________________________________________________________
समाज माध्यमे माझ्यासारख्यासाठी वरदान आहेत. धकाधकीच्या जीवनात प्रत्यक्ष न भेटता, एकमेकांच्या चांगल्या गोष्टी समजून घेणे, त्यावर भाष्य करणे, सूचना करणे त्यामुळे सहजशक्य झाले. यातून चांगल्या सूचना येतात आणि त्या माझ्यासारख्याला विचारप्रवण ठेवतात. मध्ये एका ब्लॉग वाचकाने दसऱ्यापूर्वी आपट्यावर लिहावे, असे सुचवले आणि आपट्याबाबत भरपूर शोध घेऊन मी लिहिले. समाज माध्यमांचा मोजका आणि शैक्षणिक व प्रबोधनात्मक कार्यासाठी वापर करणारी मंडळी भेटतात आणि त्यांचा चांगला फायदा होतो.
डिसेंबर
२०२० मध्ये मी मोरासंदर्भात ‘… कसा पिसारा फुलला’ हा
लेख ब्लॉगवर (http://drvnshinde.blogspot.com/2020/12/blog-post.html)
प्रसिद्ध केला. तो वाचून
मराठीतील कवी, लेखक, संत
साहित्याची विशेष जाण असणारे मित्रवर्य डॉ. शामसुंदर मिरजकर यांनी एक नोंद
निदर्शनास आणली. मोराचे साहित्यातील प्रतिबिंब शब्दांकित करताना, त्यांना-
पु.शि. रेगे यांच्या ‘सावित्री’
कादंबरीतील ‘मोर’ यायला हवा होता. त्यांनी
स्पष्टपणे तसे लिहिले नव्हते. पण मुद्दा
मांडतानाची तळमळ तसे सुचवत होती. ‘सावित्री’ मी वाचलेली
नव्हती. अर्थातच तिचा उल्लेख न येणे स्वाभाविक होते. मात्र आता वाचणे क्रमप्राप्त होते. मागे लोकसत्ताचे माजी निवासी संपादक श्री. सुधीर जोगळेकर सरांनी डॉ.
शरदिनी डहाणूकर यांच्या ‘वृक्षगान’चा
उल्लेख केला आणि मला ते पुस्तक मिळवून वाचल्यानंतरच समाधान लाभले. मी विज्ञानाचा
विद्यार्थी असल्याने मराठी साहित्यातील मुशाफिरी तशी बेताचीच. त्यामुळे असे कोणी काही सांगितले की ते
मिळवून वाचेपर्यंत मन शांत होत नाही.
… तर मिरजकर सरांनी ‘सावित्री’बद्दल लिहिलं. त्यांनी या पुस्तकावर लिहिलेला लेखही पाठवला. त्यानंतर या पुस्तकाची ओढ जास्तच वाटू लागली. अखेर हे पुस्तक मिळवले. आकार पाहून एका बैठकीत वाचून संपेल, असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. पुस्तक वाचत पुढे गेल्यानंतर तो भाग वेगळेच काही सांगत आहे, असे वाटायचे. त्यामुळे अनेक पत्रे पुन्हा सुरुवातीपासून वाचली. वाचावी लागली. हे पुस्तक म्हणजे निव्वळ कथा राहिलेले नाही. यात लेखकाने अनेक विषयांना – प्रश्नांना हात घातला आहे. हे पुस्तक विविध पैलूंवर वाचकाला विचार करायला लावते. पुस्तक वाचून पूर्ण होताना याची खात्री पटते.
वर
वर पाहिले तर या कादंबरीत ‘मुग्ध
प्रेमाची यशस्वी सांगता’ सांगणारी कथा मांडली आहे.
मात्र हे प्रेम शारीर नाही. दोन मनांनी एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे हे शेवटपर्यंत
बिंबवत जाणारी मांडणी आहे. या कादंबरीला
पत्राच्या माध्यमातून पुढे नेलेले आहे. पत्रातील संवादही दुतर्फा नाहीत. केवळ
नायिकेने पाठवलेल्या ३९ पत्रांच्या आशयातून ही कथा उलगडत जाते. तरीही संदर्भ तुटत नाहीत. पहिल्या
पत्रातच मोराची कथा येते. एक म्हातारी
आणि तिची नात लच्छी यांची ही कथा. या कथेत
लच्छी घराजवळ आलेला मोर पाहते. मोर पाहताच ती नाचू
लागते. तिला तो इतका आवडतो की तो बांधून ठेवला पाहिजे, असे तिला वाटते. तिला
मोर पाळायचा आहे. परिस्थितीजन्य कारणाने आज्जी नकार देते. मोर पाळू शकत नाही. लच्छी
नाराज होते. मग मोरच
एका अटीवर तेथे यायला तयार होतो. ती अट
म्हणजे मोर आल्यानंतर लच्छीने अगोदर नाचले पाहिजे. नाचायचे तर मन
आनंदी असले पाहिजे. मोर कधीही येऊ शकतो. तो
आला की वेळी अवेळी नाचायला हवे. असे करायचे तर स्वानंद
प्रत्येक ठिकाणी शोधता आला पाहिजे. नायिकेच्या या पत्रातील
एक वाक्य ‘मोर हवा तर आपणच
मोर व्हायचं. जें जें हवं ते आपणच
व्हायचं.’ हे वाक्य खूप काही सांगून जाते (पान क्र.४). मुळात मोराचं दर्शनच आनंददायी. पण
मनाला मोर भावतो तो नृत्यमुद्रेतला. त्यात मोराने घातलेली, लच्छीने
अगोदर नाचण्याची अट आणि त्यानंतर आलेले हे वाक्य. म्हणजे आहे त्या परिस्थितीला सामोरे जातानाही मन प्रसन्न
असायला हवे, असे लेखकाला सुचवायचे आहे.
विशेष म्हणजे गोष्टीचे तात्पर्य नायिकेला राजम्मा सांगत नाही. नायिका ते शोधते. नायिकेचे हे वाक्य कथेचे तात्पर्य आहे. पुन्हा कथानकाच्या शेवटच्या टप्प्यावर मोराचा उल्लेख येतो. नायिकेने
लहान मुलांच्या नाचाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कादंबरीच्या शेवटी पुन्हा मोर आणून लेखकाने वर्तूळ पूर्ण केले आहे.
लेखनासाठी
निवडलेला कालखंडही मोठा सूचक आहे. १९३९ ला ही
पत्रकथा सुरू होते. त्यावेळी जगामध्ये अशांततेचे ढग जमा
होत होते. जर्मनी पहिल्या महायुद्धाच्या तहावेळी लादलेल्या जाचक अटीमुळे अशांत होता. तो
पुन्हा लढाईच्या तयारीला लागला होता. मात्र ही अशांतता
उघड नव्हती. जगामध्ये अंतर्गत खळबळ जोरात होती. भारतातही
स्वातंत्र्याच्या मागणीने जोर धरला होता. नायिकेच्या मनातील वादळही त्याचवेळी सुरू झालेले दाखवले आहे.
लेखकाने नायिकेची मानसिकता दाखवण्यासाठी या जागतिक परिस्थितीचा संदर्भ सूचकतेने घेतला आहे. कथानक संपते, त्या
दिवशी एजवर्थ यांच्या घराचे खेळघरामध्ये रूपांतर करून त्या खेळघराच्या उद्घाटनासाठी बालगोपाळांच्या नाचाचा कार्यक्रम ठेवला आहे. हा दिवस
आठ वर्षांनंतरचा आहे. या दिवशी
भारत स्वतंत्र झाला. त्यापूर्वी नायक आणि नायिका परस्परांना स्वीकारतात, असे दर्शवले आहे. हे दोघे
जे नाते पत्रातून जपत होते, त्याला आता एक रूप
प्राप्त होत असल्याचे सुचवत कथा संपते. स्वातंत्र्य दिन निवडण्याचे कारण परस्परातील बंधने गळून त्यांनी परस्परांना स्वीकारले. बंधमुक्त
झाल्याचे सूचक स्वातंत्र्य दिन. आपल्याला स्वातंत्र्य मिळताना दुसऱ्या महायुद्धाने ब्रिटन खिळखिळा झाला आणि पारतंत्र्याचे बंधन गळाले, असे
लेखकाने सुचवल्याचे दिसून येते.
नायिका
ही आईविना वाढणारी मुलगी. तिचे नाव सावित्री. तिला
साउ म्हणतात. वडिलांनी तिच्या स्वभावाला पाहून तिला आनंदभाविनी असे म्हटले आहे.
ती सर्वात अगोदर स्वत:ला विसरायला
शिकली. मोर नाचताना बेभान होतो, स्वत:ला
विसरतो. साउही सर्वात अगोदर स्वत:ला विसरायला
शिकली आहे. ती सर्वांची
काळजी करते. बालपणापासून ती हट्ट
करायला विसरली आहे. ती समंजस
आहे. हुशार आहे. वर्गात प्रा. गुरूपादस्वामींच्या विषयात
पैकीच्या पैकी गुण तिने प्राप्त केले आहेत. राजम्माने सांगितलेल्या कथेचे तात्पर्य ती आपल्या
परीने शोधते. म्हणजे तिच्याकडे विश्लेषण क्षमता आहे.
ती
स्त्री-पुरुष समानता मानते. प्रवासात भेटलेल्या युवकाने सामान उतरवताना मदत केली. त्यानंतर
तिने चहाचे बिल दिले. तिने मोबदला म्हणून हे केले
नाही. मात्र उपकाराची जाण तिच्यामध्ये आहे, त्या कृतज्ञतेपोटी तिच्याकडून नकळत घडलेली ती कृती
आहे. त्याचा सभ्यपणा ओळख जुनी नसतानाही मदत करण्याची वृत्ती लक्षात घेऊन साऊ त्याच्या संपर्कात राहते. हा साउचा
सुसंस्कृतपणा संपूर्ण कथानकभर आहे. ती बहुभाषिकही आहे. तिचे वडील आप्पा हे एक
अभ्यासू आणि सर्जनशील व्यक्तीमत्व. ते शिस्तप्रिय
आहेत. ते नायिकेवर रागावत नाहीत. यामुळेच आप्पा दुखावणार नाहीत, याची
ती परोपरीने काळजी घेत असते. आप्पांच्या विद्वत्तेमुळे लोक त्यांच्याशी चर्चा करायला आणि सल्ला घ्यायला येत असतात. आप्पा
आपल्या कामात व्यस्त असतात. त्यांना त्यांचे काम सुरू असताना कोणाची लुडबूड नको असतो. आप्पा ‘एक्सपिरियन्स अँड ग्रोथ’ नावाचा ग्रंथ लिहित आहेत. हे
नावही खूप सूचक आहे. अनुभवातून ज्ञानामध्ये वाढ अपेक्षित असते. ‘अनुभवातून
माणूस शिकतो’ असे म्हणतात. अनुभव
आणि ज्ञान परस्परपूरक गोष्टी आहेत. या दोन्ही
गोष्टी अदृष्य आहेत. त्या जाणवतात, अनुभूती
घेता येते. मात्र त्या डोळ्याना दिसत नाहीत. आप्पांचे
हे पुस्तक क्रांतीकारक ठरणार, असे आप्पांचे मित्र एजवर्थ यांचे म्हणणे असते. त्या
पुस्तकाच्या लिखाणावर त्यांनी व्याख्याने द्यावीत, असे त्यांना सुचवले जाते आणि आनंद मिशनच्या माध्यमातून ते व्याख्याने
देण्यासाठी जपानला जातात.
आप्पांच्या
स्वत:च्या विश्वात रमण्यामुळे साउकडे मोकळा वेळ असतो. या वेळेत
ती आपला अवकाश शोधत असते. याचाच एक भाग
म्हणजे पत्र लेखन. साउ अनेक गोष्टी करत असते. आप्पांसमवेत
ती जपानला जाते. तेथेही ती आपला
अवकाश शोधते. या अवकाशात
ती रमते. नवे मित्र मैत्रिणी जोडते. तेथे
एक नाटक लिहिते आणि बसवते. आप्पांच्या आजारपणामुळे तिचा दवाखान्याशी संबंध
येतो. त्या दवाखान्यात, युद्ध
कालावधीत, ती परिचारिकेचे काम स्वीकारते. जपानमध्ये तिला आझाद हिंद सेनेतील सैन्य अधिकारी सेन भेटतात. त्यांचे
जपानी नर्सबरोबर लग्न झालेले असते. ते दुसऱ्या
महायुद्धात झालेल्या एका हल्ल्यात गायब होतात. त्या धक्क्याने त्यांची जपानी पत्नी अकाली प्रसूत होते. त्यात
तिचेही निधन होते. त्यांची कन्या बीनाला साउ आपली मुलगी मानते. आप्पाचे
निधन जपानमध्येच झाले. मात्र ती भारतात
येताना जपानी माता आणि बंगाली पित्याची मुलगी कुर्गमध्ये वाढवण्यासाठी घेऊन आली. ती मनस्विनी
आहे. स्वभावाने मनमोकळी आहे. नायकाने तिला ‘मनमोकळी’ असे नावही दिले आहे.
जपानमध्ये स्वीडनची भेटलेली मैत्रीण ल्योरे हिच्यासमवेतचा फोटो ती नायकाला पाठवते. तिला आवर्जून भेटायला सांगते. यामध्ये
तिला स्त्री स्वभावाला अनुसरून असुरक्षित वाटत नाही. उलट आपण लिहिलेल्या पत्राचा मजकूर लिहिताना ल्योरेचाही सहभाग होता, असे
खुलेपणाने लिहिते (पृष्ठ ८६).
यात नायकाने तिचे ‘मनमोकळी’ असे
केलेले नामकरण किती सार्थ आहे, हे लक्षात
येते.
ती
मनाने किती चांगली आहे, तर तिला
जगात सर्व चांगलेच लोक आहेत, असे वाटते. तिला
तसा कटू अनुभवही आलेला नाही. ती चांगली
व्यवस्थापिका आहे. नायक येणार म्हटल्यावर ‘कसे यायचे’, याची माहिती देणारे पत्र आणि स्वत:ला
घालून घेतलेली बंधने याची साक्ष देतात. तसेच येताना आपल्यासाठी काही आणू नका, हे लिहायला ती विसरत नाही. ‘ही भेट
निरपेक्ष असावी’ ही साउची
अपेक्षा आहे. शेवटच्या भागात नायकाच्या येण्यापूर्वी त्याच्या राहण्याच्या केलेल्या व्यवस्थेच्या वर्णनातही हे जाणवते.
साउला
नायकाला भेटायची ओढ लागली आहे. तो येणार
याची तिला असणारी उत्कंठा, ओढ चौदाव्या पत्राच्या शेवटी केलेल्या वारांच्या उल्लेखात दिसते. नायक येतो त्यांची भेट होते. मात्र
त्यानंतरचा त्यांचा पत्रव्यवहारही प्रेमाच्या पारंपरिक संकल्पनेकडे जात नाही. ती त्याच्या
इतरांच्या दृष्टीने असणाऱ्या दोषांनाही गुण मानत राहते. म्हणजे तिने त्याला मनोमन स्वीकारले आहे.
‘माणसानं इतकं शांत असू नये म्हणतात… पण तुम्हाला
हा शांत-वेष अधिकच शोभून दिसतो,’ असे सूचक वाक्य लिहिलेले आहे (पान क्र.३१).
या काळात नायिकेच्या मनात गोंधळ उडालेला आहे. ती, नायकाबद्दल आकर्षण का वाटते? याचाही उल्लेख करते. मात्र ती स्पष्टपणे
कोठेही व्यक्त होत नाही.
आप्पांचे
मित्र एजवर्थ हे ब्रिटिश आहेत. ते लागवड
करणारे (प्लँटर) आहेत. त्यांच्या
म्हणण्यानुसार ते पूर्वजन्मीचे कुर्गवासी होते. ते तीस
बत्तीस वर्ष तेथे राहात होते. त्यांना पुढच्या जन्मीही कुर्गमध्येच जन्माला यायचे होते. पण
त्यांना कूर्ग स्त्रीचा जन्म हवा होता. ते अविवाहित
आहेत. त्यांचे १९४३ मध्ये निधन होते. त्यांनी आपली सर्व संपत्ती नायिकेच्या नावे केली आहे.
एजवर्थ यांच्या घराचं साउ खेळघरात रूपांतर करते. या खेळघराचे उद्घाटन १५ ऑगस्ट
१९४७ रोजी करायचे आहे. त्यासाठी नायकाने यायचे आहे,
हे सांगणाऱ्या पत्राने कथा संपते. मात्र त्यापूर्वी ३५ वे
पत्र वाचताना नायकाने प्रेम व्यक्त केले आहे, असे लक्षात येते. यावर
नायिका तितक्याच मोकळेपणाने ‘आपणासही
ते हवे आहे’, असे लिहिते. तिलाही
हा प्रतिसाद हवा होता. खरे तर सहा वर्षांचा पत्रव्यवहारही प्रेमच होतं. पण ती
स्वत: कधीच व्यक्त झालेली नाही. त्याच्या पुढाकाराची स्त्रीसुलभ भावनेने ती वाट पाहात होती. या पत्रातील
‘तुम्ही मला उचलून, ओढून न्यायला हवं होतं – होय, हे मी अगदी खरं खरं लिहित आहे’, (पान क्र.१०४) या वाक्यातून
ही अपेक्षा स्पष्ट होते.
या
कादंबरीला केवळ प्रेमकथेमध्ये बांधणे अन्यायकारक ठरेल. या कथानकात
अनेक उपकथानके, पात्रे, व्यक्ती
आणि देशसुद्धा भेटत राहतात. केवळ ११७ पानांची ही कादंबरी.
तिचा आकार छोटा पण अवकाश मोठा आहे. एका तरूण मुलीच्या भावभावनांचा गुंता अलगद सोडवत जाणारी ही कथा. मुग्ध प्रेम ते परिपक्व प्रेमाची ही कथा, एवढेच या कथेत सापडत नाही. नायिका गुणसंपन्न आहे. ती
मनाने भेदाभेदाच्या पलिकडे आहे. तरीही
ती स्त्री आहे, हे ‘जन्माला येताना प्रत्येक मुलगी आपल्या आईला आणि बापालाही सोडण्याची तयारी करून आलेली असते,’ या विधानातून
हे स्पष्ट होते (पान क्र.१०६). साउचे चित्रण एका आदर्श, परिपक्व,
कलासक्त मुलीचे आहे. त्यामुळेच या कथेत
अनेक प्रश्नांना आणि संकल्पनाना सामावून घेणे लेखकाला शक्य झाले आहे.
कादंबरीचा
लेखन काल हा १९६०-६२ या
कालावधीतील असावा. कादंबरी १९६२ मध्ये प्रकाशित झाली. त्या
काळात पर्यावरणाचा प्रश्न एवढा ऐरणीवर आलेला नव्हता. मात्र या कादंबरीत
तो अतिशय तळमळीने मांडला आहे. साउने
जपानमध्ये लिहिलेले आणि बसवलेले नाटक ‘गाणारे झाड’
याचा कादंबरीतील उल्लेख सविस्तर आहे. या नाटकाची
कथा वाचताना मानवी वस्त्यासाठी केली जाणारी वृक्षतोड
कसे, गंभीर रूप धारण करणार आहे आणि पुन्हा मानवाला वृक्ष लागवड करावी लागणार आहे, हे सांगण्याचा
यशस्वी प्रयत्न केल्याचे लक्षात येते. मुळात मानव निसर्गातील एखाद्या घटकाचा त्रास झाला की तिच्या
मुळावरच उठतो. चीनचा प्रमुख माओ झेडोंग याने चिमण्या पिकाचे नुकसान करतात, म्हणून
देशातील सर्व चिमण्या मारायला सांगितले होते. तो कालखंड
१९५८ ते ६१ चा. त्यामुळे शिकारीवेळी पक्ष्यांच्या आवाजाने राजाची शिकार सुटते.
पक्ष्यांमुळे हे घडले. पक्ष्यांचा हा त्रास
होतो, म्हणून राजा पक्ष्यांना नाहिसे करण्यास सांगतो. त्यांना नाहिसे करण्यासाठी झाडच तोडले जाते. झाड तोडताना ते तोडू
नका, म्हणून सांगणाऱ्या वृद्धाचे कोणीच ऐकत नाही. झाड तोडले जाते. पक्ष्यांना
दूर हुसकावले जाते. या प्रवेशातील
राजा हा प्राचीन काळातील दाखवला आहे. झाडाच्या फळ्यांचे घर बांधले
जाते. या घरात माणसांबरोबर पक्षीही राहू शकत असतात, कारण हे झाड
लाकडाचे आणि फटीमध्ये पक्षी राहू शकतील, असे असते. त्यामुळे माणूस आणि निसर्ग एकत्र नांदतात, हे सुचवायचे आहे.
या
नाटकाच्या कथानकातील दुसरा प्रवेश मध्ययुगातील आहे. झाडाच्या जागेवर घर आहे. काही पक्ष्यांच्या जागेवर आता मुले दाखवली आहेत. ती उरलेल्या
पक्ष्यांबरोबर खेळत आहेत. हा राजा
पक्षी आणि मुलांना वेगळा करू पाहतो. ते वेगळे
होत नाहीत म्हटल्यावर त्रास देणाऱ्या पक्ष्यांना हाकलण्यासाठी हे घर पाडायचा हुकूम राजा देतो. घरातून एक स्त्री
येते. मुलं आणि पक्षी तिच्याजवळ जातात. ती घर
पाडू नका, असे विनवते. मात्र तिचे कोणी ऐकत नाही. तिथे
माणसाबरोबर पक्षी राहू शकणार नाहीत, असे घर बांधायचे
ठरवतात. मग तिथे सिमेंट काँक्रीटचे घर बांधले जाते. या घरात
पक्ष्यांना राहायला फटी, घरे नसतात. येथे
मानव निसर्गापासून दुरावला गेल्याचे दिसते.
तिसऱ्या
प्रवेशामध्ये जुन्या लाकडी घराच्या जागेवर सिमेंट काँक्रिटची उंचच उंच इमारत असते. पक्ष्यांना या घरात
थारा नसतो. या प्रवेशात
सर्वांचा पेहराव आधुनिक आहे. सरकारी नोकर, हॉटेल
मालक, कारखानदार अशी आधुनिक काळातील पात्रे, नेपथ्य रचना आणि दृष्य घेतले आहे.
मात्र या प्रवेशात मोठे हादरे बसतात आणि ही इमारत पडते. त्यानंतर पहिल्या प्रवेशातील झाड ‘तोडू नका’, म्हणून सांगणारा म्हातारा, दुसऱ्या
प्रवेशातील स्त्री, मुले आणि पक्षी सगळे बाहेर येतात. तिथे
ही मुले झाडे लावतात, छोटी छोटी घरे बांधतात. आता
पुन्हा तिथे मुले आणि पक्षी सर्वजण एकत्र राहू शकत असतात. या कथानकात
मानवाने स्वत:ला निसर्गापासून
वेगळे करू नये, तसे केले तर विनाश
अटळ आहे, असा संदेश दिला आहे.
विशेष म्हणजे याची प्रचिती आज प्रकर्षाने येत आहे.
या
कथेत लेखकाने ज्या काळात पर्यावरणाचा प्रश्न एवढा चर्चेत नव्हता त्या काळात भविष्यातील या भीषण समस्येची जाणीव करून दिली आहे. पन्नास वर्षानंतर वृक्ष लागवडीसाठी राबवल्या जाणाऱ्या मोहिमेचे चित्रण केले आहे.
आज आपण वृक्ष लागवड करण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहोत. शाळा महाविद्यालयांचा यात समावेश करत आहोत. हेच
चित्र या तिसऱ्या प्रवेशात रंगवले आहे. एका काव्यात्म कादंबरीत विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून उदभवणाऱ्या या पर्यावरणाच्या प्रश्नाला
हात घातला आहे. नाटकाचे नावही सुंदर आणि सूचक ठेवले आहे
‘गाणारे झाड’. भविष्याचा वेध घेऊन त्यातील धोक्याची आणि उपायाची मांडणी उत्तमपणे केली आहे.
कादंबरी ज्या काळात आली त्या काळात पर्यावरणाचा प्रश्न एवढा गंभीर नसल्याने वाचकांचे कादंबरीतील या भागाकडे गांभीर्याने लक्ष गेले नसावे.
कादंबरीमध्ये
आणखी एक महत्त्वाचा भाग दिसतो. या कादंबरीत
अनेक देशांचा उल्लेख येतो. यातील ब्रिटनचे नागरीक एजवर्थ, भारतातील
डॉ. जोशी, स्वीडनची ल्योरे आणि त्यांचे वडील, जपानमधील
नामुरा आणि त्यांचे सहकारी, पश्चिम बंगालमधील मेजर सेन,
त्यांची जपानी पत्नी ही सर्व या कादंबरीत भेटतात. हे सर्वजण
सुजन आहेत. त्यांचे देश भिन्न आहेत. यांचा
साऊला त्रास होत नाही. विना आईबापांची मोठी झालेली साउ अनाथ झालेल्या बिनाला आपलीशी करते. ब्रिटनचे
एजवर्थ आपली सर्व संपत्ती साऊच्या नावे करतात. आप्पांचे निधन जपानमध्ये होते. तेथेही
सरकारी अडथळे आणि लालफितीचा कारभार तिच्या अनुभवास येत नाही. अशा सर्व घटनांच्या माध्यमातून ‘वसुधैवकुटुम्बकम’ या भावनेला
आणि प्रेमाच्या संकल्पनेला व्यापक रूपात दर्शवले आहे. कोठेतरी ज्ञानेश्वरांच्या पसायदानाला या कथेत
वेगळ्या बंधात बांधायचा लेखकाचा प्रयत्न असावा, असे वाटत राहते.
पत्र
हे दूरस्थ संवादाचे साधन. वेळ खाणारे. पूर्वी
पत्र मिळायला काही आठवड्याचा काळ लागायचा. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीने
हा वेळ काही सेकंदावर आला आहे. त्यामुळे आजच्या पिढीला अशा पत्रसंवादाची संकल्पनाच पटू शकणार नाही. या
पत्रातील प्रत्येक शब्द अत्यंत काळजीपूर्वक वापरला आहे. काव्यात जसे प्रत्येक शब्दाला महत्त्व असते, अगदी
तसेच या कादंबरीतील प्रत्येक शब्दाला महत्त्व आले आहे. लेखक प्रसिद्ध कवीही आहेत. त्यामुळे
भाषा तरल, सहज आणि मोजक्या शब्दात मोठा आशय सांगणारी आहे.
मांडणीत सर्व पत्रे साउचीच वापरावयाची असल्याने लेखकाने तिला सर्वगुणसंपन्न रेखाटले आहे. साउला सदोदित आनंदी दाखवण्यासाठीच मोर या कथानकामध्ये
आणला आहे. अशा पत्रव्यवहारात उत्तरास होणाऱ्या विलंबाने लागणारी हुरहुर, तगमग
या कादंबरीत अनेक ठिकाणी जाणवत राहते. कादंबरीतील कथानक मुग्ध प्रेम ते समर्पण
एवढे नाही, तर आत्मशोधापर्यंत जाते. शेवटी केवळ मोराच्या नाचाच्या कार्यक्रमाचा उल्लेख नाही. तर
मोर नाचतो म्हणजे काय तर एका पायावर उभा राहायचा प्रयत्न करतो, तोल जातो म्हणून दुसरा पाय टेकवतो, आणि
पहिला वर घेतो. त्यालाच आपण नाच समजतो, असे कोठेतरी वाचल्याचे (पान क्र. ११६)
साउने नमूद केले आहे.
कादंबरी अत्युच्च आध्यात्मिक संदेशही देते. परमेश्वराची आठवण काढायची तर सुखात काढायला हवी. (पान क्र.७८) दु:खाच्या क्षणी तर कोणीही आठवण काढेल. साउला सुख-समाधानात परमेश्वर जपणे महत्त्वाचे वाटते. आपले संतही तेच सांगत आले आहेत. प्रत्येक क्षणी परमेश्वराचे स्मरण व्हावे, हेच त्यांनीही अपेक्षिले आहे. तसेच वरील महत्त्वाची मांडणी आहे. घरातील फर्निचर वाढले की माणसं बाहेर जातात (पान क्र. ११३). पूर्वी घरात मोजक्या वस्तू असायच्या. बाहेरून आलेले पाहुणे घरातच मुक्काम करायचे. आता प्रत्येकाला घरात मोठे फर्निचर लागते. पाहुणेही आता गेस्ट होतात. त्यांना खाली कसं झोपवायचं किंवा आपण आपली गैरसोय कशी करून घ्यायची, म्हणून मग त्यांची रवानगी गेस्ट हाउसमध्ये होते. तसेच झालेल्या चुकांना कुरवाळत बसण्यात काहीच अर्थ नसतो. ‘विश्लेषणाने काहीच साधत नाही. आपण आपणालाच पारखे होतो’ (पान क्र. १०४), हे विधानही असेच आहे. झाले गेले विसरून, आहे तेथून चांगल्या गोष्टीची सुरूवात करण्याची भावना व्यक्त झाली आहे.
कोणत्याही पुस्तकाला
वाचकापर्यंत पोहोचवण्यामध्ये सादरीकरणाचाही मोठा वाटा असतो. मुखपृष्ठावर निव्वळ खरेखुरे
मोराचे चित्रही छापणे शक्य होते. मात्र सूचक पद्धतीने मोराला सादर केले आहे. मौज प्रकाशनाने कादंबरीचा मजकूर मर्यादा ओळखून, त्यातील शब्दरचना आणि त्याने व्यापलेला अवकाश याचा मेळ घालण्यासाठी प्रत्येक पानावर मर्यादित मजकूर घेतला आहे.
इतर पुस्तकाप्रमाणे हे पुस्तक छापले असते, तर पाने आणखी कमी झाली असती. त्यामुळे वाचकाला वाचताना
अर्थ समजून घ्यायला कमी वेळ मिळाला असता. प्रकाशकाने आपले पूर्ण कौशल्य कादंबरीच्या छपाई प्रक्रियेत वापरले आहे.
सावित्री ही कादंबरी अत्यंत मोजक्या शब्दामध्ये, माठा आशय घेऊन, धोक्याची जाणीव देणारी,
वैज्ञानिक संदेश देणारी कादंबरी आहे. मनापासून ही कादंबरी वाचावी अशी आहे. अशी ही साठ वर्षापूर्वीची सर्वांगसुंदर कादंबरी वाचून मनही मोराप्रमाणे नाचत राहिले.
-०-
अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे, अशा लेखनामुळे पुन्हा पुन्हा वाचनाची आवड व प्रेरणा मिळते. धन्यवाद!!
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट......
उत्तर द्याहटवामोठा आशय घेऊन मोजक्या शब्दात विषयाचे सादरीकरण केले आहे..... छानच
उत्तर द्याहटवानेमक्या शब्दात ..अप्रतिम लेखाची मांडणी!!..विनोद ठाकुरदेसाई
उत्तर द्याहटवा"सावित्री" कादंबरीतील आशय, अभिव्यक्ती, रुपबंध या संदर्भातील भाष्याबरोबर तीमधील चितारलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनावरील चिकित्सक भाष्य एकतर नावीन्यपूर्ण वाटते; शिवाय ते वेगळा विचार करायला लावणारे आहे.
उत्तर द्याहटवाकादंबरीच्या जीवनवादी भूमिकेच्या संदर्भात विचार करताना समीक्षकाने तिच्या स्वरूपाचा, प्रयोजनाचा आणि परिणामाचाही विचार केलेला दिसतो. शिवाय आशयप्रधान म्हणून या कादंबरीचा विचार करताना केवळ रचना, शैली याच्या आधारेच मूल्यमापन केलेले नाही; तर जीवनमूल्यांचे निकष वापरलेले आढळतात.