शिक्षक दिन विशेष :
________________________________________________________
शिक्षक हा खऱ्या अर्थाने शिल्पकार असतो, विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो आणि कुंभार जसा मातीला आकार देतो, तसा शिक्षक आकार देत असतो, असे म्हणण्याला काही अर्थ नाही. त्याचे कारण म्हणजे कुंभार एकदा तयार केलेल्या चिखलातून हव्या तशा मूर्त्या बनवत असतो. त्याला एकाच आकाराच्या, प्रकारच्या मूर्त्या बनवता येतात, तसे शिक्षकाचे नसते कारण एका वर्गात विशिष्ट अर्हता धारण करून प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना हवे ते उद्दिष्ट गाठून देण्याचे कार्य शिक्षकाला साध्य होत नाही. कारण माती कुंभाराच्या इशाऱ्यानुसार वळत असते. ती विरोध करत नाही. तसे विद्यार्थ्यांचे नसते. ते शिक्षकाच्या इशाऱ्याप्रमाणे वागत नाहीत. चांगले गुरू, शिक्षक सर्वच विद्यार्थ्यांना चांगले घडविण्याचा प्रयत्न करत असतात. सर्वांना समान संधी देत असतात. मात्र शिक्षकाने दिलेले हे दान घेण्याची ज्यांची पात्रता असते, ते विद्यार्थी घडतात. असे प्रत्येक वर्गात काही विद्यार्थी असतात. त्याची गरज ओळखून त्यांना शिक्षक सहकार्य करतात. शिक्षकांच्या ते लक्षातही येतात. मात्र केवळ त्यांच्यावर लक्ष न देता संपूर्ण वर्गाला ते सुसंस्कारित करण्याचा प्रयत्न करत राहतात. असेच आयुष्यभर असिधारा व्रत घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षिका मला माझ्या पदवी अभ्यासाच्या वेळी भेटल्या आणि त्यांनी माझ्याप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. या शिक्षिका म्हणजे वैशाली नागेश धायगुडे मॅडम.
बार्शीच्या छत्रपती
शिवाजी महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालो, मात्र कसाबसा प्रथम श्रेणी
घेऊन. तेवढ्या गुणांवर या महाविद्यालयात बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमाला मला
प्रवेश देता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स विषयाला कोठे
प्रवेश मिळू शकेल, याचा शोध घ्यायला सुरुवात केली. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात
१९८४ साली जवळपास एक महिना वास्तव्य केले होते. वस्तीगहात राहताना या महाविद्यालयाचा
परिसर मनापासून आवडला होता. या महाविद्यालयाचा परिसर बार्शीच्या कॉलेजपेक्षा खूपच सुंदर
होता. मी दयानंद महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो का याची गावातील आबासाहेब शिंदे यांना
चौकशी करायला सांगितले. आबासाहेब त्यावेळी रसायनशास्त्र विभागात प्रयोगशाळा सहाय्यक
होते. त्यांनी चौकशी करून प्रवेश मिळू शकतो असे सांगितले. वडील प्राथमिक शिक्षक असल्याने
कोणतीही आधिकची फी भरावी लागणार नव्हती.
मी जून १९८६ मध्ये
सोलापूरला जाऊन दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रवेश घेताना प्रथम वर्षासाठी
इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र हे विषय निवडले. दयानंद महाविद्यालयात
एक वेगळी संस्कृती होती. प्रत्येक विभागाला वेगळी इमारत होती. आंतरविभागीय विषय हवामानशास्त्र,
जैवरसायनशास्त्र असे विषय द्वितीय वर्षाला निवडता येत होते. पायाभूत सुविधा जशा प्रशस्त
होत्या, तसेच विशाल मनाचे शिक्षक होते. महाविद्यालयाची गुणवत्ता टिकून राहावी यासाठी
वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक बारावीच्या वर्गाला शिकवत असत. त्याचप्रमाणे प्रथम वर्षासाठी
ज्येष्ठ शिक्षक अध्यापन करत असत. (आता ही अध्यापन संस्कृती राहिली नाही, असे ऐकावयास
मिळते.) परिणामी त्या विषयाकडे विद्यार्थी आकर्षित होत असत.
पहिल्या वर्षी भौतिकशास्त्र
शिकवण्यासाठी विभागप्रमुख मनगोळी सर, डॉ. नागेश धायगुडे आणि प्रा. वैशाली धायगुडे मॅडम
होते. मनगोळी सरांची मातृभाषा मराठी नसावी. मात्र अत्यंत सोप्या इंग्रजीत मध्येच मराठी
शब्द वापरत ते खूप सुंदर पद्धतीने जनरल फिजिक्सचा भाग शिकवत असत. दुसरा पेपर होता तो
इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिजमचा हा पेपर धायगुडे सर आणि मॅडम शिकवत असत. सरांचे अक्षर
आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत इंग्रजीतून शिकवण्याची पद्धत मुलांना भावत असे. मॅडमकडे
त्यातील अवघड, विद्यार्थ्याला समजायला कठीण वाटणारा भाग असायचा. त्या आयआयटीमध्ये शिकायला
असल्याने त्यांना कठीण भाग देतात, अशी विद्यार्थ्यात कुजबूज असायची. त्याही इंग्रजी
माध्यमातून शिकवत. मात्र मुलांना काही समजले नाही तर मराठीतूनही समजावून सांगत. मॅडमची
शिकवण्याची पद्धत वेगळी. तीन शिक्षक, तिघांच्या शिकवण्याच्या पद्धती वेगळ्या. मात्र
विद्यार्थी या तिघांच्याही शिकवण्यामुळे भौतिकशास्त्र विषयाच्या प्रेमात पडत.
दुसऱ्या वर्षी यातील
एक विषय सोडावा लागत असे. मी रसायनशास्त्र विषय सोडून इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र
आणि गणित हे विषय निवडले. दुसऱ्या वर्षी जाधव सर, धायगुडे मॅडम आणि धायगुडे सर काही
तास घेत असत. दुसरे वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकच विषय निवडावा लागत असे. तोपर्यंत धायगुडे
सर आणि मॅडमच्या शिकवण्यामुळे माझ्या मनावर भौतिकशास्त्राने बराच कब्जा करायला सुरुवात
केली होती. इलेक्ट्रॉनिक्स तरीही आवडत होते. इलेक्ट्रॉनिक्स की भौतिकशास्त्र यामध्ये
शिक्षकाच्या अध्यापनाने इलेक्ट्रॉनिक्स विषय बाजूला पडला आणि मी भौतिकशास्त्र विषय
घेऊन पदवी अभ्यासक्रम घ्यावयाचे निश्चित केले.
तसा प्रथम वर्षापासून शैक्षणिक उपक्रमाबरोबर वक्तृत्व, निबंध स्पर्धामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. महाविद्यालयातील एखाद्या विद्यार्थ्याने क्रीडा, सांस्कृतीक स्पर्धेत यश मिळवले तर त्याचे नाव लिहिलेला फलक दर्शनी भागात लावलेला असे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काही दिवसातच या संस्कृतीची ओळख झाली आणि आपलं नावपण असंच बोर्डवर झळकले पाहिजे, असे मनात येऊन गेले. आपला प्रांत सांस्कृतीक होता. माझ्या शालेय जीवनामध्ये निबंधाचे चांगलंच कौतुक करण्यात येत असे. निबंध स्पर्धा हा प्रकार आपल्याला पेलवेल असे वाटले. काही दिवसातच जायंटस ग्रुप ऑफ सोलापूर यांच्या निबंध स्पर्धेची जाहिरात आली. चार-पाच विषय होते. त्यातील ‘अंमली पदार्थांचे दुष्परिणाम’ या विषयावर १००० शब्दापर्यंतचा निबंध लिहून पाठवायचा होता. मी त्याबाबत काही संदर्भ शोधून छान निबंध तयार केला आणि मुदतीत टिळक चौकातील दिलेल्या पत्त्यावर नेऊन दिला. निकालाची उत्सुकता होती. अशा स्पर्धेत भाग घ्यायचा पहिलाच प्रसंग होता. त्यावेळी मोबाईलचे युग कल्पनेतही नव्हते. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी छापून आली. त्या काळी संचार, केसरी गर्जने, विश्वसमाचार, तरूण भारत अशी काही मोजकी दैनिके सोलापूरातून प्रकाशित होत असत. तोपर्यंत माझ्या वर्गातील सर्वांशी ओळखीही झाल्या नव्हत्या. आम्ही सकाळी चहा घ्यायला टपरीवर गेलो. तेथे आमचे चहा-नाष्टा घेत पेपर वाचन चालत असे. चहा घेत असताना राजेंद्र शिंदे या वर्गमित्राने येऊन प्रथम माझे अभिनंदन केले. ते पेपरचे पान घेऊन क्षणात बातमी वाचून काढली. पहिल्यांदाच माझे नाव छापून आलेले होते. खूप आनंद झाला होता. तब्बल तीनशे रूपयांचे पहिले बक्षीस (त्यावेळी महिन्याला खानावळीसाठी मला १४० रूपये द्यावे लागत) मिळाले होते. आता ही बातमी शिक्षकांना आपण कशी सांगायची, असे मनात होते.
मात्र प्रॅक्टिकलसाठी
भौतिकशास्त्र विभागात गेलो आणि मॅडम आम्हाला प्रॅक्टिकलला नसतानाही, पहिल्या वर्षाच्या
प्रयोगशाळेत आल्या. माझे चुलतबंधू सुरेश शिंदे हे धायगुडे सर आणि मॅडमचे फॅमिली फ्रेंड
होते. त्यामुळे त्यांचा माझा परिचय होता. त्यांनी बातमी वाचली होती. त्या माझ्याजवळ
आल्या आणि विचारले, ‘तुम्ही निबंध स्पर्धेत भाग घेतला होता का?’ मी ‘हो’ म्हटले. त्या लगेच मोठ्याने म्हणाल्या ‘जायंटस क्लबच्या निबंधस्पर्धेत
विलास शिंदेना पहिले बक्षीस मिळाले आहे, त्यांचे अभिनंदन.’ एकिकडे आपण स्वत: शिक्षकांना
कसे सांगायचे, असा मी विचार करत होतो. हा प्रश्न मॅडमनी चुटकीसरशी सोडवला होता. पुढे
त्यांनी मला कोणाचे मार्गदर्शन घेतले, आणखी काय लिहिता, असे बरेच प्रश्न विचारले. या
स्पर्धेसाठी मी कोणाचेच मार्गदर्शन घेतले नाही, असे सांगितले. तसेच कविता लिहितो, हे
ही सांगितले. ‘तुम्हाला साहित्यात रस असेल, तर तुम्ही वनस्पतीशास्त्र विभागातील शाम
कुलकणी सरांना भेटा असे आवर्जून सांगितले.
मी शाम कुलकर्णी सरांना भेटलो आणि ‘अक्षरमंच’ या महाविद्यालयाच्या भित्तीपत्रकाचे काम पाहू लागलो. यातून आमच्या वर्गात शिकणाऱ्या नरेंद्र अंभोरे यांचा परिचय झाला. अंभोरे यांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी संपादक म्हणून काम करता आले. दुसऱ्या दिवशी जायंटस क्लबचे पत्र मिळाले माझे नाव बोर्डवर लागले. पुन्हा एकदा अभिनंदन झाले. माझे अल्पकालीन ध्येय साध्य झाले होते. पुढे ज्या-ज्या स्पर्धेची जाहिरात येईल त्या सर्व स्पर्धात भाग घेऊ लागलो. मध्येच एक दिवस कामत सरांनी, ‘निबंध स्पर्धेला पाठवण्यापूर्वी धायगुडे मॅडमना दाखवत जा’, असे सांगितले. त्यानंतर रोटरी क्लबची निबंध स्पर्धा जाहीर झाली. विषय होता, स्त्री-मुक्ती. मी निबंध तयार केला आणि मॅडमना भितभितच विचारले, ‘मॅडम, हा निबंध दाखवायचा होता’. मॅडमनी निबंध लगेच वाचायला घेतला आणि पाच मिनिटात वाचून संपवला. ‘मी असाच निबंध पाठवणार, की पुन्हा लिहिणार’, असे विचारले. मी म्हटलं, ‘काही बदलायचे असेल तर पुन्हा लिहितो.’ मॅडमनी लगेच निबंध पुन्हा वाचायला आणि त्यामध्ये दुरूस्त्या करायला सुरुवात केली. दहा-बारा व्याकरणाच्या दुरुस्त्या केल्या. एक मुद्दा वाढवण्यास सूचवले. जी गोष्ट करायची ती परिपूर्ण असली पाहिजे, असा आग्रह त्या कायम धरत.
मी तो निबंध घेतला
आणि हॉस्टेलवर संध्याकाळी पुन्हा लिहून काढला. दुसऱ्या दिवशी तो रोटरी क्लबच्या कार्यालयात
सादर केला. अर्थातच या स्पर्धेतही पहिले बक्षीस मिळाले. तेथून पुढे कोणत्याही स्पर्धेसाठी
निबंध पाठवताना मॅडमना तो दाखवून दुरूस्त करूनच पाठवत असे. अनेक स्पर्धात पहिले किंवा
दुसरे बक्षीस हमखास मिळायचे. अशी दरवर्षी पाचसहा बक्षीसे मिळायची. त्यानंतर सोलापूर
बाहेरच्या स्पर्धांसाठीही निबंध पाठवले आणि बक्षीसे मिळवली. त्यामध्ये मॅडमचे मार्गदर्शन
महत्त्वाचे होते. आयआयटीमध्ये इतर विषयही शिकवले जातात. विद्यार्थ्यांना इतर विषयातील
अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध असते. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्येही आंतरविद्याशाखीय
अभ्यासाचे महत्त्व अधोरेखीत करण्यात आले आहे. दयानंद महाविद्यालयात, असे कोणतेही बंधन
किंवा नियम नसताना भौतिकशास्त्र शिकणाऱ्या मुलाला ही सुविधा उपलब्ध होती. धायगुडे मॅडम
आणि सर विद्यार्थ्याला भौतिकशास्त्राचा कोणताही संबंध नसलेल्या, निबंध लेखनाचे कौशल्य
वाढवण्यासाठी कष्ट घेत होते. त्यांनी कधीही याचा आणि तुमच्या विषयाचा काय संबंध, असा
प्रश्न विचारला नाही. उलट आपला बहुमूल्य वेळ अशा मार्गदर्शनासाठी दिला. त्यांनी अशा
कार्यासाठी शैक्षणिक धोरणामध्ये अशा तरतुदी येण्याची वाट पाहिली नाही. ते येण्याच्या
कित्येक वर्ष अगोदर हे सारे घडत होते.
विद्यार्थ्यांने केवळ विषयाचे ज्ञान घ्यावे म्हणून त्या कार्यरत नव्हत्या. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्या स्वत: एनसीसी कॅडेट होत्या. त्या खेळाडूही होत्या त्यां राष्ट्रीय पातळीवर खेळल्या होत्या. आता त्या भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत विविध उपकरणाशी लिलया खेळत होत्या. विद्यार्थ्यांना ती कौशल्ये प्राप्त व्हावीत, असे मनोमन प्रयत्न करत होत्या. अंधारखोलीतील (डार्क रूममधील) प्रयोग त्या सहज करून दाखवत. इतर नवीन शिक्षकांना जे प्रयोग करून दाखवायला दोन तास लागत, तेच प्रयोग मॅडम अर्ध्या तासात करून दाखवत असत. दुसऱ्या वर्षाचे प्रयोग आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली करत असायचो. मॅडमना सर्व उपकरणे शरण आली असावीत. मॅडमच्या उपस्थितीत कोणत्याही उपकरणाने सहकार्य करायचे नाकारले नाही. सगळी उपकरणे निमूट काम करत असत. जेव्हा उपकरणे एवढी सरळ वागायची, तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये वाकड्यात जाण्याचे धाडस कसे येणार. विद्यार्थी प्रयोग करताना मॅडम मधून एक फेरी मारून जात. मध्येच विद्यार्थ्यांबरोबर बोलत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष प्रयोगावर केंद्रित झालेले असायचे.
मी बी.एस्सी.च्या
दुसऱ्या वर्गात शिकत असताना, आमची प्रात्यक्षिके वरच्या मजल्यावरील प्रयोगशाळेत होत
असत. त्या प्रयोगशाळेतील डिमरमध्ये स्पार्किंग होत असे. तोपर्यंत उपकरणे हाताळण्याचे
कौशल्य प्रयोगशाळा सहाय्यक कारंडे यांच्या लक्षात आले होते. त्यातच मी हिंदुस्तान इन्स्टिट्युट
या खाजगी संस्थेतून विद्युत उपकरणे हाताळण्याचा कोर्स केला होता. कारंडे यांनी मला
डिमर काढून आतल्या कॉईलवरील आवरण न जाता कार्बन काढणार का असे विचारले. मी ही तेवढाच
हात साफ होईल म्हणून लगेच ते साफ करायला घेतले. दोन डिमरचा कार्बन साफ करून झाले. त्यांचे
काम सुरळीत सुरू झाले. तिसरा डिमर साफ करत असताना अचानक शिपायाने येऊन फॅनचे बटण दाबण्याऐवजी
डिमरची पीन असलेले बटन सुरू केले. जोराचा झटका बसला. त्यांने लगेच बटण बंद केले. मात्र
माझ्या अनियंत्रीत हालचाली झाल्या. पाय अचानक पुढे गेला. पुढे लोखंडी पट्टी असलेले
स्टूल होते. त्या स्टूलच्या खालच्या पट्टीवर पाय आदळला. पाय आदळताना डाव्या पायाच्या
करंगळीशेजारचे बोट आणि करंगळीच्या
मधल्या भागात ती पट्टी आली. काही कळण्याच्या आत रक्ताची धार सुरू झाली. मला लगेच महाविद्यालयाच्या
दवाखान्यात नेले. तिथल्या डॉक्टरनी पटकन तीन टाके घातले. पायाला माती, चिखल लागू देऊ
नका म्हणून सांगितले. जखम खोलवर झाली होती. चालताना नको एवढ्या वेदना होत होत्या. कसेबसे
आवरावे लागत होते. जखमेजवळ पाणी पोहोचल्यास जखम चिघळू शकते असे सांगितल्याने आंघोळही
नाही. मेसला जेवायलाही जाता येत नव्हते. बाहेरून मेसवर डब्बाही मागवता येत नव्हता आणि
होस्टेलची मेसही नव्हती. प्रयोगशाळा सहाय्यक कारंडे याला विभागप्रमुख मनगोळी सर खूप
ओरडले होते. त्याला ओरडून माझी जखम भरणार नव्हती. या काळात मॅडमनी इतर मुलांकडे माझी
चौकशी केली. संध्याकाळी डब्बा घेऊन मॅडम आणि सर निळया स्कूटरवरून होस्टेलवर आले. त्यापुढे
आठ दिवस दररोज माझ्यासाठी डब्बा हॉस्टेलवर पोहोच होत होता. डॉक्टरची औषधे, आणि मातेच्या
आपुलकीने घेतली जाणारी ही काळजी यामुळे मी लवकरच बरा होऊन पुन्हा वर्गात येऊ लागलो.
मात्र या काळात माझ्या मनात मॅडमबाबत एक बदल झाला. एका चांगल्या शिक्षिकेची मनातील
प्रतिमा, मातृप्रतिमेत कधी बदलली ते कळालेच नाही.
माझे उपकरणे हाताळण्याचे
आणि प्रयोग करण्याचे कौशल्य इतरही शिक्षकांच्या लक्षात आले होते. तसेच माझे हस्ताक्षर
कौशल्यही जर्नलच्या रूपात सर्वांच्या लक्षात आले होते. त्यातही अक्षरमंचचे अंक नियमीत
निघत असत. त्यावेळी नुकतेच संगणक शिक्षणसंस्थेत दिसू लागले होते. फ्लेक्सचा जमाना यायचा
होता. त्यामुळे विभागातील विविध कार्यक्रमाचे बोर्ड रंगीत खडूनी सजवले जात. हे काम
माझ्याकडे आपोआप आले. त्यावेळी फलकावर लिहावयाचा मजकूर प्रथम कागदावर लिहून मॅडमकडून
तपासून घ्यायचो. मॅडमचे गोलाकार अक्षर सुंदर आहे. त्यांच्या व्याख्यानाच्या नोटसही
तशाच अक्षरात कोणतीही खाडाखोड नसलेल्या असायच्या. ही नोटस काढण्याची सवय माझ्यातही
नकळत आली. कोणतीही खाडाखोड न करता लेखन व्हायला हवे हा संस्कार मॅडमचाच. त्या शिकवताना
विद्यर्यांनी मुद्दे लिहून घ्यावेत आणि संदर्भ पुस्तके वापरून नोटस काढाव्यात, असे
सांगत असत. त्यामुळे बी.एस्सी.ला असतानाच आम्हाला बी.एल. थरेजाचे बेसीक इलेक्ट्रॉनिक्स,
थर्मोडायनॅमिक्सला श्रीवास्तव, ॲटोमीक फिजिक्सला राजम या लेखकांची आणि त्यांनी लिहिलेल्या
पुस्तकांची ओळख झाली. संदर्भ पुस्तक वापरणे त्यातून नोटस काढणे, या गोष्टींची सवय झाली.
पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच विषय शिकायचा कसा, अभ्यासायचा कसा, याची शिकवण मिळाली
आणि आम्ही स्वत:च्या नोटस काढू लागलो. मॅडमकडून शिकलेल्या अनेक गोष्टीतील ही सर्वात
महत्त्वाची गोष्ट.
पुढे शिक्षकांचा १९८८ च्या अखेरीस शिक्षकांनी संप पुकारला. आंदोलनामध्ये सर्वच शिक्षक सहभागी होते. आम्ही जाताना येताना महाविद्यालयाबाहेर बसलेले शिक्षक पहात होतो. मात्र यामध्ये मॅडम किंवा सरांना क्वचित पाहिले. या संपामुळे वर्गात शिकवणे पूर्ण बंद झाले होते. जवळपास दोन महिने हा संप चालला. शिक्षकांनी संपातील दिवस सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवून भरून काढायचे होते. त्यामुळे दररोज वर्ग सुरू झाले. तो जानेवारीचा शेवटचा आठवडा होता. आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. झुंजूरवाड यांनी मला बोलावल्याचा निरोप विभागात आला. प्राचार्यानी बोलावले म्हणजे अंगावर काटा यायचा. पण मला काहीतरी वेगळी बातमी असावी, असे वाटत होते. मी तरीही भितभितच गेलो. प्राचार्यानी मला एक पत्र दाखवले आणि तुम्ही या शिबिरासाठी जायचे असे सांगितले. अभ्यासाची, शिकवण्याची आणि शिकण्याची घाई सुरू असताना अशा शिबीरासाठी जवळपास तीन आठवडे घालवणे म्हणजे एम.एस्सी. प्रवेशाच्या स्वप्नावर पाणी सोडण्यासारखे होते. त्यामुळे मी प्राचार्याना लगेच नकार सांगितला. प्राचार्यांनी माझे मन वळवण्याची जबाबदारी धायगुडे सरांवर सोपवली. सरांनी मला खूप समजावले. सरांच्या पेपरचा अभ्यास करणे सहज शक्य होते. मात्र मॅडम शिकवत असलेल्या क्वांटम मेकॅनिक्सचे काय करायचे असा प्रश्न होता. मी सरांनाही जवळपास नकारच दिला होता. सरांनीच मॅडमना मला समजावून सांगायला सांगितले असावे.
मॅडमनी मला सहज
बोलावल्यासारखे बोलावून, ‘प्राचार्यांनी का बोलावले होते’ असे विचारले. मी खिशातील
पत्र काढून मॅडमना दाखवले. मॅडमनी लगेच ‘अभिनंदन’ केले. ‘खूप छान संधी मिळाली आहे’,
असेही म्हणाल्या. मी म्हटलं, ‘मॅडम, हे जवळपास तीन आठवडे जातील. पुन्हा मी युवक महोत्सवासाठी
जावे लागेल. जवळपास एक महिना असा गेल्यावर मला एम.एस्सीला प्रवेश कसा मिळेल.’ मॅडम
लगेच म्हणाल्या, ‘तुम्ही जावा. अशी संधी पुन्हापुन्हा मिळत नसते. तुम्ही जरूर जावा.
अभ्यास होत राहील. आल्यानंतर नोटस मिळतील. होईल तुमचा अभ्यास. तुम्ही गेलंच पाहिजे.’
मी पुन्हा म्हटलं, ‘मॅडम बाकी सारे संमजेल हो, पण क्वांटम मेकॅनिक्स समजायला जड जाईल.’
मॅडमनी पुन्हा सांगितले, ‘मी आहे ना, जे समजणार नाही ते मी शिकवेन. तुम्ही बिनधास्त
जावा.’ मॅडमनी दिलेल्या खात्रीमुळे मी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सोलापूर सोडले.
मार्च १९८९ मध्ये मी परत आलो तेव्हा सर्व अभ्यासक्रम शिकवून झाला होता. सर्व शिक्षकांनी
नोटस, पुस्तके उपलब्ध करून दिली. बाकी सर्व विषयांचे बऱ्यापैकी आकलन होत होते. मात्र
क्वांटम मेकॅनिक्स डोक्यावरून जात होते. अखेर मॅडमनी तो सेक्शन घरी शिकवला. कोणतेही
शुल्क न घेता. हे शिकवणे तसे किती त्यागाचे होते हे मला मी बाप झाल्यावर लक्षात येते.
कारण त्यावेळी दिप्ती आणि प्रज्योत हे दोघेही तसे लहान होते. शालेय विद्यार्थी. त्यांचा
हक्काचा हा वेळ मॅडम मला देत होत्या. एवढेच नाही, अनेकदा शिकवत असताना उशीर झाला तर,
घरीच जेवायला लावत आणि नंतर मी होस्टेलवर येत असे.
मॅडम आणि सरांच्यामुळे
मी लेखनाकडे वळलो. दयानंद महाविद्यालयातील शिक्षकांनी केलेले संस्कार आजन्म पुरणारे
आहेत. मात्र त्यातील सर आणि मॅडम यांचा वाटा सिंहाचा आहे. त्यांनी प्रज्योत, दिप्ती
यांच्याइतकेच प्रेम माझ्यावर केले. तसे त्या सर्वांशीच आपुलकीने वागत. सर्वांच्या अडचणी
सोडवण्यात पुढाकार घेत. मला हे कायम जाणवत असे. त्यातून त्यांच्याप्रती कामयत मनात
कृतज्ञता भाव वढत गेला. त्यामुळे आयुष्यातील अनेक निर्णय घेताना मी त्यांचे मत जाणून
घेत असे.
पुढे मी सोलापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पदव्युत्तर केंद्रात अधिव्याख्याता म्हणून रूजू झालो. माझ्या मनात विचार आला की, राष्ट्रीय विज्ञान दिनी एक ‘विज्ञान पुरवणी’ प्रकाशित व्हावी. मी हा विचार मॅडम आणि सरांच्यापुढे बोलून दाखवला. लगेचच आम्ही तरूण भारतचे संपादक विवेकजी घळसासी यांना भेटलो. यापूर्वी ‘मध्यमा’ पुरवणीचे काम मी अनेक दिवस पाहिले असल्याने पुरवणी काढण्यासाठी काय, काय करावे लागते, हे मला माहीत होते. आम्ही विवेकजीना कल्पना सांगताच त्यांनी लगेच होकार दिला. मात्र विज्ञान लेखकांशी माझा परिचय नव्हता. सर आणि मॅडमनी अगदी जयंत नारळीकर, बाळ फोंडके, विगो कुलकर्णी, निरंजन घाटे हेमचंद्र प्रधान अशा अनेक लेखकांशी संपर्क साधला. या मान्यवरांनीही लेख दिले आणि २८ फेब्रुवारी १९९६ पासून पुढे मी सोलापूरमध्ये असेपर्यंत आम्ही दरवर्षी विज्ञान पुरवणी प्रकाशित करत राहिलो. पुढेही तरूण भारतची विज्ञान पुरवणी मॅडम आणि सर प्रकाशित करत. यातून मी विज्ञान लेखनाकडे जास्त ओढला गेलो. या काळात काही वेळा अगदी उशिरापर्यंत आम्ही काम करत असायचो आणि मॅडमही बरोबर असत.
पुढेही हे घर माझ्यासाठी प्रज्योत, दिप्तीइतक्याच हक्काचे झाले. घराशी कायमचे जोडले जाण्यामध्ये मॅडमचा स्वभाव महत्त्वाचा ठरला. मॅडम सरांपेक्षा थोडा प्रॅक्टिकल विचार करत. मात्र विद्यार्थ्यांसाठी काही करायचे झाले तर सरांच्याही पुढे असत. याचा अनुभव मी अनेकदा घेतला. विद्यार्थ्यांने एखादी अडचण सांगावी आणि मॅडमनी ती आईच्या ममतेने सोडवावी, याचे दर्शन अनेकदा घडले. यातून मी या कुटुंबाशी कायमचा जोडला गेलो. कन्या वैष्णवीसाठी सर ‘गुड मॉर्निंग आजोबा’ आणि मॅडम ‘आज्जी’ बनल्या. तिचेही मॅडमकडून भरपूर लाड झाले. मी प्रशासकीय सेवेत उपकुलसचिव झाल्यानंतर सोलापूरला २००३ पर्यंत होतो. तोपर्यंत दररोज किमान फोनवर बोलायचो. आठवड्यातून एकदा सर्वंजन एकत्र यायचो. सर बाहेरगावी गेले असले तरी यात खंड नसायचा. पुढे माझी बदली कोल्हापूरला झाली.
मॅडम आणि सर दोघेही
सेवानिवृत्त झाल्यानंतर सर अनेकदा कार्यालयीन कामासाठी कोल्हापूरला आले. मात्र २००९
च्या फेब्रुवारीमध्ये सर आणि मॅडम प्रथमच दोघेही कोल्हापूरला आले. राहिले. मुलांना
खऱ्या अर्थाने आजी-आजोबा अनुभवता आले. स्नेहबंध आणखी दृढ झाला. छोट्याछोट्या प्रसंगात,
कमी क्षणातही आनंदाची साठवण कशी करायची, हे त्यांच्याकडूनच शिकता आले. विद्यार्थ्याला
केवळ क्रमीक पुस्तकातील, अभ्यासक्रमात नमूद केलं तेवढ्यावर समाधान न मानता त्याचा सर्वांगीण
विकास कसा होईल यावर या उभयतांनी भर दिला.
त्यानंतर तीनच वर्षांत सरांचे निधन झाले. त्यावेळी ‘एककांचे मानकरी’ या पुस्तकाचे माझे लेखन सुरू होते. सरांच्या जाण्याचा धक्का माझ्यासाठी तीव्र होता. मी पुस्तकाचे काम जवळपास थांबवले होते. मात्र मॅडमच्या सूचनेनुसार पुन्हा ते पुस्तक पूर्ण करायला सुरुवात केली आणि तीन वर्षांनंतर ते प्रसिद्ध झाले. ते पुस्तक सरांना अर्पण केले. त्याचवेळी मी ‘एककांचे इतर मानकरी’ हे पुस्तक लिहायचा विचार करत होतो. आज ते प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि हे पुस्तक आज प्रकाशनासाठी तयार झाले आहे. एककांचे इतर मानकरी हे मॅडमना अर्पण केले आहे.
पुढे मॅडम पुण्याला
राहू लागल्या. मात्र सरांच्या स्मरणार्थ सोलापूरच्या घरांमध्ये शालेय मुलांना प्रयोगाचे
महत्त्व पटवून देणे आणि त्यांच्यामध्ये विज्ञानाची रूची निर्माण व्हावी, यासाठी त्या
कायम प्रयत्नशील राहिल्या. सरांच्या स्मरणार्थ व्याख्यानमालाही मराठी विज्ञान परिषदेच्या
सोलापूर शाखेमार्फत सुरू करण्यात आली. आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी वर्षाच्या निमित्ताने
दिप्तीच्या सहाय्याने आवर्त सारणी कशी सहज समजावून सांगता येईल यासाठीचे एक प्रतिमान
(मॉडेल) तयार केले. अनेक शाळांतून आवर्त सारणीवर व्याख्याने दिली. त्यांच्या या मॉडेलची
चर्चा रशियापर्यंत पोहोचली. त्यांना या मॉडेलसह रशियात आमंत्रित केले. त्यांना त्यावेळी
जाणे जमले नाही. मात्र, विज्ञान प्रसाराचे कार्य त्या आजही करत आहेत.
इकडे मीही याच विषयावर
‘आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया’ हे राज्य शासन पुरस्कार प्राप्त पुस्तक लिहिले.
भौतिकशास्त्र तितक्याच समर्थपणे शिकवत असतानाच, या पुस्तकाच्या लेखनाचा विचार आणि त्यासाठी
आवश्यक असणारे लेखन कौशल्याचे संस्कार देणाऱ्या या गुरूमातेला त्रिवार वंदन आणि शिक्षक
दिनांच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा!
सर प्रथमता मी आपल्याला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर आपल्या गुरु विषयी सखोल अभ्यास करून आपल्या गुरु विषयी असलेला आदर त्यांनी दिलेले ज्ञान आणि त्यांच्याप्रती असलेली आपली श्रद्धा हे वाचून अतिशय आनंद वाटला आणि खरंच आताच्या या पिढीमध्ये गुरु विषयी असलेला आदर कुठेच पाहायला मिळत नाही पण आपण एवढ्या वर्षापूर्वीची गुरु विषयी असलेली श्रद्धा आणि गुरुने दिलेले ज्ञान याविषयी सविस्तर लेख वाचला अतिशय आनंद झाला आणि आताच्या पिढीच्या पुढे एक गुरु आणि शिष्य कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण दिले याबद्दल आमच्या परिवारातर्फे आपले खूप खूप अभिनंदन सर आपण भविष्यामध्ये उत्तरा उत्तर अशीच प्रगती करत रहा आणि आपण याच्यापेक्षाही उत्तुंग शिखर गाठावे अशी मनोकामना करतो आणि थांबतो पुनश्च एकवेळ आपल्याला शिक्षक दिनाच्या अनेक शुभेच्छा.🙏
उत्तर द्याहटवातुमच्या कॉलेज जीवनातल्या या सर्व अविस्मरणीय आठवणी आहेत सर. त्याकाळात असे आदर्श गुरुजन समोर होते म्हणून आपले जीवन घडले आणि जीवनाला दिशा मिळाली. त्यांच्या कृतज्ञतेपोटी लिहिलेला हा लेख आज शिक्षक दिनी खूप सुंदर भाषेत आपण लिहिला आहे. त्या गुरूंचे भाग्य की आपण त्यांचे विद्यार्थी होता.
उत्तर द्याहटवासर अतिशय संवेदन शील लेख आहे . शिक्षक कसा असावा,संशोधक कसा असावा, विद्यार्थी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण आपण आहात. धन्यवाद.
उत्तर द्याहटवावाह असे शिक्षक म्हणजे भाग्य
उत्तर द्याहटवाखूप छान सर
उत्तर द्याहटवासर तुम्ही खुप भाग्यवान आहात कारण तुम्हाला असे शिक्षक मिळाले. 👍
उत्तर द्याहटवाअसे गुरुवर्य् आणि असा शिष्य एकमेवाद्वितीय..दोघांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि अभिवादन!! छान लेख लिहिला आहे सर.
उत्तर द्याहटवाअतिशय सहज सोप्या आठवणी आपण मांडल्या. शिक्षकांच्या प्रति असलेला आदर व्यक्त करताना सर्व आठवणी आणि सगळी फोटो संग्रही ठेवल्याबद्दल अतिशय आनंद वाटला. शिक्षकाच्या मुलाने शिक्षकाबद्दल दाखवलेला आदर निश्चितच स्मरणात राहील. यापुढेही उत्तम लेखन होत राहील बद्दल शंका नाही. ज्यांनी ज्यांनी धायगुडे सरांना पाहिले आहे ते नक्की म्हणतील सरांचे चरित्र तुम्ही/साहेबांनी लिहावे.
उत्तर द्याहटवादयानंद कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याला सलाम.
छान, गुरु शिष्य जोडीस शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा.सुंदर शब्दात वर्णन केल्यामुळे अभिनंदन व शुभेच्छा.
उत्तर द्याहटवा👌
उत्तर द्याहटवाअतिशय छान लेख. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यातील बऱ्याच प्रसंगांचा मी जवळून साक्षीदार आहे. सरांचे आणि मॅडम चे कार्य तुम्ही उत्कृष्ठ पणे पुढे नेत आहात.
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लिहिला आहे सर बहुतेक सरांचे नातेवाईक कोकणात आहेत डॉक्टर किरण मराठे यांच्या आई व धायगुडे मॅडम या बहिणी आहेत असे वाटते मी संगमेश्वर महाविद्यालयांमध्ये एम एस सी करत असताना पीजी सेंटरला भौतिकशास्त्र या विषयासाठी धायगुडे सर गॅस लेक्चर होते माझे सहकारी मित्र त्यांची नेहमी आठवण काढतात
उत्तर द्याहटवाव्वा! गुरुबद्दल इतक्या निर्मळपणे आपण व्यक्त झालात. असे गुरु मिळणे खरोखरच महत्वाचे आहे. शुभेच्छा 🌿🌿
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लेख सरजी...
उत्तर द्याहटवाआपणास शिक्षक दिनानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा...
एक प्रशासकीय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपली ओळख आहे. त्यामुळेच आपली शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या कुलसचिव पदी निवड झाली. आपले पुनश्य मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा! तसेच शिक्षक दिनाच्या ही आपणास खूप खूप शुभेच्छा.! आपल्या कार्यान प्रेरित होऊन मी आपणास माझ्या गुरु स्थानी मानतो. कामकाज यशस्वीपण सांभाळून आपण पर्यावरण व निसर्ग प्रेमी आणि साहित्य लेखन अशा वेगवेगळ्या भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहात. आपल्या प्रशासकीय व्यस्त कार्यभातून आपण सतत दर्जेदार व सत्य परिस्थितीवर लिखाण करता ही मोठी अभिमानाची बाब आहे. आपल्या गुरुप्रती आपण व्यक्त केलेल्या भावना अतिशय प्रेरणादायी आहेत.
उत्तर द्याहटवासर्वप्रथम शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा . तुमची लेखणी नेहमीच मनाला स्पर्शून जाणारी असते .आपल्या प्रत्येकालाच आपल्याला घडवलेल्या गुरुबद्दल भरभरून बोलायला खूप आवडतं . कारण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या शिक्षकांचे योगदान हे खूप मोलाचं असतं शालेय वयात महाविद्यालयीन वयात आपण जे घडतो त्यामध्ये आपल्या आई-वडिलांसोबतच शिक्षक यांचा सिंहाचा वाटा असतो हे अमान्य करून चालणारच नाही . तुम्ही तुमच्या गुरुजनाबद्दल व्यक्त केलेले विचार .. त्यांचे तुमच्या आयुष्यातील स्थान ... आज तुम्ही ज्या क्षेत्रात तुमचे योगदान देत आहात त्यामागे शिक्षकांनी दिलेलं पाठबळ व प्रोत्साहन याविषयी तुम्ही व्यक्त केलेली कृतज्ञता ही फार मोठी सांस्कृतिक आणि वैचारिक शिदोरी आहे असं मला वाटतं . लिहिते रहा .
उत्तर द्याहटवाशिक्षकाचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्थान यावर आधारित हा सुंदर आस्वादक लेख म्हणावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्त्व तयार होण्यासाठी शिक्षकाचे वागणे, बोलणे, चालणे, शिकवणे आणि त्याचे आचरण ह्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर किती प्रभाव करतात हे सोदाहरण नोंदविले आहे. ह्याशिवाय यातून एक वैज्ञानिक ललित लेखकही कसा जन्मास येऊ शकतो हे लेखक निर्मितीची प्रक्रिया सांगणारा लेख म्हणूनही या लेखाचे महत्त्व अबाधित आहे.
उत्तर द्याहटवाराष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 मध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले आहे; पण डॉ. शिंदेंनी आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे महत्त्व महाविद्यालयीन जीवनातच ओळखले होते असे दिसते. किंबहुना त्यांनी ते कृतीत आणून विद्यार्थी दशेतच एक नवा आयाम साधलेला दिसतो. आज ते विज्ञान शाखेतील प्राध्यापक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अव्वल प्रशासक म्हणून काम करताना त्यांच्यातील विज्ञानिष्ठ लेखक सतत जागता ठेवलेला आहे; हे त्यांच्या वैज्ञानिक ललितलेखनातून स्पष्ट होते.
मराठीत वैज्ञानिक साहित्याची परंपरा आहे; पण या वैज्ञानिक साहित्याला लालित्याची झालर चढविण्याचे मराठी सारस्वतात पहिले काम डॉ. शिंदेने केले आहे; हे त्यांच्या एकंदर वैज्ञानिक साहित्याचा अभ्यास केल्यास सिद्ध होते. प्रस्तुत लेखातील "एका चांगल्या विज्ञान शिक्षिकेची मनातील प्रतिमा, मातृप्रतिमेत कधी बदलली हे कळलेच नाही" यासारखी विधाने त्यातील सत्यता पडताळणीस पुरेशी ठरतात.
खूप समरसून लिहिलात, कारण तुमच्या घडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे
उत्तर द्याहटवा