संवेदना हे मानवाच्या जीवंतपणाचे लक्षण. जाणवलेल्या
संवेदनाबाबत व्यक्त होणे ही गरज. व्यक्त होण्याच्या पद्धती म्हणजे व्यक्ती तितक्या
प्रवृत्ती. मात्र या संवेदनाना शब्दरूप देऊन सकारात्मकता जपून, तरूणाईला विचार
करायला लावणारे एक पुस्तक नुकतेच वाचायला मिळाले. 'निखळ... जागर संवेदनांचा' हे आलोक जत्राटकर,
जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ यांचे पुस्तक. हे पुस्तक वाचले आणि मला व्यक्त
व्हावेसे वाटले आणि 'दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका' या नियतकालीकात ते प्रकाशित
झाले. 'दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिके'च्या सहकार्याने ते आपल्यासाठी येथे
प्रसिद्ध करीत आहे. धन्यवाद ..... व्ही. एन. शिंदे
------------------------------------------------------------------------------------
आलोक जत्राटकर यांचे "निखळ जागर
संवेदनांचा" हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. हे पुस्तक म्हणजे अप्रकाशीत
साहित्य नाही. यातील बरेच लेख 'कृषीवल' या कोकण भागात प्रामुख्याने लोकप्रिय
असलेल्या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहेत. काही लेख हे त्यांच्या ब्लॉगमध्ये प्रकाशीत
केले आहेत. ते सध्या शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी पार
पाडत आहेत. यापूर्वी त्यानी शिवाजी विद्यापीठाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त प्रकाशीत केलेल्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव
ग्रंथा"चे सहसंपादन केले आहे. तसेच त्यानी "कोल्हापूरचं पर्यटन" या
पुस्तकाचेही सहसंपादन केले आहे. आज प्रकाशीत झालेले "निखळ जागर संवेदनांचा"
हे त्यांचे स्वतंत्र साहित्यकृती म्हणून पहिलेचं पुस्तक आहे. या पुस्तकाला वरिष्ठ
पत्रकार साहित्यिक कवी विजय चोरमारे यांची ओघवती प्रस्तावना लाभली आहे. या
पुस्तकातील लेख हे त्यांच्या मनात निर्माण झालेल्या तरंगाचे शब्दरूप आहे. हे तरंग
तत्कालीन परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात उठत असतात. मात्र त्या तरंगाना शब्दात
बांधण्याचे कौशल्य फारच कमी लोकाकडे असते. त्या कौशल्य असणाऱ्या लोकातील फार कमी
लोक प्रत्यक्ष असे शब्दात लिखीत स्वरूपात मांडतात. हे काम आलोक जत्राटकर यानी
अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले आहे. कृषीवलचे तत्कालीन संपादक संजय आवटे यानी आलोक
यांना सदर लेखनाची जबाबदारी दिली आणि त्यानी ती पार पाडताना समकालिन अनेक
वैयक्तिक, सामाजिक, वैज्ञानिक घटनाबाबत मनातील तरंग शब्दरूपात मांडले. हे वेळोवेळी
प्रकाशीत केलेल्या लेखनाचे आज पुस्तकरूपात आपल्या साक्षीने प्रकाशीत झाले आहे.
'निखळ' हे पुस्तक अनेक कारणानी
वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी आहे. सर्वसामान्याना आपली भाषा
वाटेल, अशा स्वरूपाचे हे लेखन आहे. यामध्ये विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, मानवी
भावना आहेत, मनातील विचारांचे काहूर आहे, मानवी स्वार्थ आणि त्यातून पैसा
कमावण्यासाठी चोखाळलेले नीतीशून्य मार्ग आहेत. सारे काही आहे. ज्या वेळेस समाजातील
चूकीचे वागणारा कोणी येतो, तेव्हा त्यांना अशाच व्यवसायातील नीतीवान चेहरा आठवतो.
यातून त्यांची सकारात्मकता प्रकर्षाने जाणवते. त्यांचा आशावादही त्यांच्या
लेखनातून जाणवतो. सकारात्कता, आशावाद, कृतज्ञता ही सर्व मूल्ये अनेक लेखात
जागोजागी भेटतात. हे त्यांचे लेखन तिशीतील असावे. या वयात युवक बंडखोर असतात.
मात्र त्यांचे लेख बंडखोरीची भाषा करत नाही, तर ती हळूवारपणे बदलाची आशा व्यक्त करतात.
खरेतर या वयात बंडखोर भाषेत अनेकांना व्यक्त व्हायला आवडते, मात्र आलोक यांच्या
लेखनात समंजसपणाची झलक आणि आशावाद जागोजागी दिसतो. याला कारण त्यांच्या
मातापित्यांच्या शिक्षकी पेशात असावे. आई आणि वडील शिक्षक असल्याने त्याना वेगळ्या
अंगाने प्रश्नाकडे पहाण्याची सवय लागली असावी. तो सुंस्कृतपणा त्यांच्या लेखनात
उतरला आहे. या वयात असणारी समज त्यांच्या लेखनाच्या प्रांतात उज्ज्वल भविष्याची
साक्ष देते.
त्यांच्या आजोबाना त्यांनी हे
पुस्तक अर्पण केले आहे. त्यांच्या लेखणीत उतरलेल्या गुणामध्ये आजोबांच्या
संस्काराचाही वाटा असावा, असे अर्पणपत्रिका वाचली की पटते. आजोबांनी आपल्याला
राम-कृष्णापासून बुद्ध, फुले, आंबेडकरापर्यंत साऱ्यांशी मला नकळत जोडण्याचे कार्य
केले, असे लिहितात. या सर्व संस्काराचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. त्यामुळे
त्यांचे लेखन प्रवाही असले तरी खळखळाट करत वाहणारे नाही, तर मधूर संगीताची लय
पकडणारे, झुळूझुळू वाहणाऱ्या मनमोहक झऱ्यासारखे वाटते. झरा जसा मातीची धूप होऊ न
देता, आजूबाजूच्या परिसराला सुंदर बनवत जातो, तसेच हे लेखन आपल्या मनाला विव्हळ किंवा
बंडखोर न बनवता विचार करायला भाग पाडते. त्यावर सकारात्मक विचार करायला भाग पाडते.
हे पुस्तक लालित्यपूर्ण भाषेत मानवी
मनातील स्पंदने आपल्यासमोर आणते आणि म्हणूनच त्याचे शीर्षक "निखळ जागर
संवेदनांचा" हे अत्यंत समर्पक आहे. हे सर्व लेखन प्रवाही आहे. वाहत असताना ते
कोठेही वाहवत जात नाही. उलट अनेक ठिकाणी ते एक वेगळी दृष्टी देण्याचा वेगळा विचार
देण्याचा प्रयत्न करते. लेखकाचे हे फार मोठे यश आहे. निर्भया प्रकरणात ते म्हणतात,
"गुन्हेगाराना शिक्षा होणे म्हणजे प्रकरणाचा शेवट नव्हे, तर ती सुरूवात झाली
पाहिजे, बलात्काराच्या भावनेला सुरूंग लावण्याची. अत्याचाराचा विचार करणाऱ्याच्या
मनात कायद्याचे भय निर्माण झालंच पाहिजे". 'गुन्हा होऊच नये म्हणून समाज
परिवर्तन विचारातील परिवर्तन व्हावे', असा आशावाद ते बाळगतात. पुरूषी अहंकाराच्या
मानसिकतेला उद्ध्वस्त करणे हे त्याना अपेक्षित आहे.
या पुस्तकातील "सोन्याचा
दिवस" हा पहिला लेख आणि शेवटून दुसरा लेख "मरणाने सुटका केली" हा
एकाच मित्राच्या जीवनातील दोन घटनावर आधारित आहेत. मैत्री कशी असावी, मैत्री
निभावताना आलेली बंधन, मानवी स्वभाव आणि मनातील अनेक स्पंदने त्यानी अचुकपणे
मांडली आहेत. ही मांडत असताना मैत्रीत ज्यांच्यामुळे मर्यादा आली, त्यांच्याबाबतची
वक्तव्य ही त्यांच्या लैखनीतील सुजाणतेची साक्ष देतात. त्यात त्यांनी कोणाचा
तिरस्कार केला नाही, तर त्या व्यक्तीच्या भूमिकेतून पहायचा प्रयत्न केला आहे. हे
फार कठीण असते. अनेक लेखक एखाद्या घटनेकडे आपल्याला वाटते तेच बरोबर आणि बाकी
सर्वजण चूक असे मांडायचा प्रयत्न करतात. मात्र अशी भावना आलोक यांच्या लेखनात
कोठेही दिसत नाही. मित्राच्या लग्न जमल्याची बातमी आणि त्याची आत्महत्या या दोन
टोकाच्या घटना मांडताना त्यांच्या मनातील भावना पूर्णत: वेगळ्या आहेत. तरीही त्या
शब्दात मांडताना त्यांच्यातील लेखक हा तितक्याच सक्षमपणे लिहित राहतो.
"सत्यनारायणाची
क्रांतीकथा" या लेखात त्यानी सॅम पित्रोदा यांच्या क्रांतीकारी कार्याची ओळख
करून दिली आहे. या त्यांच्या लेखात शोध पत्रकारितेचे दर्शन घडते. आज सॅम पित्रोदा
यांचे खरे नाव अनेकांना अभावानेच माहीत असेल. मात्र या मानवाने देशासाठी दिलेले
योगदान, त्याचे महत्त्व हे अगदी सहजपणे त्यांनी मांडले आहे. त्यांचे जीवनविषयक
तत्त्वज्ञान त्यांनी त्यांच्याच भाषेत अगदी समर्पकपणे मांडले आहे. जाता जाता त्यांनी
उथळ पाण्याला खळखळाट का असतो? याचे उत्तर देण्याचा
प्रयत्न केला आहे. त्या पार्श्वभूमीवर वाचकाना सॅम पित्रोदा यांचे कार्य किती
महत्त्वाचे आणि मोठे आहे हे अन्य काही न लिहिता समजते आणि हे त्यांच्या लेखनाचे यश
आहे.
"डिसलायनेशन" हा लेख
आजच्या पाणीप्रश्नावर आजही तितकाच महत्त्वाचा ठरतो. समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य
करता आले तर पाणी प्रश्नाची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होऊन जाईल. हा मुद्दा एक
राजकीय नेता विचारात घेतो आणि त्यावर विचार करू लागतो. त्यानुसार विचार करण्याच्या
सूचना अधिकाऱ्यांना देतो. या घटनेतून लेख सुरू होतो. यामध्ये दिलेले संदर्भ अत्यंत
महत्त्वाचे आहेत. असे प्रयोग कोठे होतात. त्यांची क्षमता, अशा प्रयोगांना येणारा
खर्च याची सर्वंकश माहिती देण्याचा प्रयत्न लेखातून झाला आहे. या लेखातील माहिती
एका विज्ञानाच्या अधिकारी पुरूषाने सांगावी तशी मांडली आहे.
कृतज्ञता ही गोष्ट आजच्या युगात
दुर्मिळ होत चालली आहे. या अशा युगात आपल्या गुरूजीची आठवण ते लिहितात. त्यांच्या
मनातील स्पंदने आज ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यावरील लेखाचे शीर्षकच
"गुरूजी, तुम्ही होता म्हणून..." असे आहे. या लेखात आपले तिसरी आणि चौथीतील
गुरूजी भूपाल ढोले यांच्याबद्दल लिहिले आहे. हे लिहिताना शिस्तप्रिय गुरूजीच्या
मनातील हळूवार कप्पे त्यानी अलगद उलगडले आहेत. शिक्षकांच्या ज्या कृतीचे आकलन
बालपणी झाले नव्हते, त्या कृती आज त्यांच्या लक्षात आल्याचे, त्यानी प्रांजळपणे
नमूद केले आहे. शेवटी गुरूजी नसते तर आपण आज जेथे आहोत तेथवर आलो असतो का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी न देता गुरूजी
तुमच्यामुळेच आपण येथवर पोहोचलो, ही सकारात्मक कबूली दिली आहे. ही कृतज्ञतेची
भावना दिवसेदिवस दुर्मिळ होत चालली आहे. ही सकारात्मकता लेखकाची सर्वात मोठी आणि
जमेची बाजू आहे.
"आशेचे दिप तेवू द्या
मनी" या लेखातील आशावाद आणि सकारात्मक भावना अत्युच्च पातळीवर पोहोचली आहे.
वाईट गोष्टीवर ते टीका करत बसत नाहीत तर वाईट आहे म्हणून चांगले महत्त्वाचे असे ते
म्हणतात. चांगल्या गोष्टीकडे पहायला ते सांगतात. चांगले वाईट व्यवस्थेमध्ये नाही
तर आपल्या मनात असते. मनातील वाईट काढून टाकले की चांगले उरते. जुन्या नव्याचा
विचार करताना जुन्यातील चांगले घेण्याची त्यांच्या मनाची तयारी आहे. शिवाजी महाराजांकडे
ते वेगळ्या नजरेने पाहतात. शिवरायाचे नाव घेऊन उपयोग नाही तर त्यांचे गुण
अंगिकारले पाहिजेत, असा त्यांचा रास्त आग्रह आहे. शिवरायांचे मोठेपण शोधण्याचा
त्यानी केलेला प्रयत्न हा अत्यंत प्रामाणिक आणि सर्वांनी आवर्जून वाचावा असा आहे.
वेड्यांचे संस्कार, मनाची मशागत,
खुर्ची डोक्यात शिरते तेव्हा असे एकूण बत्तीस वाचनीय लेख या पुस्तकात आहेत. यात काही
मृत्यूलेखही आहेत. या सर्व लेखनाला एक वैयक्तिक स्पर्श आहे. मात्र त्यामुळे हे
लेखन वैयक्तिक स्वरूपाचे झालेले जाणवत नाही. या लेखातील भावना या अनेकांच्या
मनातील भावना आहेत. त्या शब्दबद्ध करून आपल्यासमोर आज पुस्तकरूपाने आल्या आहेत. वुई
आर बिइंग वॉच्ड किंवा इंफोटेररिस्ट यासारख्या लेखात त्यानी नव्या युगाच्या हाका
आणि त्यात आपली वर्तणूक यावर भाष्य केले आहे. अनेक विषयांना भिडणारे असूनही
पुस्तकात एकजिनसीपणा आहे कारण यातील त्यांची मांडणी प्रामाणिक आहे. ती एका
सूत्रावर आधारित आहे.
हे पुस्तक युवकांसाठी विशेष
महत्त्वाचे आहे असे मला वाटते. पुस्तक वाचून युवकांना चिंतन करावेसे वाटेल अशी मला
आशा आहे. वृत्तपत्रलेखन हे साधारण समकालिन आणि तत्कालीन असते, चिरंतन मूल्य नसणारे
असते, असे आपण मानतो. मात्र विषय जरी समकालिन असले तरी लेखनशैलीमुळे आणि विषयाच्या
मांडणीमुळे ते चिरंतन साहित्य बनले आहे. युवकांना कायमस्वरूपी विचार करायला भाग
पाडेल, असे हे लेखन झाले आहे.
सर, आपल्या या लेखनामुळे अधिक चांगले लिहीण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन लाभले. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
उत्तर द्याहटवा..उत्सुकता शिगेला पोहोचली.. ती आता 'जागराच्या' वाचन अनुभवानंतरच शमणार!
उत्तर द्याहटवाSir...pustak wachanayachi far utchukta ahe..kute bhetel ..to address dya. Dr Baad.9823145900
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर......धन्यवाद सर
उत्तर द्याहटवाराजेंद्र मोरे, मुंबई.