Prof. Devanand Shinde लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Prof. Devanand Shinde लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १ सप्टेंबर, २०१९

महापूर : शिवाजी विद्यापीठाचे मदतकार्य



(ऑगस्ट २०१९ मध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागाने पूराचा प्रकोप पाहीला. या वेदनादायी घटनेनंतर सामाजिक घटना आणि समस्याबाबत सजग भूमिका ठेवणाऱ्या सांगलीच्या 'नवे गाव आंदोलन' या मासिकाने 'महापूर' या विषयावर सप्टेंबर २०१९ चा विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये शिवाजी विद्यापीठानेही सामाजिक बांधिलकी जपत आपल्यापरीने मदत केली. याबाबतचा माझा 'शिवाजी विद्यापीठाचे मदतकार्य' हा लेख या अंकात प्रसिद्ध झाला आहे. तो आपल्यासाठी 'नवे गाव आंदोलन' मासिकाच्या सौजन्याने येथे प्रसिद्ध करत आहे.…. व्ही.एन. शिंदे)                                 
--------------------------------------------------------------------------------------------
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने कोकणासह कोल्हापूर आणि पश्चिम घाटामध्ये धुमाकूळ घातला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तर नेहमीच्या पर्जन्यमानापेक्षा दुप्पट तीप्पट नव्हे तर बारा पट पाऊस कोसळला. सर्व धरणे तुडुंब भरली. पूराने कोल्हापूर सांगली आणि काही अंशी सातारा जिल्ह्यात थैमान घातले. एक एक गाव आणि रस्ता पाण्याखाली जाऊ लागला. कोल्हापूर शहराला तर बेटाचे स्वरूप प्राप्त झाले. सर्व बाजूनी रस्ता कोंडी झाली. पेट्रोल, डिझेल, गॅस हे कोल्हापूरात येणे बंद झाले. कोल्हापूरातून पुण्या-मुंबईला जाणारे दूध थांबले. वृत्तपत्रांची छपाई थांबली. यातच शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक देवानंद शिंदे सर मुंबईतील बैठक संपवून कोल्हापूरला परतत होते. तेही कऱ्हाडमध्ये अडकले. मात्र त्यांचे एकूण पूरस्थितीवर लक्ष होते. तशाही परिस्थितीमध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठामार्फत पूरग्रस्ताना जे काही सहाय्य करता येईल, ते करावे, अशा सूचना दिल्या.
कुलगुरूंच्या आदेशानंतर प्र-कुलगुरू प्राध्यापक डी.टी. शिर्के यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठात मदत कार्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली. कुलसचिव डॉ. व्ही.डी. नांदवडेकर यांनी विद्यापीठातील वसतीगृहामध्ये प्रत्यक्ष पूरग्रस्तांच्या राहण्याची सोय केली. काही महिन्याच्या बाळापासून ते ऐंशी वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत वयोगटातील साधारण तीनशे लोक या काळात विद्यापीठात वास्तव्यास होते.या काळात वसतीगृहाचे मुख्य रेक्टर डॉ. डेळेकर सर इतर रेक्टर्स आणि विद्यार्थ्यानी मोठे काम केले. या पूरग्रस्तांच्या आरोग्याची सुरुवातीपासून काळजी घेण्यात आली. विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रामार्फत त्यांची दाखल होत असतानाच तपासणी करण्यात येत असे. त्यानंतरही गरजेनुसार सर्वाना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत असे. विद्यापीठाचे मानद वैद्यकिय आधिकारी डॉ.टी. के. पाटील, वैद्यकीय आधिकारी डॉ. विनिता रानडे आणि सर्व कर्मचारी यासाठी चोवीस तास उपलब्ध असत.
कोल्हापूरमधील माणसाना जशी झळ बसली होती तशीच ती या भागातील जनावरांनाही बसली. मुक्या जनावरांच्यासाठी काही मंडळीनी चारा छावण्या सुरू केल्या या चारा छावण्यामधील जनावरांना देण्यासाठी चारा नव्हता. त्यांच्या नेहमीच्या चरण्याच्या जागेवर पाण्याचे साम्राज्य होते. शिवाजी विद्यापीठ परिसरातील गवत मागील अनेक वर्ष आजूबाजूच्या गोपालकाना विकत असते. मात्र फळबागांच्या प्लॉटमधील गवत विक्री मागील काही वर्षापासून थांबवण्यात आली आहे. तसेच पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या वनस्पतीशास्त्र विभागाने तयार केलेल्या लिड बॉटॅनिकल गार्डनमधील गवतही विकले जात नाही. या भागातील साधारण ऐंशी एकर क्षेत्रातील गवत या चारा छावण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. सकाळी आलेल्या चारा छावणीतील लोकाना रितसर नोंद घेऊन प्लॉटमध्ये सोडले जात असे. शेतकरी दुपारपर्यंत गवत कापत. सोबत आणलेल्या ट्रॉलीमध्ये ते भरून नेत. आजवर पस्तीस टन हिरवा चारा शिवाजी विद्यापीठ परिसरातून अशा पूरग्रस्त जनावरासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावर्षीच्या पूराने कोल्हापूरला आणखी मोठा तडाखा दिला. या शहराच्या सर्व पाणीपुरवठा यंत्रणा पाण्याखाली गेल्या. शहराच्या कोणत्याच भागातील पाणीपुरवठा सुरू नव्हता. अनेक भागातील विद्युत पुरवठाही खंडीत होता. दारात बोअर आणि घरात आरओ असूनही लोकाना पाणी वापरता येत नव्हते. चारी बाजूला पाणी असूनही पिण्यासाठी पाणी नाही, अशी अवस्था झाली होती. सुदैवाने शिवाजी विद्यापीठातील विद्युत पुरवठा सुरळीत होता. शिवाजी विद्यापीठाला जलस्वंयपुर्ण बनवण्यासाठी विद्यापीठात जलशुद्धीकरण प्रकल्प प्रा. माणिकराव साळुंखे सर कुलगुरू असताना बांधण्यात आला होता. या शुद्धीकरण प्रकल्पाचा उपयोग मागील तीन वर्षापासून पूर्ण क्षमतेने विद्यापीठासाठी वर्षभर होत होता. कोल्हापूरवर आलेल्या या जलसंकटावेळी महानगरपालीकेचे धडाडीचे आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी विद्यापीठामध्ये येऊन विद्यापीठातून पिण्याचे पाणी देता येईल का? याबाबत पाहणी केली. प्रकुलगुरू शिर्के सर, अभियांत्रीकी विभागाचे जी.एस. कुलकर्णी आम्ही सर्वानी त्याचक्षणी पिण्याचे पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पातून देण्याचा निर्णय घेतला. एका दिवसात त्याबाबत करावयाच्या पाईपलाईनची बदल पुर्तता करून पाणी उपलब्ध करून दिले. पाणी भरण्यासाठी काही मंडळी अगदी घागर, पाण्याचे वीस लीटरचे कॅन घेऊन येत आणि पाणी भरून नेत. त्याचप्रमाणे महानगरपालीकेचे पाण्याचे टँकर, मनपाने भाड्याने उपलब्ध केलेले टँकर्स, काही नगरसेवक आणि मंडळानी उपलब्ध केलेले टँकर या सर्वाना पाणी भरून देण्यासाठी वेगळी सोय करण्यात आली. दोन हजार लिटरपासून तेहतीस हजार लिटर क्षमतेचे टँकर पिण्याचे पाणी भरून नेत होते. हे टँकर कोल्हापूर शहराच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवत होते. काही दिवस तर अगदी चार लाख लिटर पाणी देण्यात आले. दररोज दहा तासापर्यंत वापरला जाणारा प्रकल्प चोवीस तास कार्यान्वीत ठेवण्यात विद्यापीठाच्या अभियांत्रीकी विभागाची संपूर्ण टीम कार्यरत राहिली. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत नागरीकांना पाणी देऊन विद्यापीठाला लागणाऱ्या पाण्याची सोय रात्रीत केली जात असे. या काळात विद्यापीठाच्या जलस्वंयपुर्णतेतील क्षमतांचीही नकळत चाचणी झाली. सात ते बावीस ऑगस्ट दरम्यान एकूण तीस लाख लीटरपेक्षा जास्त शुद्ध पाणी शहराला पुरवण्यात आले. आजवर विद्यापीठ जलस्वंयपुर्ण झाले याचा आनंद होता. या जलस्वंयपुर्णतेच्या ध्यासातून कठिण प्रसंगात कोल्हापूर शहराला मदत झाली याचे समाधान आहे. मात्र पुन्हा अशी वेळ येऊ नये हीच प्रार्थना.

पूरानंतर खऱ्या अर्थाने एकएक समस्या समोर येतात. यात सर्वात मोठा प्रश्न येतो तो स्वच्छतेचा. विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे सर, प्रकुलगुरू प्रा. डी.टी. शिर्के सर, रासेयो समन्वयक प्रा. डी. के. गायकवाड यांच्यासह विद्यापीठ आधिकाऱ्यानी शक्य होईल तशा सर्व पूरग्रस्त महाविद्यालयाना आणि भागाला भेटी दिल्या. विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण चौदा महाविद्यालयाना पूराचा मोठा फटका बसला आहे. यातील सर्वात जास्त महाविद्यालये सांगली जिल्ह्यातील आहेत. अन्य १६० महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे हजारो विद्यार्थी पूरग्रस्त भागातील स्वच्छता मोहिमेसाठी कार्य करत आहेत. विद्यापीठातील समाजकार्य अभ्यासक्रमाचे शिक्षक अमोल मिणचेकर आणि उमेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा मोठा गट पूरग्रस्त भागातील लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी कार्यरत आहे.
याहीपुढे जाऊन विद्यापीठाचा पूर परिस्थती का उद्भवली याचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा मानस आहे. त्यासाठी एका गटाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच आपत्ती निवारण आणि मदतीसाठी कायमस्वरूपी केंद्र स्थापन करण्याचा मानस मा. कुलगुरू यांनी व्यक्त केला आहे. या आपत्ती काळात शिवाजी विद्यापीठाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे.     

गुरुवार, २८ मार्च, २०१९

पाणीदार अवलिया : राजेंद्र सिंह राणा




शिवाजी विद्यापीठातील जलसंधारण कार्याला प्रत्यक्षात भेट देऊन प्रामाणिक भावनेने मत मांडणारे राजेंद्रसिंह राणा मनाला खूप भावले. या महान जलनेत्याने ज्या सहजपणे आपल्या भावना मांडल्या, ते पाहून ते नेते आहेत मात्र आजही त्यांच्यातील कार्यकर्ता जिवंत ठेवला, आहे याची खात्री पटली. हेच त्यांचे मोठेपण आहे, असे मला जाणवले. मी २०१५च्या जुलैमध्ये 'कृषीक्रांतीचे शिलेदार' या लेखमालेत 'लोकमत' कोल्हापूरमध्ये राजेंद्रसिंह यांच्यावर लिहिलेला एक छोटेखानी लेख आणि शिवाजी विद्यापीठ-जलयुक्त विद्यापीठास त्यांनी दिलेल्या भेटीतील काही छायाचित्रे येथे प्रसिद्ध करत आहे.. धन्यवाद
------------------------------------------------------------------------------------ 


जागतिक ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी शिवाजी विद्यापीठास काल दिनांक २७ मार्च २०१९ रोजी भेट दिली. मी राजेंद्रसिंह यांना प्रथमच भेटलो. पर्यावरणशास्त्र विभाग, तंत्रज्ञान अधिविभाग आणि असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्स यांच्या वतीने जलदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम हे निमित्त होते. या भेटी दरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. शिवाजी विद्यापीठात ते सकाळी सव्वादहाच्या सुमारास आले. त्यांना एरव्ही अनेकदा दूरचित्रवाणीवर पाहिले होते. ऐकले होते. मात्र त्यांना आज प्रथमच पाहात होतो. एका जिंदादिल, पाणीदार व्यक्तीमत्त्वाचे दर्शन झाले. आपण एका मनस्वी माणसाला भेटल्याचे जाणवले. ते विद्यापीठात आल्यानंतर पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक पी.डी. राऊत यांनी विद्यापीठातील पाणी योजना पाहू या का? अशी विचारणा केली आणि त्यांनी आनंदाने होकार दिला.  
     त्यानंतर त्यांच्यासमवेत उदय गायकवाड आणि राऊत सर, कुलसचिव नांदवडेकर सर यांच्यासमवेत सर्वत्र पाहणी झाली. संगीतशास्त्र विभागाशेजारचा तलाव, जलशुद्धीकरण (आरओ) प्रकल्प, त्याशेजारील विहीर, शिंदे विहीर, सुतार विहीर, शेजारील शेततळी हे सर्व पाहिले. हे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरचे कौतुक स्पष्ट दिसत होते. शिंदे विहिरीतील पाणी पूर्ण काढले असल्याने त्यातील झरे स्पष्ट दिसत होते. ते पाहून त्यांचा आनंद द्विगुणीत झाल्याचे दिसत होते. 'आडवे पाण्याचे झरे हे पाण्याची पातळी चांगली वाढली लक्षण आहे. सुंदर!' हे त्यांचे उद्गार होते. आरओ प्लँटजवळील नारळाची बाग पाहूनही त्यांनी कौतुक केले. आरओचे वाया जाणारे पाणी वापरून दोनशे नारळांची बाग फुलते आहे.          त्यांनी भावी काळात सुतार विहिरीच्या खालच्या बाजूस आणखी एक विहिर खोदावी, अशीही सूचना केली. महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठाने त्या भागात विहिर खोदण्याचे पूर्ण नियोजन केले असून याच उन्हाळ्यात ती पूर्ण करायचा विद्यापीठाचा मानस आहे. आणि तो विद्यमान कुलगुरू प्रा. देवानंद शिंदे सरांच्या नेतृत्त्वाखाली पूर्णही करण्याचे नियोजन आहे.
त्यांना विद्यापीठाचे भावी नियोजन हे माहित नव्हते. मात्र केवळ सध्याची परिस्थिती पाहून
पाहून त्यांनी केलेली सूचना ही त्यांच्या अभ्यासाची साक्ष देत होती. त्यांचे शब्द म्हणजे शिवाजी विद्यापीठाचे जलसंधारणाचे कार्य योग्य दिशेने चालले आहे, याची पावती देणारे होते. आम्हाला आमची वाटचाल योग्य दिशेने चालली आहे, आणि पुढे जा, असे सांगणारे होते. हे निश्चितच प्रेरणादायी आहे.
       एक तासाचा अवधी त्यांच्यासमवेत घालवता आला, हे माझे भाग्य. त्यांच्या त्या सहवासात त्यांच्यातील मोठेपण हे प्रत्यक्ष अनुभवता आले. ते नेते आहेत, जगाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. ते जगाला या विषयावर सल्ला देतात. मात्र सहज बोलल्यानंतर, जलसंधारणाच्या शिवाजी विद्यापीठातील प्रत्येक जागेला प्रत्यक्षात भेट देऊन प्रामाणिक भावनेने मत मांडणारे राजेंद्रसिंह राणा मनाला खूप भावले. या महान जलनेत्याने ज्या सहजपणे आपल्या भावना मांडल्या, ते पाहून ते नेते आहेत मात्र आजही त्यांच्यातील कार्यकर्ता जिवंत ठेवला, आहे याची खात्री पटली. हेच त्यांचे मोठेपण आहे, असे मला जाणवले.
              मी २०१५च्या जुलैमध्ये 'कृषीक्रांतीचे शिलेदार' या लेखमालेत 'लोकमत' कोल्हापूरमध्ये राजेंद्रसिंह यांच्यावर लिहिलेला एक छोटेखानी लेख आणि शिवाजी विद्यापीठ-जलयुक्त विद्यापीठास त्यांनी दिलेल्या भेटीतील काही छायाचित्रे येथे प्रसिद्ध करत आहे. 

राजेंद्र सिंह राणा

     पाण्याला जीवन म्हणतात. प्रत्येक जीवाचे जगणं किंवा मरणे पाण्यावर अवलंबून आहे. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. तर इतर सर्व सजीव वनस्पती किंवा वनस्पतीवर आधारीत अन्य जीवांचे भक्षण करून भूक भागवतात. अन्न स्वतः तयार करणा-या वनस्पती असोत, त्यांच्यावर अवलंबून असणारे शाकाहारी जीव असोत किंवा मांसाहारी प्राणी सर्वांना जिवंत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याशिवाय जगणे अक्य आहे. या पाण्याचे महत्व ओळखून जलसंधारणासाठी आयुष्य खर्ची घालवण्यास एक युवक तयार झाला आणि राजस्थानच्या रखरखीत वाळवंटात नंदनवन फुलवले असे हे आनंददायी व्यक्तीमत्व म्हणजे डाॅ. राजेंद्र सिंह! भारताचा पाणीवाला बाबा!
                उत्तर प्रदेशातील बागपत जिल्हयातील दौला या गावात गस्ट, १९५९ रोजी राजेंद्र सिंह यांचा जन्म झाला. जमिनदार घराणे होते. ६० एकर क्षेत्रात त्यांचे वडील स्वतः शेती करत असत. त्याच दौला गावात राजेंद्रसिंह यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. रमे र्मा नावाचे गांधीजींचे अनुयायी यांनी ग्रामसुधाराबाबत राजेंंद्रसिंहांच्या मनावर खोल परिणाम केला. त्याचप्रमाणे प्रतापसिंह या त्यांच्या इंग्रजीच्या शिक्षकानेही प्रभावित केले. शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांनी आयुर्वेद शिक्षण घेण्यास सुरवात केली. बी.ए.एम.एस. ही पदवी १९७१ मध्ये घेतली. त्यानंतर एम.ए.साठी हिंदी वियाकरीता प्रवे घेतला. या काळात जयप्रका नारायण यांचा आणि विद्यार्थी चळवळीचा संपर्क आला. छात्र युवा संघर्ष वाहिनीचे ते नेते बनले. मात्र जयप्रकाजी आजारी असताना अंतर्गत राजकारणाचा राजेंद्रसिंह यांना उबग आला.
                सन १९८० मध्ये ते शासकीय सेवेत रूजू झाले. त्यानंतर जयपूर जवळ प्रौढ शिक्षा वर्गाचे शिक्षक म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. याच काळात तरूण भारत संघटनेची त्यांना ओळख झाली. ही प्रामुख्याने आधिकारी आणि विद्यार्थ्यांची संघटना होती. १९८४ मध्ये ते या संघटनेचे सचिव झाले. त्यांनी अनेक प्रश्नाकडे सदस्यांचे लक्ष वेधले. संपूर्ण कार्यकारिणीने राजीनामा देवून संपूर्ण संघटना राजेंद्र सिंहांकडे दिली. ते खेडयातून फिरले. त्यांनी ग्रामीण जीवनाचा अभ्यास केला आणि ग्रामीण जीवन सुधारण्यासाठी कार्य करण्याची त्यांची मनिषा आधिक दृढ झाली. मनात एक आराखडा तयार होवू लागला. मात्र नोकरीत वरिष्ठांचे या सुधारणावादी विचाराप्रती असणारे औदासिन्य पाहून त्यांनी नोकरी सोडली.
           घरातील सर्व साहित्य विकून रू. २३०००/- ची पुंजी घेवून १९८५ साली हा युवक चार मित्रासह एका बसमध्ये चढला आणि शेवटच्या गावाचे तिकीट काढून किशोरी या थानागाझी तालुक्यातील गावात उतरला. योगायोगाने तो दिवस ग्रामविकासाचे स्वप्न पाहणा-या महात्माजींची जयंती क्टोबर, १९८५ हा होता. भिकमपुरा गावातील रहिवाशानी त्यांना स्विकारले. राजेंद्रसिंहानी तेथे छोटेखानी दवाखाना सुरू केला. इतर चाैघे शाळेत शिकवू लागले. धान्याचे कोठार म्हणून एकेकाळी प्रसिध्द असलेल्या अलवार जिल्हयाचा तो भाग होता. आता रूक्ष वाळवंट निर्माण झाले होते. वयस्कर लोकांशी चर्चा केल्यानंतर जोहड नामशेष झाल्याने हे घडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जोहडव्दारा होणारा जलसंचय न होणे आणि बोअरवेल लावून पाणी उपसा जास्त झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खूपच खालावली होती. अरवली पर्वतावरील वृक्षांची हानी झाली होती. गावातील जेष्ठ मंगू लाल पटेल यांच्या सहमतीने त्यांनी जोहडची पुनर्निमिती केली. गावातील काही युवकांच्या मदतीने गोपालपुरा जोहड पूर्ण झाला. पावसाळयात जोहडही आले आणि गावातील विहीरीत पाणी आले. हे पाहून वनखात्याने त्यांना अभयारण्यात काम करण्यासाठी बोलावले. तरूण आश्रम, किशोरी, भाकमपुरा हा तरूण भारत संघाचे कार्यालय बनला. या यशानंतर गावोगावी फिरून आणि जनजागृती करून त्यांनी जलसाक्षरता घडवले आणि पडणारे पाणी थेंब न थेंब वापरण्यास जनतेला प्रवृत्त केले. लोकांना श्रमदानातून जोहड बांधण्याचा मुलमंत्र दिल्याने राजस्थानची पाणीपातळी वाढली. जोहड निर्मितीमुळी अरवली नदी वाहू लागली. आजवर अनेक बंधारे बांधणारे राजेंद्रसिंह हे स्टाॅकहोम वाॅटर पुरस्काराचे मानकरी आहेत. आता पुढील काळात जल जन जोडो आभियान ते राबवत आहेत. त्यांच्या या राजस्थान मधील यस्वी प्रयोगामुळे देभर नव्हे, तर विश्वभर त्यांची पाणीवाला बाबा म्हणून ओळख निर्माण झाली. ज्याने राजस्थानची भूमी पुन्हा हिरवीगार केली.