(शिक्षक दिन विशेष -३ मोतीराम दगडू खाडे गुरूजी)
आमचे गाव चिंचोली. छोटे खेडेगाव. आजही हजाराच्या
आत लोकसंख्या असणारे. गावात जिल्हा परिषद, सोलापूरमार्फत प्राथमिक शाळा चालवली जाते.
मी शाळेत जाऊ लागलो तेव्हा चवथीपर्यंत शाळा होती. सुरुवातीला एकाच वर्गात चार
ओळीमध्ये चार वर्ग बसायचे. या चार वर्गाना आळीपाळीने दोन शिक्षक शिकवत असत. गावातील
प्रमुख चौकात शाळेचा एक मोठा वर्ग होता. त्यात ही शाळा भरायची. पुढे दोन खोल्यांची
शाळा गावापासून सुमारे पाउण किलोमीटर अंतरावरील भवानी आईच्या मंदिरासमोरील जागेत
बांधण्यात आली. वर्ग दक्षिणेकडे तोंड करून होते. त्या वर्गाच्या पुढे तीसेक फुआवर आग्नेय
दिशेला भवानी मातेचे मंदिर होते. मंदिरासमोर डिकमल (दिपमाळ) दिमाखात उभी होती.
शाळेच्या पुढे मंदिराच्या दक्षिणेस कबड्डीचे मैदान बनवलेले होते. कधीकधी तेच खो-खोचे
मैदान बनवण्यात येत असे. या मैदानाच्या कडेला एक कडुनिंबाचे झाड होते. थोडी
सिताफळांची झुडपे होती. मंदिर, मैदान आणि शाळेच्या तीन बाजूला खोल दरीसारखा भाग
होता. शाळा आणि मंदिर दोन्ही माळ नावाच्या टेकडीच्या पायथ्याशी होते. याला भवानी
आईचा माळ म्हणायचे. माळावर झाडे फारशी नव्हती. जी होती ती झुडपे. पावसाळ्यात
माळाच्या पायथ्यावर येणारे गवत वाऱ्यासोबत नाचत असायचे. हलक्या वाऱ्याच्या तालावर डुलणारे
गवत पाहताना किती वेळ जायचा, ते कळायचे नाही. हिवाळा संपता-संपता गवत वाळू लागायचे.
या गवतात पावसाळा आणि उन्हाळ्यात जनावरे चरत असायची. हिवाळ्याच्या अखेरीस गवताला
कुसळे फुटायची त्या काळात जनावरे ते गवत खात नसत. अशी गावापासून दूर निसर्गाच्या
सानिध्यात आमची शाळा होती.
आमचे दुसरीपासूनचे वर्ग या नव्या शाळेत भरू लागले.
पहिली आणि तिसरी एका वर्गात तर दुसरी आणि चवथीचा वर्ग एका वर्गात बसत असे. या
शाळेत अंबऋषी कृष्णा काशिद आणि मोतिराम दगडू खाडे असे दोन शिक्षक होते. काशिद
गुरूजींचा मी विशेष लाडका होतो. प्रत्यक्ष शाळेचा विद्यार्थी होण्यापूर्वीच मी
बहिणीबरोबर शाळेत गेलेलो असल्याने ते मला ओळखत होते. त्या वेळी लहान असूनही मी
दंगा करत नसे. शिकवताना अडथळा करत नसे, असे त्यांचे मत होते. प्रत्यक्ष विद्यार्थी
झाल्यानंतर गुरूजींनी विचारलेल्या प्रश्नांची मी उत्तरे देत असल्याने काशिद गुरूजी
माझ्यावर खुश होते. पहिली सुखात पार पडली आणि मी दुसरीला गेलो. दुसरीला खाडे
गुरूजी वर्गशिक्षक होते.
मोतीराम दगडू खाडे गुरूजी. आमच्या गावापासून तीन
किलोमीटरवरील घोळवेवाडी या आमच्या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावचे
होते. सहा फुट उंची. घारे भिरभिरते डोळे. गोरा रंग. लांब नाक. सडसडीत बांधा. दाढी
आणि मिशा काढलेला गुळगुळीत चेहरा. गावातील सर्व लोकात त्यांचा रंग उजळून दिसत असे.
पांढरे शुभ्र धोतर, त्यावर नेहरू शर्ट आणि डोक्यावर पांढरी टोपी. टोपीतून बाहेर
डोकावणारे विरळ पांढरे केस. हातात निरगुडीची दोन अडिच फूट लांबीची छडी. हा त्यांचा
पेहराव ठरलेला. गावातील ‘बच्चा, बच्चा’ कोठूनही खाडे गुरूजीना ओळखत असे. त्यांचे
नाव कोणीच विसरू शकत नव्हते. आवाज खणखणीत नव्हता. मात्र सर्वांपर्यंत पोहोचणारा
होता. खोलीतील एका वर्गाला शिकवताना दुसऱ्या कोपऱ्यातील एखाद्या मुलाने काहीही
चूकीचे केले तरी त्यांच्या लक्षात येत असे. त्यामुळे ‘भिरभिरते डोळे’ हे
त्यांच्याबाबत शब्दश: खरे होते. त्यांचे सर्वच विषयांचे शिकवणे चांगले होते. मात्र
गणित शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. पहिलीच्या विद्यार्थ्याचे ‘बे’चे पाढे पाठ
असलेच पाहिजेत, असा त्यांनीच केलेला नियम होता. ते पहिलीला शिकवत नव्हते. मात्र
दुसरीला त्यांच्या वर्गात येणाऱ्या मुलांना पहिल्या आठवड्यात तोंडी परीक्षा द्यावी
लागत असे.
आमच्या वर्गालाही दुसरीला शिकवण्यासाठी खाडे
गुरुजी आले. सात जूनला मान्सूनचे आगमन होवो न होवो, प्राथमिक शाळा त्याच दिवशी
सुरू व्हायच्या. आम्हाला पहिल्या दिवसापासून शाळेत जाणे बंधनकारक होते. शाळा
बुडवली हे वडिलांना समजले की (त्यांना ते समजायचेच) पाठीचे धिरडे व्हायचे.
त्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी शाळेत गेलो. त्याच दिवशी ‘कोण किती पाण्यात आहे’, हे
खाडे गुरूजींनी तपासण्यास सुरुवात केली. नुकतीच उन्हाळ्याची सुट्टी संपलेली होती.
आंब्याची चव अजून जिव्हेवरून गेलेली नव्हती. गल्लीतील मुले सोडून इतरांशी गप्पाही
झालेल्या नव्हत्या, अशात खाडे गुरूजी वर्गात आले. कपाटातील छडी काढून टेबलवर
ठेवली. सर्वांची हजेरी घेतली. एकेकास उभा करून पहिल्याच दिवशी बेचे पाढे म्हणायला
सांगितले. काही विद्यार्थ्यांना म्हणता आले. ज्यांचे पाठ नव्हते त्यांना सक्त
ताकिद मिळाली. ‘आठ दिवसात दहापर्यंत पाढे पाठ झाले पाहिजेत. पाढे पाठ नसले तर
छडीचा प्रसाद मिळेल.’ पहिल्याच दिवशी खाडे गुरूजींनी दिलेला दम ऐकून काही मुलानी
धसका घेतला. काहींनी पाढे पाठ करायचा निर्धार केला. पण बहुतांश मुले प्रामाणिकपणे
प्रयत्न करत.
त्या काळात बालभारतीची पुस्तके बाजारात शाळा
सुरू होण्यापूर्वी उपलब्ध होत असत. तरीही पहिला आठवडा पुस्तके शाळेत लागत नसत. पैशाअभावी
काही गरीब मुलांचे आई-वडिल शाळा सुरू झाल्यावर पुस्तके आणायची, असे ठरवत. गुरूजीनी
पुढच्या सोमवारपर्यंत पुस्तके आणा, असे सांगितले. तोपर्यंत त्यांच्या भाषेत ‘मडके
किती भाजले’, हे तपासण्यास सुरूवात केली. पाढ्यांची परीक्षा झाल्यावर एक दिवस
हातात खडू दिला आणि एकेकाला उठवून फळ्यावर लिहायला सांगितले. ‘कमल बघ…, गणपत गवत
आण…’ अशी सोपी, वयाला पेलवतील अशी वाक्ये लिहायला लावली. ज्यांना लिहिता आले
त्यांना शाबसकी मिळाली. ज्यांचे थोडेफार चुकले त्यांना ‘लक्ष नव्हते का?’ असे
विचारले. तर अगदीच काही न येणाऱ्याला, ‘कारे शाळेत यायचास का म्हशी वळायला जात
होतास?’ असा खडा सवाल केला. हे सर्व त्यांचे दरवर्षी चालत असे. आम्ही पहिलीला
असताना चारही वर्ग एकाच खोलीत भरत असल्याने, वरच्या वर्गाच्या मुलांना शिकवताना
अनुभवले होते. तेंव्हाच त्यांच्याबद्दल मनात भिती निर्माण झालेली होती. तेच गुरूजी
आमच्या वाट्याला आलेले होते.
आपल्या वर्गात आलेल्या विद्यार्थ्यांना काय येते
हे तपासण्यात आठ दिवस कसे गेले ते कळलेच नाही. पुढे त्यांचे प्रत्यक्ष शिकवणे सुरू
झाले. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे पाढे पाठ व्हावेत आणि पाठ राहावेत म्हणून खाडे
गुरुजींनी वर्गातील मुलांची दोन गटात विभागणी केली. ही विभागणी सुरुवातीलाच ‘कोण
किती पाण्यात आहे’ याचा अंदाज घेऊन केली. मग दोन गटांना दोन ओळीत बसवले आणि एका
गटाने ‘बे एके बे’ म्हणायचे त्यानंतर दुसऱ्या गटाने ‘बे दुणे चार म्हणायचे.
त्यानंतर पुन्हा पहिल्या गटाने ‘बे त्रिके सहा’ म्हणायचे. असा पाढे म्हणण्याचा
कार्यक्रम दर शुक्रवारी तीन ते चार या वेळेत एका वर्गाचा आणि चार ते पाच या वेळेत दुसऱ्या
वर्गाचा असायचा. यात ज्यांचे पाढे पाठ नसायचे त्यांच्या फक्त ओठांच्या हालचाली
होत. ही गोष्ट त्यांच्या भिरभिरत्या नजरेतून सुटत नसायची. त्या मुलाजवळ किंवा
मुलीजवळ ते जाऊन छडीचा प्रसाद द्यायचे. या माराला पर्याय नसल्याने आम्ही सुट्टीतही
पाढे म्हणण्याचा न सांगता गृहपाठ किंवा रानपाठ (शेतात काम करताना) करायचो.
खाडे गुरूजी शिकवताना खूप तन्मयतेने शिकवत. गणित
असो किंवा बालभारती. शिकवताना ते कधीच खुर्चीत बसत नसत. त्यांना केवळ हजेरी
घेतानाच खुर्चीत बसलेले पाहिले. मुलांच्या ओळीमध्ये फिरत त्यांचे शिकवणे सुरू
असायचे. गणितातील बेरीज, वजाबाकीची दोन गणिते ते फळ्यावर सोडवून दाखवत. ‘समजले का?’
असे विचारायचे. ‘हो’ असे बहुतांश विद्यार्थ्यांचे उत्तर आल्यानंतर एक गणित फळ्यावर
लिहित आणि सोडवायला सांगत. ते गणित आम्ही सोडवू लागलो की बसलेल्या
विद्यार्थ्यांच्या ओळीतून फिरत. कोणाचे बरोबर कोणाचे चूक हे न बोलता लक्षात घेत.
पुरेसा वेळ झाला की ज्याचे गणित चुकलेले असायचे त्यातील एकाला पुढे बोलावून
फळ्यावर सोडवायला लावत. तो तिथे चुकला तर समजावून सांगत. पुन्हा सर्वांना समजले का
विचारत. अशी तीन गणिते सोडवून झाल्यावर पुन्हा नवे गणित सांगत. हे गणित जर कोणाचे
चूकले तर पाठीवर छडीचा प्रसाद मिळत असे. एकदा मुलांनी गुरूजी जेवायला गेल्यानंतर
त्यांची छडी फेकून दिली. आपली छडी गायब झालेली पाहून त्यांनी सर्वांना तंबी दिली, ‘तुम्ही
कितीही छड्या गायब केल्या तरी मी रोज दोन्ही वेळा नव्या छड्या आणू शकतो. आज छडी
आणलेली नाही. पण माझा हात छडीपेक्षा कमी नाही.’ असे म्हणत त्यादिवशी त्यांनी अनेकांना
हातानेच मार दिला. त्यांच्या ‘चूकीला मार’ सूत्रामुळे ‘मारकुटे गुरूजी’ हे त्यांना
टोपण नाव दिलेले होते. खाडे गुरूजींचा अभ्यासासाठी मला एकदाही हा प्रसाद खावा
लागला नाही.
एखादी कविता किंवा धडा शिकवताना मुलाच्या
डोळ्यांसमोर ते चित्र उभा करत. मुलाला त्या भावविश्वात नेत असत. मुलाच्या मनावर तो
पाठ कोरला जात असे. त्यामुळे ते शिकवू लागले की सर्वांचे कान टवकारले जात. मुले
पूर्ण लक्ष देऊन ऐकत असत. आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्व कविता पाठ असल्या पाहिजेत
असा त्यांचा आग्रह असायचा. एक दिवस असेच वर्गात मोठ्या आवाजात सामुहिक कविता
म्हणण्याचा कार्यक्रम चालत असे. प्रत्येक कवितेला चाल लावली जायची. सुरुवातीला
स्वत: दोन ओळी म्हणायचे आणि नंतर आम्हाला म्हणायला लावायचे. या सर्व शिकणे
शिकवण्यात आमची दुसरी संपली. मी पहिला आलो. खाडे गुरूजींच्या आवडत्या
विद्यार्थ्यांत समाविष्ट झालो.
आम्ही तिसरीत गेलो आणि आमच्या शाळेत आणखी एका
शिक्षकाची नियुक्ती झाली. पांगरीचे जानराव गुरूजी तिसरे शिक्षक म्हणून रूजू झाले.
त्यानंतर खाडे गुरूजीनी तिसरी आणि चवथीचा वर्ग स्वत:कडे घेतला. एकाच वर्गात तिसरी
आणि चवथीची मुले बसू लागलो. त्यातचे माझे अक्षर चांगले असल्याचे त्यांच्या लक्षात
आले. त्यांनी वर्गातील भिंतीवर लावायचे तक्ते बोरूने मला लिहायला लावले. बोरू तयार
करण्यासाठी लागणारा बांबू ते रामलिंग (बालाघाटच्या डोंगरातून) ते स्वत: आणला.
धारदार ब्लेडने ते लिलया बोरू बनवून देत असत. तक्ता तयार झाल्यानंतर स्केच पेनने
नक्षी काढायला लावली. या सर्व गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. आपण बनवलेले तक्ते
वर्गाच्या भिंतीवर लावले आहेत, हे पाहून मी नसलेली छाती फुगवून शाळेत वावरत होतो.
खाडे गुरूजींची भिती मनातून गेली होती.
गुरूजींच्या मारकुट्या स्वभावावर त्यांचे शिकवणे भारी पडले होते. चवथीच्या वर्गाला
ते शिकवत असताना आमचे कान त्यांच्या शिकवण्याकडे असायचे. एक दिवस असेच ते चवथीच्या
वर्गाला वणव्याशी संबंधीत धडा शिकवत होते. माझे कान त्यांच्या शिकवण्याकडे लागलेले
होते. वणव्याचे वर्णन ऐकून तो कसा असतो, हे पाहण्याची इच्छा मनात निर्माण झाली.
आता वणवा कोठे आणि कसा पाहायला मिळणार याचा विचार मनात सुरू झाला. आकाशाला भिडणाऱ्या
ज्वाळा. त्या आगीमुळे उडणारे कीटक. त्यांना खाण्यासाठी आगीवरून फेऱ्या मारणारे
पक्षी. हे सर्व वर्णन ऐकून वणवा आपण पाहायलाच पाहिजे असे मनात सारखे वाटू लागले.
आठ दिवस याच विचारात होतो. जानेवारी महिना सुरू
होता. गवताला कुसळे आल्याने बरेच दिवस जनावरे माळाच्या पायथ्याशी गवत खात नव्हती.
गवत गुडघाभर उंचीचे होते. ते गवत पाहून, आपण हे पेटवले तर आपणास वणव्याची अनुभुती
मिळेल, असा विचार अस्मादिकाच्या मनात आला. (त्या वेळेपासून स्वत: प्रयोग करून
पाहण्याची आवड माझ्या मनात होती.) आठवडाभर वणव्याचेच विचार सतत मनात होते. घरातून
कोणाचे लक्ष नाही, असे पाहून गुपचूप काडीपेटी खिशात ठेवली. शाळेत गेलो. मधली
सुट्टी कधी होते आणि वणवा कधी पेटवतो हा एकच विचार मनात होता. मन बेचैन होते. त्या
दिवशी शिकवताना खाडे गुरूजीनी ‘लक्ष कोठे आहे’ असे विचारले. पण पूर्वीच्या
पुण्याईवर मोठे बोलणे पडले नाही. असाच पहिला भाग संपला. मधली सुट्टी झाली. जानराव
गुरूजी आणि खाडे गुरूजी मधल्या सुट्टीत त्यांच्या घरी जेवायला जात असत. ते दोघे दहा
वाजता घरी गेले. काशिद गुरूजी त्या दिवशी आलेले नव्हते. माळाच्या पायथ्याचे गवत
वाळलेले होते. ते गवत पेटवले की दुरून वणवा अनुभवता येणार होता. इतर मुलांबरोबर
पटकन जेवण आटोपले. बाकीची मुले खेळू लागली. मी पोट दुखण्याचा बहाणा करून खेळायला
जाणे टाळले. सर्व मुले खेळण्यात दंग आहेत, हे पाहून हळूच माळाच्या पायथ्याला गेलो.
खाली बसून काडी पेटवली. काडीपेटी तिथेच टाकली आणि गुपचूप परत आलो. आपल्याला कोणी
पाहात नाही ना, याची खातरजमा करत परत आलो. दिपमाळेच्या आडून पेटणारे गवत पाहू
लागलो. तेवढ्या वेळात गवत चांगलेच पेटले. ताड ताड असा आवाज होऊ लागला. खेळण्यात
दंग असणाऱ्या मुलांचे लक्ष आगीकडे गेले. ‘आग… आग…’ अशी ती ओरडू लागली. गुरूजींनी
वर्णन केल्याप्रमाणे कीडे पकडण्यासाठी काळे पक्षी येऊन त्यांना भक्ष बनवू लागले.
काही थोराड मुले आग विझवण्यासाठी उन्हाळीची झाडे उपटून प्रयत्न करू लागली. मात्र
त्याच वेळी वारा जोरात आला आणि आग वेगाने पसरली. या आगीमध्ये शंभर-दिडशे एकराच्या
परिसरातील गवत जळून खाक झाले.
खाडे गुरूजींचा गावाकडून यायचा रस्ता नेमका तोच
होता. ते शाळेकडे यायला निघाले आणि त्यांना हा धुराचा लोट दिसला. त्यांनी आपली चालण्याची
गती वाढवली. शेतात काम करणाऱ्या लोकांना सोबतीला घेऊन आग विझवली. मात्र अर्ध्या
पाऊण तासात शेकडो एकर परिसरातील गवत जळून खाक झाले होते. आग विझवून घामेघुम झालेले
गुरूजी अडिचच्या दरम्यान शाळेत आले. येताना त्यांच्या अनुभवी डोळ्यांनी आग
शाळेजवळच लागली आणि पसरली, हे टिपले होते. शाळेत येताच सर्वांना त्यांनी समोरच्या
पटांगणात उभा केले. आग कशी लागली, याची प्राथमिक चौकशी सुरू झाली. बहुतांश मुलांनी
आम्ही खेळत होतो, हे उत्तर दिले. मग उलटसुलट अनेक प्रश्नांची सरबत्ती झाली. कोण
इकडे आले होते का? कोणाला पाहिले का? अशा सर्व प्रश्नांची नकारार्थी उत्तरे
मिळाल्यावर प्रत्येकाला तू कोठे होता? असे विचारायला सुरुवात केली.
बहुतांश मुले खेळत होती. काही विद्यार्थी घरी
किंवा शेतात जेवायला गेले होते. कोणाकडूनच उत्तर मिळत नव्हते. गुरूजी अगोदरच
लालेलाल झालेले होते. मग खेळायला कोण कोण नव्हते? असे विचारले. तोपर्यंत आपण पकडले
जाणार ही भिती माझ्या मनात दाटू लागली होती. गुरूजी माझ्याजवळ आले आणि मी तिथेच
होतो आणि खेळायला नव्हतो, हे त्यांच्या कानावर पडले. माझे पूर्व कर्तृत्व विसरून
गुरूजींनी खण्णकन गालावर थप्पड मारली. पहिल्याच थप्पडीत डोळ्यासमोर काजवे चमकले.
‘तू काय करत होतास?’ प्रश्न आणि छडी असा दुहेरी मारा सुरू झाला. या दुहेरी
माऱ्यापुढे मी जास्तवेळ तग धरू शकलो नाही.
मी आग लावल्याचे मान्य केले, तरी गुरूजींच्या
हातातील छडी काही थांबत नव्हती. ओरडले तर आणखी जोरात फटका मिळायचा. ‘तोंड दाबून
बुक्क्याचा मार’ अनुभवत होतो. माझे वय तेव्हा आठ वर्षे होते. प्रकृती तोळामासा.
मार खाऊन माझी अवस्था अगदीच केविलवाणी झाली असावी किंवा मारून गुरूजींचा हात दुखू
लागला असावा, त्यांनी मारणे थांबवून मला उभा केले. शांतपणे मला विचारले, ‘आग का
लावली?’ मी प्रामाणिकपणे स्फुंदत-स्फुंदत उत्तर दिले, ‘मला वणवा बघायचा होता.’
उत्तर ऐकताच पुन्हा चार पाच छड्यांचा प्रसाद मिळाला. शाळेत सर्व विद्यार्थ्यांसमोर
त्या दिवशी आयुष्यातील पहिला मार मिळाला. जणूकाही पूर्वी कधीच मार न खाल्ल्याचा
‘बॅकलॉग’ मी भरून काढला. तोपर्यंत साडेतीन वाजत आलेले होते. वर्गात सर्व मुलांना
बसवले.
खाडे गुरूजी पूर्ण बेचैन होते. वर्गात शिकवायला त्यांचे मन लागत नसावे. त्यांनी अस्वस्थपणे त्या आगीमुळे काय, काय नुकसान झाले याची माहिती सांगायला सुरुवात केली. त्यात पाच कधी वाजले ते कळाले नाही. शाळा सुटली. पाठीवरील मार बसलेल्या भागाची लाहीलाही होत होती. मात्र कोणाला सांगता येत नव्हते. वर्गातील मुलांना तर सारेच माहीत होते. घरात आपण काहीच बोलायचे नाही असे ठरवले. त्या दिवशी शाळेतून पहिल्यांदाच असा मार खाऊन घरी आलो. आता ही बातमी वडिलांना समजली, तर पुन्हा मार मिळणार या भितीने घरी येताच हात पाय धूवून आतल्या खोलीत अभ्यास करत बसलो. गावभर या आगीची आणि ती मी लावल्याची चर्चा सुरू होती. वडिलांना गावात येताच, ही बातमी समजली. ते बाहेरून तापूनच घरी आले. माळाच्या पायथ्याचा वणवा दुपारीच विझला होता, पण आमच्या घरात वणवा पेटणार होता. त्यांनी घरात पाऊल टाकताच, ‘मी कोठे आहे’ याची चौकशी केली. अभ्यास करत होतो, तेथे येऊन मला बाहेर आणले आणि मार-मार मारले. राग कमी झाल्यावर मला सोडले. मात्र खाडे गुरूजींनी जेवढे त्या आगीमुळे झालेल्या नुकसानीचे वर्णन केले होते, त्यापेक्षा जास्त वर्णन केले. असाच तो दिवस मी केलेल्या प्रयोगाचे दुष्परिणाम ऐकण्यात गेला. वडिलांनी मला मारल्यानंतर माझ्या त्या दिवशीच्या प्रतापाची माहिती आईला मिळाली. आईने आत येऊन शर्ट काढून पाहिले तर अंगावर काळे-निळे वळ उठले होते. आईचेच मन ते. ती त्यावर तेल लावू लागली तर वडील तिच्यावर ओरडले, ‘त्याला तेल लावतेस, त्याने मारलेल्या जीवांचे काय?’ तिच्याकडे आणि माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते. तशीच तळमळत रात्र काढली. खूप दुखत होते, पण काहीच बोलू शकत नव्हतो. माझ्या हातून अक्षम्य चूक झाली होती.
तळमळत अख्खी रात्र सरली. कालौघात पाठीवरील वळ
नाहीसे झाले. मात्र खाडे गुरूजींच्या त्या मारामुळे आणि त्यानंतर वडिलांनी
दिलेल्या प्रसादामुळे पर्यावरण, निसर्गातील प्रत्येक घटक किती महत्त्वाचे आहेत, ते
मनावर कोरले गेले. निसर्गातील इतर घटक नसतील तर माणूसही राहणार नाही, याची मनाला
खात्री पटली. त्यावेळी फार काही कळले नव्हते. मात्र पुढे जसजसे वय वाढत गेले, वाचन
वाढले तसे पर्यावरणाचे, निसर्गाचे महत्त्व पटत गेले. गुरूजीनी सर्वांसमोर
मारल्यामुळे अनेक दिवस खाडे गुरूजींबद्दल मनात राग होता. मात्र पर्यावरणाचे
महत्त्व जसजसे पटत गेले, तसतसे त्यांची कृती किती महत्त्वाची होती आणि मी किती
विध्वंसक प्रयोग केला होता हे लक्षात येऊ लागले. खाडे गुरूजींचा तो मार वळाबरोबर
वळण लावणारा होता. विद्यार्थ्यांना वळण लावणे हे शिक्षकांचे कार्यच. हे पुढे पटत
गेले. त्यांच्याबद्दलचा आदर वाढत राहिला. जागतिक तापमान वाढीच्या चर्चा चाललेल्या
असताना तर त्यांच्या कृतीचे महत्त्व आणखी ठळकपणे समोर आले. म्हणूनच आजच्या शिक्षक
दिनाच्या निमित्ताने त्यांचे स्मरण! माझ्या निसर्गप्रेमाची सुरुवात खाडे गुरूजींच्या
मारातून झाली हे मनाला पटत गेले. आज विद्यार्थ्यांना मारायचे नाही, असा नियम आहे.
मला मात्र तो तितकासा पटत नाही.
खाडे गुरूजी आज नाहीत. मात्र आजही मला त्यांची,
त्या दिवशीच्या माराची आणि त्यातून मिळालेल्या धड्याची आठवण येत राहते. त्यांनी
कदाचित त्या दिवशी मला शिक्षा दिली नसती, पर्यावरणाचे महत्त्व माझ्या मनावर
बिंबवले नसते, तर मी आजच्याइतका निसर्गप्रेमी झालो असतो का? असा नकळत प्रश्न मनात
येतो. त्यांनी दिलेल्या मारापेक्षा संस्कार मनात येतो आणि त्यांच्याप्रती
कृतज्ञतेची भावना जागी होते. आजच्या शिक्षक दिनानिमित्त समाज घडवणाऱ्या समस्त
शिक्षक वर्गास मन:पूर्वक शुभेच्छा आणि खाडे गुरूजीना विनम्र आदरांजली…
पर्यावरण प्रेमाचा धडा प्रत्येक विद्यार्थ्याला मिळायला हवा
उत्तर द्याहटवाखूपच छान सर
उत्तर द्याहटवाछडी वाजे छमछम, विद्या येई घमघम,हे आपल्या
उत्तर द्याहटवाजमान्यातील शिक्षक लोपले.
आयुष्यभरासाठी त्यांनी
दिलेली संस्कार शिदोरी घेऊनच आज आपण यशस्वी वाटचाल करतो आहे.
छान आठवण...
चाळीस एक वर्षापूर्वीच्या काळात कडकशिस्तीच्या मोतीराम दगडू खाडे गुरुजीसारख्या गुरुजनांच्या अध्यापनातून निष्पाप बालमने कशी घडत होती, त्यांच्यावर संस्कार कसे होत होते; यावर नेमका प्रकाश टाकला आहे. सुरुवातीला चिंचोली गावची शाळा म्हणजे तत्कालीन वड्या-वस्त्यांवरील शाळांचे स्वरूप, तेथील निसर्गरम्य परिसर, गुरुजन, शिकवत असताना मुले मोठी व्हावीत ही गुरुजणांची उदात्त भावना, त्यांचे शिकविणें आणि मुलांचे शिकणे यातून शिक्षक-विद्यार्थ्यांमधील भावबंध ह्या सर्व गोष्टी मनाला उभारी देतात.
उत्तर द्याहटवाशिक्षकाच्या शिकवण्याच्या प्रभावामुळे लेखकाची वणवा बघण्याची आस, त्यासाठी प्रत्यक्ष त्याने पेटविलेला वणवा, त्यातून निर्माण झालेले दुष्परिणाम, लेखकाला यासाठी खावा लागलेला मार ह्या सर्व घटना मनाला यातना देत असल्या तरी त्यापुढे जाऊन खाडे गुरुजींच्या उदात्त व्यक्तित्त्वाची उंची लेखकाने अधोरेखित केली आहे. ती आजच्या शिक्षकाने ताडून पहावी अशी आहे.
Nice
उत्तर द्याहटवाKhup Chan sir 🌹
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती आहे
उत्तर द्याहटवानर्म विनोदी आपले लिखाण पण नेमका विषय मांडण्याची आपली हातोटी, त्यामुळे लेखातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.
उत्तर द्याहटवाखूप छान सर.
उत्तर द्याहटवा������
मला अभिमान वाटतो आपला. कारण आपण आजही त्यांना विसरला नाहीत.��
आपण गावाकडे आलात तर अवश्य भेटू सर. आपले गुरू हे माझे आजोबा होते.
छान
उत्तर द्याहटवाNo words sir .. excellent
उत्तर द्याहटवासर, पर्यावरणाविषयी सर्वांनाच माहिती असायला हवी. आपल्या लेखनातून पर्यावरणाचे महत्व सुद्धा चांगल्या प्रकारे
उत्तर द्याहटवामिळाले. धन्यवाद सर ,पुढील लेखनासाठी शुभेच्छा
Amhala amche sagale thode kadak shistiche teachers athavle , sir teachers astat mhnun baryach gishtincha abhyas ani mahtv kalate,,,, great writting sir..
उत्तर द्याहटवाअविस्मरणीय flashback
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर लेख आहे...
उत्तर द्याहटवाखूप आदरपूर्वक खाडे गुरुजीबद्दल आपण व्यक्त झाला आहात.निसर्गाच्या सानिध्यात आपण सध्या असता त्याचे गमक अशा शिक्षकांमुळे आहे हे कळते.नेहमीप्रमाणे लेख मस्त झालाय.
उत्तर द्याहटवाडिकमल शब्दाने भुतकाळात गेलो. आजोळी अंबाबाई मंदिरा शेजारी होती.
उत्तर द्याहटवा