शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

खईके पान…!

 


पान म्हटलं की माझ्या नजरेसमोर ‘डॉन’ चित्रपटातील, डोक्याला लाल रंगाचा गमछा पद्धतीचा टॉवेल गुंडाळलेला, जाकीट घालून, ‘भंग का रंग हो चकाचक, फिर लो पान चबाय, अरे ऐसा झटका, लगे जिया पे, पुनरजनम होई जाय…, हो खईके पान बनारसवाला, खुल जाये बंद अकल का ताला’ हे गाणे येते. डॉन चित्रपट, त्यातील अमिताभ-झीनत अमानची जोडी आणि त्यांचे हे गीत आजही तितकेच प्रसिद्ध आहे. हिंदीतील पान आणि मराठीतील पान लिहिण्यापासून अर्थापर्यंत सर्वकाही समान आहे, असे दाखवणारे हे गाणे. मात्र हिंदीत पानाला पत्ता म्हणतात. या गाण्याने लोकांचे खूप मनोरंजन केले, त्याचबरोबर पांढरपेशांमध्येही पानाची ‘क्रेझ’ आणली, हे मात्र खरे! 

अगदी तीस-चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत गावाकडे पान खाणे, हे एखाद्या पार्टीप्रमाणे असायचे. विशेष म्हणजे गावाकडील अनेक आज्याही पान खायच्या. त्यांच्या पानाच्या पिशवीला बटवा तर पुरुषांची चंची असायची. गावातील एक बंडखोर महिला तर पुरूषांमध्ये बसून पान खायची. मुलांना लग्न झाल्यानंतर पान खाण्याचा जणूकाही परवाना दिला जायचा. लहान मुलांना मात्र पानापासून लांब ठेवले जायचे. मोठी माणसे गावातील पारावर, मारूती मंदिराच्या ओसरीत, ठरलेल्या ठिकाणी एकत्र यायची.  प्रत्येकजण आपली-आपली चंची काढायचा. त्यातून पान, सुपारी, कात, चुना, तसेच काही तालेवार मंडळीच्या पिशवीतून तंबाखू, हे सर्व जिन्नस बाहेर काढले जायचे. पानाच्या गठ्ठ्यातून दोन; लहान असतील, तर तीन पाने काढली जात. प्रथम ते पान खालून-वरून धोतर, पायजम्यावर पुसले जात असे. त्यानंतर पानाचे देठ खुडले जात. काही मंडळी खुडलेले देठसुद्धा खास पद्धतीने फेकतात. टोकाकडचा भाग तोडला जाई. त्यावर हलक्या हाताने चुना लावला जात असे. लाडाने वाढवलेल्या बकऱ्याला कापायला नेताना त्याच्या अंगावरून हलकेच फिरवावा तसा. नाहीतरी, त्या बकऱ्याचे मरण जसे आलेले असते, अगदी तसेच पानांचे चर्वण होणार असते. राहून, राहून वाटते, ‘चुना लावणे’ हा वाक्प्रचार प्रथम वापरणाऱ्याने ही चुना लावण्याची नजाकत पाहूनच तो वापरला असावा. त्यानंतर अडकित्त्याने बारीक केलेली सुपारी त्यावर पसरून काताचे तुकडे किंवा पावडर टाकण्यात यायची. एखाद्याला यात लवंग,‍ वेलची किंवा तंबाखू टाकावी लागते. त्याशिवाय त्याला पान खाल्ल्याचा आनंद मिळत नाही. अट्टल पान खाणाऱ्यांच्या भाषेत ‘कीक’ बसत नाही. त्यानंतर त्याचा विडा बनवून तो तोंडात कोंबला जात असे. यातील जो पदार्थ कमी असेल, तो बिनधास्त मागून घेतला जात असे.     अगदी पानासह सर्वकाही. पान खाण्याच्या कार्यक्रमात प्रत्येकजण आपले पान आपणच तयार करत असे. पान खाल्ल्यानंतर तंबाखुयुक्त पान खाणारी मंडळी दोन बोटे ओठावर ठेवून पिचकारी मारत. अनेक शासकीय कार्यालयातील भिंतींची खालची बाजू याच रंगाने रंगलेली असायची. हे लक्षात येऊ नये म्हणून शेवटी शासनानेच तेथे विटकरी रंग मारायला सुरुवात केली असावी.  

खरे तर, पान खाणे आरोग्यासाठी, पचनासाठी चांगले मानले जाते. मात्र दाताची काळजी घेण्याबाबत जागरूकता आली, तसे पान खाणे कमी होत गेले. शहरात मात्र पानपट्टी नावाचा प्रकार आला. तो आजही बहुतांश शहरात आहे. या पानपट्टीने पानाचे अनेक प्रकार आणले. कलकत्ता पान, बनारस पान, देशी पान, मगई पान हे पानाचे मूळ प्रकार. त्यातून पुढे साधे पान, मसाला पान, १२०-३०० पान, फुलचंद पान, पलंगतोड पान, चंदन पान, स्ट्रॉबेरी पान, चॉकलेट पान असे अनेक प्रकार बनवण्याच्या आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांवरून आणले. प्रत्येक मोठ्या शहरात असा एखादा पानपट्टीवाला सुप्रसिद्ध असतो. त्याच्याकडे रांग लावून लोक पान खरेदी करतात. गावाच्या एका टोकाला असलेल्या दुकानातील पान खाण्यासाठी, काही किलोमीटरचा प्रवास करून लोक येतात आणि पानाचा आनंद घेतात.


पान खाण्याची प्रथा नेमकी कधी सुरू झाली, याचा निश्चित काळ माहीत नाही. या पानाची मूळ चव तिखट असते. मात्र या पानात कॅल्शियम, प्रोटिन, खनिजे, कर्बोदके, तंतुमय पदार्थ, जीवनसत्व-क मोठ्या प्रमाणात असतात. भारतात प्राचीन काळात पान खाणे हे राजेशाही लक्षण मानले जात असे. राजे, महाराजे, सरदार, दरबारातील मानकरी, कलाकार सर्वांसोबत पानाची पिशवी असायची. जेवणानंतर आजही अनेकजण पान खातात. विशेषत: कलाकार मंडळी, गायक आवर्जून पान खायचे. अनेक चित्रपटात असे कलाकारांचे पान खाणे, विनोदी पद्धतीने चित्रीत केले गेले आहे. या पानाला चूना लावून त्यामध्ये कात, सुपारी टाकून पान खाण्याची पद्धत, मोगल काळापासून सुरू झाली, असे मानले जाते. त्यापूर्वी पानामध्ये वेलची किंवा बडीशेप टाकून खाण्याची पद्धत होती. मात्र मोगलांनी आणलेली, पानाला आणखी चविष्ट बनवण्यासाठी त्यात कात, सुपारी आणि चूना टाकून खाण्याची पद्धत पुढे कायम राहिली. पान खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, असे मानले जाते. बद्धकोष्ठता, ॲसिडीटी कमी होते. तसेच पोटाचे विकार कमी होतात. पानामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते. हिरड्याची सूज कमी होते. सर्दी झाल्यावर पान मधामध्ये बुडवून खाल्ले जाते. डोके दुखत असल्यास पान खातात. तसेच जखमा लवकर भरून येण्यासाठीही पान खाल्ले जायचे. पानातील सुपारीमुळे अल्सरचा त्रास कमी होतो. पानातील गुणधर्मामुळे पान खाण्याने मधुमेहाचा त्रास कमी होतो. ‘खईके पान बनारसवाला…’ या गाण्यापूर्वीही पान होते. पुढेही राहील. मात्र या गाण्याने बनारसमधील एका वेलीच्या एका भागाला, पानाला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले.

पानाचे धार्म‍िक महत्त्वही आहे. पुजेमध्ये खायचे पान मोठ्या प्रमाणात वापरले जाते. यामागे एक कथा सांगण्यात येते. देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले. त्यामध्ये विष आणि अमृत निघाले. विष भगवान शंकरानी प्राशन केले. त्यातून त्यांना नीळकंठ नाव प्राप्त झाले. अमृत दानवांकडे गेलेच होते. मात्र भगवान विष्णू यांनी मोहिनी रूप धारण केले. अमृत आपल्या ताब्यात घेऊन, सर्व देवांना अमृताचे वाटप केले. त्यानंतर थोडे अमृत शिल्लक राहिले. ते मोहिनी रूपातील विष्णूंनी हत्ती बांधायच्या खुंटीजवळ ठेवून दिले. काही दिवसानंतर खुंटीजवळ एक वेल उगवली. ती सरसर वरती चढली. सर्वत्र पसरली. हिरव्यागार वेलाला पाहून सर्व देवांना आनंद झाला. देवांनी तिला नागवेल असे नाव दिले. भोजनानंतर देवांनी त्या वेलीच्या पानाचा विडा खाण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यानंतर पानाचा विडा आणि दक्ष‍िणा अर्पण करण्याची सुरुवात झाली. आजही कोणत्याही पुजेमध्ये खाऊचे पान शुभ मानले जाते. विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मी वास करते, तर पानाच्या मध्यभागी सरस्वती असते, असे मानले जाते. विड्याच्या पानाला संस्कृतमध्ये ‘तांबुल’ असे म्हणतात.     

पान. पर्ण, दल, पत्र, पत्री, पत्ती, पात, पाते, फळ, पल्लव, पाचोळा, पाला, पालापाचोळा, पत्रा, इत्यादी अनेक नावे प्राप्त झालेले, पान झाडाचं. पान वेलीचं. हिरव्यागार पानांनी लगडलेले झाड, वेल मनाला प्रसन्न करते. हे झाडाचे महत्त्वाचे अंग. सर्व हिरव्या वनस्पतींचा महत्त्वाचा अवयव. अवघ्या जीवसृष्टीला तारणारे असते ते पान. पाने अपवाद वगळता हिरव्या रंगाचीच असतात. काही शोभिवंत वनस्पतींची पाने मात्र लाल, जांभळी, पिवळी, पांढरी असतात. तरीही पान म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर हिरवा रंगच येतो. ही पाने खोडावर असतात. खोडाशी ती देठाने जोडलेली असतात. ती सहज नजरेला पडतात. देठ आकाराने लांब, आखूड असतो. पान जन्माला येताना खोडाला अगदी बिलगून बसलेले असते. तो सहसंबंध पान पिकून गळेपर्यंत टिकतो. बीज अंकुरत असताना खोड पानाला घेऊन बाहेर पडते. अंकुर किंवा कोंब जसजसे वाढते, तसतसे पान आणि खोड वेगळे होतात. कोंब जसजसे वाढत जाते, तसतशी कोवळी पाने टोकाला येतात आणि खाली जूनी पाने असतात. कोवळ्या पानांचे रंग सुंदर असतात. लहान बाळ पाहिल्यावर जसे मन प्रसन्न होते, तसाच आनंद ही कोवळी, पिवळी, चॉकलेटी, लाल अशी अनेक रंगांनी रंगलेली पाने असतात. काही दिवसात त्यांचा रंग पोपटी किंवा हिरवा बनतो. पाने मुख्यत्वे पसरट असतात. पानावर भरपूर सूर्यप्रकाश पडावा, यासाठी ही रचना असते. देठाची लांबीही पानाला पुरेसा प्रकाश मिळण्यासाठी लांब किंवा आखूड असते. पानाचे देठ आणि खोड यांच्यामध्ये झालेल्या कोनाला कक्ष म्हणतात. जास्वंदीसारख्या झाडामध्ये पाने लघुकोनात असतात. काही झाडांना काटकोनात पाने फुटतात. काही झाडाची पाने मात्र विशालकोनात निवांतपणे पसरलेली असतात. पानाच्या वरच्या बाजूच्या तुलनेमध्ये खालच्या बाजूचा रंग कमी हिरवा असतो. अनेक झाडांच्या पानाचा खालचा भाग पांढरट, केसाळ असतो. पानाला अंतर्गत आधार देण्यासाठी देठ पानात आल्यावर देठाचे शिरेमध्ये रूपांतर होते. शिरेला पुढे उपशिरा फुटत जातात.

पान जीवसृष्टीसाठी सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. झाडाचा हाच घटक पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईड शोषून त्याचे ऑक्सिजन आणि पाण्यामध्ये रूपांतर करत असतो. प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया पानामध्ये घडत असते. कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन आणि बाष्परूपातील पाण्याची देवाणघेवाण याच भागात घडत असते. खोडाकडून आलेले पाणी आणि क्षार, तसेच तयार झालेले अन्न इतर भागाकडे पोहोचवण्यासाठी पान मदत करत असते. पानामधून पाण्याचे मर्यादेपेक्षा जास्त बाष्पीभवन होऊ नये यासाठी पानाच्या दोन्ही बाजूस पेशींचा अधिधर्म नावाचा एक थर असतो. त्यावर क्युटिनाचा एक थर असतो. त्याच्या मध्यभागात असणाऱ्या हरितलवकामध्ये प्रकाशसंश्लेषण घडते. काही नेच्यासारख्या वनस्पती याला अपवाद असतात. असायलाच हव्यात, अपवाद असल्याखेरीज नियम कसा सिद्ध होणार? पानावर सूक्ष्म छिद्रे म्हणजेच पर्णरंध्रे असतात. ती खरेतर पानाची नाकं असतात. प्रत्येक छिद्राभोवती दोन रक्षक पेशी असतात. त्यातून वातावरणाशी झाडाची देवाणघेवाण होत असते. 

पाने हरितद्रव्याच्या सहाय्याने प्रकाश ऊर्जा रासायनिक ऊर्जेत रूपांतरीत करतात. ही रासायनिक ऊर्जा अन्नाच्या रूपात साठवले जाते. या प्रक्रियेत बाहेर पडणारे पाणी झाडातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते. पानाच्या मुख्य भागाला पर्णदल म्हणतात. पर्णदलाच्या आणि खोडाच्यामध्ये देठ असते. देठ खोडाजवळ जाड असते. त्याला पर्णाधार म्हणतात. काही झाडामध्ये पर्णाधाराजवळ दोन अनुपर्णे असतात. अनुपर्णे टोकदार असतात. जास्वंदीतील अनुपर्णे सहज पहायला मिळतात. काही झाडांना पाने येताना सोबत मोठी अनुपर्णे घेऊन येतात, मात्र ती पान पूर्ण बाहेर येताच गळून जातात. रबर, वड, पिंपळ या झाडांची अशा येणाऱ्या अनुपर्णाना कलिका शल्क म्हणतात. ज्या झाडांना पाने येताना अनुपर्णे येत नाहीत त्याना अननुपर्णी असे म्हणतात. काही पानांचे देठ लांब असते. काहींचे आखूड तर काहीना देठच नसतो. ती थेट खोडाला चिकटून फुटलेली असतात. ज्यांना देठ नसतो, त्यांना अवृंत्त पाने म्हणतात. बहुतांश झाडांचे देठ गोलाकार असते. ऑस्ट्रेलियन बाभळीच्या झाडांचे देठ चपटे असते. काही पाने अगदी धाग्यासारख्या देठाने जोडलेली असतात. बहुतांश झाडांच्या पानांची देठे खोडाजवळ फुगीर झालेली असतात. पानाकडून आलेले अन्न त्यामध्ये साठवलेले असते, असे मानले जाते. मात्र ते तितकेसे खरे नसावे. पानाबरोबरच्या देवाणघेवाणीत जणू हे देठ, जकात वसुली करून तेथे संचय करत असावे.

विज्ञानाच्या भाषेत प्रत्यक्ष पानाला पर्णदल असे म्हणतात. ते हिरवे, चपटे आणि पसरट असते. त्याच्या तळापासून टोकाकडे एक किंवा अनेक शिरा निघतात. शिरा सुरुवातीला जाड असतात, पुढे त्या बारीक होत जातात. एक शिरा असलेल्या पानातही अनेक उपशिरा फुटतात. त्या पानाच्या टोकाकडे जाताना बारीक होत जातात. पानाचे तळ, कडा आणि टोक असे भाग असतात. माणसाच्या शरीरात रक्त वाहून नेणाऱ्या केसवाहिन्यांचे जाळे असते, तसेच या शिरांचे जाळे तयार होते. त्या अत्यंत सूक्ष्म असतात. ऊस, मका, ज्वारी अशा काही वनस्पतींच्या पानाचा पर्णदलाचा सुरुवातीचा भाग खोडाभोवती गुंडाळलेला असतो. बहुतांश पानांची विभागणी शिरेमुळे दोन भागात होते. मात्र तळापासून निघालेल्या कडा समांतर पुढे जात टोकाला एकत्र येतात. वड, पिंपळ, पिंपरण अशा बहुतांश झाडांच्या पानांच्या कडा सरळ, वर्तुळाकार वाढत जातात. अशोकाच्या झाडाच्या पानांच्या कडा मात्र नागमोडी रस्ता पसंत करत टोकाला येऊन मिळतात. बकुळाच्या पानांना पण असे वेडेवाकडे जावेसे वाटते, मात्र त्यांचा तेवढा पैस नसतो. पानफुटीच्या जाड कडेलाही छान नक्षी असते. दोडक्याची आणि घोसावळ्याच्या वेलीची पाने जवळपास एकसारखी. दोडक्याची पाने गर्द हिरवी तर घोसावळ्याची पोपटी. दोन्हीच्या पानाला असणाऱ्या दात्र्या मात्र जोरात असतात. मुचकुंदाची पाने पसरट मोठ्या दात्र्याची. मात्र याचे पान फार वेगळे. मुचकुंदाचे पान हातात घ्यावे, जितके चुरगळता येईल, तितके चुरगळावे आणि सोडून द्यावे. पुन्हा ते पहिल्यासारखे पसरते. जणूकाही ‘झाले गेले विसरून जावे’ हे गीत त्याच्या शिरेशिरेमध्ये सामावले आहे.

घायपाताच्या कडा जाडजूड असतात. मूळातच पान जाड असते. बहुतांश झाडांचे, पान खोडाला जेथे चिकटलेले असते, तेथे बेचक्यात मुकुल किंवा डोळा किंवा ज्याला आपण कोंब म्हणतो, तो नव्या फांदीच्या निर्मितीसाठी बसलेला असतो. मात्र त्यातून प्रत्येक वेळी फांदी फुटेलच असे नाही. जास्वंदीच्या पानाच्या शेजारून लगेच कळी बाहेर येते आणि तिचे फुलात रूपांतर होते. हे त्या झाडाच्या गुणधर्मानुसार, तसेच त्याला मिळणारे अन्न आणि पाणी यावर अवलंबून असते. जास्तीत जास्त प्रकाश मिळणे ही पानाची नाही, तर समस्त जीवसृष्टीची गरज आहे. पान समस्त जीवसृष्टीसाठीच प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, त्यातून ऑक्सिजन, पाणी आणि अन्ननिर्मिती हे पर्णदलाचे कार्य आहे.

सूचीपर्णीच्या पानांचा आकार लांब, अरूंद सुईसारखा असतो. काही कंदवर्गीय अळू, कमळ, लिलीसारख्या वनस्पतीची पाने गोलाकार असतात. केळीची पाने लांब, पसरट आणि समांतर कडा आणि उपशिरांनी सजलेले असते. कांद्याची लसणांची आणि काही गवताची पाने पोकळ गोलाकार असतात. त्यातील पानकणसाची पाने याहीपेक्षा वेगळी. पाण्यातून बाहेर येणारी. या प्रवर्गातील कांद्याच्या पातीपासून पिपाणी बनवून लहान मुले वाजवत. मात्र बहुतांश गवताची पाने चपटी आणि लांब असतात. म्हणूनच ‘गवताला भाले फुटतात’ असे नाटकाचे शीर्षक आले असावे. मिरी, नागवेलीची पाने हृदयाच्या आकाराची असतात. गारवेलीची पाने हाताच्या पंज्यासारखी असतात. धोतरा ही तशी विषारी वनस्पती. धोतऱ्याची पाने लव असलेली, पांढरट रंग धारण केलेली आणि दोन्ही कडांना एकत्र न येऊ देणारी असतात. त्याच्या विषारीपणाची कल्पना जनावरांनाही आली असावी. कोणताही प्राणी त्याला तोंड लावत नाही. त्यामुळे धोतऱ्याची पाने दोन समान भागात विभागलेली नसतात. आंब्याची पाने वरून गर्द हिरवी तेलात न्हाऊन निघालेली पुढे टोकाला अणकुचीदार रूप धारण करणारी असतात. कण्हेरीची पाने भाल्याच्या टोकासारखी आणि खालच्या बाजूला पांढरा रंग घेतलेली असतात. करंजाच्या पानाचा तोरा वेगळाच असतो. लंबगोलरूप धारण करून ते झाडावर मिरवत असते. मात्र गर्द हिरव्या रंगाऐवजी पोपटी रंगच त्याला आवडत असावा. जास्वंदीची पाने अंडाकृती मात्र त्याच्या कडा छान नक्षीदार कुशल शिम्प्याने कातरल्यासारखी असतात. तर बदामाची पाने उलट अंडाकृती म्हणजे देठाकडे निमुळती असतात. याच्या पानाच्या कडा टोकाला गोल असतात. आपट्याच्या पानाला दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून वाटले जाते. याची पाने दोन भागात विभागलेली असतात, मात्र दोन दले समान नसतात. कांचनच्या पानाचा आकार मोठा असतो, आपट्यापेक्षा पातळ असतात. दोन्ही झाडांची पाने इतर गुणवैशिष्ट्याने सारखीच. मधल्या देठासह शिरा उपशिरांचे जाळे त्याच्या पिवळसर पोपटी रंग आणि रचनेने पांढरट पानांचे सौंदर्य खुलवतात. प्रत्येक वेलीचे, झाडाचे पान वेगळे असते. 

रबर, वड अशी काही झाडे वगळता बहुतांश पाने तशी खूपच पातळ असतात. या पानाला आधार आवश्यक असतो. तो आधार नसेल तर पान पसरट बनू शकत नाही. त्यासाठी पानांमध्ये शिरा आणि उपशिरांचे जाळे तयार होते. त्यामध्ये एक किंवा अनेक उपशिरा असतात. त्याच पानाला पसरटावस्थेत ठेवण्याचे कार्य करतात. पानफुटी वनस्पतीचे पुनरूत्पादन हे पानांपासूनच होते.   एकावेळी अनेक कामे करण्याचे काम झाडांकडून माणसाने शिकावे. झाडाचा प्रत्‍येक घटक अनेक जबाबदाऱ्या विनातक्रार पार पाडत असतात. शिरांचे असेच असते. त्या पाणी आणि क्षार पानापर्यंत पोहोचवतात, त्याचबरोबर पानाने तयार केलेले अन्न झाडाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्यही, ती विना तक्रार करत असतात. शिरा आणि उपशिरांच्या रचनेला ‘शिराविन्यास’ असे भरभक्कम नाव मिळाले आहे. पान देठाला जेथे जोडलेले असते, तेथून हा शिराविन्यास सुरू होतो. पानामध्ये शिरा आणि उपशिरांच्या रचनांचे जाळीदार आणि समांतर शिराविन्यास हे दोन मुख्य प्रकार आढळतात. जाळीदार शिरांची रचना ही प्रामुख्याने द्वीदल वनस्पतीमध्ये आढळते. यामध्ये एक, तीन, पाच, सात अशा शिरा पानाच्या तळापासून सुरू होतात आणि पुढे उपशिरा फुटून पानभर नक्षी पसरवत राहतात. याचे पुढे एकप्रशिरी म्हणजे एकच मुख्य शिरेपासून जाळे तयार करणारे आणि बहुप्रशिरी म्हणजे एकापेक्षा जास्त शिरा फुटून जाळे तयार करणारे असे दोन प्रकार असतात. पिंपळ, जास्वंद यांची पाने एकप्रशिरी वर्गात आढळतात. बहुप्रशिरी शिराविन्यासामध्ये अभिसारी आणि अपसारी असे दोन प्रकार आहेत. यातील अभिसारी प्रकारात मुख्य शिरा पानाच्या तळापासून निघतात, मात्र टोकाला पुन्हा एकत्र येतात. तमालपत्र, बोराच्या झाडाची पाने अशा प्रकारची असतात. तर अपसारी प्रकारात झाडाच्या शिरा तळापासून फुटतात आणि पुढे त्यांच्यातील दुरावा वाढत जाऊन कडेला संपतात. कापूस, पपईच्या पानात अशा रचना आढळतात. 

समांतर शिराविन्यासातही असेच दोन प्रकार आहेत. ज्वारी, मका अशा वनस्पतीमध्ये पानात एकच शीर सुरुवातीस निघते आणि अत्यंत छोट्या उपशिरांचे समांतर जाळे करत पुढे जात राहते. राळे, भगर, बाजरी आणि अनेक तृणवर्गीय वनस्पतीमध्ये पानांची रचना अशीच असते. हा प्रकार म्हणजे समांतर एकप्रशिरी शिराविन्यास होय. कर्दळ, हळद, ऊसाची पानेही अशीच असतात, एकाच कुळातून निघालेल्या सर्व लेकरांनी एकाच गावात सवते सुभे थाटावेत, अगदी तसेच या शिरा आणि उपशिरांचे असते. लहान मुलाने आईच्या कमरेभोवती हात गुंडाळावेत अगदी तशीच ही पाने खोडाजवळ असतात. बहुप्रशिरीमध्ये एका मुख्य शिरेपासून अनेक उपशिरा फुटत असतात. बांबुसारख्या वनस्पतीत पाने एका देठापासून निघून पुढे टोकाला मिळत असतील, तर त्या रचनेला अभिसारी बहुप्रशिरी रचना म्हणतात. अपसारी बहुप्रशिरी रचनेमध्ये एका मुख्य शिरेपासून अनेक उपशिरा फुटतात. मात्र त्या पुन्हा एकत्र न मिळता, कडेला जातात. ताड, पंखामाड, सुपारी अशा अनेक झाडांची पाने अशी असतात. या झाडामध्ये पामच्या एका प्रजातीची पाने खूपच मोठी असतात.  

पानाच्या शिरांचे जाळे कसेही असो, पानाचे दोन प्रकार आहेत असे वनस्पतीशास्त्र सांगते. साधी पाने आणि संयुक्त पाने. मात्र ही तरी कोठे साच्यात बसणारी. साध्या पानामध्ये एकच पर्णदल असते. पानाची कडा अखंड असते. जास्वंद, आंबा, पेरू, चिकू, अशोक, करंज अशा असंख्य झाडांची पाने साधी असतात. याचा आकार काही मिलीमीटरपासून फुटापर्यंत असतो. यातील सागाचे पान पाहा कसे नखरे दाखवते. संयुक्त पान हा दुसरा प्रकार. यामध्ये एकाच देठाला एकापेक्षा जास्त पर्णदले असतात. त्यामध्येही ही चिंचेसारख्या झाडाच्या पानात सर्व पर्णदले मुख्य शिरेला जोडलेली असतात. तर गुलमोहोरासारख्या झाडाच्या पानातील पर्णदले ही उपशिरेशी जोडलेली असतात. बाभूळ, चिंच, शेवगा, बकान नीम, कडुलिंब, हादगा, सुबाभूळ, गुलमोहोर, अफ्रिकन ट्युलिप अशा अनेक वनस्पतींची पाने संयुक्त पाने असतात. संयुक्त पानामध्ये पुढे अनेक प्रकार पडतात. पिच्छाकृती आणि हस्ताकृती असे महत्त्वाचे प्रकार. यातील पिच्छाकृती संयुक्त पानामध्ये एकच देठ असते. एकाच शेपटावर अनेक केस असतात, तसेच देठाच्या दोन्ही बाजूला पर्णिका असतात. त्याचेही पुढे एकपिच्छक, द्विपिच्छक, त्रिपिच्छक आणि विसंयुक्त असे प्रकार आहेत. पिसासारखी रचना असल्याने त्याला पिच्छाकृती म्हणतात. एकपिच्छक संयुक्त पानामध्ये मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूला समोरासमोर पर्णिका असतात. यामध्ये समपिच्छक आणि असमपिच्छक असे दोन प्रकार आहेत. समपिच्छक संयुक्त पानातील पर्णिकांची संख्या सम असते. आवळा, चिंच, बाभूळची पाने या प्रकारची असतात. सूर्य मावळतीला लागला की यांच्या पर्णिका एकामेकांना कुशीत घेऊन जणू झोपी जातात. म्हणे लाजाळूचे झाड स्पर्श करताच लाजून पर्णिका एकमेकाजवळ घेते. असे असेल तर त्याचप्रकारची पाने असणाऱ्या शिरीष, आवळा, चिंचेची पाने स्पर्श झाल्यावर मिटत नाहीत, म्हणजे या झाडानी लाज सोडली का, असा प्रश्न उगाचच मनात येतो. ते काहीही असो, रात्री पाने मिटून घेणाच्या या पानांच्या गुणाचा मोहोळ–मधाची पोळी शोधण्यासाठी चांगला उपयोग करून घेतला जातो. दिवसभर पानांनी भरलेले झाड मधाच्या पोळ्याना दडवून ठेवते, मात्र रात्री पाने मिटल्यावर ती मधाची पोळी सहज नजरेला पडतात. पानांची ही सवय लक्षात घेऊन मधाच्या पोळ्यांची जागा शोधून, दुसऱ्या दिवशी त्यातून मध काढणारे अनेक महाभाग पाहिले आहेत. बाभळीचे पान द्विपिच्छक प्रकारात येते. एका मुख्य देठाला पुढे समांतर उपशाखा फुटतात आणि त्यावर पर्णिका असतात. अशा संयुक्त पानातही पर्णिकांची संख्या समान असेल तर त्या संधीप्रकाशात मिटलेल्या असतात.

त्रिपिच्छक संयुक्त पानांमध्ये देठाला शाखा फुटतात. त्यांना पुन्हा उपशाखा फुटतात आणि त्यांना पर्णिका जोडलेल्या असतात. या दुसऱ्या उपदेठावर पर्णिका जोडल्या गेलेल्या असतात. शेवग्याची पाने या प्रकारची असतात. विसंयुक्त पाने हा आणखी एक प्रकार यामध्ये असतो. गाजर, बडीशेप, जिरे यांची पाने अशा प्रकारची असतात. यामध्ये दोनपेक्षा जास्त फुटवे आणि त्यांना चिकटलेल्या पर्णिका असतात. संयुक्त पानातील दुसरा मुख्य प्रकार असतो, तो हस्ताकृती संयुक्त पान. या प्रकारच्या पानांमध्ये पर्णिका देठाच्या टोकाला फुटलेल्या असतात. एकपर्णिका प्रकारामध्ये एकच पर्णिका पानाच्या टोकाला असते. पपई, पपनसाची पाने या प्रकारची असतात. यामध्ये बहुतांश पानांचे देठ पोकळ असते. द्विपर्णिकी संयुक्त पानामध्ये देठाच्या टोकाला दोन पाने असतात. ‘बेलाला पाने तीन’ किंवा ‘पळसाला पाने तीन’, असे आपण म्हणतो, मात्र ती पाने नाहीत तर त्या पर्णिका असतात. त्रिपर्णिकी संयुक्त पानामध्ये एकाच देठाला तीन पर्णिका असतात. नेच्याच्या काही प्रकारामध्ये देठाच्या टोकाला चार पर्णिका असतात. अशा पानांना चतु:पर्णिकी संयुक्त पान म्हणतात. सप्तपर्णी, शाल्मलीसारख्या झाडाच्या पानाला चारपेक्षा जास्त पर्णिका देठाच्या टोकाला वसलेल्या असतात. त्यांना बहुपर्णिकी संयुक्त पाने म्हणतात. अशा पानांमध्ये ५, ७, ९ अशी पर्णिकांची संख्या असते.

वेगवेगळ्या झाडांच्या पानांचे आयुष्य वेगवेगळे असते. पर्णपाती प्रकारातील झाडांची पाने हिवाळ्यात गळतात. या प्रकारच्या झाडांच्या पानांचे आयुष्य एका ऋतुचे असते. पानझडी वृक्षांची पाने वर्षातून एकदा गळतात. मार्च ते मे महिन्यात पुन्हा पाने यायला सुरुवात होते. सदाहरित वृक्षांची पाने एक वर्षापेक्षा झाडावर असतात. जांभूळ, आंब्याच्या झाडांना विनापानाचे कधीच पाहता येत नाही. मात्र बहावा, सागाची झाडे पूर्ण पर्णहिन अवस्थेत हिवाळ्याच्या सुरुवातीलाच येतात. बहावा फुलांनी पूर्ण बहरल्यावरच पानांचे आगमन होते, तर सागाची पक्व झालेली पाने पिवळे ठिपके अंगावर परिधान करून लोकांचे लक्ष वेधत असतात. पूर्ण काही शैवालवर्गीय वनस्पतींमध्ये पानसदृष्य रचना असतात, त्या पानाची कार्येही करतात. मात्र ती पाने नसतात. निवडुंगासारख्या वनस्पतींमध्ये खोडच पानाचे कार्य करत असते. पानाचा आकार पहाता फार मोठे वैविध्य आढळते. अगदी काही मिलीमीटरपासून काही फुटापर्यंत पानाचा आकार आढळतो. चिरघोळ किंवा चिघळाची भाजी अनेकांच्या आवडीची. तिची पाने अगदी लहान काही मिलीमीटर लांबी-रूंदीची. ताटभर भाजी घेतल्यावर घराला पुरते. मात्र चव आणि पौष्ट‍िकपणा लाजवाब. तर वाळवंटात आढळणारी वेलवेट्श‍ियाची पाने चांगलीच लांब असतात. दोन मीटरपर्यंत लांबी आण‍ि सात-आठ सेंटिमीटरची रूंदी असणारे पान एखाद्या पात्यासारखे असते. ॲमेझॉन लिलीचे पान अडीच पौंडाच्या बाळाला लिलया तोलून धरते. या लिलीच्या पानाचा व्यास एक ते दीड सेंटिमीटर सहज असतो. मात्र सर्वात मोठ्या पानाचा मान आहे, तो रॅफियाचा. याचे पान दोन मीटर लांब आणि तीन मीटर रूंदीचे असते.

उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताला पानेही अपवाद नाहीत. अन्न तयार करणे हे पानाचे मुख्य कार्य असले तरी इतरही कार्ये पान करतेच. हे काम माझे नाही, ते काम माझे नाही, असे म्हणत बसत नाहीत, ही पाने. पडेल ते काम करणाऱ्या पानांकडून मानवाने शिकण्यासारखे बरेच काही आहे. अनेक वेलवर्गीय वनस्पतींना तणावे असतात. पानाशेजारून बारीक, लांब, तारेसारखे हा तणावा वेलीला किंवा झाडाला आधार देण्याचे काम करतात. वाटाणा, बचनाग, मोरवेल यामध्ये असे तणावे येतात. ही उत्क्रांत पानेच असतात. दुसरा उत्क्रांत पानाचा प्रकार म्हणजे शूल. जनावरांपासून संरक्षण करणे तसेच बाष्पोत्सर्जन कमी करण्यासाठी हा पानाचा प्रकार तयार झाला आहे. बाभूळ, निवडुंग, घायपातीमध्ये असणारे काटे म्हणजेच शूल. काही पातळ पडद्यासारखी पाने जमिनीखालच्या भागावर असतात. ही कोंबांचे रक्षण करतात. त्यांना शल्कपर्णे म्हणतात. हळदीचे खोड, केळीचा कंद, कांदा, लसूण या सर्वामध्ये अशी शल्कपर्णे असतात. कांदा, लसूण यावरील शल्कपर्णे अन्न साठवून ठेवण्याचेही कार्य करतात. पर्णाभवृंत्त या उत्क्रांत पानाचा देठ चपटा, पातळ, पसरट, हिरवा आणि पर्णदलासारखाच असतो. ऑस्ट्रेलियन बाभळीमध्ये असे पर्णाभवृंत्त असतात. घटपर्णी या कीटकभक्षी वनस्पतींमध्ये कीटकांना पकडण्यासाठी पान सापळ्याचे रूप धारण करते. ड्रॉसेरा, घटपर्णी या वनस्पतीमध्ये पानाचे रूपांतर सापळ्यात झालेले आढळून येते.

मानवाला खाण्यासाठी फळे आणि फुले मिळावीत, म्हणून कार्य करत असणारी पाने मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापरली जातात. पालक, चूका, शेपू, मेथी, चाकवत, माठ, तांदळी, चिघळ किंवा चिरघोळ, पोकळा, चंदनबटवा इत्यादी पालेभाज्या लागवड करून विकल्या जातात. त्याखेरीज फळांसाठी लावलेल्या शेवग्याच्या झाडांची पाने आवर्जून मृग नक्षत्राच्या आगमनावेळी खाल्ली जातात. हादग्याच्या फुलांप्रमाणेच पानांची भाजी करण्यात येते. कोकणात अनेक रानवनस्पतींच्या पानांची भाजी बनवतात. फांजी, भारंगी, कुर्डू, दार, अळू, टाकळा, बांबुचे कोंब, तरोडा या रानभाज्यांची पाने भाज्यांसाठी वापरली जातात. काही विशिष्ट काळात विशेषत: चातुर्मासात लाल भोपळ्याची पाने इतर वनस्पतींच्या पानांसोबत मिसळून त्यांची भाजी करून खाल्ली जाते. याखेरीज करडई, अंबाडी, कांदेपात, मोहरी, राजगिरा या त्यांच्या बियांसाठी, फळांसाठी, किंवा खोडासाठी लावल्या जातात. मात्र त्यांच्या पानांचा भाज्यासाठी उपयोग केला जातो. तमालपत्र, कडीपत्ता यासारख्या पानांचा वापरही फोडण्यासाठी केला जातो. भाज्यांमध्ये क्षार आणि जीवनसत्‍त्वे मोठ्या प्रमाणात असतात. पानांमध्ये खनिजे आणि एंझाईम्सही मोठ्या प्रमाणात असतात. पानाच्या चोथ्यामुळे आतड्यातील अपचनाचा तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. काही झाडांची पाने औषधांसाठी वापरली जातात. यामध्ये निरगुडीचा पाला पायाची सूज कमी करण्यासाठी गरम सूती कपड्यांमध्ये गुंडाळून सूजलेल्या भागावर बांधला जातो. हाडजोडीच्या पानांचा रस काढून हाड मोडलेल्या रूग्णांना पिण्यासाठी देण्यात येतो. दगडी पाल्याच्या पानांचा रस काढून जखम झालेल्या भागावर लावण्यात येतो.

पाने जनावरांचे आवडते खाद्य. अनेक वनस्पतींची पाने जनावरे खात असल्याने त्या झाडांची संख्या वाढत नाही. आंबा, कडुलिंबाची पाने जनावरे मोठ्या आवडीने खातात. पेरलेल्‍या धान्याची पानेही जनावरे मोठ्या प्रमाणात खातात. त्यामुळे जनावरांपासून अनेक झाडांचे, पिकांचे रक्षण करणे आवश्यक ठरते. काही वनस्पतींच्या पानाकडे जनावरे ढुंकूनही पहात नाहीत. कडू नसूनही रामफळ, सिताफळीची पाने जनावरे कधीच खात नाहीत. त्याउलट टाकळ्याची पाने कडू असूनही शेळ्या मोठ्या आवडीने ती खातात. अनेक वनस्पतींबाबत, त्यांची पाने जनावरांनी खाल्ल्यास त्या वनस्पतींना येणारी फळे कडू बनत असल्याचे मानले जाते. विदेशी वनस्पतींमधील आता कुठे गुलमोहोराची पाने जनावरे खाऊ लागली आहेत. इतर वनस्पतींची पाने उदाहरणार्थ ग्लिरिसिडीया, रानमोडी, कॉस्मॉस, अफ्रिकन सनफ्लॉवर, अफ्रिकन ट्युलिप, काजू अशा अनेक वनस्पतींची पानांना जनावरे तोंडही लावत नाहीत. त्यामुळे या वनस्पती विना अडथळा वाढतात. त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढते. चिंच जांभूळ, हादगा, शेवगा, बाभूळ, बोरीच्या पानांवर शेळ्या आणि मेंढ्या तुटून पडतात. हरीण, ससा, गेंडा, हत्ती आणि समग्र जंगली शाकाहारी प्राण्यांचे खाद्य वनस्पतींची पानेच आहेत. काटे असूनही शेळ्या-मेढ्या मोठ्या कुशलतेने बोरी-बाभळीची पाने खातात. १९७२ च्या दुष्काळात धामण या वनस्पतीच्या पानांनीच मराठवाड्यातील जनावरांना जगवले होते. पाने खाऊन जगणाऱ्या प्राण्यांची संख्या मर्यादित राहावी, यासाठी जणू निसर्गाने मांसाहारी प्राण्यांची निसर्गाने केली असावी.

पिंपळाच्या पानाला काही दिवस पाण्यात बुडवून ठेवले, तर त्याच्या शिरांची जाळी अलगद मिळते. विशेष म्हणजे ही जाळी सोनेरी लालसर रंगाची असते. अनेक भेटकार्डामध्ये या जाळीचा सुंदर वापर करण्यात येतो. इतर झाडांच्या पानांची अशी जाळी पाहावयास मिळत नाही. याच पिंपळपानाला घेऊन, ‘इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे,’ असे अरूण दाते यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर सांगत आहेत. त्याचवेळी मंगेश पाडगावकर दुसऱ्या कवितेत, ‘आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान’, असल्याचे सांगतात. अमोल हिवरे ‘पान आयुष्याचं’ लिहितात. मनिषा आवेकर यांना मात्र पानाचे महत्त्व पुरेपूर समजले असावे. त्यांच्या मते ‘पानांनी बनवले असे, जीवन आपुले सुंदर’. पानांनी कवींना भरपूर कष्ट घ्यायला लावले आहेत. त्यातही पिंपळपान यांचे आवडते. बालपणापासून या पिंपळपानाचे वेड लागलेले असते. लहानपणी वह्या आणि पुस्तकांमध्ये मोरपिसाप्रमाणे, अशी पिंपळपाने ठेवून अनेकांनी वर्षभर जतन केलेली आहेत. परमेश्वर म्हेत्रे हे भलतेच रोमँटिक मूडमध्ये, ‘पिंपळाचं पान जसं उगवताना लाल गं, लाल गं, सखे तसे तुझं गाल गं’, अशी भन्नाट रचना रचतात. संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेतही पान आले आहे, मात्र ते जेवणाचे पान आहे. तर सोनाली अवसरे-करमनकर यांना ‘तुझ्या आठवणीतील एक पान’ लिहावेसे वाटते. तर क्षितिजा कुलकर्णी या पिकल्या पानावर कविता लिहितात. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कलावंतीण’ चित्रपटात शोभा गुर्टू यांच्या आवाजातील जगदिश खेबूडकरांनी शब्दबद्ध केलेली ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…’ ही लावणी आजही तितकीच हिरवी, ताजी वाटते. हा चित्रपट त्याकाळी बॉक्स ऑफिसवर जोरात आपटला. मात्र ज्या लावणीने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर झाला होता, ती लावणी मात्र अजरामर झाली. आजही कोणी फाटलेले पान लिहित आहे, तर कोणाची पाने जीर्ण झाली आहेत. कोणाला पानझड आठवते, तर कोणी याला पानगळ म्हणत जुन्या आठवणींना उजाळा देत राहते. कोणी मागे पडलेली पाने आठवत बसते. कोणाचे पान पूर्ण कोरेच असते. तर कोणी ‘आपट्याची सोनेरी पाने तोडू नका’, असे सांगणारी कविता कागदाच्या पानावर लिहितो. कवी मंडळींनी पुस्तकाच्या आणि झाडांच्या पानांना समान महत्त्व दिले आहे. ‘मेंदीच्या पानावर’ हे गीत जसे गाजले, तसेच शरणकुमार लिंबाळे यांचे सुरुवातीच्या काळातील याच नावाचे सदरही खूप गाजले होते. नाही तरी पूर्वी भ्रुजपत्रावरच लिहिले जायचे.

भोजन करताना वाढले जाते त्यालाही ‘पान’ म्हटले जाते. त्याला भोजनपात्र, ताट, पत्रावळ असे प्रतिशब्द आहेत. पूर्वी केळीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात भोजनासाठी केला जात असे. आता त्यांच्याजागी स्टीलची ताटे आली असली तरी वाढलेले असते ते पानच. सागाचे पान कितीही मोठे असले तरी त्यावर मात्र पान वाढता येत नाही. त्याच्यावर असणारी लव हे मुख्य कारण असावे. त्यासोबत एक कथा जोडली गेली आहे. हे सागाचे पान चुरगळले आणि त्याचा रस हाताला लागला तर हात कुंकवाने माखावा तसा लाल होतो. पळसाच्या पानाला जोडून त्यापासून पत्रावळी तयार केली जाते. द्रोणही त्यापासून बनवली जातात. त्यांना जोडण्यासाठी एरवी कडू असणाऱ्या कडुलिंबाच्या काड्या म्हणजेच पानाचा देठ वापरला जातो. या पत्रावळ्यांना लग्नामध्ये मोठे महत्त्व होते. मात्र त्यांनाही आता प्लास्टीक ताटांनी हटवले आहे. विडीसाठीही पानेच वापरली जातात. दोन वनस्पतींच्या पानांचा उपयोग विडी बनवताना केला जातो. पानापासून बनलेल्या तंबाखूला, टेंभुच्या पानात गुंडाळून विडी बनवली जाते.

पान आहेच सर्वांसाठी महत्त्वाचे. जीवनात ही पाने, अन्न-हवा-पाणी या मूलभूत गरजांचे घटक उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कार्यरत असतात. वनस्पतींची पाने जगण्यासाठी आवश्यक आहेत, तर आनंदी आयुष्यासाठी पुस्तकांची आणि वहीची पाने महत्त्वाची असतात. या पानालाही अनेक प्रतिशब्द आहेत. पुस्तकाचे-वहचे पान तक्ता, ताव, पृष्ठ, दर्शनी, मुखपृष्ठ, मलपृष्ठ, बंद अशा नावांनी ओळखले जाते. त्याच्या योग्यतेनुसार, उपयुक्ततेनुसार ती वापरली जातात. पुस्तकाची पाने वाचण्याची ज्यांना सवय जडते, ते सदैव आनंदी असतात. म्हणजेच जीवनानंद देण्यासाठीही पानेच महत्त्वाची ठरतात. आपल्या आयुष्याचे पान सुखात्म ठरावे, म्हणून वनस्पतीचे, पुस्तकाचे, वहीचे, भोजनाचे पान महत्त्वाचे आहे! चला, ते काहीही असो, आता फराळाचे पान वाट पाहातेय!

                                                                         -०-

बुधवार, १ एप्रिल, २०२६

निसर्ग पंढरीचा वारकरी

 

त्यांचा स्वभाव आंदोलनकर्त्याचा नव्हता. त्यांचा ‘लोकांना सुज्ञ बनवल्यास समस्येची तीव्रता कमी होईल’, असा ठाम विश्वास होता. याचा अर्थ असा नाही की त्यांनी कधीच आंदोलनात भाग घेतला नाही. सायलेंट व्हॅली, चिपको, कित्तिको-हच्चिको आंदोलनात ते सहभागी झाले, पण एक कार्यकर्ता म्हणून. आंदोलनकर्त्यांची भूमिका योग्य असल्याने आणि ही सर्व आंदोलने गांधीजींच्या विचरांनुसार अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रही स्वरूपाची असल्याने. आपण एखाद्या प्रश्नावर मत मांडायचे झाले तर ते अगोदर त्या समस्येचा पूर्ण अभ्यास करत. कधीही त्यांनी ‘मला असे वाटते,’ किंवा ‘जर-तर’ची भाषा केली नाही. आपले पहिले काम अभ्यास करणे, विषय समजून घेणे आणि नंतरच तो विषय विद्यार्थ्यांपुढे मांडणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते आणि वेगळेपणही.

_________________________________________________________

कोणत्याही सजीवाच्या अन्न, पाणी आणि हवा या तीनच मूलभूत गरजा असतात. वनस्पतींना फिरता येत नाही. त्या स्थलांतर करू शकत नाहीत, पण त्यांच्याही याच तीन मूलभूत गरजा आहेत. निसर्ग रचनेमध्ये त्यांना पाणी आणि हवा जागेवरच मिळाल्यास कोठेही न जाता अन्न तयार करण्याची क्षमता वनस्पतींना मिळाली. अन्य जीवांना स्थलांतर करता येते. त्यातील अनेक जीव वनस्पती खातात, तेच त्यांचे अन्न असते. त्यांना शाकाहारी प्राणी म्हणतात. शाकाहारी प्राण्यांची संख्या अमर्याद वाढू नये. जर ते तसे वाढले तर वनस्पती राहणार नाहीत. म्हणून निसर्ग रचनेमध्ये मांसाहारी प्राणी आले... आणि वनस्पती आणि इतर जीवांचे संतुलन राखत जीवसृष्टी विकसित झाली. निसर्गाची किमया समजून घेण्यासाठी ही ढोबळ मानाने गोष्ट. हे ‘सृष्टी निर्माण विश्व’ जितके खोलात जाऊ, तितके मनोरंजक होत जाते. परिसंस्थेतील बहुतांश घटकांना पुढे काय वाढून ठेवले आहे, नैसर्गिकरित्या काय घडणार आहे, ते अगोदरच कळते. ठोकताळ्यांने आज त्यातील काही गोष्टींबाबत आपण चर्चा करतो. उदाहरणार्थ, भूकंप येणार असेल तर कुत्रे विशिष्ट पद्धतीचे आवाज काढतात, मोठ्या प्रमाणात साप दिसू लागतात… आणि बरेच काही.

 निसर्ग रचना समजून घेण्यासाठी त्याच्याशी एकरूप व्हावे लागते. तरीही तळ गाठणे अगदी कठीण. कोणीही असे म्हणू शकत नाही की, मला निसर्ग पूर्णत: समजला आहे. मात्र निसर्गातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे, त्याची निसर्गाने कोणत्या न कोणत्या बहुमोल कार्यासाठी निर्मिती केलेली आहे आणि म्हणून निसर्ग टिकला आहे, म्हणून निसर्गाला मानवी हस्तक्षेपासून मुक्त ठेवले पाहिजे. हे सुद्धा फार कमी लोकांच्या लक्षात येते. हे ज्यांच्या लक्षात येते, ते लगेच स्वत:ला फार मोठे समजू लागतात आणि ते समाजापासून दूर होतात. केवळ आपणासच सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त झाले आहे असा त्यांचा भ्रम असतो. ते लोकांना दुय्यम किंवा कमी लेखू लागतात. या सर्वाला अपवाद असणारे, आपले म्हणणे आग्रहाने पण संयत भाषेत मांडणारे आणि आपण कोणी फार मोठे आहोत, असा अविर्भाव न बाळगता, निसर्गाला जपण्यासाठी सर्वतोपरी कार्यरत राहणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉ. माधव धनंजयराव गाडगीळ.

माधवराव गाडगीळ यांचा जन्म पुण्यामध्ये २४ मे १९४२ रोजी झाला. नियोजन मंडळाचे अध्यक्ष राहिलेले, निसर्गप्रेमी, अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांचे ते सुपुत्र. धनंजयराव बाँबे नॅचरल हिस्टरी संस्थेचे आजीव सदस्य होते. तसेच पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांचे ते मित्रही होते. सलीम अली यांच्यासमवेत ते जंगलांमध्ये फिरायला जात. अशावेळी वडील माधवरावांना बरोबर घेऊन जात असत. यातूनच त्यांना निसर्गअभ्यासाची आवड निर्माण झाली. एका जलविद्युत प्रकल्पाला भेट देताना झालेली जंगलतोड पाहून वडिलांना दु:ख झाले. त्यावेळी वडिलांनी विकास आणि पर्यावरणासंबधी केलेल्या विधानातून माधवरावांना विकास आणि पर्यावरण अर्थात शाश्वत विकास यासंदर्भात एक दिशा सापडली. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे १४ वर्षाचे. तेव्हाच त्यांनी पर्यावरण या क्षेत्रात पुढील अभ्यास करण्याचे निश्चित केले. त्यांचे शालेय आणि पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह फर्ग्युसन महाविद्यालयातून पुणे विद्यापीठाची पदवी प्राप्त केली. पदवीनंतर ते मुंबईतील इंस्टिट्युट ऑफ सायन्स या संस्थेत आले आणि मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. या संपूर्ण अभ्यासातून पर्यावरणातील विविध घटकांच्या परस्परसंबधांची वीण त्यांच्या मनात घट्ट होत गेली. त्यामुळेच पुढे संशोधनासाठी पर्यावरणीय गणितीतील विषय निवडला. अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठात जीवशास्त्रीय संशोधनामध्ये गणितीय प्रतिमानांचा समावेश असलेला गाडगीळ यांचा प्रबंध पहिला होता. हॉर्वर्ड विद्यापीठाची त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. मॅथेमेटिकल इकॉलॉजी हा विषय माधवराव गाडगीळ यांच्या संशोधनामुळे संशोधनाच्या क्षेत्रात चर्चेत आला. गणिताचा वापर करून पर्यावरणीय समस्यांचे आकलन करून घेण्याचे त्यांचे कौशल्य पाहून हॉवर्ड विद्यापीठाने त्यांना तेथेच थांबून अघ्यापन करण्यास सांगितले होते. मात्र स्वदेशात येऊन येथेच कार्य करण्याचे त्यांनी ठरविले आणि १९७१ मध्ये ते भारतात परतले.

भारतात आल्यानंतर डॉ. सतीश धवन यांच्या सूचनेनुसार ते इन्डियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर या संस्थेत रूजू झाले. त्यांनी येथे काही काळ संशोधक म्हणून कार्य केले. पुढे त्यांची शिक्षक पदावर नियुक्ती झाली. त्यांनी १९७३ ते २००४ पर्यंत सहाय्यक प्राध्यापक ते प्राध्यापक पदावर शिक्षक म्हणून कार्य केले. ते कृतिशील शिक्षक होते. पर्यावरणशास्त्र हा य केवळ वर्गात शिकवण्याचा विषय नाही. प्रत्यक्ष जागेवर जाऊन एखाद्या पर्यावरणीय समस्येचा अभ्यास केला, तर विद्यार्थ्यांना विषयाचे नेमके आकलन होते. त्यामुळे अनेकदा ते विविध वनांमध्ये मुलांना नेत आणि तेथे तो विषय समजावून सांगत. पदव्युत्तर आणि पदवी विद्यार्थ्यांप्रमाणेच, त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबतही अनेक प्रयोग केले. पर्यावरणीय समस्यांचे शालेय विद्यार्थ्यांना आकलन झाल्यास किमान अशा समस्यांची तीव्रता तरी वाढणार नाही, असे त्यांचे मत होते.

विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगत असताना तेही शिकत होते. त्यांचे गुरू वामनराव वर्तक यांच्यासमवेत त्यांनी अनेक जंगलांना भेटी दिल्या. या दोघांनी देवरायासंदर्भांत जमा केलेली माहिती महत्त्वाचा दस्ताऐवज मानली जाते. या भ्रमंतीत त्यांनी अनेक वेळा झाडाखाली मुक्काम केला. लोकांशी चर्चा करत रात्री जागवल्या. आढळणाऱ्य सर्व वनस्पतींच्या नोंदी केल्या. यातून नव्या देवराया निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक माहिती उपलब्ध झाली. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातील जंगलास त्यांनी भेट दिली. पन्नास हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर ते जंगलात पायी चालले. या प्रवासात काहीवेळा त्यांच्या जीवावरही बेतले. एकदा तर हत्तीपासून बचाव करण्यासाठी त्यांना झाडावर रात्र काढावी लागली.

भ्रमंती करत असताना, ते त्या भागातील समस्या समजून घेत असत. समस्येचे मूळ शोधत आणि त्यावर साक्षेपी उपायही सांगत. त्यांचा स्वभाव आंदोलनकर्त्याचा नव्हता. त्यांचा ‘लोकांना सुज्ञ बनवल्यास समस्येची तीव्रता कमी होईल’, असा ठाम विश्वास होता. याचा अर्थ असा नाही की त्यांनी कधीच आंदोलनात भाग घेतला नाही. सायलेंट व्हॅली, चिपको, कित्तिको-हच्चिको आंदोलनात ते सहभागी झाले, पण एक कार्यकर्ता म्हणून. आंदोलनकर्त्यांची भूमिका योग्य असल्याने आणि ही सर्व आंदोलने गांधीजींच्या विचरांनुसार अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रही स्वरूपाची असल्याने. आपण एखाद्या प्रश्नावर मत मांडायचे झाले तर ते अगोदर त्या समस्येचा पूर्ण अभ्यास करत. कधीही त्यांनी ‘मला असे वाटते,’ किंवा ‘जर-तर’ची भाषा केली नाही. आपले पहिले काम अभ्यास करणे, विषय समजून घेणे आणि नंतरच तो विषय विद्यार्थ्यांपुढे मांडणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते आणि वेगळेपणही.

पश्चिम घाटात होणारा विकास ‘कंत्राटदार धार्जिणा’ नको असे त्यांनी मांडलेले मत, हे पूर्ण अभ्यासांती होते. नाणार आणि बारसू प्रकल्पासंदर्भात त्यांना पत्रकार आणि शासनाने मत मागितल्यानंतर त्यांनी शासनाकडे या प्रकल्पाचे आराखडे मागितले. सरकारने ते देण्यास टाळाटाळ केली. मात्र गाडगीळ यांनी ते मिळविले आणि त्यानंतरच त्यांनी आपले मत सांगितले. शासनाने स्वत:च मागवलेल्या त्यांच्या अभिप्रायाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. कारण ते त्यांच्या सोईचे नव्हते. आपल्या अहवालाकडे असे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यातून पर्यावरणाचे आणि तेथील रहिवाशांचे होऊ घातलेले नुकसान टाळण्यासाठी त्यांनी लोकांपुढे प्रकल्पाबरोबर येणाऱ्या समस्येची मांडणी करायला सुरुवात केली. आपला अहवालही खुला केला. हे विज्ञानयात्रेतील वारकऱ्याचे प्रबोधन होते.   

या अभ्यासात निसर्गाचे मोठेपण त्यांच्या लक्षात येत होते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या पाच राज्यांमध्ये सोळाशे किलोमीटर दूरवर पश्चिम घाट वसला आहे. जगभर नामशेष होत चाललेल्या अनेक वनस्पती, कीटक आणि प्राण्यांच्या प्रजाती या भागात आजही आढळतात. पश्चीम घाटातील विकासाच्या विरोधात काढलेल्या एका मोर्चातही ते सहभागी झाले होते. विकासाच्या नावाखाली होत असलेले पर्यावरणाचे नुकसान त्यांच्या लक्षात आले. ‘देशाला विकास करणे आवश्यक आहे, मात्र तो शाश्वत विकास असायला हवा. रस्त्यांची निर्मिती, उद्योगांची उभारणी या गोष्टी कधीच टाळता येणार नाहीत. मात्र त्या करताना पर्यावरणाचे नुकसान झालेच नाही पाहिजे आणि झालेच तर ते कमीत कमी असायला हवे,’ असे त्यांचे मत होते. एखादा उद्योग उभारताना सर्वांगिण विचार होणे गरजेचे असते. तो न केल्यामुळे पर्यावरणीय समस्या गंभीर होतात, हे त्यांच्या लक्षात आल्याने, कोणत्याही प्रकल्पाच्या नियोजनात स्थानिकांना सहभागी करायला हवे, असे ते म्हणत. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कोकणामध्ये पर्यावरणाची हानी होऊ न देता, केवळ तीस टक्के पाणी वापरून २००० मेगावॅट जलविद्युत निर्माण करण्याचा त्यांनी आराखडा शासनास सादर केला. मात्र त्याकडेही गांभिर्याने पाहिले गेले नाही.

आज कोणताही प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याची जणू शर्यत लागली आहे. विशेषत: जंगलातून जाणाऱ्या रस्‍त्यांच्या निर्मितीसाठी अवजड यंत्रांचा वापर करण्यात येतो. त्यातून डोंगररांगा पोकळ होतात आणि पावसाचे पाणी त्यात शिरल्यावर जडत्व वाढून दरडी कोसळतात. त्यामुळे मूळात अशा डोंगररांगातून किमान रस्ते काढायला हवेत आणि तेही अवजड यंत्रांचा वापर न करता. त्यामुळे लोकांना रोजगार मिळेल, त्यासोबत दरडी कोसळण्याचे प्रमाण घटेल, असे ते सांगत. मात्र विक्रमी वेळात प्रकल्प पूर्ण करण्याच्या नादात अशा शाश्वत विकासाच्या मंत्राकडे कोण लक्ष देणार? असे असले तरी त्यांनी अभ्यास करणे आणि आपले स्पष्ट मत देणे कधीच थांबवले नाही.

जगण्यासाठी नोकरी, कामधंदा करणे गरजेचे असते. आनंदी जगण्यासाठी कोणतातरी छंद जोपासला जातो. मात्र गाडगीळ सरांनी नेहमी आपल्या कामात आनंद शोधला. असे कौशल्य प्राप्त होणे फार कमी लोकांना साध्य करता येते. गाडगीळ यांना असे कौशल्य साध्य करता आले होते. त्यांनी विदर्भातील जंगलातील वनस्पतींच्या नोंदी केल्या. या कार्यात त्यांनी आदिवासीना सहभागी करून घेतले. त्यामुळे अशिक्षित आदिवासींची नोंद जागतिक पातळीवर पोहोचली. गाडगीळ यांनी नेहमीच ज्याचे श्रेय त्याला दिले. यातून त्यांच्या मनाची श्रीमंती लक्षात यावी. आदिवासी, मूलनिवासी यांचे जगणे त्रासाचे होऊ नये, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत राहिले. मात्र त्यांच्या कार्याचे महत्त्व या मंडळीच्याही लक्षात येत नव्हते. ही परिस्थिती पाहून कोणीही नाऊमेद झाले असते. मात्र गाडगीळ यांनी याबाबत कधीही नाराजी दाखवली नाही किंवा भडकावू आंदालनाची दिशा देण्याचे कार्यही केले नाही. त्यांच्या रक्तात आक्रमकपणा नव्हता. वृक्षवल्ली, वनचरे, सर्व जीव हे वाचले पाहिजेत. पर्यावरण टिकले पाहिजे, हे सांगतानाही लोकांना सुज्ञ करणे हा हेतू असे. ते ज्ञान द्यायचे, तेही एखाद्या संताप्रमाणे. त्यांच्याशी बोलताना त्यांचा अविर्भाव ‘मलाच सर्व काही ज्ञात आहे’, असा कधीच नसे. अगदी या प्रांतात कार्य करणाऱ्या नवख्या अभ्यासकाचे म्हणनेही ते तितक्याच तन्मयतेने ऐकत असत आणि ते पूर्ण ऐकून घेतल्यानंतर आपले मत किंवा म्हणणे शांतपणे सांगत.

त्यांना खऱ्या अर्थाने लोक ओळखू लागले ते पश्चिम घाटासंदर्भात त्यांनी तयार केलेल्या अहवालामुळे. या अहवालामुळेच २०१२ साली पश्चिम घाटास ‘जागतिक सांस्कृतिक ठेवा’ म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केले. पश्चिम घाट हा जैवविविधतेने नटलेला. अतिशय संवेदनशील. या भागात विकासाचे कार्य तितक्याच संवेदनशीलपणे व्हायला हवे, असे ते म्हणत. ‘आपले निष्कर्ष पूर्ण अभ्यासांती असले पाहिजेत’, हे जीवनभर जपलेले तत्व उतारवयातही त्यांनी पाळले. त्यासाठी त्यांनी पश्चिम घाट पुन्हा पायी पालथा घातला. आपली निरीक्षणे आणि निष्कर्ष तर्कशुद्ध विश्लेषणासह मांडले. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानेच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवलेली. माधवराव गाडगीळ आणि त्यांच्या समितीने अभ्यासपूर्ण असा हा अहवाल २०११ साली शासनास सादर केला. अत्यंत महत्त्वपूर्ण, वैज्ञानिक अशा या अहवालाकडेही दुर्लक्षच करण्यात आले. जागतिक तापमान वाढीचे चटके भारतालाही बसू लागले. अतिवृष्टी झाल्यानंतर पश्चिम घाटात केरळपासून महाराष्ट्रापर्यंत दरडी कोसळून हजारो प्राणांची आहुती गेली. त्यानंतर लोकांना या अहवालाची आठवण आली. आपण इशारा देऊनही लोकांचे प्राण वाचवता आले नाहीत, हे पाहून गाडगीळ सरांच्या मनात काय विचार आले असतील, असा प्रश्न नेहमी पडत असे. मात्र यावर त्यांनी, ‘आपण हे कधीच सांगीतले होते’, अशी शेखी कधी मिरवली नाही. जंगलामध्ये राहणारे आदिवासींचे हक्क अबाधित राहावे, त्यांच्याकडूनही जंगलांचे नुकसान होणार नाही आणि त्यांचे उत्पन्न वाढेल, अशा प्रकारच्या योजना त्यांनी शासनास दिल्या. आदिवासींचा नैसर्गिक संसाधनावरील हक्क प्रथम मान्य केला पाहिजे, असे ते सांगत. यातूनच जैवशास्त्रीय संरक्षण वनही संकल्पना आली. त्यांचे सांगणे निस्पृह होते. मात्र निर्णय घेणाऱ्या यंत्रणांना बरे बोलणारे हवे असतात, खरे बोलणारे नव्हे. तरीही त्यांनी आपणास उमगलेले, गवसलेले जनतेपर्यंत पोहोचवणे काही सोडले नाही.

त्यांची साहित्याची जाणही उत्तम होती. त्यांची मराठीसह हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर उत्तम पकड होती. शिक्षण संशोधनाची भाषा ही इंग्रजी असल्याने त्यांचे संशोधनपर लेखन इंग्रजीतून झाले. २५० पेक्षा जास्त संशोधन निबंध जगभरातील दर्जेदार संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मराठीतूनही विपुल लेखन केले. विज्ञान, पर्यावरण मांडताना, वैज्ञानिक तथ्यांना लालित्याची जोड देऊन ते विज्ञान रंजक करत. संस्कृत साहित्यातील संकल्पना आणि वर्णनाचा उल्लेख ते चपखलपणे करत. आपोआपच त्यांचे लेखन लोकांना आवडू लागले. वैज्ञानिक लेखन करताना त्यामध्ये ऐकून माहीत असलेले ऐतहासिक आणि पौराणिक दाखले त्यामध्ये आल्याने वाचक त्यांच्या लेखनाशी जोडला जात असे. त्यांचे लेखन वाचताना त्यांच्या साहित्यविषयक अभ्यासाची खोली लक्षात येते. त्यांनी मराठीतून अनेक पुस्तके लिहिली. ‘उत्क्रांती एक महानाट्य’ हे पुस्तक त्यांच्या आयुष्यभरच्या संशोधनातून केलेले चिंतन आहे. ‘निसर्गाने दिलेला आनंदकंद’ वाचताना आपण आपले अनुभव त्यात शोधत राहतो. ‘वारूळ पुराण’ या पुस्तकाची प्रस्तावना त्यांच्या अभ्यासाची खोली दाखवते. त्यांनी अनेक मराठी आणि इंग्रजी दैनिकातून सदर आणि प्रासंगिक लेखन केले. याखेरीज सहा दर्जेदार इंग्रजी पुस्तकांचेही लेखन केले आहे. त्यांचे हे लेखन अखेरपर्यंत सुरू होते. शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना लेखन करणे कठीण झाले, तेव्हा ते भ्रमणध्वनीवर बोलून आपले लेख लिहीत.  

त्यांना भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांने सन्मानित केले आहे. तरीही त्यांच्या  कार्याची म्हणावी तशी देशपातळीवर दखल घेतली गेली नाही, असे वाटते. त्यांचे कार्य आणि मांडणी ही लोकानुनय करणारी नव्हती. लोकांना भविष्यातील धोक्याची जाणिव करून देणारी होती. १९८६ ते १९९० या काळात ते पंतप्रधानांचे विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार समितीचे सदस्य होते. १९९८ ते २००२ या कालावधीत ते जागतिक पर्यावरणविषयक सल्लागार समितीचे सदस्य होते. विज्ञान संशोधनासाठी त्यांना भटनागर पुरस्कारांनेही सन्मानित करण्यात आले होते. याखेरीज कुसुमाग्रज पुरस्कार, कर्नाटक शासनाचा सर्वोच्च राज्योत्सव पुरस्कार, कॅलिफोर्निया विद्यापीठाचा मात्र पर्यावरण क्षेत्रातील संशोधनासाठीचा नोबेल मानला जाणारा टायलर पुरस्कार, ईश्वरचंद्र विद्यासागर पुरस्कार, विक्रम साराभाई पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. २०२४ साली संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) पर्यावरणविषयक कार्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च ‘चॅम्पियन्स ऑफ दि वर्ल्ड’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांना अनेक संस्थांनी फेलोशिप आणि सदस्यत्व दिले होते.

त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत साधेपणा जपला. खादीची साधी, स्वच्छ वस्त्रे परिधान केलेले माधवराव गाडगीळ हे पर्यावरण अभ्यासकांचे प्रेरणास्थान होते. आपले म्हणने शांतपणे मात्र निग्रहाने मांडणे या त्यांच्या स्वभावामुळे ते नेहमी निसर्गपंढरीचे वारकरी वाटत. असा हा एक सच्चा पर्यावरणवादी, निसर्गाचा अभ्यासक, मानव हा अन्य जीवांप्रमाणेच एक आहे, त्यांने संपूर्ण जीवसृष्टीचे आपण मालक आहोत असे मानू नये, असे स्पष्ट सांगणारा, विकास न थांबवता पर्यावरणाची हानी टाळता येईल असे आराखडे देणारा एक अभ्यासक ८ जानेवारी २०२६ रोजी निसर्गात विलिन झाला. त्यांच्या जाण्याने अवघा पश्मि घाट पोरका झाला. सह्यकडाच नव्हे तर भारतातील संपूर्ण वनसृष्टीला एकटेपण जाणवावे इतके ते भारतातील जंगलांशी जोडले गेले होते. अवघे आयुष्य लोकांचे भविष्य सुरक्षित रहावे यासाठी कार्य करणाऱ्या या निसर्गाच्या वारकऱ्याच्या अंत्यविधीला ४०-५० लोकच उपस्थित होते. त्यांचे असे हे जाणे निश्चितच चटका लावणारे आहे. पण जेव्हा जागतिक तापमान वाढीचे चटके असह्य होतील, तेव्हा माधव गाडगीळ यांची पुन्हापुन्हा आठवण येईल.... मात्र तेव्हाही उशीरच झालेला असेल.