शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

सर अल्बर्ट हॉवर्ड


(इंग्लंडमधून भारतात एक शास्त्रज्ञ येतो ते भारतियाना आधुनिक शेती पद्धती शिकवण्यासाठी आणि नंतर येथील शेती पद्धतीच्या प्रेमात पडतो. तो सेंद्रिय शेती पद्धतीचा पुरस्कार करतो. भारतातील शेतकरी माझे प्राध्यापक आहेत असे विश्वाला सांगतो. अशा महान शास्त्रज्ञाचा आज जन्म दिन. त्यांच्या जीवनाचा हा संक्षिप्त परिचय खास आपल्यासाठी... व्ही. एन. शिंदे)                                 
--------------------------------------------------------------------------------------------

एखादया व्यक्तीची एका विशिष्ट कार्यासाठी नियुक्ती व्हावी. त्या व्यक्तीने त्या ठिकाणी गेल्यावर मूळ हेतू विसरावा आणि तेथील जनतेच्या आणि मातीच्या प्रेमात पडावे. त्यांच्यातील एक होवून जावे. असेच काहीसे सर अल्बर्ट हॉवर्ड यांच्याबाबतीत घडले. भारतात वारंवार मोठे दुष्काळ पडत होते. या  दुष्काळावर मात करायची तर आधुनिक पाश्चात्य शेती पध्दती भारतातील लोकांना शिकवली पाहिजे. ती शिकविण्यासाठी अल्बर्ट यांना ब्रिटीश शासनाने भारतात पाठवले. पण भारतातील शेती पध्दतीच्या प्रेमात पडून ते शेती कशी करावयाची हे शिकायचे असेल तर भारतात या असे सांगू लागले. असे हे सर अल्बर्ट हॉवर्ड सेंद्रीय शेती पध्दतीचे जनक म्हणून ओळखले जावू लागले.
ब्रिटनमधील श्रॉपशायर परगण्यात रिचर्ड आणि अॅन हॉवर्ड या दांपत्याच्या पोटी अल्बर्ट यांचा जन्म ८ डिसेंबर, १८७३ रोजी झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण रेकिन महाविद्यालयातून झाले. पुढे त्यांनी सेंट जॉन कॉलेजमधून केंब्रिज विद्यापीठाची निसर्ग विज्ञान विषयातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर १८७७ मध्ये त्यांनी कृषीशास्त्राचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.
त्यांनी १९०२ पर्यंत कृषीशास्त्राचा शिक्षक म्हणून इंपिरिअल डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरल कॉलेजमध्ये काम केले. नंतर त्यांची वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून कृषी महाविद्यालयात नियुक्ती झाली. १९०५ पासून भारताचा कारभार पाहणाऱ्या खात्यामध्ये बदली झाली. ते वनस्पती शास्त्रातील अर्थविषयक सल्लागार म्हणून काम पाहू लागले. त्यानंतर त्यांची भारतात पाश्चिमात्य शेती पद्धती रूजविण्यासाठी नियुक्ती करण्यात आली.
लॉर्ड कर्झन यांनी त्याकाळी पुसा येथे कृषी संशोधन संस्था सुरू केली होती. वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे मोठी जिवीतहानी होत होती. यातून जनतेला वाचवायचे असेल तर कृषी उत्पादन वाढवण्याची नैतिक जबाबदारी सरकारची होती. अन्नधान्य खरेदी करून ते सरकार पुर्ण करू शकत नव्हते. त्यासाठी भारतात लॉर्ड कर्झन यांच्या पुढाकाराने कृषी संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक संशोधकांच्या नियुक्त्या झाल्या. त्यामध्ये अल्बर्ट यांचा समावेश होता. अल्बर्ट यांनी पुसा येथील कृषी संशोधन केंद्रात कार्य सुरू केले. त्यानी सुरूवातीला येथील लोकांच्या आहाराच्या पद्धतीचा अभ्यास सुरू केला. एकदा जंगलात फिरताना त्यांना कांही आदिवासी भेटले. त्यांच्या आहार पद्धतींची त्यानी माहिती घेतली. तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले की या लोकानी निसर्गत: पिकवलेली फळे आणि अन्य घटक खावूनही ही मंडळी धष्टपुष्ट आहेत. त्यानी या मंडळीच्या शेतीचा अभ्यास केला. इतर ग्रामिण भागातील शेती पद्धती अभ्यासली. त्यातून पिकणाऱ्या पदार्थातील सकसपणा अभ्यासला आणि नंतर त्याना या शेती पद्धतीचे महत्तव समजले. पाश्चिमात्य शेती पध्दती भारतात रूजविण्यासाठी आलेले अल्बर्ट भारतातील शेती पध्दतीच्या हळूहळू प्रेमात पडू लागले.
भारतीय शेती पध्दतीतून होणारे अन्नधान्याचे उत्पादन हे आधिक पोषक असल्याचे निरीक्षणांती त्यांच्या लक्षात आले. त्यामध्ये मातीचा सकसपणा हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांच्या लक्षात आले. माती जर सकस असेल, वनस्पतींना आवश्यक असणारे सर्व अन्न घटक धारण करणारी मृदा असेल आणि अशा मातीत उत्पादित झालेले अन्न आहारात असेल तर मानव आणि पशू आजारी पडणार नाहीत असे प्रतिपादन अल्बर्ट यांनी केले. हे निरीक्षण शास्त्रीय पातळीवर तपासून त्यांनी माती निरोगी असेल तर मानव आणि पशू निरोगी राहतीलअसे सांगितले. मातीचा सकसपणा टिकवण्यासाठी मानवाला आवश्यक पिक घेतल्यानंतर पिकाचा अर्वरीत भाग जमिनीत कुजवणे आणि शेतात पसरण्याची पद्धती त्यानी अभ्यासली. भारतीय शेती पद्धतीचा त्यानी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला. शेतातील टाकाउ घटकाना कुजवण्यासाठी त्यांनी इंदौर संस्थानाच्या शेतीत प्रयोग केले. विशिष्ट आकाराचा खड्डा घेवून त्यामध्ये सेंद्रिय खतांची निर्मिती केली. ही पद्धती पुढे इंदौर पॅटर्न म्हणून ओळखली जावू लागली. पुढे पुढे तर भारतीय शेतकरी माझे गुरू आहेत असे आभिमानाने सांगत असत.
वनस्पती उद्योग विभागाचे संचालक म्हणून अल्बर्ट यांनी काम पाहिले. इंदौर आणि राजपुताना संस्थानाचे ते कृषी मार्गदर्शक होते. त्यांची रॉयल सोसायटीने फेलो म्हणून नियुक्ती केली. इंदौरच्या शेती संशोधन केंद्राचे ते प्रमुख होते. त्यांच्या प्रथम पत्नी गॅब्रिएलाचे निधन झाले. त्यानंतर मेव्हणी त्यांची ल्यूसी यांच्याशी त्यानी विवाह केला. या दोघीनीपण त्यांच्या या संशोधनात मोलाचे योगदान दिले. अल्बर्ट यांनी सेंद्रीय खत बनवण्याचा इंदौर पॅटर्न विकसित केला. तसेच अॅग्रीकल्चरल टेस्टामेंट हे सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करणारे पुस्तक लिहीले.  भारतीय शेती पध्दतीचा पुरस्कार करणारे फार्मिंग ऑर गार्डनिंग फॉर हेल्थ ऑर डिसिज हे पुस्तक १९४० मध्ये प्रकाशित केले. या व्यतिरिक्तही त्यांनी अनेक शोधनिबंध आणि पुस्तके प्रकाशित केली.
रासायनिक खताचा प्रसार करायला आलेला हा संशोधक. मातीचे महत्व ओळखून रासायनिक खताचा दुस्वास करू लागला. अर्थात खत कंपन्यांना हे मानवणारे नव्हते. सुरूवातीला शासनाला त्यांचे हे उद्योग पटले नाहीत. मात्र नंतर त्यांना १९३४ मध्ये ‘‘सर‘‘ या उपाधीने सन्मानित करण्यात आले. मात्र २० ऑक्टोबर, १९४७ ला शेवटचा श्वास घेईपर्यंत हा संशोधक भारयि शेती पद्धतीचा पुरस्कार करत राहीला.

४ टिप्पण्या:

 1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

  उत्तर द्याहटवा
 2. भारतीय शेतकरी हे नैसर्गिक शेती करीत असत. सर अल्बर्ट हॉवर्ड यांनी भारतीय शेतीचा अभ्यास करून तिचा पुरस्कार केला. त्यांनी भारतीय पद्धतीची नैसर्गिक शेती त्यांच्या मायदेशात रुजविण्याचा प्रयत्न केला तो नैसर्गिक शेती म्हणूनच. परंतु तत्कालीन परिस्थितीत ब्रिटनमध्ये सेंद्रिय नावाने शेती पद्धतीचा उगम होत होता. परंतु सेंद्रिय शेतीमध्ये वापरली जाणारी कांहीं आदने ही भांडवलशाही तत्वावर आधारलेली असल्यामुळे नैसर्गिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे खर्चिक होते. परंतु त्यांनी मांडलेल्या नैसर्गिक शेतीचे तत्व भांडवलशाही लोप झाले वा ते करण्यात आले. शिवाय नैसर्गिक शेती ही भारतीय बनावटीची असल्यामुळे तेथील ब्रिटिश नागरिकांनी ती नाकारली. त्यामुळे सर अल्बर्ट हॉवर्ड यांना भारतीय शेतीचे ज्ञान नव्याने उदयास येणाऱ्या सेंद्रिय शेतीच्या संकल्पनेत मांडावे लागले. त्यांनी आपल्या Agriculture Testonomy मध्ये भारतीय नैसर्गिक शेतीची मांडणी सेंद्रिय शेती पद्धतीत केली. त्यामुळे सेंद्रिय शेतीस सोनेरे दिवस प्राप्त झाले आणि सर अल्बर्ट हॉवर्ड हे सेंद्रिय शेतीचे जनक म्हणून गणले गेले.

  भारतात सुभाष पालेकर यांनी भारतीय नैसर्गिक शेती पद्धतीचा अभ्यास करून त्याचे पुनरुज्जीवित केले. त्यांनी भारतीय कृषी संस्कृतीचा वारसा नैसर्गिक शेती या नावाने नव्याने उदयास आणला. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गात आर्थिक दृष्टिकोनातून तिचे महत्त्व पटवून देण्यासाठी व शेतकरी वर्गात ती अंगीकृत करण्यासाठी झीरो बजेट या तत्त्वाने तिची मांडणी केली. त्यामुळे सुभाष पालेकर यांची झीरो बजेट नैसर्गिक शेती भारतात वेगाने पसरत आहे. त्यांच्या या कार्याची दखल देऊन भारत सरकारने सुभाष पालेकर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. यामध्येही पाळेकर यांनी भांडवलशाही नफा केंद्रित आदाने वापण्यास प्रतिबंध केलेला आहे. नैसर्गिक रित्या मातीत तयार होणारी शुण्याधारित आदानांची निर्मिती शेतकऱ्यांनी स्वतः तयार करण्याच्या कार्याचा त्यांनी मार्ग दाखवला आहे.

  ..... तानाजी घागरे, अर्थशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. tanajighagare.blogspot.in

  उत्तर द्याहटवा
 3. Thank you for detailed comment. Work of Padmashri Palekar is grat. Sir Albert Howard is the firs foreigner who recognised significance of farming by Indians. He advocated openly by stating "Indian farmers are my Professors". Today is birth anniversary of Sir Albert Howard, hence this brief article

  उत्तर द्याहटवा