रविवार, १ सप्टेंबर, २०१९

महापूर : शिवाजी विद्यापीठाचे मदतकार्य



(ऑगस्ट २०१९ मध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागाने पूराचा प्रकोप पाहीला. या वेदनादायी घटनेनंतर सामाजिक घटना आणि समस्याबाबत सजग भूमिका ठेवणाऱ्या सांगलीच्या 'नवे गाव आंदोलन' या मासिकाने 'महापूर' या विषयावर सप्टेंबर २०१९ चा विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये शिवाजी विद्यापीठानेही सामाजिक बांधिलकी जपत आपल्यापरीने मदत केली. याबाबतचा माझा 'शिवाजी विद्यापीठाचे मदतकार्य' हा लेख या अंकात प्रसिद्ध झाला आहे. तो आपल्यासाठी 'नवे गाव आंदोलन' मासिकाच्या सौजन्याने येथे प्रसिद्ध करत आहे.…. व्ही.एन. शिंदे)                                 
--------------------------------------------------------------------------------------------
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने कोकणासह कोल्हापूर आणि पश्चिम घाटामध्ये धुमाकूळ घातला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तर नेहमीच्या पर्जन्यमानापेक्षा दुप्पट तीप्पट नव्हे तर बारा पट पाऊस कोसळला. सर्व धरणे तुडुंब भरली. पूराने कोल्हापूर सांगली आणि काही अंशी सातारा जिल्ह्यात थैमान घातले. एक एक गाव आणि रस्ता पाण्याखाली जाऊ लागला. कोल्हापूर शहराला तर बेटाचे स्वरूप प्राप्त झाले. सर्व बाजूनी रस्ता कोंडी झाली. पेट्रोल, डिझेल, गॅस हे कोल्हापूरात येणे बंद झाले. कोल्हापूरातून पुण्या-मुंबईला जाणारे दूध थांबले. वृत्तपत्रांची छपाई थांबली. यातच शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक देवानंद शिंदे सर मुंबईतील बैठक संपवून कोल्हापूरला परतत होते. तेही कऱ्हाडमध्ये अडकले. मात्र त्यांचे एकूण पूरस्थितीवर लक्ष होते. तशाही परिस्थितीमध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठामार्फत पूरग्रस्ताना जे काही सहाय्य करता येईल, ते करावे, अशा सूचना दिल्या.
कुलगुरूंच्या आदेशानंतर प्र-कुलगुरू प्राध्यापक डी.टी. शिर्के यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठात मदत कार्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली. कुलसचिव डॉ. व्ही.डी. नांदवडेकर यांनी विद्यापीठातील वसतीगृहामध्ये प्रत्यक्ष पूरग्रस्तांच्या राहण्याची सोय केली. काही महिन्याच्या बाळापासून ते ऐंशी वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत वयोगटातील साधारण तीनशे लोक या काळात विद्यापीठात वास्तव्यास होते.या काळात वसतीगृहाचे मुख्य रेक्टर डॉ. डेळेकर सर इतर रेक्टर्स आणि विद्यार्थ्यानी मोठे काम केले. या पूरग्रस्तांच्या आरोग्याची सुरुवातीपासून काळजी घेण्यात आली. विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रामार्फत त्यांची दाखल होत असतानाच तपासणी करण्यात येत असे. त्यानंतरही गरजेनुसार सर्वाना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत असे. विद्यापीठाचे मानद वैद्यकिय आधिकारी डॉ.टी. के. पाटील, वैद्यकीय आधिकारी डॉ. विनिता रानडे आणि सर्व कर्मचारी यासाठी चोवीस तास उपलब्ध असत.
कोल्हापूरमधील माणसाना जशी झळ बसली होती तशीच ती या भागातील जनावरांनाही बसली. मुक्या जनावरांच्यासाठी काही मंडळीनी चारा छावण्या सुरू केल्या या चारा छावण्यामधील जनावरांना देण्यासाठी चारा नव्हता. त्यांच्या नेहमीच्या चरण्याच्या जागेवर पाण्याचे साम्राज्य होते. शिवाजी विद्यापीठ परिसरातील गवत मागील अनेक वर्ष आजूबाजूच्या गोपालकाना विकत असते. मात्र फळबागांच्या प्लॉटमधील गवत विक्री मागील काही वर्षापासून थांबवण्यात आली आहे. तसेच पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या वनस्पतीशास्त्र विभागाने तयार केलेल्या लिड बॉटॅनिकल गार्डनमधील गवतही विकले जात नाही. या भागातील साधारण ऐंशी एकर क्षेत्रातील गवत या चारा छावण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. सकाळी आलेल्या चारा छावणीतील लोकाना रितसर नोंद घेऊन प्लॉटमध्ये सोडले जात असे. शेतकरी दुपारपर्यंत गवत कापत. सोबत आणलेल्या ट्रॉलीमध्ये ते भरून नेत. आजवर पस्तीस टन हिरवा चारा शिवाजी विद्यापीठ परिसरातून अशा पूरग्रस्त जनावरासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावर्षीच्या पूराने कोल्हापूरला आणखी मोठा तडाखा दिला. या शहराच्या सर्व पाणीपुरवठा यंत्रणा पाण्याखाली गेल्या. शहराच्या कोणत्याच भागातील पाणीपुरवठा सुरू नव्हता. अनेक भागातील विद्युत पुरवठाही खंडीत होता. दारात बोअर आणि घरात आरओ असूनही लोकाना पाणी वापरता येत नव्हते. चारी बाजूला पाणी असूनही पिण्यासाठी पाणी नाही, अशी अवस्था झाली होती. सुदैवाने शिवाजी विद्यापीठातील विद्युत पुरवठा सुरळीत होता. शिवाजी विद्यापीठाला जलस्वंयपुर्ण बनवण्यासाठी विद्यापीठात जलशुद्धीकरण प्रकल्प प्रा. माणिकराव साळुंखे सर कुलगुरू असताना बांधण्यात आला होता. या शुद्धीकरण प्रकल्पाचा उपयोग मागील तीन वर्षापासून पूर्ण क्षमतेने विद्यापीठासाठी वर्षभर होत होता. कोल्हापूरवर आलेल्या या जलसंकटावेळी महानगरपालीकेचे धडाडीचे आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी विद्यापीठामध्ये येऊन विद्यापीठातून पिण्याचे पाणी देता येईल का? याबाबत पाहणी केली. प्रकुलगुरू शिर्के सर, अभियांत्रीकी विभागाचे जी.एस. कुलकर्णी आम्ही सर्वानी त्याचक्षणी पिण्याचे पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पातून देण्याचा निर्णय घेतला. एका दिवसात त्याबाबत करावयाच्या पाईपलाईनची बदल पुर्तता करून पाणी उपलब्ध करून दिले. पाणी भरण्यासाठी काही मंडळी अगदी घागर, पाण्याचे वीस लीटरचे कॅन घेऊन येत आणि पाणी भरून नेत. त्याचप्रमाणे महानगरपालीकेचे पाण्याचे टँकर, मनपाने भाड्याने उपलब्ध केलेले टँकर्स, काही नगरसेवक आणि मंडळानी उपलब्ध केलेले टँकर या सर्वाना पाणी भरून देण्यासाठी वेगळी सोय करण्यात आली. दोन हजार लिटरपासून तेहतीस हजार लिटर क्षमतेचे टँकर पिण्याचे पाणी भरून नेत होते. हे टँकर कोल्हापूर शहराच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवत होते. काही दिवस तर अगदी चार लाख लिटर पाणी देण्यात आले. दररोज दहा तासापर्यंत वापरला जाणारा प्रकल्प चोवीस तास कार्यान्वीत ठेवण्यात विद्यापीठाच्या अभियांत्रीकी विभागाची संपूर्ण टीम कार्यरत राहिली. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत नागरीकांना पाणी देऊन विद्यापीठाला लागणाऱ्या पाण्याची सोय रात्रीत केली जात असे. या काळात विद्यापीठाच्या जलस्वंयपुर्णतेतील क्षमतांचीही नकळत चाचणी झाली. सात ते बावीस ऑगस्ट दरम्यान एकूण तीस लाख लीटरपेक्षा जास्त शुद्ध पाणी शहराला पुरवण्यात आले. आजवर विद्यापीठ जलस्वंयपुर्ण झाले याचा आनंद होता. या जलस्वंयपुर्णतेच्या ध्यासातून कठिण प्रसंगात कोल्हापूर शहराला मदत झाली याचे समाधान आहे. मात्र पुन्हा अशी वेळ येऊ नये हीच प्रार्थना.

पूरानंतर खऱ्या अर्थाने एकएक समस्या समोर येतात. यात सर्वात मोठा प्रश्न येतो तो स्वच्छतेचा. विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे सर, प्रकुलगुरू प्रा. डी.टी. शिर्के सर, रासेयो समन्वयक प्रा. डी. के. गायकवाड यांच्यासह विद्यापीठ आधिकाऱ्यानी शक्य होईल तशा सर्व पूरग्रस्त महाविद्यालयाना आणि भागाला भेटी दिल्या. विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण चौदा महाविद्यालयाना पूराचा मोठा फटका बसला आहे. यातील सर्वात जास्त महाविद्यालये सांगली जिल्ह्यातील आहेत. अन्य १६० महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे हजारो विद्यार्थी पूरग्रस्त भागातील स्वच्छता मोहिमेसाठी कार्य करत आहेत. विद्यापीठातील समाजकार्य अभ्यासक्रमाचे शिक्षक अमोल मिणचेकर आणि उमेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा मोठा गट पूरग्रस्त भागातील लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी कार्यरत आहे.
याहीपुढे जाऊन विद्यापीठाचा पूर परिस्थती का उद्भवली याचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा मानस आहे. त्यासाठी एका गटाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच आपत्ती निवारण आणि मदतीसाठी कायमस्वरूपी केंद्र स्थापन करण्याचा मानस मा. कुलगुरू यांनी व्यक्त केला आहे. या आपत्ती काळात शिवाजी विद्यापीठाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे.     

१७ टिप्पण्या:

  1. विद्यापीठाने कायम आपल्या लोकांना पंखाखाली घेऊन मायेची ऊब देण्याचे अत्यंत स्पृहणीय काम आजवर केले आहे. महापुराच्या दणक्याने व्यथित व हतबल झालेल्या ग्रस्तांना योग्य ती सर्वप्रकारची मदत विद्यापीठाने करून खरोखरच नवीन इतिहास रचला आहे. उत्तम नेटके संयोजन, समन्वय व स्रोतांचा योग्य तो वापर. अभिमान वाटतो.

    उत्तर द्याहटवा
  2. वाह, विद्यापीठांनी आपले कर्तव्य व जबाबदारी अगदी चोख पणे पार पाडली, धन्यवाद सर्व विद्यापीठ कर्मचारी वर्गाचे ....राजेंद्र मोरे, मुंबई.

    उत्तर द्याहटवा
  3. Good message & cooperation from Shivaji University & your publication also Shide sir.From Dr. S .J.Naik &family Kolhapur .

    उत्तर द्याहटवा
  4. I feel very happy that the team of shivaji university under the supervision of Honble vice Chancellor has rendered excellent welfare work towards flood affected districts of western maharashtra.
    No doubt Dr Vilasji Shinde might have taken the lead role in this societal contribution.
    He is devoted and dedicated person in such issues.
    I have an experience of his work when he was the Registar
    Of SRTM University and I was the then Dean faculty of Arts.
    Dr Ajay Tengse
    Yashwant college
    Nanded

    उत्तर द्याहटवा
  5. खूपच उपयोगी विचार आणि प्रत्यक्ष मदत...

    उत्तर द्याहटवा
  6. विधापीठाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये जपलेले सामाजीक भान व सर्व अधिकाऱ्यांनी दाखलेली निर्णयांमधील तत्परता यामुळेच हे सर्व शक्य झाले. शिंदे सर, आपण सर्वांनी केलेल्या कामांचे उत्कृष्ट व येथोचित शब्दांकनाबद्दल आपले अभिनंदन!
    अजूनही विद्यापीठाचे काम सुरू आहेच....

    उत्तर द्याहटवा
  7. विद्यापीठाचे सर्व अधिकारी, प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी दर्शविलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे. विद्यापीठाच्या स्थापनेसाठी कोल्हापूरने केलेल्या योगदानाची आठवण झाली. सर्वांचे आभार.

    उत्तर द्याहटवा
  8. विद्यापीठाने पूरग्रस्तांना केलेली मदत खरोखरच वाखाणण्या सारखी आहे. विद्यापीठातील सर्व अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी यांचे मनपूर्वक अभिनंदन. आपला लेख प्रेरणादायी आहे.

    उत्तर द्याहटवा
  9. अत्यंत स्पृहणीय आणि साजेशी कामगिरी. सुसंस्कृत व्यक्तीमत्वांचा अनुभव.

    उत्तर द्याहटवा
  10. Salute to great Shivaji University .Your administration & work for Flood affected Kolhapur citizens is great Sir.Great work sir.👏👏
    Anil Kalyankar
    Department of Physics
    Bahirji College Basmath

    उत्तर द्याहटवा
  11. विद्यापीठातील सर्व घटकांनी पूरग्रस्तांना केलेली मदत सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे . आपत्ती काळात जनतेला मदत करण्याचा शिवछत्रपतींचा आदर्श आपण सर्वांनी आचरणात आणल्याचा आनंद आहे .
    - डॉ . प्रकाश दुकळे

    उत्तर द्याहटवा