शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१८

नरसिंहा, मित्रा, जायची घाई केलीस...



(शिवाजी विद्यापीठातील संगीतशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. एन.व्ही. चिटणीस यांचे रात्री निधन झाले. एक जिंदादिल माणूस. मैत्रीच्य एका वेगळ्या उंचीवर दिसणारा. त्यांचे निधन मनाला चटका लावणारे. त्याना भावपूर्ण श्रद्धांजली... व्ही. एन. शिंदे)                                 
--------------------------------------------------------------------------------------------
         
       डॉ. एन.व्ही. तथा नरसिंह चिटणीस सर. संगीतशास्त्र अधिविभागप्रमुख. वयाने आमच्यापेक्षा नऊ -दहा वर्षनी मोठे. वयाची बंधनं कधीच विसरलेले. प्रशासनातील लोकात मिसळलेले. मी २००३ मध्ये सोलापूरहून आलो आणि या माणसाशी कधी जोडला गेलो कळलेच नाही. ओळख झाली आणि नकळत मैत्रीत रूपांतर झाले. आम्ही आमची मैत्री घरापर्यंत नाही नेली. कार्यालयापुरतीचं ठेवली. मात्र त्यात ओलावा होता. एकमेकाला समजून घेणारा हा माणूस होता. काही सल्ले देणारे, माहिती देणारे हे व्यक्तीमत्त्व. एनव्ही एक जिंदादिल माणूस होता हे मात्र खरे.  डॉ. गीरीष कुलकर्णी, डॉ. एन.पी सोनजे, श्री. संजय कुबल, आणि मी ही त्यांची मुख्य प्रशासकीय इमारतीत भेट द्यायची ठिकाणे. माझी परीक्षा विभागात बदली झाली, तर ते तिथे भेटायला यायचे. तत्कालीन वरिष्ठांची माझ्यावर खपा मर्जी असली तरी त्याची त्यानी पर्वा केली नाही. परीक्षा भवनमध्ये आवर्जून भेटायला येणारा हा माणूस. २००९-१०च्या त्या कठिण कालखंडात सदैव भेटत असायचा. एक आत्मविश्वास देत असायचा. "व्हीएन, तु पुढे जाणार रे. दिवस बदलत असतात. हा एक बॅडपॅच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. जास्त विचार करू नको" असा आत्मविश्वास द्यायचे. एक फार वेगळे व्यक्तीमत्व. नाटक हा त्यांचा आत्मा. नाटकाला साजेशा खर्जातील आवाज. मात्र व्यावसायीक रंगभूमीकडे न वळता अध्यापनात आलेला माणूस. विभागाच्या कामात काही अडचण आली की हा माणूस फोन करायचा.
      फोनवर त्यांच्या खास आवाजात "व्हीएन, मी चिटणीस बोलतोय. मोकळा आहेस का? मला जरा बोलायचं होतं". असं म्हणायचे. आपण जरा काम आहे असं सांगीतल की यांच पुढे सुरू. "तू कधी कामात नसतोस. नाटकं करणे आमचं काम आहे. तू नको नाटक करू. हे बघ मी येतोय. मला पाचं मिनिटे पाहिजेत. मी दहा मिनिटात येतो". असे सांगून दहाव्या मिनिटाला खरंच येणारे चिटणीस सर. त्यांचा आवाज प्रदिप भिडेंच्या आवाजाची आठवण करून द्यायचा. सुरूवातीला आम्ही त्याना अहो-जाहो करायचो. पण २००८ मध्ये तत्कालीन कुलगुरू माणिकराव साळुंखे सरानी मणीपाल भेटीसाठी विद्यापीठातील अधिकारी, विभागप्रमुख, अधिष्ठाता आणि कांही अधिकार मंडळाच्या सदस्याना नेले. त्यामध्ये आम्ही बसताना चिटणीस सराना आमच्या बसमध्ये घेतले. आणि आम्ही जवळ आलो. धमाल मस्ती केली. बसमध्ये कोणीचं झोपायचे नाही असे ठरवले. मात्र मी आणि कुबल सोडून सर्वजण झोपले. कोणीही झोपले की मी त्यांचा फोटो काढणार म्हणून दम पण दिला. पण सारेजण झोपले आणि सर्व पुरूष मंडळी झोपली असताना आम्ही टिपली. चिटणीस सर आमच्या बसमध्ये असल्याने प्रवास हलका झाला. अहो-जाहोची भाषा त्यानी सोडली तरी आम्ही अरे तुरे करत नव्हतो. मग चिटणीस सरानी आमचं प्रबोधन केले आणि "साल्या मला अहो जाहो करून म्हातारा करतोस काय?" असा प्रश्न केला. आमचा नाइलाज झाला. ट्रिपमध्ये अरे तुरे झाले. पण तरीही आम्ही आजही त्याना अहो-जाहो करायचो. कधीकधी ते पुन्हा पहिल्या लयीमध्ये येत वयाचा विचार सांगायचे.
      मध्ये एका माहितीच्या अधिकाराच्या अर्जाने ते बरेचं वैतागले. एक दिवस संध्याकाळी ऑफिसमध्ये येऊन तासभर चर्चा केली. काहीही मदत पाहिजे असली की एनव्ही आणि व्हीएन भेटणे आले. कधी कधी एकटे जरा वेळ मिळाला की यायचे. काय सर काय विशेष असं म्हटलं की जरा तुझ्याकडून चहा प्यायचाय रे म्हणायचे. किती दिवस भेटला नाहीस. काम होत म्हटलं की बस कर की नाटक म्हणयचे. जरा गप्पा मारायचे. मला व्ही.एन. हे संबोधन प्रथम वापरायला सुरूवात केली ती चिटणीस सरानी. खरंतर मी सुरूवातीला माझं नाव विलास शिंदे असे वापरायचो. पण चिटणीस सर आवर्जून व्ही.एन.चं म्हणायचे. मी म्हणयचो पण तुम्ही एनव्ही म्हणून माझे व्हीएन करता का? यावर ते फक्त हसायचे पण व्ही.एन.चं म्हणायचे.
      मध्ये दोन वर्ष नांदेडला असताना संपर्क कमी झाला. मी नांदेडवरून परत आलो आणि चिटणीस सर आजारी होते असे कळाले. परत भेटी सुरू झाल्या. ते आजारातून बरे झाले. तर मी आजारी पडलो. ते फोन करून घराजवळ यायचे. बोलायचे. घरी चला म्हटले की "आजारी माणसाचं करून घरची कंटाळतात, आणखी आपण कशाला त्रास द्यायचा म्हणायचे." मात्र भेटत राहायचे. पाय मोडला तेंव्हाही हा नाटकातला माणूस सदैव संपर्कात असायचा. "व्हीएन, लवकर बरा हो. तुला फिरताना बघायला बरं वाटतं. बेडवर आडवा व्हीएन मला बघायचा नाही" हा डायलॉग एक दोन दिवसातून ऐकावा लागायचा.
      मात्र आज रात्री एक वाजून अठरा मिनीटानी प्रा. विजय ककडे सरांचा व्हॉटसअप मेसेज आला. नरसिंहा इज नो मोअर. सकाळी मी तो सर्व अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर टाकला. पण लगेचं काढून टाकला. म्हटल एनव्ही नाटकातला माणूस. हेही नाटकच असणार. एवढ्यात तो जाणार नाही. त्याला जायची घाई थोडीचं आहे. त्याला अजून बरीचं कामे करायची आहेत. तुम्हाला माझ्या कथावर एकांकिका बनवायची होती. त्यासाठी चर्चा करणार होता. सारे काही राहिले. ही बातमी खोटी ठरो. मनात असे विचार सुरू होते, तेवढ्यात जीएस कुलकर्णी सरांचाही संदेश आला. भ्रमणध्वनीवरून परत ककडे सराकडून खात्री करून घेतली. मात्र दुर्दैवाने ती बातमी खरी होती. अनेक नाटकातून "वन्स मोअर" घेणारे कलावंत घडवणाऱ्या एनव्हींच्या बाबत "नरसिंहा इज नो मोअर" हे नाटक नव्हत... मन अस्वस्थ करणारे वास्तव होत. ते स्वीकारणे भाग पडले.इतराना नाटकात काम कसं करायचे हे शिकवणारा आणि मला मात्र "नाटक करू नको," असा हक्कान दम देणारा एनव्ही उर्फ नरसिंहा आज नाही.
      प्रश्न आणि एकचं प्रश्न... सर, आम्ही अहो-जाहो बोलायला नको होते...कारण आमच्यापेक्षा तुम्ही म्हातारा ठरत होतात. मग ही आज अचानक जायची घाई का केली?

८ टिप्पण्या:

  1. Very lively, energetic person....sir ur untimely exit is difficult to believe!! How can I say rest in peace to a magnificent man who brought that liveliness, that charismatic aura in everybody who was in his vicinity!! Our lives are touched by you sir!!! We will miss u sir...always!!!!

    उत्तर द्याहटवा
  2. Khare aahe sir,te jari aajari hote tari,tyanchya dehbolitun te ase kadhi janaun det navte.amachya sarkhyala hakkane aare ture karayche.nehmi jamel ti madat nishank manane karayche.vadilkichya natyane bolayche.Asha ya jindadil vyaktimatvachi anpekshit exit manala chataka lavat aahe..

    उत्तर द्याहटवा
  3. एका चांगल्या मित्राचा तिसरा अंक संपला आणि पडदा पडला भावपूर्ण श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा