Shivaji Univeristy लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Shivaji Univeristy लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

सर्वांगीण विकासासाठी झटणारी गुरुमाता : वैशाली धायगुडे मॅडम

 शिक्षक दिन विशेष :

विद्यार्थी जीवनामध्ये अनेक शिक्षक भेटतात. त्यांच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांचे दान ते विद्यार्थ्यांना देतात. त्यातून विद्यार्थी घडत जातो. विषयाचे अध्ययन सुरू असताना स्वंयअध्ययन करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक असते. हे कौशल्य ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त होते, ते विद्यार्थी घडतात. असे विद्यार्थी घडवणारे शिक्षक मला लाभले, हे माझे भाग्य. माझ्या आयुष्यात भेटलेल्या शिक्षकांपैकी एक महत्त्वाच्या शिक्षिका म्हणजे वैशाली धायगुडे मॅडम. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सेवेत असताना आणि नंतरही कायम कार्यरत मॅडमचे ऋण कधीच फेडता येणार नाहीत. आजच्या शिक्षकदिनी त्यांच्याबद्दलच्या काही साठवणीतील आठवणी….

________________________________________________________

 शिक्षक हा खऱ्या अर्थाने शिल्पकार असतो, विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो आणि कुंभार जसा मातीला आकार देतो, तसा शिक्षक आकार देत असतो, असे म्हणण्याला काही अर्थ नाही. त्याचे कारण म्हणजे कुंभार एकदा तयार केलेल्या चिखलातून हव्या तशा मूर्त्या बनवत असतो. त्याला एकाच आकाराच्या, प्रकारच्या मूर्त्या बनवता येतात, तसे शिक्षकाचे नसते कारण एका वर्गात विशिष्ट अर्हता धारण करून प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना हवे ते उद्दिष्ट गाठून देण्याचे कार्य शिक्षकाला साध्य होत नाही. कारण माती कुंभाराच्या इशाऱ्यानुसार वळत असते. ती विरोध करत नाही. तसे विद्यार्थ्यांचे नसते. ते शिक्षकाच्या इशाऱ्याप्रमाणे वागत नाहीत. चांगले गुरू, शिक्षक सर्वच विद्यार्थ्यांना चांगले घडविण्याचा प्रयत्न करत असतात. सर्वांना समान संधी देत असतात. मात्र शिक्षकाने दिलेले हे दान घेण्याची ज्यांची पात्रता असते, ते विद्यार्थी घडतात. असे प्रत्येक वर्गात काही विद्यार्थी असतात. त्याची गरज ओळखून त्यांना शिक्षक सहकार्य करतात. शिक्षकांच्या ते लक्षातही येतात. मात्र केवळ त्यांच्यावर लक्ष न देता संपूर्ण वर्गाला ते सुसंस्कारित करण्याचा प्रयत्न करत राहतात. असेच आयुष्यभर असिधारा व्रत घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षिका मला माझ्या पदवी अभ्यासाच्या वेळी भेटल्या आणि त्यांनी माझ्याप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. या शिक्षिका म्हणजे वैशाली नागेश धायगुडे मॅडम.

बार्शीच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालो, मात्र कसाबसा प्रथम श्रेणी घेऊन. तेवढ्या गुणांवर या महाविद्यालयात बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमाला मला प्रवेश देता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स विषयाला कोठे प्रवेश मिळू शकेल, याचा शोध घ्यायला सुरुवात केली. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात १९८४ साली जवळपास एक महिना वास्तव्य केले होते. वस्तीगहात राहताना या महाविद्यालयाचा परिसर मनापासून आवडला होता. या महाविद्यालयाचा परिसर बार्शीच्या कॉलेजपेक्षा खूपच सुंदर होता. मी दयानंद महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो का याची गावातील आबासाहेब शिंदे यांना चौकशी करायला सांगितले. आबासाहेब त्यावेळी रसायनशास्त्र विभागात प्रयोगशाळा सहाय्यक होते. त्यांनी चौकशी करून प्रवेश मिळू शकतो असे सांगितले. वडील प्राथमिक शिक्षक असल्याने कोणतीही आधिकची फी भरावी लागणार नव्हती.

मी जून १९८६ मध्ये सोलापूरला जाऊन दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रवेश घेताना प्रथम वर्षासाठी इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र हे विषय निवडले. दयानंद महाविद्यालयात एक वेगळी संस्कृती होती. प्रत्येक विभागाला वेगळी इमारत होती. आंतरविभागीय विषय हवामानशास्त्र, जैवरसायनशास्त्र असे विषय द्वितीय वर्षाला निवडता येत होते. पायाभूत सुविधा जशा प्रशस्त होत्या, तसेच विशाल मनाचे शिक्षक होते. महाविद्यालयाची गुणवत्ता टिकून राहावी यासाठी वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक बारावीच्या वर्गाला शिकवत असत. त्याचप्रमाणे प्रथम वर्षासाठी ज्येष्ठ शिक्षक अध्यापन करत असत. (आता ही अध्यापन संस्कृती राहिली नाही, असे ऐकावयास मिळते.) परिणामी त्या विषयाकडे विद्यार्थी आकर्षित होत असत.

पहिल्या वर्षी भौतिकशास्त्र शिकवण्यासाठी विभागप्रमुख मनगोळी सर, डॉ. नागेश धायगुडे आणि प्रा. वैशाली धायगुडे मॅडम होते. मनगोळी सरांची मातृभाषा मराठी नसावी. मात्र अत्यंत सोप्या इंग्रजीत मध्येच मराठी शब्द वापरत ते खूप सुंदर पद्धतीने जनरल फिजिक्सचा भाग शिकवत असत. दुसरा पेपर होता तो इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिजमचा हा पेपर धायगुडे सर आणि मॅडम शिकवत असत. सरांचे अक्षर आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत इंग्रजीतून शिकवण्याची पद्धत मुलांना भावत असे. मॅडमकडे त्यातील अवघड, विद्यार्थ्याला समजायला कठीण वाटणारा भाग असायचा. त्या आयआयटीमध्ये शिकायला असल्याने त्यांना कठीण भाग देतात, अशी विद्यार्थ्यात कुजबूज असायची. त्याही इंग्रजी माध्यमातून शिकवत. मात्र मुलांना काही समजले नाही तर मराठीतूनही समजावून सांगत. मॅडमची शिकवण्याची पद्धत वेगळी. तीन शिक्षक, तिघांच्या शिकवण्याच्या पद्धती वेगळ्या. मात्र विद्यार्थी या तिघांच्याही शिकवण्यामुळे भौतिकशास्त्र विषयाच्या प्रेमात पडत.

दुसऱ्या वर्षी यातील एक विषय सोडावा लागत असे. मी रसायनशास्त्र विषय सोडून इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय निवडले. दुसऱ्या वर्षी जाधव सर, धायगुडे मॅडम आणि धायगुडे सर काही तास घेत असत. दुसरे वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकच विषय निवडावा लागत असे. तोपर्यंत धायगुडे सर आणि मॅडमच्या शिकवण्यामुळे माझ्या मनावर भौतिकशास्त्राने बराच कब्जा करायला सुरुवात केली होती. इलेक्ट्रॉनिक्स तरीही आवडत होते. इलेक्ट्रॉनिक्स की भौतिकशास्त्र यामध्ये शिक्षकाच्या अध्यापनाने इलेक्ट्रॉनिक्स विषय बाजूला पडला आणि मी भौतिकशास्त्र विषय घेऊन पदवी अभ्यासक्रम घ्यावयाचे निश्चित केले.

तसा प्रथम वर्षापासून शैक्षणिक उपक्रमाबरोबर वक्तृत्व, निबंध स्पर्धामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. महाविद्यालयातील एखाद्या विद्यार्थ्याने क्रीडा, सांस्कृतीक स्पर्धेत यश मिळवले तर त्याचे नाव लिहिलेला फलक दर्शनी भागात लावलेला असे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काही दिवसातच या संस्कृतीची ओळख झाली आणि आपलं नावपण असंच बोर्डवर झळकले पाहिजे, असे मनात येऊन गेले. आपला प्रांत सांस्कृतीक होता. माझ्‍या शालेय जीवनामध्ये निबंधाचे चांगलंच कौतुक करण्यात येत असे. निबंध स्पर्धा हा प्रकार आपल्याला पेलवेल असे वाटले. काही दिवसातच जायंटस ग्रुप ऑफ सोलापूर यांच्या निबंध स्पर्धेची जाहिरात आली. चार-पाच विषय होते. त्यातील ‘अंमली पदार्थांचे दुष्परिणाम’ या विषयावर १००० शब्दापर्यंतचा निबंध लिहून पाठवायचा होता. मी त्याबाबत काही संदर्भ शोधून छान निबंध तयार केला आणि मुदतीत टिळक चौकातील दिलेल्या पत्त्यावर नेऊन दिला. निकालाची उत्सुकता होती. अशा स्पर्धेत भाग घ्यायचा पहिलाच प्रसंग होता. त्यावेळी मोबाईलचे युग कल्पनेतही नव्हते. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी छापून आली. त्या काळी संचार, केसरी गर्जने, विश्वसमाचार, तरूण भारत अशी काही मोजकी दैनिके सोलापूरातून प्रकाशित होत असत. तोपर्यंत माझ्या वर्गातील सर्वांशी ओळखीही झाल्या नव्हत्या. आम्ही सकाळी चहा घ्यायला टपरीवर गेलो. तेथे आमचे चहा-नाष्टा घेत पेपर वाचन चालत असे. चहा घेत असताना राजेंद्र शिंदे या वर्गमित्राने येऊन प्रथम माझे अभिनंदन केले. ते पेपरचे पान घेऊन क्षणात बातमी वाचून काढली. पहिल्यांदाच माझे नाव छापून आलेले होते. खूप आनंद झाला होता. तब्बल तीनशे रूपयांचे पहिले बक्षीस (त्यावेळी महिन्याला खानावळीसाठी मला १४० रूपये द्यावे लागत) मिळाले होते. आता ही बातमी शिक्षकांना आपण कशी सांगायची, असे मनात होते.

मात्र प्रॅक्टिकलसाठी भौतिकशास्त्र विभागात गेलो आणि मॅडम आम्हाला प्रॅक्टिकलला नसतानाही, पहिल्या वर्षाच्या प्रयोगशाळेत आल्या. माझे चुलतबंधू सुरेश शिंदे हे धायगुडे सर आणि मॅडमचे फॅमिली फ्रेंड होते. त्यामुळे त्यांचा माझा परिचय होता. त्यांनी बातमी वाचली होती. त्या माझ्याजवळ आल्या आणि विचारले, ‘तुम्ही निबंध स्पर्धेत भाग घेतला होता का?’ मी ‘हो’ म्हटले. त्या लगेच मोठ्याने म्हणाल्या ‘जायंटस क्लबच्या निबंधस्पर्धेत विलास शिंदेना पहिले बक्षीस मिळाले आहे, त्यांचे अभिनंदन.’ एकिकडे आपण स्वत: शिक्षकांना कसे सांगायचे, असा मी विचार करत होतो. हा प्रश्न मॅडमनी चुटकीसरशी सोडवला होता. पुढे त्यांनी मला कोणाचे मार्गदर्शन घेतले, आणखी काय लिहिता, असे बरेच प्रश्न विचारले. या स्पर्धेसाठी मी कोणाचेच मार्गदर्शन घेतले नाही, असे सांगितले. तसेच कविता लिहितो, हे ही सांगितले. ‘तुम्हाला साहित्यात रस असेल, तर तुम्ही वनस्पतीशास्त्र विभागातील शाम कुलकणी सरांना भेटा असे आवर्जून सांगितले.

मी शाम कुलकर्णी सरांना भेटलो आणि ‘अक्षरमंच’ या महाविद्यालयाच्या भित्तीपत्रकाचे काम पाहू लागलो. यातून आमच्या वर्गात शिकणाऱ्या नरेंद्र अंभोरे यांचा परिचय झाला. अंभोरे यांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी संपादक म्हणून काम करता आले. दुसऱ्या दिवशी जायंटस क्लबचे पत्र मिळाले माझे नाव बोर्डवर लागले. पुन्हा एकदा अभिनंदन झाले. माझे अल्पकालीन ध्येय साध्य झाले होते. पुढे ज्या-ज्या स्पर्धेची जाहिरात येईल त्या सर्व स्पर्धात भाग घेऊ लागलो. मध्येच एक दिवस कामत सरांनी, ‘निबंध स्पर्धेला पाठवण्यापूर्वी धायगुडे मॅडमना दाखवत जा’, असे सांगितले. त्यानंतर रोटरी क्लबची निबंध स्पर्धा जाहीर झाली. विषय होता, स्त्री-मुक्ती. मी निबंध तयार केला आणि मॅडमना भितभितच विचारले, ‘मॅडम, हा निबंध दाखवायचा होता’. मॅडमनी निबंध लगेच वाचायला घेतला आणि पाच मिनिटात वाचून संपवला. ‘मी असाच निबंध पाठवणार, की पुन्हा लिहिणार’, असे विचारले. मी म्हटलं, ‘काही बदलायचे असेल तर पुन्हा लिहितो.’ मॅडमनी लगेच निबंध पुन्हा वाचायला आणि त्यामध्ये दुरूस्त्या करायला सुरुवात केली. दहा-बारा व्याकरणाच्या दुरुस्त्या केल्या. एक मुद्दा वाढवण्यास सूचवले. जी गोष्ट करायची ती परिपूर्ण असली पाहिजे, असा आग्रह त्या कायम धरत.

मी तो निबंध घेतला आणि हॉस्टेलवर संध्याकाळी पुन्हा लिहून काढला. दुसऱ्या दिवशी तो रोटरी क्लबच्या कार्यालयात सादर केला. अर्थातच या स्पर्धेतही पहिले बक्षीस मिळाले. तेथून पुढे कोणत्याही स्पर्धेसाठी निबंध पाठवताना मॅडमना तो दाखवून दुरूस्त करूनच पाठवत असे. अनेक स्पर्धात पहिले किंवा दुसरे बक्षीस हमखास मिळायचे. अशी दरवर्षी पाचसहा बक्षीसे मिळायची. त्यानंतर सोलापूर बाहेरच्या स्पर्धांसाठीही निबंध पाठवले आणि बक्षीसे मिळवली. त्यामध्ये मॅडमचे मार्गदर्शन महत्त्वाचे होते. आयआयटीमध्ये इतर विषयही शिकवले जातात. विद्यार्थ्यांना इतर विषयातील अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध असते. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्येही आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे महत्त्व अधोरेखीत करण्यात आले आहे. दयानंद महाविद्यालयात, असे कोणतेही बंधन किंवा नियम नसताना भौतिकशास्त्र शिकणाऱ्या मुलाला ही सुविधा उपलब्ध होती. धायगुडे मॅडम आणि सर विद्यार्थ्याला भौतिकशास्त्राचा कोणताही संबंध नसलेल्या, निबंध लेखनाचे कौशल्य वाढवण्यासाठी कष्ट घेत होते. त्यांनी कधीही याचा आणि तुमच्या विषयाचा काय संबंध, असा प्रश्न विचारला नाही. उलट आपला बहुमूल्य वेळ अशा मार्गदर्शनासाठी दिला. त्यांनी अशा कार्यासाठी शैक्षणिक धोरणामध्ये अशा तरतुदी येण्याची वाट पाहिली नाही. ते येण्याच्या कित्येक वर्ष अगोदर हे सारे घडत होते.

विद्यार्थ्यांने केवळ विषयाचे ज्ञान घ्यावे म्हणून त्या कार्यरत नव्हत्या. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्या स्वत: एनसीसी कॅडेट होत्या. त्या खेळाडूही होत्या त्यां राष्ट्रीय पातळीवर खेळल्या होत्या. आता त्या भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत विविध उपकरणाशी लिलया खेळत होत्या. विद्यार्थ्यांना ती कौशल्ये प्राप्त व्हावीत, असे मनोमन प्रयत्न करत होत्या. अंधारखोलीतील (डार्क रूममधील) प्रयोग त्या सहज करून दाखवत. इतर नवीन शिक्षकांना जे प्रयोग करून दाखवायला दोन तास लागत, तेच प्रयोग मॅडम अर्ध्या तासात करून दाखवत असत. दुसऱ्या वर्षाचे प्रयोग आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली करत असायचो. मॅडमना सर्व उपकरणे शरण आली असावीत. मॅडमच्या उपस्थितीत कोणत्याही उपकरणाने सहकार्य करायचे नाकारले नाही. सगळी उपकरणे निमूट काम करत असत. जेव्हा उपकरणे एवढी सरळ वागायची, तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये वाकड्यात जाण्याचे धाडस कसे येणार. विद्यार्थी प्रयोग करताना मॅडम मधून एक फेरी मारून जात. मध्येच विद्यार्थ्यांबरोबर बोलत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष प्रयोगावर केंद्रित झालेले असायचे. 

मी बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्गात शिकत असताना, आमची प्रात्यक्षिके वरच्या मजल्यावरील प्रयोगशाळेत होत असत. त्या प्रयोगशाळेतील डिमरमध्ये स्पार्किंग होत असे. तोपर्यंत उपकरणे हाताळण्याचे कौशल्य प्रयोगशाळा सहाय्यक कारंडे यांच्या लक्षात आले होते. त्यातच मी हिंदुस्तान इन्स्टिट्युट या खाजगी संस्थेतून विद्युत उपकरणे हाताळण्याचा कोर्स केला होता. कारंडे यांनी मला डिमर काढून आतल्या कॉईलवरील आवरण न जाता कार्बन काढणार का असे विचारले. मी ही तेवढाच हात साफ होईल म्हणून लगेच ते साफ करायला घेतले. दोन डिमरचा कार्बन साफ करून झाले. त्यांचे काम सुरळीत सुरू झाले. तिसरा डिमर साफ करत असताना अचानक शिपायाने येऊन फॅनचे बटण दाबण्याऐवजी डिमरची पीन असलेले बटन सुरू केले. जोराचा झटका बसला. त्यांने लगेच बटण बंद केले. मात्र माझ्या अनियंत्रीत हालचाली झाल्या. पाय अचानक पुढे गेला. पुढे लोखंडी पट्टी असलेले स्टूल होते. त्या स्टूलच्या खालच्या पट्टीवर पाय आदळला. पाय आदळताना डाव्या पायाच्या करंगळीशेजारचे बोट आणि करंगळीच्या मधल्या भागात ती पट्टी आली. काही कळण्याच्या आत रक्ताची धार सुरू झाली. मला लगेच महाविद्यालयाच्या दवाखान्यात नेले. तिथल्या डॉक्टरनी पटकन तीन टाके घातले. पायाला माती, चिखल लागू देऊ नका म्हणून सांगितले. जखम खोलवर झाली होती. चालताना नको एवढ्या वेदना होत होत्या. कसेबसे आवरावे लागत होते. जखमेजवळ पाणी पोहोचल्यास जखम चिघळू शकते असे सांगितल्याने आंघोळही नाही. मेसला जेवायलाही जाता येत नव्हते. बाहेरून मेसवर डब्बाही मागवता येत नव्हता आणि होस्टेलची मेसही नव्हती. प्रयोगशाळा सहाय्यक कारंडे याला विभागप्रमुख मनगोळी सर खूप ओरडले होते. त्याला ओरडून माझी जखम भरणार नव्हती. या काळात मॅडमनी इतर मुलांकडे माझी चौकशी केली. संध्याकाळी डब्बा घेऊन मॅडम आणि सर निळया स्कूटरवरून होस्टेलवर आले. त्यापुढे आठ दिवस दररोज माझ्यासाठी डब्बा हॉस्टेलवर पोहोच होत होता. डॉक्टरची औषधे, आणि मातेच्या आपुलकीने घेतली जाणारी ही काळजी यामुळे मी लवकरच बरा होऊन पुन्हा वर्गात येऊ लागलो. मात्र या काळात माझ्या मनात मॅडमबाबत एक बदल झाला. एका चांगल्या शिक्षिकेची मनातील प्रतिमा, मातृप्रतिमेत कधी बदलली ते कळालेच नाही.

माझे उपकरणे हाताळण्याचे आणि प्रयोग करण्याचे कौशल्य इतरही शिक्षकांच्या लक्षात आले होते. तसेच माझे हस्ताक्षर कौशल्यही जर्नलच्या रूपात सर्वांच्या लक्षात आले होते. त्यातही अक्षरमंचचे अंक नियमीत निघत असत. त्यावेळी नुकतेच संगणक शिक्षणसंस्थेत दिसू लागले होते. फ्लेक्सचा जमाना यायचा होता. त्यामुळे विभागातील विविध कार्यक्रमाचे बोर्ड रंगीत खडूनी सजवले जात. हे काम माझ्याकडे आपोआप आले. त्यावेळी फलकावर लिहावयाचा मजकूर प्रथम कागदावर लिहून मॅडमकडून तपासून घ्यायचो. मॅडमचे गोलाकार अक्षर सुंदर आहे. त्यांच्या व्याख्यानाच्या नोटसही तशाच अक्षरात कोणतीही खाडाखोड नसलेल्या असायच्या. ही नोटस काढण्याची सवय माझ्यातही नकळत आली. कोणतीही खाडाखोड न करता लेखन व्हायला हवे हा संस्कार मॅडमचाच. त्या शिकवताना विद्यर्यांनी मुद्दे लिहून घ्यावेत आणि संदर्भ पुस्तके वापरून नोटस काढाव्यात, असे सांगत असत. त्यामुळे बी.एस्सी.ला असतानाच आम्हाला बी.एल. थरेजाचे बेसीक इलेक्ट्रॉनिक्स, थर्मोडायनॅमिक्सला श्रीवास्तव, ॲटोमीक फिजिक्सला राजम या लेखकांची आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची ओळख झाली. संदर्भ पुस्तक वापरणे त्यातून नोटस काढणे, या गोष्टींची सवय झाली. पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच विषय शिकायचा कसा, अभ्यासायचा कसा, याची शिकवण मिळाली आणि आम्ही स्वत:च्या नोटस काढू लागलो. मॅडमकडून शिकलेल्या अनेक गोष्टीतील ही सर्वात महत्त्वाची गोष्ट.

पुढे शिक्षकांचा १९८८ च्या अखेरीस शिक्षकांनी संप पुकारला. आंदोलनामध्ये सर्वच शिक्षक सहभागी होते. आम्ही जाताना येताना महाविद्यालयाबाहेर बसलेले शिक्षक पहात होतो. मात्र यामध्ये मॅडम किंवा सरांना क्वचित पाहिले. या संपामुळे वर्गात शिकवणे पूर्ण बंद झाले होते. जवळपास दोन महिने हा संप चालला. शिक्षकांनी संपातील दिवस सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवून भरून काढायचे होते. त्यामुळे दररोज वर्ग सुरू झाले. तो जानेवारीचा शेवटचा आठवडा होता. आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. झुंजूरवाड यांनी मला बोलावल्याचा निरोप विभागात आला. प्राचार्यानी बोलावले म्हणजे अंगावर काटा यायचा. पण मला काहीतरी वेगळी बातमी असावी, असे वाटत होते. मी तरीही भितभितच गेलो. प्राचार्यानी मला एक पत्र दाखवले आणि तुम्ही या शिबिरासाठी जायचे असे सांगितले. अभ्यासाची, शिकवण्याची आणि शिकण्याची घाई सुरू असताना अशा शिबीरासाठी जवळपास तीन आठवडे घालवणे म्हणजे एम.एस्सी. प्रवेशाच्या स्वप्नावर पाणी सोडण्यासारखे होते. त्यामुळे मी प्राचार्याना लगेच नकार सांगितला. प्राचार्यांनी माझे मन वळवण्याची जबाबदारी धायगुडे सरांवर सोपवली. सरांनी मला खूप समजावले. सरांच्या पेपरचा अभ्यास करणे सहज शक्य होते. मात्र मॅडम शिकवत असलेल्या क्वांटम मेकॅनिक्सचे काय करायचे असा प्रश्न होता. मी सरांनाही जवळपास नकारच दिला होता. सरांनीच मॅडमना मला समजावून सांगायला सांगितले असावे. 

मॅडमनी मला सहज बोलावल्यासारखे बोलावून, ‘प्राचार्यांनी का बोलावले होते’ असे विचारले. मी खिशातील पत्र काढून मॅडमना दाखवले. मॅडमनी लगेच ‘अभिनंदन’ केले. ‘खूप छान संधी मिळाली आहे’, असेही म्हणाल्या. मी म्हटलं, ‘मॅडम, हे जवळपास तीन आठवडे जातील. पुन्हा मी युवक महोत्सवासाठी जावे लागेल. जवळपास एक महिना असा गेल्यावर मला एम.एस्सीला प्रवेश कसा मिळेल.’ मॅडम लगेच म्हणाल्या, ‘तुम्ही जावा. अशी संधी पुन्हापुन्हा मिळत नसते. तुम्ही जरूर जावा. अभ्यास होत राहील. आल्यानंतर नोटस मिळतील. होईल तुमचा अभ्यास. तुम्ही गेलंच पाहिजे.’ मी पुन्हा म्हटलं, ‘मॅडम बाकी सारे संमजेल हो, पण क्वांटम मेकॅनिक्स समजायला जड जाईल.’ मॅडमनी पुन्हा सांगितले, ‘मी आहे ना, जे समजणार नाही ते मी शिकवेन. तुम्ही बिनधास्त जावा.’ मॅडमनी दिलेल्या खात्रीमुळे मी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सोलापूर सोडले. मार्च १९८९ मध्ये मी परत आलो तेव्हा सर्व अभ्यासक्रम शिकवून झाला होता. सर्व शिक्षकांनी नोटस, पुस्तके उपलब्ध करून दिली. बाकी सर्व विषयांचे बऱ्यापैकी आकलन होत होते. मात्र क्वांटम मेकॅनिक्स डोक्यावरून जात होते. अखेर मॅडमनी तो सेक्शन घरी शिकवला. कोणतेही शुल्क न घेता. हे शिकवणे तसे किती त्यागाचे होते हे मला मी बाप झाल्यावर लक्षात येते. कारण त्यावेळी दिप्ती आणि प्रज्योत हे दोघेही तसे लहान होते. शालेय विद्यार्थी. त्यांचा हक्काचा हा वेळ मॅडम मला देत होत्या. एवढेच नाही, अनेकदा शिकवत असताना उशीर झाला तर, घरीच जेवायला लावत आणि नंतर मी होस्टेलवर येत असे.

मॅडम आणि सरांच्यामुळे मी लेखनाकडे वळलो. दयानंद महाविद्यालयातील शिक्षकांनी केलेले संस्कार आजन्म पुरणारे आहेत. मात्र त्यातील सर आणि मॅडम यांचा वाटा सिंहाचा आहे. त्यांनी प्रज्योत, दिप्ती यांच्याइतकेच प्रेम माझ्यावर केले. तसे त्या सर्वांशीच आपुलकीने वागत. सर्वांच्या अडचणी सोडवण्यात पुढाकार घेत. मला हे कायम जाणवत असे. त्यातून त्यांच्याप्रती कामयत मनात कृतज्ञता भाव वढत गेला. त्यामुळे आयुष्यातील अनेक निर्णय घेताना मी त्यांचे मत जाणून घेत असे.

पुढे मी सोलापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पदव्युत्तर केंद्रात अधिव्याख्याता म्हणून रूजू झालो. माझ्या मनात विचार आला की, राष्ट्रीय विज्ञान दिनी एक ‘विज्ञान पुरवणी’ प्रकाशित व्हावी. मी हा विचार मॅडम आणि सरांच्यापुढे बोलून दाखवला. लगेचच आम्ही तरूण भारतचे संपादक विवेकजी घळसासी यांना भेटलो. यापूर्वी ‘मध्यमा’ पुरवणीचे काम मी अनेक दिवस पाहिले असल्याने पुरवणी काढण्यासाठी काय, काय करावे लागते, हे मला माहीत होते. आम्ही विवेकजीना कल्पना सांगताच त्यांनी लगेच होकार दिला. मात्र विज्ञान लेखकांशी माझा परिचय नव्हता. सर आणि मॅडमनी अगदी जयंत नारळीकर, बाळ फोंडके, विगो कुलकर्णी, निरंजन घाटे हेमचंद्र प्रधान अशा अनेक लेखकांशी संपर्क साधला. या मान्यवरांनीही लेख दिले आणि २८ फेब्रुवारी १९९६ पासून पुढे मी सोलापूरमध्ये असेपर्यंत आम्ही दरवर्षी विज्ञान पुरवणी प्रकाशित करत राहिलो. पुढेही तरूण भारतची विज्ञान पुरवणी मॅडम आणि सर प्रकाशित करत. यातून मी विज्ञान लेखनाकडे जास्त ओढला गेलो. या काळात काही वेळा अगदी उशिरापर्यंत आम्ही काम करत असायचो आणि मॅडमही बरोबर असत.


पुढेही हे घर माझ्यासाठी प्रज्योत, दिप्तीइतक्याच हक्काचे झाले. घराशी कायमचे जोडले जाण्यामध्ये मॅडमचा स्वभाव महत्त्वाचा ठरला. मॅडम सरांपेक्षा थोडा प्रॅक्टिकल विचार करत. मात्र विद्यार्थ्यांसाठी काही करायचे झाले तर सरांच्याही पुढे असत. याचा अनुभव मी अनेकदा घेतला. विद्यार्थ्यांने एखादी अडचण सांगावी आणि मॅडमनी ती आईच्या ममतेने सोडवावी, याचे दर्शन अनेकदा घडले. यातून मी या कुटुंबाशी कायमचा जोडला गेलो. कन्या वैष्णवीसाठी सर ‘गुड मॉर्निंग आजोबा’ आणि मॅडम ‘आज्जी’ बनल्या. तिचेही मॅडमकडून भरपूर लाड झाले. मी प्रशासकीय सेवेत उपकुलसचिव झाल्यानंतर सोलापूरला २००३ पर्यंत होतो. तोपर्यंत दररोज किमान फोनवर बोलायचो. आठवड्यातून एकदा सर्वंजन एकत्र यायचो. सर बाहेरगावी गेले असले तरी यात खंड नसायचा. पुढे माझी बदली कोल्हापूरला झाली.

मॅडम आणि सर दोघेही सेवानिवृत्त झाल्यानंतर सर अनेकदा कार्यालयीन कामासाठी कोल्हापूरला आले. मात्र २००९ च्या फेब्रुवारीमध्ये सर आणि मॅडम प्रथमच दोघेही कोल्हापूरला आले. राहिले. मुलांना खऱ्या अर्थाने आजी-आजोबा अनुभवता आले. स्नेहबंध आणखी दृढ झाला. छोट्याछोट्या प्रसंगात, कमी क्षणातही आनंदाची साठवण कशी करायची, हे त्यांच्याकडूनच शिकता आले. विद्यार्थ्याला केवळ क्रमीक पुस्तकातील, अभ्यासक्रमात नमूद केलं तेवढ्यावर समाधान न मानता त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर या उभयतांनी भर दिला.

त्यानंतर तीनच वर्षांत सरांचे निधन झाले. त्यावेळी ‘एककांचे मानकरी’ या पुस्तकाचे माझे लेखन सुरू होते. सरांच्या जाण्याचा धक्का माझ्यासाठी तीव्र होता. मी पुस्तकाचे काम जवळपास थांबवले होते. मात्र मॅडमच्या सूचनेनुसार पुन्हा ते पुस्तक पूर्ण करायला सुरुवात केली आणि तीन वर्षांनंतर ते प्रसिद्ध झाले. ते पुस्तक सरांना अर्पण केले. त्याचवेळी मी ‘एककांचे इतर मानकरी’ हे पुस्तक लिहायचा विचार करत होतो. आज ते प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि हे पुस्तक आज प्रकाशनासाठी तयार झाले आहे. एककांचे इतर मानकरी हे मॅडमना अर्पण केले आहे.

पुढे मॅडम पुण्याला राहू लागल्या. मात्र सरांच्या स्मरणार्थ सोलापूरच्या घरांमध्ये शालेय मुलांना प्रयोगाचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांच्यामध्ये विज्ञानाची रूची निर्माण व्हावी, यासाठी त्या कायम प्रयत्नशील राहिल्या. सरांच्या स्मरणार्थ व्याख्यानमालाही मराठी विज्ञान परिषदेच्या सोलापूर शाखेमार्फत सुरू करण्यात आली. आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी वर्षाच्या निमित्ताने दिप्तीच्या सहाय्याने आवर्त सारणी कशी सहज समजावून सांगता येईल यासाठीचे एक प्रतिमान (मॉडेल) तयार केले. अनेक शाळांतून आवर्त सारणीवर व्याख्याने दिली. त्यांच्या या मॉडेलची चर्चा रशियापर्यंत पोहोचली. त्यांना या मॉडेलसह रशियात आमंत्रित केले. त्यांना त्यावेळी जाणे जमले नाही. मात्र, विज्ञान प्रसाराचे कार्य त्या आजही करत आहेत.

इकडे मीही याच विषयावर ‘आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया’ हे राज्य शासन पुरस्कार प्राप्त पुस्तक लिहिले. भौतिकशास्त्र तितक्याच समर्थपणे शिकवत असतानाच, या पुस्तकाच्या लेखनाचा विचार आणि त्यासाठी आवश्यक असणारे लेखन कौशल्याचे संस्कार देणाऱ्या या गुरूमातेला त्रिवार वंदन आणि शिक्षक दिनांच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा!





गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

'सर, खूप लवकर एक्झिट घेतलीत!'


(शिक्षक दिन विशेष-१ प्राचार्य एन.एस, धायगुडे सर)
आज शिक्षक दिन. शिक्षक, गुरू यांनी घडवले तर आपण घडतो. मलाही जीवनाच्या वेगवेगळ्या टप्पयावर  अनेक गुरू भेटले. यानिमित्ताने दरवर्षी एका गुरूच्या आठवणीला ऊजाळा देण्याचा आणि त्या तुमच्यापुढे सादर करण्याचा संकल्प आहे. यावर्षी ज्यांनी एका खेड्यातील मुलाला अनेक अंगानी घडवले असे गुरूवर्य प्राचार्य नागेश स्वानंद धायगुडे सरांविषयी मी लिहिले आहे. दयानंद महाविद्यालयांतील या सरांनी आम्हाला खूप काही दिले. ते अकाली गेले. मात्र त्यांच्याबद्दलची आठवण नाही असा दिवस जात नाही. अशा या सरांविषयी......                            
--------------------------------------------------------------------------------------------
सोलापूरचे दयानंद महाविद्यालय! ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात याच महाविद्यालयात प्रवेशित होतात. पासष्ट एकरांचा विस्तीर्ण परिसर. चार महाविद्यालये एकाच परिसरात, मात्र स्वत:चे वेगळेपण सांभाळणारी. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र इमारत. प्रशस्त देखणी मुलांचे व मुलींचे वसतिगृहे. भव्य ग्रंथालय. 'शिक्षणाचा खरा अर्थ हा विद्यार्थ्याला परिपूर्ण माणूस म्हणून घडवणे हा आहे,' हे प्रमाण मानून विद्यार्थ्यांवर कायम चांगले संस्कार होतील, याची जाणीव ठेवून कार्य करणारे शिक्षक या महाविद्यालयात होते आणि अजूनही आहेत. विस्तीर्ण परिसराप्रमाणे, मोठ्या मनाचे शिक्षक. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे. आपले विद्यार्थी चुकीचे तर वागत नाहीत ना, वाईट मार्गाला जात नाहीत ना, हे आपल्या तीक्ष्ण नजरेने तपासणारे. महाविद्यालयीन अभ्यासक्रमाबरोबर संस्कारांचे धडे देणारे. आम्ही विद्यार्थी होतो तेव्हा, या शिक्षकांतील डॉ. नागेश स्वानंद धायगुडे सर हे विद्यार्थ्यांच्या मनात सर्वोच्च स्थानी. विद्यार्थी चुकीचे वागले तर त्याची अशा शब्दात जाणीव करून द्यायचे की, विद्यार्थ्यांचे वागणे बदलणारच, याची १०० टक्के खात्री. गुंड प्रवृत्तीचेही काही विद्यार्थी असायचे, पण सरांचा आदरयुक्त दरारा असा की, ते विद्यार्थीही सरांसमोर निःशब्द व शांत होऊन जात.
            आजूबाजूच्या ग्रामीण भागातीलच नव्हे तर माढा, बार्शी, अक्कलकोट भागातील, खेड्यांतील मुले या महाविद्यालयात प्रवेश घ्यायची. महाविद्यालयात शहरी विरूद्ध ग्रामीण असे गट असायचे. या गटांच्या हालचाली विशेषतः निवडणुकाच्या वेळी फार जोरात असायच्या. त्यावेळी थेट विद्यार्थ्यांच्या मताद्वारे विद्यार्थी प्रतिनिधीच्या निवडी व्हायच्या. एकदा अशाच निवडणुकीच्या काळातील वादात शहरातील मुलांचा गट एका गुंडाला घेऊन आला. त्याच्याजवळ चाकू होता. शिक्षणशास्त्र इमारतीच्या पुढे असणाऱ्या बुचाच्या झाडाखाली दोन्ही गटांतील मुले उभी होती. त्यावेळी
त्या मुलाने चाकू बाहेर काढून धमकावायला सुरूवात केली. तेवढ‌्यात गेटमधून सरांच्या स्कूटरचा आवाज आला. सरांना पाहताच भांडणाचे वातावरण एकदम बदलले. चाकू खिशात गेला. एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून गप्पांचा आव आणला गेला. पण सरांच्या हे सारं लक्षात आलं असावं. सरांनी त्या मुलाजवळ आपली निळी स्कूटर उभी केली. 'काय चाललं आहे?' सरांनी विचारलं. मुलांमधून 'काही नाही, चहाला जातोय' असं उत्तर आलं. तरी सरांनी सांगितलं, 'हे बघा, निवडणुका आहेत, जय-पराजय होतच असतो. तुम्ही शिकायला आलात. पण निवडणुकांच्या नावाखाली काहीही चुकीचे होणार नाही, याची काळजी घ्या.' असं सांगतानाच त्यांच लक्ष त्या बाहेरच्या मुलाक़डं गेलं. त्यांनी विचारलं, 'हा कोण? हा तर आपला विद्यार्थी नाही.' त्यावर 'नाही सर, तो आमचा मित्र आहे,' असं मुलांमधून उत्तर आलं. पुन्हा सरांनी सांगितल, 'निवडणुका सुरळीत झाल्या पाहिजेत आणि सर्वांशी मैत्री असणं खूप चांगलं, पण अशा प्रसंगी ती काॅलेजमध्ये आणू नका,' एवढं सांगून सर निघून गेले. पण त्यांच्या सांगण्याचा परिणाम असा झाला की, पुन्हा चाकू बाहेर आला नाही. दमदाटीची भाषा संपली. शांतपणे, योग्य शब्द आणि शब्दफेकीच्या जोरावर सर आपल्याला जे साध्य करायच ते करत. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि बाहेरील विद्यार्थी ते अचूक ओळखत. 
      वर्गात त्यांचे शिकविणे, विषय समजावून सांगणे हे तर भन्नाटच होते. इलेक्ट्राॅनिक्स किंवा अन्य विषय घेण्यासाठी प्रवेशित झालेले अनेक विद्यार्थी सरांच्या व्यक्तिमत्वाने व शिकविण्याने प्रभावित होऊन भौतिकशास्त्र विषय निवडायचे. मीही असाच बार्शीवरून बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स शिकण्यासाठी ‘दयानंद’मध्ये प्रवेश घेतलेला. मी खेड्यातलाच. बार्शीत इलेक्ट्रॉनिक्स मिळाले नाही म्हणून सोलापूरला गेलो होतो. पण सरांच्या प्रभावाखाली कधी गेलो ते कळाले नाही आणि सरांचा भौतिकशास्त्र विषय घेऊनच १९८९ मध्ये बी.एस्सी. झालो. सरांनी वर्गात शिकवत राहावे आणि आपण ऐकतच राहावे, असे वाटायचे. त्यांच्याकडून इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम, क्लासिकल
मेकॅनिक्स, मॅक्सवेल इक्वेशन्स शिकताना असे वाटायचे की, जणू हे शास्त्रज्ञ सरांना येऊन आपण हा शोध कसा लावला, इक्वेशन कसे सुचले, ते सांगत असावेत. त्यांच्या सुंदर अक्षरात बोर्डवर लिहीलेली सूत्रे किंवा इक्वेशन्स पाहात राहावी, असे वाटायचे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सर वर्गात शिकविताना मराठीचा वापर करत नसत. ते इंग्रजीतूनच शिकवत. मात्र वर्गाबाहेर अस्खलित मराठीत संवाद चालायचा. सर आणि धायगुडे मॅडम दोघेही शिकवायला असत. मॅडमकडे नेहमीच 'क्वाॅंटम मेकॅनिक्स'सारखा अवघड पेपर असतो आणि तरीही तो आपल्याला समजतो, आपण त्याची उत्तरे छान लिहू शकतो, याचही कौतुक वाटायच. वर्गातील शिकवण्याच्या बाबतीत मॅडम आणि सरांची तुलना अनेकदा व्हायची आणि शेवटी दोघंही 'ग्रेट' आहेत, यावरच शिक्कामोर्तब व्हायच. 
     एक प्रसंग सांगतो. मी बी.एस्सी.च्या तिसऱ्या वर्षात असताना १९८९च्या फेब्रुवारीत बिहारमधील 'राजेंद्र ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी, पुसा' येथे आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबीरासाठी माझी विद्यापीठामार्फत निवड झाली. मी जायला तयार नव्हतो. सरांनी मला समजावून सांगितलं. अशी संधी पुनःपुन्हा येत नाही आणि ती टाळू नकोस, म्हणून बजावले. नेमका १९८८ मध्ये चौथा वेतन आयोग लागू करावा, यासाठी शिक्षकांचा संप झाला होता. संपकाळात बुडालेले अध्यापन त्या काळात झाले. संपामुळे परीक्षा काही काळ पुढे गेल्या होत्या. मी बिहारवरून आलो आणि विद्यापीठाच्या युवक महोत्सवासाठी कोल्हापूरला थांबून ८ मार्चला परत सोलापूरला आलो. जवळपास एक महिना यात गेला. तोपर्यंत अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला. सरांकडे क्लासिकल मेकॅनिक्स आणि इलेक्ट्रीसिटी मॅग्नेटिझमचा पेपर होता, तर मॅडमकडे मॅथेमॅटिकल फिजिक्स आणि क्वाँटम मेकॅनिक्सचा पेपर होता.
सर आणि मॅडम दोघांनीही त्यांच्या विषयाच्या संदर्भ पुस्तकांची माहिती दिली. कठीण भागाच्या नोट्स दिल्या. सरांचा पेपर तसा तयार करणे शक्य होते. पण क्वाँटम मॅकेनिक्स पूर्णपणे डोक्यावरून जात होते. काय करायचे? हा प्रश्न होता. सराना अडचण सांगितली. मॅडम आणि सरांनी दोघांनी बोलावून सांगितले, 'सांयकाळी पाचनंतर थेट घरी ये. मॅडम तुला तो संपूर्ण भाग शिकवतील.' मी त्यानुसार घरी जायला सुरूवात केली. आमची 'विना फी'ची शिकवणी सुरू झाली. दिप्ती आणि प्रज्योत दोघेही त्यावेळी लहान होते. त्यांना खरे तर आई-बाबांची गरज होती. त्या वेळेत मॅडम मला शिकवत असत आणि सर या दोन्ही पिल्लांना सांभाळत. या कालावधीत ज्ञानग्रहणानंतर अनेकदा अन्नग्रहण करूनच मी तेथून निघत असे. कोण कुठला मी? एक हजाराच्या आतल्या लोकसंख्येच्या खेडयातील शिक्षकाचा मुलगा. त्यांचा माझा संबध आला, तो एक विद्यार्थी म्हणून. मात्र विद्यार्थ्याला आपल्याकडे असलेले सारे काही द्यावयाचे या उद्देशाने सर आणि मॅडम जगत होते आणि त्याचा मी पूर्ण अनुभव घेतला. त्यांनी निरपेक्ष भावनेने विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी केलेले प्रयत्न मला त्यांच्याकडे खेचत. त्यामुळे माझे लौकिकार्थाने त्यांच्याकडून शिकण्याचे दिवस संपले तरी जीवनाचे धडे मी त्यांच्याकडून शेवटपर्यंत घेत राहिलो. त्यांच्या मार्गदर्शनाचा अनेक कठिण प्रसंगात लाभ होत राहिला. मला माझे विद्यार्थीपण असेच आजीवन जपायचे होते आणि आज सर भौतिकदृष्ट्या जवळ नसले तरी जपण्याचा प्रयत्न करत आहे. 
      पुसा इथल्या शिबिराला जायला माझा मुख्यत्वे नकार होता, तो माझी एम.एस्सी. प्रवेशाची संधी सुटेल म्हणून. मात्र सरांनी त्यावेळचे शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.
आर.एस. माने यांच्याशी संपर्क साधला. त्या काळात कुलगुरूंच्या आधिकारात प्रत्येक विभागात एका विद्यार्थ्याला प्रवेश दिला जात असे. त्या जागेवर भौतिकशास्त्र विषयासाठी मला संधी द्यावी, अशी विनंती केली. मला ते सांगितले. त्यानंतर मी तयार झालो होतो. शिबिरावरून आल्यानंतर आता आपण सहज उत्तीर्ण होऊ शकतो आणि आपण एम.एस्सी.ला प्रवेश मिळवणार, या आविर्भावात होतो. त्यामुळे महाविद्यालयात इकडून तिकडे मित्रांसोबत फिरत असे. मी हवा तसा अभ्यास करत नाही, हे सरांनी ओळखले. मला शिपायामार्फत बोलावणे धाडले. मी गेलो. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, 'हे बघ, तू उत्तीर्ण होशील. एम,एस्सी.ला प्रवेशही मिळेल - मात्र ताे कुलगुरूंच्या आधिकारात. आणि जर अभ्यास चांगला केलास तर मात्र गुणवत्तेवर प्रवेश मिळेल. तू आता अभ्यास करायला हवा. हे हुंदडणे थांबवा.' तोपर्यंत सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर एवढा परिणाम झाला होता की मी त्यांचा शब्द प्रमाण मानला. त्या दिवसापासून मी पहाटे तीन-तीन वाजेपर्यंत अभ्यास केला आणि महाविद्यालयात प्रथम आलो. विद्यार्थ्याला त्याच्या चुकीची नेमकी जाणीव करून देणारे सर भेटले नसते, तर एम.एस्सी.ला प्रवेश मिळाला असता पण गुणवत्तेवर नाही, तर सवलतीचा फायदा घेऊन. विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण करण्याचा त्यांच्याकडे अलौकिक गुण होता. ज्याचा मी एक लाभार्थी आहे.
      वर्गात शिकविणाऱ्या सरांचा प्रभाव पडायचाच, पण अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्याला जे शिकवायचे आणि घडवायचे, तेही अफलातून होते. त्यांच्या प्रयत्नातून समाजात अनेक यशस्वी व्यक्ती-नागरिक त्यांनी निर्माण केले. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमबाह्य उपक्रमांत सहभागी व्हायला प्रोत्साहित करायचे. विद्यार्थ्यांच्या अंगचे नेमके कलागुण हेरून ते प्रोत्साहित करत, मार्गदर्शन करत. फिजिक्स क्लबद्वारा अनेक नामवंतांची व्याख्याने आयोजित व्हायची. त्यामध्ये सर्वांना उपस्थिती सक्तीची असे. हा उपक्रम विद्यार्थ्यांनीच चालवला पाहिजे, याकडे त्यांचे लक्ष असायचे. पाहुण्यांची ओळख, आभार मानणे, सूत्रसंचलन मुलांनी करावे, यासाठी ते आग्रही असत.
त्यातून नकळत सभाधीटपणा यायचा. या क्लबचे खातेसुध्दा विद्यार्थी आणि शिक्षक यांचे संयुक्त असायचे आणि जमा होणारे सर्व पैसे त्याच वर्षी खर्ची पडावेत, त्याचा त्याच वर्षीच्या विद्यार्थ्याना फायदा व्हावा, हा त्यांचा कटाक्ष असायचा. स्पर्धांना पाठवण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे निबंध सर तपासून द्यावयाचे. नकला, गाणी सादर करणारांना सुधारणा सांगायचे. त्यांचे इंग्रजीतील शिकवणे जेवढे सुंदर, तितकेच मराठीचे ज्ञानही उत्तम होते. काना, मात्रा, वेलांटीच्या चुकाही दुरूस्त करायला लावत. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. त्यासाठी तो विद्यार्थी आपल्या विषयाचा किंवा विभागाचा असावा, असे कोणतेही बंधन नव्हते. एखाद्या विषयाच्या बाबतीत हे अमूक एका सरांनी तपासून दिलं तर अधिक चांगलं होईल, असे सांगण्याची आणि दुसऱ्याची त्या विषयातील प्रज्ञा मान्य करण्याचा मोठेपणा आणि नम्रता त्यांच्याकडे होती. इतरांच मोठेपण ते सहजपणे सांगत आणि त्यांच्या अशा कृतीतून निगर्वीपणाचा संस्कार विद्यार्थ्यांवर होई. सरांचा विद्यार्थ्यावर इतका प्रभाव असे की, अनेक विद्यार्थी सरांप्रमाणे पूर्ण बाह्यांच्या शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत दुमडत. माझ्यातही ती सवय नकळत उतरली. 
    सरांची भाषा शुध्द आणि संयमी होती. त्यांनी चुकूनही कधी अपशब्द उच्चारलेला आठवत
नाही. त्यांना गाण्यांची आवड होती. ते चित्रे खूप सुंदर काढत. एकदा ते कोल्हापूरला माझ्याकडे आले असताना सकाळी कन्या चित्र काढत बसली होती. तिने हॉलभर पसारा मांडलेला. मी तिच्या त्या चित्र काढण्याच्या पद्धतीवरून तिला ओरडलो. सरांनी मला शांतपणे बाहेर जायला सांगितले आणि ५५ वर्षांनी लहान असलेल्या चिमुरडीबरोबर सर खाली जमिनीवर बसले. मी माझ्या कामासाठी निघून गेलो. संध्याकाळी घरी आलो, तेव्हा एक चित्र पुस्तकाच्या कपाटावर लावलेले होते. समुद्र किनाऱ्यावरील घर, त्याला कुंपण, नारळाचे झाड, कडेने जाणारी वाट असे ते संध्याकाळचे सुंदर चित्र होते. माझ्या कन्येने इतके सुंदर चित्र काढले, यावर माझा विश्वास बसत नव्हता. सरांनी आणि आमच्या सौभाग्यवतींनीही सांगितले की, ते चित्र तिनेच काढलेय. बी.एस्सी., एम.एस्सी.च्या वर्गांना शिकवणाऱ्या सरांनी सात आठ वर्षांच्या मुलीला किती सहजपणानं सुंदर चित्र काढायला शिकवलं. हे फक्त एक सच्चा शिक्षकच करू शकतो. 
    सरांचे पशुपक्ष्यांवरही तितकेच प्रेम होते. दारात येणाऱ्या कुत्र्याला किंवा मांजरांना ते अत्यंत प्रेमाने वागवत. सरांच्या घरात आपले घर थाटणाऱ्या होला पक्षाला त्यांनी कधी हाकलले नाही. तो त्यांच्या घराचा भाग बनून राहिलेला मी अनेकदा पाहिलाय. 
    वैष्णवी तीन वर्षांची असताना आम्ही सोलापूरला राहायला आलो. त्यावेळी दिप्ती आणि प्रज्योत दोघेही सोलापुरात नसायचे. या दिवसात आमच्यात आणखी जवळीक आली. मॅडम सोलापूरमध्ये
नसताना अनेकदा ते वैष्णवीला घेऊन बाहेर जात. एकदा आपण सर्वांनी गड्डयाच्या जत्रेत जायचे, म्हणून सांगितले. मी म्हटले, सर, खूप धूळ असते नको. पण सरांनी आपल्या गावची जत्रा आहे, गेलेच पाहिजे, म्हणून सांगितले. जत्रेत अगदी पन्नालाल गाढवापासून सगळे एंजॉय केले. निघताना एका फोटोच्या दुकानात सरांनी फोटो काढायला लावला आणि सांगितले- दरवर्षी जत्रेत असा फोटो काढून घेतला पाहिजे. ती एक मस्त आठवण असते. मला शिक्षक, प्राचार्य याच्यापलिकडचे सर खऱ्या अर्थाने समजायला लागले. धूळ, गर्दीचा अगर आपण प्राचार्य आहोत याचा विचार न करता प्रथम आपण माणूस आहोत, हे माणूसपण जपलं पाहिजे, हेच त्यांच्या या कृतीतून मला दिसून आलं. 
      वर्गात शिकवताना सरांनी फळ्यावर काढलेल्या आकृत्या खूपच सुंदर आणि प्रमाणबद्ध असत. त्यांचे अक्षरही सुंदर होते. वर्गात आल्यावर बोर्ड स्वच्छ पुसायचा. त्याचे खडूने दोन भाग करायचे आणि मग शिकवायला सुरूवात करायची. तास संपताना पुन्हा बोर्ड स्वच्छ पुसूनच ते बाहेर पडायचे. त्यांच्या या सवयी पुढे अनेक विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्या. वर्गात लक्ष न देता हुडपणा करणारी मुलंही असायची, वेळप्रसंगी त्यांना वर्ग सोडण्याची सौम्य शिक्षा ते द्यायचे. पण यातल्याच कोणी पुढे कोणतेही चांगले काम केले, तर त्याचे मोकळेपणाने कौतुकही करायचे. परिणामी, मुलांना सरांच्या नजरेतला आपला वाढलेला भाव कमी होऊ नये, असे वाटायचे. आपोआपच व्रात्यपणा कमी व्हायचा.
      पुढे सर प्राचार्य झाले. खरे तर सर प्रशासन कुशलही होते. ते मी अनेक कार्यक्रमातून अनुभवलेही. प्रशासनात यशस्वी होण्यासाठी काही वेळा डावपेच खेळावे लागतात. या गोष्टीला त्यांचा विरोध होता. असे कोणतेही डावपेच न खेळता ते स्पष्टपणे आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखवत. अनेकदा अनेकांना त्या रूचत नसत. त्याचा त्यांना त्रासही व्हायचा. लोक दुखावले जायचे. मात्र अपवाद वगळता, सरांनी अप्रिय निर्णय घेतला, तरी लोकांचे त्यांच्यावरील प्रेम कमी होत नसे. भौतिकशास्त्रातील इल्युजन त्यांना पूर्ण माहित होते, मात्र माणसे दुखावू नयेत म्हणून त्यांनी आभासी मुखवटा कधीही धारण केला नाही. प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळत असताना संस्थेची तत्त्वे चुकूनही मोडणार नाहीत, यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. 
    सरांना प्राचार्य पदापेक्षा शिक्षक म्हणून कार्य करण्यात जास्त रस होता. विज्ञानप्रसारासाठी ते स्वत:च्या खिशातून खर्च करत. अनेक शाळा महाविद्यालयांत ते व्याख्यानाला जात. मानधन तर सोडाच, पण अनेकदा प्रवास खर्चही घेत नसत. व्याख्यानांद्वारे आपल्या सुमधूर वाणीने ते विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगत. विज्ञान क्षेत्रातील करिअरच्या संधी सांगत. भाभा अणुशक्ती केंद्र, इस्रो अशा नामांकित विज्ञान संशोधन संस्थांमधील संशोधक त्यांचे मित्र होते. त्यांची व्याख्याने ते मुलांसाठी आयोजित करत. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. व्ही.एन. बापट, डॉ. जयंत नारळीकर इत्यादी विज्ञान क्षेत्रातील दिग्गज मंडळींना ऐकण्याची संधी त्यांनी सोलापूरकरांना उपलब्ध केली. 
      एक शिक्षक म्हणून, ल्युमिनिसन्स संशोधन प्रयोगशाळा दयानंद महाविद्यालयात उभारून अनेकाना मार्गदर्शन करणारे संशोधक म्हणून, एक विज्ञान प्रसारक म्हणून सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार सहजी मिळायला हवा होता; पण, त्यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी कधी अर्ज केला नाही. आदर्श पुरस्कार घेऊन आदर्श ठरतो, असे नाही. पुरस्कार मिळाला तर, चार दिवस कौतुकाचा वर्षाव होतो आणि सारे विसरून जातात, असे पुरस्कार मला महत्त्वाचे वाटत नाहीत. आपण आपले काम करीत राहावे, असे त्यांचे कायम म्हणणे असायचे. त्यांच्याबद्दल मोठा आदर असणाऱ्या मुख्यमंत्री महोदयांनी एकदा त्यांना अर्ज पाठवायला सांगितला होता. माझ्यामार्फतही निरोप पाठवला. मात्र सरांनी अत्यंत नम्रपणे नकार दिला. यातच सरांचे मोठेपण होते. 
     सर अगदी जवळीक असलेल्या विद्यार्थ्यांना एकेरीतून बोलायचे. तो त्यांचा हक्कही होता. मात्र अशा एखाद्या विद्यार्थ्याच्या कार्यालयात गेले की, त्याला अहो-जाहो असे आदरार्थी संबोधायचे. त्यावर त्यांचे म्हणणे असायचे की, 'मी जर आदरार्थी बोललो तर त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांमध्ये आपोआप आदराची भावना वाढते. आणखी एक फायदा होतो, होणारी कामे, नियमानुसार कामे, माझा विद्यार्थी अडवणारच नाही. पण जर तेथे आमच्या दोघांच्या ओळखीचा कोणी असेल आणि त्याचे काम अडलेले असेल, तर तो दुसरा माणूस वशीला लावायला माझ्याकडे येणार नाही'. यातला आपल्या विद्यार्थ्यांबाबत सरांच्या मनात किती विश्वास होता, हे समजून यायचे.
मी सोलापूरला पदव्युत्तर शिक्षण केंद्रात अधिव्याख्याता म्हणून काम पाहात असताना २८ फेब्रुवारी १९९६ या विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञान दिन पुरवणी प्रकाशित करण्याचा मानस व्यक्त केला. त्यांनी लगेच सोलापूर तरूण भारतचे तत्कालीन संपादक विवेक घळसासी यांच्याशी चर्चा करून पुरवणी काढायचे निश्चित केले. लेखकांना विनंती करणे, पत्रे पाठवणे इत्यादी गोष्टी स्वत:ची कामे बाजूला ठेवून केली. या विज्ञान दिनाचे औचित्य साधून एखाद्या मराठी वृत्तपत्राने चार पानांची विज्ञान पुरवणी काढायची, ती पहिली वेळ असल्याचे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा लेखन करणार असल्याचे वि. गो. कुलकर्णी यांच्यासारख्या मातब्बर विज्ञान प्रसारकाने सांगितले. पुढे मी अधिव्याख्याता पदावर असेपर्यंत मी त्यांच्यासमवेत पुरवणीचे पूर्ण कामकाज पाहायचो. एकदा तर रात्री अकरा वाजेपर्यंत काम चालले होते. त्यावेळी होटगी रोडवरील तरूण भारतच्या कार्यालयातून आम्ही रेल्वे स्टेशनवर चहा पिण्यासाठी गेलो होतो. दिवसभर कॉलेजचे काम सांभाळून रात्री उशीरापर्यंत या कामासाठी वेळ देणे हे सरांनाच शक्य होते. त्यांची ही सवय नकळत आमच्यात उतरत होती. एकदा काम स्विकारले की पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा ते करत. 
     माझे पहिले पुस्तक 'एककांचे मानकरी' लिहायला घेण्यापूर्वी मी माझा या पुस्तकाचा संकल्प सरांना सांगितला. सरांशी मी मोकळेपणाने त्या विषयावर चर्चा केली. त्यातील काही भाग लिहून झाल्यावर मी त्यांना पाठवला. त्यावर तू सर्व लिखाण संपव, आपण १२ नोव्हेंबरला सोलापूरमध्ये पुन्हा चर्चा करू, असे सांगितले. आम्ही एकत्र बसणार होतो, पुस्तकाचा मसुदा अंतिम होणार होता... आणि सात नोव्हेंबरला प्रज्योतचा मला पुण्याला येण्यासाठी निरोप आला. आठ तारखेला सरांचे जाणे झाले. मात्र ते जाणेसुद्धा एका विज्ञानप्रेमी शिक्षकाचे ठरले. सरांचे डोळे आणि अन्य अवयव दान करण्यात आले. सरांनी आयुष्यभर विद्यार्थ्याना जे काही शक्य होते, ते ते दिले... जातानाही दात्याच्या रूपातच जाणे पसंत केले. ज्ञानदानाचा हा यज्ञ अवयव दानापर्यंत गेला आणि त्यांच्या सर्व अवयवांचे रोपण यशस्वी झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रसंगी प्रसिद्ध झालेल्या स्मृतीग्रंथाचे नाव विज्ञानाचा वारकरी असेच ठेवले. 
     सरांच्या जाण्याने बसलेला धक्का फार मोठा होता. आपण पुस्तक पूर्ण करत आणले आहे, मात्र ते सरांनी पाहिले नाही. आता आपण ते कशाला प्रसिद्ध करायचे, असा विचार करत ते हस्तलिखित तसेच पडून होते. मी पूर्णतः एका वेगळ्या मन:स्थितीत होतो. शेवटी 'हे पुस्तक प्रसिद्ध करा आणि ते सरांनाच अर्पण करा' अशी सूचना माझ्याइतकेच सरांवर आणि मॅडमवर प्रेम करणाऱ्या आमच्या
सौ.कडून आली. मी एरवीही ते पुस्तक सरांनाच अर्पण करणार होतो. त्यामुळे सरांनी न पाहता ते प्रसिद्ध करायला मन तयार नव्हते. शेवटी पत्नी वैशालीने 'सरांना तुमचे हे वागणे आवडले असते का? सरांचे विद्यार्थी म्हणवता आणि त्यांच्या तत्त्वाविरूद्ध कसे वागता?' असा प्रतिप्रश्न केला आणि मुलीनेही तिचे म्हणणे उचलून धरले. तसेही आमचे पूर्ण कुटुंबच सरांचे विद्यार्थी झाले होते. मलाही ते पटले आणि 'एककांचे मानकरी' हे पुस्तक जून २०१५ मध्ये प्रसिद्ध झाले. माझ्या आजच्या लेखनाचे श्रेय खऱ्या अर्थाने सरांनाच जाते. त्यांच्या सूचनेप्रमाणे मी विज्ञान लेखक आणि अगदी कार्टुनिस्टही झालो. टिकलो मात्र लेखनाच्या प्रांतात. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी मराठीतून लेखन करणे कसे आवश्यक आहे, हे त्यांच्या बोलण्यातून अनेकदा जाणवले होते. तेच कार्य पुढे नेण्याचा मी अल्पसा प्रयत्न करत आहे. 
      माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना सरांनी त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही मदत केली. त्यांना अनमोल मार्गदर्शन केले. ते त्याच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होत, पण निर्णयात ढवळाढवळ नसे. अडचणीतला विद्यार्थी सल्ला मागायला भेटल्यानंतर ते अडचण समजून घेत. सरांनी शिक्षणाचा खरा अर्थ खऱ्या अर्थाने आचरणात आणला. पण एवढ‌्‌यात त्यांनी जायला नको होतं. अजून त्यांची आम्हाला, जगाला गरज होती. त्यांच्या प्रत्येक कृतीतून, उक्तीतून आणखी खूप शिकायचं होतं. पण...

... सर, तुम्ही खूप लवकर एक्झिट घेतलीत!

(यातील एककांचे मानकरी या पुस्तकाचा कव्हर फोटो वगळता सर्व छायाचित्रे 'विज्ञानाचा वारकरी' या स्मृतीग्रंथातून घेतली आहेत.)