शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

नाते गुरू- शिष्याचे!

 

प्राचीन काळात भारतातच नव्हे, तर जगातील विविध देशात शिक्षण हे धर्मशिक्षणाचा भाग होते. विद्यार्थ्याला नीतीमान, ज्ञानी बनवण्यासाठी अध्यात्म आणि तत्वज्ञानाची बैठक देणारी शिक्षण पद्धती जगभरात निर्माण झाली. पाश्च्यात राष्ट्रात विद्यार्थी किंवा शिष्य हा मठात जाऊन शिक्षण घेत असे. त्याला तेथे धर्मगुरू शिक्षण देत. पुढे शाळा ही संकल्पना पाश्चात्य राष्ट्रांत अस्तित्वात आली. ज्यांना धर्मगुरू व्हायचे, तेच मठामध्ये शिक्षणासाठी जाऊ लागले. ज्यांना राज्यकारभर करावयाचा आहे, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्य करावयाचे आहे, असे विद्यार्थी शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेत. त्यांच्यामुळे पाश्चात्य राष्ट्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानात भरीव कार्य झाले. ज्ञानाचे केवळ निष्कर्ष न अभ्यासता, प्रयोग करण्याची आणि प्रचिती घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असे. धर्मप्रसाराचे कार्य करू इच्छिणारे शिष्य, मठातील शिक्षण संपवून जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन धर्मरक्षण आणि प्रसाराचे कार्य करत. यातून ग्रेगर मेंडेलसारखा एखादाच संशोधनाचे कार्य करू शकला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास, प्रसार आणि प्रचार पाश्चात्य राष्ट्रात भारताच्या अगोदर झाला. त्यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी शिक्षकाबरोबर विविध ग्रंथांची उपलब्धता झाली. मात्र अगदी पंधराव्या शतकापर्यंत ग्रंथ बाळगणे सामान्यांच्या कुवतीबाहेर होते.

भारतातील शिक्षण पद्धतीत मात्र असे कोणतेही मोठे बदल झाले नाहीत. शिष्य कोणते शिक्षण घ्यावयाचे, हे अगोदर ठरवत असे. त्यानुसार त्या विद्येमध्ये पारंगत असणाऱ्या गुरूची निवड करत असे. त्यानंतर तो गुरूगृही जाऊन अध्ययन करायचा. गुरूगृही त्याला आपले घर असल्याप्रमाणे शिष्याला राहावे लागे. घरातील कामे करणे, जनावरांची देखभाल करणे, गुरूगृही किंवा आश्रमात पडेल ते आणि सांगण्यात येईल ते काम करणे क्रमप्राप्त असे. सुरुवातीला गुरू शिष्याची पात्रता ओळखत. गुरू त्याची चाचणी घेत. तो कोठपर्यंत ज्ञान आत्मसात करू शकेल, याचा अंदाज घेत आणि नंतरच त्याचा खऱ्या अर्थाने शिष्य म्हणून स्विकार करत. ही गुरू-शिष्य परंपरा अनेक वर्षे सुरू होती. पुढे राजदरबारी पंडीत किंवा गुरू येऊ लागले आणि राजधानीतच राजकुमार, सरदारपुत्र शिक्षण घेऊ लागले. हीच शिक्षण पद्धती इंग्रज येईपर्यंत सुरू होती. त्या शिक्षण पद्धतीत गुरूबद्दल नितांत आदर असे. ‘गुरू आज्ञा प्रमाण’ मानली जात असे. गुरू आज्ञेचे उल्लंघन झाल्यास शिष्य शिक्षेस पात्र असे. गुरूच्या इच्छेप्रमाणे आणि त्या स्वरूपात परीक्षा घेतली जाई. गुरूंने सांगितलेली गोष्ट शिष्याला पाळावीच लागे. आश्रमातील सर्व नियमांचे पालन करावे लागे. त्यासाठी विद्यार्थ्यास सुरुवातीला कोणतेही शुल्क आकारले जात नसे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरूदक्षिणा दिली जात असे. गुरू शिष्याच्या कुवतीप्रमाणे दक्षिणा मागत. काही वेळा ही गुरूदक्षिणा देण्याची कुवत नसली, तरी जीवाची बाजू लावून, ती अदा करत. पांडवानी युद्ध करून गुरूदक्षिणा दिली. एकलव्याने धनुर्विद्येसाठी अत्यावश्यक असणारा, अंगठा देऊन गुरूदक्षिणा दिली. मात्र एरवी गुरू शिष्याला देता येईल, अशीच दक्षिणा मागत.

हीच शिक्षण पद्धती इंग्रज येईपर्यंत अस्तित्वात होती. मूठभर इंग्रजांनी खंडप्राय देशावर सत्ता निर्माण केली. येथील राज्यकारभार सांभाळताना आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता व्हावी, म्हणून शिक्षण व्यवस्था निर्माण केली. ही शिक्षण व्यवस्था सर्वांसाठी खुली होती. यामधून त्यांना आधिकाऱ्यांपेक्षा, हाताखाली काम करणारा कर्मचारीवर्ग तयार करायचा होता. या शिक्षण पद्धतीतही पूर्वी ज्यांना शिक्षण खुले होते, तेच शिक्षक होते. त्यामुळे शाळेत वर्णव्यवस्थेप्रमाणे विद्यार्थ्यांना वागणूक मिळे. महात्मा जोतिराव फुले, विठ्ठल रामजी शिंदे यांनी समता आणण्याचा प्रयत्न केला. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात याचा पाया घातला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अनेक संस्थाचे जाळे विणले. त्यातून बहुजन समाज शिकला. नवीन शिक्षक तयार झाले आणि आजचे शिक्षक-विद्यार्थी नाते असणारी व्यवस्था तयार झाली.

आधुनिक शिक्षण व्यवस्थेतही शिक्षकांबद्दल नितांत आदर आहे. हा आदर ‍किंवा शिक्षकांबद्दलच्या विद्यार्थ्यांच्या मनातील भावना, अगदी ९० च्या दशकांपर्यंत कायम होत्या. या दशकात ‘खाउजा’ संस्कृती उदयास आली. यातून नवतंत्रज्ञान जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. मात्र तोपर्यंत शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या मनात सर्व काही असायचा. सर्वज्ञानी शिक्षकांनी सांगितलेले वाक्य हे ब्रम्हवाक्य असायचे. स्वत: दुसऱ्या शाळेत त्याच वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकाचा पाल्य, आपल्या मुलाला जरा काही वेगळ्या पद्धतीने गणिताची पद्धत सांगू लागला, तर तो गुरूभक्त शिष्य आपल्या वडिलांना ‘असं नाही. आमच्या सरांनी/मॅडमनी असं शिकवलयं.’ असे सांगत असे. शिक्षकांने सगितलेले सर्व काही खरे मानले जात असे. त्या काळात शिक्षकांना विद्यार्थ्यांना मारण्याची मुभा होती. काही शिक्षक चांगलेच बडवून काढत. काही शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या पोटाला चिमटा काढायची सवय होती. शिक्षकांनी मारले म्हणून घरात सांगायची सोय नव्हती. ‘कार्ट्या, तूच चूकला असशील. काय खोडी केली सांग’, म्हणत पुन्हा घरातल्यांचा मार मिळायचा. असा दुहेरी मार खाण्यापेक्षा गुरूजी किंवा शिक्षकांच्या मारावर थांबलेले बरे. असाच विचार बहुतांश मुले करत असत. शिक्षक गल्लीत आले तरी मुले दुसरीकडे पळून जात. गुरूजी घरातल्यांशी बोलू लागले तर मुले दाराआड उभा राहून चोरून ऐकायची, पण समोर यायची नाहीत. गुरूजींचा, दरारा, धाक, आदर, ‍भिती सर्व काही यात असे. आपली जिज्ञासा पूर्ण करण्याचे साधन गुरूजी किंवा शिक्षक असायचे.

शिक्षक आणि मुलांचेच नाही तर पालकांचे, गावकऱ्यांचे गुरूजींशी, शिक्षकांशी वेगळेच नाते तयार झालेले असायचे. गावही गुरूजींचा शब्द प्रमाण मानत असे. गुरूजी अडाणी गावकऱ्यांचे पत्र वाचून दाखवायचे आणि लिहून द्यायचे. गावकरी शेतातील भाजी, गायीचा खरवस गुरूजींच्या घरी आवर्जून पाठवायचे. शिक्षकाची गावातून बदली झाली की अख्खी शाळा रडत असे. गाव त्यांना निरोप द्यायला लोटायचा. गावातील सुखदु:खात सावरायला गुरूजी असायचे आणि गुरूजीला हवं नको ते पाहायला गाव असे. गुरूजी अख्ख्या गावाचे असायचे. गुरूजींसाठीही गाव तितकाच जवळचा झालेला असायचा. पुढे गुणांची शर्यत लागली. शिक्षकांनी स्वत:ला बदलून घेतले. मुले गुणांच्या शर्यतीत मागे राहू नयेत, म्हणून सकाळी, संध्याकाळी शाळेव्यतिरिक्त वेळ ते मुलांचा अभ्यास करून घेण्यासाठी घालवत. मुलांना रात्री अभ्यास करता यावा, यासाठी दिव्याचे तेल स्वत:च्या पगारातून जाळत. या नात्यात व्यवहार नव्हता. प्रेम होते, आपुलकी होती. ती टिकवून ठेवण्याचे कार्य दोन्ही बाजूकडून पार पाडण्यात येत असे.

पुढे खाउजा संस्कृती आली आणि चित्र वेगाने बदलले. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणामध्ये भौतिक सोयीसुविधा सहज उपलब्ध होऊ लागल्या. गुरूजींना गावात राहण्यापेक्षा शहरात राहणे आवडू लागले.‍ शिक्षकांच्या वेतनातही सुधारणा झाली. ते गावात राहिनासे झाले. गावाशी जोडलेले नाते दुरावले. तरीही मुलांच्या मनात आपल्या शिक्षकांविषयी तशीच आदराची भावना होती. आजही ती बऱ्याच अंशी आढळून येते. मात्र पूर्वीइतके ते दृढ राहिलेले नाही. अँड्रॉईड फोन आल्यानंतर तर आणखी वेगाने चित्र बदलले. अनेकांना शिकवणे हे पैशाच्या बदल्यात करायचे काम वाटू लागले. पूर्वी अत्यंत तोकड्या पगारात पूर्ण निष्ठेने कार्य करणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण कमी झाले असल्याचे शिक्षणतज्ज्ञ सांगतात. अजूनही पूर्ण क्षमतेने योगदान देणारे शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षकांवरचा विश्वास कायम आहे.

मात्र हा विश्वास कायम ठेवण्यासाठी आता शिक्षकांना स्वत:चे ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक बनले आहे. कोरोनाने शिक्षकांना ‘चॉक अँड टॉक’ संस्कृतीतून बाहेर आणले. ‘ऑनलाईन शिक्षण’ पद्धती अस्तित्वात आली. काही वर्षांपूर्वी ‘असे कधी शिकवणे असते का’, असे विचारणारे शिक्षकही ऑनलाईन वर्ग घेऊ लागले. मुलांच्या हाती मोबाईल देणे पालकांना भाग पडले. मुले त्यातून अभ्यासाबरोबर अतिरिक्त ज्ञानही घेऊ लागली. अभ्यासात पडणाऱ्या शंकाची उत्तरे देणारे ‘गुगल गुरू’ मुलांना भेटले. त्यातून मुलांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत आहेत. उलट मुले शिक्षकांकडून प्रश्नांच्या उत्तरांची खात्री करून घेत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी समाजमाध्यमांवर मित्र बनले आहेत. अनेक कार्यक्रमात एकत्र येतात. शिक्षकाबद्दल भिती नष्ट होत आहे. यातून आधिक चांगला सुसंवाद निर्माण होऊन ज्ञानग्रहण सुकर व्हावे. अर्थात यात काही चूकीच्या गोष्टी घडत आहेत. काहीही असले तरी शिक्षकांची भिती जाऊन आता मित्रत्वापर्यंत नाते आले आहे, हे मात्र खरे! 

  (बदलते जग २०२२ दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख.)

  

 

२ टिप्पण्या:

  1. शिक्षण पद्धतीचे बदलते टप्पे व गुरु शिष्यांचे बदलते नाते याचे सुंदर चित्रण या लेखात असते आहे. सुंदर लेख

    उत्तर द्याहटवा
  2. गुरू-शिष्य नात्याची हाताळणी बदलली आहे पण नात्याच्या गाभ्याला आज तारखेस धक्का पोहोचला नाही नक्कीच.
    उत्तम लेख.

    उत्तर द्याहटवा