रविवार, १८ डिसेंबर, २०२२

पर्यावरण आणि नेतृत्व

 

नेतृत्वाने जनतेमध्ये शहाणपण आणायचे असते. लोकानुनय करणारे नेतृत्व दिर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहात नाही. तर जनतेला शहाणपण देणारे नेतृत्व लोकोत्तर ठरते, हे जगभरातील नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे. तरच ही वसुंधरा वाचू शकेल. केवळ परिषदामधील भाषणे उपयोगाची नाहीत तर सर्वच राष्ट्रानी पर्यावरण सर्वांसाठी सुखकर राहावे यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. इंद्रधनुष्य २०२२ या दिवाळी अंकात ‘पर्यावरण आणि नेतृत्व’ हा प्रसिद्ध झालेला लेख… आपल्यासाठी

___________________________________________________

‘काय झाडी… काय डोंगार… … समंद कसं, ओक्केमंदी हाय’ या वाक्याने सगळ्यांना वेड लावले. सोलापूरी मराठीतील या वाक्याचे मराठी न येणाऱ्या लोकांनाही लागीर झाले. हे वाक्य सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे. वाक्य गाजू लागले, त्या वेळी महाराष्ट्रात राजकीय तणाव होता. जनसामान्यांच्या मनातील तणाव या वाक्याने हलका केला. त्या वाक्यातील इतर बाबींपेक्षा एका वेगळ्या कारणासाठी हे वाक्य महत्त्वाचे वाटले. महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या झाडांची कत्तल होत असताना, जंगल आच्छादित जमीन उघडी होत असताना, डोंगरच्या डोंगर क्रशरची दगडांची भूक भागवण्यासाठी भुईसपाट होत असताना, राजकीय तणावात महाराष्ट्राला ढकलत, राज्यातील आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर, तिथल्या निसर्गाच्या प्रेमात पडले. तिथले डोंगर आणि त्यावरील वृक्षराजीच्या प्रेमात पडले. त्यांना तेथील वृक्षराजीचे अप्रूप वाटले आणि रांगड्या बापूंच्या मनातून हे वाक्य आले. ती निखळ भावना होती. त्यांना झाडांचे आणि निसर्गाचे कौतुक वाटले, तेच त्यांनी व्यक्त केले आणि ते सर्वत्र पोहोचले. वाक्यासोबत बापूंनाही प्रसिद्धी लाभली.

खरे तर, जग आज एका मोठ्या चिंतेत आहे. ती समस्या मानवानेच निर्माण केली आहे. ती निर्माण होण्यामागे निसर्गातील घटलेले जंगलांचे प्रमाण हेही मुख्य कारण आहे. मानवाने निसर्गाचा एक घटक म्हणून वावरायला सुरुवात केली. पुढे बुद्धीच्या जोरावर आपले जगणे किमान कष्टाचे कसे होईल, याचा ध्यास घेतला. तत्पूर्वी तो स्वत:ला निसर्गाचा घटक मानत असे. मात्र जीवन सुखासीन बनवण्याचा मागे धावताना तो स्वत:ला निसर्गाचा घटक न मानता निसर्गाचा, या वसुंधरेचा स्वामी मानू लागला. यातून निसर्गातील संसाधने स्वत:ला पाहिजे तशी वापरू लागला. तेथूनच समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला शेती, शेतीसाठी जमीन मिळावी म्हणून, निवाऱ्याच्या निर्मितीसाठी त्यांने जंगलांवर घाव घालायला सुरुवात केली. पहिला घाव घातल्यापासून आजवर अव्याहतपणे घाव घालणे सुरूच आहे. निसर्गातील संसाधने केवळ मानवासाठी नाही, तर सर्वच जीवांसाठी आहेत हा विचारच त्याने सोडून दिला. निसर्ग ओरबडताना त्याचा इतर जीवसृष्टीवर काय परिणाम होतो, याचा विचार कधीच केला नाही. दुसरीकडे त्याला सुख जसे लाभू लागले, तसे त्यांने आपले जीवन निरोगी व्हावे, म्हणूनही प्रयत्न सुरू केले. परिणामी, लोकसंख्येचा विस्फोट झाला. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी पुन्हा जंगलतोड आणि निसर्गाची हानी सुरू झाली. असे हजारो वर्ष मानव करत राहिला. गावे वसवली, उद्योग उभारले. निसर्गाचा कोणताही विचार न करता!

सतराव्या शतकापर्यंत मानव प्रगती साधतानाही थोडाफार का होईना, निसर्गाचा स्नेहबंध जपत होता. मात्र जसजशी वैज्ञानिक क्रांती होत गेली. तंत्रज्ञानाची निर्मिती होऊ लागली, तसतशी मानवाला आणखी वेगाने प्रगती करण्याची इच्छा निर्माण झाली. जीवनमान सुधारायचे तर पैसा हवा. जास्तीत जास्त श्रीमंत होण्यासाठी उद्योग उभारणे, उत्पादनाची विक्री करणे, असे प्रयत्न सुरू झाले. संपन्नता असलेल्या राज्यांवर कब्जा मिळवण्यासाठी युद्ध करणे नित्याचे झाले. एखाद्याने युद्ध टाळले, तरी समोरचा शांत न राहिल्याने युद्धे अपरिहार्य ठरू लागली. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध जगाने पाहिले. छोटी-छोटी युद्धे तर अगणित. हे सर्व गतीने होऊ लागले कारण प्रगत शस्त्रे आणि अस्त्रे निर्माण झाली होती. यातील हिरोशिमा आणि नागासाकीचा भयंकर अनुभव जगाने घेतला. हे दोन्ही आघात मोठे होते. त्या आघातांनी मानवी अस्तित्वाचे मोठे नुकसान केले. मात्र त्यापेक्षाही मोठा बाँब, संपूर्ण जगाला विळख्यात घेत असताना जग आणि जागतिक नेतृत्वाने मात्र त्याकडे दुर्लक्षच केले. लक्षात येण्यापूर्वी हा विळखा घट्ट पडत गेला.

त्यातच एखाद्या राष्ट्राच्या प्रगतीचा मापदंड म्हणून प्रति माणसी ऊर्जेचा वापर गृहीत धरण्यात येऊ लागले. आपण ज्याला विकास म्हणतो, ती वसुंधरेच्या विनाशाची नांदी आहे, याकडे मानवाचे अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत लक्षच नव्हते. ऊर्जा मिळवण्यासाठी इंधनाचा वापर अनिवार्य असल्याने प्रथम लाकूड, नंतर दगडी कोळसा आणि खनिज तेलाचा वापर सुरू झाला. यातून कार्बनी संयुगांचे वातावरणात उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होत होते. सीएफसी किंवा हरित वायूचा शीतयंत्रामध्ये होत असणाऱ्या वापरातून तर ओझोन थराला धक्का पोहोचला, तरीही मानवाने या बाबीकडे लक्ष दिले नाही. वातावरणात असणारी कार्बनी संयुगे सौर ऊर्जा शोषत पृथ्वीवरील तापमान वाढवत राहिले. या तापमानवाढीचा तोटा सर्वच राष्ट्रांना बसत आहे, हे उमजूनही दुर्दैवाने आजही जगातील बहुतांश राष्ट्रे वागत नाहीत.  

जॉन फार्किन आणि मर्श या दोन संशोधकांनी १९०७ मध्ये ‘माणूस आणि निसर्ग’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी तत्कालिन परिस्थिती आणि मानवाकडून होत असलेली निसर्गाची हानी यावर भाष्य केले. मानवाने या प्रश्नाकडे लक्ष दिलेच नाही. पुढे खऱ्या अर्थाने याबाबत चर्चा सुरू झाली १९६० पासून! इन्व्हायरमेंट हा शब्द ‘इन्हायर सराउंडिंग ऑफ इनसर्कल’ या फ्रेंच शब्दापासून बनवण्यात आणि वापरण्यास सुरुवात झाली. याचा नेमका अर्थ सजीव-निर्जीव यांच्यातील क्रिया-प्रतिक्रिया आणि आंतरक्रिया या सर्वांमधून सजीवाभोवती साकारलेली स्थिती होय. मराठी आणि हिंदीमध्ये यासाठी पर्यावरण हा शब्द वापरण्यात येतो. परि म्हणजे अवतीभवती, भवताल किंवा सभोवताल. तर आवरण म्हणजे सभोवताल ज्याने व्यापले आहे ते. यावेळी मात्र निदान संशोधकांना परिस्थितीची जाणीव झाली. त्यामुळे लगेच हा अभ्यासाचा स्वतंत्र विषय बनला. त्यांनतर हळूहळू जगभरातील संशोधकांचे या विषयाकडे लक्ष जाऊ लागले. ती जगासमोर मांडण्याचे प्रयत्न सुरू केले. पैशाच्या आणि ऐशोआरामाच्या कह्यात गेलेल्या देशोदेशीच्या नेतृत्वांनी मात्र हे फारसे गांभिर्यांने घेतलेच नाही. याचे गांभिर्य युनोने ओळखून १९७० मध्ये पॅरिसमध्ये पहिली जागतिक परिषद भरवली. पुढे दोन वर्षांनंतर स्टॉकहोम येथे भरलेल्या परिषदेत पर्यावरण संरक्षणाबद्दल आणि हानी टाळण्याबद्दल विचारविमर्ष सुरू झाला. तसेच या पुढे ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. १९७५ च्या बेलग्रेड परिषदेत कृती आराखडा मंजूर करण्यात आला. यानंतर नियमितपणे आंतरराष्ट्रीय परिषदा होत आहेत. या परिषदांमध्ये कार्बन उत्सर्जन कसे कमी करता येईल, याबद्दल चर्चा होतात, मात्र परिस्थिती फारशी बदलताना दिसत नाही. या परिषदांमध्ये वसुंधरा वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठराव मांडले जात आहेत. मात्र अंमलबजावणीची वेळ आली, की सगळे राष्ट्रप्रमुख परस्परांकडे बोट दाखवत प्रत्यक्षात कृती करण्याचे टाळत आहेत.

परिस्थिती गंभीर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रगतीचा मापदंड, ऊर्जेच्या प्रतिमाणसी ऊर्जेवर ठरवण्यात आला. आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी सहज उपलब्ध असणारी संसाधने वापरण्यात आली. यातून विकसित राष्ट्रांनीही सुरुवातीला जंगलातील वृक्षांची बेसुमार वृक्षतोड करून ऊर्जा मिळवली. त्यानंतर प्रथम दगडी कोळशाचा आणि नंतर खनीज तेलाचा वापर सुरू झाला. या तिन्ही घटकांच्या वापरातून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जित होत असे. याचा वातावरणावर काय परिणाम होतो, याचा विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत कोणीच विचार करत नव्हते. रिचर्ड बेकर यांच्यासारखा एखादा माणूस झाडांचे महत्त्व सांगत होता. मात्र त्यामध्ये पर्यावरण विचारांपेक्षा भविष्यात तोडण्यासाठी झाडेच उरणार नाहीत, याची चिंता जास्त होती. सर्व झाडे तोडली गेली, तर जंगलच राहणार नाहीत. सर्वत्र वाळवंटच होईल, हा विचार होता. कोणी अल्बर्ट हॉवर्ड रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रीय खतांचा वापर करायला हवा, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. तर त्यांनाही नोकरीतून काढून टाकण्याचा बनाव रचण्यात आला होता.

या परिस्थितीत जगभरातील सर्व राष्ट्रप्रमुख आपले राष्ट्र प्रगत झाले पाहिजे, याचा ध्यास घेऊन प्रयत्न करत होते. परिणामी, विविध राष्ट्रांमध्ये कारखाने उभारले जात होते. आपल्या देशात विदेशी गुंतवणूक वाढावी, असे प्रयत्न होत होते. या कारखान्यांना लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी दगडी कोळसा आणि खनिज तेल वापरले जात होते. लाकडे तर होतीच. यातून कर्बवायूंबरोबर इतरही घातक पदार्थ वातावरणात जात होते. भारतातही असे अनेक कारखाने आले. त्यातील भोपाळजवळ उभारलेल्या युनियन कार्बाईडच्या कारखान्यातून मिथील आयसोसायनेट या वायूची गळती झाली. अनेकांचे जीव गेले. अनेकांना अपंगत्व आले, हे एक उदाहरण! अशा अनेक करखान्यातून जल, वायू आणि जमिनीचे प्रदूषण होत आले; मात्र, आपल्या काळात राष्ट्राची प्रगती झाली, हे दाखवण्याच्या हट्टापायी असे अनेक उद्योग अविचाराने, पर्यावरणाची काळजी न घेता उभारण्यात आले आहेत.

या परिस्थितीला वैतागून नववीतील एक मुलगी ग्रेटा थनबर्ग पेटून उठते. सत्याग्रहाचे हत्यार उपसते. राष्ट्रसंघाच्या व्यासपिठावरून जगभरातील विविध देशांच्या प्रमुखाना आरसा दाखवण्याचा प्रयत्न करते. तुमच्यामुळे आमचे भवितव्य अंध:कारमय झाले असल्याचे ठणकावते. सगळे तिचे कौतुक करतात. परिणाम मात्र शून्य! जगातील सर्व देशांचे राष्ट्रप्रमुख गांधारीच्या भूमिकेत वावरत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास थांबला पाहिजे, हे ते मान्य करतात. मात्र कृती करायच्या वेळी ते परस्परांकडे बोट दाखवतात. ‘आम्ही पूर्वी दगडी कोळसा खनिज तेल वापरला असेल. मात्र आता आम्ही हे प्रमाण घटवले आहे. आता आम्ही विशिष्ट मर्यादेपेक्षा ही इंधने वापरत नाही. विकसनशील राष्ट्रे आणि अप्रगत राष्ट्रे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण करतात. त्यांनी दगडी कोळसा, खनिज तेलाचा वापर थांबवायला हवा’ असे प्रगत राष्ट्रांचे म्हणणे असते. अमर्याद उत्पादन करताना या राष्ट्रांनी पर्यावरणाचे मोठे नुकसान केले आहे. मात्र आजच्या परिस्थितीवर बोला, असे त्यांचे म्हणणे आहे.

विकसनशील राष्ट्रे यावर सांगतात, ‘प्रगत राष्ट्रांनी पर्यावरणाचे नुकसान करून प्रगती साधली आहे. त्यांनी प्रदूषणाचे कारण असलेली इंधने वापरूनच हे साध्य केले आहे. तेव्हा त्यांनी १०० टक्के अशी इंधने थांबवायला हवीत. आम्हाला अजून प्रगती करायची आहे. आमच्यावर ही बंधने न घालता ही सवलत द्यायला हवी.’ या सर्व वादातून आजची परिस्थिती उद्भवली आहे. १९५१ पासून २०१५ पर्यंत वातावरणाचे तापमान सरासरी एक डिग्री सेल्सियसने वाढले आहे. तापमानवाढ हा एक भाग. पण पर्यावरणातील सर्वच घटकांवर मानवी प्रगतीचा अनिष्ट परिणाम झालेला आहे.

सर्वात प्रथम मानवाने सजीवाना आवश्यक असणाऱ्या दोन घटकांना प्रदूषणाच्या विळख्यात ढकलले आहे. त्या म्हणजे पाणी आणि हवा. मूलत: पाणी आणि हवा या मानवाच्या मूलभूत गरजा असल्याचे आपण आजही मान्य करत नाही. त्यामुळे अन्नाची कमतरता होताच मानवाने हरित क्रांती केली. मात्र पाणी आणि हवेची शुद्ध प्रमाणात उपलब्धता व्हावी, यासाठी प्रयत्न करताना काही छोटे देश वगळता फारसे कोणी आजही प्रयत्न करत नाहीत. घोषणा होतात, मात्र निष्पन्न काहीच नाही. यातील सर्वात भीषण समस्या पाण्याची आहे. काही वर्षांपूर्वी केपटाऊन या आफ्रिकेतील राजधानीच्या शहरासाठी शून्य प्रहर जाहीर करण्यात आला होता. त्या वेळेपर्यंत पाऊस पडला नसता, तर त्या शहराला पाणी पुरवठा पूर्ण थांबणार होता. मात्र आजही तशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी फारसे प्रयत्न झाल्याचे ऐकिवात नाही. आपल्याकडील पुण्याची अवस्था फारशी वेगळी नाही. दुष्काळ पडला तर पुण्यासारख्या शहराला कोठून पाणी पुरवणार? याचा विचार शहराचा विस्तार करताना कोणीच करत नाही.

शहरांचे वाढते प्रमाण, वाढती कारखानदारी यातून पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात सुरू झाले. कारखान्यात वापरलेले रसायनमिश्रीत पाणी, शहरातील मलमूत्र मिश्रीत पाणी थेट नद्यांमध्ये सोडण्यात आले. शेतीसाठी वापरण्यात येणारी किटकनाशके आणि रासायनिक खते संपूर्णत: पिकांसाठी वापरली जात नाहीत. ती जमिनीवर तशीच राहतात. पावसाच्या पाण्यात मिसळतात आणि पाण्याचे प्रदूषण आणखी वाढते. पाण्यामध्ये नको असणारे घटक मिसळले तर त्यांना संतुलित करणारी यंत्रणा निसर्गत: विकसित झालेली असते. मात्र प्रदूषकांचे प्रमाण इतके मोठ्या प्रमाणात वाढले आहे की या नैसर्गिक यंत्रणाच मोडकळीस आलेल्या आहेत. यामुळे पाण्याचे प्रदूषण इतके वाढले आहे की नद्यांच्या पाण्यात राहणारे जीव त्यामध्ये जगू शकत नाहीत. त्यामुळेच नद्यांतील मासे मृतावस्थेत आढळल्याच्या बातम्या येतात. वापरलेले सर्व पाणी पुनर्प्रक्रिया करून इतर कारणासाठी वापरायला हवे. मात्र ते अशुद्ध पाणी तसेच नद्या नाले आणि पाण्यांच्या साठ्यांमध्ये मिसळू दिले जातात. या गोष्टी टाळायला हव्यात मात्र तसे होत नाही. मनात आणले तर काय होऊ शकते, याचे सुंदर उदाहरण इंग्लंडमधील थेम्स नदी. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगातील सर्वाधिक प्रदूषित नदी म्हणून या नदीला ओळखले जात होते. हा क्रमांक आता भारतातील गंगा नदीने पटकावला आहे. जगातील दहा सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये अर्ध्याधिक नद्या भारतातील आहेत. थेम्स नदी स्वच्छ व्हावी, असे शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले. मात्र कितीही प्रयत्न केला तरी नदी काही स्वच्छ होत नव्हती. काही सुजाण नागरिकांना ही नदी पूर्वीसारखी स्वच्छ व्हावी, असे वाटत होते. मात्र नदी काही स्वच्छ होत नव्हती. अखेर लोकांचा सहभाग वाढू लागला. नेत्यांनी जनतेच्या बरोबरीने यात सहभाग घेतला आणि पाहता-पाहता नदी पूर्ण स्वच्छ झाली. जगातील सर्वात जास्त शुद्ध नदी म्हणून ती आज ओळखली जाते. लोकांचा अनुनय न करता लोकांच्या हिताच्या उपक्रमांत नेत जेव्हा सहभागी होतात, तेव्हा निश्चितच समाजाच्या भल्याचे कार्य उभा होते. मात्र अनेकदा हे घडत नाही. लोकांना जे आवडते ते करण्याचा आणि त्याला पाठिंबा देण्याचा नेत्यांकडून प्रयत्न होतो. याचा परिणाम असा होतो, उगमाजवळ स्वच्छ पाणी घेऊन वाहणारी नदी, मोठ्या शहराजवळून पुढे जाताना गावाची घाण आपल्यात सामावून घेत पुढे जाताना दिसते. नद्यांची अशी अवस्था पाहिली की मन अस्वस्थ होते.

दुर्दैवाने आजही नेतृत्व लोकानुनयाच्या भूमिकेतून निर्णय घेते. त्यामध्ये मग डॉल्बीबाबतची त्यांच्या प्रतिक्रिया असोत वा गणपती नदीतच विसर्जित करण्याचा आग्रह असो. नेतृत्वाने जनतेमध्ये शहाणपण आणायचे असते. लोकानुनय करणारे नेतृत्व दीर्घकाळ स्मरणात राहात नाही. तर जनतेला शहाणपण देणारे नेतृत्व्‍ा लोकोत्तर ठरते, हे जगभरातील नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे.

वायू प्रदूषणाचा विळखा तर इतका भयानक आहे की, सर्वोच्च न्यायालयास स्वत:हून यासंदर्भातील याचिका दाखल करून घ्यावी लागली. न्यायमूर्तींनी स्पष्टपणे काही प्रश्न विचारले. सर्वोच्च न्यायालयाने, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शेतकरी शेतातील पिकाचे इतर जैविक घटक दिल्लीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जाळल्याने प्रदूषणाची समस्या गंभीर होत असल्याचे म्हणणे खोडून काढले. यावर या विषयातील तज्ज्ञ अधिकारी आपले म्हणणे सर्वोच्च न्यायालयास पटवून देऊ शकले नाहीत. प्रदूषण नियंत्रण मंडळच नियंत्रण सोडू लागले, तर पर्यावरणाची हानी टळणार कशी? भारतात विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यात येते. मात्र या वाहनांना पुनर्प्रभारित करण्यासाठी लागणारी ऊर्जा दगडी कोळसा जाळून मिळवली जाते. ज्या हेतूने ही वाहने बनवली आहेत, तो हेतू यातून खरेच पूर्णत: साध्य होतो का? हा प्रश्न पडतो. वाहनांचे नियम, त्यांना चालवताना बाहेर पडणाऱ्या प्रदूषक घटकांचे प्रमाण हा एक भाग आहे. कारखाने सुरू असताना बाहेर पडणारा वायू यामुळे वातावरणाचे अपरिमित नुकसान होत आहे. वाहने आणि कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी काही नेते मनापासून प्रयत्न करत आहेत. लोकांच्या इच्छेपेक्षा लोकांचे हित लक्षात घेऊन हे नेते निर्णय घेत आहेत, ही त्यातील जमेची बाजू आहे. हवेचा प्रदूषण निर्देशांक अनेक शहरांमध्ये धोका पातळी ओलांडत आहे. आपण, आपले कुटुंबिय याच शहरात राहात असल्याचे नेत्यांना माहीत आहे. मात्र हे कमी करण्यासाठी प्रयत्न करणे ही केवळ अधिकाऱ्यांची जबाबदारी मानून सोडून देण्यात येते. याउलट अधिकाऱ्यांनी कारवाई करायचे ठरवले तर त्यांना सोडून देण्यासाठी प्रकरण दडपण्यासाठी काही नेते आवर्जून प्रयत्न करत असल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. हवेच्या प्रदुषणांमुळे श्वसनाचे विकार वाढत आहेत. ओझोनचा थर विरळ होत जात आहे. मात्र मी एकटा नीट वागून काय उपयोग, असे प्रत्येकजण म्हणतो आहे. मात्र प्रत्येकाने काहीतरी करायचे ठरवले तर निश्चितच इप्सित साध्य होईल, हे कोणी लक्षातच घेत नाही. कार्बनी संयुगामुळे तापमान वाढ आणि त्यामुळे पर्जन्यमानाचे बदलणे हे वारंवार दिसू लागले आहे. ‘इंटरगव्हर्मेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज’ या युनोच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या संघटनेने सादर केलेल्या अहवालात अनेक गंभीर इशारे देण्यात आले आहेत. ज्या गांभिर्याने हे इशारे घ्यायला हवेत, तितक्या गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही.

आणखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. झपाट्याने ती बिकट होताना दिसत आहे. जमिनीचे प्रदूषण ही मोठी निर्माण झाली आहे. किटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिकांनी न वापरलेला भाग जमिनीवर तसाच असतो. त्यातून क्षारपड क्षेत्र वाढत आहे. किटकनाशकांच्या अविचारी वापराने मधमाशा आणि इतर किटक मृत्यूमुखी पडत आहेत. त्यातून परागीभवनाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र त्यापेक्षा जमिनीत वाढलेले प्रमाण ठराविक पट्ट्यात मोठ्या प्रमाणात आजाराचे कारण घडत आहे. पंजाबमध्ये आणि महाराष्ट्रातील काही भागांत कर्करोगाचे प्रमाण वाढण्यामागे जमिनीचे प्रदूषण, किटकनाशकांचे, रासायनिक खतांचे जमिनीतील वाढते प्रमाण कारण असल्याचे असे काही संशोधक सांगत आहेत. हरित क्रांतीनंतर तारतम्य न बाळगल्याचे हे परिणाम असल्याचे आज मानले जात आहे. आता कोठे लोकांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटू लागले आहे. मात्र सेंद्रिय शेतीचा अविवेकी स्विकारही श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवू शकते.

नेत्यांनी कोणत्याही कृतीचे दीर्घकालीन परिणाम घ्यायला हवेत. तज्ज्ञांचे विचार ऐकायला हवेत. आपला विचार आपल्या गावाचे, भागाचे आणि देशाचे हित साधणारा ठेवायला हवा. पुण्याजवळ दिसणारे कॉस्मॉसचे ताटवे पाहून कोल्हापुरातील एका जनप्रतिनिधीने त्याच्या बिया आणून वनाजवळ टाकल्या. त्याचे प्रमाण वाढल्याने पूर्वी मिळणारा चारा जनावरांना मिळेनासा झाला. त्या वनात कॉस्मॉसचे प्रस्थ वाढले आहे. जंगलातील पशूंना खाण्यासाठी आवश्यक वनस्पतींचे प्रमाण कमी झाले. जंगलात खाद्य न मिळाल्याने ही जनावरे गावात आणि शहरात येऊ लागली. पिकांचे नुकसान करू लागली. आज त्या भागातील लोक कॉस्मॉसच्या बिया आणून टाकणाऱ्या त्या दिवंगत नेत्याला नावे ठेवते. एका नेत्याला का होईना डोंगर, झाडांचे नवल वाटले आणि अंत:करणातील भाव शब्दातून व्यक्त झाले हे चांगलेच झाले. आता पुढचा टप्पा म्हणून नेतृत्त्वाने अशी झाडी वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न करायला हवेत. डोंगर आपल्या भागात कसे टिकून राहतील यासाठी प्रयत्न करायला हवेत. नद्यांच्या प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील अधिकाऱ्यांना पाठबळ आणि प्रदूषण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईसाठी आग्रह धरायला हवा. ज्या ठिकाणी जनता चुकते असे वाटत असेल, तेथे समाजाला समजावून सांगण्याची भूमिका त्यांना घ्यावीच लागेल. पृथ्वीवरील जीवसृष्टीचा विनाश जवळ आल्याची चर्चा होत असते. हे खरेही आहे. हे टाळायचे असेल तर संशोधकांच्या मताचा आदर करून नेतृत्वाला प्रत्यक्ष कार्यात सहभागी व्हावे लागेल. शेजाऱ्याच्या डोंगराचे, झाडांचे कौतुक जसे मनातून ओठात आले… तसेच आता… नेतृत्वाने आपल्या भागात, ‘तसेच डोंगर… तशीच झाडी’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.  

-०-


१० टिप्पण्या:

  1. सुपर्ब सरजी, नेतृत्वालाही जबाबदारीची जाणीव करून दिलीत आपण 🙏💐

    उत्तर द्याहटवा
  2. सरजी ,
    योग्य असे धडे आपण नेतृत्व करणार्यांना दिले आहेत . मात्र हे नेते गेंड्याच्या कातडीचे आहेत ओ. काही दिवसांनी गेंडे या बद्दल तक्रार करतील की कृपया आमची या नेत्यांबरोबर बरोबरी करून आमचा अपमान करूनका .

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर माहिती दिली आहे ती खरोखरच समाजाला उपयोगी पडण्यासारखे आहेपरंतु जो नेता वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने काढतो काढतो तोच जनतेला लोकप्रिय झाला आहे मग त्याच्यातून प्रदूषण किती होतं याकडे जनता पाहत नाही त्यांना आपला ऊस कसा लवकर जाईल व आपल्या मुलांना वेगवेगळ्या कारखान्यात नोकरी मिळून आपली प्रगती कशी होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे तेव्हा शाश्वत विकास हा सर्वसामान्य जनतेपासून होणे आवश्यक आहे आज ज्वारी बाजरी गहू ही पिके नामशेष होत चालले आहेत त्यामुळे पक्षांची संख्या अतिशय अल्प झाली आहे आणि पर्यावरणातील साखळी खंडित होण्याची भीती आहे आपण अतिशय सुंदर पर्यावरणाबद्दल माहिती देता ती खरोखरच पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाची आहे तेव्हा असेच लिहित जा दहा टक्के जनतेवर परिणाम झाला तरी चालेल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  4. "लोकानुनय करणारे नेतृत्व दीर्घकाळ स्मरणात राहात नाही. तर जनतेला शहाणपण देणारे नेतृत्व लोकोत्तर ठरते" हे वाक्य राजकारणी लोकांनी आचरणात आणले तर सगळीकडे नंदनवन घडेल सुंदर लेख

    उत्तर द्याहटवा
  5. अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैली मध्ये या लेखाचं लिखाण झालं आहे. पर्यावरण या विषयाबद्दल आजूबाजूला काय चाललं आहे, इतिहासात काय घडलं आहे याचं सातत्याने भान राखणं आणि त्याचा वेध घेणं हे एका अभ्यासकाचं काम आहे.तो व्यासंग, तो अभ्यास म्हणजे हा लेख किंवा हे लिखाण आहे.अगदी यातील ग्रेटा थनबर्ग हा ओझरता उल्लेख सुदधा आपल्या चिंतनातून सुटला नाही. केवळ काही उपाययोजना नाही तर नेतृत्व आणि अंमलबजावणी सुद्धा खूप महत्त्वाची आहे, हे अगदी सूत्रबद्ध पद्धतीने मांडलं आहे..अतिशय सुंदर लेख झालाय सर!

    विनोद ठाकूरदेसाई

    उत्तर द्याहटवा
  6. पर्यावरणाविषयी छान माहितीपर लेख .....सर 👌
    लेखाच्या शीर्षकानुसार पर्यावरण वाचवण्यामध्ये नेतृत्व फार मोठी भूमिका पार पडू शकतात. कारण नेतृत्वाचा प्रभाव लोकांच्यावर होत असतो म्हणून नेतृत्वाकडून कर्तव्य भावनेनं हे व्हायला हवे.

    उत्तर द्याहटवा
  7. शाश्वत विकासाचे महत्व व गरज .चिकित्सक,विचार प्रवर्तक लेख सर.

    उत्तर द्याहटवा
  8. खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  9. DrS.S.Bodhale अतिशय छान, वैचारिक लेख आहे . धन्यवाद खूप खूप शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा