शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

सन्मान, सच्च्या संशोधकाचा




(नोव्हेंबर २०१९ पासून जागतीक पातळीवरील भौतिकशास्त्रातील 'इंटरनॅशनल सेंटर फॉर ‍थिअरॉटीकल फिजिक्स' या इटलीतील नामवंत संस्थेचे संचालक म्हणून मराठमोळ्या डॉ. अतिश दाभोळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे भौतिकशास्त्र विषयातील नामवंत संशोधक व्यक्तीमत्त्व या पदावर विराजमान होत असल्याचा आनंद प्रत्येक भारतीयाला असायला हवा. त्यांचा अल्प परिचय या लेखात करून देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकमत कोल्हापूरच्या 'विज्ञान' या सदरात शुक्रवार नांक २३ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसिद्ध झालेला लेख आपल्यासाठी येथे पुनर्प्रकाशित करत आहे.….. व्ही.एन. शिंदे)                                 
--------------------------------------------------------------------------------------------
 मागील आठवड्यात आभिमान वाटावा अशी एक मोठी घटना घडली. यासंदर्भात बातम्या आणि काही वृत्तपत्रातून लेखही आले. मात्र त्याचे पाहिजे त्या प्रमाणात कौतुक झाले असे वाटले नाही. महाराष्ट्रीयन भौतिकशास्त्रज्ञ अतिश दाभोळकर हे आंतराष्ट्रीय सैद्धांतीक भौतिकी संस्थेचे (आयसीटीपी) संचालक बनले. इटलीमध्ये असलेली ही संस्था अब्दूस सलाम यांनी १९६४ मध्ये स्थापन केली. मूलभूत संशोधनासाठी ही संस्था कार्य करते. विद्यार्थ्यामधील वैज्ञानिक क्षमता वाढीस लावण्यासाठी विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजनही या संस्थेमार्फत करण्यात येतात. वेगवेगळ्या देशातील हजारो संशोधक दरवर्षी या संस्थेला भेट देत असतात. इटलीचे सरकार, आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा संस्था आणि युनोच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संस्था (युनेस्को) यांच्यामध्ये झालेल्या त्रीपक्षीय करारानुसार ही संस्था कार्यरत आहे. युनोने या संस्थेला प्रथम श्रेणीची संस्था म्हणून मान्यता दिली आहे. या संस्थेमार्फत दरवर्षी साठपेक्षा जास्त चर्चासत्रे, परिषदा आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. भौतिक शास्त्र आणि गणित या विषयात उत्कृष्ट संशोधन करणाऱ्या संशोधकांचा गौरवही या संस्थेमार्फत करण्यात येतो. संस्थेमध्ये तीस टक्केपेक्षा जास्त महिला संशोधक कार्यरत आहेत. तसेच विज्ञान तंत्रज्ञान विषयाशी संबधित एक लाखापेक्षा जास्त पुस्तके असणारे मारी क्युरी ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात सर्व इलेक्ट्रॉनिक सुविधा, आणि इ-जर्नल्सच्या लिंक उपलब्ध आहेत.

अशा जागतिक संशोधनात समन्वय साधणाऱ्या संस्थेच्या संचालक पदी अतिश दाभोळकर यांची निवड झाली आहे. दाभोळकर हे नाव महाराष्ट्राला डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यामुळे सुपरिचित आहे. नरेंद्र दाभोळकरांचे अतिश हे पुतणे. अतिश हे स्वत: अंधश्रद्धा निर्मुलन मोहिमेचे खंदे पुरस्कर्ते आहेत. जादूटोणा विरोधी कायदा संमत व्हावा म्हणून त्यांनी 'ॲक्टनाऊ' नावाचे संकेतस्थळ सुरू करून ही मोहिम राबवली होती. अनेक संशोधकांचा या विधेयकाला पाठिंबा मिळवून त्यांनी शासनावर दबाव आणला होता. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९६३ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव हे जरी सातारा असले तरी अतिश यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे गेले आहे.
त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी कानपूर येथून १९८५ मध्ये भौतिकशास्त्रातील एम.एस्सी. पदवी प्राप्त केली. अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून १९९० मध्ये डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली. पुढे १९९३ पर्यंत रूजर्स विद्यापीठात तर १९९३-९४ मध्ये हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी पोस्ट डॉक्टरल संशोधन कार्य केले. कॅलिफोर्निया इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी संशोधनास सुरूवात केली. फ्रांसमधील सीएनआरएस प्रयोगशांळेचे संचालक म्हणून ते कार्य पाहत होते. हे केंद्रही आयसीटीपीच्या उपक्रमाचा एक भाग आहे. भारतातील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत ते प्राध्यापक होते. त्याचबरोबर जगातील नामवंत विद्यापीठामध्ये अभ्यागत अधिव्याख्याता म्हणूनही ते कार्यरत होते.
त्यांनी सैद्धांतीक भौतिकीमध्ये आपले संशोधन केले आहे. यामध्ये स्ट्रींग थिअरी, कृष्ण विवर आणि पुंज गुरूत्व या विषयावर उल्लेखनिय कार्य केले आहे. त्यांना २००६ साली शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. भारतीय विज्ञानातील योगदानाबद्दल दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. भारताच्या राष्ट्रपतींचा विज्ञानातील सर्वोत्कृष्ट नेतृत्वासाठीचा पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला आहे. फ्रांसमधील सर्वोच्च गुणवत्तेचे संशोधन केल्याबद्दलचा पुरस्कार त्यांना देण्यात  आला आहे. भारतीय विज्ञान अकादमीचे ते सदस्य आहेत. त्यांच्या संशोधनाचा दर्जा हा अत्यंत उच्च राहिला आहे. २००१ मध्ये अतिश यांनी स्ट्रींग थिअरीवर प्रसिद्ध केलेल्या संशोधनामुळे विज्ञान क्षेत्रातील दंतकथा बनलेले महान संशोधक स्टीफन हॉकिंग हे व्हील चेअरवर बसून त्यांना भेटायला गेले होते. यातच त्यांच्या कार्याचे मोठेपण लक्षात येते. विज्ञानावर सार्वजनिक कार्यक्रमात षण्मुखानंद हॉलमध्ये त्यांनी जाहिर व्याख्यान दिले. अशा या मराठमोळ्या, या मातीतील माणसाला या जागतिक संशोधन संस्थेची संचालक पदाची जबाबदारी पाच वर्षाकरिता मिळाली आहे. त्यांच्या निवडीने त्यांच्या कार्याचा उचित सन्मान झाला आहे!





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा