पृथ्वीला आपण स्त्री-रूपात मानतो. तो गुरू,
तो शनी, तो शुक्र असे म्हणतो. मात्र पृथ्वीच्याबाबत ती पृथ्वी असते. तीला आपण
माता, जननी यारूपात मानतो. कुसुमाग्रजानी तिला सूर्याच्या प्रेयसीच्यारूपात
पाहीले. त्यांनी तीचे प्रेमगीत लिहिले आणि मानवाने तीचे वय शोधण्याचा प्रयत्न
केला. प्रत्येक आधुनिक प्रयत्नातून पृथ्वीचे वय आणखी जास्त येत राहीले. पृथ्चीच्या
वय शोधण्याच्या विविध पद्धतींचा आढावा २८ फेब्रुवारी २००१ रोजीच्या 'सोलापूर तरूण
भारत' तर्फे प्रकाशित झालेल्या 'विज्ञान दिन पुरवणी'मधील लेखामध्ये घेण्यात आला
होता. तो लेख येथे प्रसिद्ध करत आहे.......
--------------------------------------------------------------------------------------------
पृथ्वीला मानवाने
जननी, माता अशा असंख्य विशेषणांनी गौरविले आहे. मूळात पृथ्वी ही माता आहे सर्वांची जननी
आहे, असेच मानले जाते.
पृथ्वीला स्त्री मानून अनेक उपमाही देण्यात आल्या आहेत. कुसुमाग्रजांनीही या पृथ्वीला सूर्याच्या प्रेयसीच्या रूपात पाहिले. त्यांच्या मते ही पृथ्वी आपल्या प्रियकराला म्हणजेच सूर्याला भेटण्यास व्याकूळ झाली आहे. ती आपल्या
प्रियकराला विनवते आहे. प्रेमाची याचना करत म्हणते आहे.
'युगामागूनी
चालली रे युगे ही
करावी
किती भास्करा वंचना
किती
काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा
करू प्रीतीची याचना.'
बरं, ही सूर्यावर प्रेम करणारी प्रेयसी आपली व्हावी,
तीने आपल्यावर प्रेम करावे म्हणून अनेकजन तिच्यावर प्रेम करत आहेत. लाख नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. तिचे रूप पाहून चंद्र तिच्या भोवती फिरतो आहे. उसना आव आणि फुकटचा रूबाब आणून चंद्र तिला मोहवण्याचा प्रयत्न
करतो आहे. तर लाजरा मंगळ हा लज्जेने लाल होऊन पृथ्वीकडे प्रेमयाचना करतो आहे. ध्रुवांनी पृथ्वी आपल्या प्रेमयाचनेला दाद देत नाही म्हणून व्रतस्थ होणं पसंत केले आहे. तर शुक्राला अजूनही आशा
आहे की पृथ्वी आपले प्रेम स्वीकारेल. त्याच्या प्रेमळ नजरेत आजही आशेचा किरण दिसतो आहे. हे सारे माहीत असूनही ही पृथ्वी वेड्यासारखी सूर्याभोवती पिंगा घालते आहे. कारण, तिला
दुर्बळांचा शृंगार नको आहे. तिच्या नजरेत तिच्यायोग्य साथीदार केवळ
सूर्य आहे. सूर्य आपला झाला नाही तरी चालेल, पण दूसऱ्या कोणाची मी होणार नाही हा तीचा निर्धार आहे. याच
भावनेने ती मानिनी म्हणते.
'परी
भव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ
गळ्याशी कसे काजवे
नको
क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी
दूरता त्याहूनी साहवे.'
'पृथ्वीचे प्रेमगीत' या कवितेत
कुसुमाग्रजांनी पृथ्वीच्या मनोभावना अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलेल्या आहेत.
आमच्यावेळी म्हणजे १९८४-८५च्या अकरावीच्या पुस्तकामध्ये हे काव्य मराठी विषयामध्ये
अभ्यासाला होते. हे काव्य शिकताना आम्ही कुसुमाग्रजांची प्रतिभा आणि पृथ्वीच्या प्रेमाची
संकल्पना
पाहून त्यावेळी थक्क झालो होतो. पृथ्वी स्वत:च्या प्रियकराच्या कल्पना निश्चित ठरवून निश्चिंत आहे. हे सारे आठवले कारण पृथ्वीच्या वयाचा शोध
घेण्याचा प्रयत्नांची माहिती वाचनात आली. पृथ्वी ही स्त्री आहे आणि स्त्री आपले
खरे वय सांगत नाही असे म्हटले जाते. तसेच काहीसे पृथ्वीच्या वयाबाबतही असल्याचे
लक्षात आले. अनेक संशोधकांनी अनेक वर्षापासून पृथ्वीचे वय शोधण्याचा प्रयत्न केला.
मात्र अजूनही पृथ्वीचे वय अंदाजेच सांगितले जाते. अशा या भास्कराच्या
प्रेयसीला तिचं वय विचारलं तर…
अर्थातच तिचे वर्तन हे याबाबतही स्त्रीसुलभ आहे. ती तिचे खरे वय सांगावयास तयारच नाही. कोणत्याही चतुर आणि सुंदर स्त्रीप्रमाणेच तिने तिच्या वयाचे निश्चित अनुमान किंवा थांगपत्ता लागू दिलेला नाही. ही व्याकूळ
प्रेयसी वय सांगताना मात्र सावधपणे वागताना दिसते. पृथ्वीचे खरे वय काय असावे याचा शोध मानवाने अनेकवेळा आणि अनेक प्रकारे घेतला आहे. या विविध
पद्धतींचा आणि पृथ्वीचे वय शोधण्याच्या प्रयत्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या
लेखात केला आहे.
कुसुमाग्रजांच्या पृथ्वीच्या प्रेमगीतात वर्णनामध्ये चंद्र, मंगळ, शुक्र यांना पृथ्वीचे वय कमी वाटणे स्वाभाविक आहे. पण अगदी
परवा परवापर्यंत म्हणजे सन १९२० पर्यंत मानवालासुद्धा ही पृथ्वी फारच तरूण वाटायची. त्यानंतर आज संशोधकांनीसुद्धा पृथ्वीचे वय ४५० कोटी वर्ष असल्याचे मान्य केले. १९२० पूर्वीतर ही सूर्यदेवतेची
प्रेयसी तीन चार हजार वर्ष वयाची नवयौवना मानण्यात येत होती.
पृथ्वी आणि विश्वाची निर्मिती एकाचवेळी झाली असे मानले जाते. अनेक धार्मिक कथांमधून विश्वाचा विनाश आणि पुनर्निर्मितीच्या कल्पना मांडण्यात आल्या आहेत. 'जिनेसीस' या पुस्तकामध्ये ख्रिश्चन आणि ज्यू धर्मामध्ये मान्य संकल्पनाप्रमाणे ही पद्धत वर्णिलेली आहे. त्याचा वापर करून जॉन लिफ्टहूट यांनी पृथ्वीची जन्मवेळ निश्चित केली. त्यांच्या
म्हणण्यानुसार पृथ्वीचा जन्म सकाळी नऊ वाजता, २६ ऑक्टोबर
४००४ (ख्रिस्तपूर्व) रोजी झाला. परंतु
हे वय काही खरे नसल्याचा आणि पृथ्वी आपले वय लपवत असल्याचा संशय संशोधकांना आला आणि
वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून पृथ्वीचे वय शोधले जाऊ लागले.
अठराव्या शतकात, पृथ्वीचा
जन्म हा विश्वनिर्मितीनंतर झाला असावा असा एक मतप्रवाह आला. फ्रान्समधील एक मतप्रवाह
आला. फ्रान्समधील संशोधक कोम बफन यांनी पृथ्वीचे वय शोधण्यासाठी प्रयोग सुरू केले. त्यांनी असे प्रतिपादन केले की,
पृथ्वी जन्मली तेव्हा तप्त लाव्हारसाचा गोळा असावी. त्यानंतर हळूहळू ती थंड
होत गेली. या अनुमानानुसार
त्यांनी एक गोळा तयार केला. त्याच्या थंड होण्याच्या दराचा अभ्यास करून पृथ्वीचा जन्म ७५ हजार वर्षापूर्वी झाला असल्याचा निष्कर्ष मांडला.
सन १८६२ मध्ये लॉर्ड केल्वीन या संशोधकाने बफनच्या प्रयोगाचा अभ्यास केला. त्यात अनेक त्रुटी राहिल्याचे त्यांच्या लक्षात आलं. गुरूत्वीय बलासारख्या अनेक राहून गेलेल्या बाबी विचारात घेऊन त्यांनी पृथ्वीचे वय शोधण्यासाठी
प्रयोग केला. पृथ्वीमधून उष्मा वहनाचा दर,
सौर उर्जेपासून मिळणारी उष्णता, वाऱ्यामुळे आणि सागरी लाटांतून निर्माण होणारा उष्मा या सर्व बाबींचा साधकबाधक विचार करून त्यांनी असा निष्कर्ष काढला की, पृथ्वीचे वय हे दोन कोटी ते चार कोटी वर्षे इतके असावे.
भौतिकशास्त्राप्रमाणेच इतर विज्ञानशाखांतील संशोधक पूर्ण एकोणिसाव्या शतकामध्ये पृथ्वीचे वय शोधण्यासाठी त्या त्या विषयांतील संकल्पना वापरून प्रयोग करत होते. भूगर्भशास्त्रज्ञ चार्लस लिल याने खडक कसे निर्माण झाले असावेत याचा अभ्यास सुरू केला होता. खडकांची निर्मिती, त्यांची
झिज आणि पुननिर्माण यांच्या अभ्यासातून पृथ्वीच्या वयाचा अंदाज बांधता येईल, असा त्यांना विश्वास होता. त्यांच्या म्हणण्यानुसार खडक निर्माण होताना लाव्हा थंड होण्याची प्रक्रिया प्रदीर्घ काळ सुरू असावी. त्यामुळे केल्विनच्या कल्पनेप्रमाणे
पृथ्वीचे वय शोधणे हे पूर्णत: चूक होते. त्यांनी पृथ्वी ही केल्वीनच्या निष्कर्षापेक्षा फार
अगोदर तयार झाली असावी किंवा ती कायमस्वरूपी अशीच असावी असे मत मांडले.
या वय
शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये जीवशास्त्रज्ञही मागे नव्हते. जीवशास्त्रज्ञानांही केल्विनच्या या निष्कर्षाबाबत समाधान वाटत नव्हते. चार्लस डार्विनचा उत्क्रांतिवाद हा जगभर
मान्यता पावत होता. त्यानुसार क्रमाक्रमाने वेगवेगळ्या जातीप्रजातींची निर्मिती झाली हे संशोधकांनी
स्वीकारले होते. या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार उपलब्ध प्रगल्भ जीवसृष्टी निर्मितीसाठी किमान चार कोटी वर्षे तरी लागली असावीत. याचाच अर्थ पृथ्वीचं वय चार
कोटी वर्षापेक्षा जास्त असावे.
एकोणविसाव्या शतकाच्या अखेरीस भूगर्भशास्त्रज्ञांची खात्री झाली की, पृथ्वीचं वय दहा
कोटी वर्षांपेक्षा जास्त असावे. परंतु या त्यांच्या मतांच्या पुष्ट्यर्थ देण्यासाठी त्यांच्याकडे भक्कम पुरावे नव्हते. डब्लीनमधील भूगर्भसंशोधक जॉन जॉली यांनी एक नवा
मार्ग शोधून काढला. त्यांनी सर्व घटकांचा विचार करता पृथ्वीवरील समुद्रातील पाण्याची क्षार क्षमता किती प्रमाणात वाढते याचा अभ्यास सुरू केला. दरवर्षी हा प्रयोग
करून अनेक वर्षानंतर पृथ्वीचे वय नव्वद कोटी वर्षे असावे असा निष्कर्ष काढला. परंतु समुद्रातील क्षार असमान पद्धतीने बाहेर पडतात. त्यामुळे या प्रयोगातही त्रुटी आढळून येतात.
सन १८९६ मध्ये बेक्वेरेल यांनी रेडिओ ॲक्टिव्हीटी किंवा किरणोत्साराचा शोध लावला. या
शोधानंतर पृथ्वीचे वय म्हणजे पृथ्वीच्या वर्तमान घनता आणि वस्तुमानासह अस्तित्वात आल्यापासूनचा कालावधी असे मानण्यात येऊ लागले. मेरी क्युरी आणि रूदरफोर्ड यांनी किरणोत्साराबाबत संशोधन पुढे नेले. किरणोत्सार होत असताना मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते हे सिद्ध
झाले. केल्वीनने याबाबतचा विचार केला नव्हता. याचाच अर्थ केल्वीनचा निष्कर्ष अचूक नव्हता.
पृथ्वीच्या विविध थरात उपलब्ध असणाऱ्या आयसोटोपच्या प्रमाणावरून किरणोत्सार किती झाला असेल
याचा अंदाज बांधता येणं शक्य झाले. किरणोत्सार हा ठराविक
सुत्रानुसार होतो हे लक्षात आल्यानंतर संशोधकांच्या आशा बळावल्या. या तत्वाचा
वापर करून विविध मूलद्रव्यांसाठी हा अभ्यास होऊ लागला. किरणोत्सारी शिसे या धातूचा
अभ्यास करून पृथ्वीचे वय ठरविण्यात आले. या अभ्यासात
पृथ्वीवरील खनिजातील शिशाचा विचार करण्यात आला होता. या पद्धतीने
पृथ्वीचे वय हे साडेतीनशे कोटी वर्षे एवढे निश्चित करण्यात आले.
दुसरा महत्त्वपूर्ण किरणोत्सारी धातू किंवा मूलद्रव्य म्हणजे युरेनियम! युरेनियमचे दोन किरणोत्सारी आयसोटोप पृथ्वीवर १.६४:१ या
प्रमाणात मिळून येतात. त्यांच्या किरणोत्साराच्या प्रमाणावरून पृथ्वीचे वय ठरविण्यात आले. या मूलद्रव्यांच्या किरणोत्साराच्या अभ्यासावरून
पृथ्वीचे वय हे सहाशे साठ कोटी वर्षे असावे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
खनिजातील शिशाच्या प्रमाणावरून पृथ्वीचे वय शोधण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु विशिष्ट खनिजातील शिशाचे प्रमाण बदलत जाते. तरीही अंदाजे पृथ्वीचे वय हे तीनशे कोटी वर्षे असावे असे निश्चित करण्यात आले आहे.
सर्वांनी स्वीकारण्यास तयारी दर्शवलेली पद्धती ही सुद्धा
किरणोत्साराशी निगडित आहे. पृथ्वीवर वेळोवळी उल्कापात होत असतात. वेळोवेळी
पृथ्वीवर आलेले उल्कांचे खडक हे निवडले जातात. त्यामधील शिसे हेच मूलद्रव्य आधारभूत मानले जाते. त्यानुसार
त्या खडकाचे आयुष्य काढण्यात येते. त्यांचे आणि पृथ्वीचे वय सारखेच
आहे असे मानण्यात येते. या पद्धतीने
पृथ्वीचे वय हे चारशे साठ कोटी वर्षे आहे असे मानतात.
पृथ्वीचं वय ठरविण्यासाठी
अशा भिन्न मार्गांचा वापर करण्यात आला आहे. विविध प्रयोगाचे निष्कर्ष हे वेगवेगळे
आहेत. यापैकी कोणत्याही दोन पद्धतीद्वारा पृथ्वीचं एकच वय सांगता येत नाही. आजमितीला आपण पृथ्वीचं वय चारशे साठ
कोटी वर्षे असल्याचे मान्य करत आहोत.
धर्म संकल्पना किंवा साहित्य यामध्ये उपलब्ध ज्ञानाचे प्रतिबिंब दिसून येत असते. अनेक साहित्यकृतीमध्ये पृथ्वीचे वय चारशे साठ कोटी वर्षे मान्य करण्यात आले असले तरी ते निश्चित मानता येत नाही. त्यातही बदल होण्याची शक्यता आहे.
मात्र पृथ्वीला जर कधी आपले मन मोकळे करण्याची संधी मिळाली तर ती मानवावरचा राग व्यक्त करेल यात शंकाच नाही. आपण संपूर्ण मानवजात पृथ्वीकडून काहीना काही घेतच असतो. देतो
मात्र प्रदूषण आणि घाण! हे कमी
की काय म्हणून मानवाने पृथ्वीच्या वयाबाबत नको तेवढे कुतूहल दाखवले आहे. या पृथ्वीला
तिच्या प्रियकराला भास्कराला भेटायला आणखी पाच कोटी वर्षे लागणार असेही सांगायला सुरूवात केली आहे. ते काही
असेल पृथ्वीच्या वयाचे कोडे अजूनतरी निश्चितच सुटलेले नाही. ‘अजुनी यौवनात मी’
म्हणत सूर्याभोवती स्वत:चे प्रेमगीत
गात पृथ्वी फिरत आहे हेच खरे!
पृथ्वी ही स्त्री आहे आणि स्त्री खरे वय लपवते,या अनुषंगाने संशोधनात्मक रोमँटिक लिखाण वाचण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन.
उत्तर द्याहटवाVery nice and informative article.
उत्तर द्याहटवावेगळा विषय आणि वेगळी मांडणी.खूपच सुंदर.
उत्तर द्याहटवावेगळा विषय आणि वेगळी मांडणी.खूपच सुंदर.
उत्तर द्याहटवा'पृथ्वी आणि तिचं वय' असं या लेखाचं नाव असतं.. तर कदाचित हा रुक्ष विषय म्हणून बहुतेकांनी वाचणं टाळलं असतं.. पण रूपकात्मक शीर्षक आणि वर्णन यांनी अक्षरशः खिळवून ठेवलं..जबरदस्त!
उत्तर द्याहटवाSubjected to a clear and informative description of Earth a Soul
उत्तर द्याहटवा