Teacher लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Teacher लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

गुरू माऊली…!

 


    चांगले शिक्षक लाभणे ही मुलांच्या भवितव्यासाठी अत्यंत गरजेचे असते. ते फक्त लिहायला-वाचायलाच नव्हे, तर माणूस म्हणून जगायलाही शिकवतात. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला योग्य मार्गावर ठेवणारे शिक्षक लाभले. त्यांनी अनेक चांगल्या सवयी लावल्या. अशा शिक्षकांपैकी एक लक्ष्मण विनायक शिंदे गुरूजी. ते गावात शिक्षक म्हणून आले आणि शाळेच्या विकासासोबत आमच्या मनाचाही विकास केला. त्यांनी विद्यार्थ्याप्रती ममत्व कसे असते, हे शिकवले. आज शिक्षक दिन. शिक्षक दिनाच्या त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देताना... त्यांच्यासंदर्भातील हा लेख..

___________________________________________________________

शिक्षक हा सदा सर्वदा ‍शिक्षक असतो. शिक्षकाला मास्तरही म्हणत. मास्तर हे नाव पालकांसाठी असायचे. त्यातही न शिकलेले पालक, मास्तर हा शब्द वापरत. शिकले-सवरलेले पालक मात्र गुरूजी म्हणत. वारकरी संप्रदायातील अनेक पालक गुरूमाऊली म्हणत. आता हा शब्द फारसा ऐकावयास मिळत नाही. खरे तर माऊली म्हटले की संत ज्ञानेश्वर डोळ्यासमोर येतात. त्यांना मिळालेली उपाधी ‘माऊली’ गुरू शब्दासोबत जोडून वापरली जात असे. खरंच शिक्षकांमध्ये एक माऊली असते. नेहमी आपल्या बाळाचे भले चिंतणारी. मुलांने चांगला माणूस बनावे, असे सदैव विचार करणारी. शिक्षक अनेक प्रकारचे असतात. काही शिक्षक ‘चुकीला माफी नाही’ म्हणत नेहमी मारणारे. अशा गुरूंना मारकुटे गुरूजी असे टोपणनाव देत नव्याने बारसे होते. त्यांनी मारायचे सोडले तरी नाव काही जात नाही. त्यांची बदली झाल्यावर गुरूजी त्या गावी पोहोचण्यापूर्वी त्यांचे हे नाव पोहोचलेले असे. आज मुलांना मारण्यास बंदी घातली असल्याने असे मारकुटे गुरूजी नाव कोणाला मिळत नसावे. आमच्या बालपणी मात्र असे मारणारे गुरूजी होते. मात्र त्यांच्याही मनात ‘मार दिल्यावर विद्यार्थी सुधारेल’, हीच भावना असायची. आता अनेक शाळांमध्ये गुरूजीऐवजी टिचर म्हणतात. मात्र टिचर या शब्दात गुरूजींमध्ये असणारा आदर, भीती आणि स्नेह दिसत नाही.

या गुरूजींबद्दल गावात अपार आदर असायचा. गावात आलेली अनेक घरातील पत्रे वाचून दाखवायची जबाबदारी गुरूजीवर असायची. अडल्‌या-नडल्या गोष्टींवर सल्ला देणारे ते सल्लागार असायचे. अगदी मुलीचे लग्न करायचे, असेल तर स्थळ पाहायलाही गुरूजींना सांगण्यात येत असे. शेतात पिकलेल्या भाज्या, फळांचा वाणवळा गुरूजींच्या घरात हमखास सर्वात अगोदर पोहोचायचा. यातून द.मा. मिरासदार, शंकर पाटील आणि इतर लेखकांना अनेक कथांचे विषय मिळाले. पुढे काळ बदलत गेला. वाहने आली. प्रवास वेगवान झाला. गावाच्या मुलांत आपल्याही मुलाला पाहणारे गुरूजी, पुढे गावातील मुलांच्या भवितव्यापेक्षा आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता करू लागले. त्यांनी शहरात राहून गावातील शाळेत येणे-जाणे सुरू केले... आणि ही संस्कृती पुर्णपणे लुप्त होत गेली. गुरूजींबद्दलच्या त्या भावना हळूहळू लुप्त होत गेल्या असे वाटते.  

आमचे गाव चिंचोली. बालाघाटच्या डोंगराच्या कुशीत वसलेले. रेल्वे गावाजवळून जात असताना आमच्या गावी रेल्वे स्टेशन नाही. बार्शी-लातूर हायवे गावाजवळून जातो. पण तोही आमच्या गावापासून साधारण पाचशे मीटर अंतरावरून जाणारा. आमच्या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होती. चौथीपर्यंत. गावाला शिक्षणाचा समृद्ध वारसा होता. माझे आजोबा, वडील सर्वजन गावातील शाळेत शिकून गुरूजी झालेले. एवढेच काय, या गावाचा लौकिक मास्तरांचे गाव असा झालेला. त्याचे कारण म्हणजे गावातील ज्येष्ठ नागरिकांतील सत्तर टक्के लोक प्राथमिक शिक्षक होते. आमच्या बालपणी या गावातील शाळेत शिक्षक फारच चांगले होते. आज गावाकडे जाणे कमी झाले आहे. अनेक वर्षात नेमके कोण शिक्षक आहेत, याची माहिती नाही. मात्र त्या वेळचे सर्व शिक्षक आजही डोळ्यासमोर येतात.  

तसा मी फारच नशिबवान होतो. बालवाडीची संकल्पना खेड्यात पोहोचण्यापूर्वीच्या त्या काळात बहिणींचा हात पकडून मी सहा वर्षांचा होण्यापूर्वीच शाळेत जाऊ लागलो. भावाला सांभाळण्यासाठी शाळा सोडणाऱ्या अनेक मुली असत. आमच्या गावातील शाळेत त्याकाळी असणारे मुळे गुरूजी आणि काशिद गुरूजींनी लहान भावाला किंवा बहिणीला शाळेत घेऊन येण्याची मुक्त परवानगी दिली होती. ही संस्कृती हे दोन शिक्षक असेपर्यंत कायम होती. पुढे वय वाढले आणि सहा वर्षे होताच शाळेत रितसर नाव नोंदवण्यात आले. मुळे गुरूजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर बापू दगडू जानराव हे एक किलोमीटरवर असणाऱ्या पांगरीचे गुरुजी आमच्या शाळेत आले. पहिली काशिद गुरूजींच्या हाताखाली शिकता आले. तेही सेवानिवृत्त झाले. त्यानंतर घोळवेवाडीचे मोतीराम दगडू खाडे गुरूजी शाळेत आले. त्यांनी आमचे पाढे आणि वाचन चांगले करून घेतले. तोपर्यंत शाळेचा पट चांगला वाढला. प्रत्येक वर्गात वीसपेक्षा जास्त मुले झाल्यामुळे आमच्या गावातील लक्ष्मण विनायक शिंदे गुरूजी गावात बदलून आले.

आता हे गुरूजी गावातील असल्याने गावातच राहणार होते. एरवी आम्हाला गावात काही वाटत नसायचे. बिनधास्त उनाडक्या चालायच्या. आता गावातील गुरूजी आल्यामुळे आम्हा मुलांची मोठी पंचाईत झाली होती. गुरूजी त्यांच्या शेतात जाताना येतानाही आपणास पाहू शकतात. त्यांना एखादी गोष्ट नाही आवडली तर शाळेत फटके मिळू शकतात, हा धाक सर्वच मुलांच्या मनात निर्माण झाला होता. त्यांची शेती, गावाच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूला होती. त्यांचे घर गावाच्या मध्यभागी होते. घरातून बाहेर पडले की मुख्य चौक होता. त्यामुळे सर्वच मुलांची पंचाईत झाली. पश्चिमेला पिकणारी शेती. काळ्या मातीची. त्यामुळे तो भाग खेळण्यासाठी उपयोगाचा नव्हता. यावर उपाय म्हणून आम्ही मुलांनी पूर्व बाजू निवडली. या बाजूला मुरमाड जमीन होती. तसेच या भागात जाताना त्यांच्या घरावरून जावे लागत असे. त्यातच हा रस्ता निळकंठेश्वर मंदिराकडे जाणारा. गुरूजी नेहमी मंदिरात जाणारे. त्यामुळे कोठेही असले तरी मुले खेळताना सावधपणा बाळगत.


गुरूजी गावात प्रत्यक्ष हजर होण्यापूर्वीच चर्चा सुरू झालेली. तसे ते गावात फार राहात नसत. शेजारी असणाऱ्या मुलांनाही त्यांची सविस्तर माहिती नव्हती. पण आम्ही त्यांना लक्ष्मण तात्या म्हणायचो. त्यावेळी ते आमचे गुरूजी नव्हते. त्यांच्या पत्नीला आम्ही वहिनी म्हणायचो. नात्याने ते आमचे भाऊ आहेत, असे सांगण्यात येत असे. वहिनींचे नाते मात्र अवघड होते. एकिकडे ती भावाची पत्नी होती, तर दुसरीकडे माझ्या चुलत मामांची मेहुणी होती. पूर्वी सुट्टीत गावी आल्यानंतर मोकळेपणाने बोलत असत. आम्ही त्यांना वहिनी म्हणायचो. तात्या गावात रूजू झाल्यानंतर वहिनींना पहिल्यासारखे मोकळेपणाने बोलता येईनासे झाले. लक्ष्मण तात्यांना मात्र आम्ही फक्त गुरूजी म्हणू लागलो.

ते गावातील शाळेत रूजू झाले. साधारण साडेपाच फूट उंची. गव्हाळ रंग. लांब नाक. सडसडीत शरीरयष्टी. सरळ नाक. कामाची नेहमीची सवय राखली असावी. मोठे कपाळ. उभट चेहरा. लांब बोटे. चेहऱ्याच्या प्रमाणात थोडेसे उभट कान. कायम पांढरेशुभ्र कपडे असायचे. मी एकदाही त्यांना रंगीत कपडे घातलेले पाहिले नाही. तेही पांढरा नेहरू शर्ट आणि पायजमा असा त्यांचा ड्रेस ठरलेला असायचा. पांढऱ्या  कपड्याना त्यावेळच्या रितीप्रमाणे कायम नीळ देऊन आणखी शुभ्र केलेले असे. कायम स्वच्छ सफेद कपड्यातील गुरूजी त्यामुळे सर्वात उठून दिसत असत. सण, उत्सवाच्या दिवशी कपाळावर कुंकवाचा लाल गंध असायचा. तो त्यांना शोभून दिसत असे. या त्यांच्या पेहरावामुळे गुरूजी आणखी उठून दिसत असत.

 हे नवे गुरूजी आले आणि आमचाच वर्ग त्यांच्याकडे देण्यात आला. ते सर्वांपेक्षा जास्त शिकलेले गुरूजी होते. शाळेत आल्याबरोबर त्यांनी आमच्यातले पाणी मोजायला सुरुवात केली. ‘अभ्यास करणारी, जमलं तर अभ्यास करणारी आणि अभ्यास टाळणारी’ या तीन गटातच मुलांची विभागणी होते असे ते म्हणत. ‘सर्वांना डोकं सारखेच असते, कोणी अभ्यास करण्यासाठी वापरते तर कोणी अभ्यास न करण्याचे कारण काय सांगायचे, याचा विचार करण्यासाठी वापरते,’ असे त्यांचे म्हणने होते. त्यामुळे अभ्यास केला पाहिजे. खूप शिकले पाहिजे असे अनेक मुलांना वाटू लागले. हा त्यांचा आल्याआल्या मुलांवर झालेला सकारात्मक परिणाम होता.

आम्ही या गुरूजींच्या वर्गात आलो तेव्हा चौथीत होतो. आमची परीक्षा केंद्रावर होणार होती. तेव्हा आजच्यासारखे आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण नव्हते. तसे असते तर अजून काहीजन शिकले असते, मात्र त्यांना चांगले लिहायला, वाचायला आले असते का असा प्रश्न पडतो. तर लक्ष्मण गुरूजी शाळेत रूजू झाले आणि वातावरण थोडे बदलले. गुरूजी तसे खूप मृदू होते. मराठी भाषेचा अभ्यास चांगला होता. कविता शिकवताना ते तल्लीन होऊन जात. गणिताची पद्धत एकदा, दोनदा, तीनदा समजावून सांगत. तोंडी गणिते सांगण्यात तर त्यांचा हातखंडा होता. त्यांनी आम्हाला चवथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसायला भाग पाडले. तोपर्यंत आमच्या शाळेतून या परीक्षेला कोणी बसले नसावे. मूळातच चौथीसाठी शाळेत परीक्षा न होता, केंद्रावर जावे लागत असताना हा नवीन परीक्षेचा घाट कशाला, असा काही पालकांचा प्रश्न होता. त्या प्रत्येकाला गुरूजींनी समजावून सांगितले. केंद्र परीक्षेचा अभ्यास आणि शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास. असा... अभ्यास एके अभ्यास, या नव्या गुरूजींनी सुरू केले. लवकरच त्यांच्या लक्षात आले की त्यांनी ज्या सात विद्यार्थ्यांना निवडले होते, त्यातील जवळपास सर्वच कलाकार आणि अधिकचा अभ्यास म्हणजे लादलेला असे समजून तो टाळत आहेत. अर्थात वर्गातील इतर मुले चांगली खेळत बसलेली असताना आपण अभ्यास करायचा, हे त्या बालवयात अन्यायकारक वाटणे नैसर्गिक होते. यावर त्यांनी आम्हाला अभ्यासाला बसवण्यासाठी वेगळा मार्ग निवडला.

त्यांनी त्यांच्यादृष्टीने क्षमता असणाऱ्या आम्हा मुलांच्या घरी, एक दिवस संध्याकाळी फेरी मारली. उद्यापासून तुमचा मुलगा संध्याकाळी माझ्याकडे घरी अभ्यासाला येईल, असे सांगितले. वडील शिक्षक असल्याने आमच्या घरातून नकाराचे कारण नव्हते. गुरूजींची ही तळमळ आणि प्रामाणिक प्रयत्न इतर पालकांच्याही लक्षात आले असावेत. आम्ही चार विद्यार्थी गुरूजींच्या घरी अभ्यासाला जाऊ लागलो. त्या काळी आमच्या गावात विज आलेली नव्हती. त्यासाठी रॉकेल विकत आणून आमचा हा अभ्यास ते घेत होते. आम्ही अभ्यासच करत आहोत, याकडे त्यांचे लक्ष असे. आम्ही अभ्यास करत असताना ते कोणते ना कोणते पुस्तक वाचत बसलेले असायचे. आम्हाला शिकवायच्या पुस्तकाव्यतिरिक्त अन्य पुस्तकांचे त्यांचे वाचन मोठे होते. इतर शिक्षकांपेक्षा ते अधिक संदर्भ सांगायचे. त्यांचे हे आम्हाला सांगणे या वाचनातून आल्याचे पुढे मी शिक्षक झाल्यानंतर लक्षात आले. मात्र त्यांच्या येण्याने दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतही या गुरूजींच्या तावडीतून आमची सुटका होत नसायची.

चौथीच्या परीक्षेचे केंद्र पांगरीच्या शाळेत असायचे. तेथे तालुक्यातील जवळपास तीसेक शाळातील मुले येऊन परीक्षा देत असत. गुरुजी शाळेजवळ सर्व मुलांना एकत्र करत. तेथून आमची परेड पांगरीला निघत असे. परीक्षा पूर्ण होईपर्यंत ते तेथेच एखादे पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचत बसत असत. त्यानंतर परीक्षेत कोणते प्रश्न विचारले होते. उत्तरे काय लिहिली याची चर्चा करत प्रत्येकाला घरी पोहोचवत असत.

त्याचसोबत गावातील धार्म‍िक कार्यक्रमात सहभागी व्हायची सवय त्यांच्यामुळेच लागली. गावात कोणत्या ना कोणत्या ग्रंथाचे म्हणजे रामविजय, हरिविजय, नवनाथ ग्रंथाचे पारायण सुरू असायचे. ती पद्धत अजूनही काही गावात सुरू असते. एकजण ग्रंथातील ओवी वाचत असे आणि दुसरा त्याचा अर्थ सांगायचा. दररोज असे एका अध्यायाचे पारायण होत असे. एकदा गावातील वाचन करणारा बाहेरगावी गेला होता. तो त्या दिवशी आला नाही. गुरूजींनी मला वाचायला सांगितले. मी गुरू आज्ञा प्रमाण मानून पहिल्यांदा नवनाथाच्या पोथीतील सातवा अध्याय वाचला. तो लोकांना आवडला. त्यातून मी पट्टीचा पोथी वाचणारा बनलो. त्या वयातही मला गावोगावी निमंत्रणे येऊ लागली. त्यांनी पहाटे लवकर उठायची सवय लावली. श्रावण महिन्यात तर ते आम्हाला पहाटे साडेपाचला उठवायचे. चरवी घेऊन त्यांच्याबरोबर नदीवर जावे लागायचे. नदीच्या डोहात डुंबायचे. तीच आमची आंघोळ असायची. गुरूजी आमच्यापुढे असायचे. आंघोळीनंतर नदीच्या वरच्या अंगाला जाऊन चरवी पाण्याने भरून घ्यायची. मंदिरात जायचे. मंदिराचा परिसर स्वच्छ असायचा. चरवीतील पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालायचा. असा महादेवाला अभिषेक घालण्याचा कार्यक्रम संपूर्ण महिना चालत असे. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आम्हाला ते चालत रामलिंगच्या मंदिरात घेऊन जात असत. जाताना अनेक वनस्पतींची ओळख करून देण्याचे गुरूजींचे काम सुरू असायचे. चिंचोलीपासून दुर्गादेवीपर्यंत रेल्वेच्या ट्रॅकने सर्वात कमी अंतर भरायचे. गप्पा मारत तीन किलोमीटरचे अंतर कसे काटले जायचे, ते कळायचेही नाही. मुले-मुली कोणाचीच यातून सुटका नसायची. या सर्व सहली खूपच आनंददायी होत्या.

विद्यार्थ्यांचा पट शासन नियमानुसार प्रत्येक वर्गात वीसपेक्षा जास्ती होता. या नव्या गुरूजींनी गावातील लोकांच्या डोक्यात शाळा सातवीपर्यंत करण्याचा प्रस्ताव ठेवला. सरपंच आणि पाटील दोघांनाही कल्पना आवडली. तोपर्यत आमची चौथीची परीक्षा संपून निकाल लागला होता. आमचे दाखले काढण्यात आले होते. पांगरीच्या सर्वोदय विद्या मंदिर प्रशाला या शाळेत आम्ही प्रवेश घेतला होता आणि अशा वेळी गावात पाचवीचा वर्ग सुरू करण्यास मान्यता मिळाली. गावातील पाचवी इयत्तेच्या पहिल्या वर्षात आम्ही प्रवेश घेतला. पुढे सहावीचा वर्ग सुरू झाला. पाचवी असो वा सहावी आमचे वर्गशिक्षक लक्ष्मण गुरूजीचे राहिले. सहावीत असतानाची एक आठवण मात्र मनात कायमची कोरली गेली आहे.

शिंदे गुरूजींचा मार न खाणाऱ्यामध्ये मी आणि माझा मित्र दिलीप गोरख शिंदे आम्ही दोघे होतो. त्या वेळी  आम्ही सहावीत होतो. त्या दिवशी दुपारच्या सत्रातील शाळा सुरू होती. वर्गातील एका वांड मुलांने गुरूजींशी वाद घालायला सुरुवात केली. तोही एका शिक्षकाचा मुलगा होता. त्याचे वडील दुसऱ्या गावात नोकरीस होते. त्या दिवशी दिलीप मात्र गैरहजर होता. त्या मुलाचे म्हणणे असे होते की, ‘गुरूजी ‘पार्सलिटी’ करतात. राजा (अस्मादिकांचे टोपण नाव) आणि दिलीपला त्यांचे चुकले तरी गुरूजी मारत नाहीत.’ यावरून तो जरा मर्यादा सोडून जोरात बोलला. तसे तर ते चूकल्यानंतर कोणालाच सोडत नसत. सर्वानाच छडीचा प्रसाद देत. त्या वेळी वर्गात गद्य वाचन सुरू होते. झाले, शिंदे गुरूजीनी माझ्याकडून गद्यवाचन करताना एका ठिकाणी थोडी चूक झाली. ती नेमकी टिपली. ‘न’ आणि ‘ण’च्या उच्चारातील ती चूक. आज मोबाईल युगात या चुका सर्रास होतात. गुरूजींनी छडीचा जोरात वापर केला. हातावर तीन चार छड्या बसल्या. मला खूप वाईट वाटले. मनातून खूप खट्टू झालो. शाळा संपेपर्यंत गप्प राहिलो. गुरूजींचा खूप राग आला होता. घरी आलो. कोणाशीच बोलावे वाटत नव्हते. मी असा का वागतो, हे आईलाही कळत नव्हते. साडेसात वाजले आणि आवाज आला, ‘गुरूजी आहेत का घरात?’ दारात लक्ष्मण शिंदे गुरूजी होते. आल्याआल्याच ते गदगदल्या आवाजात म्हणाले, ‘राजा कुठाय. मी आज त्याला मारायला नको होतं. बाळूच्या (वांड मुलगा) बोलण्यानं माझा तोल गेला आणि मी राजाला मारलं.’ वडिलांनी बोलावल्यावर मी बाहेर आलो. गुरूजींनी जवळ बोलावले. मी त्यांच्या जवळ गेलो. गुरूजींनी माझा हात हातात घेतला आणि त्याचा पापा घेतला. ‘माफ कर’, गुरूजी गदगदल्या आवाजात म्हणाले’. त्यांच्या त्या मायेच्या उबेतून हात सोडवून घेताना त्यांच्या डोळ्यातील दोन थेंब हातावर पडले. त्या थेंबांनी माझ्या मनातील राग धूवून काढला आणि त्या दिवशी लक्ष्मण गुरूजींवरचे माझे प्रेम आणखी वाढले. त्याचंसोबत विद्यार्थ्यांच्याबद्दल शिक्षकाच्या मनात ममत्वाची भावना ठेवण्याचा संस्कार देऊन गेले.

सुरुवातीपासून आमच्या शाळेत आणखी एक उत्सव असायचा. हा प्रसंग खरेच मनोरंजनाचा  असायचा. लक्ष्मण गुरूजी आल्यानंतर याची वारंवारिता वाढली. जी मुले नेहमी शाळा बुडवत, त्यांना गुरूजी उचलून आणायला सांगत. त्यासाठी पाच मुलांना  पाठवण्यात येत असे. त्यातील चार दांडगट मुले असत आणि एक त्यांच्यादृष्टीने हुशार आणि त्यांच्या पूर्ण विश्वासातील असायचा. कोणाला उचलून आणायचे त्या मुलांची ते नावे सांगायचे. हे सर्व अचानक असे. शाळेत येईपर्यंत कोणाला उचलायचे, हे माहीत नसायचे. मग ही मुले जाऊन शाळेत न आलेल्या मुलाला शोधायचे. त्याला शाळेत यायचे नसायचे. मात्र गुरूजींची आज्ञा प्रमाण असे. प्रथम त्याची विचारपूस घरी होत असे. आई त्या मुलाला शाळेत जा, असे सांगून कंटाळलेली असायची. अनेकवेळा हा पठ्ठ्या लपलेला असायचा. अशा घरातील आईच तो कोठे लपला, हे सांगायची. कधीकधी मुले परसबागेत जाऊन लपत आणि आम्ही पकडायला गेलो की मोकळ्या रानातून पळत सुटत. इतर मुले त्याच्यापेक्षा चपळ असत. ती त्याला पकडत. मग चार दांडगट मुले हाताला आणि पायाला पकडून त्याचा झुला करायची. दोघे हात पकडत आणि दोघे पाय पकडत. त्याला उचलून शाळेत आणत.

त्याला पकडल्याबरोबर त्याचा दंगा सुरू व्हायचा. जोरजोरात आईला तो पहिल्यांदा ओरडायचा. रस्त्यावर आले की त्याची बडबड मुलांना उद्देशून सुरू व्हायची. शाळेत येताच हा पठ्ठ्या जोरात रडायला सुरुवात करायचा. शिंदे गुरूजी छडी घेऊन त्याला बदडायचे. शाळेत नियमित येणाऱ्याकडून उत्तर चुकले तरी जास्तीत जास्त समजावून सांगायचे. अपवादानेच छडी वापरायचे. मात्र शाळा बुडवली की त्यांचा पारा चढायचा. त्यांच्या शिकवण्याने आमचे शिकणे सुंदर झाले. त्यांनी चवथीपर्यंतची शाळा सातवीपर्यंत वाढवली. आम्ही त्या सुविधेचे पहिले लाभार्थी. वर्ग वाढल्याने गावातील विठ्ठल पाटील नावाचे गुरूजी या शाळेत बदलून आले. त्यांनी सातवीचा वर्ग मागून घेतला आणि शिंदे गुरूजींचा आणि आमचा शाळेतील संबंध संपला. आमच्याच शाळेत असूनही आम्हाला त्यांचे मार्गदर्शन मिळत नसे. मात्र त्यांच्यामुळेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी म्हणून सातवी उत्तीर्ण झालो. अगदी सातवीची परीक्षा पूर्ण होईपर्यंत त्यांनी आमच्या अभ्यासाची विचारपूसही केली नाही. कधी-कधी याचे वाईट वाटत असे. मात्र आपल्याकडे अधिकृतपणे वर्ग नसताना, दुसऱ्या शिक्षकाच्या वर्गातील विद्यार्थ्यांची चौकशी करून गैरसमजाचे वातावरण निर्माण होऊ नये, यातून ते ही दक्षता घेत होते. ते त्यांच्या नैसर्गिक स्वभावधर्मास अनुसरून होते, हे पुढे खूप वर्षांनी लक्षात आले.


पुढे लक्ष्मण गुरूजींची बदली अन्य गावात झाली. गावातील राजकारणातून ही बदली झाल्याची चर्चा कानावर आली. मात्र हे गुरूजी गावातील राजकारणात कधीच लक्ष झालत नसत. आपण भले, आपले काम भले आणि शिकपणे भले... असा गुरूजींचा स्वभाव होता. ते गावातील अन्य लोकांमध्ये कधी दिसायचे नाहीत. कामाशिवाय कोणाकडे जात नसत. त्यांना सुट्टीच्या दिवशी कायम कामात पाहायचो. आपण शिकलो म्हणून कामाची लाज वाटायचे कारण नाही, हा संस्कार गुरूजींच्या कृतीतून आमच्या मनावर कोरले जात होते. त्यामुळेच अगदी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्यानंतर शेतातील कामे करण्याची लाज कधी वाटली नाही. अगदी घरातील चुलीसाठी लाकडे आणण्यापासून ती फोडण्यापर्यंत सर्व काम गुरूजी करायचे. ज्वारीचे पीक काढणीला आले की धाटे उपटण्यापासून खळे होईपर्यंत शेतातील फेरी कधीच चुकत नसे. याचे नकळत संस्कार बालमनावर होत असत.

शाळा आमच्यासोबत वाढली, म्हणजे इयत्ता वाढत गेल्या. काही वर्ष सातवीपर्यंत शाळा छान सुरू राहिली. पुढे इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या. स्कूल बस खेड्यापाड्यात मुले गोळा करत फिरू लागल्या. गरीब पालकांपर्यंत शिक्षणाचे महत्त्व पोहोचल्याने पोटाला चिमटा देऊन ते इंग्रजी माध्यमाच्या शाळात मुलांना पाठवू लागले. शाळेचा पट कमी होत गेला. सातवी, सहावी बंद होत पुन्हा चवथीपर्यंतची शाळा राहिली. मध्ये समजले की गावातील शाळा पूर्णपणे बंद पडली आहे. खूप वाईट वाटले. सरपंच आणि बाकीच्या नेत्याकडे शाळा चांगली चालावी, याबद्दल अनेकदा चर्चा केली. शाळेला पूर्वीचे वैभव राहिले नाही.

इतर शिक्षकांची नंतर अपवादानेच भेट झाली. त्यातील बहुतेक शिक्षकांचा इहलोकीची प्रवास संपला आहे. मात्र शाळेजवळून जाताना या सर्व गुरूजनांच्या आठवणी येतात. त्यांचे रूप समोर उभे राहते, विलास नाव असतानाही राजा म्हणून हाक मारत असल्याचे जाणवते. तसेच हातात छडी घेतलेले, संस्काराचे धडे देणारे गुरूजन डोळ्यासमोर येतात आणि डोके त्यांचे पाय शोधत राहते.

त्यातील आम्हाला शिकवणाऱ्या चांगल्या शिक्षकांतील लक्ष्मण शिंदे गुरूजी गावात प्रवेश करतानाच भेटतात. त्यांनी निवृत्तीनंतर शेतात घर बांधले. गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पण गावाच्या हद्दीपासून २०० मीटरवर छोटेखानी पक्के घर बांधले आहे. ते तिथे मोठे घरही बांधू शकले असते. मात्र ‘निसर्ग ओरबडू नये, हवे तेवढेचं घ्यावे’, असा विचार सांगणाऱ्या गुरूजींनी आटोपशीर घर बांधले. गावाबाहेर जाणाऱ्या एकमेव रस्त्यावर घर असल्याने जाता-येता घराचे दर्शन होते. अनेकदा तेथे थांबावेसे वाटते. मात्र गुरूजी काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. वर्गातील अभ्यासक्रम नेटकेपणाने शिकवणारे, अतिरिक्त माहिती देणारे, पुस्तक वाचनाचे महत्त्व पटवून देणारे, स्वत:ला कायम कार्यरत ठेवणारे, निसर्गाला हानी पोहोचू नये म्हणून काळजी करणारे, चांगल्या सवयी मुलांत रूजवण्यासाठी धडपडणारे, असे तात्या उर्फ लक्ष्मण गुरूजी... आजही कार्यरत असतात.

नांदेडचे माधव जाधव सर ‘कुळवाडी’ हा दिवाळी अंक प्रसिद्ध करतात. गतसाली त्यांनी शालेय जीवनासंदर्भात लेख लिहावयास सांगितले. तो लेख लिहिताना लक्ष्मण गुरूजींच्या आठवणी दाटून आल्या. काही दिवसांनी गावी जाणे झाले. योगायोगाने गुरूजी दिसले. आवर्जून थांबावेसे वाटले. त्यांनी जे शिकण्यासाठी आवश्यक सर्व काही शिकवले होतेच, पण त्याही पलिकडे विद्यार्थ्यांशी ममत्वाने वागण्याची शिकवण दिली होती. तो त्यांनी अभ्यासक्रमाबाहेरचा एक धडा शिकवला होता. आपली कृती चुकली असेल तर क्षमा मागण्यात कोणताही कमीपणा नसतो, हेही शिकवले. कोणाबद्दलही वाईट न बोलणारे लक्ष्मण गुरूजी, कायम आठवतात. मला लाभलेले सर्वच शिक्षक चांगले होते. त्यांनी आम्हाला चांगले विद्यार्थी बनवण्यासाठी मनापासून कष्ट घेतले. मात्र त्यापुढे जाऊन चांगला माणूस बनण्यासाठी, चांगला शिक्षक होण्यासाठी आवश्यक कौशल्ये देणारे लक्ष्मण गुरूजी वेगळेच!

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

'सर, खूप लवकर एक्झिट घेतलीत!'


(शिक्षक दिन विशेष-१ प्राचार्य एन.एस, धायगुडे सर)
आज शिक्षक दिन. शिक्षक, गुरू यांनी घडवले तर आपण घडतो. मलाही जीवनाच्या वेगवेगळ्या टप्पयावर  अनेक गुरू भेटले. यानिमित्ताने दरवर्षी एका गुरूच्या आठवणीला ऊजाळा देण्याचा आणि त्या तुमच्यापुढे सादर करण्याचा संकल्प आहे. यावर्षी ज्यांनी एका खेड्यातील मुलाला अनेक अंगानी घडवले असे गुरूवर्य प्राचार्य नागेश स्वानंद धायगुडे सरांविषयी मी लिहिले आहे. दयानंद महाविद्यालयांतील या सरांनी आम्हाला खूप काही दिले. ते अकाली गेले. मात्र त्यांच्याबद्दलची आठवण नाही असा दिवस जात नाही. अशा या सरांविषयी......                            
--------------------------------------------------------------------------------------------
सोलापूरचे दयानंद महाविद्यालय! ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात याच महाविद्यालयात प्रवेशित होतात. पासष्ट एकरांचा विस्तीर्ण परिसर. चार महाविद्यालये एकाच परिसरात, मात्र स्वत:चे वेगळेपण सांभाळणारी. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र इमारत. प्रशस्त देखणी मुलांचे व मुलींचे वसतिगृहे. भव्य ग्रंथालय. 'शिक्षणाचा खरा अर्थ हा विद्यार्थ्याला परिपूर्ण माणूस म्हणून घडवणे हा आहे,' हे प्रमाण मानून विद्यार्थ्यांवर कायम चांगले संस्कार होतील, याची जाणीव ठेवून कार्य करणारे शिक्षक या महाविद्यालयात होते आणि अजूनही आहेत. विस्तीर्ण परिसराप्रमाणे, मोठ्या मनाचे शिक्षक. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे.ले विद्यार्थी चुकीचे तर वागत नाहीत ना, वाई मार्गाला जात नाहीत ना, हे आपल्या तीक्ष्ण नजरेने तपासणारे. महाविद्यालयीन अभ्यासक्रमाबरोबर संस्कारांचे धडे देणारे. आम्ही विद्यार्थी होतो तेव्हा, या शिक्षकांती डॉ. नागेश स्वानंद धायगुडे सर हे विद्यार्थ्यांच्या मनात सर्वोच्च स्थानी. विद्यार्थी चुकीचे वागले तर त्याची अशा शब्दात जाणीव करून द्यायचे की, विद्यार्थ्यांचे वागणे बदलणारच, याची १०० टक्के खात्री. गुंड प्रवृत्तीचेही काही विद्यार्थी असायचे, पण सरांचा आदरयुक्त दरारा असा की, ते विद्यार्थीही सरांसमोर निःशब्द व शांत होऊन जात.
            आजूबाजूच्या ग्रामीण भागातीलच नव्हे तर माढा, बार्शी, अक्कलकोट भागातील, खेड्यांतील मुले या महाविद्यालयात प्रवेश घ्यायची. महाविद्यालयात शहरी विरूद्ध ग्रामीण असे गट असायचे. या गटांच्या हालचाली विशेषतः निवडणुकाच्या वेळी फार जोरात असायच्या. त्यावेळी थेट विद्यार्थ्यांच्या मताद्वारे विद्यार्थी प्रतिनिधीच्या निवडी व्हायच्या. एकदा अशाच निवडणुकीच्या काळातील वादात शहरातील मुलांचा गट एका गुंडाला घेऊन आला. त्याच्याजवळ चाकू होता. शिक्षणशास्त्र इमारतीच्या पुढे असणाऱ्या बुचाच्या झाडाखाली दोन्ही गटांतील मुले उभी होती. त्यावेळी
त्या मुलाने चाकू बाहेर काढून धमकावायला सुरूवात केली. तेवढ‌्यात गेटमधून सरांच्या स्कूटरचा आवाज आला. सरांना पाताच भांडणाचे वातावरण एकदम बदलले. चाकू खिशात गेला. एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून गप्पांचा आव आणला गेला. पण सरांच्या हे सारं लक्षात आलं असावं. सरांनी त्या मुलाजवळ आपली निळी स्कूटर उभी केली. 'काय चाललं आहे?' सरांनी विचारलं. मुलांमधून 'काही नाही, चहाला जातोय' असं उत्तर आलं. तरी सरांनी सांगितलं, 'हे बघा, निवडणुका आहेत, जय-पराजय होतच असतो. तुम्ही शिकायला आलात. पण निवडणुकांच्या नावाखाली काहीही चुकीचे होणार नाही, याची काळजी घ्या.' असं सांगतानाच त्यांच लक्ष त्या बाहेरच्या मुलाक़डं गेलं. त्यांनी विचारलं, 'हा कोण? हा तर आपला विद्यार्थी नाही.' त्यावर 'नाही सर, तो आमचा मित्र आहे,' असं मुलांमधून उत्तर आलं. पुन्हा सरांनी सांगितल, 'निवडणुका सुरळीत झाल्या पाहिजेत आणि सर्वांशी मैत्री असणं खूप चांगलं, पण अशा प्रसंगी ती काॅलेजमध्ये आणू नका,' एवढं सांगून सर निघून गेले. पण त्यांच्या सांगण्याचा परिणाम असा झाला की, पुन्हा चाकू बाहेर आला नाही. दमदाटीची भाषा संपली. शांतपणे, योग्य शब्द आणि शब्दफेकीच्या जोरावर सर आपल्याला जे साध्य करायच ते करत. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि बाहेरील विद्यार्थी ते अचूक ओळखत. 
      वर्गात त्यांचे शिकविणे, विषय समजावून सांगणे हे तर भन्नाट होते. इलेक्ट्राॅनिक्स किंवा अन्य विषय घेण्यासाठी प्रवेशित झालेले अनेक विद्यार्थी सरांच्या व्यक्तिमत्वाने व शिकविण्याने प्रभावित होऊन भौतिकशास्त्र विषय निवडायचे. मीही असाच बार्शीवरून बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स शिकण्यासाठी दयानंदमध्ये प्रवेश घेतलेला. मी खेड्यातलाच. बार्शीत इलेक्ट्रॉनिक्स मिळाले नाही म्हणून सोलापूरला गेलो होतो. पण सरांच्या प्रभावाखाली कधी गेलो ते कळाले नाही आणि सरांचा भौतिकशास्त्र विषय घेऊनच १९८९ मध्ये बी.एस्सी. झालो. सरांनी वर्गात शिकवत राहावे आणि आपण ऐकतच राहावे, असे वाटायचे. त्यांच्याकडून इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम, क्लासिकल
मेकॅनिक्स, मॅक्सवेल इक्वेशन्स शिकताना असे वाटायचे की, जणू हे शास्त्रज्ञ सरांना येऊन आपण हा शोध कसा लावला, इक्वेशन कसे सुचले, ते सांगत असावेत. त्यांच्या सुंदर अक्षरात बोर्डवर लिहीलेली सूत्रे किंवा इक्वेशन्स पाहात राहावी, असे वाटायचे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सर वर्गात शिकविताना मराठीचा वापर करत नसत. ते इंग्रजीतूनच शिकवत. मात्र वर्गाबाहेर अस्खलित मराठीत संवाद चालायचा. सर आणि धायगुडे मॅडम दोघेही शिकवायला असत. मॅडमकडे नेहमीच 'क्वाॅंटम मेकॅनिक्स'सारखा अवघड पेपर असतो आणि तरीही तो आपल्याला समजतो, आपण त्याची उत्तरे छान लिहू शकतो, याचही कौतुक वाटायच. वर्गाती शिकवण्याच्या बाबतीत मॅडम आणि सरांची तुलना अनेकदा व्हायची आणि शेवटी दोघंही 'ग्रेट' आहेत, यावरच शिक्कामोर्तब व्हायच. 
     एक प्रसंग सांगतो. मी बी.एस्सी.च्या तिसऱ्या वर्षात असताना १९८९च्या फेब्रुवारीत बिहारमधील 'राजेंद्र ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी, पुसा' येथे आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबीरासाठी माझी विद्यापीठामार्फत निवड झाली. मी जायला तयार नव्हतो. सरांनी मला समजावून सांगितलं. अशी संधी पुनःपुन्हा येत नाही आणि ती टाळू नकोस, म्हणून बजावले. नेमका १९८८ मध्ये चौथा वेतन आयोग लागू करावा, यासाठी शिक्षकांचा संप झाला होता. संपकाळात बुडालेले अध्यापन त्या काळात झाले. संपामुळे परीक्षा काही काळ पुढे गेल्या होत्या. मी बिहारवरून आलो आणि विद्यापीठाच्या युवक महोत्सवासाठी कोल्हापूरला थांबून ८ मार्चला परत सोलापूरला आलो. जवळपास एक महिना यात गेला. तोपर्यंत अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला. सरांकडे क्लासिकल मेकॅनिक्स आणि इलेक्ट्रीसिटी मॅग्नेटिझमचा पेपर होता, तर मॅडमकडे मॅथेमॅटिकल फिजिक्स आणि क्वाँटम मेकॅनिक्सचा पेपर होता.
सर आणि मॅडम दोघांनीही त्यांच्या विषयाच्या संदर्भ पुस्तकांची माहिती दिली. कठीण भागाच्या नोट्स दिल्या. सरांचा पेपर तसा तयार करणे शक्य होते. पण क्वाँटम मॅकेनिक्स पूर्णपणे डोक्यावरून जात होते. काय करायचे? हा प्रश्न होता. सराना अडचण सांगितली. मॅडम आणि सरांनी दोघांनी बोलावून सांगितले, 'सांयकाळी पाचनंतर थेट घरी ये. मॅडम तुला तो संपूर्ण भाग शिकवतील.' मी त्यानुसार घरी जायला सुरूवात केली. आमची 'विना फी'ची शिकवणी सुरू झाली. दिप्ती आणि प्रज्योत दोघेही त्यावेळी लहान होते. त्यांना खरे तर आई-बाबांची गरज होती. त्या वेळेत मॅडम मला शिकवत असत आणि सर या दोन्ही पिल्लांना सांभाळत. या कालावधीत ज्ञानग्रहणानंतर अनेकदा अन्नग्रहण करूनच मी तेथून निघत असे. कोण कुठला मी? एक हजाराच्या आतल्या लोकसंख्येच्या खेडयातील शिक्षकाचा मुलगा. त्यांचा माझा संबध आला, तो एक विद्यार्थी म्हणून. मात्र विद्यार्थ्याला आपल्याकडे असलेले सारे काही द्यावयाचे या उद्देशाने सर आणि मॅडम जगत होते आणि त्याचा मी पूर्ण अनुभव घेतला. त्यांनी निरपेक्ष भावनेने विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी केलेले प्रयत्न मला त्यांच्याकडे खेचत. त्यामुळे माझे लौकिकार्थाने त्यांच्याकडून शिकण्याचे दिवस संपले तरी जीवनाचे धडे मी त्यांच्याकडून शेवटपर्यंत घेत राहिलो. त्यांच्या मार्गदर्शनाचा अनेक कठिण प्रसंगात लाभ होत राहिला. मला माझे विद्यार्थीपण असेच आजीवन जपायचे होते आणि आज सर भौतिकदृष्ट्या जवळ नसले तरी जपण्याचा प्रयत्न करत आहे. 
      पुसा इथल्या शिबिराला जायला माझा मुख्यत्वे नकार होता, तो माझी एम.एस्सी. प्रवेशाची संधी सुटेल म्हणून. मात्र सरांनी त्यावेळचे शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.
आर.एस. माने यांच्याशी संपर्क साधला. त्या काळात कुलगुरूंच्या आधिकारात प्रत्येक विभागात एका विद्यार्थ्याला प्रवेश दिला जात असे. त्या जागेवर भौतिकशास्त्र विषयासाठी मला संधी द्यावी, अशी विनंती केली. मला ते सांगितले. त्यानंतर मी तयार झालो होतो. शिबिरावरून आल्यानंतर आता आपण सहज उत्तीर्ण होऊ शकतो आणि आपण एम.एस्सी.ला प्रवेश मिळवणार, या आविर्भावात होतो. त्यामुळे महाविद्यालयात इकडून तिकडे मित्रांसोबत फिरत असे. मी हवा तसा अभ्यास करत नाही, हे सरांनी ओळखले. मला शिपायामार्फत बोलावणे धाडले. मी गेलो. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, 'हे बघ, तू उत्तीर्ण होशील. एम,एस्सी.ला प्रवेशही मिळेल - मात्र ताे कुलगुरूंच्या आधिकारात. आणि जर अभ्यास चांगला केलास तर मात्र गुणवत्तेवर प्रवेश मिळेल. तू आता अभ्यास करायला हवा. हे हुंदडणे थांबवा.' तोपर्यंत सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर एवढा परिणाम झाला होता की मी त्यांचा शब्द प्रमाण मानला. त्या दिवसापासून मी पहाटे तीन-तीन वाजेपर्यंत अभ्यास केला आणि महाविद्यालयात प्रथम आलो. विद्यार्थ्याला त्याच्या चुकीची नेमकी जाणीव करून देणारे सर भेटले नसते, तर एम.एस्सी.ला प्रवेश मिळाला असता पण गुणवत्तेवर नाही, तर सवलतीचा फायदा घेऊन. विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण करण्याचा त्यांच्याकडे अलौकिक गुण होता. ज्याचा मी एक लाभार्थी आहे.
      वर्गात शिकविणाऱ्या सरांचा प्रभाव पडायचाच, पण अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्याला जे शिकवायचे आणि घडवायचे, तेही अफलातून होते. त्यांच्या प्रयत्नातून समाजात अनेक यशस्वी व्यक्ती-नागरिक त्यांनी निर्माण केले. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमबाह्य उपक्रमांत सहभागी व्हायला प्रोत्साहित करायचे. विद्यार्थ्यांच्या अंगचे नेमके कलागुण हेरून ते प्रोत्साहित करत, मार्गदर्शन करत. फिजिक्स क्लबद्वारा अनेक नामवंतांची व्याख्याने आयोजित व्हायची. त्यामध्ये सर्वांना उपस्थिती सक्तीची असे. हा उपक्रम विद्यार्थ्यांनीच चालवला पाहिजे, याकडे त्यांचे लक्ष असायचे. पाहुण्यांची ओळख, आभार मानणे, सूत्रसंचलन मुलांनी करावे, यासाठी ते आग्रही असत.
त्यातून नकळत सभाधीटपणा यायचा. या क्लबचे खातेसुध्दा विद्यार्थी आणि शिक्षक यांचे संयुक्त असायचे आणि जमा होणारे सर्व पैसे त्याच वर्षी खर्ची पडावेत, त्याचा त्याच वर्षीच्या विद्यार्थ्याना फायदा व्हावा, हा त्यांचा कटाक्ष असायचा. स्पर्धांना पाठवण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे निबंध सर तपासून द्यावयाचे. नकला, गाणी सादर करणारांना सुधारणा सांगायचे. त्यांचे इंग्रजीतील शिकवणे जेवढे सुंदर, तितकेच मराठीचे ज्ञानही उत्तम होते. काना, मात्रा, वेलांटीच्या चुकाही दुरूस्त करायला लावत. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. त्यासाठी तो विद्यार्थी आपल्या विषयाचा किंवा विभागाचा असावा, असे कोणतेही बंधन नव्हते. एखाद्या विषयाच्या बाबतीत हे अमूक एका सरांनी तपासून दिलं तर अधिक चांगलं होईल, असे सांगण्याची आणि दुसऱ्याची त्या विषयातील प्रज्ञा मान्य करण्याचा मोठेपणा आणि नम्रता त्यांच्याकडे होती. इतरांच मोठेपण ते सहजपणे सांगत आणि त्यांच्या अशा कृतीतून निगर्वीपणाचा संस्कार विद्यार्थ्यांवर होई. सरांचा विद्यार्थ्यावर इतका प्रभाव असे की, अनेक विद्यार्थी सरांप्रमाणे पूर्ण बाह्यांच्या शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत दुमडत. माझ्यातही ती सवय नकळत उतरली. 
    सरांची भाषा शुध्द आणि संयमी होती. त्यांनी चुकूनही कधी अपशब्द उच्चारलेला आठवत
नाही. त्यांना गाण्यांची आवड होती. ते चित्रे खूप सुंदर काढत. एकदा ते कोल्हापूरला माझ्याकडे आले असताना सकाळी कन्या चित्र काढत बसली होती. तिने हॉलभर पसारा मांडलेला. मी तिच्या त्या चित्र काढण्याच्या पद्धतीवरून तिला ओरडलो. सरांनी मला शांतपणे बाहेर जायला सांगितले आणि ५५ वर्षांनी लहान असलेल्या चिमुरडीबरोबर सर खाली जमिनीवर बसले. मी माझ्या कामासाठी निघून गेलो. संध्याकाळी घरी आलो, तेव्हा एक चित्र पुस्तकाच्या कपाटावर लावलेले होते. समुद्र किनाऱ्यावरील घर, त्याला कुंपण, नारळाचे झाड, कडेने जाणारी वाट असे ते संध्याकाळचे सुंदर चित्र होते. माझ्या कन्येने इतके सुंदर चित्र काढले, यावर माझा विश्वास बसत नव्हता. सरांनी आणि आमच्या सौभाग्यवतींनीही सांगितले की, ते चित्र तिनेच काढलेय. बी.एस्सी., एम.एस्सी.च्या वर्गांना शिकवणाऱ्या सरांनी सात आठ वर्षांच्या मुलीला किती सहजपणानं सुंदर चित्र काढायला शिकवलं. हे फक्त एक सच्चा शिक्षकच करू शकतो. 
    सरांचे पशुपक्ष्यांवरही तितकेच प्रेम होते. दारात येणाऱ्या कुत्र्याला किंवा मांजरांना ते अत्यंत प्रेमाने वागवत. सरांच्या घरात आपले घर थाटणाऱ्या होला पक्षाला त्यांनी कधी हाकलले नाही. तो त्यांच्या घराचा भाग बनून राहिलेला मी अनेकदा पाहिलाय. 
    वैष्णवी तीन वर्षांची असताना आम्ही सोलापूरला राहायला आलो. त्यावेळी दिप्ती आणि प्रज्योत दोघेही सोलापुरात नसायचे. या दिवसात आमच्यात आणखी जवळीक आली. मॅडम सोलापूरमध्ये
नसताना अनेकदा ते वैष्णवीला घेऊन बाहेर जात. एकदा आपण सर्वांनी गड्डयाच्या जत्रेत जायचे, म्हणून सांगितले. मी म्हटले, सर, खूप धूळ असते नको. पण सरांनी आपल्या गावची जत्रा आहे, गेलेच पाहिजे, म्हणून सांगितले. जत्रेत अगदी पन्नालाल गाढवापासून सगळे एंजॉय केले. निघताना एका फोटोच्या दुकानात सरांनी फोटो काढायला लावला आणि सांगितले- दरवर्षी जत्रेत असा फोटो काढून घेतला पाहिजे. ती एक मस्त आठवण असते. मला शिक्षक, प्राचार्य याच्यापलिकडचे सर खऱ्या अर्थाने समजायला लागले. धूळ, गर्दीचा अगर आपण प्राचार्य आहोत याचा विचार न करता प्रथम आपण माणूस आहोत, हे माणूसपण जपलं पाहिजे, हेच त्यांच्या या कृतीतून मला दिसून आलं. 
      वर्गात शिकवताना सरांनी फळ्यावर काढलेल्या आकृत्या खूपच सुंदर आणि प्रमाणबद्ध असत. त्यांचे अक्षरही सुंदर होते. वर्गात आल्यावर बोर्ड स्वच्छ पुसायचा. त्याचे खडूने दोन भाग करायचे आणि मग शिकवायला सुरूवात करायची. तास संपताना पुन्हा बोर्ड स्वच्छ पुसूनच ते बाहेर पडायचे. त्यांच्या या सवयी पुढे अनेक विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्या. वर्गात लक्ष न देता हुडपणा करणारी मुलंही असायची, वेळप्रसंगी त्यांना वर्ग सोडण्याची सौम्य शिक्षा ते द्यायचे. पण यातल्याच कोणी पुढे कोणतेही चांगले काम केले, तर त्याचे मोकळेपणाने कौतुकही करायचे. परिणामी, मुलांना सरांच्या नजरेतला आपला वाढलेला भाव कमी होऊ नये, असे वाटायचे. आपोआपच व्रात्यपणा कमी व्हायचा.
      पुढे सर प्राचार्य झाले. खरे तर सर प्रशासन कुशलही होते. ते मी अनेक कार्यक्रमातून अनुभवलेही. प्रशासनात यशस्वी होण्यासाठी काही वेळा डावपेच खेळावे लागतात. या गोष्टीला त्यांचा विरोध होता. असे कोणतेही डावपेच न खेळता ते स्पष्टपणे आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखवत. अनेकदा अनेकांना त्या रूचत नसत. त्याचा त्यांना त्रासही व्हायचा. लोक दुखावले जायचे. मात्र अपवाद वगळता, सरांनी अप्रिय निर्णय घेतला, तरी लोकांचे त्यांच्यावरील प्रेम कमी होत नसे. भौतिकशास्त्रातील इल्युजन त्यांना पूर्ण माहित होते, मात्र माणसे दुखावू नयेत म्हणून त्यांनी आभासी मुखवटा कधीही धारण केला नाही. प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळत असताना संस्थेची तत्त्वे चुकूनही मोडणार नाहीत, यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. 
    सरांना प्राचार्य पदापेक्षा शिक्षक म्हणून कार्य करण्यात जास्त रस होता. विज्ञानप्रसारासाठी ते स्वत:च्या खिशातून खर्च करत. अनेक शाळा महाविद्यालयांत ते व्याख्यानाला जात. मानधन तर सोडाच, पण अनेकदा प्रवास खर्चही घेत नसत. व्याख्यानांद्वारे आपल्या सुमधूर वाणीने ते विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगत. विज्ञान क्षेत्रातील करिअरच्या संधी सांगत. भाभा अणुशक्ती केंद्र, इस्रो अशा नामांकित विज्ञान संशोधन संस्थांमधील संशोधक त्यांचे मित्र होते. त्यांची व्याख्याने ते मुलांसाठी आयोजित करत. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. व्ही.एन. बापट, डॉ. जयंत नारळीकर इत्यादी विज्ञान क्षेत्रातील दिग्गज मंडळींना ऐकण्याची संधी त्यांनी सोलापूरकरांना उपलब्ध केली. 
      एक शिक्षक म्हणून, ल्युमिनिसन्स संशोधन प्रयोगशाळा दयानंद महाविद्यालयात उभारून अनेकाना मार्गदर्शन करणारे संशोधक म्हणून, एक विज्ञान प्रसारक म्हणून सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार सहजी मिळायला हवा होता; पण, त्यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी कधी अर्ज केला नाही. आदर्श पुरस्कार घेऊन आदर्श ठरतो, असे नाही. पुरस्कार मिळाला तर, चार दिवस कौतुकाचा वर्षाव होतो आणि सारे विसरून जातात, असे पुरस्कार मला महत्त्वाचे वाटत नाहीत. आपण आपले काम करीत राहावे, असे त्यांचे कायम म्हणणे असायचे. त्यांच्याबद्दल मोठा आदर असणाऱ्या मुख्यमंत्री महोदयांनी एकदा त्यांना अर्ज पाठवायला सांगितला होता. माझ्यामार्फतही निरोप पाठवला. मात्र सरांनी अत्यंत नम्रपणे नकार दिला. यातच सरांचे मोठेपण होते. 
     सर अगदी जवळीक असलेल्या विद्यार्थ्यांना एकेरीतून बोलायचे. तो त्यांचा हक्कही होता. मात्र अशा एखाद्या विद्यार्थ्याच्या कार्यालयात गेले की, त्याला अहो-जाहो असे आदरार्थी संबोधायचे. त्यावर त्यांचे म्हणणे असायचे की, 'मी जर आदरार्थी बोललो तर त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांमध्ये आपोआप आदराची भावना वाढते. आणखी एक फायदा होतो, होणारी कामे, नियमानुसार कामे, माझा विद्यार्थी अडवणारच नाही. पण जर तेथे आमच्या दोघांच्या ओळखीचा कोणी असेल आणि त्याचे काम अडलेले असेल, तर तो दुसरा माणूस वशीला लावायला माझ्याकडे येणार नाही'. यातला आपल्या विद्यार्थ्यांबाबत सरांच्या मनात किती विश्वास होता, हे समजून यायचे.
मी सोलापूरला पदव्युत्तर शिक्षण केंद्रात अधिव्याख्याता म्हणून काम पाहात असताना २८ फेब्रुवारी १९९६ या विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञान दिन पुरवणी प्रकाशित करण्याचा मानस व्यक्त केला. त्यांनी लगेच सोलापूर तरूण भारतचे तत्कालीन संपादक विवेक घळसासी यांच्याशी चर्चा करून पुरवणी काढायचे निश्चित केले. लेखकांना विनंती करणे, पत्रे पाठवणे इत्यादी गोष्टी स्वत:ची कामे बाजूला ठेवून केली. या विज्ञान दिनाचे औचित्य साधून एखाद्या मराठी वृत्तपत्राने चार पानांची विज्ञान पुरवणी काढायची, ती पहिली वेळ असल्याचे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा लेखन करणार असल्याचे वि. गो. कुलकर्णी यांच्यासारख्या मातब्बर विज्ञान प्रसारकाने सांगितले. पुढे मी अधिव्याख्याता पदावर असेपर्यंत मी त्यांच्यासमवेत पुरवणीचे पूर्ण कामकाज पाहायचो. एकदा तर रात्री अकरा वाजेपर्यंत काम चालले होते. त्यावेळी होटगी रोडवरील तरूण भारतच्या कार्यालयातून आम्ही रेल्वे स्टेशनवर चहा पिण्यासाठी गेलो होतो. दिवसभर कॉलेजचे काम सांभाळून रात्री उशीरापर्यंत या कामासाठी वेळ देणे हे सरांनाच शक्य होते. त्यांची ही सवय नकळत आमच्यात उतरत होती. एकदा काम स्विकारले की पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा ते करत. 
     माझे पहिले पुस्तक 'एककांचे मानकरी' लिहायला घेण्यापूर्वी मी माझा या पुस्तकाचा संकल्प सरांना सांगितला. सरांशी मी मोकळेपणाने त्या विषयावर चर्चा केली. त्यातील काही भाग लिहून झाल्यावर मी त्यांना पाठवला. त्यावर तू सर्व लिखाण संपव, आपण १२ नोव्हेंबरला सोलापूरमध्ये पुन्हा चर्चा करू, असे सांगितले. आम्ही एकत्र बसणार होतो, पुस्तकाचा मसुदा अंतिम होणार होता... आणि सात नोव्हेंबरला प्रज्योतचा मला पुण्याला येण्यासाठी निरोप आला. आठ तारखेला सरांचे जाणे झाले. मात्र ते जाणेसुद्धा एका विज्ञानप्रेमी शिक्षकाचे ठरले. सरांचे डोळे आणि अन्य अवयव दान करण्यात आले. सरांनी आयुष्यभर विद्यार्थ्याना जे काही शक्य होते, ते ते दिले... जातानाही दात्याच्या रूपातच जाणे पसंत केले. ज्ञानदानाचा हा यज्ञ अवयव दानापर्यंत गेला आणि त्यांच्या सर्व अवयवांचे रोपण यशस्वी झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रसंगी प्रसिद्ध झालेल्या स्मृतीग्रंथाचे नाव विज्ञानाचा वारकरी असेच ठेवले. 
     सरांच्या जाण्याने बसलेला धक्का फार मोठा होता. आपण पुस्तक पूर्ण करत आणले आहे, मात्र ते सरांनी पाहिले नाही. आता आपण ते कशाला प्रसिद्ध करायचे, असा विचार करत ते हस्तलिखित तसेच पडून होते. मी पूर्णतः एका वेगळ्या मन:स्थितीत होतो. शेवटी 'हे पुस्तक प्रसिद्ध करा आणि ते सरांनाच अर्पण करा' अशी सूचना माझ्याइतकेच सरांवर आणि मॅडमवर प्रेम करणाऱ्या आमच्या
सौ.कडून आली. मी एरवीही ते पुस्तक सरांनाच अर्पण करणार होतो. त्यामुळे सरांनी न पाहता ते प्रसिद्ध करायला मन तयार नव्हते. शेवटी पत्नी वैशालीने 'सरांना तुमचे हे वागणे आवडले असते का? सरांचे विद्यार्थी म्हणवता आणि त्यांच्या तत्त्वाविरूद्ध कसे वागता?' असा प्रतिप्रश्न केला आणि मुलीनेही तिचे म्हणणे उचलून धरले. तसेही आमचे पूर्ण कुटुंबच सरांचे विद्यार्थी झाले होते. मलाही ते पटले आणि 'एककांचे मानकरी' हे पुस्तक जून २०१५ मध्ये प्रसिद्ध झाले. माझ्या आजच्या लेखनाचे श्रेय खऱ्या अर्थाने सरांनाच जाते. त्यांच्या सूचनेप्रमाणे मी विज्ञान लेखक आणि अगदी कार्टुनिस्टही झालो. टिकलो मात्र लेखनाच्या प्रांतात. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी मराठीतून लेखन करणे कसे आवश्यक आहे, हे त्यांच्या बोलण्यातून अनेकदा जाणवले होते. तेच कार्य पुढे नेण्याचा मी अल्पसा प्रयत्न करत आहे. 
      माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना सरांनी त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही मदत केली. त्यांना अनमोल मार्गदर्शन केले. ते त्याच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होत, पण निर्णयात ढवळाढवळ नसे. अडचणीतला विद्यार्थी सल्ला मागायला भेटल्यानंतर ते अडचण समजून घेत. सरांनी शिक्षणाचा खरा अर्थ खऱ्या अर्थाने आचरणात आणला. पण एवढ‌्‌यात त्यांनी जायला नको होतं. अजून त्यांची आम्हाला, जगाला गरज होती. त्यांच्या प्रत्येक कृतीतून, उक्तीतून आणखी खूप शिकायचं होतं. पण...

... सर, तुम्ही खूप लवकर एक्झिट घेतलीत!

(यातील एककांचे मानकरी या पुस्तकाचा कव्हर फोटो वगळता सर्व छायाचित्रे 'विज्ञानाचा वारकरी' या स्मृतीग्रंथातून घेतली आहेत.)