शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

राजे…

 ‘इतिहासाचे पान उलटूनी, चरित्र त्यांचे पहा जरा, त्यांच्या सम आपण व्हावे हाच सापडे बोध खरा’ कुसुमाग्रजांच्या या ओळीतून महापुरूषांच्या चरित्र वाचनाचे सार सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि कार्याचे गारूड तर प्रत्येकाच्या मनावर आहे. माझे कळते वय सुरू झाले ते बार्शीच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने बसवलेल्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासोबत. पुढे शिवाजी विद्यापीठातील छत्रपतींचा अश्वारूढ भव्य पुतळा प्रेरणेचे स्थान बनून राहिला. छत्रपतींच्या छत्रछायेखाली वावरताना, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन मला काय सांगते, हे मांडण्याचा केलेला प्रयत्न....

या मजकूराचा व्हिडिओ https://youtu.be/eXwdHOE5MJU येथे पाहू शकता...
_________________________________________________________
छत्रपती शिवाजी महाराज…
तुमचा पराक्रम… आम्ही शिकलो,
चवथीच्या पुस्तकात आणि
नंतरही…
त्यातून एवढेच समजले…
खूप मोठा पराक्रम केला तुम्ही…
अफझलखानाचा वध…
शायिस्तेखानाची फजिती…
अनेक गडकोटांची निर्मिती आणि ते जिंकणे
स्वराज्याची निर्मिती केली तुम्ही….
आणि…
अन्याय, अत्याचार थांबवले तुम्ही…
हा इतिहास ऐकताना, शिकताना…
अंगावर आमच्या रोमांच उभे राहात
साक्षात तुम्ही… अफझलखानाचा…
कोथळा बाहेर काढताना दिसायचे…
शायिस्तेखानाच्या बोटाऐवजी मानेवर
वार बसायला पाहिजे होता…
असेच वाटत राहायचे…
तुमच्या पराक्रमाचे गारूड
आमच्या मनावर असायचे…
तुमचा धडा शिकलेल्या दिवशी…
आम्ही असायचो तुमच्याच भुमीकेत…
हाताला टॉवेल गुंडाळलेली ढाल घेऊन…
काठीची तलवार असायचो फिरवत…
समोर
शत्रू नसतानाही…

पुढे…
तुमची ऐकून ओळख झाली…
गोब्राह्मणप्रतिपालक,
हिंदवी स्वराज्य संस्थापक,
मराठा राज्य निर्माते,
आणि बरेच काही…
हे ऐकल्यावर…
इतरांविरूद्ध मनात राग यायचा
मी, आम्ही आणि आमचे
हाच विचार मनात असायचा…
 

राजे…
तसे तर, आमचे जीवनच व्यापलेय तुम्ही…
आमचा प्राण बनलात…
कोणी ‘शिवाजी महाराज की’… म्हणताच
‘जय’ आपोआप येते मुखात…
तरीही
खरंच सांगतो, राजे…
तुम्ही कळू लागलात… नंतर
जीवनाची लढाई लढताना…
छोट्या-छोट्या अडचणींना भिडताना…
निराश मनाने तुमच्या पुतळ्याकडे
टक लावून पाहात बसलो असताना…
तेव्हा समोर यायचा…
आम्ही शिकलेलो तुमचा इतिहास…
आणि
छोटी व्हायची समोरची अडचण…
जगण्याची मिळायची नवी उमेद…

राजे,
तसे तर, तुम्हीही…
हजारो सरदारपुत्रांनी जन्म घ्यावा…
तसे जन्मलेले…
पण तुम्ही वेगळे ठरलात…
असामान्य बनलात…
छत्रपती झालात…
स्वराज्य संस्थापक ठरलात…
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटना येते
नजरेसमोर…
अन्… काहीतरी बोध देते…
तुमचा पराक्रम तर थोरच…
तुमच्याप्रमाणे आज आम्हाला…
तलवार घेऊन कोणाशी लढायचे नाही…
तरीही तुमचे आयुष्य खूप काही शिकवणारे
आणि प्रेरणादायी…
चांगला माणूस बनवणारे…
जगण्याची उमेद देणारे…

आठवते… अवघ्या पंधराव्या वर्षी,
तुम्ही केलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा…
आणि… आपण काहीतरी बनले पाहिजे…
असे मन सांगू लागते…


स्वराज्य स्थापनेसाठी आपण
प्रथम सवंगडी गोळा केले…
तेच मावळे, सैनिक बनले…
धर्म, जात, पंथ विसरून लढणारे…
ते मावळे… नजरेसमोर येतात आणि
सर्वधर्मसमभाव शिकवत राहतात…

कानद खोऱ्यातील अवघड तोरण्यावर
स्वराज्याचे तोरण बांधलेला तो प्रसंग…
डोळ्यांसमोर येतो…
आणि सांगू लागतो,
चल उठ, कामाला लाग…
अवघड ते पहिले कर… सोपं सहज करशील’…

किल्ले बांधत आणि जिंकत
स्वराज्याचा विस्तार सुरू असतानाच…
अफझलखानाचे संकट आले…
तेथे तुम्ही… युक्तीने लढलात…
कमीपणा घेत, मानाचे आमिष दाखवले…
त्याला ‘शिवाजी झुकला’, वाटावे…
इतके तुम्ही झुकलात…
तरीही त्याला होता दगा करायचा…
तुम्ही त्याचा डाव ओळखून हल्ला चढवला…
अफजलखान संपवला…
हे आठवताना…
समोरच्याला कमी न लेखता,
पूर्ण अभ्यासानंतर… प्रयोग करायला शिकलो…


त्याच अफजलखानाची कबर बांधून
दिवाबत्तीची सोय केलीत…
मृत्यूबरोबर वैर संपव…
मृत्यूवर टपून बसलेल्या शत्रूचाही
सन्मान कर याचा वस्तुपाठ दिलात तुम्ही…


पन्हाळगडावरून सुटका…
सिद्दी जौहरच्या वेढा भेदला तुम्ही…
तोही शक्तीपेक्षा युक्तीने…
आठवतो आम्ही आणि
अंगचे बळ न दाखवता
यशस्वी व्हायला शिकतो मी…


आदिलशाही नरमली पण…
दिल्लीचा शहेनशहा पिसाळला…
त्याने पाठवले चक्क मामाला…
तुम्ही मात्र मामाचाच ‘मामा’ केला…
शायिस्तेखानाची बोटे कापलीत…
कात्रजचा घाट दाखवून…
इतकी दहशत निर्माण केली…
की शायिस्तेखान पळाला…
अचूक वेळ निवडून…
कृती करायची शिकवण तुम्ही दिलीत…

नंतर… आले…
मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान…
बलाढ्य शत्रू…
स्वराज्याचा घास घ्यायला टपलेला…
पण… मारता मारता मरून न जाता…
तुम्ही माघार घेतलीत…
पण… पुन्हा भरारी घेण्यासाठी…
दिला चार लक्ष होनांचा मुलूख आणि तेवीस किल्ले…
औरंगजेबासह सर्वांना वाटले…
स्वराज्य संपले…
यातून शिकतो आम्ही…
अपयशात जळून न जाता… पुन्हा उठायला…
रडायला नाही… तर परिस्थितीशी लढायला…
आयुष्यातील अपयश पचवायला…
अन नव्या उमेदीने ध्येयपूर्तीसाठी पळायला…

आग्र्याची कैद…
आणि कैदेतून सुटका…
‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’चे, संयमाचे
धीरोदात्तपणाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण…
पण…
मथुरेत शंभूबाळाला सोडून येताना…
तुमच्यातील पित्याची अस्वस्थता दिसते…
अन तेव्हा कळते…
तुम्ही केवळ शंभूबाळाचे आबासाहेब नव्हता…
तर संपूर्ण रयतेचे पालक होता…
हा प्रसंग आठवतो… आणि…
आपला स्वार्थ न पाहता…
सहकाऱ्यांचे दायित्व नकळत घेतो…

आपल्या जिवंत पुत्राच्या दशक्रिया विधीवेळीचे…
तुमच्या डोळ्यातील भाव येतात…
माझ्याही नजरेसमोर…
आणि…
संकट कितीही गहिरे असले तरी…
अविचल राहून उद्दिष्ट साध्य करायचा
बोध देता तुम्ही…


गड आला पण सिंह गेला…
रायबाचे लग्न सोडून
तानाजी गेला… कोंढाणा जिंकायला…
जिंकलाही… अन्
जिंकता जिंकता वीरमरण पत्करले…
आपण… रायबाचे पालकत्व घेतले…
हे आठवताना…
सहाय्याला येणाऱ्याच्या ऋणात राहायला
शिकवता तुम्ही…


राज्याभिषेक झाला…
आपण सार्वभौम झालात आणि….
गुरू, मार्गदर्शक, माता, तुमचे सर्वस्व…
माँसाहेबांचे छत्र हरपले…
हे… आभाळाएवढे दु:ख विसरून
आपण दक्षिण दिग्विजय मिळवला…
हे आठवताना…
दु:ख कुरवाळत न बसता…
कर्तव्यपूर्ती महत्त्वाची…
मिळतो बोध मला.

गडकोटांची निर्मिती…
विजयदुर्ग… सिंधुदुर्ग… जलदुर्ग…
गनिमी कावा… अन्… घडवलेला छावा…
तुमची अजोड रणनिती शिकवते…
म्हणूनच ‘मोसाद’ही आपल्या हेरांना…
तुमचे लढणे अभ्यासायला सांगते


बेलवडीच्या मल्लाबाई देसाईंना…
गढी परत करून दिलेला बहिणीचा मान…
प्रधानगड जिंकल्यावर…
शत्रू किल्लेदार केशरीसिंगवर केलेले… अंत्यसंस्कार…
स्वत: मेण्यातून उतरून…
त्याच्या आईला दिलेला मान…
आठवताना… स्त्रियांना सन्मानाने
वागवण्याचे संस्कार शिकतो मी…


तुमच्या आज्ञापत्रातील मजकूर…
निसर्गाचे अगाध ज्ञान आणि भान दर्शवणारा…
गडकोट बांधताना वापरलेले विज्ञान…
आणि तंत्रज्ञान…
‘गुगलगुरू’च्या युगात आम्हाला न उमजणारे
कसे आत्मसात केले तुम्ही, हे कोडे पडते…
अन् नेहमी शिकत राहायला ‘शिकतो’ मी…

गडकोट कोठे, कसे बांधावेत सांगताना…
तुम्ही पाण्याचे महत्त्व लिहिता…
पाण्याचे टाके बनवताना निघणारी दगडे
बांधकामाला वापरायला सांगता…
आणि
निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचवत…
प्रगती करायला शिकवता…


प्रजेच्या सुखासाठी…
गडकोटावरून बियाणे पुरवता…
धान्य विकत घेण्याची व्यवस्था आणि
दुष्काळात सारा माफ करण्याची कृती…
‘बळीराजा सुखी तर राज्य सुखी’ हा मंत्र शिकवते

झाडांबद्दलचे तुमचे विचार…
ज्याने लावले, त्याचाच झाडावर आधिकार
हे सांगणारे आपण…
नकळत निसर्गस्नेहाचा पाठ शिकवता…
‘जाणता राजा’ कसा असावा
याचा वस्तुपाठ देता…
कोणताही विषय असो
विषयाच्या मुळाशी जायची
आज्ञाच… ही आज्ञापत्रे देतात…

आपली अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती…
हा तर लोकशाहीचा आविष्कार…
हे आठवते… आणि…
सामुहिक नेतृत्वाची शिकवण मिळते…
मलाच सारे कळते…
मी कशाला कोणाला विचारू…
हा अहंभाव जवळही येत नाही…
‘ग’ची बाधा होत नाही…


राजे…
तुमचे चौफेर ज्ञान,
विज्ञानाचे… वास्तवाचे… निसर्गाचे भान…
उत्कृष्ट व्यवस्थापन,
आदर्श नेतृत्व, तुमची शूरता आणि पराक्रम,
सत्य आणि समतेवर आधारीत प्रशासन...
बुद्धिचातुर्याने भरलेले तुमचे आयुष्य
आठवताना मन भरून जाते…
कोणताही प्रसंग घेतला… तर तो…
उत्कृष्टतेची आदर्शाची शिकवण देते…
तुमच्या वाटेवरून…
माणूस म्हणून चालण्याचे बळ देते…
संकटाला प्रसंगी भेदून किंवा
वळसा घालून जायची प्रेरणा देते…
आणि… म्हणूनच…
कोणी, कोठेही…
‘छत्रपती शिवाजी महाराज की’…
म्हटले की मुखातून…
आपोआप ‘जय’ निघते…
‘जय’ निघते…

मानाचा मुजरा




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा