_________________________________________________________
ll १ ll
रखरखणारे
ऊन, दिवसभर वाढत जाणारे तापमान, सूर्य मावळला तरी अंगातून निथळणाऱ्या घामाच्या धारा.
असा असतो उन्हाळा. जीव नकोसा करून टाकणारा. मात्र याच उन्हाळ्यात नवनिर्मितीला सुरुवात
होते. पानझड झालेल्या झाडांना नवी पालवी फुटते. नव्या पानांसोबत विविध वनस्पतींना कळ्या
येतात, फुले फुलू लागतात आणि वसंत ऋतू विविध रंगांची बरसात करत राहतो. उन्हाळा हा आंब्याचाही
मौसम. आंबे आवडत नाहीत, असा माणूस दुर्मिळ. अनेकजण चांगल्या चवीच्या आंब्यासाठी अक्षय्य
तृतियेपर्यंत वाट पाहतात. आपल्या अवीट गोडीने सर्वप्रिय असणारे हे फळ भारताचे आणि पाकिस्तानचे
राष्ट्रीय फळ, तर बांग्लादेशचा राष्ट्रीय वृक्ष.
आपल्या खास चवीने सर्वप्रिय बनलेल्या या फळाला मराठीत आंबा, संस्कृतमध्ये आम्रम्, रसाल, अतिसौरभ, कोकणीमध्ये आंबो, हिंदीमध्ये आम, आंब, गुजरातीत केरी, आंबो, सिंधीमध्ये आंब, आमु, तमिळमध्ये मांबाझम, मांकाय, मम्मारूम, मांगाय, तेलगूमध्ये मामिडी, मामाडिचिट्टू, पंजाबीमध्ये आंब किंवा आम, ओडिसीमध्ये आंबा, आम, काश्मिरीमध्ये आंब, मल्याळमध्ये मना किंवा मंगा, कन्नडमध्ये मावू, माविनहन्नु म्हणून ओळखले जाते. याला इंग्रजीमध्ये मँगो म्हणतात. हे नाव मल्याळममधील मना किंवा मंगा या नावावरून आले, असे मानले जाते. पंधराव्या आणि सोळाव्या शतकात दक्षिण भारतात मसाल्याच्या व्यापारासाठी पोर्तुगीज आले आणि हे फळ त्यांना चाखावयास मिळाले. त्यांना ते आवडले आणि त्याला ‘मंगा’ असे म्हणायला सुरुवात केली. त्या फळाची पाश्चात्य देशांना ओळख करून देताना त्याचे इंग्रजीत मँगो झाले. त्याचे शास्त्रीय नाव ‘मँजिफेरा इंडिका’ असे कार्ल लिनियस यांनी ठेवले. त्याचे भारतीय नाव ‘मना’ किंवा ‘मंगा’ यावरून ‘मॅन्जिफेरा’ आणि मूळ भारतातील झाड म्हणून ‘इंडिका’ असे निश्चित करण्यात आल्याचे मानले जाते. दगडासारख्या बियांमुळे त्याला अश्मफळ म्हणूनही ओळखले जाते.
आंबा मूळचा
भारतीय उपखंडातील असल्याचे मानले जाते. काही तज्ज्ञांच्या मते अगदी भारत नाही पण दक्षिण
आशियातील एखाद्या देशात या वृक्षाचे मूळ असावे. तसे अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. अगदी
सोळाव्या शतकापर्यंत भारतीय उपखंडाबाहेर या फळांची ओळखही नव्हती. मात्र आज बहुतांश
उष्ण कटिबंधीय देशात या वृक्षाची लागवड केली जाते. मेघालयातील दामलगिरी येथे सापडलेल्या
जीवाश्मांच्या अभ्यासातून साठ लाख वर्षापूर्वी त्या भागात आंब्याची झाडे असावीत, असे
सिद्ध झाले आहे. ख्रिस्तपूर्व दोन हजार वर्षांपूर्वीपासून आंब्याची लागवड करण्यात येत
असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. इसवी सन पूर्व चारशे ते पाचशे वर्षांपूर्वी हे फळ पूर्व
आशियामध्ये लावले जाऊ लागले. चौदाव्या शतकात श्रीलंकेमध्ये आंब्याच्या लागवडीचे पुरावे
मिळतात. पंधराव्या शतकात हे फळ फिलिपाईन्समध्ये पोहोचले; तर सोळाव्या शतकात ब्राझिल
आणि पोर्तुगालमध्ये, सतराव्या शतकात अमेरिकेत आणि पुढे अठराव्या शतकात वेस्ट इंडिजमध्ये
पोहोचले. आज बहुतांश उष्ण कटिबंधीय देशात आंब्याची लागवड केली जाते.
इतिहासात आंब्याच्या लागवडीचे अनेक संदर्भ मिळतात. सम्राट अशोकाने राजमार्गाच्या बाजूला सावली आणि फळ देणारी झाडे लावण्याचा आदेश दिला होता. त्यामध्ये आंब्याच्या झाडाचा समावेश होता. अल्लाउद्दिन खिलजीला आंबे प्रिय होते. बाबराने आपल्या ‘बाबरनामा’ या ग्रंथात आंब्याचे वर्णन केले आहे. इराण आणि मध्य आशियामध्ये प्रथम तोतापुरी आंबा पोहोचला. अकबराने एक लाख आंब्याची बाग लावल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. बादशहा जहांगीर याने लाहोर येथे तर बादशहा शहाजहानने दिल्लीत आंब्याच्या बागा लावल्या होत्या. शहाजहानने औरंगजेबाला आमराईतील सर्व आंबे स्वत:साठी तोडले म्हणून कैदेत ठेवले होते. आंब्यामुळेच मिर्झा गालिब आणि शेवटचा बादशहा बहादूरशाह यांच्यात मैत्री झाली, असे म्हणतात. आंब्याच्या मौसमात मिर्झा गालिब प्रतिदिन एक डझन आंबे खात असत. छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरणाच्या दृष्टीने आंब्यासारख्या झाडांची लागवड करण्याचे आदेश दिले असल्याचे संदर्भ मिळतात. पेशव्यांनी सुद्धा आमराया फुलवल्या होत्या. पेशवेकाळात कलम करण्याचे तंत्रही वापरले जात होते. इंग्रजांमुळे आंबा कापून खाण्याची पद्धत आली.
आंब्याची
झाडे बियांपासून तयार होतात. आंब्याच्या बियांना कोय म्हणतात. कठिण कवचात द्विदल बी
दडलेले असते. आंब्याचा मुख्य मौसम उन्हाळ्यात येतो. आंबे खाऊन त्याच्या कोया टाकून
दिल्या जातात. पावसाळा सुरू झाला की या बिया रूजतात आणि कोवळे तांबडे - तपकिरी कोंब
बाहेर पडतात. खाली सोटमूळ जाते आणि कोंब वर येतो. नेहमीच्या पानासारखीच पाने सुरूवातीपासून
कोंबाला यायला लागतात. कोंब वाढत जातो, तसा त्यांचा रंग हिरवा होत जातो. पाने एकाआड
एक येत जातात. मात्र शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस असे पाळीव प्राणी या उगवलेल्या रोपांना
आवडीने खातात. त्याचे कोंब प्राण्यांनी खाल्ले
की रोप जगत नाही. त्यामुळे मोकळ्या जागेवरील रोपे जगण्याचे प्रमाण शून्य असते. खास
लावलेली किंवा जनावरांचे तोंड न लागलेली रोपेच जगतात. जनावरांनी खाऊ नये म्हणून त्याभोवती
कुंपण घालतात. हिरवे खोड जरा मोठे झाले की प्रथम त्याचा रंग लालसर होतो, आणि पुढे किरमिजी
होत जातो. आणखी मोठ्या खोडाचा रंग काळसर होतो. त्यामध्ये खाचा तयार होतात. भारतातील
आंब्यांच्या कोयीतून साधारणपणे एकच कोंब बाहेर पडतो. मात्र एकाच कोयीतून सात कोंब बाहेर
पडणारे वाण फिलिपाईन्स, फ्लोरिडा, मेक्सिको, वेस्ट इंडिज येथे आढळतात.
आंब्याची
झाडे काळ्या किंवा लाल मातीत चांगली वाढतात. मुरमाड जमिनीतही जगतात, मात्र त्यांची
वाढ नीट होत नाही. आंब्यांच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन चांगली असते.
नव्याने लावलेल्या रोपांच्या बुंध्याशी तण वाढले, तर त्याचा परिणाम आंब्याच्या वाढीवर
होतो. मात्र पुरेसे अंतर राखून लावलेल्या आंबा बागेत आंतरपिक घेतले जाते. आंब्याच्या
बागेस पाच वर्षांनंतर पाणी नाही दिले, तरी झाडांची वाढ चांगली होते. कोकणामध्ये चांगली
वाढ झालेल्या आंब्याच्या झाडास मीठ देतात. ते पाहून इतर भागातही झाडांच्या बुंध्यात
मीठ घातले गेले. मात्र नेमके किती मीठ घालायचे, हे न समजल्याने अनेक बागांतील झाडे
जळून गेली. कोकणात झाडाचा पालापाचोळा बुंध्याशी जमा करून त्यावर माती टाकण्याची पद्धत
आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा ताण पडून झाडे मरत नाहीत. पाल्यापासून तयार होणारे
खत झाडास मिळते. जमीन हलक्या प्रतीची असल्यास झाडाला बाहेरून खत आणि पाणी पुरवावे लागते.
रोप चार-पाच फुटांचे होताच त्याला फांद्या फुटतात. फांद्या सर्व बाजूंनी फुटल्याने झाड डेरेदार होऊ लागते. झाड अगदी शंभर सव्वाशे फुट उंचीचे होते. हे झाड दीर्घायुषी आहे. अगदी तीनशे वर्षांपर्यत जगतात. मात्र कोयीपासून तयार झालेल्या झाडाचे फळ हे मूळ झाडाच्या फळांप्रमाणे नसते. त्यामुळे आता त्याच प्रकारची फळे मिळवण्यासाठी कलम बांधून रोपे तयार केली जातात. कलम बांधलेल्या रोपांची झाडे उंच वाढत नाहीत. आंब्याला सोटमूळ असते. पूर्ण वाढलेल्या झाडांचे सोटमूळ तीस फुटांपर्यंत खोल जाते. त्यापासून फुटणारी उपमुळे सर्वत्र पसरत जातात. आंब्याचे झाड मूळ खोडापासून तोडले तर पुन्हा फुटत नाही.
आंबा सदाहरित
वृक्ष आहे. आंब्याची पाने एकाआड एक येतात. मोहोर येताना त्याठिकाणी अनेक पाने एकत्र
आलेली असतात. पानाचा देठ सुरूवातीला रूंद असतो. पुढे तो थोडा निमुळता असतो. पाने लांब
आणि दाट असल्याने आंब्याची सावली घनदाट असते. खेड्यापाड्यातील लोकांची दुपारची विश्रांती
सुखकर करणारे हे झाड. आंब्याची पाने साधी असतात आणि त्यांची लांबी पंधरा सेंटिमीटर
पासून पस्तीस सेंटिमीटरपर्यंत असते, तर रूंदी चार सेंटिमीटरपासून पंधरा सेंटिमीटरपर्यंत
असते. पानाला मध्यभागी शीर असते. त्यापासून उपशिरा निघतात. उपशिरांची बारीक जाळी बनते.
पानांचा रंग गर्द हिरवा तर शीरांचा रंग पिवळसर पोपटी असतो. या पानांचे खत चांगले होते.
त्यामुळे माती भुसभुशीत होते. फांद्यांना येणारी कोवळी पाने लाल, तपकीरी रंगांची असतात.
नंतर त्यांचा रंग पोपटी आणि पुढे गडद हिरवा
होत जातो. पाने जुन झाली की पिवळी पडतात आणि गळतात. मात्र सर्व पाने एकाच वेळी पडत
नाहीत. त्यामुळे याची सावली वर्षभर मिळते.
झाड सात आठ वर्षांचे होताच त्याला ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात मोहोर यायला सुरुवात होते. या मोहोरापासून येणारी फळे ही एप्रिल-मे महिन्यात येतात. अपवादात्मक परिस्थितीत मे-जूनमध्ये मोहोर येतो. याची फळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येतात. मोहोर म्हणजे असंख्य कळ्यांचा गुच्छ असतो. बारीक फांद्यांच्या टोकाला मोहोर येतो. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कोवळी पाने आली नाहीत, की समजावे आंब्याला मोहोर येणार आहे. ज्या फांद्यांना मोहोर येत नाही, त्यांना कोवळी पाने येतात. कळ्यांचा गुच्छ पोपटी किंवा फिकट चॉकलेटी लालसर रंगाचा असतो. काही दिवसांतच त्याची वाढ होवून कळ्या फुलायला सुरुवात होते. काही झाडांच्या मोहोराचा दांडा अगदी एक फुट लांबीचा असतो. कळ्या फुलताच आसमंत गंधांने भरून जाते आणि त्यावर मधमाशा, कीटकांचा वावर सुरू होतो. फुलाला पाच पाकळ्या असतात. पाकळ्या पाच ते दहा मिलीमीटर लांब असतात. गुप्त काळात आम्रमंजिरीचा उपयोग मद्याला सुगंधित करण्यासाठी करण्यात येत असे. या कीटकांचा वावर अनेक झाडांवर असल्याने मिश्र संकर होतो. त्यामुळे बियांपासून त्याच वाणांचे झाड तयार होत नाही. कीटक आणि मधमाशामुळे परागीभवन होते आणि फलधारणा होते. दोन-तीन दिवसात फलधारणा झालेली फुले सोडून इतर फुले गळतात. पिवळ्या किंवा लालसर केशरी देठाला जोडलेले हिरवे गोंडे असे चित्र खूप मजेदार दिसते. आमरस खाणे जितके आनंददायी तितकेच आंब्याचा फुललेला मोहोर पाहणे आल्हाददायक असते. आंब्याची फळेही मोठ्या प्रमाणात गळतात. मोहोराच्या दांड्याची लांबी जास्त असते. आंबे जसे मोठे होत जातात, तसे वाऱ्याबरोबर झुलू लागतात. अनेक झाडांच्या फळांचे देठ हलके असते. अशा झाडांच्या फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते. फलधारणा झाल्यापासून चार ते पाच महिन्यांत फळ पक्व होते. फळांचा आकार गोल, अंडाकृती किंवा केळीसारखा असतो. फळांच्या गुणधर्मावरून वाणांना नावे दिली आहेत. फळांचा आकार चार ते पाच सेंटिमीटरपासून तीस ते पस्तीस सेंटिमीटरपर्यंत भरतो. गोटी आंब्यांचे वजन पन्नास ग्रॅम तर मल्लिकासारख्या वाणांच्या फळांचे वजन दोन-तीन किलोपर्यंत भरते. विदेशातील काही वाणांचे फळ पाच किलोपर्यंत वजनाचे असते. भारतातही मध्यप्रदेशातील अलिराजपूर भागात पिकणाऱ्या नूरजहाँ आंब्याचे वजन एक ते पाच किलो भरते.
फळ वाढू लागल्यानंतर सुरुवातीला आतील बीवरील आवरण कोवळे असते. मात्र फळ पक्व होऊ लागले की ते कठीण होत जाते. देशी वाणांचे पाचशेपेक्षा जास्त वाण भारतात पाहावयास मिळतात. झाडावरच आंबे पिकू लागतात. असे एक दोन पिकलेले आंबे मिळाले की ओळखावे, आंबे पक्व झालेत आणि फळे काढायला हवीत. झाडाचे आंबे काढण्याच्या प्रक्रियेस ‘आंबे उतरणे किंवा उतरवणे’ असे म्हणतात. झाडावरून आंबे काढणे हे कौशल्याचे काम असते. जरा जोरात हिसका दिला, तरी आंबे खुडीतून खाली पडतात आणि ते खराब होतात. लांब बांबूला पुढे लोखंडाचे फुटभर व्यासाचे कडे असते. त्याच्या पुढच्या टोकाला दोन लोखंडी पट्ट्या बसवून पसरट V आकार केलेला असतो. त्या गोल कढीच्या खाली दोरीची गोल जाळी असते. फांदीच्या टोकाला असणारे आंबे त्या गोल कडीमध्ये घेणे आणि तोडणे सरावाने जमते. खुडीतून खाली पडलेले आंबे डागील बनतात. त्यांना वेगळे ठेवावे लागते. खुडीत तीन-चार आंबे काढले की झोळी जवळ घेऊन ते आंबे मोठ्या झोळीत टाकले जातात. याला गांजा म्हणतात. गांजा म्हणजे मीटरभर व्यासाची गोल बांगडी असायची. त्याच्या खाली शे-दोनशे आंबे बसतील, अशी दोऱ्यांची जाळी बनवलेली असायची. आता ही जाळी बनवण्याची कला संपत चालली आहे. त्याऐवजी आता पोते बांधण्याचा शॉर्टकट वापरला जातो. त्या बांगडीला चार ठिकाणी दोरी बांधून पुढे ती जाड दोरीला जोडली जायची. या दोरीसह गांजा आणि खुडीसह उतारी झाडावर चढत. आंबे गांज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साठले की त्याची दोरी खाली सोडली जाते आणि गांजा रिकामा करून परत वर पाठवला जातो.
आंबे उतरवताना
आंब्याच्या देठातून चिकट द्रव बाहेर पडतो. त्याला चीक म्हणतात. हा चीक शरीराला लागल्यास
शरिरावर जखमा होतात. कपड्याला लागल्यास कपड्यावर डाग पडतात आणि ते काढणारा कोणताही
साबण नाही. विंचू चावल्यानंतर लावण्यासाठी काही आदिवासी आंब्याचा चीक जमा करून ठेवतात.
बाकीचे आंबे गवतामध्ये (अढीत) पिकायला घातले जातात. सात – आठ दिवसानंतर आंबे पिकू लागतात.
रसायनांचा वापर करूनही आंबे पिकवले जातात. मात्र असे आंबे खाणे आरोग्यासाठी धोकादायक
असते. पिकलेल्या आंब्यांचा रंग साधारणपणे पिवळा असतो. काही वाणांच्या आंब्यांच्या सालीचा
रंग केशरी, लाल होतो. मात्र काही वाण असे आहेत की ज्यातील पिकलेल्या आंब्यांच्या सालीचा
रंग हिरवाच असतो. काही आंब्याच्या फळांवर ठिपके असतात. पिकलेल्या आंब्यांची चव गोड,
आंबट असते. काही आंब्यांना विशिष्ट वासही येतो. काही फळांतील बीवरील आवरणास केसर असते,
तर काहींना बिल्कुल नसते. कोय आणि सालीच्या मध्ये मधूर पिवळा केशरी गर असतो. तो गरच
आंब्याला सर्वप्रिय बनवतो.
असे पिकलेले
चांगले आंबे खाणे म्हणजे पर्वणी असते. त्यातही हापूस आंब्याचा तोरा खास असतो. ही फळे
कापून खाल्ली जातात. पिकलेल्या आंब्याचा रस करतात. रसपोळीचा बेत उन्हाळ्यात अनेक घरांत
असतो. रसाबरोबर खाण्यासाठी धिरडी हा प्रकार मराठवाड्यात आवर्जून बनवला जातो. विदर्भात
रसाबरोबर तळलेली कुरवडी खातात. आमरस भात आणि शेवयाबरोबरही खातात. रसांपासून पोळी बनवून
त्यापासून आंबावडी बनवली जाते. आंबा जास्त खाल्ल्यास काही लोकांना त्रास होतो. आमरस
बाधू नये म्हणून त्यामध्ये दुध किंवा तूप घालून खातात. काही भागात रसामध्ये ताक किंवा
दही मिसळतात. आमरस कसा खावा याचे शास्त्र आहे. नवयुवकांना फुर्रर्र असा आवाज करत रस
खाणे आवडत नाही, ते नाराजी दाखवतात. मात्र गो.वि. करंदीकर गुरूजींनी याबाबत एक मार्गदर्शक
पुस्तिका लिहिली आहे. पोळी आणि रस खाताना फुर्रकन आवाज आलाच पाहिजे. तसा न येऊ देणे
अवैज्ञानिक आहे. आपल्या जिभेच्या मध्यभागी असणाऱ्या ग्रंथी अशा पद्धतीने रस खाल्ला
तरच स्त्रवतात, असे सांगण्यात आले आहे. जुनी माणसे बाळ गोपाळांना रस वाढल्यानंतर,
‘पोरांनो, लावा घोडे पव्हणीला’ म्हणायचे, त्यानंतर मुले फुरक्या मारत वाट्यांवर वाट्या
संपवायची.
आंब्याचे
भारतात दोन कोटी ५६ लाख टन उत्पादन होते. इंडोनेशिया, चीन, मेक्सिको, पाकिस्तान, ब्राझील
या देशांमध्ये एकूण वीस ते तीस लाख टन उत्पादन होते. जगातील एकूण आंबा उत्पादनाच्या
साठ टक्के उत्पादन भारतात होते. शंभर ग्रॅम आंबा गरामध्ये कार्बोहायड्रेटस १५ ग्रॅम
असते. साखर १३.७ ग्रॅम, तंतूजन्य पदार्थ दीड ग्रॅम, मेद ०.३८ ग्रॅम आणि प्रथिने ०.८२
ग्रॅम असतात. डोळ्यांना उपयुक्त बीटा कॅरेटीन ५४ मायक्रोग्रॅम असते. उर्वरित भाग पाण्याने
भरलेला असतो. यात जीवनसत्व ए, जीवनसत्व बी-१, बी-२, बी-३, बी-५, बी-६, बी-९, जीवनसत्व
सी, जीवनसत्व इ आणि जीवनसत्व के असतात. कॅल्शियम, तांबे, लोह, मॅग्नेशियम, मँगेनिज,
फॉस्फरस, पॉटेशियम, सेलेनियम, सोडियम, जस्त क्षार विपुल प्रमाणात असतात. आंब्याच्या
कोया जमा करून पुढे विकल्या जाऊ लागल्या. बियांपासून साबण बनवण्याचे तंत्र विकसित झाले
आणि कोयांना चांगला भाव मिळू लागला. उकिरड्यावर कोया जाणे दुर्मिळ झाले. याचा परिणाम
रायवळ आंब्याची संख्या कमी होण्यात झाला आहे. एकिकडे लाकडांसाठी जुन्या झाडांची तोड
आणि दुसरीकडे बियांना जमिनीत मिसळू न देण्यामुळे एकूणच आंब्याची झाडे कमी होत आहेत.
आयुर्वेदामध्ये
आंब्याच्या आरोग्यविषयक उपयोजनाबाबत अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. लांबट आंब्यापेक्षा
गोल आंबे चांगले मानले जातात. गरोदर महिला कैऱ्या (कच्चे आंबे) आवर्जून आणि आवडीने
खातात. कैरीमध्ये आम्लता आणि क्षार जास्त असतात. त्यापासून पन्हे हे पेय बनवले जाते.
उन्हाचा त्रास यामुळे कमी होतो. त्यापासून कोशिंबीर केली जाते. अनेक भागात कैरीचे तुकडे
वरणात टाकण्याची पद्धत आहे. आंबा खाल्ल्यामुळे त्वचा, पोटाचे आरोग्य चांगले ठेवते.
मात्र जास्त खाणे त्रासदायक ठरते. कच्च्या कैऱ्यांचे लोणचे बनवतात. फोडींची भाजीही
बनवतात. मुरांबा, साखरांबा, आमसूल हे पदार्थही कैरींपासून बनतात. पिकलेल्या आंब्यांचा
आमरस, आंबावडी, आंबापोळी इत्यादी पदार्थ बनवतात. आईसक्रिम, मिल्कशेक यामध्येही आमरसाचा
वापर करतात. साल, पान, फुले, फळे या सर्वांचे उपयोग आयुर्वेदात दिले आहेत. कैऱ्यांपासून
कोशिंबीरही बनवली जाते. हिरव्या शेंगदाण्यासह कांदा, लसूण, तिखट, मीठ आणि थोडीसी हळद
घालून बनवलेली कोशिंबीर चाखत राहावी अशी असते. प्रसाद शिरगांवकर यांनी आंब्याचीही वाईन
बनवण्याचे प्रयोग केले आहेत.
कैरीचा गर
फडक्यात गुंडाळून डोळ्यांवर ठेवला जातो. आंब्याची साल कुटून त्यापासून पोटदुखीवर औषध
बनवले जाते. गळा सुजल्यास सालीची भुकटी चुन्यामध्ये मिसळून गळ्याभोवती बांधली जाते.
अंतर्सालीचा वापर पोटात जळजळ होत असल्यास केला जातो. हगवणीवर कच्च्या सालीचा अर्क वापरला
जातो. आंब्याची कोवळी साल चघळल्यासही फरक पडतो. अनेक लोक सकाळी आंब्याचे कोवळे पान
खाल्ल्यास प्रसन्न वाटते, असे मानतात. संधिवाताचा त्रास असणारे लोक आंब्याची आणि निरगुडीची
पाने पाण्यात टाकून आंघोळ करतात. आंब्याच्या कोयीपासून किंवा कोय जाळून तिच्या राखेपासून
घामगुंडावर औषध बनवले जाते. आंब्याच्या बियांचा वापर साबण तयार करण्यासाठी केला जातो.
आयुर्वेदामध्ये आंब्याच्या विविध भागांच्या औषधी उपयोगासंदर्भात उल्लेख आहे. आंब्याच्या
पानांचा मधुमेह, मुतखडा, दमा आणि पोटावरील विकारामध्ये उपयोग होतो. आंब्याच्या पानांचा
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोग होतो. आंब्याच्या औषधी गुणधर्मासंदर्भात ‘पक्वाम्रो
मधुर: शुक्रवर्धक: पौष्टिक: स्मृत:l गुरु: कान्तितृप्तिकर: किंचिदम्लो रुचिप्रद:ll हृद्यो मांसबलानांच वर्धक: कफकारक:l तुवरश्च तृषावातश्रमाणां नाशक: स्मृत:ll’ अर्थात
पक्व, पिकलेला आंबा चवीला गोड आणि किंचित आंबट, तुरट असतो. पचण्यास जड असतो. आंब्याचे
सेवन शुक्रधातू वाढवतो. तो पौष्टिक, रूचकर आणि तृप्ती देणारा असतो. स्नायुंची ताकत
वाढवतो. कफ, तृष्णा, वात आणि श्रम परिहार करतो.
आंब्याच्या बुंध्याचे लाकूड सरळ असते. रायवळ आंब्याच्या फांद्याही काही
प्रमाणात सरळ असतात. आंब्याचे लाकूड तुलनेने वजनाला हलके असते. त्याचा प्रामुख्याने
जळण म्हणून उपयोग केला जातो. काँक्रिट बांधकामामध्ये आधारासाठी हे लाकूड काही प्रमाणात
वापरतात. सेंट्रिंग कामात फळ्याही उपयोगाला येतात. मात्र लाकडास वाळवी आणि कीड मोठ्या
प्रमाणात लागत असल्याने त्याचे इतर उपयोग तसे कमी आहेत. काही भागात आंब्याच्या लाकडाचा
उपयोग फर्निचरसाठी केला जातो. आंब्याच्या मोठ्या लाकडाचा उपयोग ढोल करण्यासाठी केला
जातो. प्लायवूड बनवण्यासाठीही आंब्याचे लाकूड वापरले जाते. चंद्रपूरमध्ये याचा कारखाना
आहे. विदर्भात आंब्याच्या झाडांची मोठी तोड करण्यात आली आहे. तात्पुरत्या निवाऱ्यासाठी
शेतकरी याच्या दोन फांद्या फुटलेल्या खोडाचा उपयोग मेढ म्हणून करतात. मात्र मुख्य उपयोग
जळणासाठीच केला जातो.
आंब्याच्या अनेक प्रजाती आढळतात. आंब्याच्या फुलांचे परागीभवन होण्यासाठी त्याच झाडाच्या फुलांच्या परागकणांची गरज नसते. त्यामुळे कोयीपासून त्याच गुणधर्माची फळे असणारी रोपे तयार होत नाहीत. भिन्न चव, रंग, रूप, गंध, आकार, झाडांची उंची यावरून आंब्याचे वर्गीकरण आजवर कोणीही करू शकले नाही. विशेष म्हणजे असा प्रयत्न झाला तो अमेरिकेत. नावावरून प्रजात ठरविणेही शक्य होत नाही, कारण एकाच प्रकारचे गुणधर्म असणाऱ्या झाडांना भिन्न नावे देण्यात आलेली आहेत. महाराष्ट्रातील पायरी आणि बेंगलोरचा रसपूरी हे दोन्ही एकच आहेत. महाराष्ट्रात मात्र आंब्याचे तीन गटात वर्गीकरण होते. विशेष म्हणजे हे वर्गीकरण त्यांची लागवड कशी होते, यावरून ठरवले आहेत. कोठेतरी कोय पडून उगवलेल्या आणि आपोआप वाढलेल्या आंब्याना रायवळ आंबे म्हणतात. या नव्या झाडांचे फळ कसे असेल याचा काहीच अंदाज बांधता येत नाही. चांगल्या जातीच्या आंब्याच्या कोयीपासून खास रोपे बनवून काळजीपूर्वक वाढवलेल्या आंब्यांना ‘इरसाल’ आंबे म्हणतात. यांचे फळ चांगले असण्याची शक्यता जास्त असते. रायवळ आणि इरसाल या दोन्ही गटातील आंब्यांची झाडे खूप मोठी होतात. आंब्याचा तिसरा प्रकार म्हणजे कलमी आंबे. यामध्ये कोयीपासून रोपे बनवतात. या रोपांवर चांगली फळे येणाऱ्या झाडांच्या फांद्यापासून कलम बांधले जाते आणि या कलमांची लागवड करण्यात येते. हे वर्गीकरण ढोबळ आहे. ते शास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही. यातून लावण्याची पद्धत वगळता कोणतीही विशेष माहिती मिळत नाही. काही शेतकरी चांगल्या गुणांच्या रायवळ आंब्याचीही कलमे तयार करून लावतात.
आज संकरित
वाणाची आणि कलम करून मूळ गुणधर्म असणारी रोपे तयार करून लावली जातात. ही झाडे फार उंच
वाढत नाहीत. मात्र फळे एकाच प्रकारची असल्याने विक्री करताना चांगला भाव मिळतो. यातही
कोकण भागात हापूस, मध्य महाराष्ट्रात केशर आणि काही भागात पायरी, दशहरी वाण लावला जातो.
भारतातील इतर राज्यात तौमुरिया, दशहरी, फझरी, बनारसी, लंगडा, हापूस, सफेदा हे वाण उत्तर
प्रदेशमध्ये लावले जातात. आंध्रप्रदेशमध्ये नीलम, तोतापूरी, बेनिशान, मलगोवा, रूमाली
वाण लावले जातात. पायरी, मडप्पा, हापूस हे वाण कर्नाटकमध्ये लोकप्रिय आहेत. बिहारमध्ये
हेमसागर, हापूस, सिंदूराय, लंगडा या वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. याखेरीज
सुंदरजा, कासजी पटेल, चिन्नासरम, स्वर्णरेखा, कावसजी पटेल, कृष्णभोग, गोपाळभोग, गोवाबंदर,
चौसा, जमादार हे वाणही लावले जातात. महाराष्ट्रातील शेतकरी बांधावर आंब्यांची झाडे
आवर्जून लावत. शक्यतो रायवळ वाण लावत. ही आंब्यांची झाडे अनेक पिढ्यांना उत्पादन देत.
आंब्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. बहुतांश
सर्व आंब्याच्या कैऱ्या आंबट असतात. ‘खोबऱ्या’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याच्या
कैऱ्या मात्र आंबट नसतात. मात्र याचे पिकलेले फळ इतर आंब्यांची मजा देत नाही. त्यामुळे
या वाणांच्या कैऱ्याच खाल्ल्या जातात.
आंब्याचे
काही शत्रू आहेत. यातील महत्त्वाचा शत्रू म्हणजे तुडतुडे किडे. आंब्याच्या झाडाला मोहोर
येताच हे कीडे मोहोराचा रस शोषून घेतात. त्यामुळे मोहोर मोठ्या प्रमाणात गळतो आणि फलधारणा
कमी होते. या किड्याचा प्रतिबंध करण्यासाठी फिशऑईल रोझिनसौप पाण्यात मिसळून ते मिश्रण
फवारण्यात येते. झाडांचा मुख्य शत्रू आहे भिरूड किडा. या किड्याची मादी पावसाळ्याच्या
सुरुवातीस सालीमध्ये अंडे घालते. अंड्यातून किडे बाहेर पडताच आतील लाकूड खात जातात.
हे किडे लाकूड खाताना लाकडाचा भुसा बाहेर पडत जातो. त्यावरून किडे कोठे आहेत, हे शोधले
जाते. काठीने सालीवर मारून पोकळ भाग शोधून किड्याची जागा शोधण्याचे तंत्र काही शेतकरी
अवगत करून घेतात. किड्याच्या जागी क्लोरोफॉर्म किंवा क्रिओसोट औषध टाकून मारले जातात.
काही शेतकरी ते किडे बाहेर काढून मारतात. किडे मारल्यावर ज्या ठिकाणचे लाकूड खाल्लेले
असते त्याठिकाणी डांबर लावतात. काही झाडांच्या फळांमध्ये अळ्या सापडतात. अशा झाडाची
आपोआप गळून पडलेली सर्व फळे गोळा करून मातीमध्ये गाडून टाकावीत. झाडाचे मोडलेल्या फांद्यांच्या
ठिकाणी तयार झालेल्या ढोलीमुळेही नुकसान होते. त्यामुळे मोडलेल्या फांदीस व्यवस्थित
कापून त्यावर डांबर लावल्यास ढोली तयार होत नाहीत. अशा ढोली पक्ष्यांची घरे असतात.
त्यामुळे त्या तशाच राहणे निसर्गासाठी योग्य असते. मात्र झाडाचे आयुष्य वाढवण्यासाठी
अशा ढोली बुजवणे योग्य ठरते.
आंब्याच्या
झाडावर अनेक पक्षी घर बनवतात. पक्षीदेखील आंबे खातात. आंब्याच्या मोडलेल्या फांदीपासून
ढोली बनते. त्यामध्ये साप आणि पक्षी राहतात.
आंब्याच्या झाडावर अनेक प्रकारच्या वेली चांगल्या वाढतात. मात्र फळांच्या उत्पन्नावर
परिणाम होऊ नये, म्हणून चांगल्या फळांच्या झाडावर अशा वेली वाढू देत नाहीत. आंब्याच्या
झाडावर बांडगूळ किंवा शंकहाड आवर्जून वाढतो. ज्या फांदीवर तो वाढू लागतो, ती फांदी
न तोडल्यास हळूहळू ते पूर्ण झाड व्यापते आणि झाडालाच मारून टाकते. आंबा निसर्गातील
सर्व घटकांना उपयोगी पडते. मोहोर आला की किटकांना, मधमाशांना उपयोगाला येतो. पक्ष्यांसाठी
फळे आणि निवारा, सापासाठी घर अनेक किटकांना सालीवरील खाचेत घर देते. आंब्याच्या साली
जनावरे खातात. माणसाला फळे, सावली आणि जळण देते. त्यामुळे आंबा निसर्गातील महत्त्वाचे
झाड आहे.
चांगल्या
फळाच्या झाडाची फळे कोणी तोडू नयेत म्हणून त्या झाडावर भूत राहात असल्याची अफवा जाणीवपूर्वक
पसरवली जाते. ज्या झाडाला फळे येत नाहीत, त्या झाडावर भूते का राहात नाहीत असा प्रश्न
भोळ्याभाबड्या मनाला कधीच पडत नाही, हे विशेष. आंब्याची काही झाडे वांझ निघतात. काही
झाडे कितीही वर्षांची झाली तरी त्यांना मोहोर येत नाही. तर काही झाडांना मोहोर येतो
मात्र एकही फळ लागत नाही.
ll २ ll
खेड्यात ज्यांचे बालपण गेलेले असते, अशा प्रत्येकाची नाळ आंब्याशी जोडलेली असते. लहानपणी वाळलेल्या पानांचे भिरभिरे तयार करणे, आपल्या शेतात नसल्या तरी दुसऱ्याच्या शेतातल्या कैऱ्या चोरणे, दगड मारून कैऱ्या पाडणे, गरोदर बहीण किंवा वहिनीसाठी कैऱ्या मिळवणे, अशा अनेक कारणांनी आंबा मनात वसतो. प्रत्येकाच्या मनात, आठवणीतील आंब्याची जुनी झाडे आता नाहिशी होत चालली आहेत. मात्र शेतीसाठी, आरोग्यासाठी उपयुक्त असणारे हे झाड शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर अवश्य लावावे, वाढवावे, असे आहे. मग ते रायवळ असो किंवा कलमाचे!
भारतातील
हे एक उत्कृष्ट फळ मानले जाते. त्यामुळेच त्याला राष्ट्रीय फळाचे स्थान मिळाले. आंबा
पूर्व भाद्रपदा नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. प्रत्येक मंगल कार्यावेळी आंब्याच्या
पानांचे तोरण बांधले जाते. यज्ञ, होम, हवनामध्ये आंब्याच्या लाकडांची आहुती देतात.
येथील संस्कृतीत हे झाड पुरते मिसळून गेले आहे. काही आदिवासी समाजात कैऱ्या खाण्यापासून
पिकलेले फळ खाण्यापर्यंत सारे काही उत्सवासारखे साजरे करतात. माघ शुद्ध द्वितियेच्या
दिवशी चंद्राला आणि शिवरात्रीदिवशी शंकराला आम्रपंजिरी अर्पण करतात. वटसावित्रीच्या
पूजेतही आंब्याचा मान मोठा असतो. सुवासिनींची ओटी भरताना पाच फळांमध्ये आंब्याचा समावेश
आवर्जून करतात. शंकरास अभिषेक करताना आंब्याच्या रस वापरतात. लग्नमंडपात आंब्याच्या
फांद्या खांबाना बांधतात. लग्नविधीत वधूने आंबा शिंपण्याची पद्धत काही भागात विशेषत:
कोकणामध्ये आहे. कोकणात लग्नानंतर वधूवर मिळून सकाळी उठून आंब्याच्या झाडाची पूजा करून
त्याला पाणी घालतात. विविध ठिकाणी काढल्या जाणाऱ्या नक्षीवर आंब्याची रचना काढण्यात
येते. काश्मिरी शाल, कांचिपुरम आणि रेशमी साड्यांवर आंब्याच्या पानांची नक्षी असते.
तमिळनाडूमध्ये केळी आणि फणसासमवेत उत्तम फळ मानले जाते.
भारतीय संस्कृतीत
कोकिळा व्रत आहे. प्रामुख्याने ते उत्तर भारतात पाळतात. हे व्रत अठरा वर्षांनी येते.
या व्रतातील एका विधीमध्ये आंब्याची रोपे आणून कुंडीमध्ये लावली जातात. घरात जेवढ्या
विवाहित महिला आहेत, तेवढी रोपे आणली जातात. प्रत्येक महिलेला एक रोप दिले जाते. या
महिला आपापल्या रोपांची पूजा महिनाभर करतात. त्यानंतर ते रोप शेतात नेऊन लावले जाते.
महिन्याभरात त्या झाडाच्या सानिध्यात राहिल्याने महिलांच्या मनात रोपाबद्दल जिव्हाळा,
आपुलकी निर्माण झालेली असते. त्यामुळे आपापल्या रोपाला जगवण्यासाठी त्या प्रयत्न करतात.
कोकिळ पक्ष्याचे आंब्यावरील प्रेम आणि मानवाचे आंब्यावरील प्रेम यांचा सुंदर संगम असणारे
हे व्रत, महाराष्ट्रात मात्र फारसे प्रसिद्ध नाही.
आंब्याचा भारतीय साहित्यात पुराणकाळापासून उल्लेख आढळतो. आंब्याला हिंदू धर्माप्रमाणेच बौद्ध, जैन आणि मुस्लिम धर्मातही स्थान दिले असल्याचे आढळते. बौद्धधर्मीय प्रवासी फाहायन आणि संगयन यांच्या प्रवासवर्णनात ‘आम्रसारिकेने गौतम बुद्धांना तपश्चर्येकरिता एक आम्रवन भेट दिले होते’, असे नमूद केले आहे. जैन धर्मातील देवी आंबिका, आंब्याच्या झाडाखाली बसलेली दर्शवण्यात येते. देवी सरस्वतीच्या पुजेसाठी आंब्याचा मोहोर वापरण्यात येतो. आंब्याचा उल्लेख इसवी सन पूर्व एक हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या बृहदारण्य कोपनिषदामध्ये चवथ्या अध्यायात ‘स यत्रायमणिमानं न्येति जरया वोपतपता वाsणिमानं निगच्छति तद्यथाssम्रं वोदुम्बरं वा पिप्पलं वा बन्धनात्प्रमुच्यत एवमेवायं पुरुष एभ्योsग्ङेभ्य: सम्प्रमुच्य पुन: प्रतिन्यायं प्रतियोन्याद्रवति प्राणायैव ll३६ll’ असा आला आहे. याचा अर्थ ज्याप्रमाणे आम्र, उंबर किंवा पिंपळाचे फळ रस वाळल्यानंतर आपल्या देठापासून गळून पडते, तसेच मनुष्याचा देह वृद्धपणामुळे किंवा व्याधीमुळे कृश होतो किंवा नष्ट होतो. आंब्याचा उपयोग अनेक विषय समजून देण्यासाठी करण्यात आलेला आहे. हनुमान सीतामाईच्या शोधात लंकेत गेला. त्यावेळी तेथे त्याला आमराई आढळल्याचा उल्लेख आहे. महाभारतातही बागामध्ये आंब्याची झाडे लावल्याचा उल्लेख येतो. आंब्याची झाडे लवकर फळे कशी देतील याबद्दलही पुराणकाळात संशोधन झाले असावे. द्रोणपर्वात ‘चूतारामो तथाभग्न: पंचवर्ष: फलोपग:l’ असा उल्लेख येतो. यावरून पाच वर्षात आंब्याला फळे येण्यासाठीचे तंत्र विकसित करण्यात आले असावे, असा निष्कर्ष काढता येतो. अग्निपुराणामध्येही आंब्याचा उल्लेख आलेला आहे. ‘मत्स्योदकेन शीतेन आम्राणां सेक इष्यते’ म्हणजेच आम्रवृक्षास थंड मासळीचे पाणी द्यावे, असे सांगण्यात आले आहे. मानव इसवी सनाच्या अगोदर चार हजार वर्षांपूर्वीपासून फळझाडांची लागवड करत आला आहे. आंब्याच्या वृक्षाची लागवड त्या वेळेपासून करण्यात येत असावी.
कवी अमीर खुस्रो (१२५३ ते १३२५) यांनी काव्यात ‘आम्र नंदनवनीचे विभुषण, श्रेष्ठ हिंद फळांतील फळ, अन्य फळे जरी मधुर अन पक्व, मधुर आम्र फळ जरी नसे परिपक्व’, असे वर्णन केले आहे. तर बादशहा अकबराने दरभंग्याजवळ निर्मिलेल्या लाखबागेत एक लाख आंब्याची झाडे लावली होती. ही झाडे त्यानंतर तीनशे वर्षांनंतरही सुस्थितीत असल्याचे इंग्रज कृषीतज्ज्ञ चार्ल्स मेरीज यांनी लिहिल्याचे संदर्भ मिळतात. लेडी ब्रॅसी यांनी आंब्याचे वर्णन ‘फळांचा राजा’ असे केले आहे. फ्रायर यांनी सफरचंद, सप्ताळू, जर्दाळू, या फळांपेक्षा आंबे श्रेष्ठ फळ असल्याचे सांगितले. हॅमिल्टन यांच्या म्हणण्यानुसार, ‘गोव्याचा आंबा जगातील इतर सर्व आंब्यापेक्षा श्रेष्ठ आहे.’
मिर्झा गालिब
(१७९७ ते १८६९) यांचे आंबाप्रेम सर्वश्रुत आहे. बादशहा गालिब यांना करंडी भरून आंबे
पाठवत असत. एकदा गालिब यांनी आंबे खाल्ले आणि कोया आणि साली कचऱ्याच्या ढिगामध्ये टाकल्या.
एक गाढव तेथे गेले. नेहमीच्या सवयीने त्यांने कचऱ्यात तोंड घातले, मात्र कोय किंवा
साल न खाता तसेच गेले. हे नेमके गालिब यांच्या एका मित्राने पाहिले. त्यांना गालिब
यांची फिरकी घ्यायचे ठरवले. तो गालिब यांना म्हणाला, ‘गालिबसाब, तुम्ही एवढे आंब्याचे
कौतुक करता, पण, आंब्याला गाढव तोंडसुद्धा लावत नाही’. त्याचे बोलणे संपताच गालिबनी
उत्तर दिले, ‘अरे मित्रा, फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत.’ त्यानंतर त्या मित्राने
गालिबना आंब्यावरून कधीच चिडवले नाही.
कविश्रेष्ठ
कालिदासाने आंब्याला ‘वसंत ऋतूचा आत्मा’, असे म्हटले आहे. शाकुंतल या नाटकात प्रियेच्या
वियोगाने वसंत उत्सव साजरा न करण्याचा आदेश राजा दुष्यंत देतो आणि लगेच आम्रमोहोर गळून
पडतो, असाही उल्लेख येतो. आम्रवृक्षाचे लग्न लावण्याचाही उल्लेख कालिदासाच्या काव्यात
येतो. वसंतपंचमीला आम्र कुसुम प्राशन करणे, नवयुवतींनी कानात आम्रमंजिरी धारण करणे
अशा अनेक प्रकारे कालिदासाच्या काव्यामध्ये आंब्याचा उल्लेख येतो. कामदेवाच्या पाच
बाणांतील एक बाण आम्रमंजिरी आहे. कामदेव अर्थात मदनाचा दोस्त. वसंत ऋतू आम्रमंजिरीचा
बाण हाती घेऊन मिलनोत्सुक लोकांना विद्ध करतो, असे वर्णन कालिदासांने आपल्या ऋतूसंहार
या काव्यात केले आहे. ‘कुमारसंभवम’मध्येही आंबा आला आहेच. यावरून कालिदास यांनाही आम्रफळ
विशेष प्रिय असावे, हेच दिसते.
गुरूदेव
रविंद्रनाथ टागेार मोठे आंबाभक्त होते. १९२४ च्या एप्रिल – मे महिन्यात ते चीन दौऱ्यावर
गेले. त्या वर्षीचा आंब्याचा मौसम संपल्यानंतर परतले. यावर्षी आपणास आंबे खाण्यास मिळाले
नाहीत याचे त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी आपल्या मित्राला सांगितले की, ‘माझे निधन
झाल्यानंतर, वय सांगताना, त्यातून एक वर्ष कमी करा. आंबे न खाता गेलेले वर्ष मी व्यर्थ
मानतो त्यामुळे ते माझ्या वयात धरू नये.’ साने गुरूजींच्या ‘धडपडणारी मुले’ या पुस्तकामध्ये
वृक्ष कोणते लावावेत, याबाबत चर्चा केली आहे. त्यामध्ये सुगंध देणारी आणि फळे देणारी
झाडे लावावीत. यामध्ये अशोक, चंदन, बकूळ, शिरीष, निंब, जांभूळ यासोबत आम्रवृक्षही लावण्यास
सांगतात. शांतिनिकेतनमधील मुक्त शिक्षण देणारे वर्ग आंब्याच्या झाडाखाली भरत असल्याचा
संदर्भ मिळतो.
आंब्यासंदर्भात अनेक कथा आणि बोधकथा
आहेत. राजा कृष्णदेवराय यांची आई वृद्धत्वामुळे आजारी होती. आपण बरे होणार नाही, हे
लक्षात आल्यानंतर तिने राजाला लोकांना आंबे दान करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र
तो आंब्याचा मौसम नव्हता. आंब्याचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच तिचे निधन झाले. आपण आईची
इच्छा पूर्ण करू शकलो नसल्याचे राजाला वाईट वाटत असे. इच्छा पूर्ण करण्यापूर्वीच तिचे
निधन झाले असल्याने तिला मुक्ती मिळणार नाही, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी
राज्यातील विद्वान पंडितांना बोलावून यावर उपाय विचारला. यावर पंडितांनी त्यांना उपाय
सांगितला की ‘आईच्या पुण्यतिथीला ब्राम्हणांना भोजनानंतर, दक्षिणा म्हणून सोन्याचे
आंबे दान करावेत’. राजा कृष्णदेवराय या गोष्टीला सहज तयार झाले. ही गोष्ट तेनालीरामला
समजली. हा स्वार्थापोटी सुचविलेला उपाय असल्याचे त्यांनी ताडले. त्यांनी राजाकडून सोन्याचे
आंबे घेणाऱ्या सर्व ब्राम्हणांपर्यंत निमंत्रण पोहोचवले. त्यात लिहिले होते की ‘माझ्याही
आईची एक इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिला मुक्ती मिळावी म्हणून मी
तिच्या पुण्यतिथीला दान करणार आहे, आपण अवश्य यावे.’ त्या ब्राम्हणांना वाटले तेनालीराम
राजदरबारी व्यक्ती आहेत, येथेही आपणास चांगले धन मिळणार. सर्व दान स्वीकारणारी मंडळी
तेनालीरामच्या घरी आले. तेनालीराम यांनी सर्व खिडक्या दारे बंद केली. ‘थोडी तयारी करतो’,
असे म्हणत सर्वांना बसायला लावले. इकडे शेकोटीत सळया आगीत तापायला ठेवल्या होत्या.
ब्राम्हण अस्वस्थ झाले कारण तेथे भोजनाचे आणि दानधर्माचे कोणतेच चिन्ह नव्हते. शेवटी
त्यांनी तेनालीरामना विचारले की, ‘आईची कोणती इच्छा राहिली आहे.’ त्यावर तेनालीराम
म्हणाले, ‘माझ्या आईला संधिवाताचा त्रास होता. सांध्याच्या ठिकाणी लाल सळईचा चटका दिला,
की तिला बरे वाटत असे. मृत्यूपूर्वी तिने मला अशा गरम सळईचा चटका देण्यास सांगितले.
पण सळई गरम होण्यापूर्वी तिचे निधन झाले. तिची इच्छा अपूर्ण असल्याने तिला मुक्ती मिळणार
नाही. म्हणून गरम सळयांचे सर्वांच्या सांध्यांना चटके देणार आहे. राजाच्या आईला मुक्ती
देण्यासाठी जर सोन्याचे आंबे लागत असतील, तर मलाही हे काम करणे आवश्यक आहे.’ यावर त्या
स्वार्थी मंडळींनी ‘तेनालीराम तुमच्या दाव्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही’, असे
सांगितले. यावर तेनालीराम यांनी परत सांगीतले, ‘राजाच्या आईला ज्या कारणांने मुक्ती
मिळते, त्याच कारणाने माझ्या आईला मुक्ती मिळणार. नाहीतर यातून धडा घ्या, आणि जे सोन्याचे
आंबे राजाकडून घेतले आहेत ते परत करा, नाही तर सळईचे चटके सहन करा’. सर्व ब्राम्हण
राजाकडे गेले आणि सोन्याचे आंबे परत केले. राजाने तेनालीराम यांना बोलावले. असे करण्याचे
कारण विचारले. तेनालीराम यांनी सांगितले की, ‘हे सर्व स्वार्थापोटी तुम्हाला म्हणजेच
राज्याला फसवत होते. हे राजाला फसवत असतील तर सर्वसामान्यानांही फसवणार. म्हणून मला
केवळ त्यांचे हृदय परिवर्तन करावयाचे होते’. राजाला तेनालीरामचे म्हणणे पटले. त्यांनी
त्या ब्राम्हणांना सांगितले, ‘तेनालिराम जे म्हणतात ते १०० टक्के बरोबर आहे. मात्र
राजा एकदा दिलेले दान परत घेऊ शकत नाही. ते सोन्याचे आंबे तुम्ही ठेवा. पुन्हा असे
कोणाला फसवू नका’. राजाने आपले डोळे उघडल्याबद्दल तेनालीरामला मोठे बक्षीस दिले. सोने
देणारा आंबा, सोन्याचा आंबा अशा अनेक नावाने ही बोधकथा सांगण्यात येते.
बिरबलाच्या
संभाषणचातुर्याचे वर्णन करणारी एक कथाही बालपणापासून सर्वपरिचित आहे. एकदा बादशहा अकबर
बेगमबरोबर आंबे खात बसले होते. तेवढ्यात बिरबलाचे आगमन झाले. बादशहाने बिरबलासही आंबे
खाण्यास बोलावले. बिरबल, बादशहा आणि बेगम आंबे खात असताना, बादशहाच्या मनात बिरबलाची
गंमत करण्याचा विचार आला. त्यांनी आंबे खाऊन कोया आणि साल बिरबलासमोरच्या पात्रात टाकण्यास
सुरुवात केली. आंबे खाऊन संपले तेव्हा अकबरासमोरचे कोय आणि साल ठेवण्याचे पात्र रिकामे
तर बिरबलासमोरचे पूर्ण भरलेले होते. बादशहा म्हणाला, ‘ काय हे बिरबल, किती हा हावरटपणा’
यावर संभाषण चतुर बिरबल म्हणाला, ‘खाविंद, गुस्ताखी माफ. मी साल आणि कोयी तरी सोडल्या.
तुम्ही तर त्यापण खाऊन टाकल्या.’ बादशहाच्या लक्षात आले, बिरबल हजरजबाबीपणात हरणारा
नाही.
वाईट मित्रांची
संगत सोडण्यासाठी ‘एका सडक्या आंब्यामुळे चांगल्या आंब्याची पाटी सडते’ असे नेहमी म्हटले
जाते. याचे उदाहरण म्हणून आजोबा आणि नातवाची गोष्ट सांगण्यात येते. एक आजोबा आपल्या
दहा वर्षांच्या नातवासोबत राहात होते. आजोबांचा लाडका नातू हुशार, मात्र खोडकर होता.
अभ्यासासह खेळांमध्येही सर्वात पुढे होता. पण अचानक त्याचे वागणे विचित्र होत चालले.
घरातील सर्वांना त्याचे वागणे खटकू लागले. आजोबानी त्याचे वागणे बदलण्याचे कारण त्याचे
बदललेले मित्र असल्याचे शोधून काढले. नातू कोणाच्याही खोड्या काढतो. पूर्वीसारखा अभ्यास
करत नाही, हे पाहून तो वाया चालला आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्याला समजावून सांगून
काहीच फरक पडणार नाही, हे आजोबांच्या लक्षात आले होते. आजोबा थेट बाजारात गेले. चांगल्या
आंब्याची एक पाटी आणि एक सडका आंबा विकत घेऊन आले. ते आपल्या नातवाला म्हणाले, ‘गोपू,
हे सर्व आंबे टोपलीमध्ये व्यवस्थित भर. त्याच्यामध्ये हा सडलेला आंबाही ठेव. आपल्याला
हे आंबे तीन दिवसांनी खायचे आहेत.’ तीन दिवस गेले. आजोबांनी ती टोपली आणायला सांगितली.
गोपूने ती टोपली आणली आणि उघडली. तर टोपलीतील सर्व आंबे सडलेले होते. गोपू म्हणला,
‘हे काय आजोबा, एका सडक्या आंब्याने सारेच आंबे नासवले.’ आजोबा लगेच म्हटले, ‘अगदी
बरोबर गोपू. हा वाईट संगतीचा परिणाम. एका सडक्या आंब्याच्या सहवासाने सारे चांगले आंबे
नासले. तूही सर्वांना हवाहवासा वाटणारा. पण, तुझा स्वभाव आता वाईट संगतीमुळे सर्वांना
नकोसा झाला आहे.’ आजोबांचे बोलणे ऐकून गोपू निरूत्तर झाला. आपल्या चुकीबद्दल त्यांने
आजोबांची माफी मागितली आणि चांगले वागू लागला.
‘सहवासाचे फळ’ नावाची ‘दधिवाहन जातककथा’ प्रसिद्ध आहे. वाराणशीमध्ये राजा दधिवाहन राज्य करत होता. एक दिवस, राजा जलक्रीडा करत असताना जाळीमध्ये अडकलेले एक आम्रफळ मिळाले. राजाला ते खूप आवडले. त्यांने कोयीपासून रोप तयार करून लावण्यास सांगितले. दुधाचे पाणी घालून झाड वाढवले. काही वर्षांनंतर झाडाला मूळ फळाप्रमाणेच गोड फळे येऊ लागली. गोड पदार्थ मिसळून त्या आंब्याला खत घातले जात असे. दधिवाहन आपल्या आंब्याची फळे इतर राजाना पाठवत असे. मात्र आंबे पाठवताना आंब्याच्या कोयीला विषारी काटा टोचून पाठवत असे. त्यामुळे इतर राजांनी ती मधुर फळे खाल्ल्यानंतर कोय रूजवून रोप तयार करण्याचा प्रयत्न केला तर तो अयशस्वी ठरत असे. एका राजाला दधिवाहनाचा गर्व आणि वागणे आवडले नाही. त्याने आपल्या सर्वोत्तम माळ्याला बोलावून दधिवाहनाच्या आंब्याला बेचव करण्याचा आदेश दिला. त्या माळ्याने चार वर्षांची रजा मागितली आणि तो माळी दधिवाहनकडे गेला. दधिवाहनने त्या माळ्याचे कौशल्य पाहून नोकरीला ठेवले. त्याच्यावर आमराईची जबाबदारी सोपवली. नव्या माळ्याने त्या गोड फळांच्या आंब्याच्या कडेला कडुनिंबाची झाडे लावली. ती झाडे भरभर वाढली. फांद्या एकमेकांत मिसळल्या. मुळे एकमेकात मिसळली. त्या आंब्याची चव बिघडली. आंब्याची चव बिघडताच तो माळी पळून मूळ राजाकडे गेला. बोधिसत्वासह राजा दधिवाहन, असे का झाले? ते पाहायला गेला. तेंव्हा बोधिसत्वाच्या लक्षात आले की, ‘त्या झाडाजवळ वाढलेल्या कडुनिंबामुळे फळांची चव बिघडली. वाईट सहवासाचे हे फळ आहे’. त्यांनी तत्काळ ती कुडुनिंबाची झाडे नष्ट केली. त्यानंतर पुन्हा त्या झाडाला पूर्वीप्रमाणे मधूर फळे येऊ लागली.
कर्माला
सद्भावनेची जोड असेल तर सफलता मिळते, याबद्दलच्या कथेतही आंबाच येतो. याबाबतची कथा
दोन राजकुमारांची आहे. एका राजाला दोन पुत्र होते. मोठा अहंकारी आणि लोभी, तर धाकटा
दयाळू आणि परोपकारी होता. राजाच्या निधनानंतर परंपरेने मोठा मुलगा राजा झाला. तो प्रजेवर
खूप जुलुम करत असे. धाकटा मात्र आपल्या परीने सर्वांना मदत करत असे. त्यामुळे धाकट्याला
लोक मान देत. ही गोष्ट राजाला सहन झाली नाही. त्याने धाकट्याला बोलावून, ‘मी राजा आहे.
माझ्या परवानगीशिवाय कोणालाही दानधर्म, मदत करायची नाही’ असे सांगितले. धाकट्याने ते
मानले नाही. हे पाहून राजाने ‘राजाज्ञा’ काढून त्याला गावाबाहेर जमीन दिली आणि राजावाड्याबाहेर
हाकलून दिले. धाकट्या राजपूत्राने त्या जमिनीत छोटेसे घर बांधले. आंब्याची झाडे लावली.
आंब्यांना परिश्रमपूर्वक वाढवले. लवकरच त्या झाडांना फळे लागली. येणाऱ्या जाणाऱ्या
प्रत्येकाला आंब्याची फळे देऊन तो स्वागत करत असे. या निस्वार्थ सेवेमुळे त्याच्या
लोकप्रियतेत आणखी भर पडली. हे पाहून राजानेही अशी बाग लावली. अनेक माळी ठेवले. रखवालदार
ठेवले. आंब्याची झाडे वाढली. मात्र त्यांना फळे येत नव्हती. एक दिवस राजाकडे एक साधू
आले. बागेतून फिरताना राजाने झाडे एवढी वाढूनही त्याला फळे येत नसल्याची खंत बोलून
दाखवली. यावर साधूंनी सांगितले, ‘तुझ्या झाडावर अहंकाराची सावली पडली असल्याने, झाडांना
फळे येत नाहीत. अहंकारापासून जोपर्यंत तू मुक्त होत नाहीस, तोपर्यंत आंबे येणार नाहीत’.
साधूच्या सांगण्यातील मर्म राजाच्या लक्षात आले. तो अहंकारापासून मुक्त झाला. प्रजेची
क्षमा मागितली आणि धाकट्या भावासह पुन्हा राजवाड्यात राहू लागला. त्यानंतर राजाच्या
बागेतील झाडानांही फळे येऊ लागली.
‘सहनशीलता
यशाची गुरूकिल्ली आहे’, या सुवचनाच्या पुष्ट्यर्थ सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीतही आंबाच
आहे. एका गावात आई-वडील आणि त्यांचा मुलगा राहात असे. मुलगा सदाशिव कोणतेही काम नीट
करत नसे. काही दिवस काम केले की लगेच दुसरे काम सुरू करत असे. त्यामुळे कोणतेच काम
नीट होत नसे. त्यामुळे आई-वडिलांना त्याच्या भविष्याविषयी चिंता वाटत असे. मात्र सदाशिव
आपली सवय सोडायला तयार नव्हता आणि त्यामुळे कोणत्याच कामात यशस्वीही नव्हता. त्या दरम्यान
गावात एक मोठे विद्वान पंडित आले होते. त्यांचे व्याख्यान ऐकून आई-वडीलांनी सदाशिवला
त्यांच्याकडे न्यायचे ठरवले. त्यांनी पंडिताची भेट घेऊन आई-वडिलांकडून समस्या ऐकली.
नंतर दुसऱ्या दिवशी सदाशिवला पाठवण्यास सांगितले. सदाशिव आला त्यावेळी पंडित झाडे लावत
होते. त्यांनी सदाशिवला जवळ बोलावले. त्यांनी विचारले, ‘तुला कोणते फळ आवडते?’ सदाशिवने
आंबा असे सांगितले. त्यांनी सदाशिवला कोया आणायला सांगितल्या आणि जमीन उकरून तेथे कोय
पेरली. नंतर ते सदाशिवला घेऊन आत गेले. अर्ध्या तासानंतर त्यांनी सदाशिवला जाऊन आता
लावलेल्या आंब्याच्या झाडाला आंबे आले का पाहायला सांगितले. सदाशिवला आश्चर्य वाटले
अजून झाड उगवलेही नसेल आणि हे आंबे आले का, हे पहायला कसे सांगतात. पण तो गेला. पाहून
आला. त्यांने त्या झाडाला आंबे आले नसल्याचे सांगितले. मग त्यांनी सदाशिवला ती कोय
दुसरीकडे लावायला सांगितले. त्यानुसार सदाशिवने लावली. पुन्हा अर्ध्या तासाने सदाशिवला
त्यांने जागा बदलून लावलेल्या झाडाला आंबे लागले का पाहायला सांगितले. सदाशिव पाहून
आला आणि ‘नाही’ असे उत्तर दिले. पुन्हा जागा बदलून कोय लावायला सांगितले. पुन्हा अर्ध्या
तासानंतर सदाशिवला त्या झाडाला आंबे लागले का पाहायला सांगितले. तेंव्हा सदाशिव चिडला
आणि म्हणाला, ‘उगाच त्रास देऊ नका. एवढ्या कमी वेळात झाडही उगवू शकत नाही आणि तुम्ही
आंबे आलेत का असे कसे विचारता?’ तेंव्हा त्या पंडिताने शांतपणे उत्तर दिले, ‘मला हेच
तुला सांगायचे आहे. कोणत्याही कामात लगेच यशप्राप्ती नसते. योग्य रितीने काम केल्यास
योग्यवेळी फळ मिळते. तोपर्यंत आपणास प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे तुला जे काम आवडते
ते करत राहा. तुला त्रास झाला तर सहन कर. काही दिवसात तू ते काम छान करू शकशील आणि
तुला यश मिळेल.’ पंडिताचे बोलणे सदाशिवला पटले आणि त्यांने पुढे मनलावून धंदा केला
आणि जीवनात यशस्वी झाला.
‘आपल्याकडील
कलागुणांचा, सौंदर्याचा गर्व करू नये’, अशी सांगणारी बोधकथाही आंब्यावर बेतली आहे.
एकदा एका आंब्याला अतिशय सुंदर आणि वेगळा आंबा लागला. तो जादूचा आंबा होता. तो विचार
करू शकत होता, बोलू शकत होता. एक दिवस त्याने गावात फिरायला जाण्याचा आणि आपल्याला
पाहून लोकांची होणारी गम्मत अनुभवण्याचा विचार केला. तो खाली येऊन थोडा पुढे गेला.
रस्त्यात ससा आला. ससोबा आपल्याच नादात पळणाऱ्या आंब्याला म्हणाले, ‘अरे थांब, मला
तुला खाऊ दे’. यावर आंबा गर्वाने म्हणाला, ‘अरे हट, तू काय मला खाणार. मी तर जादूचा
आंबा आहे’. ससा वेगाने आंब्यामागे पळू लागला. आंबा आणखी वेगाने पळू लागला. शेवटी सशाने
आंब्याचा नाद सोडून दिला. पुढे गेल्यावर एका लहान मुलाने त्याला पाहिले. त्यांने आंब्याला
थांबायला आणि आपल्याला खाऊ देण्याची इच्छा व्यक्त केली. मुलालाही त्याने सशासारखेच
उत्तर दिले. मुलगा काही आंब्याला पकडू शकला नाही. आंबा रस्त्याने पळत पुढे गेला. त्याला
एका नवविवाहितेने पाहिले, ‘अय्या, किती किती छान आहे हा आंबा. मला हा खावासा वाटतो’,
ती म्हणाली. नव्यानेच लग्न झालेल्या नवरोबांने आंब्याला पकडायचा प्रयत्न सुरू केला.
आंबा त्याला म्हणाला, ‘तू मला पकडू शकत नाहीस. मी जादूचा आंबा आहे. तुझ्यापेक्षा मी
वेगाने पळतो. उगाच शक्ती वाया घालवू नको’ आणि आंबा पुढे गेला. नवरोबा मात्र हिरमुसला
होत परतला. पुढे त्याला शिकारी भेटला. त्यालाही आंबा खावासा वाटला. तो त्यामागे पळू
लागला. आंबा वेगाने पळत राहिला. त्यानंतर भिकारी भेटला. तोही आंबा पकडायला धावू लागला.
एवढ्या वेळात आंबा झाडापासून फार दूर आला. शिकारी, भिकारी आंब्यामागे धावत होते. आंब्याने
त्यांना चुकवण्यासाठी एका गवताच्या ढिगात उडी घेतली. तेथे लपला. तेवढ्यात सूर्य मावळला.
आता आंब्याला झाडाकडे परतणे शक्य नव्हते. तो ढिगात तसाच पडून राहिला. पिकला आणि नंतर
सडलाही. गवत काढताना तो बाहेर आला. गवत उचलणाऱ्याने त्यावर पाय दिला. तेव्हा आंब्याला
पश्चाताप झाला, ‘अरेरे, आपण कोणाला तरी आनंद देऊ शकलो असतो. भिकाऱ्याची भूक भागवली
असती. शिकाऱ्याचे पोट भरून कोणाचा तरी जीव वाचवू शकलो असतो. लहान मुलाला निरागस आनंद
देऊ शकलो असतो. नवरोबाला बायकोची इच्छा पूर्ण केल्याचे समाधान देऊ शकलो असतो. पण हे
काहीच न होता मी संपलो. माझे जीवन व्यर्थ गेले.’
‘वेगाने
केलेली प्रगती शाश्वत नसते’, या बोधकथेतही आंबा आहे. एका शेतकऱ्याने पावसाळा सुरू होताच
जुन्या आंब्याच्या झाडाजवळ भोपळ्याचा वेल लावला. वेल वेगाने वाढत आंब्याच्या शेंड्यापर्यंत
गेला. फुलू लागला. लवकरच त्याला भोपळे लागले. आपले सौंदर्य आणि वाढण्याचा वेग पाहून
वेलाला गर्व झाला. आंब्याकडे पानाशिवाय काहीच नाही, हे पाहून तो म्हणाला, ‘काय रे आंब्या,
तू इतकी वर्ष वाढतोस पण तुला पानाखेरीज काहीच नाही. तुझ्या मागून येऊन अल्पावधीत मी
तुझ्या शेंड्यापर्यंत गेलो. मला बघ किती छान फळे आणि फुले आहेत.’ यावर आंबा बोलला,
‘अरे मी कित्येक उन्हाळे पावसाळे पाहात असाच आहे. मात्र तुझे बघ. जरा पावसाळा संपला
आणि हिवाळा सुरू झाला की तू सुकू लागशील. मी मात्र तसाच असेन.’ वेलाला आंब्याचे बोलणे
पटले नाही. काही दिवस गेले आणि पावसाळा संपला. वेलाला पाणी पुरेनासे झाले. वेल हळूहळू
सुकू लागला आणि संपत चालला. आंबा मात्र हिवाळा संपता-संपता फुलू लागला. आता वेलाला
आपल्या फुलांचा आणि फळांचा गर्व व्यर्थ होता, हे लक्षात आले.
‘उत्कृष्ट राज्याचे प्रतीक स्वंयशिस्त पाळणारी प्रजा असते’, असे सांगणारी एक कथा महाभारतातील शांतीपर्वात आहे. शंख आणि लिखित या दोन भावांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपले दोन आश्रम स्थापन केले. विद्यादान करू लागले. अनेक दिवस दोघा भावांची भेट झाली नाही, म्हणून लिखित शंखास भेटावयास गेला. मात्र शंख आश्रमात नव्हता. निराश होऊन परत जाताना शंखाच्या बागेतील एका झाडाला पिकलेला आंबा दिसला. तो आंबा पाहून लिखितची अगोदरच लागलेली भूक आणखी तीव्र झाली. त्यांनी तो आंबा तोडला आणि परत निघाला. थोडे अंतर जाताच शंख भेटला. लिखिताच्या हातातील आंबा पाहून त्याने विचारले, ‘हा आंबा कोठे मिळाला?’ लिखिताने सांगितले, ‘अरे तुझ्याच बागेतील झाडाचा आहे. पिकलेला दिसला आणि भूक लागली होती म्हणून तोडला.’ यावर शंख म्हणाला, ‘झाडाच्या मालकाला न विचारता तू तोडलास म्हणजे तू चोरी केली आहेस.’ लिखितास आपली चूक उमगली. त्याने शंखास शिक्षा देण्याची विनंती केली. मात्र शंख म्हणाला, त्याची काही गरज नाही. पुन्हा असे करू नकोस. आपल्याला शिक्षण देणाऱ्या गुरुचे नाव आपण जपले पाहिजे’. शंखाने शिक्षा देण्यास नकार दिला. मात्र आपण चूक केली या विचाराने लिखिताचे मन सैरभैर झाले. तो सरळ राजाकडे गेला. राजाला प्रसंग कथन केला आणि शिक्षा देण्याची विनंती केली. राजा म्हणाला, ‘लिखिता तू म्हणतोस ते सारे खरे आहे. मात्र माझ्याकडे तक्रार नसताना मी शिक्षा करू शकत नाही.’ यावर लिखिताने विचारले, ‘मला या गुन्ह्याची शिक्षा काय आहे, हे कळू शकेल का?’ यावर राजाने चोरीसाठी एक हात कापणे ही शिक्षा असल्याचे सांगीतले. यावर लिखिताने दरबारातच तलवार घेऊन आपला आंबा तोडणारा हात कापून टाकला आणि स्वत:च शिक्षा करून घेतली.
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना आंबे फार आवडत असत. त्यांच्या आदर्श तत्वनिष्ठ जीवनातील अनेक प्रसंग बोध देणारे आहेत. आंब्याबाबतचा एक प्रसंग त्यांच्या तत्वनिष्ठेचे उत्तम उदाहरण मानले जाते. त्यावेळी स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल शास्त्रीजींना अटक झाली होती. त्यांना ठेवण्यात आलेल्या कारागृहात कडक पहारा होता. कोणालाही भेटण्यास अनुमती नव्हती. मोठ्या प्रयत्नाने आई रामदुलारी किंवा पत्नी ललितागौरी यांच्यापैकी एकीला भेटण्याची अनुमती मिळाली. आईने ललितागौरीना भेटायला पाठवले. शास्त्रीजींना भेटायचे हे सांगताच कोणतीही तपासणी न करता ललितागौरींना सोडण्यात आले. शास्त्रीजींशी त्यांचे बोलणे झाले. निघताना त्यांनी पदराखालून दोन आंबे काढून शास्त्रीजींना देऊ लागल्या. त्या म्हणाल्या, ‘तुम्हाला आंबे आवडतात, म्हणून हे आणले आहेत.’ शास्त्रीजी यावर म्हणाले, ‘मला खूप वाईट वाटले. तुरुंगाच्या नियमानुसार येथे बाहेरचे पदार्थ आणता येत नाहीत. त्यांनी नाव ऐकून न तपासता सोडले, आणि तू त्यांचा विश्वासघात केलास. मला काय आवडते याचा विचार करण्यापूर्वी मला काय आवडत नाही, याचा तू विचार करायला हवा होतास. कारागृहाचा नियम मोडलेला आणि ज्यांने विश्वास ठेवला त्याचा विश्वासघात झालेला मला आवडणार नाही. मला आंबे कितीही आवडत असले तरी असे विश्वासघाताने नियम मोडून आणलेले आंबे मी खाऊ शकत नाही. ते तू परत घेऊन जा.’ तत्त्वनिष्ठेचे यापेक्षा सुंदर उदाहरण कोणते असू शकेल?
राजशिष्टाचारासाठी आंबा वापरण्यात झिया उल हक प्रसिद्ध होते. सीमेवर गोळीबार करण्याचा एकिकडे आदेश द्यायचे आणि दुसरीकडे पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आंब्याची पेटी भेट म्हणून पाठवायचे. त्यांच्याकडे हापूस नव्हता. ते ‘रातोल अन्वर’ जातीचे आंबे पाठवत असत. त्यामागे तुमच्या हापूसपेक्षा आमचा अन्वर ‘ग्रेट’ आहे, असे त्यांना सुचवायचे होते. झिया उल हक मोठे आंबाप्रेमी होते. त्यांचा घात आंब्यावरील प्रेमाचा फायदा घेऊन झाला, असे मानले जाते. ज्या विमानातून ते प्रवास करत होते, त्या विमानात आंब्याच्या पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. त्या पेट्यांमध्येच बाँब ठेवण्यात आला होता. त्याचा स्फोट होऊन विमान अपघात झाला, असा एक निष्कर्ष काढण्यात आला आहे. नवाज शरीफ यांनी चौस वाणांच्या पेट्या पंतप्रधान मोदी सुषमा स्वराज आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवल्या होत्या. मात्र आंब्याला ‘मँगो डिप्लोमसी’ असे नाव देण्यात आले, त्याचे कारण मात्र वेगळे आहे. हापूस आंब्याला अमेरिकन बाजारपेठ मिळावी म्हणून कमलनाथ प्रयत्न करत होते. त्यावेळी भारतात ‘हार्ले डेव्हिडसन’ मोटारसायकल आयात करण्यास परवानगी नव्हती. हिलरी क्लिंटन यांनी हापूससाठी अमेरिकन बाजारपेठ खुली करायची तर ‘हार्ले डेव्हिडसन’ मोटारसायकलला भारतीय बाजारपेठ खुली करावी लागेल, अशी अट घातली. या प्रसंगाचे एका साक्षीदाराने वर्णन करताना ‘मँगो डिप्लोमसी’ शब्द वापरला आणि त्यानंतर हा शब्द सर्वत्र रूढ झाला.
(पूर्वार्ध)