(ऊर्जा... प्रत्येकाला हवी असते. प्रत्येकाची
गरज आहे. ही ऊर्जा मातीतही आहे. माती.. जीला आपण मूल्यहीन म्हणतो, भाव कमी मिळाला
तर शेतकरी मातीमोल भावाने विकावे लागले असे सहज बोलतो. या मातीत मला मोठी ऊर्जा
जाणवली. त्यावरील लेख "नवे गाव आंदोलन" मासीकाच्या नोव्हेंबर २०१८च्या
ऊर्जा विशेषांकात प्रसिद्ध झाला. तो मूळ लेख येथे प्रकाशित करत आहे. धन्यवाद...
व्ही. एन. शिंदे)
--------------------------------------------------------------------------------------------
माणूस जन्माला येतो
आणि जमिनीशी पहिलं नातं निर्माण होते. जन्माला आल्यानंतर पहिले कांही दिवस, म्हणजे
रांगायला येईपर्यंत, बाळ आणि जमिनीमध्ये कपड्याचे अंतर असते. एकदा ते पालथं
झोपायला लागले की ते प्रथम मातीच्या संपर्कात येते. हळूचं पालथे असताना जड असणारे
डोके जमिनीला टेकते. जीभ मातीला चिकटते आणि मातीची चव चाखली जाते. पुढे अनेक लहान
मुले चक्क माती खातात. त्यासाठी मारही खातात. हळूहळू सवय मोडत जाते. माती खाणे
बहुतेकांचे सुटते, मात्र जगण्यासाठी मातीने दिलेलेचं खावे लागते. माणूस ते खात
राहतो. जगतो आणि एक दिवस मरतोही. माणसाचे हे नाते मृत्यूनंतर संपते. मेल्यानंतर
जात धर्म कोणताही असो तो मातीत मिसळून जातो. जाळले, तर राखेच्या रूपात आणि दफन
केले तर थेट. माणूस, पक्षी, अन्य पाळीव व जंगली प्राणी आणि सर्वांचे संगोपन करणाऱ्या
वनस्पती, या सर्वांचे अस्तित्व हे या मातीवर अवलंबून आहे. माती हा घटक नसता तर काय
झाले असते? समजा
खडकांच्या जमिनीचा भूप्रदेश असता, तर, त्या खडकावर सिमेंटची इमारत बांधणे सोपे
झाले असते. पण खाल्ले काय असते? खडकावर गिरीपुष्प यासारखी
वनस्पती सोडली तर कांहीच उगवत नाही. मग आपणास आवश्यक असणारे धान्य पिकवता आले असते
का? हे प्रश्न नकळत मनात आले आणि हळूहळू जाणवायला लागले,
माती ही एक ऊर्जा आहे. सर्वशक्तीमान ऊर्जा. पृथ्वीवरील जीव निर्माण करण्याची आणि
तो मेल्यानंतर त्याला सामावून घेण्याची ताकत असणारी ती एक शक्ती आहे. या मातीचे
महत्त्व "ॲग्रीकल्चर टेस्टामेंट" या पुस्तकातून सर्वप्रथम अल्बर्ट
हॉवर्ड या संशोधकाने जगाला सांगीतले.
ब्रिटनमधील श्रॉपशायर परगण्यात रिचर्ड आणि अॅन हॉवर्ड या दांपत्याच्या पोटी अल्बर्ट
यांचा जन्म ८ डिसेंबर, १८७३ रोजी झाला. त्यांचे
वडील शेतकरी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण रेकिन महाविद्यालयातून झाले. पुढे
त्यांनी सेंट जॉन कॉलेजमधून केंब्रिज विद्यापीठाची निसर्ग विज्ञान विषयातून पदवी
प्राप्त केली. त्यानंतर १८७७ मध्ये त्यांनी कृषीशास्त्राचा पदविका अभ्यासक्रम
पूर्ण केला. त्यांनी १९०२ पर्यंत कृषीशास्त्राचा
शिक्षक म्हणून इंपिरिअल डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरल कॉलेजमध्ये काम केले. नंतर
त्यांची वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून कृषी महाविद्यालयात नियुक्ती झाली. १९०५ पासून
भारताचा कारभार पाहणाऱ्या खात्यामध्ये बदली झाली. ते वनस्पती शास्त्रातील अर्थविषयक
सल्लागार म्हणून काम पाहू लागले. त्यानंतर त्यांची भारतात पाश्चिमात्य शेती पद्धती
रूजविण्यासाठी नियुक्ती करण्यात आली.
लॉर्ड कर्झन यांनी भारतात पुसा येथे कृषी संशोधन संस्था सुरू केली होती.
वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे मोठी जिवीतहानी होत होती. जनतेला वाचवायचे असेल तर
कृषी उत्पादन वाढवणे आवश्यक होते. ती नैतिक जबाबदारी सरकारची होती. अन्नधान्य आयात
करून सरकार अन्नधान्याची गरज भागवू शकत
नव्हते. त्यासाठी भारतात लॉर्ड कर्झन यांच्या पुढाकाराने कृषी संशोधन केंद्र
स्थापन करण्यात आले. त्यामध्ये अनेक संशोधकांच्या नियुक्त्या झाल्या. अल्बर्ट त्यापैकीचं
एक. अल्बर्ट यांनी पुसा येथील कृषी संशोधन केंद्रात कार्य सुरू केले. सुरूवातीला त्यानी
येथील लोकांच्या आहाराच्या पद्धतीचा अभ्यास सुरू केला. एकदा जंगलात फिरताना
त्यांना कांही आदिवासी भेटले. घनदाट जंगलात
राहणाऱ्या त्या लोकांची शरीरयष्टी पाहून ते आश्चर्यचकीत झाले. त्यांच्या आहार पद्धतींची त्यानी माहिती घेतली.
तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले की या लोकानी निसर्गत: पिकवलेली फळे आणि अन्य
घटक खावूनही ही मंडळी धष्टपुष्ट आहेत. त्यानी आदिवासींच्या शेतीचा अभ्यास केला.
इतर ग्रामिण भागातील शेती पद्धतीही अभ्यासली. त्यातून पिकणाऱ्या धान्यातील सकसपणा
अभ्यासला आणि त्याना या शेती पद्धतीचे महत्त्व समजले. त्यांच्या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले की, मातीमध्ये
रासायनीक खते मिसळण्याची गरजच नाही. पाश्चिमात्य शेती पध्दती भारतात रूजविण्यासाठी आलेले अल्बर्ट भारतातील शेती
पध्दतीच्या हळूहळू प्रेमात पडू लागले. निसर्गात जे पिकते, त्यातील आवश्यक भाग काढून राहीलेला भाग, शेतातील मातीत
मिसळला तर माती सुपिक राहते. पीक चांगले येते. ते भारतीय पद्धत वापरून आधुनिक शेती
करू लागले. ते सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते बनले.
शेतातील पालापाचोळा, जैवीक घटक जाळून नष्ट
करण्याऐवजी त्याना कुजवण्यासाठी त्यानी इंदौर पॅटर्न नावाने ओळखले जाणारे खड्डे
घ्यायला सुरूवात केली. कुजलेले खत शेतात मिसळून अमाप पीक निघते, हे लोकाना दाखवले.
मात्र त्यांच्या नेमूनलेल्या कार्यापेक्षा हे विपरीत होते. पुढे पुढे तर अल्बर्ट
भारतीय शेतकऱ्यांचा उल्लेख "माय प्रोफेसर्स" असा करू लागले. इंग्रज
वरिष्ठाना त्यांचे हे काम मूळीचं पसंत नव्हते. ते नाराज झाले. त्याना परत
पाठवण्यापर्यंत विचार सुरू झाला. खत कंपन्यांनाही
हे मानवणारे नव्हते. सुरूवातीला शासनाला त्यांचे हे उद्योग पटले नाहीत. मात्र इंग्लंडच्या राणीने जेंव्हा सेंद्रिय
शेतीतील आंबे खाल्ले, तेंव्हा ती बेहद खुश झाली. सन १९३४ मध्ये "सर" हा
किताब देऊन तीने अल्बर्ट यांचा सन्मान केला. त्यांच्या मते 'माती सशक्त असेल, तर, त्या जमिनीवर पिक
चांगले येईल. सशक्त असणाऱ्या पीकांचे धान्य खाल्ले, तर माणूस सशक्त राहील'. या त्यांच्या निष्कर्षावरील "ॲग्रीकल्चर टेस्टामेंट" पुस्तकही
वादळी ठरले. हे सेंद्रिय शेतीचा
पुरस्कार करणारे पुस्तक होते. त्या पुस्तकातील त्यांचे
निष्कर्ष अनेकाना मान्य नव्हते. मात्र पुढे लोकाना आणि संशोधकाना त्यांचे म्हणणे
पटू लागले आणि आज तर सेंद्रिय शेती हा परवलीचा शब्द बनू लागला आहे. अल्बर्ट यांचे
प्रयोग आणि कार्य हे मातीचे महत्त्व सांगणारे होते. माती ही अनमोल आहे. सुदृढ
जीवनासाठी सुदृढ जमिनीची आवश्यकता आहे. सुदृढ जमिनीमध्ये जर सजीव माती असेल तरचं
शेती ही समृद्ध राहू शकते.
त्यांनी वनस्पती उद्योग विभागाचे संचालक म्हणूनही काम पाहिले. इंदौर आणि
राजपुताना संस्थानाचे ते कृषी मार्गदर्शक होते. त्यांची रॉयल सोसायटीने फेलो
म्हणून नियुक्ती केली. इंदौरच्या शेती संशोधन केंद्राचे ते प्रमुख होते. त्यांच्या
प्रथम पत्नी गॅब्रिएलाचे निधन झाले. त्यानंतर मेव्हणी ल्यूसी यांच्याशी त्यानी
विवाह केला. या दोघीनीपण त्यांच्या संशोधनात मोलाचे योगदान दिले. अल्बर्ट यांनी
सेंद्रीय खत बनवण्याचा इंदौर पॅटर्न विकसित केला. तसेच भारतीय शेती पध्दतीचा
पुरस्कार करणारे 'फार्मिंग ऑर गार्डनिंग फॉर
हेल्थ ऑर डिसिज' हे पुस्तक १९४० मध्ये
प्रकाशित केले. या व्यतिरिक्तही त्यांनी अनेक शोधनिबंध आणि पुस्तके प्रकाशित केली.
रासायनिक खताचा प्रसार करायला आलेला हा संशोधक. मातीचे महत्व ओळखून रासायनिक खताचा
दुस्वास करू लागला. मात्र २० ऑक्टोबर, १९४७ ला शेवटचा श्वास
घेईपर्यंत हा संशोधक भारतिय शेती पद्धतीचा पुरस्कार करत राहीला. असे हे अल्बर्ट मातीचे महत्त्व जाणणारे पहिले
संशोधक. त्यांनी मानवाला खऱ्या अर्थाने मातीचे महत्त्व सांगीतले. ही माती तयार
होण्याची दिर्धकालीक प्रक्रिया आहे.
पृथ्वी सुरूवातीला खडकाळ
होती. अनेक वर्षानंतर त्यापासून माती तयार झाली. खडक फुटून सुरूवातीला त्याचे
लहानमोठे तुकडे तयार झाले. ही प्रक्रिया वातावरणातील भौतिक बदलातून झाली. त्यानंतर
त्यातील मुलद्रवांचे ऑक्सीडेशन, विद्रावीकरण, जल संयोगीकरण, कर्ब पदार्थाचे मिसळणे
आदि अनेक प्रक्रिया णाल्या आणि आजची ही माती बनली. तीला लाखो वर्षाचा इतिहास आहे.
पुढे निसर्गचक्रात पाऊस आला. पाऊस या मातीवर पडल्यानंतर मातीत ओलावा निर्माण झाला.
त्यात असंख्य जीव जन्मू लागले. जगले. त्यानी मातीला सकस बनवत अनेक वनस्पतींच्या
वाढीसाठी पोषक घटक पुरवायला सुरूवात केली. त्यानंतर आजची सुंदर जीवसृष्टी निर्माण
झाली. निसर्गाची यातून वेगवेगळी चक्र सुरू झाली. झाडे वनस्पती या मातीतून
स्वत:च्या वाढीसाठी आवश्यक घटक घेतात. मातीचे हे उपकार स्मरत, पावसाने तीची हानी
किंवा धूप होऊ नये म्हणून मातीवर स्वत:च्या पानाचे आवरण घालतात. मातीचे सरंक्षण
करतात. ही पाणी परत मातीत कुजून तीला आधिक सुपीक बनवतात. मातीचे वाळू, वाळू दुमट,
दुमट लोम, गाळ दुमट, चिकण माती असे अनेक प्रकार आहेत. मातीच्या रंगावरूनही काळी
माती, लाल माती, पांढरी माती असे मातीचे प्रकार आहेत.
माती ही सजीव आहे. एका गावाच्या
लोकसंख्येपेखा जास्त जीव एक चौरसमीटर जमिनीतील
मातीत जगत असतात. हे जीव त्या
मातीवर पेरलेल्या पीकाला आवश्यक घटक पुरवतात. दसऱ्यापुर्वी घटस्थापना करताना त्या
मातीत रब्बी हंगामात पेरावयाचे धान्य कसे उगवते हे पाहून शेतकरी धान्य पेरतो.
कोणते पीक चांगले येणार याचा अंदाज बांधतो. म्हणजेचं माती प्रतिसाद देते. मातीमध्ये
धान्य पेरले की माती त्याला अंकूर फुटेपर्यंत पोटात सामावून घेते. नंतर तो कोंब
बाहेर येतो आणि त्याचे स्वतंत्र अस्तित्व जाणवते. त्याची मूळे मात्र मातीत घट्ट
रूतलेली असतात. मातीतील अनेक घटक ही मूळे शोषतात. त्यातून ती ऊर्जा साठवत वाढत राहतात.
जैवीक ऊर्जा साठवत ती वाढतात. मात्र मूळांना जमीनीतून बाहेर काढताचं ते झाड
निस्तेज बनते. मरते. इंजीनातील इंधन संपल्यानंतर ते बंद पडते तसे. झाडाचाही
मातीबाहेर येताच ऊर्जा प्रवाह बंद पडतो. म्हणूनचं माती हे चैतन्याने भरलेली आहे. ती
मूल्यहीन नाही अनमोल आहे. सचेतन आहे. म्हणूनचं पहिला पाऊस पडताचं मातीचा सुगंध
आसमंत गंधीत करतो. शेतकऱ्याला सजीवपणाची जाणिव करून देतो. तीला जपले पाहिजे. माती
जगली पाहिजे. माती जगली नाही तर ही जीवसृष्टीही जगणार नाही हे मात्र निश्चित.
"उर्जा मातीची" खूपच आवडली..माती(सेंद्रीय शरीर) जगविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
उत्तर द्याहटवाPanch tatwani banlelya sharirache mati he tatv aplyala pruthivar stable vhayla madat karte.
उत्तर द्याहटवाYa madhil urjemule aplyalla sarv anubhavache dnan hote
Khup sunder varnan sir apan kele ahe.
11:12 AM
उत्तर द्याहटवाPanch tatwani banlelya sharirache mati he tatv aplyala pruthivar stable vhayla madat karte.
Ya madhil urjemule aplyalla sarv anubhavache dnan hote
Khup sunder varnan sir apan kele ahe.
सर,अप्रतिम आणि अवर्णनीय लेख आहे....
उत्तर द्याहटवाVery nice article
उत्तर द्याहटवाखूप छान 👌
उत्तर द्याहटवामातीशी नाती निर्माण केल्यास काय होते आणि मातीची माती केल्यास काय होऊ शकते याचे छान वर्णन यालेखात आपण केलेला आहात. आपले मनापासून अभिनंदन करतो.
उत्तर द्याहटवाउत्तम..
उत्तर द्याहटवाVery nice and knowledgeable article which gives information about the origin of energy and importantance of soil.keep it up sir.
उत्तर द्याहटवाVery nice sir!
उत्तर द्याहटवाजबरदस्त! Energy conservation नेहमीच डोक्यात होतं पण उर्जेचा हा प्रकार म्हणून नाही कधी शिकला ना शिकविला...
उत्तर द्याहटवाउद्या 9th ला work and energyघ्यायचं आहे . Officially शिकवू का हा form of energy?
जबरदस्त! Energy conservation नेहमीच डोक्यात होतं पण उर्जेचा हा प्रकार म्हणून नाही कधी शिकला ना शिकविला...
उत्तर द्याहटवाउद्या 9th ला work and energyघ्यायचं आहे . Officially शिकवू का हा form of energy?
ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात जाते, त्यात रासायनीक, भौतिक बदल आपण शिकवतो. मात्र जैविक बदलामुळे होणाऱ्या भौतिक आणि रासायनीक बदलाचा आपण तसा अभ्यास करत नाही. खरंतर मुलाना वे गळ्या दिशेने विचार करायला शिकवले पाहिजे. मात्र आपल्याला अभ्यासक्रमात आणि मुलाना मार्कसमध्ये गुंतून राहाव लागत. पण मुलाना हा दृष्टीकोन शिकवला तर खुपचं छान!
हटवा