गुरुवार, २१ जुलै, २०२२

मनभावन चंदन!

 

    चंदन त्याच्या सुगंधामुळे सुपरिचित असे झाड. संतांनी चंदनाच्या झाडाचा, चंदनाच्या झिजण्याचा, त्याच्या सुगंधाचा सज्जन माणसाशी संबंध जोडला. चंदन स्वत: झिजते, जळते आणि आजूबाजूला सुगंध पसरवते. सज्जन माणसांचेही असेच असते. ती प्रत्येकाच्या अडीनडीला मदतीला धावून जातात. ती स्वत: कष्ट करतात, दु:ख झेलतात आणि जवळ असणाऱ्या, आजूबाजूच्या लोकांना सुखी ठेवतात… आजतरी, चंदन आणि सज्जनांना मोठे होऊ दिले जात नाही… चंदन आणि सज्जनांचे प्राक्तन एकच; पण, त्यांचा सुवास सदैव दरवळत राहीलच! मानवी जीवनात सुगंध पसरवत राहणाऱ्या चंदनाविषयी…

------------------------------------------------------------------------------------------------

झाडे ऑक्सिजन देतात. शुद्ध हवा देतात. जमिनीमध्ये पाणी मुरवतात आणि पाणी टिकवूनही ठेवतात. झाडे जळणासाठी लाकडे देतात. ती फर्निचरसाठीही वापरली जातात. पाने, फुले आणि फळे जनावरांची भूक भागवतात. वाळलेल्या पानांच्या सहाय्याने माती भुसभूशीत करतात. काही झाडे त्यांच्या  फळांमुळे, फुलांमुळे तर काही लाकडांमुळे लोकांच्या मनात स्थान मिळवतात, लोकप्रिय ठरतात. मात्र एक झाड असे आहे की, ते पुरातन काळापासून त्याच्या सुगंधामुळे प्रसिद्ध आहे. जिवंतपणी आणि मृत झाल्यानंतर लाकडाच्या रूपातही ते सुगंध देते. ऋषी-मुनींपासून, संतांपासून आधुनिक कवींपर्यंत सर्वांना या झाडांवर व्यक्त व्हावेसे वाटले. ते झाड लोकसंस्कृतीतही एकरूप झाले, म्हणूनच खेड्यापाड्यातील मायमाऊलीच्या ओव्यांतही त्याला स्थान मिळाले. या झाडांची फळे मानवी आहारात मोठ्या प्रमाणात वापरली जात नाहीत. पण या झाडाला मोठे होऊच दिले जात नाही. त्याच्या पानांचा जनावरांना चारा म्हणून उपयोग होत नाही. असे केवळ सुगंधामुळे प्रसिद्ध असलेले झाड आहे चंदनाचे!

चंदन सर्वपरिचित आहे, ते त्याच्या सुगंधामुळे. विरप्पन या तस्करामुळे आणि नंतर आलेल्या विविध चित्रपटांमुळे चंदन तस्करी हा विषय कायम चर्चेत राहिला आहे. चंदनाच्या झाडांची चोरी हा महिन्यातून एकदा तरी बातमीचा विषय बनतो. बरं, या चंदन चोरांना कशाची भिती असते की नाही, असा प्रश्न पडतो, कारण कापण्यायोग्य झाड बरोबर हेरून चोर कधी चोरी करतात, हे कोणालाच कळत नाही. अगदी जिल्हाधिकारी निवासस्थान, कुलगुरू निवासस्थान, तहसिल कार्यालय, इतर सरकारी कार्यालये, खाजगी शेतीच्या बांधावर वाढणारी झाडेही चोरीला जातात. जंगलातील झाडांवर तर तस्करांची, चंदन चोरांची नजर असतेच. सध्या चोर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून झाडे कापतात. ते प्रथम चंदनाचे कापण्यायोग्य झाड शोधतात. त्याच्या बुडाशी ड्रील यंत्राने छिद्र पाडून सुगंध येतो का ते पाहतात आणि सुगंध आला तरच त्याला कापतात. सुगंध नसणाऱ्या झाडाला जीवदान मिळते. पावसाळ्याच्या दिवसात चंदन चोरीचे प्रमाण जास्त असते. बॅटरीवर चालणाऱ्या करवतीचा आवाज कमी येतो. मात्र ज्यांना याचे ज्ञान नाही असे चोर, केवळ झाडाच्या बुंध्याच्या आकार पाहून कापतात. चांगल्या वातावरणात आणि जमिनीत वाढलेले झाड अनेकदा सुगंधी झालेले नसते. केवळ त्यांच्या बुंध्याचा आकार मोठा आहे म्हणून त्यांची कत्तल होते. झाडाचा शेंडा वाळू लागल्यानंतर इतरांच्या लक्षात येते की, झाडाचा बुंधा चोरीला गेला आहे. असे दुर्दैव वाट्याला आलेले, चंदनाचे झाड आहे.

चंदन महाराष्ट्रात सर्व भागात आढळते. उत्तर भारतात मात्र हे झाड फारसे आढळत नाही. त्यामुळेच ‘मोक्तकं न गजे गजे… चंदनं न वने वनेl’ असा संस्कृत श्लोक आपणास वाचावयास मिळतो. संस्कृतमध्ये ‘चंदन’ किंवा ‘चंदनम्’ म्हणून हे झाड ओळखले जाते. चंदनाच्या झाडाची लागवड न करताही इतर झाडांच्या बुडाशी रोपे उगवतात. चंदन हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ सुगंध असा आहे. सुगंधासाठी इतर अनेक संस्कृत शब्द असताना, चंदनम् हा शब्द येण्यामागे चंद्राचा प्रकाश जसा शीतल असतो, चंदनाचा लेप तशी शीतलता सुगंधाबरोबर देतो, हे कारण आहे. यावरून त्याचे संस्कृत नाव चंदनम् निश्चित झाले. त्याचा अपभ्रंश होऊन अरबी भाषेत ते चंडल झाले. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन इंग्रजीत झाले संडल. त्यावरून त्याचे इंग्रजीत नाव आले सँडलवूड. ग्रीक भाषेत ते बनले सँटलॉन. शास्त्रीय नाव बनले सँटॅलम अल्बम. चंदनम् म्हणजे चंद्राप्रमाणे शितलता असणारे, या अर्थाच्या लॅटिन भाषेतील शब्दावरून सँटलम घेण्यात आले आहे. अल्बम हे नावाशी जोडले गेले, ते चंदनाच्या लाकडाच्या पांढऱ्या रंगावरून. याचे कुळ आहे सँटॅलसी. लाकडाचा बाह्य भाग जरी पांढरा असला, तरी पूर्ण वाढ झालेल्या चंदनाच्या लाकडाचा गाभा पिवळा आणि सुगंधित असतो. भारतीय उपखंडामध्ये सँटलम अल्बम ही प्रजात सापडते. ऑस्ट्रलियामध्ये सँटॅलम स्पिकॅटम ही प्रजाती आढळते. सँटलम एलिप्टिकम, सँटॅलम फ्रीसिनिेटीनियम आणि सँटॅलम पॅनिक्युलेटम या काही चंदनाच्या आणखी प्रजाती आहेत. या हवाई बेटावर आढळतात. मात्र एकूणच जागतिक पातळीवर चंदनाची मोठी झाडे शिल्लक राहिलेली नाहीत. आसामी, बंगाली, ओडिसी, पाली, उर्दू, गुजराती भाषांमध्ये चंदन, हिंदीमध्ये चंदन, संदल, मणिपूरीमध्ये सँडल, तेलगूमध्ये भद्रासी, तमिळ आणि मल्याळममध्ये चंदनम, पंजाबीमध्ये चंदन, संदल, तेलगूमध्ये चंदनमू, बंगालीमध्ये श्वेतचंदन, कन्नडमध्ये बवन्ना, श्रीगंधा, कोकणीमध्ये गांद, श्रीगंध अशी नावे आहेत. चंदन म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या झाडाची, मराठीमध्ये नावे आहेत गंधचकोडा आणि श्रीखंड. चंदनाला ‘श्रीखंड’ हे नाव का मिळाले, समजू शकत नाही. नेपाळीमध्ये श्रीखंड, इटालियनमध्ये लेग्नो डी सँडल, स्पॅनिश आणि पोर्तुगीजमध्ये सँडलो, डचमध्ये सँडलहाउट, फ्रेंचमध्ये सँटल, तुर्कीमध्ये सँडल अगासी, स्वीडीशमध्ये सँडेल्ट्रा तर रशियनमध्ये सँडलोव्होये डेरेवो अशी नावे चंदनाला मिळाली आहेत. याला ‘डॉलर ट्री’, ‘सोन्याचे झाड’ अशीही नावे मिळाली आहेत.

चंदन हा मूळ भारतातील वृक्ष आहे. मूलत: गोदावरीच्या खोऱ्यामध्ये कर्नाटक, तमिळनाडू, केरळ,  महाराष्ट्र, मध्यप्रदेश या भागात या झाडांची संख्या जास्त आहे. रायलसिमा भागातील कडप्पा, चित्तूर, कुर्नूल, आंध्रप्रदेशातील नेल्लोर, कर्नाटकातील म्हैसूर, केरळमधील मरायूर आणि मलयगिरी डोंगररांगांतील चंदन त्याच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध होते. आज या भागात चंदनाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली असल्याने या झाडाचा समावेश धोकादायक किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींच्या गटामध्ये करण्यात आलेला आहे. भारताबाहेर इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाईन्स, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका या देशातही चंदनाची झाडे आढळतात. त्याच्या किंमती लाकडामुळे आज त्याची कृत्रिमरित्या लागवड करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

चंदनाचे झाड मध्यम चणीचे असते. झाडाची उंची १५ ते ३० फुट असते. चंदनाच्या झाडाचा आकार हा डेरेदार, घनदाट पर्णसंभाराने कायम भरलेला असल्याने सुंदर दिसतो. चंदन सदाहरित वृक्ष आहे. उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधात हा वृक्ष आपोआप उगवतो. समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंचीपर्यंत, झाडाची वाढ चांगली होते. २२ ते ३० डिग्री सेल्सियस तापमान झाडाच्या वाढीसाठी पोषक मानले जाते. चंदनाचे झाड ४५० ते २५०० मिलीमीटर पावसाच्या प्रदेशात वाढते. मृदा उदासीन असल्यास झाडांची वाढ चांगली होते. चंदनाचे झाड अर्धपरोपजिवी आहे. त्यामुळे त्याच्या बिया, पक्ष्यांच्या विष्ठेतून झाडाच्या बुडाशी पडतात आणि रूजतात. बिया रूजण्याचे प्रमाण साधारण ७० टक्के आहे. रोपवाटिकांमध्ये ऊती संवर्धनाच्या (टिश्यू कल्चर) तंत्राचा वापर करून चंदनाची रोपे बनवली जातात. फांद्याचे तुकडे लावूनही काही भागात रोपे बनवतात. चंदनाची झाडे कमी किंवा मध्यम पावसाच्या प्रदेशात चांगली वाढतात. भरपूर सूर्यप्रकाश असणेही आवश्यक असते. या झाडांच्या निकोप वाढीसाठी पाण्याचा निचरा होणारी कोणत्याही प्रकारची जमीन चालते. चंदनाच्या झाडाची वाढ तशी कमी असते. रोपाची उंची एक फूट होण्यासाठी वर्षभराचा काळ जातो.

रोपाला समोरासमोर पाने फुटत जातात. पाने साधी असतात. पानांचा आकार चार ते सहा सेंटिमीटर लांब आणि दोन ते तीन सेंटिमीटर रूंद असतो. पानाला पोपटी लांब देठ असतात. देठापासून टोकापर्यंत शीर असते. मुख्य शिरेपासून एकाआड एक उपशिरा फुटत जातात. पानात उपशिरा एकमेकाला भेटतात आणि सुंदर जाळी बनवतात. पाने टोकदार आणि गुळगुळीत असतात. कोवळी पाने पोपटी असतात. ती जशी जुन होतात, तशी गडद हिरवीगार होत, झाडाचे सौंदर्य वाढवत जातात. सुरुवातीला खोड हिरवट पोपटी असते. झाड फुटभर उंचीचे होताच त्याला फांद्या फुटू लागतात. खोड थोडेसे मोठे होताच त्याचा रंग सुरुवातीस चॉकलेटी लाल, नंतर तपकिरी आणि शेवटी काळा होत जातो.

चंदनाच्या झाडाची साल जाड असते. ती बाहेरील बाजूस खडबडीत आणि काळी असते. खोलगट भागातील सालीचा तपकिरी किंवा चॉकलेटी रंग दिसतो. मात्र आतील बाजूस ती लाल असते. सालीच्या आतील लाकूड पांढरे शुभ्र असते. खोड सरळ वाढत जाते. खोडाची उंची जशी वाढत जाते, तशा खालच्या फांद्या वाळतात. जातात. झाड मुळातच दुसऱ्या झाडाच्या किंवा झुडपांच्या मुळावर उगवलेले असल्याने सुरुवातीला ते सावलीत असते. दुसऱ्या झाडाच्या मुळाच्या सहाय्याने चंदन पाणी आणि नायट्रोजनची आपली गरज भागवत जाते.

झाडाला सात वर्षांनंतर, सात-आठ फुट उंचीचे झाल्यावर, फुलोरा येतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला फांद्याच्या टोकाला पोपटी कळ्यांचे गुच्छ येतात. कळ्या सुरुवातीला हिरव्या असतात. त्यातून पांढरट हिरवी फुले फुलतात. पुढे ती लाल, तपकिरी, मरून किंवा चॉकलेटी रंगाची होतात. तशी ती दुरून अनाकर्षक दिसतात. मात्र त्यांच्या जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांचे खुललेले सौंदर्य पाहवयास मिळते. फुले साधारण पाच ते सहा मिलीमीटर आकाराची असतात. सुगंधी चंदनाची फुले मात्र बिनवासाची असतात. ती बाहेरून लक्षातही येत नाहीत. चंदनाच्या फुलांमध्ये चार, पाच किंवा सहा पाकळ्या असतात. पाकळ्यांची संख्या बदलली तरी पाकळ्यांच्या आतून येणारे पुंकेसर केवळ चारच असतात. त्यांच्या टोकाला परागकणांमुळे पिवळा रंग येतो. फुलाच्या मध्यभागी देठाजवळ बिजांडकोश असतो. तेथून एक नळी वरपर्यंत येते. फुलांवर मधमाशा आणि कीटक विशेषत: सकाळच्या प्रहरात येतात आणि पुष्परस घेत परागीभवनाची प्रक्रिया घडवून आणतात. फुलावर मधमाशा आणि इतर जंगली माशा प्रामुख्याने घोंघावत असतात.

पावसाळा संपत असताना फुलांचे रूपांतर फळात होते. हिरव्या रंगाच्या फळांचे गुच्छ फांद्यांच्या टोकाला शोभून दिसतात. फळे गोलाकार आणि जांभळासारखी दोन्ही बाजूला देठ असणारी असतात. काही झाडांची फळे दंडगोलाकारही असतात. फळांचा व्यास एक सेंटिमीटर असतो. मात्र सर्व फळातील बी गोलाकार असते. फळे पक्व होताना सुरुवातीला गुलाबी, लालसर होतात. फळाचे बाह्यावरण आणि बी यांच्यामध्ये पातळ गराचा थर असतो. फळ पिकताना तो गुलाबी होतो. फळांमध्ये एकच बी असते. बीदेखील गोल आणि गुळगुळीत असते. बीवर कडक पातळ आवरण असते. फळाच्या गराचा गुलाबी रंग लागून बीसुद्धा त्याच रंगाचे आहे असा भास होतो. मात्र बीवरील आवरण कठीण, पांढऱ्या रंगाचे असते. त्या आवरणाच्या आत मऊ स्निग्धांशाने पूर्ण असा गाभा असतो. फळाचा लाल रंग गडद होत शेवटी काळा बनतो. त्यावेळी अनेक फळे शंखाच्या आकाराची दिसतात. पक्व फळ पक्ष्यांचे आवडते खाद्य असते. फळे पिकू लागली की चंदनाच्या झाडावर कोकीळ पक्ष्यांची गर्दी होते. बुलबुल, मुनियासारखे पक्षीही फळे खाण्यासाठी हजेरी लावतात. हे पक्षीच चंदनाच्या झाडाच्या बिया सर्वत्र पसरवतात.  

झाड पंधरा वर्षांचे झाल्यानंतर खोडामध्ये सुगंधी गाभा तयार व्हायला सुरुवात होते. त्यावेळी खोडाचा व्यास वीस सेंटिमीटरपर्यंत वाढलेला असतो. गाभ्याची वाढ पूर्ण होण्यासाठी चाळीस वर्षांचा काळ जावा लागतो. त्यावेळी लाकडात पांढरा भाग कमी आणि पिवळा लालसर सुगंधी भाग जास्त तयार झालेला असतो. त्यापासून सुगंधी चंदन मिळते. या लाकडाचा उपयोग तेल मिळवण्यासाठी केला जातो. २०२० साली चंदनाच्या एक लिटर तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ही ३००० डॉलर होती. २००९ साली ऑस्ट्रेलियातून २०००० लिटर चंदन तेल निर्यात झाले. भारतीय चंदन तेलाचा दर्जा हा इतर कोणत्याही देशातील चंदन तेलापेक्षा चांगला असल्याने किंमत जास्त मिळते. चंदन तेलाचे प्रमुख खरेदीदार पाश्चात्य राष्ट्रे आहेत.

रोपवाटिकांमध्ये बियांपासून रोपे बनवतात. बियांपासून रोपे उगवतातही. मात्र ती परावलंबी असल्याने, इतर झाडाची मुळे नसल्यास मरतात. रोपाला जर इतर वनस्पतींच्या मुळांपासून पाणी आणि क्षार मिळाले, तरच ती जगतात. घाणेरी, पांढरफळी, बारतोंडी, निरगुडी, धावडा, कडुनिंब, शिरीष, सिसू, करंज या झाडांच्या मुळाशी चंदनाची झाडे चांगली वाढ पकडतात. गिरीपुष्पांच्या मुळावरही चंदनाची झाडे वाढतात, मात्र ग्लिरिसिडीयाच्या झाडावर पक्षी बसत नाहीत, घरटे बनवत नाहीत. त्यामुळे चंदनाच्या बिया या झाडांच्या मुळाशी पडत नाहीत. त्यामुळे ग्लिरिसिडीयाच्या जंगलामध्ये चंदनाची झाडे उगवलेली आढळत नाहीत. सुरू, मँजियम, डाळींब, सीताफळ, पेरू, करवंद यांच्या मुळांच्या सहाय्यानेही ही झाडे रूजतात आणि वाढतात. कृत्रिमरित्या चंदनाच्या रोपांची लागवड करताना प्रथम तुरीची लागवड केली जाते. तूर रोपे वाढली की त्याच्या बुंध्याजवळ चंदनाच्या रोपांची लागवड केली जाते. चंदनाची मुळे तुरीच्या मुळांशी भेटल्यानंतर तुरीच्या रोपांची उंची कमी केली जाते. चंदनाच्या रोपांना अन्न पुरवणारी झाडे आणि वनस्पतींना यजमान वनस्पती (होस्ट प्लँट) म्हणतात. विविध वनस्पतीतील जवळपास तीनशे वनस्पती चंदनाच्या रोपांचे आदरातिथ्य करण्यास तयार असतात. झाडांची पाने हिरवी असल्याने चंदनाची झाडे शर्करा स्वत:च बनवतात, मात्र पाणी आणि नत्रयुक्त घटक यजमान झाडाच्या मुळांपासून मिळवतात.  

   चंदनाचे झाड दीर्घायुषी आहे. ते शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ जगते. मात्र आपण त्याला जगू देत नाही. फार पूर्वी चंदनाच्या लाकडापासून मंदिरातील खांब, राजवाड्यातील बांधकामासाठी या लाकडाचा उपयोग केला जात असे. अगदी अलिकडच्या काळातील उदाहरण म्हणजे माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांच्या घराच्या बांधकामामध्ये चंदनाच्या लाकडाचा वापर करण्यात आला होता. चंदनाच्या लाकडाला कीड लागत नाही. लाकूड वजनाने जड असते. चीनमध्ये नेत्यांच्या दफन विधीसाठी चंदनाच्या पेट्या बनवल्या जात. भारतातही थोर व्यक्तींचे दहन करण्यासाठी चंदनाच्या लाकडाचा वापर केला जात असे. लाकूड मऊ आणि टिकाऊ असल्याने त्याचा फर्निचर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असे. या लाकडावर नक्षीकाम करणे सोपे जाते. चंदनाच्या लाकडाच्या वापरासंदर्भात ख्रिस्तपूर्व २००० पासून संदर्भ मिळतात. हिंदू, बौद्ध आणि मुस्लीम धर्मामध्ये चंदनाच्या झाडाला, लाकडाला आणि तेलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शंकराच्या मंदिरामध्ये सान आणि चंदनाचे लाकूड ठेवलेले असायचे. भक्त शंकराच्या दर्शनानंतर चंदन उगाळून गंधाचा तीन बोटांचा पट्टा माथी आवर्जून लावत असत. चंदन लेपामुळे शीतलता प्राप्त होते. त्वचा तुकतुकीत बनवण्यासाठी चंदन लाकडापासून बनवलेल्या पावडरीचा वापर करण्यात येतो. झाडाची साल काही लोक चावून खातात.

चंदनाच्या लाकडापासून काढलेले तेल औषधांमध्ये आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. चंदनाचे तेल आरोग्यवर्धक तेल आहे. त्वचा कोरडी पडणे, सुरकुत्या पडणे यावर उपचारासाठी चंदन तेलाचा उपयोग केला जातो. त्वचेवर असणारे मुरूम, काळे डाग, लालसरपणा, त्वचेची जळजळ यावर चंदन तेल उपयुक्त ठरते. केसांवरील उपचारासाठीही चंदनाचे तेल वापरले जाते. चंदन तेलाच्या वापरामुळे पांढऱ्या पेशींची वाढ चांगली होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वात, पित्त आणि शरीर संतुलनाचे कार्य चंदन तेल करते.   

झाडाच्या मुळापासूनही तेल मिळवले जाते. मात्र चंदनाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात चंदन तस्कर तोड करतात. ही मंडळी झाडाचे खोड वरूनच कापतात आणि मुळांचा वापर केला जात नाही. चंदनाच्या तेलामध्ये ३ ते ६ टक्के अल्फा आणि बीटा सँटालोल तेल असते. हे तेल सुगंध देण्याचे आणि शरीराला व मनाला थंड ठेवण्याचे कार्य करते. पचनसंस्था सुरळीत ठेवण्याचे कार्यही चंदन तेल करते. मूत्रविकार, आतड्यांमधील अनियमितता, वेदना, पचन विकारावरील उपचारामध्येही चंदनापासून बनवलेले औषध देण्यात येते. चंदनाच्या लाकडाचा गाभा, मुळे आणि फांद्यापासून तेल मिळवले जाते. सौंदर्य प्रसाधने, अत्तरामध्ये ते वापरले जाते. इतर तेलांमध्ये सहज मिसळून त्याला सुगंधी बनवते. कमी-जास्त प्रमाणात झाडाच्या सर्व भागात सुगंधी तेल असते. मात्र हे तेल उर्ध्वपातनाच्या माध्यमातून वेगळे केल्याखेरीज सुगंधाचा पूर्ण आनंद मिळत नाही. चांगल्या वाढलेल्या झाडाच्या गाभ्यात ४ ते ८ टक्के, पानामध्ये ४ टक्के, फांद्यामध्ये २ ते ४ टक्के आणि सालीमध्ये २ टक्के तेलाचा अंश असतो. उदबत्त्यांच्या वापरासाठीही चंदनाच्या तेलाचा वापर केला जातो. सालीमध्ये १२ ते १४ टक्के रंगद्रव्ये असतात. बियांपासून लालसर रंगाचे तेल मिळते. ते दिव्यासाठी वापरले जाते. तसेच रंग बनवण्यासाठीही बियांपासून बनवलेल्या तेलाचा वापर केला जातो.

चंदनाच्या झाडाची लागवड आणि कापणे हे शासन नियंत्रित आहे. मात्र चंदनाची झाडे आपोआप बांधावर उगवतात. त्याला जनावरे खात नाहीत. ते स्वत: वाढत जाते. त्याला वाढू द्यावे आणि नंतर ते कापण्यायोग्य झाल्यावर शासन मान्यतेने कापून वनखात्याला विकल्यास चांगला फायदा मिळू शकतो. मात्र चंदन तस्कर या झाडाला मोठे होऊ देत नाहीत. झाडाच्या खोडाची वाढ पंधरा ते वीस सेंटिमीटरची झाल्यानंतर ही मंडळी कधी त्याला चोरतील, याचा नेम नाही. मात्र हे झाड पक्ष्यांना आकर्षित करणारे आहे. याच्या पानापासून जमीन भुसभूशीत राहण्यास मदत होते. अर्धपरावलंबी असणारे झाड घेता, घेता द्यायला लागते. त्याच्या या गुणामुळेच त्याचा घात होत असला तरी आपण त्याला वाढवले पाहिजे. 

ll२ll

हजारो वर्षांपासून चंदनाच्या गुणांची माहिती लोकांना होती. अनेक संस्कृत ग्रंथांतील श्लोकांमध्ये आणि पुराणांमध्ये चंदनाचा उल्लेख आढळतो. चंदनाच्या झाडाला गंधासार आणि मलयज ही नावेही आहेत. चंदनाच्या झाडाची मालकी इंद्रदेवाची मानली जाते. समुद्र मंथनानंतर निघालेले हलाहल म्हणजेच विष महादेव शंकरांनी प्राशन केले. मात्र त्यानंतर त्यांच्या देहामध्ये दाह निर्माण झाला. तो दाह कमी करण्यासाठी त्यांना चंदनाचा लेप लावण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. म्हणूनच की काय प्रत्येक शिव मंदिरांमध्ये मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर सान आणि चंदन खोड ठेवलेले असायचे आणि शिवभक्त ते उगाळून मस्तकी चंदनाचा टिळा लावत. विठ्ठल भक्तही चंदनाचा ‘U’ आकाराचा टिळा आणि मध्ये एक गंधाचा ठिपका लावतात. काही मंडळी केवळ गंधाचा ठिपका लावतात. यामुळे मस्तक शांत राहते. नाकातून वाहणाऱ्या दोन नाड्यापैकी एक धन आणि दुसरी ऋण असते. धन नाडीतून श्वास वाहताना निर्माण होणारी उष्णता शोषण्यासाठी चंदनाचा टिळा उपयुक्त ठरतो. काही लोकांची अशी धारणा आहे की शरीरामध्ये सात चक्रे असतात. त्यातील महत्त्वाचे आज्ञाचक्र कपाळामध्ये असते. इडा, पिंगला आणि सुष्मना या तीन नाड्या एकत्र येऊन मिळण्याचे ठिकाण गुरू स्थान असते. योगामध्ये ध्यान तेथेच केंद्रित करण्यास सांगण्यात येते. तेथे टिळा लावल्याने स्वभावात सकारात्मक बदल घडून येतात, अशीही अनेकांची धारणा आहे. टिळा कोणत्या बोटाने लावावा, याबाबतही अनेक समज आहेत. मोक्षप्राप्तीसाठी अंगठ्याने टिळा लावावा, शत्रू विनाशासाठी तर्जनीने, धनप्राप्तीसाठी मध्यमाने आणि शांती प्राप्तीसाठी अनामिकेने टिळा लावावा. बहुतांश लोक टिळा अनामिकेने लावतात. टिळा लावणे, ही आर्य संस्कृतीची ओळख मानली जाते. टिळा लावल्याने निद्रानाश आणि ताण-तणावापासून मुक्ती मिळते.

बालाजी मंदिरामध्ये दरवाजाच्या उजव्या बाजूला एक छडी आहे. बालाजी लहान असताना त्यांना शिक्षा करण्यासाठी ती वापरली जात असे. या छडीमुळे त्यांच्या हनुवटीला जखम झाली. यामुळे बालाजीच्या हनुवटीला चंदन लेप लावला जातो. संत एकनाथ, तुकाराम महाराजांच्या काळापासून कपाळावर चंदनाचा टिळा लावणारी व्यक्ती सज्जन मानली जात असे. तशा आशयाच्या अनेक रचनाही मिळतात. अर्थात देवी-देवतांना चंदन उटी लावण्याचा प्रघात आहे. वारकरी संप्रदायामध्ये तर चंदन टिळा विशेष महत्त्वाचा मानला जातो.

चंदनाच्या सुगंधाचा आणि शीतलतेचा लाभ सर्पही घेतात, अशा आशयाचा एक संस्कृत श्लोक आहे. ‘अयि मलयज महिमाअयं कस्य गिरामस्तु विषयस्ते l उद्गिरतो यद गरलं फणिनं l पुष्पासि परिमल उद्गारै: ll’ अर्थात, ‘हे चंदनवृक्षा, तुझा महिमा वर्णन करायला कोणाची वाणी समर्थ ठरेल? कारण तू गरळ ओकणाऱ्या सर्पांचेही आपल्या गंधाच्या सहाय्याने पोषण करतोस’. वास्तविक चंदनाच्या झाडांजवळ साप येण्यामागे चंदनाचा सुगंध कारणीभूत नाही. चंदन झाडापासून मिळणारी शीतलता ही त्याच्या मुळांशी चंदनाच्या सहवासात असणाऱ्या मातीतूनही मिळते. चंदन झाडांजवळ सर्प असतात आणि ते त्याच्या गंधामुळे चंदनाजवळ येतात, असा समज असावा. मात्र ते केवळ मातीतून येणाऱ्या शितलतेमुळे येतात.

चंदन आणि त्याच्या गुणधर्माबाबत अनेक बोधकथा सांगण्यात येतात. नेहमी चांगला विचार करावा, याबाबत एक सुंदर बोधकथा आहे. फार-फार वर्षांपूर्वी राजा भोज बाजारात फिरत होता. त्यावेळी त्याने एका व्यापाऱ्यास पाहिले आणि का कोण जाणे, भोज राजाला त्या व्यापाऱ्याला फाशी द्यावे, असे वाटले. त्यांने आपल्या प्रधानाला जवळ बोलावले आणि नंतर बाजारात येऊन त्या व्यापाऱ्याची माहिती काढायला सांगितले. दुसऱ्या दिवशी प्रधान वेश बदलून त्या बाजारात गेला. त्या व्यापाऱ्याची इतर दुकानदारांकडून माहिती काढली. तो लाकडाचा व्यापारी होता. नंतर प्रधान त्या दुकानदाराकडे गेला. त्या दुकानदाराला उत्तम आणि वेगळे लाकूड दाखवायला सांगितले. व्यापाऱ्यांने त्याला चंदनाचे सुगंधी लाकूड दाखवले. ते सुगंधी लाकूड पाहून प्रधान खूश झाला. व्यापाऱ्याला त्याची किंमत देऊन चंदनाचे ते सुगंधी लाकूड कापडात गुंडाळून प्रधान दरबारात गेला. राजाला ते लाकूड दाखवले. राजा भोज ते सुगंधी चंदन पाहून खूश झाला. त्या दिवसांपासून राजा भोज भेटायला येणाऱ्या मान्यवरांना भेट देण्यासाठी त्या व्यापाऱ्याकडून चंदनाचे लाकूड खरेदी करू लागला. व्यापाऱ्याच्या धंद्यामध्ये मोठी वाढ झाली. ज्याला फाशी द्यावे, असे वाटत होते, तो व्यापारी आता राजाला आवडू लागला. पूर्वी त्या व्यापाऱ्याने मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड खरेदी करून ठेवले होते. त्यामध्ये व्यापाऱ्याची मोठी गुंतवणूक झाली होती. लोक यायचे, त्याचा वास घ्यायचे आणि किंमतही न विचारता जायचे. चंदनाच्या लाकडात पैसे अडकून पडल्याने व्यापाऱ्यास वाटायचे की ‘राजा मरावा. राजा मेला तर त्याला जाळण्यासाठी हे चंदनाचे किंमती लाकूड खरेदी केले जाईल आणि आपले पैसे सुटतील’. व्यापाऱ्याच्या मनात राजा भोजबद्दल असे वाईट विचार सुरू असताना, राजाने त्याला पाहिले होते. व्यापाऱ्याच्या मनातील विचार राजापर्यंत पोहोचले आणि त्यामुळे त्याच्या मनात व्यापाऱ्याबद्दल नकारात्मक भावना तयार होऊन, त्या व्यापाऱ्याला फाशी द्यावी, असा विचार आला होता. आता राजाच ती लाकडे खरेदी करू लागला आणि धंदा जोरात चालला. त्यामुळे व्यापाऱ्याला राजा कधीच मरू नये, असे वाटू लागले. आपण जो दुसऱ्याबद्दल नकारात्मक विचार करत असतो, तो न बोलताही समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल नकारात्मक भाव तयार करतो, हे सांगणारी ही बोधकथा! म्हणून कोणालाही भेटताना सकारात्मक विचाराने भेटावे.

आणखी एक बोधकथा ‘ज्ञान हेच चंदन’ असे सांगणारी. एक लाकूडतोड्या रोज जंगलाकडे जायचा. जंगलाच्या कडेची झाडे तोडून लाकडाची मोळी बांधून शहरात न्यायचा. ती लाकडे विकून आलेल्या पैशात घर चालवायचा. त्या जंगलात एक साधू तपश्चर्या करत होता. तो हे दररोज पाहात असे. एक दिवस साधूने लाकूडतोड्याला बोलावले आणि म्हणाला, ‘अरे, जंगलाच्या आत जरा जा. आत चंदनाची झाडे आहेत. त्याचे लाकूड कापून विकलेस, तर तुला आठवड्यातून एकदाच यावे लागेल’. लाकूडतोड्याला वाटायचे की आपल्याइतकी जंगलाची माहिती कोणालाच नाही. आपल्या सात पिढ्या हा धंदा करतात आणि आपल्याला हा काय सांगतो. काही दिवस, साधूचे न ऐकता, लाकूडतोड्या पूर्वीप्रमाणेच काम करत राहिला. मात्र एक दिवस त्याच्या मनात आले, ‘हा साधू मला खोटे कशाला सांगेल. खरंच आत जाऊन पाहू या.’ लाकूडतोड्या जंगलाच्या आत गेला. तेथे त्याला सुगंधी चंदनाची झाडे आढळली. त्याने चंदनाची लाकूड कापले. तो ते घेऊन गेला आणि चंदनाचे लाकूड विकून त्याला आठ दिवस पुरतील इतके पैसे मिळाले. आता तो चंदनाचे लाकूड तोडून विकू लागला. काही दिवस गेल्यानंतर पुन्हा साधूने त्याला बोलावले आणि म्हणाला, ‘अरे, चंदनाची लाकडे काय विकतोस. आणखी जरा पुढे जा. आत चांदीची खाण आहे. एकदा घेऊन गेलास, तर दोन-तीन महिन्याची कमाई होईल’. लाकूडतोड्या जंगलामध्ये आणखी आत गेला आणि त्याला चांदीची खाण मिळाली. तो आता चांदी विकून घर चालवू लागला. काही दिवस गेल्यानंतर पुन्हा साधूने त्याला बोलावले आणि सांगितले, ‘अरे, जरा आणखी आत जा. सोन्याची खाण भेटेल. एकदा सोने नेऊन विकलेस, तर तुला सहा महिने पुरतील एवढे पैसे मिळतील.’ लाकूडतोड्या आणखी जंगलात गेला आणि त्याला सोन्याची खाण भेटली. लाकूडतोड्याचा आता साधूवर विश्वास बसला होता. तरीही काही दिवस गेले आणि पुन्हा साधूने सांगितले, ‘अरे, किती दिवस सोने विकत बसणार आहेस. जरा आणखी पुढे जा. तुला हिऱ्याची खाण भेटेल. जी तुला एका भेटीत वर्ष-दोन वर्षे पुरतील एवढे पैसे देईल.’ लाकूडतोड्याला आता राहवले नाही. त्याने साधूला विचारले, ‘हिऱ्याच्या खाणीपुढे काय आहे?’ साधू उत्तरला, ‘त्याच्यापुढे मी आहे. माझी साधना आहे. मूर्खा, तुझ्या लक्षात कसे आले नाही, पुढे काय आहे, ते सर्व मला माहीत असूनही मी येथे साधना करत आहे. हे जे मी करतो, यातून मला ज्ञान मिळते आणि ते सर्वात किंमती आहे. हिरे, सोने चांदी यापेक्षा कितीतरी जास्त. चंदन जळाल्यानंतर जसा त्याचा सुगंध दरवळतो, तसा ज्ञानाचा सुगंध माणूस मेल्यानंतरही दरवळत राहतो.’ लाकूडतोड्याने साधूचे बोलणे ऐकल्यानंतर, संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि तो साधूसमवेत तपस्या करू लागला.

चंदनाच्या झाडावर आधारित ‘सुसंगतीचे महत्त्व’ सांगणारी आणखी एक बोधकथा आहे. एका गावात हकीम लुकमन राहात असे. लोकांना मदत करणारा अशी त्याची ख्याती होती. त्याला एक मुलगा होता. एक दिवस त्याने आपल्या मुलाला बोलावले आणि चंदन आणि कोळसा आणावयास सांगितले. मुलगा स्वंयपाकगृहात गेला. एका हातात चुलीतील कोळसा घेतला. चंदनाचा तुकडा दुसऱ्या हातात घेतला आणि तो वडिलांजवळ आला. लुकमननी त्याला ते दोन्ही तुकडे फेकावयास सांगितले. वडिलांची आज्ञा पाळत मुलांने ते दोन्ही तुकडे फेकले आणि हात धुण्यासाठी चालला. लुकमननी त्याला थांबवले. दोन्ही हात पुढे करावयास सांगितले. ज्या हातात मुलाने कोळसा घेतलेला होता, तो हात काळा झाला होता. तर चंदनाचा हात तसाच स्वच्छ होता. लुकमन मुलाला म्हणाले, ‘मुला, बघ ज्या हातात कोळसा घेतला होतास, तो हात कोळसा फेकूनही काळा राहिला आहे. वाईट लोकांची संगतही तशीच असते. त्यांची संगत सोडली तरी त्यांचे वाईट गुण आपल्यासोबत राहतात. चंदनाने मात्र कोणतीच घाण मागे ठेवलेली नाही, मात्र तुझ्या हातासोबत छान सुगंध मागे ठेवला आहे. चंदनाची संगत म्हणजे सद्गृहस्थांची संगत. जी सुटली तरी त्यांच्या चांगल्या विचारांचा सुगंध आयुष्यभर दरवळत असतो. म्हणून नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत असावे.’  

वेळीच एखादी गोष्ट समजून घेणे किती महत्त्वाचे आहे, हे समजावून सांगण्याऱ्या बोधकथेतही चंदन आहेच. एक राजा शिकारीला गेला होता. शिकारीच्या शोधात जंगलाच्या आत गेला आणि रात्र झाली. त्याला भूकही खूप लागली होती. तरीही तो चालत राहिला. त्याला एक झोपडी दिसली. त्याने त्या झोपडीत आसरा मागितला. त्यांनी राजाला वाटसरू समजून त्याचे आदरातिथ्य केले. दुसऱ्या दिवशी निघताना राजाने आपली खरी ओळख सांगितली आणि त्यांच्या चांगल्या वर्तनाबद्दल एक चंदनाचे वन बक्षीस म्हणून दिले. त्या गरीब माणसाला चंदनाचे महत्त्व माहीत नव्हते. तो रोज चंदनाची काही झाडे कापत असे आणि त्याचा कोळसा बनवून गावात नेऊन विकत असे. काहीच दिवसात बरीच चंदनाची झाडे कापली गेली. आता थोडीच झाडे शिल्लक राहिली होती. ही झाडेदेखील संपली, तर आपले कसे होणार, असा प्रश्न त्या कुटुंबासमोर होता. एक दिवस झाड कापल्यानंतर कोळसा बनवण्यासाठी भट्टी लावणार तेवढ्यात मोठा पाऊस आला. कोळसा बनू शकला नाही. पैसे तर हवे होते. त्यांनी ती लाकडे तशीच विकायला नेली. बाजारात गेल्यानंतर त्या लाकडांचा वास एका ग्राहकाने ओळखला. त्याचे मूल्य विचारले. त्यांनी ‘द्या काय द्यायचे ते’, असे सांगितले. ग्राहकांने त्याला कोळशाच्या किंमतीपेक्षा कितीतरी जास्त पैसे दिले. लाकडे विकणाऱ्याने, ‘याचे मूल्य एवढे असण्याचे काय’ असे त्या गिऱ्हाईकाला विचारले. तेव्हा त्यांने, ‘ही चंदनाची लाकडे आहेत. खूप किमती आहेत. जर तुमच्याकडे अशी आणखी लाकडे असतील, तर आम्ही मोठी किंमत देऊन खरेदी करू’, असे सांगितले. जंगलातील त्या गृहस्थाला आता राजाने दिलेल्या भेटीचे मूल्य लक्षात आले. इतके किंमती चंदन आपण कोळसा करून कवडीमोल भावाने विकत होतो, हे लक्षात आले. मात्र आता फार कमी झाडे राहिली होती. ती लाकडे त्यांनी काळजीपूर्वक वापरली. अनेक लोकांचे असेच असते. आयुष्यातील बहुमोल वेळेचे महत्त्व खूप उशिरा लक्षात येते. आयुष्यभर किंमती वेळ असाच वाया घालवतात आणि पुढे उर्वरित आयुष्यात पश्चाताप करत बसतात. म्हणून वेळीच सावध होऊन वेळेचे महत्त्व ओळखून जगायला हवे. 

नीतीला नियती साथ देते, याबाबतची बोधकथाही चंदनाभोवती गुंफली आहे. फार फार वर्षांपूर्वी, एक शेतकरी बायकोसह सुखाने राहात होता. त्याला दोन गोड मुले होती. त्याच्या शेतात तो आणि त्याची बायको राबत होते. त्यांच्या मेहनतीमुळे शेती चांगली पिकत होती. त्यातून त्याने चांगले घर बांधले. त्याने मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांचा सुखाचा संसार चालला असताना शेतकऱ्याचे निधन झाले. त्यावेळी मोठा मुलगा सोळा वर्षाचा आणि धाकटा चौदा वर्षांचा होता. मोठ्या मुलाने मोठ्या मनाने आपले शिक्षण थांबवले आणि वडिलांप्रमाणे शेती करू लागला. त्यानेही शेती मनापासून कसायला सुरुवात केली. धाकट्याला तो पैसे पाठवत राहिला. धाकटा भाऊ मात्र शहरातील वातावरणात आपण शिक्षण घेण्यासाठी आलो, हे विसरून वाईट लोकांच्या नादाला लागला. त्याने व्यसने करायला सुरुवात केली. तो भावाला विविध कारणे सांगून पैसे पाठवायला लावत असे. थोरलाही पैसे पाठवत असे. अखेर त्याचे एका मुलीवर प्रेम जडले. त्याचे पैसे उधळणे पाहूनच ती त्याच्या प्रेमात पडली होती. तिने त्याला भडकावण्यास सुरुवात केली. शेवटी तिच्या हट्टाप्रमाणे तो गावी आला. भावाबरोबर भांडण काढले. शेतीची वाटणी करायला लावली. वहिवाटीखालील जमीन स्वत:कडे घेतली. राहत्या घरातून थोरल्या भावाला आणि वहिनीला त्याने बेघर केले. मोठ्या भावाला पडीक जमीन दिली. त्या जमिनीत खोपट बांधून थोरला भाऊ राहू लागला. हळूहळू त्याने ती जमीन वहिवाटीखाली आणायचा प्रयत्न सुरू केला. त्या शेतात एक विहीर होती. तिला पाणी नव्हते. त्या विहिरीत त्याने डोकावून पाहिले, तर एक चंदनाचे झाड दिसले. तो विहिरीत उतरला. त्या झाडाच्या फांद्या खूप मोठ्या होत्या. त्यातील काही लाकूड त्याने कापले आणि शहरात नेऊन विकले. त्या लाकडाचे त्याला चांगले पैसे मिळाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने झाडाकडे पाहिले तर फांद्या पुर्ववत होत्या. त्यांने पुन्हा त्या फांद्या कापल्या. नेऊन विकल्या. पैसे मिळाले. लाकूड कापून विकायचे, पैसे आणायचे आणि त्यासोबत शेती वाहीत करायचे, त्याचे काम अव्याहत सुरू राहिले. यातून त्याला चांगले पैसे मिळाले. लवकरच त्यांने चांगले घर बांधले. शेतात दुसरीकडे विहीर घेतली. तिला पाणी लागले. त्याचे शेत चांगले पिकू लागले. दुसरीकडे धाकटा, आहे त्या पैशांवर चैन करत राहिला. त्याच्याकडे असणारे पैसे संपत गेले. शेतामध्ये तो कष्ट करत नव्हता. शेतीत उत्पादन निघत नव्हते. आपण पुन्हा गरीब झालो आणि आपला भाऊ श्रीमंत झाला, हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. भाऊ श्रीमंत कसा झाला, याची त्याने माहिती काढली. ते ऐकून पुन्हा त्याच्या मनात वाईट विचार आला. तो मोठ्या भावाकडे गेला आणि वाटण्या बदलून मागितल्या. मोठ्या भावाने मोठ्या मनाने तेही स्विकारले. आता धाकटा नव्या शेताचा मालक झाला. त्याचा विहिरीतील चंदन तोडून कापायचा विचार होता. तो जुन्या विहिरीकडे गेला. विहिरीत पाहिले, तर तेथे चंदनाचे झाड नव्हते. नीतीने वागले तरच नियती साथ देते, हेच खरे!

याखेरीज चंदन झाडाचा वापर करून अनेक बोधकथा आहेत. चंदनावर इतरही मोठ्या प्रमाणात साहित्य लिहिले गेले आहे. ‘चंदनाची झाडे’ नावाचे प्रफुल्ल देसाई यांनी लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध आहे. साताऱ्याच्या जवळ २४ किलोमीटरवर चंदन-वंदन किल्ले आहेत. चंदनपूर, चंदनगाव अशी गावांची नावेही आहेत.

ll३ll

चंदनाच्या झाडांचा आणि गुणांचा वापर अनेक काव्यात झालेला आहे. संस्कृत साहित्यात तर चंदनाचा उल्लेख आहेच, पण चंदनाच्या झाडाचा उपयोग लोकसाहित्यातही खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. चंदनाचे झाड सर्वांच्या मनात वसलेले आहे, त्यामुळेच ते सहजपणे महिलांच्या ओव्यांमध्ये आले. कृष्णा इंगोले यांच्या ‘लोकसंस्कृतीतील स्त्रीरूपे’ या पुस्तकामध्ये काही उल्लेख आढळतात. तारूण्याचे भान आलेल्या युवतीला मुलांचे आकर्षण वाटू लागते. यासंदर्भात ‘तिचा चंदन मव्हरला’ हे एक प्रकरण आहे. ‘चंदन मव्हरणे’ हे शब्दप्रयोजन खूप विचारांती झाले आहे. चंदनाच्या झाडाला कळ्या येतात, झाड मोहोरते: मात्र चंदनाचे झाड फुललेले काळजीपूर्वक पाहिल्याशिवाय लक्षात येत नाही. नवतरूणींचे तसेच काहीसे असते. मनात मुलांबद्दल ओढ निर्माण झालेली असते; मात्र ती दाखवली जात नाही. बारकाईने त्यांचे वागणे टिपणाऱ्यांच्या लक्षात ते येते. त्यामध्ये जवळ असलेल्या विहिरीवरून पाणी आणण्याऐवजी, मुलांचा वावर असलेल्या बारवेवरून पाणी आणायला गेलेल्या मुलीचे वर्णन, ‘पाण्याला गेली गोरी l हिर सोडून बारवला ll तिचा चंदन मव्हरला ll’ असे येते. गरोदर महिलेला लागलेले डोहाळे पुरवण्याची पद्धत आहे. त्यासाठी डोहाळ्याची गाणी रचण्यात आलेली आहेत. यामध्ये दुसऱ्या महिन्यात सासरे, सूनेला विचारतात, ‘दुसऱ्या मासी सासऱ्याची पुस l सून तुमचं डव्हाळं कसं ll’ सूनबाईला चंदनाच्या सुगंधी लाकडाच्या आसरा हवा आहे. त्या सांगतात, ‘पुरवावे डव्हाळं सासरा l चंदन तोडून बांधावा आसरा ll’ लग्न होईपर्यंत आई-वडिलांशी प्रसंगी भांडणारी हट्ट करणाऱ्या, रूसणाऱ्या, भांडणाऱ्या मुलीला नांदायला गेल्यानंतर आईवडिलांचे प्रेम समजते. ती म्हणते, ‘बाबा माझा चंदन l आई माझी वडफांदी ll जलम माझा झाला l दोघांच्या कडेखांदी ll’ त्यावेळी न समजलेले वडिलांचे प्रेम सासरी नांदताना तिला कळते आणि ती म्हणते, ‘वाटंवरला वड l पानं त्याची किती रूंद ll नाना माझ्या वडिलांची l गार सावली करवंद ll तोडला चंदन l सुटला दरवळ मातीचा ll चंदन माझा नाना l खरा चंदन जातीचा ll’ सुखाने चाललेल्या संसारात कशाची कमी नव्हती. मात्र त्याच्याभोवती गावातील लोक गोळा झाले आणि तो व्यसनाच्या आहारी गेला, याचे वर्णन करताना ती म्हणते, ‘तोडला चंदन l टाकला गराडा ll पुरुष नाही धड l झाली नारीचा पवाडा ll’  

महिलांच्या ओव्यामध्ये स्थान मिळालेल्या चंदनाचा संतसाहित्यापासून नवोदित कवीपर्यंत सर्वत्र  उल्लेख आला आहे. संतसाहित्यामध्ये चंदनाच्या गुणावर जास्त रचना आढळतात. त्याचबरोबर चंदनाची उटी लावलेल्या आपल्या आराध्याच्या गुणांचे वर्णन आढळते. संतांनी सज्जनाला चंदनाची उपमा दिली आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांच्या काव्यात चंदन अनेक ठिकाणी भेटतो. चंदन लेपामुळे सुंदर दिसणाऱ्या देवाचे वर्णन करताना संत तुकाराम म्हणतात, ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळाl रविशशिकळा लापलिया ll कस्तुरीमळवट चंदनाची उटी l रुळे माळ कंठी वैजयंती ll’ तुकारामांच्या आणखी एका अभंगामध्ये ‘गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा l हार मिरवती गळा ll टाळ मृदंग पुष्पवरूषाव l अनुपम्य सुखसोहळा रे ll’ असे वर्णन आढळते. ‘पंढरी चोहटा मोडियला खेळ’ या रचनेतही संत तुकाराम, विठ्ठल भक्तीमध्ये रंगलेल्या भक्तांचे वर्णन करताना म्हणतात, ‘भक्तांची भुषणें मुद्रा आभरणे l शोभती चंदनाच्या उट्या रे ll सत्व सुंदर कास घालूनि कुसरी l गर्जती नाम बोभाटी रे ll’   

‘अंगी चंदनाची उटी l माथां शोभे मयोरवेटी ll१ll शंख चक्र पद्म करीं l उभा विटेवरी श्रीहरी ll२ll’, ‘चतुर्भुज शामसुंदर l गळां शोभे गुंजांचे हार ll निडळी चंदन शोभे परिकर l मिरवे नंदरायाचा किशोर ll१ll’,  ‘सांडुनि रत्नकिळा गळां तुळसीमाळा l चंदनाचा टिळा केशरयुक्त ll४ll’, ‘वैजयंती माळा तुळशीहार मिरवला l निढळी शोभला चंदन वो माय ll३ll, ‘चंदनाची शोभे उटी l वैजयंती कंठी मिरवत ll’ या शब्दांमध्ये एकनाथानी विठ्ठलाचे वर्णन केले आहे. काही अभंगामध्ये विठ्ठल आणि रूक्मिणी यांचे एकत्र वर्णन आढळून येते. ‘न माये त्रैलोकी तो उभा विटी l दोन्ही कर समपदे ठेवुनी कटी l सर्वांगी चंदन कस्तुरी उटी l वामभागी रूक्मिणी गोमटी गे माय ll’ किंवा ‘केशर कस्तुरी चंदन टिळा l कांसे शोभें सोनसळी ll३ll वामांगी शोभे रुक्मिणी l शरण एका जर्नादनी ll४ll’, तसेच ‘राही रखुमाई शोभती वामभागी l शोभे उटी सर्वांगी चंदनाची ll’, या शब्दांमध्ये एकनाथ विठ्ठल-रूक्मिणीचे वर्णन करतात. आणखी एका रचनेमध्ये एकनाथ श्रीकृष्णाचे वर्णन करताना लिहितात, ‘वेधक वेधक नंदनंदनु l लाविला अंगीं चंदनु l पुराणपुरुष पंचाननु l सावळां कृष्ण ll२ll’.

याखेरीज संत तुकाराम आणि संत एकनाथ यांनी अन्य विषयांवरील अभंगातही चंदनाचा, चंदनाच्या झिजण्याचा आणि सुगंधाचा उपयोग केला आहे. मनापासून कोणतेही कार्य केले नाही, तर त्याला कोणताही अर्थ नाही, हे सांगताना तुकाराम म्हणतात, ‘नाना परिमळद्रव्य उपचार l अंगी उटी सारचंदनाची ll४ll जेविलियाविण शून्य ते शृंगार l तैसी गोडी हरिकथेविण ll५ll’. मनी वसे ते स्वप्नी दिसे अशा आशयाच्या अभंगात ‘न लगे चंदना सांगावा परिमळ l वनस्पतीमेळ हाकारूनी ll१ll अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी l धरितां ही परी आवरे ना ll’. सज्जनाचे गुण सांगताना ‘चंदनाचे हात पाय ही चंदन l परिसा नाहीं हीन कोणी अंग ll दीपा नाही पाठी पोटी अंधकार l सर्वांगे साकर अवघी गोड ll’ असे वर्णन करतात. नको त्या गोष्टीचा अभिमान बाळगणे गैर आहे, हे ‘चंदनाचा शूळ सोनियाची बेडी l सुख नेदी फोडी प्राण नाशी ll’ या शब्दांतून समजावून सांगतात.

संत एकनाथ भक्त आणि अभक्तातील भेद ‘चंदन वेळू नोहे समान’ असा सांगतात. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला, हीच गोष्ट सांगताना एकनाथ महाराज लिहितात, ‘सर्वांगी सुवास परि तो उगला न राहे l सभोवती तरू चंदन करीतचि जाये l’. शंकराच्या पूजेमध्ये चंदनाचा वापर करण्यात येतो. त्याचे वर्णन एकनाथानी केले आहे. शिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी करावी हे सांगताना एकनाथ सांगतात, ‘एक बिल्वदळ चंदन अक्षता l पूजन तत्वतां सोपें बहु ll’ एकनाथानी दत्तात्र्ययांवरही रचना केल्या आहेत. दत्तपूजेबाबत ‘सुबुद्धी सुगंध चंदन l केलें दत्तात्र्यया अर्पण ll शांती क्षमा अक्षता l तिलक रेखिला तत्वतां ll’ असे वर्णन एकनाथ करतात. मूर्खापुढे शहाणपण सांगून काही उपयोग नसतो. हे एकनाथ ‘अंधापुढे दीप खरासी चंदन l सरकार दूधपान करूं नये ll’ किंवा ‘गर्दभाचे अंगी चंदनाची उटी l व्यर्थ शीण पोटीं लावूनिया ll’ या शब्दातून समजावतात. चंदनासोबत हे संत इतके एकरूप झाले आहेत की ज्याच्या कपाळी चंदनाची उटी असेल तो सज्जन असतो, असा एकनाथांना ठाम विश्वास आहे.  ते अशा मानवाला या जगीचा देव मानतात. ‘असे गोपीचंदन उटाई जयाचिया अंगी l प्रत्यक्ष देव जगें तोचिं धन्य ll’ असे ते या रचनेत म्हणतात. योग्याचे जीवन कसे असावे, हे लिहिताना एकनाथ महाराज ‘एकनाथी भागवता’मध्ये ‘वस्त्र चंदन वनिता माळा l सदा भोगितां विषयसोहळा l वायुनातळे जेवीं जाळा l तेवीं योगी वेगळा विषयांसी ll’ असे सांगतात. अर्थात वस्त्र, चंदन, स्त्री किंवा सुगंधी पुष्पांच्या माळा इत्यादी विलासांचा उपभोग घेत असला तरी वायु जसा जाळ्यांत अडकत नाही, त्या प्रमाणेच योगीसुद्धा विषयापासून अलिप्त असतो. तसेच एखादी वाईट गोष्ट सर्व काही आपल्यासारखे करून टाकते हे सांगताना एकनाथ लिहितात, ‘चंदन सुवासे दुर्गंध धुरे l निंब कडू ऊस गोडिेरे l ते जाळुनि आकारविकारें l कीजे वैश्वानरें आपणाऐसीं ll’ अर्थात सुगंधी चंदन काष्ठ असो किंवा दुर्गंधीयुक्त दुसरे लाकूड असो, कडुनिंबाचे लाकूड असो किंवा गोड ऊसाचे चिपाड, या सर्वांना जाळून अग्नी त्या सर्वांना आपल्यासारखे करून टाकतो.

संत निळोबाराय यांनीही आपल्या रचनांतून चंदनाचा उपयोग केला आहे. संत चोखामेळा यांनीही ‘चंदनाच्या संगे बोरिया बाभळी, हेकळी टाकळी चंदनची, संताचिया संगे अभाविक जन, तयाच्या दर्शने तेची होती, चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा, नाही तरी भार वहावा खरा ऐसा’ या रचनेतून संगतगुणांने सज्जनाच्या संगतीत सज्जन घडतात हे नेमकेपणाने सांगितले आहे. अगदी विठ्ठलाचा पाळणाही चंदनाच्या उल्लेखानेच सुरू होतो. ‘पहिल्या दिवशी आनंद झाला l टाळ मृदुंगाचा गजर केला ll चंदन बुक्क्याचा सुवास त्याला l पंढरपुरात रहिवास केला llधृll जो बाळा, जो जो रे जो…’ यातून पंढरी आणि वारी डोळ्यासमोर आल्याशिवाय राहात नाही. संत जनाबाईंच्या रचनांमध्ये सज्जन घरी आल्यानंतर पूजा कशी केली जाते याचे वर्णन ‘शुद्ध सुमन सेजे नीरा l वालिताती विंझणवारा ll सुगंध चंदन चर्चिती l नानापरींच्या उट्या देती ll’ असे केले आहे. जनाबाईना एवढेच नाही तर मलयगिरी पर्वतरांगातील चंदन हे उच्च दर्जाचे असल्याचे माहीत असावे. त्या आपल्या रचनेत म्हणतात, ‘विठोबा तुझी संगत बरी l जैसा चंदन मैलागिरी ll’ 

संत ज्ञानेश्वरांच्या रचनांतून तर चंदन सर्वत्र भेटतो. ज्ञानेश्वरींमध्ये अठ्ठावीस ओव्यांमध्ये चंदनाचा उल्लेख सापडतो. इतर संताप्रमाणेच चंदन, चंदनाचे झिजणे, त्याचा परिमळ या सर्व गुणांचा उल्लेख आढळतो. संत ज्ञानेश्वरांनी विराणी किंवा विरहिणी प्रकारची काव्येही रचली आहेत. श्रीकृष्ण किंवा विठ्ठलाला आपला प्रियकर मानत, अर्थात स्वत:ला त्याची प्रेयसी, अशी कल्पना करून या रचना करण्यात आल्या आहेत. यातील ‘कृष्णाविण जीवनाचे शून्यत्व’ या विरहिणीमध्ये ‘कृष्णे वेधली विरहिणी बोले l चंद्रमा करीतो उबारा गे माये l न लावा चंदनु न घाला विंजणवारा l हरिविणे शून्य शेजारूगे माये ll’ अशा भावना व्यक्त करतात. विठ्ठलाच्या प्रेमामध्ये ज्ञानेश्वर किती आकंठ बुडाले होते ते ‘विरहाग्नीचा दाह’ या विरहिणीमध्ये पाहावयास मिळते. या विरहिणीमध्ये ज्ञानेश्वरांनी ‘चंदनाची चोळी’ ही संकल्पना मांडली आहे. विठ्ठलाच्या परमेश्वराच्या भेटीसाठी किती आसुसलेले आहेत ते सांगितले आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘घनु वाजे घुणघुणा’ ही विरहिणी अनेकांच्या स्मरणात असेल. ‘चंदनाची चोळी l माझे सर्व अंग पोळी l कान्हो वनमाळी l वेगीं भेटवा गा ll’ या शब्दात आपल्या विरहाग्नीचे वर्णन केले आहे. ही संकल्पना पुढे शृंगार रसासाठी जगदीश खेबुडकरांनी वापरली आणि ती लावणीही लोकप्रिय ठरली आहे. खेबुडकर लिहितात, ‘उरी आग पेटली विरहाची, लावला लेप चंदनी, राग रूसवा सोडा, सोडा अबोला धनी, चांदण असून कशी रात काळी काळी, चंदनाची चोळी, माझं अंग अंग जाळी’. ज्ञानेश्वर भक्तीरसामध्ये विठ्ठलाच्या भेटीसाठी अधीर झालेले आहेत, तर खेबूडकरांची प्रिया, प्रियकराच्या अबोल्याने विरहात जळते आहे. दोन्ही कवनामध्ये भेटीची ओढ आहे आणि ती चंदनाच्या शीतलतेनेही शांत होत नाही, अशा भावना आल्या आहेत.

आणखी चंदनाचा उल्लेख असलेले एक भक्तीगीत आणि एक प्रेमगीत खूप लोकप्रिय आहे. देवघर चित्रपटामध्ये जगदीश खेबूडकर यांचे सुधीर फडके यांच्या आवाजातील ‘चंदनाच्या देव्हाऱ्यात उभा पांडुरंग, मुकेपणा आज माझा आळवी अभंग’ हे गाणे चांगलेच गाजले. तर दादा कोंडके यांच्या ‘तुमचं आमचं जमलं’ या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि महेंद्रकुमार यांच्या स्वरसाजाने सजलेले ‘चंदनाच्या पाटावर, सोन्याच्या ताटामंदी, मोत्याचा घास तुला भरविते’ हे गाणेही लोकप्रिय ठरले.

चंदन आणि कविता हे नाते आजच्या कवींशीही जोडले गेलेले आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी पृथ्वी वृत्तामध्ये अन्योक्ती लिहिली आहे. चंदनाविषयी ते लिहितात,

वनी विलसती बहू विविध वृक्ष चोहींकडे,

तयात मज चंदनासम न एकही सापडे,

जयास न दिली फळें, न कुसुमही दैवें जरी,

शरीर झिजवूनि जो तरि परोपकार करी’

कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी चंदनाच्या झिजण्याच्या गुणाचे या काव्यात कौतुक केले आहे. बाभळीसारखे बिनकामाचे झाड असे म्हटलेले नाही. या रचनेत कृष्णशास्त्री म्हणतात, चंदनाला फुले आणि फळे नसतात. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. चंदनाला फुले असतात आणि ती सुंदर असतात. ही फुले रंग बदलत जातात. ती फुले लहान असल्याने सहज लक्षात येत नाहीत. चंदनाला फळेही असतात. ती मोठ्या प्रमाणात खाल्ली जात नाहीत. मात्र लहान मुले चंदनाच्या बिया फोडून त्यातील गर खातात. 

बी. रघुनाथ यांनी आपल्या कवितेमध्ये ‘चंदनाचा विठोबा’ कल्पिला आहे.

‘चंदनाच्या विठोबाची,

माय गावा गेली,

पंढरी या ओसरीची

आज ओस झाली’

असे अत्यंत मर्मस्पर्शी वर्णन केले आहे. पुढे आई घरात नसेल, तर काय परिस्थिती ओढवते याचे वर्णन केले आहे. कृष्ण बलवंत तथा कृ.ब. निकुंबाची ‘चंदन’ ही कविता आहे. ही कविताही वडिलांवर आहे, असे ‘माझे सुख, माझी तृप्ति, हीच देवपूजा त्याची’ या ओळीवरून दिसते. चंदनाचा झिजण्याचा गुण आणि वडिलांचे सर्वांसाठी राबणे याचे सुंदर वर्णन त्यांनी केले आहे. ते लिहितात,

‘माझ्या चंदनी खोडाचा

मंत्र ‘झिजणे झिजणे’

ऊणे लिंपायला माझे

घाली सुगंधाचे लेणें’

वडील सर्वांसाठी राबतात, माझ्या उणिवा झाकण्यासाठी प्रयत्न करतात, माझ्या सुखासाठी केलेले प्रयत्न हीच त्याची देवपूजा असते. अशा आपल्या पित्याची काळजी घेण्यासाठी जीव गहाण टाकण्याची तयारी आहे. हे सांगताना ते म्हणतात, ‘वृद्ध चंदन ते माझें, नित्य जपलें-जपेन, त्याच्यासाठी-आण त्याची- जीव ठेवीन गहाण’

ग.दि. माडगुळकरांच्या कवितेतील नववधू आपल्या सासरचे कौतुक करते. तिला सासरचे कौतुक करताना आई-वडिलांची आठवणही येते.

‘उघडले एक चंदनी दार,

उजेड दिसतो आत केशरी, सोन्याचा संसार’

असे सहज वर्णन करते. असा संसार मिळण्यासाठी कोणत्या देवाला नवस बोलावा लागतो, हे आई-वडिलांनाच माहीत. म्हणूनच त्यांची मी सुखातही आठवण काढते, असे ती शेवटी सांगते. दुसरीकडे अरूणा ढेरे यांच्या ‘माहेरी बोलवा’ कवितेतील सासुरवाशीण सासरच्या जाचाला कंटाळली आहे. सासरी जाच कसा होतो हे सांगताना,

‘तिथे तिच्या अंगावर किती गोंदले निखारे

इथे फिरेल त्यावरी रक्तचंदनाचे वारे’

असे वर्णन करतात. निखाऱ्यांनी सासरी जरी गोंदले जाणार असेल, तरी माहेरी त्यावर चंदन लावले जाईल, याची खात्री अरूणा ढेरे यांच्या सासुरवाशीणीला आहे. गदिमांच्या निधनानंतर त्यांना उद्देशून सुंदर रचना झाली आहे. त्यात कवी म्हणतो, ‘चंदन चितेत जळाला चंदन, सुगंधे भरून… मर्त्यलोक’. कवविर्य सुरेश भटांनी मराठी भाषेवरील आपले प्रेम व्यक्त करताना मराठी भाषेचे पांग फेडण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. ते लिहितात,

‘शब्दोशब्दी अमृत ओतून

भवफुलांना पायी उधळून

मम प्रतिभेचे झिजवुनि चंदन

आयुष्याचा कापूर जाळून

तुझे सारखे करीन पूजन’

मराठी भाषेबद्दल नितांत आदर व्यक्त करताना ते मराठी भाषेला आईचे स्थान देतात. तिची सेवा करताना आपली प्रतिभा चंदनासारखे झिजवण्याची मनिषा सुरेश भट व्यक्त करतात. ‘उशीर’ या गझलेमध्ये सुरेश भट लिहितात, ‘आला न गंध त्यांना केव्हाच चंदनाचा, सारे उगाळलेले ते कोळसेच होते…’ तर गझलकार वैभव जोशी ‘बाभळीची देहजाळी चंदनाला सांगते, पार्थिवाला जाळतो तू, मी चुलीशी नांदते’ असा बाभूळ आणि चंदनाचे प्राक्तन सांगतात. कवी र.वा दिघे यांच्या बालकवितेत चंदनाच्या झाडाच्या सर्वगुणांचे वर्णन आले आहे.

ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या ‘अजुनही तिन्ही सांज’ या कवितेत चंदनाचा उल्लेख आहे. आई आणि भरवणाऱ्या बाळाचे वर्णन करताना त्या लिहितात,

‘चंदनाचा की चौरंग वर चांदीचे आसन,

मायबाई अन्नपुर्णा रांगणारा बालकृष्ण

बाजूलाच सोनहंसी उभी चोचीत घेऊन

कांचनाची दीपकळी तिचे हळवे वर्तन’

अस्मिता जोगदंड-चांदणे यांनी ‘लेक तांबडं कुंदन’ या कवितेत मुलीचे वर्णन केले आहे. ही कविता सातवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली. या कवितेत त्या म्हणतात, ‘लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन’. या कवितेत पुढे मुलगी घरात नसेल तर कशी उदासी येते, घरातील चैतन्य कसे हरवून जाते, याचे सुंदर वर्णन केले आहे. रोहित साठे यांनी प्रेयसीला भेटल्यावर मनातील भावना कशा असतात याचे वर्णन केले आहे. ते लिहितात,

‘वसंतपहाटे सूर्याच्या त्या दवांत लक्षो प्रतिबिंबी तू,

कृष्णचुड्याच्या लाल थव्यागत दरवळणारी लाली ही तू,

तळहातावर हात ठेवता विद्युतलहरी नसानसांतून

वितळून जाण्या तव स्पर्शाने मंगल चंदन आलो लिंपून’

 वर्षा कदम यांना चंदनाच्या झाडाला भेटायची ओढ लागली आहे. चंदनाच्या झाडाच्या परिमळामुळे स्पर्श न होताही सुगंधाने त्याला भेटल्याचा आनंद मिळतो. त्या लिहितात,

‘स्पर्शाविना तुझा सुगंध आसमंत भरून उरतो,

चंदना एकदा तरी चांदण्यात तू मला कडकडून भेट

रंध्रातून श्वासात उतरून मीच होऊ दे चंदनाचे बेट!!’

खरे तर ही प्रेमकविता, म्हटले तर, विरहगीत. मात्र चंदनाचे रूपक घेऊन कवयित्रीने प्रेयसीच्या मनातील प्रियकराशी एकरूप व्हायची इच्छा व्यक्त केली आहे. कधीकधी भेटणाऱ्या प्रियकराला कडकडून भेटायची प्रेयसीची इच्छा आहे. चंद्रशेखर गोखले यांनाही चारोळीमध्ये चंदनाला गुंफावेसे वाटले.

‘झिजेल म्हणून चंदन मी

उगाळायचं थांबवलं तर

कंटाळून ते म्हणालं माझं

उरलं आयुष्य उगाच लांबवलं’

चंदन झिजेल म्हणून त्याला उगाळले नाही तर ते झिजणार नाही. मात्र त्याच्या गुणधर्माच्या विरूद्ध ते असेल. त्यामुळे चंदनाला आपले आयुष्य उगाच लांबले, असे निश्चितच वाटणार. शुभम वरूडकरांना कविता ही रसिकांना चंदनाप्रमाणे सुगंध देते, असे वाटते. रंगराज लांजेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या कवितेमध्ये ‘चंदन वृक्षासमान होता भिमराव झिजला, जीवननौकेचा तो आमच्या दीपस्तंभ ठरला’ असे बाबासाहेबांच्या जीवनाचे वर्णन केले आहे. तर मनमोहन नातू यांनी महात्मा गांधी यांच्यावरील ‘बापूजींची प्राणज्योती’ कवितेत, ‘चंदनाचे खोड लाजे, हा झिजे त्याहुनही, आज कोटी लोचनींच्या अश्रुमाला सांडताती’.

कविवर्य श्यामसुंदर मिरजकर यांनी ‘माय’ या कवितेत आईचे वर्णन केले आहे. आईच्या सर्व गुणांचे वर्णन करून शेवटी ते लिहितात, ‘माय कशी, माय कशी, जसे चंदन झिजावे, तिच्या पदराखालती, अवघे विश्व बाळ व्हावे’. आईचे सर्वांसाठी राबणे, सर्वांचे सर्व काही पाहणे या कवितेत सर्व काही नेमके टिपले आहे. मात्र सर्वात शेवटी आईचे झिजणे हे चंदनासारखे आहे हे सांगत, तिच्या मायेने सर्व विश्व बाळ व्हावे, ही कल्पना छानच मांडली आहे. हरीष दांगट यांनी आपल्या ‘चंदन आणि बाभळ’ कवितेत या दोन झाडांची तुलना केली आहे.  

हिंदीमध्येही चंदन, चंदनाचे झिजणे आणि सुगंध देणे यावर अगणित कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. यात हास्यकवी सुनिल जोगी आपल्या प्रेयसीला मोठेपण देतात. तिच्या तुलनेत आपण किती कमी आहोत, हे ते सांगत जातात. ‘तुम अरब देश की घोडी हो, मै हूं गधे की नाल प्रिये’ असे म्हणतात. पुढे लाकडामध्ये तुलना करताना ‘तुम चंदन वनकी लकडी हो, मै हूं बबूल की छाल प्रिये’ म्हणत प्रेयसीला चंदनाच्या लाकडाची उपमा देतात, तर स्वत:ला बाभळीची ढलपी संबोधतात. तर अनुपम निशांत यांनी प्रेयसी भेटल्यावर मनाची अवस्था काय होते, हे ‘तेरे आने की आहट पाकर, मन चंदन वन हो जाता है, पतझडसी उदास आँखोंमें, मधुमास उतरता जाता हैl’ मात्र चंदनाचा उल्लेख असलेले इंदिवर यांचे एक गाणे अजरामर झालेले आहे. ‘चंदन सा बदन, चंचल चितवन, धीरे से तेरा ये मुस्काना, मुझे दोष न देना जगवालों, हो जाऊं अगर मैं दिवाना…’ अनेक संत, कवी आणि साहित्यिकांनाच नव्हे, तर एकूणच मानव जातीला चंदनाने, त्याच्या सुगंधाने वेडे केले आहे. विविध भाषांत या रचना असणार आहेत. भाषामर्यादा आणि लेखन मर्यादेमुळे सर्वांचा समावेश करणे केवळ अशक्य!

ll४ll

माझे बालपण ग्रामीण भागामध्ये गेले. महाराष्ट्रातील इतर भागाप्रमाणे चंदनाची झाडे बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये आढळत. आमचे गाव चिंचोली, बालाघाटच्या डोंगररांगांच्या पायथ्याशी असल्याने चंदनाचा आणि माझा परिचय न कळत्या वयात झाला. एकदा आम्ही शेतातील काम संपवून विश्रांतीसाठी कडुनिंबाच्या झाडाखाली बसलो. आम्हाला झाडाखाली काही पांढरे गोळे दिसले. चहुबाजूंनी आम्ही त्यांच्याकडे कुतुहलाने पहात होतो. आमच्यातील एकाने त्या चंदनाच्या बिया असल्याचे ओळखले. या बियात गोड खोबरे आहे आणि ते खायला मजा येते, हेही सांगितले. त्याचे अनुकरण करत आम्ही त्या बियांवरील पांढरे आवरण काढले. ते खाल्ले. मजा वाटली. त्या वेळेपासून चंदनाच्या बिया शोधून आम्ही त्यातील खोबरे खाण्याचा आनंद अनेक दिवस घेतला. पुढे १९७२ च्या दुष्काळात बालाघाटच्या डोंगरात धामणीचा पाला आणायला गेलो असताना वडिलांनी चंदनाच्या झाडाची ओळख करून दिली. गडद काळ्या सालीसह हिरवा पर्णसंभार घेऊन उभा असलेले झाड मनापासून आवडले. चंदनाच्या झाडाची ओळख होण्याच्या अगोदरपासून चंदन उटीची ओळख झाली होती.

ग्रामदैवत निळकंठेश्वराच्या मंदिरात आठवड्यातून एकदा तरी जाणे व्हायचेच. श्रावणात तर दररोज गुरूजींच्या आज्ञेनुसार आम्ही गावातील सर्व मुले निलकंठा नदीमध्ये डुबकी मारून ओल्या कपड्याने कुडकुडत, हातातील निलकंठा नदीतील पाण्याने भरलेली चरवी घेऊन निळकंठेश्वराच्या मंदिरामध्ये जायचो आणि निळकंठेश्वराला जलाभिषेक घालायचो. बहिणींचा सोमवारी उपवास असायचा. त्यांच्यासोबत आम्ही मंदिरात जायचो. मंदिरात गेल्यानंतर चाफ्याची फुले आणून देणे आणि सहाणेवर चंदनाचे लाकूड उगाळून गंध तयार करण्याचे काम आमच्याकडे असायचे. आम्हीही ते आवडीने करायचो. बहिणी कपाळावर गोल गंधाचा टिळा लावायच्या. आम्ही मात्र तीन बोटे चंदन उटी कपाळावर लावायचो. गावातील काही वारकरी गळ्यालापण चंदन उटी लावत. ते पाहून एकदा आम्हीपण गळ्याला उटी लावली. निळकंठेश्वर मंदिरामध्ये ते आमच्यासोबत असतील, तर गंध उगाळून तेच उटी लावत. आमचे वय वाढल्यानंतर चंदन उगाळण्याचे कार्य आमच्याकडे आले. काही वर्षे त्यांनी चंदनाचे लाकूड घरी आणले होते आणि घरातील सानेवर ते उगाळून वडील गंध लावत असत. आम्हाला मात्र घरातील चंदन उगाळता येत नसे. मात्र चंदनाचा सुगंध आम्हाला आवडत असायचा.

पुढे दयानंद महाविद्यालयात, शिवाजी विद्यापीठामध्ये आणि नांदेडच्या स्वामी रामानंद विद्यापीठात चंदनाच्या झाडे सर्वत्र दिसत. सकाळी फिरताना अनेक झाडांच्या रखरखीत बुंध्याजवळ ही झाडे आपला हिरवागार पिसारा पसरून उभी असायची. कधीकधी त्याच्या टोकाला कळ्या आलेल्या दिसायच्या. मात्र त्याकडे कधी बारकाईने पाहिले नव्हते. पुढे चंदनाच्या झाडांचे अप्रुप असे राहिले नाही. ‘पुष्पा’ चित्रपटाने चंदनाला पुन्हा चर्चेत आणले. एका शास्त्रीय माहिती असणाऱ्या पुस्तकामध्ये ‘चंदनाचे फुल, बिनवासाचे आणि अनाकर्षक असते’, असे वाक्य आढळले आणि मनात प्रश्नांचे काहूर माजले. चंदनाचे किंवा कोणतेही फुल अनाकर्षक कसे असू शकते? हा माझ्यासमोर पहिला प्रश्न होता. फुल हे आकर्षकच असले पाहिजे, नव्हे असतेच. ते अनाकर्षक असूच शकत नाही, या माझ्या मताला या विधानाने तडा जात होता. दुसरा प्रश्न होता, तो म्हणजे चंदनाचे फुल अनाकर्षक आणि बिनवासाचे असेल तर फळ कसे बनते? त्या फुलांमध्ये परागीभवनास कारण कोण ठरते? चंदनाला फळे येतात. बी असते आणि ते प्रजननासाठी उपयुक्त असते. चंदनाची रोपे बियापासून तयार होतात. मग यासाठी आवश्यक परागीभवन कोण आणि कसे घडवून आणते? हा विज्ञाननिष्ठ प्रश्न समोर होता. वारा खेळत असेल का फुलांशी! असा विचारही मनात आला.

      अनेक प्रश्न मनात असतानाच, सध्या पावसाळा सुरू होणार आहे आणि चंदनाचे फुलण्याचेच दिवस आहेत, हे लक्षात आले आणि अस्मादिकांनी मनातले प्रश्न चंदनालाच विचारायचे ठरवले. थेट चंदन झाडाजवळ गेलो. चंदन झाडाने माझ्या मनातील इच्छा ओळखून माझ्या सर्वच प्रश्नांची उत्तरे द्यावयाचे ठरवले असावे. मी झाडाकडे जाण्याचे मूळ कारण फुलांबाबतचे ते पुस्तकातील विधान होते. मात्र हे विधान खोटे असल्याचे आढळले. ‘कानसेन’ समोर असल्यानंतर ‘तानसेना’चे गाणे खुलावे, तसेच काहीसे झाले होते. चंदन फुलांनी आपले सारे सौंदर्य माझ्यापुढे भरभरून सादर करायला सुरुवात केली. मी त्यांचे सौंदर्य भ्रमणध्वनीतील कॅमेऱ्याच्या सहाय्याने टिपत होतो. चंदन फुलांचे सौन्दर्य पाहताना त्या फुलात हरवून गेलो. अहाहा, काय ते आरस्पानी सौन्दर्य... चंदनाच्या झाडाने आणि त्याच्या सहचरांनी माझ्या सर्व शंकांचे निरसन करावयाचे ठरवले असावे. त्यामुळे फुलांवर मधमाशा बसत होत्या. त्यातील पुष्परस शोषत होत्या. माझ्या तेथील अस्तित्वाची दखल न घेता हे सारे सुरू होते.

एक छान फुलांचा गुच्छ होता. त्याचे फोटो काढायचे होते. मात्र त्याच्यावर असणारी फांदी त्या गुच्छावर पुरेसा प्रकाश येऊ देत नव्हती. नेमकी एक मधमाशी त्या गुच्छावर होती... छायाचित्र आणखी चांगले यावे, म्हणून मी ती फांदी दुसऱ्या हाताने पकडली... मात्र ती मधमाशी उडून गेली नाही, चावलीही नाही... उलट 'खिंच मेरी फोटो' म्हणत वेगवेगळ्या ‘पोज’ देत राहिली... मी छायाचित्रे काढत राहिलो... चंदनाच्या सर्जन क्षणांचा साक्षीदार बनलो... चंदनांमध्ये फलन प्रक्रिया किटकांमुळे होते… हे ही समजले. चंदनाची फुले दररोज रंग बदलत तीन-चार दिवस फुललेली असतात. कळ्या पोपटी… फूल उमलताना चार पोपटी पाकळ्यांचे… मध्येच भगवे पुंकेसराचे ठिपके घेऊन दिमाखात फुलणारे… त्यामध्ये बिजांड कोशापासून वर आलेली नलिका… अवघ्या चार-पाच मिलीमीटरमध्ये प्रत्येक फुल सामावलेले! पुढे ते लालसर होते… तपकिरी किंवा अगदी मरून रंगामध्ये, सर्व भाग रूपांतरीत होईपर्यंत चार-पाच दिवस फुल अगदी तसेच असते. अशा सर्व रंगछटांची फुले, मधमाशी एकाच छायाचित्रात टिपता आले. फुले आहेत बिनवासाची… मात्र ती अनाकर्षक निश्चितच नाहीत…उलट आकर्षक आणि सुंदर आहेत… मनाला हरवून टाकणारी आहेत. याची खात्री पटली आणि नंतरच मन शांत झाले. झाडे शुद्ध हवा देतात, जमिनीत पाणी पकडून ठेवतात, जळण देतात, पानाच्या सहाय्याने माती भुसभूशीत करतात... हे सारे ज्ञात होते... पण मनातील सर्व प्रश्नांची उत्तरेही देतात… हे पुन्हा सिद्ध झाले. चंदनाच्या झिजण्याचे आणि सुगंध, शीतलता देण्यासंदर्भात संतांनी केलेले वर्णन प्रभावी आहेच. पण माझ्या मनातील प्रश्नांची चंदन झाडाने दिलेली सहज सुंदर उत्तरे पाहून वाटले… अवघे जगणे चंदन व्हावे... एक प्रश्न मात्र तसाच आहे, सर्वांग सुगंधी तेलाने भरलेल्या चंदनाची फुले बिनवासाची का असावीत? की आपले घ्राणेंद्रिय चंदन फुलांचा वास घेण्यास सक्षम नाही?

अनेक संतांनी चंदनाच्या झाडाचा, चंदनाच्या झिजण्याचा, त्याच्या सुगंधाचा सज्जन माणसाशी संबंध जोडला आहे. चंदन स्वत: झिजते, जळते आणि आजूबाजूला सुगंध पसरवते. सज्जन माणसांचेही असेच असते. ती प्रत्येकाच्या अडीनडीला मदतीला धावून जातात. ती स्वत: कष्ट करतात, दु:ख झेलतात, पचवतात आणि आपल्या जवळ असणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना सुखी ठेवतात. पुलंच्या ‘नारायण’ कथेत अशा माणसातील सर्वात गरीब माणसाचे सुंदर वर्णन आले आहे. अशी माणसे कर्तृत्वाने छोटी असतील किंवा मोठी! पण अशी इतरांच्या सुखासाठी निर्मोहीपणे कार्यरत माणसे असतात, ती भेटतात.

चंदन आणि सज्जनांमध्ये आणखी एका बाबतीत साम्य आढळते. चंदन असो वा सज्जन; दोघांनाही समाजाकडून समान वागणूक मिळते. चंदनामध्ये सुगंध निर्मितीला सुरुवात होते, ती झाड दहा ते पंधरा वर्षांचे झाल्यावर. त्या झाडांमुळे आसमंत आपोआप सुगंधी होतो, ते चंदनाचे झाड चाळीस वर्षांचे झाल्यानंतर. मात्र त्या झाडाचा असा नैसर्गिक सुगंध पसरण्याअगोदरच चंदन चोर त्या झाडाला कापतात आणि त्याला अटकाव करणारे हात त्यांच्यापुढे अनेकदा हतबल असतात. म्हणूनच विरप्पन किंवा पुष्पा तयार होतो. कोणाला त्याचा पत्ताही लागत नाही. सज्जनांचेही अगदी तसेच आहे. सज्जन सतत सर्वांना सुखी पाहण्याची इच्छा बाळगतो. त्यासाठी पदरमोड करतो. कष्ट करतो. या त्याच्या निर्मोही कार्यातून त्याची ओळख तयार होते. त्याची किर्ती वाढत जाते. अशा व्यक्तींना त्रास देणारा, सज्जनांचे पंख कापणारा, एक गट कायम कार्यशील असतो. सज्जनांचे पंख कसे कापता येतील, त्यांना अडचणी कशा निर्माण करता येतील, याचा विचार हा गट करत असतो. असे हात कलम करणारेही त्यांच्यापुढे अनेकदा हतबल होतात. आजतरी, चंदन आणि सज्जनांना मोठे होऊ दिले जात नाही… चंदन आणि सज्जनांचे प्राक्तन एकच; पण, त्यांचा सुवास सदैव दरवळत राहीलच!

-०-

१५ टिप्पण्या:

  1. वेड लावणारा सुगंध घेऊन येणाऱ्या चंदनासारखाच हा लेखही सुगंधित झाला आहे. शास्त्रीय माहिती, लोककथा, संतसाहित्य, अर्वाचीन साहित्य, हिंदी काव्य आणि स्वानुभव इतकाच प्रदीर्घ अवकाश कवेत घेणारा हा लेख सर्वांग सुंदर आहे. खूप खूप धन्यवाद सर!

    उत्तर द्याहटवा
  2. ज्याप्रमाणे महनीय व्यक्तींच्या दहनासाठी चंदन वापरले जाते, त्याप्रमाणे लिंगायत समाजात दफन करताना मृतदेहाच्या आजूबाजूला चंदनाचा पाला टाकला जातो. अर्थातच उपलब्धतेनुसार.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप प्रदीर्घ आणि माहितीपूर्ण, Well Researched 👌

    उत्तर द्याहटवा
  4. सर छान माहिती दिली आहे. मला तर हा लेख एक सुंशोधनाचा उत्तम नमुना आहे असे वाटते. अगदी सखोल माहिती दिली आहे. अशीच नवनवीन माहिती आम्हाला मिळावी. मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  5. संशोधना धरित लेख . वास्तव शील सुंदर सुरवात व विज्ञान शिक्षण करीता उपयुक्त .अभिनंदन व शुभेच्छा .

    उत्तर द्याहटवा
  6. चंदनाच्या वृक्ष म्हणजे सुगंधी वृक्ष एवढेच माहिती होते.पण एवढी विस्तृत माहिती पहिल्यांदाच वाचायला मिळाली. खूप उपयुक्त लेख.... सर 👌

    उत्तर द्याहटवा
  7. अत्यंत विस्तृत माहिती पहिल्यांदाच वाचायला मिळाली, अत्यंत उपयुक्त असा हा लेख आम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरेल..

    उत्तर द्याहटवा
  8. चंदन या विषयावरचा खूपच मोठा विस्तृत आणि माहिती पूर्ण लेख आपण पाठवला आहे , जणू काही चंदन या विषयावरचा विकिपीडियाच,

    उत्तर द्याहटवा
  9. चंदन वृक्षाबद्धल एवढी सखोल माहिती कधीच वाचनात आली नाही खूप खूप अभिनंदन आणि आभार

    उत्तर द्याहटवा
  10. लेखन अत्यंत उपयुक्त आहे धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  11. लेख किती आवडला ते सांगण्यासाठी अक्षरशः शब्द अपुरे आहेत.. पण मोबाईलवर लेख वाचण्यासाठी ब्लॉग ओपन केला आणि अवघ्या मोबाईलचे 'चंदन' झाले..लेख वाचताना मी चंदनाचा दरवळ अनुभवला..लेख लिहिताना तुम्ही तो किती अनुभवला असाल याची कल्पना पण आनंद देऊन गेली..

    उत्तर द्याहटवा
  12. या झाडाबद्दल थोडीफार माहिती होती। परंतु या लेखामुळे विस्तृत माहिती मिळाली। धन्यवाद सर।

    उत्तर द्याहटवा
  13. आदरणीय सर,
    या सुरेख लेखाप्रमाणे चंदनाचा भाव मनी ठेवून आम्हा वाचकांसाठी
    संशोधन आधारीत माहिती देवून जो ज्ञानरूपी सुगंध उपलब्ध करून दिलात. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 🙏

    उत्तर द्याहटवा