शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

वेडी नव्हे शहाणी बाभूळ


 बाभूळ झाड हे सर्वार्थाने मानवाला उपयोगी पडणारे. केवळ काटे आहेत म्हणून त्याचा दुस्वास केला जातो. पाने आणि शेंगा जनावराबरोबर  पक्षी तसेच
माणसाच्याही उपयोगाच्या. लाकूड तर सागवानापेक्षाही टिकाऊ. पण केवळ काटेरी झाड म्हणून त्याला आज वाढू दिले जात नाही. हे झाड शेतकऱ्याच्या बांधावर तर असावेच, पण इतरही ठिकाणी त्याला जगू दिले पाहिजे, वाढू दिले पाहिजे. या बहुगुणी बाभूळ झाडाविषयी व त्याविषयीच्या आठवणी….

_______________________________________________________

बाभूळ म्हटले की डोळ्यासमोर सर्वप्रथम त्याचे काटेच येतात. बाभळीला धारदार, टोकदार, सर्वांग पांढऱ्या रंगाने झाकलेले, पिवळसर लाल टोकाचे, फांदीच्या एकाच ठिकाणी काटकोनात बसलेले दोन काटे असतात. या काट्यांची भीती प्रत्येकाच्या मनात असते. प्रत्येकाला बाभळीच्या झाडाची ओळख होते ती या काट्यामुळेच. काट्यामुळेच बाभळीचे झाड उगवलेले दिसले रे दिसले की, त्याच्यावर विळा किंवा कुऱ्हाड चालवली जाते. केवळ काट्यामुळेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्वाधिक उपयोगी पडणाऱ्या बाभळीचे जीवन संपवले जाते. बाभळीच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग मानवाला आणि निसर्गातील अन्य सजीवांना होतो. तरीही या सदुपयोगी झाडाशी माणसाचे वागणे कृतघ्नपणाचे आहे. इतर प्राणी-पक्षी मात्र त्याच्याशी दोस्ती करतात.

मराठी बाभूळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या झाडाला शास्त्रीय भाषेत ‘ॲकेशिया निलोटिका’ किंवा वाचेलिया निलोटिकाम्हणतात. इंग्रजीत गम अरेबिक ट्रीअसे नाव आहे. बाबूल, थॉर्न मिमोसा, इजिप्शियन ॲकॅसिया, थॅार्नी ॲकेसिया नावानेही ओळखले जाते. हिंदी बाबूल, किकर म्हणतात. बंगालीत बाबला, कन्नडमध्ये जाली मारा, तमिळमध्ये करूवेल, तेलगूमध्ये नल्लातुम्मा म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये झाडाच्या विविध गुणांवरून नावे देण्यात आली आहेत. दोन काटे एकत्र असतात म्हणून युग्मकांता, झाडाचे खोड आणि फांद्या चिवट असतात म्हणून द्रिदारूहा, पाने लहान असल्याने सूक्ष्मपत्रा, शेंगा साखळीसारख्या म्हणून मालाफला, काटे असल्याने कंटकी, पिवळी फुले असल्याने सपितका, पीतपुष्प:, नैसर्गिक औषधी वनस्पती असल्याने कसायकह: इत्यादी नावे याला मिळाली आहेत. हे झाड फॅबीएसी कुटुंबातील आहे. याचे मूळ आफ्रिका आणि मध्यपूर्व भारतीय उपखंडातील मानले जाते. ऑस्ट्रेलियात याला राष्ट्रीय महत्त्वाचे तण मानतात, तर, अमेरिकेत राष्ट्रीय आपत्तीकारक तण. याला ॲकेशिया हे वैज्ञानिक नाव ग्रीक शब्दॲकाकियाम्हणजे औषधी या शब्दावरून दिले आहे. ग्रीक वनस्पतीशास्त्रज्ञ पेडानिअस डायस्कॉर्डिस यांनी बाभळीच्या शेंगा आणि पानापासून औषध बनवले होते. याला ते ॲकाकिया म्हणत. त्यावरून ॲकेशिया हे नाव घेण्यात आले. ॲकेशिया म्हणजे काटेरी. वनस्पतींच्या वर्गीकरणशास्त्राचा पाया घालणाऱ्या कार्ल लिनियस यांनी हे झाड नाईल नदीच्या काठावर आढळत असल्याने निलोटिकानाव दिले

बाभळीचे झाड सहज उगवणारे, वाढणारे आहे. ही झाडे काळ्या मातीत वाढतात. मुरमाड जमिनीतही ही झाडे वाढतात. कोकणातील ज्या लाल मातीत हापूस रूजतो, त्या मातीत बाभूळ मात्र रूजत नाही. मात्र कोकणातील ज्या भागात काळी माती असते, तेथे बाभूळ आढळते. बाभूळ उष्ण कटिबंधात आणि समशितोष्ण भागात चांगले वाढते. बाभळीचे काळ्या रंगाचे धामुके म्हणून ओळखले जाणारे द्विदल बी असते. गडद तपकिरी काळ‌्‌या रंगाच्या चमकदार आवरणावर तपकिरी रंगाचा पट्टा या बियांना आकर्षक बनवतो. साधारण पाच मिलीमीटर चपट्या आकाराचे हे बी असते. एका किलोमध्ये पाच ते आठ हजार बिया बसतात. मातीतून उगवताना चिंचेसारखी दोन पातळ गोलाकार पाने घेऊन हे बी उगवते. चिंचेच्या आणि बाभळीच्या झाडामध्ये खूप साम्य आहेत. अगदी बीज रूजण्यापासून. चिंचेच्या झाडाला काटे फक्त नाहीत. नाही तर रूजणे, पान, फळांचा आकार सारे काही सारखे. बाभूळ उगवल्यानंतर नव्या पानासोबत काटेरी व्हायला सुरूवात होते. या छोट्या रोपांना पालवं म्हणतात. या पालवांचा काटा पायात घुसला तरी दिसत नाही. त्यामुळे शेतामध्ये उगवणारी रोपे जन्मानंतर काही दिवसां उपटून टाकली जातात. शेतात शेळ्या-मेंढ्यांचे खत घातले की त्यांच्या खतातून आपोआप या बिया येतात. त्या बिया रूजतात, मात्र, त्यांना जगू दिले जात नाही. माळरानावरही शेळ्या-मेंढ्यांच्या लेंढ्यांतून या बिया पडतात, रूजतात. ही छोटी रोपे वाढू लागतात. मात्र शेळ्या-मेंढ्यांच्या नजरेस पडली की त्या त्यांच्यावर तुटून पडतात. या रोपांची कोवळी पोपटी पाने खायला त्यांना फार आवडतात. त्यामुळे या रोपांचे झाडात रूपांतर व्हायला वेळ लागतो.

एकदा हे रोप जनावरांच्या तोंडांच्या पोहोचेपलिकडे गेले की वाढायला सुरूवात होते. याच्या फांद्या कापल्यानंतर याची वाढ खुंटत नाही, तर ते दुप्पट जोमाने वाढते. सुरूवातीला याचे खोड हिरवे असते. ते वाढत जाते, तसतसे त्याच्या हिरव्या रंगावर तपकिरी चमकदार आवरण यायला सुरूवात होते. खोड पूर्ण वाढले की त्याचा रंग काळा होत जातो. बाहेरून साल काळी असली तरी आतल्या बाजूला पांढरी असते. मधला भाग मात्र लाल रंगाचा असतो. लाकडाचे बाह्यावरण पांढरे असते. खोडाचा अंतर्भाग पिवळसर किंवा लाल असतो. खोडावरची साल भेगाळलेली असते. मध्ये-मध्ये त्या भेगां खंड येतो.

सालीवरी भेगांमध्ये मोठ्या प्रमाणात किडे राहतात. दिवसा-रात्री किर्रsर्र असा आवाज करणारा किडा बाभळीच्याच झाडावर राहतो. ऐन उन्हाळ्यात भर दुपारी या किड्याच्या आवाजाने डोके दुखते. लाखेच्या किड्यांचेही बाभळीचे झाड म्हणजे आवडते घर. इतरही अनेक किटकांचे आणि पक्ष्यांचे वास्तव्य बाभळीवर असते. विशेषत: सुगरण पक्ष्यांचे ते आवडते झाड. पावसाळ्याच्या मध्यावर नर सुगरण पक्षी पाणवठ्याशेजारच्या बाभळीवर घरटी बांधतात. ती घरटी आपल्या प्रियेला दाखवतात. ते घर तिला आवडले तर ती त्या घरात अंडी घालते. त्यामुळे बाभळीच्या शेंड्याला सुगरणीची अनेक घरटी वाऱ्यासोबत झुंबराप्रमाणे झुलत असतात
या झाडाच्या काट्यांमुळे ही पसंती असते. बॅगवर्म मॉथ नावाचा पतंग स्वत:च्या कोषावर बाभळीचे काटे तोडून चिकटवूजणू काही भक्कम तटबंदी तयार करतो. तो त्या कोषातून बाहेर येऊन केवळ पाने खातो आणि पुन्हा आत जाऊन बसतो. हा कालावधी काही महिन्याचा असतो. लहान बाभळीच्या झाडावर असे अनेक कोष लटकलेले दिसतात. आफ्रिकेतील बाभळीवर मुंग्या घरांचा कोष तयार करतात. कोणी झाड तोडू लागले तर या मुंग्या हल्ला चढवतात. आपल्या संरक्षणाच्या बदल्यात झाड मुळाजवळ मुंग्यांना अन्न उपलब्ध करून देते.

    नेहमीच्या बाभळीला बाभूळ किंवा वेडी बाभूळ म्हणतात. बाभळीचे इतरही काही प्रकार आहेत. यातील एक प्रकार म्हणजे रामकाठी किंवा रामटेक बाभूळ. रामकाठी बाभळीला काटे कमी आणि आकाराने लहान असतात. ही झाडे उंच वाढत जातात. ती इतर झाडांसारखी खुलून फुलत नाहीत. त्यामुळे या झाडांना शेंगा येण्याचे प्रमाणही कमी असते. त्यांची वाढ कमी असते. ती शक्यतो कोणी तोडत नाहीत. त्यांना वाढू दिले जाते. रामकाठी बाभळीच्या फांद्या इतर बाभळीप्रमाणे आडव्या जाता उंच वाढत जातात. ही झाडे क्वचितच आढळतात. या झाडांचा बुंधाही इतर बाभळीच्या झाडांप्रमाणे मोठा होत नाही. मात्र लाकूड फार टणक, टिकाऊ असते.

आज ग्रामीण भागातवेडी बाभूळम्हणून ओळखली जाणारी बाभूळ प्रत्यक्षातविलायती बाभूळआहे. विलायती बाभूळ भारतीय नाही. हिचे खोड प्रथम हिरवे आणि नंतर पांढरे बनते. काटे खूपच धारदार आणि मोठे असतात. या झाडाचा काटा टायरखाली आला तर टायर पंक्चर झालेच म्हणून समजा. याची पांढरी फुले माळेसारखी येतात. या फुलांवर मधमाशा आणि इतर किटक मध गोळा करायला येतात. मात्र कोणताही पक्षी या विलायती बाभळीशी दोस्ती करत नाही. आपण पूर्वीपासून ज्या बाभळीला ‘वेडी बाभूळ’ म्हणून ओळखतो ती भारतीय आहे. खरे तर ती शहाणी बाभूळआहे. तिची उंची कमी असते. काटेही लहान असतात. पाने सामान्य बाभळीसारखी मात्र लहान असतात. या झाडाला येणाऱ्या शेंगा सामान्य बाभळीसारख्याच मात्र काळ्या गडद चॉकलेटी असतात. या शेंगांचे औषधी महत्त्व फार आहे. विशेषत: पोटाच्या विकारावर या शेंगा गुणकारी असतात. त्यामुळे हे झाड बांधावर आले, तर, जपले आणि वाढवले जाते. मात्र ही झाडे आज अत्यंत दुर्मिळ झाली आहेत. 

बाभळीचा आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे सुबाभूळ. या झाडाचे पिक उदंड झाले आहे. १९७२ पर्यंत हे झाड कुबाभूळ’ म्हणून ओळखले जात असे. त्या वर्षीच्या दुष्काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी उरळीकांचनच्या दुग्ध प्रकल्प पाहायला आल्या होत्या. भीषण दुष्काळातही तेथील जनावरांचे उत्तम पोषण पाहून त्यांनी त्याचे गुपित विचारले. त्यावेळी कोसबाडचे कृषीशास्त्रज्ञ डॉ. जयंत पाटील यांनी कुबाभूळची झाडे दाखवली आणि त्याचा पाला या जनावरांचे पोषण करतो, असे सांगितले. यावर प्रतप्रधान इंदिराजी गांधी यांनीतो फिर इस पेड को कुबाभूल नही, सुबाभूल कहना चाहिए’, असे म्हटले. झाले, कुबाभूळ’ची सुबाभूळ’ झाली आणि ही झाडे सर्वत्र लावली जाऊ लागली; मात्र त्यामागचे शास्त्र विसरून! त्यामुळे ही झाडे सर्वत्र जंगलासारखी वाढली. या झाडाला काटे नसतात. याची पाने जनावरासाठी पौष्टिक अन्न आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये या झाडांची शेती केली जाते. या झाडांच्या शेंगा चपट्या असतात. त्यांना जनावरे खात नाहीत. उन्हाळ्यात त्या फुटतात आणि बिया आजूबाजूला पसरतात आणि उगवतात. भारतात काही सुजाण शेतकरी मेंढी-शेळीपालनासाठी ही झाडे लावताहेत. मात्र जंगलात ही झाडे लावणे योग्य नाही. याचे लाकूड ठिसूळ असते. मुळे जमिनीलगतच असतात. पावसाळ्यात ही झाडे थोड्याशा वाऱ्यानेही उन्मळून पडतात. या लाकडाचा जळणाखेरीज काहीही उपयोग होत नाही. 

ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे या तीन प्रकारच्या बाभळीच्या झाडांना राजकी पक्षाच्या रचनेशी जोडतात. ते म्हणतात, ‘रामकाठी बाभळीची झाडे म्हणजे असे नेते ज्यांचा संबंध थेट हायकमांडशी असतो. काही नेते सुबाभळीसारखी असतात. ते कालपर्यंत कोठेच नसतात. अचानक उगवतात आणि त्यांना महत्त्व प्राप्त होते. राजकी पक्षांतील तिसरा वर्ग म्हणजे येड्या (साध्या) बाभळीसारखा. अर्थात सामान्य कार्यकर्त्यासारखा. या कार्यकर्त्यांमुळेच राजकी पक्ष उभा असतो’.

    बाभळीच्या खोडाला कोठे जखम झाली तर त्यातून चिकट पदार्थ बाहेर येतो. त्याचा काळसर वंगणासारखा थर खोडावर पसरत जातो. जखमेच्या जागेवर पिवळ्या-लाल किंवा पांढऱ्या रंगांचा डिंकाचा गोळा बनतो. या डिंकामध्ये ५२ टक्के कॅल्शियम आणि २० टक्के मॅग्नेशियम असते. हा डिंक लाडू बनवण्यासाठी वापरला जातो. त्यातही डिंकाचे पदार्थ बाळंतीण महिलेस आवर्जून खायला दिले जातात. हा डिंकलाडू पौष्टिक आहाराचा भाग मानला जातो. अर्जून, शेवगा, कडूलिंब इत्यादी झाडांना डिंक येतो. मात्र बाभळीचा डिंक सर्वात चांगला मानला जातो. डिंकाचे औषधी गुणधर्म लक्षात घेवून जास्त डिंक मिळवण्यासाठी झाडाला कृत्रिमरित्या जखमा केल्या जातात. कापलेल्या सालीच्या भागातून डिंक बाहेर येतो. हिवाळ्यामध्ये रात्री तापमान कमी होते आणि डिंक जास्त प्रमाणात मिळतो. डिंकाचा उपयोग रंग बनवण्यासाठी आणि रंग टिकाऊ बनवण्यासाठी केला जातो. भारतात बाभळीच्या डिंकाच्या औषधी गुणधर्मामुळे त्यालाअमरावती डिंकअसेही म्हणतात. डिंक हा मधूर, शक्तीवर्धक आणि शीत गुणधर्माचा आहे. हाड मोडलेल्या रूग्णांनाही डिंकलाडू खाण्याचा सल्ला दिला जातो.

डिंकाचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग होतो. तो म्हणजे पुस्तके आणि वह्या चिकटवण्यासाठी. आज वेगवेगळ्या कंपन्यांच्या गम बॉटल्स बाजारात विकत मिळतात. मात्र आमच्या लहानपणी हा डिंक पुस्तके आणि वह्या चिकटवण्यासाठी आम्ही गोळा करायचो. बाभळीचा डिंक गोळा करायचा. चांगला वाळवायचा. त्यानंतर त्याची भुकटी करून पाणी मिसळून त्याचा डिंक बनवायचा. दरवर्षी उन्हाळ्यात वापरलेल्या वह्या रद्दीत घालण्यापूर्वी त्यातील कोरी पाने काढणे आणि त्याच्या वह्या शिवायच्या. दरवर्षीचा हा उपक्रम असायचा. एरवीही फाटलेली पुस्तके चिकटवण्यासाठी हा डिंक वापरला जात असे.

झाडाला पहिली दोन पाने वगळता एकाच प्रकारची संयुक्त पाने यायला सुरुवात होते. पाने संयुक्त असतात. एका पानाला दोन ते दहा उपपाने येतात. या प्रत्येक उपपानावर दहा ते पन्नास पर्णिका असतात. पर्णिकांची लांबी दोन ते सात मिलीमीटर तर रूंदी अर्धा ते तीन मिलीमीटर असते. या पर्णिका समोरासमोर असतात. कोवळ्या पानांचा रंग पोपटी असतो, पुढे ती गर्द हिरवी बनतात. कोवळी पाने बकऱ्या आणि मेंढ्यांचे आवडते खाद्य. त्या कोवळ्या काट्यांसह पाला फस्त करतात. काटे एक सेंटिमीटरपासून अगदी साडेसात सेंटिमीटर लांबीचे असतात. काट्यांचा बाह्यरंग पांढरा असतो. मात्र टोक पिवळसर हिरवे असते. वाळलेल्या काट्याचे टोक मात्र लालसर काळे असते. सुरूवातीला आलेले काटे, खोड मोठे होताच काटे गळून जातात. तसेच झाडाचे वय जास्त झाल्यानंतर काट्यांचा आकार कमी होत जातो. खूप जुन्या झाडाला काटे येत नाहीत. अशा झाडांनागोडी बाभूळम्हणतात. मात्र माणूस इतका स्वार्थी की काटेरी बाभळीला, ‘गोडी बाभूळबनेपर्यंत जगूच देत नाही!

झाड सात-आठ वर्षांचे झाले की, त्याला फुले यायला लागतात. कणखर, पोलादी मनाच्या माणसालाही एक हळवा कोपरा असावा, तशी ही बाभळीची फुले असतात. दणकट लाकूड, दहशत भरवणारे काटे, उन-पावसात फुटणाऱ्या शेंगा असणाऱ्या या झाडाची फुले मात्र सोनेरी, नाजूक असतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही झाडे फुलतात. अवकाळी पावसाच्या काळ्या ढगांनी भरलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर सोनेरी पिवळ्या रंगांच्या गोंडेदार फुलांनी न्हाऊन निघालेले झाड खूपच खुलू दिसते. मार्च ते जुलै या काळात प्रत्येक पानापासून दोन ते सहा फुलांचे गुच्छ येतात. कमी जास्त प्रमाणात ही फुले वर्षभर येत असतात. फुलांचा व्यास दहा ते पंधरा मिलीमीटर असतो. त्यातही रूक्ष वाळवंटी भागातील बाभूळ फुलांचा दिमाख काही वेगळाच असतो. कसदार भरपूर पाणी असणाऱ्या जमिनीत वाढणाऱ्या झाडांना मात्र तसा बहर येत नाही. या झाडांना फुले येण्याचे प्रमाण खूप कमी असते. हे फुल म्हणजे तीस ते पन्नास फुलांचा गोल गुच्छ असते. फुल दिडेक सेंटिमीटर लांबीचे असते. या फुलामध्ये फ्लॅवोनाईडस असते. ते खोडाला दोन सेंटिमीटर लांबीच्या पोपटी देठाने जोडलेले असते. अनेक फुले गळतात आणि झाडाच्या खाली पिवळ्या फुलांची दुलई तयार होते. फुले फुलली की किटक आणि मुंग्यांचा झाडावर वावर वाढतो. त्यातून परागीभवन होते. फळ तयार होते.

    बाभळीची फळे म्हणजे साखळीसारख्या शेंगा असतात. यामुळे काही भागात या शेंगांनासाखळ्याअसेही म्हणतात. शेंगा सहा ते पंचेवीस सेंटिमीटर लांबीच्या चार ते १७ मिलीमीटर रूंदीच्या असतात. या शेंगावर मऊ आखूड केसांचे आवरण असते. त्यामुळे या शेंगा मऊ बनतात. या चपट्या शेंगात आठपासून पंधरापर्यंत बिया असतात. ऊन-पावसातही शेंगा फुटत नाहीत. शेंगामध्येही १२ ते २० टक्के टॅनीन असते. तसेच पॉलीफिनॉलिक संयुगे माेठ्या प्रमाणात असतात. पांढरट हिरव्या रंगाच्या शेंगा पक्व होतांना पांढऱ्या रंगाच्या बनतात. या शेंगा पा फुटापर्यंत लांब असतात. त्यावर करवे पडलेले असतात. या शेंगा हिरव्या असताना माकडांची नजर पडली, तर, माकडे शेंगा फस्त करत सुटतात. अर्धवट खाणे आणि खाली टाकणे हा त्यांचा आवडता खेळ, अनेक तास सुरू असतो. शेंगा तीन-चार महिन्यां वाळायला सुरूवात होते. त्या वाळल्यानंतर देठही लगेच वाळते आणि त्या खाली पडतात. या शेंगा जिराफ, हत्ती यांचेही आवडते फळ आहे. पौष्टिक गराने भरलेल्या शेंगा हिरव्या असोत किंवा वाळलेल्या, शेळ्या आणि मेंढ्यांचे ते आवडते खाद्य. वाळलेल्या शेंगाही त्या अधाशासारख्या खातात. शेंगामध्ये दहा-बारा बिया असतात. वाळलेल्या शेंगाचे बी शेळ्या-मेंढ्यांच्या पोटात रात्रभर मुक्काम करून लेंढ्यातून बाहेर पडते. त्यानंतर ते जिथे पडते तेथे पावसाळ्याच्या सुरूवातीला ओलावा मिळताच रूजतात. या बियापासून कातडी कमावण्यासाठी रंगही मिळवला जातो. शेंगापासूनही रंग बनवले जातात. पूर्वी कोवळ्या शेंगापासून लोणचे आणि भाजी करत असल्याचे संदर्भ मिळतात.

या झाडाची उंची पाच ते वीस मीटरपर्यंत वाढते. अनेक जाणकार शेतकरी शेताच्या बांधावर ही झाडे वाढवतात. शेतातील मातीचे बांध संरक्षित करण्याचे काम ही बाभळीची झाडे करतात. शेताच्या सीमा ठरवण्याची खूण म्हणूनही झाडे जपतात. काळ्या कुळकुळीत झाडावर हिरव्यागार पानांनी भारलेल्या फांद्यांचा गोलाकार डेरा बनतो. बाभळीच्या झाडांच्या काटेरी फांद्या (काटाड्या) बांधावर रोवून पिकांचे संरक्षण केले जाते. या झाडांच्या पानांचा, फळांचा उपयोग पशू-पक्ष्यांना होतो. शेळ्या-मेंढ्यांपालनात बाभूळ फार महत्त्वाची ठरते. बाभळीचा पाला कोंबड्यांच्या खाद्यातही मिसळतात. या झाडाच्या बारीक फांद्यांचा उपयोग आफ्रिकेत आणि भारतात दात घासण्यासाठी केला जातो. उत्तर भारतात दात घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काड्यांनादातूनम्हणतात. दातांच्या आरोग्याची काळजी हे दातून घेते. बाभळीच्या इतर भागाचा मानवालाही मोठा उपयोग होतो.

बाभळीचे लाकूड मोठे काटक, टिकाऊ, कणखर आणि चिवट असते. या लाकडपापासून कुळवाची दिंडे, बैलगाडीचे विविध लाकडी भाग बनवले जातात. लोखंडांचा नांगर येण्यापूर्वी नांगराचा आकडा बनवण्यासाठी बाभळीचे जोडफांदीचे लाकूड शोधले जायचे. गुऱ्हाळातील मुसळे, खळ्यातील बैल फिरवायचे तिवडे अशा अनेक कारणासाठी बाभळीचे लाकूड वापरले जात असे. साधारण चैत्रात हे झाड तोडले तर लालसर पिवळ्या रंगाचे ते लाकूड भेगाळता वाळते. झाड तोडून सालीसह लाकूड उभे ठेवून वाळवतात. त्यानंतर त्यापासून फळ्या काढल्या जातात. जुन्या काळात धाब्याची घरी बांधली जात. या माळवदासाठी बाभळीचे लाकूड वापरले जात असे. वाळलेले लाकूड कुऱ्हाडीने तोडणे कठिण होत जाते. खूप मोठे लाकूड असेल तर त्याच्या फळ्या काढून दरवाज्यासाठी वापरतात. छोट्या लाकडाचा उपयोग घर बांधताना खुंट्या, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या खुरप्यांच्या आणि विळ्यांच्या मुठी बनवायला केला जातो. लाकडावर पाण्याचा परिणामही कमी होत असल्याने जहाज बांधणीसाठी बाभळीच्या लाकडाला मागणी आहे. बाभळीच्या लाकडाचा कुऱ्हाडीसाठी बनवलेला दांडा अनेक गोतांचा काळ बनतो. तो खूप टिकतो. बाभळीचे लाकूड सागवानापेक्षा दुप्पट टिकावू असते. अगदीच उपयोगाला येणारी लाकडे जळणासाठी वापरली जातात. ही लाकडे कार्बनचा मोठा साठा असतात. त्यामुळे ती दीर्घकाळ जळतात आणि मोठ्या प्रमाणात उष्णता देतात. ही लाकडे हळूवार जळतात आणि धूर कमी करतात.

बाभळीच्या झाडामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकद्रव्ये, जीवनसत्वे आणि क्षार असतात. शंभर ग्रॅम बाभूळ घेतली तर त्यात .२८ मिलीग्रॅम लोह असते. .९०२ मिलीग्रॅम मॅगेनीज, १३.९२ ग्रॅम प्रोटीन, .६३ ग्रॅम मेद, .२५६ मिलीग्रॅम जस्त असते. त्याचबरोबर ग्रॅम व्हॅलाईन अमिनो आम्ले, .६३ ग्रॅम हिस्टिडाईन, .०६ ग्रॅम आयसोल्युसाईन, . ग्रॅम थ्रिओनाईन, .९८ ग्रॅम लायसीन आणि .०६ ग्रॅम ल्युसाईन असते. यामुळेच बाभूळ औषधी बनते.

हे झाड मुळातच औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. खालील संस्कृत श्लोक वाचला तरी त्याच्या औषधी गुणांची कल्पना येते.

बब्बुलस्तुवर: शीत: कुष्ठकासामयापह:l आमरक्तातिसारघ्न पित्ताशरेदाहनाशन्:ll

बब्बुलस्य फलं रूक्षं विषदं स्तम्भनं गुरूl बब्बुलस्य तु निर्यासीग्राही पित्तानिलापह:ll

रक्तातिसारपित्तास्त्र मेह प्रदरनाशन:l भग्नसंधानक: शीत: शोणितस्त्रुतिवारण:ll’

डिंक वगळता बाभूळ झाडाचे सर्व भाग तुरट चवीचे आहेत. त्यामुळे दाताच्या आरोग्यासाठी ते उपयुक्त ठरतात. घशाला कोरड पडल्यामुळे खोकला येत असल्यास डिंक तोंडात धरतात. अतिसाराच्या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून कोवळी पाने चावून खायला सांगतात. डिंक तुपासोबत खाल्ल्यास शक्ती वाढते. लघवीच्या त्रासावर डिंक गरम पाण्यासोबत घेतात. आयुर्वेदि दंतमंजनात सालीचा उपयोग केला जातो. टॉन्सीलच्या त्रासावरही पानाचा काढा करून सैंधव मी घालून पितात आणि गुळण्या करतात. बाभळीच्या पानाचे उटणे त्वचारोगावर गुणकारी ठरते. कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी यावरही बाभूळ गुणकारी ठरते. बाभूळ रक्तस्तंभक आहे. रक्तस्राव थांबवण्यासाठी बाभळीचा पाला लावला जातो. गुडघेदुखीवर बाभळीच्या शेगांचे चूर्ण करून ते तेलातून लावतात. झाडाच्या सालीचा उपयोग रंगनिर्मिती, औषधनिर्मिती आणि देशी दारू बनवण्यासाठी केला जातो. मधुमेहींच्या उपचारातही बाभूळ साल उपयोगी पडते. झाडाच्या काढ्याचा उपयोग हिरड्या घट्ट करण्यासाठी केला जातो. बाभूळपासून वेदनाशामक आणि दाहशामक औषधे बनवली जातात. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या लोकांना बाभळीपासून बनवलेली औषधे घेणे घातक ठरते. वेदनाशामक, त्वचारोग, विषबाधा, तोंडातील व्रण, कर्णदोष, अपचन, अतिसार, रक्तस्राव इत्यादी आजारावर बाभळीपासून बनवलेल्या औषधाचा उपयोग केला जातो. सालीमध्ये १२ ते १५ टक्के टॅनिन असल्याने कातडी व्यवसायातही सालीचा वापर केला जातो. कातडीला चिकटलेला मांसल भाग बाभळीच्या सालीच्या द्रावणामुळे लवकर अलग होतो.

बाभळीचा पायात काटा मोडला की खूप राग यायचा; मात्र हा राग तो काटा बाभळीच्या काट्याने काढेपर्यंत. त्यातूनचकाट्याने काटा काढणेही म्हण तयार झाली असावी. मोडलेला काटाचोर की पोलीसते ठरवण्यासाठी आम्ही भुवयीतील केस काढायचो आणि त्याला तो काटा चिकटतो का? हे तपासायचो. काटा बारीक आणि कोवळा असला तर चिकटायचा, तो चोर. जुना आणि जरा मोठा असला तर तो चिकटायचा नाही, तो पोलिस. या चोर-पोलिसाच्या खेळात आमचे दुखणे आम्ही विसरायचो. सहज दुखणे विसरायचा, हा बालस्वभाव जे मोठेपणीही टिकवतात, त्यांचे जगणे सुंदर बनते. ते इतरांचे जगणेही सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात. ‘चोर-पोलीस’ ठरवून झाले की आम्ही पुन्हा बाभळीचा काटा शोधायचो, भिरभिरा बनवण्यासाठी. कागदाला कापून, चार पात्याचे, आठ पात्याचे पंखे बनवायचो. हे पंखे बाभळीच्या काट्याने लाकडाला किंवा ज्वारीच्या धाटाला लावायचो आणि ते हातात घेऊन आम्ही रानभर पळायचो. या भिरभिऱ्यांची सर शहरात विकत घेतलेल्या भिरभिऱ्यांना कधीच येणार नाही. बाभळीचे काटे वापरून आणखी एक खेळणे बनवायचो. ज्वारीची धाटे घेऊन आम्ही गाडी बनवायचो. त्या गाडीला चाके मात्र खापराच्या तुकड्यापासून बनवली जायची. ही चाके बसवण्यासाठी काट्यांचा वापर खिळ्यासारखा केला जायचा. ही गाडी अंगणात फिरवत वेळ कसा जायचा, कळायचे नाही. बाभळीच्या शेंगा वाळल्या की धामुक्यांचा मधूर आवाज यायचा. याचा उपयोग करून मुली त्याचे पैंजण, जोडवी बनवून पायात घालत असत. तसेच साखळीच्या पाच कड्यांचा तुकडा घेऊन मधल्या कडीच्या दोन्ही बाजूला छिद्र पाडले जाई. त्या छिद्रातून दोरा ओऊन त्याला पिळ द्यायचा आणि नंतर त्याला दोरा तुटेपर्यंत फिरवत बसायचो.

   बाभळीच्या काट्यांना पुरं तालुक्यातील गुळुंचे गावच्या यात्रेत मोठे महत्त्व आहे. ही प्रथा पाहणाऱ्यांच्या, ऐकणाऱ्यांच्या अंगावरही काटा आणणारी आहे. या गावातील ज्योतिर्लिंग यात्रेची सुरुवात कार्तिक महिन्यात लक्ष्मीपूजनांच्या मध्यरात्री घटस्थापना करतात. त्या दिवसापासून दररोज छबिना, काकड आरती, भजन, किर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. असंख्य ग्रामस्थ उपवासही करतात. एकादशी दिवशी पालखीतून देवाचा मुखवटा नीरा नदीत स्नान घालून पुन्हा मंदिरात आणला जातो. यावेळी सर्वत्र गुलाल उधळला जातो. दुसऱ्या दिवशी मंदिरासमोरील प्रांगणात गतसाली तोडून ठेवलेल्या बाभळीच्या काटेरी फांद्यांचा फेस (ढिग) आणून रचला जातो. या फेसाला पालखीच्या पाच फेऱ्या मारल्या जातात. यानंतर पालखी मंदिरात जातात. त्यानंतर हजारोंच्या उपस्थितीत अनेक भाविक त्या काटेरी बाभळीच्या फेसावर उड्या मारतात. ‘हर हर भोले, हर हर महादेवच्या गजरात पाण्यात सूर मारावा, तसे उड्या मारतात. केवळ बनियन आणि पँटवर असणारे भाविक उड्या मारताना पाहिले की अंगावर काटा येताे. ही प्रथा काटेबारस यात्रेचे मुख्य आकर्षण असते.  

बाभळीच्या झाडावरील वसंत बापट यांचीबाभूळ झाडकविता खू गाजली. महाराष्ट्राच्या अनेक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचा शेवट या कवितेने केला आहे. बाभळीच्या कणखरपणाचे वर्ण ही कविता इतक्या चपखलपणे करते की अनेकांना रांगड्या बापाचे दर्शन होते. कणखर मनाने, आपले दु: आपल्या मनात ठेवत, कुटुंबाची बारा महिने काळजी घेणारा बाप या कवितेतील

अस्सल लाकूड, भक्कम गाठ,

ताठर कणा, टणक पाठ,

वारा खात, गारा खात, बाभुळ झाड उभेच आहे,

या ओळीतून दिसतो. त्याचबरोबर आयुष्यभर तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलाने बापाला म्हातारपणी छळावे, तसा सुतार पक्षी बाभळीला छळताना दिसतो. ते लिहितात,

खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन उभेच आहे,

टक्टक्टक्टक्…, चिटर् फटक्चिटर फटक्,

सुतारपक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे, शोषत आहे’.

वसंत बापट सरांना बाभळीच्या झाडामध्ये कणखर बाप दिसत असला तरी बा.सी. मर्ढेकरांसारख्या आधुनिक कवीला मात्र-

अजून येतो वास फुलांना,

अजून माती लाल चमकते,

खुरट्या बुंध्यावरी चढून,

अजून बकरी पाला खाते,

असे थोडे वेगळे दर्शन होते. इंदिरा संत यांना बाभूळ झाडाचे नाजूकपण भावते. आपल्या 'बाभळीया कवितेत लवलवत्या हिरव्यागार पालवीवरील काट्यांची जाळी त्यांना मोहवत असल्याचे त्या सांगतात. शेंगांची वेलांटी त्यांना नाजूक वाटते. बाभळीचे एकाकीपण मान्य करतानाच त्या पोपट, शेळ्यांची जवळीकही सांगतात. मात्र या झाडाचा नाजूक कोपरा म्हणजेच फुलणे त्यांनी खूप सुंदर रंगवले आहे. त्या म्हणतात,

येथे येऊन नवेच होऊन

लेऊन हिरवे नाजूक लेणे,

अंगावरती माखूनी अवघ्या

धुंद सुवासिक पिवळे उटणे’.

कृष्णशास्त्री चिपळूणकरांना मात्र बाभूळ आवडत नसावी. बाभळीला कुरूप ठरवत ते लिहितात,

काट्यांनी भरलें शरीर अवघे, छाया नसे दाटही,

नाही वास फुलांस, भूक निवे ज्याच्या फळे अल्पही’.

एवढ्यावरच थांबता ते पुढे लिहितात, त्याच्याजवळ एकही पांथस्थ येत नाही. असे असले तरी गावाकडील आजीबाई कृष्णशास्त्रींशी सहमत नाहीत. त्या बाभळीच्या झाडाच्या सावलीची तुलना आईच्या मायेबरोबर करते. बाभळीच्या झाडावर कोणी कुऱ्हाड चालवू लागले की ती म्हणते, ‘अरे थांब, नको तोडूस. ‘आई सारखी माया, अन बाभळी सारखी छाया’ दुसऱ्या कोणाची नसते’. बाभळीच्या झाडाला काटे असतात. मात्र याच काट्यामुळे ऐन उन्हाळ्यातही बाभळीखाली सावली मिळते. आईची साडी फाटकी असली तरी रडणारे बाळ तिच्याजवळ असले की शांत होते, तसेच ऐन उन्हाळ्यात बाभळीच्या काट्यांची सावली सुखकारक ठरते. बाभळीच्या आणि बोरीच्या काटेरी गुणधर्मामुळे त्यांचे शेतीला कुंपण घातले जाते. दोन्ही झाडांच्या फांद्यांचे भविष्य एकच. त्यामुळेचज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळीही म्हण आली असावी.

बाभळीच्या पानापासून लाकडापर्यंत सर्व गोष्टींचा उपयोग मानवाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष होतो. बाभूळ हे झाड निसर्गातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. सध्या जागतिक पातळीवर तापमान वाढीचा प्रश्न चर्चेत आहे. तापमान वाढ नियंत्रीत करण्यासाठी वातावरणातील कार्बन डायऑक्साईड कमी होणे आवश्यक आहे. हा कार्बन डायऑक्साईड सर्वात जास्त शोषून घेण्याची क्षमता बाभळीच्या झाडामध्ये आहे. याच गुणधर्मामुळे या झाडाचे लाकूड टणक आणि टिकाऊ बनते. वैश्विक तापमान वाढ नियंत्रित करण्यामध्ये बाभूळ महत्त्वाची भूमिका पार पाडते. मात्र यासाठी बाभळीच्या झाडांना वाढू दिले पाहिजे. बाभळीच्या झाडाखाली पिक चांगले येत नाही, म्हणून त्यांना बागायतीच काय जिरायती शेतीतही वाढू दिले जात नाही. तसेच या झाडाचे लाकूड चांगली उष्णता देत असल्याने लाकडासाठी या वसुंधरेच्या रक्षकाची आम्ही बिनधास्त कत्तल करतो. पूर्वी गावोगावी बाभूळ बने’ असायची. त्या भागाला बाभूळ बन असेच ओळखले जायचे. आज मात्र अशी बने केवळ नावालाच राहिली आहेत. पान, फुल, फळ, लाकूड या सर्व गोष्टीतून इतरांना अर्पण करणाऱ्या या झाडाला निदान बांधावर तरी वाढू द्यायला हवे. वारा खात, गारा खात त्याला उभे राहू द्यायला हवे. सुरुवातीला मलाही बाभळीच्या झाडाचा राग येत असे. मीही बाभळीची झाडे तोडत असे. तोडायला लावत असे. मात्र तिचा कार्बन शोषून घेण्याचा गुणधर्म समजला, तेव्हापासून या झाडांना वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आहे.

--००—