(शिक्षक दिन विशेष-२ प्रा. शाम तथा एस.एच. कुलकर्णी सर)
आज महाविद्यालयीन शिक्षणाचा सुवर्णकाळ येतो… त्यामुळे स्वप्न पाहायला पूर्ण मोकळीक असते. इथे जाणिवा समृद्ध व्हायला सुरुवात होते. या वयात चांगल्या शिक्षकांचा परिसस्पर्श झाला किंवा आपण गुरूरूपी परिसाच्या जवळ गेलो, तर आयुष्याचे सोने होते… त्यासाठी शिक्षकाचा सहवास अनुभवावा लागतो. मी स्वत:ला या बाबतीत नशीबवान समजतो. मला वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांच्या तर जवळ जाता आलेच; पण ज्यांच्या विषयाचा विद्यार्थी नव्हतो, अशा अनेक शिक्षकांच्याही सहवासाचे भाग्य लाभले. त्यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकता आल्या. आजच्या शिक्षक दिनानिमित्त मला वर्गात कधीच न शिकवणाऱ्या पण अनेक कौशल्ये शिकवणाऱ्या गुरूंचे अर्थात शाम कुलकर्णी सरांविषयी......
--------------------------------------------------------------------------------------------
विद्यार्थी मातीचा गोळा असतो. कुंभार जसा मातीला आकार देऊन त्यातून भांडी तयार करतो, तसेच शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. शालेय जीवनात तर शिक्षक मुलांसाठी सर्वस्व असतात. त्या वयात शिक्षकांनी सांगितलेले सारे काही खरे वाटते. आपले वडील एखाद्या विषयाचे कितीही मोठे तज्ज्ञ असले तरी मुलांना शिक्षकांनी शिकवलेली पद्धतीच योग्य वाटते. ‘आमच्या टिचरनी असे सांगितले आहे’, हे वाक्य बहुतांश ‘पप्पा-मम्मी’ने ऐकलेले असते. पुढे उच्च माध्यमिकचा कालावधी, विद्यार्थी दशेतील अत्यंत कठीण काळ. त्या वयात खरे तर काहीच कळत नसते. मात्र आपल्याइतके जगात कोणालाच कळत नाही, असा भ्रम असतो. तो हळूहळू कमी होत जातो. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाचा सुवर्णकाळ येतो. जबाबदारी काहीच नसते, त्यामुळे स्वप्न पाहायला पूर्ण मोकळीक असते. इथे जाणिवा समृद्ध व्हायला सुरुवात होते. या वयात चांगल्या शिक्षकांचा परिसस्पर्श झाला किंवा आपण गुरूरूपी परिसाच्या जवळ गेलो, तर आयुष्याचे सोने होते. मात्र त्यासाठी शिक्षकाचा सहवास अनुभवावा लागतो. मी स्वत:ला या बाबतीत नशीबवान समजतो. मला वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांच्या तर जवळ जाता आलेच; पण ज्यांच्या विषयाचा विद्यार्थी नव्हतो, अशा अनेक शिक्षकांच्याही सहवासाचे भाग्य लाभले. त्यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकता आल्या. आजच्या शिक्षक दिनानिमित्त मला वर्गात कधीच न शिकवणाऱ्या पण अनेक कौशल्ये शिकवणाऱ्या गुरूंचे अर्थात शाम कुलकर्णी सरांचे स्मरण होते.
जुलै १९८६ मध्ये मी दयानंद महाविद्यालयात गेलो. पूर्वीपासून माझा ओढा
‘ए’ ग्रुपकडे होता. त्यामुळे वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांची
निवड करण्याचा प्रश्नच नव्हता. त्या वेळी महाविद्यालयात एकापेक्षा एक दिग्गज
शिक्षक होते. कला,
साहित्य क्षेत्रातील डॉ. नरेंद्र कुंटे मराठीचे शिक्षक संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. पदार्थविज्ञानशास्त्राचे डॉ. धायगुडे सर ( http://drvnshinde.blogspot.com/2019/09/blog-post.html ) आणि
धायगुडे मॅडम यांचे वर्तमानपत्रातून विज्ञान विषयावर लेख येत. गणिताच्या डी.जी.
आणि एल.जी.
कुलकर्णी सरांच्या शिकवण्याचा मोठा दबदबा होता. असेच वनस्पतीशास्त्राचे दोन शिक्षक होते. डॉ.
प्रमोद पाटसकर आणि शाम कुलकर्णी सर. दोघे विज्ञानाचे असूनही साहित्याच्या प्रांतात मुक्त संचार करत.
विद्यार्थ्याचा विषय असो किंवा नसो, सर्वांना माहित असणारे असे बरेच शिक्षक ‘दयानंद’मध्ये होते.
महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर आम्ही इकडे तिकडे खूप भटकत असू. महाविद्यालयाचा परिसर मोठा. ६५
एकराच्या परिसरात विज्ञान अधिविभागासाठी स्वतंत्र इमारती होत्या. भौतिकशास्त्र, भूगोल आणि भूशास्त्र विषयाची इमारत पूर्व परिसराच्या उत्तर बाजूला होती. मध्येच
शिक्षणशास्त्र महाविद्यालय. त्याला जोडून एनसीसीचे शस्त्रागार आणि त्याला बिलगून वनस्पतीशास्त्र विभाग. त्याच्यापलिकडे प्राणीशास्त्र
विभाग. सर्वात दक्षिणेकडील भागात रसायनशास्त्र विभाग होता. त्याच्या डोक्यावर सूक्ष्मजीवशास्त्र विभाग. या इमारतींच्या
मागे आमचे वसतीगृह होते. आमचे विषय उत्तरेच्या कोपऱ्यात विसावलेले. मात्र वसतीगृहाच्या दक्षिण द्वारातून निघून आम्ही मित्रांना सोडत भौतिकशास्त्र विभागाकडे जात असू. त्या पलिकडे आमच्या विभागातील अन्य विद्यार्थ्यांचा दक्षिण बाजूस संबंध नसे. विभागाच्या स्वतंत्र सूचनाफलकाखेरीज मुख्य सूचनाफलक पश्चिम बाजूच्या परिसरात होता. तिकडे
प्राचार्यांचा कक्ष, गणित विभाग, कला
विभाग व विधी आणि वाणिज्य महाविद्यालये होती. एका भव्य इमारतीच्या मध्ये ग्रंथालय. ग्रंथालयाकडे
जाणाऱ्या जिन्याच्या
ठिकाणी तळ मजल्यावर मुख्य सूचनाफलक होता. तेथे आठवड्यातून दोन वेळा जाऊन सर्व विद्यार्थ्यांना सूचना पाहाव्या लागत. मोकळ्या
जागेत रस्ता आणि झाडे भरलेली होती. या इमारतींची
रचना आकाशातून ॐ प्रमाणे दिसायची. त्याचे छायाचित्र कला व शास्त्र
महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कक्षात लावलेले होते. महाविद्यालयाचा परिसर आणि एकूण वातावरण कथा कादंबऱ्यातील वर्णनाप्रमाणे रम्य होते.
प्रवेश घेतल्यानंतर प्रथमच मुख्य सूचनाफलक पाहताना, सर्वात मध्यभागी असलेल्या फलकाजवळ मी थांबलो. तेथे ‘अक्षरमंच’ नावाचे हस्तलिखित भित्तीपत्रक लावलेले होते. अतिशय सुंदर पद्धतीने सजवलले आणि साहित्याने भरलेले भित्तीपत्रक पाहून मनापासून आनंद झाला. अकरावी-बारावीत असताना मी कविता करायचो. कविता म्हणून त्या किती चांगल्या, किती वाईट, हे आज काही सांगता येत नाही. कारण त्या आज माझ्याजवळ नाहीत. मात्र दोन्ही वर्षी बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या नियतकालिकात त्यातील दोन कविता छापल्या गेल्या होत्या. अर्थात त्यामुळे उगाचच भविष्यातल्या महान कवीपणाची स्वप्ने त्या काळी मला पडत असत. असे त्या वयात जवळ जवळ प्रत्येकालाच वाटत असते. आपण लिहू शकतो, यापेक्षा आपले अक्षर खूप चांगले आहे, असाही माझा समज होता. ‘अक्षर चांगले आहे’, असे म्हणणाऱ्या बहुतेकांचे अक्षर खूपच खराब होते. त्यामुळे ते सापेक्षतेनुसार खरे होते. आज माझ्यापेक्षा सुंदर हस्ताक्षर असणारे अनेकजण मला माहीत आहेत. मात्र अक्षराबाबत अनेकांनी सांगितल्याने मलाही असे वाटायचे की, जगातील सर्वात चांगले हस्ताक्षर आपलेच आहे. अशा सर्व मानसिकतेमुळे या भित्तीपत्रकाचे- ‘अक्षरमंच’चे काम आपण आणखी चांगले करू, असे वाटले.
‘अक्षरमंच’च्या त्या अंकाच्या उजव्या कोपऱ्यावर मार्गदर्शक म्हणून डॉ. नरेंद्र कुंटे आणि प्रा. शाम
कुलकर्णी यांची नावे होती. त्या खाली संपादक म्हणून दोन विद्यार्थ्यांची नावे होती. एका सिनियरला भेटून अक्षरमंच, कुलकर्णी
सर आणि कुंटे सरांची माहिती घेतली. कुलकर्णी सर वनस्पतीशास्त्र विभागातील
आहेत, ते कथा खूप छान लिहितात, त्यांचे कथाकथन तर इतके भन्नाट असते की हसून हसून पोट दुखते, असे बरेच काही समजले. नरेंद्र
कुंटे सर मराठीचे होते़. कुंटे सर आणि
कुलकर्णी सर कोण, ते लांबून पाहून घेतले. का माहीत
नाही पण त्यावेळी कुंटे सरांकडे जायला भिती वाटली. त्यांचा चेहरा करारी होता. त्यांना
कसे बोलावे, असा प्रश्न पडायचा. पुढे
त्यांच्याशीही अनेकदा खूप चांगला संवाद झाला. पण कुलकर्णी
सरांना पाहताच ते आपलेसे वाटले. त्यातच कुंटे सरांचा विभाग सकाळच्या सत्रात असायचा. शास्त्र
विषयाच्या विभागांना दहा वाजता जाग येत असे. त्यामुळे मी शाम कुलकर्णी सरांना भेटायचा निर्णय घेतला.
सावळा वर्ण, मध्यम उंची, थोडे
जाडसर ओठ असे मध्यम चणीचे कुलकर्णी सर वनस्पतीशास्त्र विभागाच्या शिक्षक कक्षात बसलेले होते. मी रामहरी
आगलावे नावाच्या मित्रासह गेलो होतो. आम्हाला बाहेर पाहताच दरवाजाजवळ शिपायाने ‘काय
आहे?’ असे विचारले. मी सांगितले, ‘कुलकर्णी सरांना भेटायचे आहे.’ त्याने सरांना निरोप देताच ते लगेच उठून बाहेर आले. ‘आपल्याकडे आलेल्या मुलांचा वेळ जाऊ नये आणि इतर शिक्षकांना त्रास होऊ नये,’ म्हणून ते नेहमी
असे करत, हे नंतर
आमच्या लक्षात आले. हा माझ्यावर
झालेला पहिला संस्कार होता. मी आजही
मला भेटायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना कधीच ताठकळत ठेवत नाही. अगदी कुलसचिवपदी कार्य करत असतानाही हे कटाक्षाने
पाळले. सर आम्हाला प्रयोगशाळेत घेऊन गेले आणि ‘हं बोला, काय काम आहे’, असे विचारले. मी
माझा परिचय करून दिला आणि ‘अक्षरमंच’चे काम
करायचे असल्याचे
सांगितले. सरांनी विचारले, ‘काय लिहिता?’ मी
महान कवी असल्याच्या आविर्भावात सांगितले, ‘कविता करतो.’ आमच्या मित्राने पुढे सांगितले, ‘सर,
त्याचे अक्षर खूप चांगले आहे.’ अक्षर चांगले आहे आणि कविता करतो म्हटल्यावर सरांनी परीक्षा घ्यायचे ठरवले असावे.
त्यानंतर नरेंद्र आंभोरे यांच्यासमवेत ‘अक्षरमंच’
संपादनाची जबाबदारी १९८६ मध्येच माझ्यावर सोपवली गेली. पुढची दोन वर्षे मी सिनियर झालो. इतर विद्यार्थ्यांनी मला साथ दिली. पहिला
अंक कधी निघेल, असे मला झाले होते. तो
काढला आणि सर्वांना आवडलाही. त्यानंतर त्या महिन्यात कोणाची पुण्यतिथी आहे,
कोणाची जयंती आहे. महिन्याभरात कोणती महत्त्वाची घटना घडली आहे,
या सर्व गोष्टींचा आढावा घेणे, लिहित्या मुलांंकडून लेख मागवायचे, त्यासाठीच्या सूचना लावायच्या, आलेल्या
लेखांची छाननी करून आपल्या मतासह कुलकर्णी सरांना दाखवायची. हे सलग
तीन वर्षे केले. ‘अक्षरमंच’ आपण एकटे पाहात नाही, तर
कुंटे सरही त्याचे भाग आहेत, हे कुलकर्णी सर कधीच विसरत नसत. सर्व लेख आणि आम्हाला घेऊन ते कुंटे
सरांकडे जात. त्यांच्याकडून सर्व लेखांची, कवितांची
आणि छायाचित्रांची निवड अंतिम करून घेत. कुंटे सर त्या
लेखातील व्याकरणाच्या चुका आणि अपवादात्मक परिस्थितीत शब्द दुरूस्ती करून देत. त्याबरहुकूम लिहावे लागत असे.
अध्यापन, संशोधन किंवा इतर बाबी सांभाळत त्यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभत असे. ‘वेळ नाही’ हे
वाक्य या शिक्षकद्वयांकडून आम्हाला कधीच ऐकायला मिळाले नाही.
अनेकदा कामासाठीचे ड्रॉइंगशिट मिळायचे नाही, कधी स्केचपेन संपत, अशा वेळी कुलकर्णी सर खिशातील पैसे काढून देत. आम्हाला वाटायचे, याचे त्यांना ऑफिसकडून पैसे मिळत असतील. मात्र पुढे माहीत झाले की ती सरांची पदरमोड होती. कारण अशा खरेदीचे बिल त्यांनी आमच्याकडे कधीच मागितले नाही आणि बिल नसेल तर कोणतेही
कार्यालय पैसे आदा करत नाही. दर महिन्याला
एक अंक निघावा, असा त्यांचा कटाक्ष असे आणि त्यासाठी त्यांनी केलेली ती पदरमोड असे.
आमच्याकडून उशीर झाला की त्यांचा निरोप आलाच म्हणून समजायचे. स्वत: कलाक्षेत्रात
रमणारे असूनही विलंब त्यांना चालत नसे. ‘अक्षरमंच’चा अंक तयार झाला की, प्रथम तो कुलकर्णी सरांना दाखवला जात असे. त्यामध्ये काही चुका आहेत का,
हे ते तपासून पाहात. त्यानंतर तो कुंटे
सरांना दाखवला जात असे. कुंटे सरांनी ‘ठीक
आहे’, म्हटल्यावरच तो सूचनाफलकावर लावला जाई. १९८८ मध्ये एक अंक
असाच दाखवला. अगोदर फायनल केलेले सर्व लेख आणि कविता लिहिल्यानंतर थोडी जागा शिल्लक राहिली होती. त्या
जागेवर अंतिम निवडीत नसणारी एक छोटी कविता मी लिहिली. कुलकर्णी सरांच्या ते लगेच
लक्षात आले.
त्यांनी तो अंक पुन्हा लिहायला लावला. तसेच ‘पुन्हा असे करायचे नाही’, हे निक्षून
सांगितले. आपण सर्वजण मिळून काम करत असताना सर्वांनी मिळून निर्णय घेतल्यानंतर तो कधीही एकट्याने बदलायचा नाही. सर्वांना विश्वासात घेऊनच बदल केला पाहिजे, हा धडा
त्यावेळी न रागावता दिला. प्रशासनात आल्यानंतर या गोष्टीचाही
मला खूप फायदा झाला.
लेखांची निवड कशी करायची, त्यांचे संपादन कसे करायचे, हे सर्व सरांसोबत काम करताना हळूहळू लक्षात येऊ लागले. लेखनात सुधारणा करताना मूळ लेखकाच्या मताचा पूर्ण सन्मान झाला पाहिजे, या गोष्टींची जाणीव झाली. महाविद्यालयाच्या भित्तीपत्रकात प्रसिद्ध होणाऱ्या लेखातील मते सकारात्मक असावीत, त्यात विखारीपणा नसावा, भाषा ही बोलीभाषा असली तरी ती त्याबरहुकुम असावी, अशा अनेक गोष्टी सर सांगत. ‘अक्षरमंच’ त्या काळात खूपच चर्चेत आला. त्यावेळी तरूण भारत (सोलापूर) हे दैनिक दर बुधवारी ‘मध्यमा’ नावाची खास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी प्रकाशित करत असे. ‘अक्षरमंच’च्या कामामुळे मध्यमा पुरवणीचे काम मला मिळाले. त्या निमित्ताने ‘तरूण भारत’मध्ये जाऊ लागलो. विवेक घळसासी सर त्यावेळी संपादक होते. त्यांना सुरुवातीला लांबून पाहात असे. मात्र नंतर त्यांच्याशी संवाद सुरु झाला. पुढे ‘विज्ञान दिन पुरवणी’मुळे स्नेह आणखी दृढ झाला. ‘केसरी’मध्ये आमचे मित्र अरूण लोहकरे होते. त्यामुळे १९८६ पासून मी अधूनमधून वृत्तपत्रातून लिहू लागलो. विद्यार्थी दशेतील सर्व लेख डॉ. धायगुडे सरांच्या मार्गदर्शनाखाली लिहायचो. प्रसिद्ध झालेल्या लेखांवर शाम कुलकर्णी सरांची आवर्जून प्रतिक्रिया असायची. त्या काळात सारे काही उत्साहाच्या भरात चाललेले असायचे. या उत्साहात होणारी चूक सांगायला व सुधारायला शाम कुलकर्णी सर असायचे. रामानुजन यांच्यावर मी ‘गणितातील अढळ ध्रुव रामानुजन’ नावाचा लेख ‘केसरी’त लिहिला. त्यावेळी भेटल्यानंतर कुलकर्णी सरांनी प्रथम लेखाचे कौतुक केले. नंतर म्हणाले, ‘शीर्षकात मात्र चूक झाली. अरे ध्रुव अढळच आहे. हे शीर्षक ‘गणितातील ध्रुव रामानुजन’ एवढेच हवे होते. अशा चुका टाळल्या पाहिजेत. ‘अक्षरमंच’च्या संपादकाकडून अशा चुका अपेक्षित नाहीत.’ तेव्हापासून शीर्षक लिहिताना खूप विचार करू लागलो. अनेकदा शीर्षक अगोदर तयार असते. तरीही आजदेखील महत्त्वाच्या लेखांचे शीर्षक जवळच्या मित्रांशी चर्चा करून अंतिम करतो. अशा अनेक छोट्या छोट्या प्रसंगातून सरांनी कळत-नकळत माझ्यावर अनेक संस्कार केले. त्यातून लेखन कला विकसित व्हायला मदत झाली. त्यामुळे डॉ. धायगुडे सर आणि मॅडम यांच्याप्रमाणेच शाम कुलकर्णी सरही लेखन संस्काराबाबत माझ्यासाठी गुरूस्थानी आहेत आणि अखेरपर्यंत राहतील. महाविद्यालयात विविध निबंध, वक्तृत्व स्पर्धा आयोजित होत. त्यामध्ये मीच नव्हे, तर कोणत्याही विद्यार्थ्याला बक्षीस मिळाले की सर आवर्जून कौतुक करून प्रोत्साहन देत.
सर, कथाकथन खूप छान करायचे. पु.ल. देशपांडे, व.पु. काळे यांच्यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या कार्यक्रमाचे मुक्तपणे कौतुक केले होते. कितीही विनोदी प्रसंग असला तरी चेहऱ्यावर हास्य दिसू न देता सहजपणे ते सांगत आणि श्रोत्यांना खळखळून हसवत. दरवर्षी वसतीगृहात त्यांचा एक कार्यक्रम आवर्जून होत असे. त्यावेळी वसतीगृहातील हॉल तुडुंब भरलेला असे. सोलापुरात नोकरी करणाऱ्या कुलकर्णी सरांनी हुबळी, जालना, लातूर, पाटण, लांजा, निपाणी, इचलकरंजी अशा अनेक ठिकाणी शंभरावर प्रयोग केले होते. ‘रसिका आवडे विनोद’ हा त्यांचा कार्यक्रम असे, तेव्हा तर श्रोत्यांची तोबा गर्दी होई. हे कौशल्य त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून विकसित केले होते.
सरांचे शिकवणेही खूपच चांगले होते. वनस्पतीशास्त्राचे शिक्षक म्हणून पानांची हिरवाई त्यांनी पूर्ण आत्मसात केली होती. त्यांचे
दर्शनच मनाला प्रसन्न करणारे होते. त्यांचे वर्गातील शिकवणे हे रंजक किश्श्यांनी आणि खुमासदार शैलीने भरलेले असायचे, असे आमच्या बॅचचे वनस्पतीशास्त्र विषयाचे विद्यार्थी मित्र सांगायचे. मलाही त्यामुळे आपण सरांचे विद्यार्थी असायला हवे होते, असे वाटायचे. त्यांच्याकडे फक्त पानांचा हिरवटपणा नव्हता, तर, फुलांच्या पाकळ्यांची कोमलताही होती. त्यामुळे त्यांचे बोलणे कोणाला दुखावत नसे.
महाविद्यालयात ते एखाद्या टपोऱ्या गुलाबासारखे असायचे. मात्र एवढ्या गोड आणि विद्यार्थीप्रिय सरांना मधुमेहासारखा एक काटा (ज्ञात) जोडला गेला होता. त्यांच्या
गोड खाण्यावर बंदी होती. मात्र घरापर्यंत पोहोचणारे कोणी नसले की ते
कधी-कधी गोड खात. ‘मधुमेहाला एवढे चालते रे,’
असे म्हणत. त्यांना आणखी एक कला
अवगत होती. विद्यार्थ्याचा चेहरा वाचून तो अडचणीत
आहे, हे सर ओळखायचे. प्रयोगशाळेत बोलावून त्याची अडचण समजून घेऊन आपल्या परीने मदत करायचे. त्यांनी
केलेली मदत कधी कोणाला कळत नसे.
मोठेपणा आव न बाळगणारे, चांगल्याचे कौतुक करणारे, चुक
हळूवार निदर्शनास आणणारे, अचूकतेचा आग्रह धरणारे, विद्यार्थ्यांचा उत्साह
टिकून राहावा म्हणून पदरमोड करणारे, इतरांचा सन्मान कसा जपावा, याचा नकळत संस्कार करणारे, स्वत:चे
दु:ख झाकून इतरांना खळाळून हसवणारे, अडचणीच्या प्रसंगही विद्यार्थ्यांच्या मदतीला धावणारे… कुलकर्णी सर.
सरांनी प्रत्यक्ष वर्गात फळ्यावर पानाफुलांच्या आकृत्या काढायला आणि रेषा मारायला मला कधी शिकवले नाही. मात्र साहित्य समजून घ्यायला, त्यातील
चुका शोधायला, स्वत:चे
लेखन स्वत:च तपासायला,
रंगसंगती निवडायला शिकवले. लौकिकार्थाने माझे थेट शिक्षक नसणाऱ्या मात्र प्रत्यक्ष जीवनात अनेक गोष्टी शिकवणाऱ्या, अवेळीच अस्ताला गेलेल्या या सच्च्या गुरूला शिक्षक दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!
You are lucky
उत्तर द्याहटवाThe Great Teacher of the common man really hats off
उत्तर द्याहटवाCongratulations for nice compilation
विलास,
उत्तर द्याहटवाशाम कुलकर्णी सरांच्या व्यक्तीमत्वाचे अतिशय सुंदर व बोलके वर्णन केलेस.वनसपतीशास्र विभागात मला त्यांचा लाभलेला सहवास अविस्मणीय आहे. आजच्या शिक्षक दिवसा निमित्त त्यांच्या तसेच डॉ पाटसकर, डॉ. पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. तसेच माझ्यातील संशोधक जागा करणाऱ्या डॉ बावचकर यांना सादर प्रणाम.
तुझ्या उत्तम जिवंत लेखा करीता खूप खूप अभनंदन.
विभाग
देणारा देतच असतो पण वेचणारा गुणग्राहक हवा.
उत्तर द्याहटवाछान लिहिले आहेस.
विलास,
उत्तर द्याहटवाशाम कुलकर्णी सरांच्या व्यक्तीमत्वाचे अतिशय सुंदर व बोलके वर्णन केलेस.वनसपतीशास्र विभागात मला त्यांचा लाभलेला सहवास अविस्मणीय आहे. आजच्या शिक्षक दिवसा निमित्त त्यांच्या तसेच डॉ पाटसकर, डॉ. पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. तसेच माझ्यातील संशोधक जागा करणाऱ्या डॉ बावचकर यांना सादर प्रणाम.
तुझ्या उत्तम जिवंत लेखा करीता खूप खूप अभनंदन.
डॉ. अमर सुपाते
सर खूप छान. आपल्या गुरूंची छाप नकळत आपल्या सर्वांमध्ये मध्ये दिसते,तसेंच तुमच्यामध्ये पण दिसते,असे गुरू लाभणेचं भाग्य भाग्यवान व्यक्तीनाच लाभते.💐.
उत्तर द्याहटवामी दयानंद कॉलेजची विद्यार्थिनी नव्हते, पण स्पर्धेच्या निमित्ताने दयानंद कॉलेजमध्ये येणे व्हायचे त्यावेळेला सरांची ची ओळख झालेली होती. लेख वाचताना सगळे प्रसंग आज अनुभवतोय असे वाटले अतिशय सुंदर लेख 💐👍🏻
उत्तर द्याहटवाछान लेख मला दयानंद चे दिवस आठवलं. मी ही अक्षरमंच लिहिले होते. कॉमन रूम च्या जवळ नोटीस बोर्डावर तो लावला जायचं.
उत्तर द्याहटवासर शिक्षक दिनाच्या आपणास शुभेछ्या. आपला लेख मनापासून खुप आवडला. एखाद्या शिक्षकाप्रमाने आपलेही मार्गदर्शन विद्यापीठाला, कर्मचारी यानां नेहमी मिळत असते.
उत्तर द्याहटवाI was bestowed by his Devine grace,for I was his student and passed my graduation in Botany in the year 1990,great teacher,go go orator,kind enough to cope up with any situation at college times.
उत्तर द्याहटवा