रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

कोरोना आणि शिक्षण

 
      काही दिवस लॉकडाउनची परिस्थिती अनुभवल्यानंतर, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांचे वर्ष वाया जाण्याचा धोका लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत बदल करणे अपरिहार्य ठरले. विद्यमान शिक्षण पद्धतीचा स्वीकार केल्यापासून प्रथमच ‘खडू आणि फळा’ संस्कृतीप्रती तडत्व निर्माण झालेल्या शिक्षकांना अचानक या बदलास सामोरे जावे लागले. विद्यार्थी तंत्रज्ञान सहज स्वीकारतात. त्यांनी या तंत्राशी स्वत:ला जुळवून घेतले. शिक्षकांनीही झूम, गुगल मीट, वेबेक्स, व्हॉटसअप व्हिडीओ कॉल अशा विविध प्लॅटफॉर्मवर बैठका आयोजित केल्या. अशा अध्यापनाला ऑनलाईन टिचींग असा शब्द रूढ झाला….

‘सह्याद्री’ गगनबावड्याचे आनंद रंगराज आणि त्यांचे तरूण मित्र यांनी मनावर घेऊन प्रसिद्ध केलेल्या पहिल्या दिवाळी अंकासाठी ‘कोरोना आणि शिक्षण’ विषयावरील माझा लेख प्रसिद्ध झाला. तो ‘सह्याद्री’च्या सौजन्याने आपल्यासाठी येथे प्रसिद्ध करत आहे.

___________________________________________________ 

मानवाच्या दृष्टीने, ‘कोरोना संकट’ इतिहासातील काळा अध्याय म्हणून लिहिला जाईल. हा अध्याय कधी पूर्ण होणार, कधी संपणार, याबाबत आजही अनिश्चितता आहे. औद्योगिक क्रांतीनंतर आलेले हे सर्वात गंभीर संकट. त्याचे सावट अद्यापही दूर झालेले नाही. जगभरातील विचारवंत यापुढे कालगणनेमध्ये ‘कोरोनापूर्व’ आणि ‘कोरोनात्तर’ असे दोन भाग पडतील, असे सांगत आहेत. कोरोनाचे सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाले आहेत. उद्योग, पर्यटन, शेती, व्यापार सर्व क्षेत्रे या संकटाने ग्रासली आहेत. उद्योगातील उत्पादन घटले. पर्यटन व्यवसायामध्ये मोठी घसरण झाली. शेतीतील उत्पादन कायम ठेवण्यात शेतकरी यशस्वी ठरत असले, तरी तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये अनंत अडचणी येत आहेत. व्यापारी वर्गास अनेक निर्बंधांना सामोरे जावे लागत आहे. मानवी जीवनाचा प्रत्येक कोपरा कोरोनाच्या संकटाने झाकोळला आहे. शिक्षण व्यवस्था याचाच एक भाग.

शिक्षण क्षेत्रावर फार मोठा परिणाम झाला आहे. काही दिवसानंतर याचे गांभीर्य ठळकपणे समोर येणार आहे. शिक्षणतज्ज्ञांनी शिक्षण व्यवस्था खुली करण्याचे वारंवार मागणी केली आहे. ‘शिक्षण हे एकमेव उन्नतीचे साधन आहे’, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. शिक्षण व्यवस्थेवर आलेल्या या संकटामुळे उन्नतीचे हे एकमेव साधन संकटात आले आहे. शिक्षण व्यवस्थेतील अंगणवाडीपासून विद्यापीठापर्यंतच्या सर्व शिक्षणसंस्थांतील नेहमीचे वातावरण आज दिसत नाही. डिसेंबर २०१९ पासून कोरोनाच्या संकटाची चर्चा सुरू झाली. अनेक राष्ट्रांनी याला गांभिर्याने घेतले नाही. कोरोनाला रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये सर्वांना घरांमध्ये नजरकैद व्हावे लागले.

शाळा आणि महाविद्यालये बंद झाली. ‘युनेस्को’च्या अहवालानुसार, एप्रिल २०२० मध्ये जगभरातील १८८ देशांतील १५४ कोटी विद्यार्थी घरी बसले. भारताचाही यात समावेश आहे. भारतातील पंधरा लाख शाळा आणि पन्नास हजार शिक्षण संस्था बंद आहेत. यामुळे २६ कोटी शालेय विद्यार्थी आणि तीन कोटी सत्तर लाख उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी घरात बसले आहेत. शालेय आणि उच्च शिक्षणातील एकूण एक कोटी चार लाख शिक्षक शाळा-महाविद्यालयांपासून दूर आहेत. सुमारे तीस कोटी विद्यार्थी असे निव्वळ घरात बसून राहणे, हे एका स्फोटक परिस्थितीला निमंत्रण देणारे ठरू शकते. कोरोनाची समस्या ही निव्वळ आरोग्याची समस्या नाही. या समस्येचे आरोग्य हे तत्कालिक दृष्य स्वरूप आहे. याचे सामाजिक परिणाम दिसत आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत होत असलेल्या बदलांचे परिणाम लगेच न दिसता काही दिवसांनंतर, काही महिन्यानंतर, कदाचित काही वर्षांनंतर दिसू लागतील. कोरोना संकटामध्ये विद्यार्थ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. ‘शिक्षण पद्धती अशीच बंद राहिली तर शिक्षण हक्कालाच धोका पोहोचेल’, अशी शंका युनेस्कोच्या महासंचालकांनी व्यक्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल, याचा विचार सुरू झाला.

काही दिवस लॉकडाऊनची परिस्थिती अनुभवल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांचे वर्ष वाया जाण्याचा धोका लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत बदल करणे अपरिहार्य ठरले. विद्यमान शिक्षण पद्धतीचा स्वीकार केल्यापासून प्रथमच ‘खडू आणि फळा’ संस्कृतीप्रती जडत्व निर्माण झालेल्या शिक्षकांना अचानक या बदलास सामोरे जावे लागले. यासाठी त्यांना कोणतेही प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. विद्यार्थी तंत्रज्ञान सहज स्वीकारतात. त्यांनी या तंत्राशी स्वत:ला जुळवून घेतले. शिक्षकांनीही झूम, गुगल मीट, वेबेक्स, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल अशा विविध प्लॅटफॉर्मवर बैठका आयोजित केल्या. अशा अध्यापनाला ‘ऑनलाईन टिचिंग’ असा शब्द रूढ झाला. काही उद्यमी शिक्षकांनी यामध्येही प्रयोग सुरू केले. आपले अध्यापन विद्यार्थ्यांपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी त्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, अध्यापनाशी निगडित चलत्चित्रफिती दाखवण्यास सुरुवात केली. यातुन काही अंशी विषय समजणे विद्यार्थ्यांसाठी सोपे झाले. नॅशनल डिजीटल लायब्ररी, स्वयम्, शोधगंगा, इनफ्लिबनेट अशा मार्गातून ज्ञानाची संसाधने सार्वत्रिक उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न झाले. ते गरजेचेच आहेत. मात्र अपरिहार्यतेतून या तंत्राचा स्वीकार करताना सर्वसमावेशकतेचा विचार न करता ही शिक्षण पद्धती वापरली जात आहे. त्यामुळे ती वर्गातील अध्यापनाइतकी परिणामकारक ठरताना दिसत नाही.

लॉकडाऊननंतर अनेक देशांत दूरशिक्षण, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, यू-ट्यूब, मल्टिमीडिया, मोबाईल, इ-लायब्ररी, दूरचित्रवाणी, ध्वनी आणि ध्वनीचित्रफिती, माहिती तंत्रज्ञान अशा सर्व माध्यमांतून मुलांना अध्ययन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भारतात मात्र परीक्षा रद्द करणे, परीक्षा न घेता मुलांना पुढील वर्गात प्रवेश देणे अशा स्वरूपाचे निर्णय घेतले जाऊ लागले. प्रगत राष्ट्रांमध्ये अशा शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत संधी उपलब्ध आहेत. भारतात मात्र अशी परिस्थिती नाही. माहिती तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचा प्रसार, विस्तार, दर्जा आणि संधी वाढवण्यास आजही मोठी संधी आहे. २०२० मध्ये ‘ट्राय’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतात ६८ कोटी ४५ लाख लोक आंतरजाल (इंटरनेट) वापरतात. भ्रमणध्वनी वापरणाऱ्यांची संख्या ४८ कोटी ८२ लाख इतकी आहे. आंतरजालासह भ्रमणध्वनी वापरणाराची संख्या ४० कोटी ७२ लाख इतकी आहे. दूरचित्रवाणी पाहणाराची संख्या ७६ कोटी आहे. हा माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार मोठा वाटत असला, तरी भारताची लोकसंख्या १३८ कोटी इतकी प्रचंड आहे. भारतातील एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के लोकांकडे आंतरजाल सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच सुमारे पन्नास टक्के लोक आंतरजाल सुविधेपासून दूर आहेत. ग्रामीण भागातील ६४ टक्के जनता आंतरजाल सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत. शहरातील हेच प्रमाण ३६ टक्के इतके आहे. त्यामुळे ही विषमता टोकाची दिसून येते. आंतरजाल सुविधेपासून वंचित असणारा वर्ग आर्थिकदृष्ट्याही कमकुवत आहे. आंतरजाल सुविधेसह भ्रमणध्वनी असला तरी त्याच्या डाटासाठी द्यावे लागणारे अधिकचे शुल्क, विद्युत पुरवठा इत्यादीचा अधिकचा आर्थिक भार अनेक कुटुंबाना परवडत नाही. अखंडित वीज पुरवठा आणि सक्षम भ्रमणध्वनीसाठी आंतरजाल उपलब्धता या समस्याही गंभीर आहेत. भारताप्रमाणेच अनेक विकसनशील देशांत परिस्थिती आहे. त्यातील काही देशांनी अध्यापनासाठी आंतरजालापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचलेल्या दूरचित्रवाणीसारख्या संसाधनाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. भारतात मात्र या संसाधनाची म्हणावी तशा चर्चा झाली नाही. खरं तर, भारतात नऊशेपेक्षा जास्त दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत. मात्र या वाहिन्यांचा शैक्षणिक कारणांसाठी किती उपयोग केला जातो? 

 असे असले तरी ‘ऑनलाईन’ शिक्षण पद्धती आता रूजू लागली आहे. ‘शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू राहिले पाहिजे’, या धोरणानुसार आजची शिक्षण प्रक्रिया सुरू आहे. ही शिक्षण पद्धती प्रचलित शिक्षण प्रक्रियेला पर्याय ठरू शकते का? याचा विचार करणे आवश्यक आहे. ‘शिक्षणाचा उद्देश मिळणारे चौफेर ज्ञान आत्मसात करणे आणि त्यातून चांगले व्यक्तिमत्व घडवणे’, हा आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा खूप मोठा वापर करता येऊ शकतो. या तंत्राचे निश्चित काही फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे काही महिने शिक्षण व्यवस्थेपासून दूर राहिलेले विद्यार्थी आणि शिक्षक परस्परांशी आभासी पद्धतीने का होईना, संवाद साधू लागले आहेत. शिक्षक आपली पारंपरिक ‘खडू-फळा संस्कृती’ सोडून ‘तंत्रस्नेही’ बनत आहेत. शहरातील विद्यार्थ्यांना मिळणारे दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळू लागली आहे. मोबाईलवर खेळत बसणे, दूरचित्रवाणीवरील कॉमिक्स पाहणे, याऐवजी मुले ऑनलाईन अभ्यास करू लागली आहेत. मुले अभ्यास करतात की नाही, यावर पालकांना लक्ष देता येऊ लागले आहे. शाळेत सहा तास जाणे, जाण्या-येण्यासाठी लागणारा वेळ, शिकवणीसाठी लागणारा वेळ आणि खर्च वाचू लागला आहे. तंत्रज्ञान आत्मसात करण्यास मुले नेहमी तयार असतात. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शिकण्यास मुले उत्सुक आहेत. आंतरजालांवरील उपलब्ध ज्ञानाचा वापर करणे मुलांनी स्वीकारले केले आहे.

अनेक फायदे दिसत असले, तरी ऑनलाईन शिक्षण’ पद्धतीचे अनेक नकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. विद्यार्थांना अनुभवातून शिकलेले चांगले लक्षात राहते. मात्र प्रयोग करणे, अनुभवातून शिक्षण घेणे या पद्धतीतून साध्य करता येत नाही. भ्रमणध्वनीवरील आंतरजाल सुविधेची उपलब्धता, विद्युत पुरवठ्याची अनुपलब्धता, लॅपटॉप, भ्रमणध्वनीची उपलब्धता अशा अनेक गोष्टींमुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वंचित विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये थेट संवाद होत नसल्याने शिक्षकांनी शिकवलेले विद्यार्थ्यांना समजते की नाही, याचा अंदाज बांधणे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांना शिकवलेले समजलेले पाहून शिक्षकांना मिळणारे समाधान ऑनलाईन पद्धतीत मिळू शकत नाही. इलेक्ट्रॉनिक संसाधनाचा अतिवापर मुलांच्या आरेाग्यासाठी घातक ठरत आहे. भ्रमणध्वनी, संगणक, लॅपटॉप दीर्घकाळ पडद्याकडे पाहिल्याने डोळ्यांचा त्रास, पाठदुखी, कानांचे विकार वाढत आहेत. वर्गातील प्रत्यक्ष अध्यापनामध्ये शिक्षक अभ्यासक्रमबाह्य दाखले, माहिती देत असतात. ऑनलाईन शिक्षणामध्ये शिक्षक काटेकोरपणे केवळ अभ्यासक्रमाशी निगडित चर्चा करतात. त्यामुळे वर्गात खूप छान शिकवणारे काही शिक्षक ऑनलाईन पद्धतीत कंटाळवाणे वाटतात. विद्यार्थी बहुतांश वेळ ऑनलाईन असताना आक्षेपार्ह संकेतस्थळावर भेट देण्याची शक्यता असते.

जे विषय प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासावयाचे असतात, त्यांची मोठी अडचण झाली आहे. शिक्षण संस्था बंद असल्याने प्रत्यक्षिके होत नाहीत. प्रात्यक्षिक होत नसल्याने ते कसे करावयाचे याचे केवळ ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन विद्यार्थी ते कौशल्य आत्मसात करू शकत नाहीत. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांचे कौशल्‍य देण्यासाठी तो प्रयोग करण्याची प्रत्यक्ष संधी त्यांना मिळणे आवश्यक असते. मात्र, असे घडत नाही. विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानसशास्त्रासारख्या विषयांच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांखेरीज दिले जाणारे शिक्षण परिणामकारक बनवण्यासाठी निश्चितच सक्षम ठरू शकत नाही.  

वर्गातील, शाळेतील इतर मित्र-मैत्रिणींशी भेट होत नसल्याने मुले एकलकोंडी बनू लागली आहेत. अधिक वेळ ऑनलाईन कार्य करण्यातून ऑटिझ्‍म हा आजार उद्भवण्याची शक्यता असते. शाळेतील खेळांचे तास, त्यामध्ये होणारी दंगामस्ती, चिडणे, चिडवणे, धडपडणे  या साऱ्या गोष्टीला बालगोपाळ मुकले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तर हे सुवर्ण दिन असतात. अभ्यास, कला, क्रीडा क्षेत्रांत प्राविण्य दाखवायचे, मित्र-मैत्रिणींना भेटायचे, प्रेमात पडायचे हे दिवस! ऑनलाईन शिक्षणाने त्यांचा शिक्षणाबरोबर शिक्षणबाह्य आनंदही हिरावला गेला आहे. आवाज आणि शिक्षकाचे चलचित्र माध्यमातील बोलणे स्पष्ट ऐकता यावे, दिसावे यासाठी इतरांचे कॅमेरा बंद असतात. त्याचा गैरफायदा काही अतिहुशार विद्यार्थी घेतात. ते निव्वळ स्वत:ला त्या तासाला जोडतात आणि इतर उद्योग करत असतात. त्यांचे  अध्यापनाकडे लक्षच नसते.

शिक्षक आता अध्यापन पद्धतीला सरावत आहेत. गांभीर्याने शिकू इच्छिणारे विद्यार्थीही नवे तंत्रज्ञान स्वीकारून ज्ञानसाधना करत आहेत. ‘मोबाईल बाजूला ठेवा’, असे सांगणारे पालक आता ऑनलाईन तासासाठी ‘मोबाईल घेऊन बसा’ असे सांगत आहेत. मात्र  सर्वच विद्यार्थी गांभीर्याने शिक्षण घेत नाहीत. चार ते पाच तास ऑनलाईन राहणे विद्यार्थ्यांना अडचणीचे आणि कंटाळवाणे ठरत आहे. अध्ययन करणारे करत आहेत, अभ्यास टाळू पाहणारे, शिकण्याचे टाळत वेळ वाया घालवण्याचे काम करत आहेत. यातून अध्ययन चांगले होत आहे, असे खात्रीने सांगण्यासारखी परिस्थिती सध्या नाही. शिक्षण पद्धतीत तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन! यातील अध्यापन ऑनलाईन सुरू आहे. अध्ययन विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार सुरु आहे. मूल्यमापन हा तिसरा महत्त्वाचा भाग सध्या अडचणीमध्ये आहे. नामवंत व्यवस्थापन तज्ज्ञ पीटर ड्रकर यांच्या मताननुसार अर्थप्राप्तीचे मूळ ज्ञानवृद्धिंगतेवर आहे. ‘ऑनलाईन’ शिक्षणपद्धती किती ज्ञानवृद्धिंगत करते हे तपासणे सध्याच्या मूल्यमापन व्यवस्थेतून नेमके समजू शकत नाही.   

सध्या परीक्षाही ऑनलाईन पद्धतीमध्ये घेण्यात येतात. या परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित घेण्यात येत आहेत. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांचे एखाद्या विषयाचे सर्वंकष आकलन तपासले जाणे अपेक्षित असते. त्याचं हेतूने विद्यार्थ्यांची मौखिक परीक्षा घेण्यात येतात. लेखी परीक्षा घेताना प्रश्नांची भिन्न स्वरूपात मांडणी असणे आणि त्याची काठिण्यपातळी किती आणि कशी असावी, हे तज्ज्ञांचे मंडळ निश्चित करून देत असते. यामध्ये वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी, टिपात्मक, टिकात्मक असे प्रश्नांचे स्वरूप प्रमाणासह निश्चित करून देण्यात आलेले असते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या वस्तुनिष्ठतेपासून विश्लेषण करण्याच्या क्षमतेपर्यंत सर्व काही तपासता यावे, हे अपेक्षित असते.

सध्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतात. यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांखेरीज इतर प्रकारचे प्रश्न योजणे आणि त्याआधारे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची पडताळणी करणे अपवादानेच घडते. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष परीक्षा न घेताच निकाल लावण्याचे अद्भुत कार्य कोरोना काळात अनुभवण्यास मिळाले.

न्यूटन शिकत असताना प्लेगची साथ आली होती. त्यावेळी त्या भागातील सर्व शिक्षण संस्था बंद झाल्या होत्या. त्या काळात ते वर्ष विद्यार्थ्यांच्या शिक्षण कालखंडात शून्य वर्ष म्हणून गृहित धरण्यात आले होते. मात्र परीक्षा घेण्यात आल्या नव्हत्या. अर्थात त्या काळात तंत्रज्ञान आजच्याइतके प्रगत नव्हते. कोणत्याच माध्यमातून अध्यापन झालेले नव्हते. आज ऑनलाईन पद्धतीतून अध्यापन होत आहे. त्यामुळे किमान ऑनलाईन परीक्षा आज होत आहेत. मात्र काही वर्गांच्या परीक्षा न घेताच निकाल जाहीर न करणे अनाकलनीय आहे. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे आकलन झाले किंवा नाही, याचे मूल्यमापन होणे शक्य नाही.

फार वर्षांपूर्वीच शिक्षण व्यवस्थेच रूप बदलणे आवश्यक होते. शिक्षण व्यवस्थेतील अध्यापन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्हावे, यासाठी शिक्षण संस्थांना मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात आले. त्यातून डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टर्स, आंतरजाल सुविधा, कम्युनिटी रेडिओ केंद्राची उभारणी, दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे निर्मिती, स्वयम्साठी अभ्यासक्रमावर आधारित, आकलन समृद्ध करणाऱ्या चलत‌चित्रफितींची निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध करून देण्यात आले. या अनुदानातून साहित्य खरेदी करण्यातही आले. मात्र अनेक संस्थांमध्ये असे घेतलेले साहित्य वापराविना पडून होते. कोरोनाच्या संकटाने यातील अनेक उपकरणे वापरली जाऊ लागली आहेत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. कोरानाचा अनेक क्षेत्रांवरील प्रभाव अजूनही पूर्ण नाहीसा झालेला नाही. शिक्षण व्यवस्थेवरचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. या संकटातून अध्यापनाचे नवे सापडलेले तंत्र अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. या तंत्रामध्ये सुधारणेला मोठा वाव आहे. नवी फिचर्स यामध्ये येत आहेत. यातून ऑनलाईन शिक्षण प्रणाली आणखी कार्यक्षम होईल. अर्थात कोरोनाचे संकटही दूर होईल. पुन्हा मुले शाळेत बागडू लागतील. महाविद्यालये तरूणाईने फुलतील आणि शिक्षण व्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येऊन सक्षम नागरिक घडवू लागेल. मात्र कोरोना काळात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य त्यांच्याच हाती असणार आहे. त्यांनी या काळातही मनापासून अभ्यास करणे, ज्ञान संपादन करणे आणि स्वत:ला सिद्ध करणे याची जबाबदारी विद्यार्थ्यांवरच अधिक आहे, हे जाणून शिकायला हवे!    

-०-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा