचं नाही म्हणतोय. हाच माझ्या जगण्याचा आधार हाय. त्यानं दोनदा जीव द्यायचा पण प्रयत्न केला. आता असाचं वेड्यासारखा करतोय. यानं जर जीवाचं काही बरंवाईट करून घेतलं तर मी जगू कोणासाठी?". मी त्या महिलेला बसायला सांगीतले. त्या मुलाशी बोलायला सुरूवात केली. बी.एस्सी.पर्यंत त्या मुलाचे गुण चांगले होते. मला त्या मुलाशी संवाद आवश्यक वाटला. त्याच्या आईला बाहेर थांबायला सांगून त्या मुलाशी मी संवाद वाढवला. त्या मुलाचे म्हणणे असे होते की 'त्याला खुप मोठे व्हायचे होते, पण वडील गेल्याने आता सारं काही संपलय. मी आता मोठा होऊच शकत नाही. मग जगून काय करायचं?'
                मी त्या मुलाशी अर्धा तास बोलत होतो. त्यावेळी मी वॉल्ट डिस्नेचे चरित्र वाचले होते. मी वॉल्ट डिस्नेच्या जीवनातील प्रसंग त्या मुलाला सांगीतले. डिस्नेचे वडील त्याला कसे शिकू देत नव्हते. तो पॉकेटमनीसाठी पेपर टाकायचा. त्याने एक पेपरची लाइन वाढवून पैसे कसे जमा केले, तो कसा शिकला? धंद्याचे दिवाळे निघाल्यावर तो कोणत्या परिस्थितीत जगला? त्यानंतर त्या मुलाला चांगला माहित असणारा संशोधक मायकेल फॅराडे याचे जीवन थोडक्यात सांगीतले. संशोधन सहाय्य्क असणाऱ्या मायकेल फॅराडेना हंफ्रे डेव्हीच्या बायकोने कसे वागवले. फॅराडे अपमान गिळून संशोधन क्षेत्रात टिकून राहीला म्हणून आपण त्याचे सिद्धांत अभ्यासतो, हे जाणिवपुर्वक सांगीतले. तसेच तूझी आई तर तूला शिकवायला तयार आहे. तू शिकले पाहिजे. तू आईच्या स्वप्नांची पुर्तता करण्यासाठी आणि वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी जास्त जिद्दीने अभ्यास केला पाहिजे.  असे बरेचं काही सांगत राहिलो. अर्ध्या तासाच्या या संभाषणानंतर मुलगा जरा प्रफुल्लित दिसू लागला. त्याने शब्द दिला की तो आत्महत्येचा विचार करणार नाही. तो अभ्यास करेल आणि काहीतरी बनेल. त्यानंतर त्याच्या आईला आत बोलावले. आईसमोर त्याने हसत हसत शिकायचे मान्य केले. पुढे काळाच्या ओघात, दैनंदिन कामात मी हा प्रसंग विसरलो. तीन वर्षानंतर तो मुलगा अचानक पेढ्याचा बॉक्स घेऊन आला. त्यानेचं हा प्रसंग सांगीतला. त्या दिवसानंतर त्याने मन लावून अभ्यास केला. मी ज्यांची माहिती थोडक्यात सांगीतली होती, त्यांची चरित्रे वाचली. पदव्यूत्तर शिक्षण पुर्ण केले. पुढे नेट आणि सेट दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. आता त्याची एका महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून निवड झाली होती. त्या आनंदात तो पेढे घेऊन आला होता. तो या सर्व बदलाचे श्रेय मला देत होता. मला मात्र हे श्रेय अनेक संकटावर मात करून आयुष्यात यशस्वी होणाऱ्या त्या महान विभूतींच्या चरित्राचे वाटत होते. एक जीवन वाचवण्याचे आणि घडवण्याचे सामर्थ्य त्या चरित्रात असल्याची साक्ष मला त्या दिवशी मिळाली.
      अनेकदा आपली एक अडचण असते, ती म्हणजे आपण यशस्वी व्यक्तींना मोठेपणाचे लेबल चिकटवतो.  त्याना मोठेपण दिले की, नंतर आपण मोठे नसल्याचा वृथा साक्षात्कार आपणास होतो. आपण त्यांच्याप्रमाणे मोठे नाही, आपण काही करू शकणार नाही असे वाटते. निराशेचे ढग मनाला घेरतात. आपण निराश होतो. त्यामूळे चरित्र वाचताना आपण प्रथम ज्यांचे चरित्र वाचतो ती व्यक्तीही सर्वसामान्याप्रमाणे जन्मली होती, हे लक्षात घेऊन ते वाचले पाहिजे. याबाबतीत सर्वाना माहित असलेले उदाहरण पाहू या. छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांना आपण मोठे म्हणतो आणि विषय सोडून देतो. मात्र त्यांना हे मोठेपण मिळवताना कोणत्या मानसिक आंदोलनांना, संघर्षमय परिस्थितीला सामोरे जावे लागले असेल, याचा विचार करत नाही. चरित्रवाचन त्या दृष्टीने विचार करायला शिकवते. छत्रपतींचा जन्म झाला, त्यावेळी त्यांचे पिता शहाजीराजे त्यांच्यापासून शेकडो मैल दूर आदिलशहाकडे सरदार म्हणून काम करत होते. महाराजांना स्वराज्य उभा करताना बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरेसारख्या अनेक सुहृदांना गमवावे लागले. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आणि लाडक्या पत्नीचा मृत्यू झाला. अफजल खानाची स्वारी, शायीस्तेखानाचा लाल किल्ल्याला वेढा ही स्वराज्यावरील फार मोठी संकटे होती. स्वराज्य निर्माण होत असताना मोगलांशी तह करावा लागला. मिर्झाराजेंसोबतच्या तहाची पुर्तता म्हणून महाराज संभाजीराजासमवेत आग्र्याला गेले. तेथून मोठ्या शिताफीने सुटका करून घेतली. पण परतताना लाडक्या शंभू बाळाला मथूरेसारख्या अनोळखी प्रदेशात सोडून परतावे लागले. त्यावेळी पिता म्हणून त्याना झालेल्या यातना आपणास कळत नाहीत. राज्याभिषेक झाल्यानंतर अगदी थोड्याच दिवसांत महाराजांच्या जीवनाच्या शिल्पकार माँसाहेब जिजाऊंचे निधन झाले. पुढे संभाजी राजाबरोबर दक्षिण स्वारीची तयारी केली आणि त्यांना वगळून स्वारी पूर्ण करावी लागली. हे आणि असे बरेच प्रसंग पाहताना, त्या प्रसंगाना धीरोदात्तपणे सामोरे गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाकडे पाहिले की, आपल्या आयुष्यातील अडचणी, संकटे त्यापुढे कितीतरी छोटी वाटायला लागतात. आपण किती क्षुल्लक गोष्टींना अनाठायी महत्त्व देतो, हे जाणवायला लागते. अशा अनेक प्रसंगाना सामोरे जात, त्यावर मात करत, अशी मोठी व्यक्तीमत्त्वे घडलेली असतात. त्यांचे चरित्र समजून घेणे म्हणजे ऊर्जेचे कुंभ प्राशन करण्यासारखे असते. अशा थोर व्यक्तींच्या चरित्रातून आपल्याला कायम प्रेरणा मिळते. म्हणूनचं चरित्रे वाचली पाहिजेत. कुसुमाग्रजांनी तर म्हणूनच ठेवले आहे की, 'इतिहासाचे पान उलटूनी चरित्र त्यांचे पाहा जरा, त्यांच्यासम आपण व्हावे हाच सापडे बोध खरा!'