बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

माझे स्वच्छतेचे प्रयोग


(कोल्हापूर सकाळनं मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या दिवाळी अंकातही लिखाणाची संधी दिली. 'प्रशासनातील अनुभव' या विषयावर लिहीण्यास सांगण्यात आले. प्रशासनातील कार्यालयीन अनुभवाऐवजी विद्यापीठातील स्वच्छतेबाबत एकूण आलेल्या अनुभवातील कांही अनूभव लिहिले. ते प्रसिद्ध झाले. तो लेख इथं आपल्यासाठी सकाळच्या सौजन्यानं प्रकाशित करत आहे. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
एका परदेशी विचारवंताने म्हटले आहे की 'मी जन्मलो तेंव्हा हे जग सुंदर होते. मला हे जग कुरूप करण्याचा कोणताही आधिकार नाही. मी मरेन तेंव्हाही हे जग सुंदर असेल. मात्र आयुष्य जगताना हे जग मी आणखी सुंदर करण्याचा प्रयत्न केला तर.......' किती सुंदर आहे हा विचार! खरंच आपल्याभोवतीचे हे जग सुंदर आहे,फक्त आपण डोळे उघडे ठेवून ते पहायला हवे. वेगवेगळी झाडे, विविध आकाराची पाने, विविध रंगाची फुले, त्यांचे वेगवेगळे सुगंध, विविध प्रकारची फळे, विविध पशू आणि पक्षी. किती विविधता आहे. यात मानव प्राणी हा आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर केंद्रस्थानी येवून बसला आहे. त्याने आपल्या भौतिक सुखासाठी निसर्गात हस्तक्षेप सुरू केले आणि कुरूपता यायला सुरूवात झाली. निसर्गाचे सौंदर्य बिघडवण्यात सर्वात मोठी भुमिका बजावते ती अस्वच्छता. सुंदरतेसाठी आवश्यक घटक कोणता असेल तर ती स्वच्छता.  स्वच्छता आणि सुंदरता यांचे एक अतूट नाते आहे.
स्वच्छतेचे संस्कार लहाणपणापासून व्हायला हवेत. हे संस्कार केवळ आई-वडील आणि शिक्षक यांच्यामार्फत होतात असे नाही. मुलांच्या संपर्कात येणाऱ्या थोरांकडून मुले कळत नकळत हे संस्कार घेत असतात. म्हणून वडिलधाऱ्यांची जबाबदारी वाढते. मला खरेतर शिक्षक व्हायचे होते, पण प्रशासनात यावे लागले. शिवाजी विद्यापीठाचा परिसर आम्ही विद्यार्थी असताना खुपचं सुंदर होता. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या काळी प्लॅस्टीकचे प्रस्थ एवढे वाढले नव्हते. आज सर्वात जास्त प्लॅस्टीकचा कचरा आढळतो. त्यात वाढदिवस, वेगवेगळे दिवस साजरे करण्यामध्ये आलेला उत्साह भर टाकतो. शिक्षण संस्थातील प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्याकडे पाहून विद्यार्थी खूप कांही शिकत असतात.
विद्यापीठात ज्या सुंदर उद्यानात आम्हीही विद्यार्थी असताना बागडलो, तो परिसर सुंदर रहावा यासाठी आम्ही विचार करत होतो. हा परिसर सुंदर दिसण्यासाठी तो स्वच्छ करणे आवश्यक आहे, हे लक्षात आले. बागेत वाढदिवस साजरा करून कागद, पुट्ठे, डिशेस तेथेच टाकून जाणाऱ्‍या विद्यार्थ्यांना सुरूवातीला प्रेमाने सांगीतले. ऐकत नाहीत हे पाहून बागेत असे कार्यक्रम करध्याला बंदी घातली. तरीही कोणी दिसले तर मी खूप रागवायचो, पण फारसा परिणाम होत नसे. अनेक दिवस हे चालू होते. शेवटी मीच बदलायचे ठरवले. मी त्या मुलांना रागावणे बंद केले. रस्त्याच्या कडेला अनेक कचराकुंंड‌्या ठेवल्या होत्या. शेवटी असा कचरा आपणच उचलून त्यात टाकायला सुरूवात केली. आपोआप मुलात बदल होताना दिसू लागला.
त्यानंतर सकाळच्या फिरण्याच्या वेळेत रस्त्यावर कोठेही कचरा विशेषतः प्लॅस्टिक दिसले की उचलून कचरा कुंडीत टाकायला सुरूवात केली. कांही ज्येष्ठ नारीकही हा उपक्रम राबवताना दिसू लागले. आपण हे काम करताना लाजायचे कारण उरले नाही. मात्र मला असा कचरा उचलताना पाहून अनेक विद्यार्थ्यानी कचरा रस्त्यावर, बागेत टाकणे बंद केले. त्याही पुढे एक विद्यार्थ्यांचा गट तयार झाला. तो गट मी ज्या रस्यावरून चालायचो त्या रस्त्यावर माझ्यापुढे फिरायचा आणि दिसेल तो कचरा उचलायचा. मला कचरा दिसणार नाही याची काळजी घ्यायचा. एकदा त्यांना थांबवून विचारले. तेंव्हा त्यांनी सांगीतलं, "सर, कचरा मुलं, म्हणजे आम्ही करतो आणि तुम्ही तो उचलता. आम्हाला बरं वाटत नाही. आम्ही जोपर्यंत विद्यार्थी म्हणून आम्ही या परिसरात आहोत तोपर्यंत आमचा हा उपक्रम विद्यापीठात चालेल. नंतर आम्ही कोठेही राहू तेथे घाण असणार नाही याची काळजी घेवू." त्यानंतरही अनेक दिवस हा त्यांचा उपक्रम सुरू होता. मात्र हे त्या मुलापासून पुढे वारसा रूपात आले असणार कारण आता क्वचितच मुलांकडून रस्यावर कचरा पडलेला दिसतो. कचराकुंडीचा वापर विद्यार्थी निश्चितच करतात म्हणूनच विद्यापीठ परिसर हा स्वच्छ आणि सुंदर आहे. मुलांच्यामध्ये ही भावना निर्माण होणे ही आशादायी बाब होती. प्रशासनात अभिनव उपक्रम राबवताना विद्यार्थ्यांची साथ अत्यंत महत्वाची आहे.
नंतर २००९-१० मध्ये विद्यापीठात बऱ्याच घडामोडी घडल्या. मी अन्य विद्यापीठात कांही वरिष्ठ पदासाठी अर्ज केले. त्यातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे मला मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. मुलाखतीच्या निमित्ताने प्रथमच त्या परिसरात मी जात होतो. अत्यंत भव्य अशी टेकडीवर विद्यापीठाची मुख्य इमारत उभी आहे. रस्त्यावरूनचं ती लक्ष वेधून घेते. मात्र इमारतीमध्ये प्रवेश करताच धक्का बसला. इमारतीच्या भिंती या पान आणि तंबाखूच्या रंगात न्हाउन निघाल्या होत्या. खालील बाजूला तिव्रता कमी करण्यासाठी लाल रंगाचा दोन - तीन फुटांचा पट्टा रंगवला होता. तरीही ती घाण लक्षात येत होती. माझी कुलसचिव पदासाठी मुलाखत झाली. मुलाखतीनंतर चर्चा करण्यासाठी म्हणण्यापेक्षा वेळ घालवण्यासाठी आस्थापनाचे उपकुलसचिव तामसेकर यांच्या कक्षात बसलो. तामसेकर सेवानिवृत्तीच्या जवळ पोहोचलेले शांत गृहस्थ. त्यांच्याशी गप्पा चालू असताना मी बोलून गेलो. "काय हो ही अवस्था. इतकी सुंदर इमारत आणि भिंती अशा रंगलेल्या. मला जर येथे कुलसचिव म्हणून काम करायची संधी मिळाली, तर प्रथम पान तंबाखू खाणे आणि थुंकण्यावर बंदी घालेन" योगायोगाने मुलाखतीदिवशीच निवड झाल्याचे मला कळले. नियुक्तीपत्रही मिळाले.
 अन्य कोणाशीही न् बोलता मी माझे मित्र अशोक सागर यांच्या गाडीत बसलो. माझ्या गाडीला पाठीमागे यायला सांगीतले. पार्कींगपासून तीनशे मीटरवर गेट आहे. त्या गेटवरील सुरक्षारक्षकानी कडक सॅल्यूट ठोकला. त्यांच्यातील कुजबूज स्पष्ट करत होती की माझ्या नियुक्तीची बातमी गेटपर्यंत पोहोचली. सागर सर म्हणाले, "एरवी गेटसुद्धा लवकर उघडत नाहीत आज बाप गाडीत आहे म्हटल्यावर कसा कडक सॅल्यूट ठोकतायत." इथेही बातम्या पटकन बाहेर पडतात, गोपनियतेचे चांगभल आहे हे जाणवल. पुढील कामासाठी एक महत्त्वाची टिप मिळाली होती.
 शिवाजी विद्यापीठात मूळ पदावर दोन वर्षाची रजा मंजूर झाली आणि २४ ऑष्ट, २०१० रोजी मी नांदेडला कुलसचिव पदावर हजर झालो. रुजू होतानाही मनातून त्या घाण भिंतीना स्वच्छ केले पाहीजे हा विचार कांही जात नव्हता. महाराष्ट्र शासनाने शासकीय कार्यालयात आणि सार्वजनीक ठिकाणीतंबाखू खाणे आणि थुंकणे यावर बंदी घालणारे शासन निर्णय काढले होते. विद्यापीठातील एकूण वातावरणाची माहिती मिळाली असल्याने ही योजना केवळ शासन निर्णय लागू करून यशस्वी होणार नव्हती.  हे कसे साध्य करायचे याचा विचार रूजू व्हायला जातानाच केला होता. विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक गणेश शिंदे यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यानी "अवघड आहे पण व्हायला पाहिजे" असे मत व्यक्त केले. मी माझी संकल्पना मांडली. या उपक्रमात विद्यार्थ्यांची मदत घ्यायचे ठरवले.
विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक किंवा अभ्यागत कोणिही तंबाखु पान खाताना किंवा खाऊन थुंकताना आढळल्यास पहिल्या वेळी रू. १०० तर दुसऱ्‍या वेळी रू २०० आणि तिसऱ्‍या वेळी आढळल्यास रू. ५०० इतका दंड आकारला जाईल असे परिपत्रक काढले. परिपत्रकाने थोडी जरब बसली. उघड बार भरण्याचा सार्वजनिक उपक्रम थांबला. गुपचूप कोपऱ्यात मळणी व्हायची. मात्र अपेक्षित परिणाम दिसून येत नव्हता. सुरूवातीला पूर्वीच्या सर्व घाण भिंती स्वच्छ करायला स्वच्छता निरीक्षकाना सांगीतले. सफाई कामगारांनी "ती घाण अनेक वर्षापासूनची असल्याने निघत नाही" असे सांगितले. मी स्वतः, स्वच्छता निरिक्षकासह काम सुरू असलेल्या काणाला भेट दिली. त्यांना स्वच्छ कस करायचे याच्या सूचना दिल्या. कुलसचिव खुर्चीतून न् बोलता प्रत्यक्ष जागेवर येतो म्टल्यावर मात्र घाण निघू लागली. भिंती स्वच्छ दिसू लागल्या. तरीही थुंकणे सुरूच होते. कमवा आणि शिका योजनेतील तीस विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना कार्यालयीन वेळेत त्यांच्या अभ्यासक्रमात बाधा येणार नाही या पद्धतीने डयुटी लावल्या. विविध ठिकाणी निरीक्षणासाठी बसवले. अनेक शिपाई आणि सुरक्षा रक्षक स्वताच तांबूल पान करत असल्याने त्यांचे सहकार्य घेण्यात अर्थ नव्हता. या विद्यार्थ्यांनी अशी व्यक्ती आढळल्यास प्रथम त्याना नियमाचा बोर्ड दाखवायचा. दंड भरायची निंती करायची. दंड भरला तर पावतीची एक प्रत घ्यायची आणि ती विद्यार्थी कल्याण मंडळात जमा करायची. कोणी ऐकत नसेल तर त्याना संचालक गणेश शिंदे सराकडे घेवून जायचे. यात कोणलाही सूट नाही हे सांगीतले.   
उपक्रमाला सुरूवात झाली आणि मुले चोख काम करू लागली. बघता बघता दंडाची रक्कम वाढू लागली आणि थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी होवू लागले. कांही कर्मचारी मात्र तरीही चूक करत. त्यावर उपाय म्हणून त्यांच्या शिक्षेत वाढ केली. केलेली घाण त्यानेच साफ करायची आणि दंडही भरायचा ही ती शिक्षा. यानंतर मात्र हे प्रमाण झपाट‌्याने घटत गेले. साधारणतः तीन महिन्याच्या कालावधीत भिंतीचे रंगकाम होणे जवळपास थांबले. मात्र तरीही आम्ही विद्यार्थ्यांचे पथक मोहिमेवर कायम ठेवले होते.
असेच एक दिवस विद्यार्थी काम करत होते. नांदेडजवळच्या गावातील एक सरपंच विद्यापीठात आले होते. त्यांच्या सुनबाईना दूर शिक्षण अंतर्गत प्रवेश घ्यायचा होता. त्यांनी सवयीने पान तंबाखूचा बार भरलेला होता. त्यांनी पिचकारी मारली आणि विद्यार्थ्यानाऱ्‍याच दिवसांनंतर शिकार मिळाली. विद्यार्थी त्यांच्याजवळ गेले आणि नम्रपणे त्यांना रू. १०० दंड म्हणून भरायची विनंती करू लागले. मात्र त्या सरपंच महोदयांनी विद्यार्थ्यांची विनंती साफ धुडकावून लावली. विद्यार्थी आग्रह धरत होते आणि सरपंच आग्रह मोडत होते. आवाज वाढला. सुरक्षा रक्षक तीथे गेला. त्याने सरपंचांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. मात्र सरपंच महाशय कांही ऐकायला तयार नव्हते. बोर्ड दाखवला. पण सरपंच कही ऐकायला तयार नव्हते. शेवटी सर्वजण विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक गणेश शिंदे यांचेकडे गेले. ते स्थानिक होते. सरपंचांना ओळखत होते. त्यांनी सरपंचांना "नियम आहे आणि दंड भरावा लागेल" असे सांगीतले. तरीही सरपंच ऐकायला तयार नव्हते. शेवटी विद्यार्थी, सुरक्षा रक्षक, सरपंच आणि गणेश शिंदे सर सर्वजण माझ्याकडे आले. येताना त्यांचे बोलणे सुरूचं होते. केबिनमध्ये त्याचा आवाज येत होता. कांहीतरी गडबड आहे याची जाणीव झाली.
सर्वजण आत आल्यावर बसायला सांगितले. तिथल्या प्रथेप्रमाणे शिपायाला पाणी द्यायला सांगीतले. पाणी द्यायच्या आतच सरपंच साहेबांनी थेट विषयाला हात घातला. "असला कसला नियम केलाय! स्वतंत्र भारतात, स्वतंत्र देशच्या नागरीकाला थुंकायची बंदी. निजामशाही लागू गेलीय का? म्हणं १०० रूपये दंड भरा. मी का भरू? आमचं विद्यापीठ आहे, मी थुंकणार!"
मी परत गणेश शिंदे सराकडे पाहिले. त्यांनी "त्यांना सर्व समजावून सांगीतले तरी दंड भरायला तयार नाहीत" असे सांगीतले. पुन्हा सरपंच सुरू झाले. "मुंबईला गेलतो. तिथं मला कुणी अडीवलं नाही. तिथं तर हाॅस्पिटलमधीबी मला कुणी अडिवलं नाही. अन् हिथं कुठला काढलाय नियम." बराच वेळ समजावयाचा प्रयत्न केला. पण सरपंच साहेब कांही ऐकायला तयार नव्हते. वेळ जसा जाईल तसा सरपंचांचा आवाज वाढत होता. त्यांना सोडून देणेपण शक्य नव्हते. त्यामुळे शिस्तीला बाधा पोहोचणार होती. सरपंच तर ऐकायला तयार नव्हते. मी पटकन एका विद्यार्थ्याला बोलावले. विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्‍याला बोलवायला सांगीतले. त्यावर सरपंच गुरगुरले "कुणाला बी बोलवा. मी दंड भरणार नाही. स्वतंत्र भारतात....." सुरूचं होते.
मीच शेवटी खिशातून १०० रूपये काढले. शिंदे सरांना म्हटले "सर, सरपंचसाहेबांचे नाव एका कागदावर लिहून द्या" यावर सरपंच साहेब म्हणाले "माझं नाव कशापायी?" मी म्हटलं "पावती करण्यासाठी." सरपंचांनी पुन्हा सुरूवात केली "मी पैसे देणार नाही, मग माझ्या नावावर पावती कशासाठी? मी पैसे भरणार नाही. पावती करणार नाही." त्यावर मी म्हटले "हे बघा, तुम्ही पैसे देणार नाही. कबूल. पैसे मी देतोय. पण पान तंबाखू ज्याने खाल्ली. जो थुंकला. त्याच्या नावावरच पावती होणार. आता विद्यापीठात थुंकलात तुम्ही. नियमानुसार पावती तुमच्या नावावर होणार." तेवढ‌्यात जनसंपर्क अधिकारी आले. त्यांना म्हटलं. तेही स्थानिक असल्याने सरपंचाना ओळखत होते. "या यांची ओळख असेलच. काय आहे, यांनी आपला तंबाखूचा नियम मोडला. मी पैसे भरून त्यांची पावती तयार करतोय. सगळा प्रकार सीसी टीव्हीत आपल्याकडे आहे. पावती झाली की यांची एक मस्त बातमी करा. सगळ‌्या पेपरमध्ये सरपंचांनी विद्यापीठात नियम मोडल्याबद्दल पावती केल्याची बातमी पहिल्या पानावर येईल असं बघा. सीसीटिव्ही फुटेज घ्या अन् चॅनेलवर पण झळकू द्या सरपंच साहेबांना." हे माझं बोलणं ऐकलं आणि सरपंच साहेब उठतच म्हणाले "बाप भेटला राव. भरतो मी पैसे. पण बातमीचं काय करू नका. उगच सगळीकडं बोंब हुईल. आयुष्यभर लक्षात राहचाल. थुंकाची बी पंचाईत हाय. चल रं पोरा कुठ पावती करायची दाखव."
प्रत्यक्षात सीसीटीव्हीच बसवलेले नव्हते. मात्र बातमीची मात्रा सरपंचांचा सर्व आवेश उतरावयाला उपयोगी ठरली. सरपंचांनी पावती तर केलीच पुन्हा वर दाखवायला आले आणि बातमी करू नका म्हणून विनंती करून गेले. या उपक्रमाचे पुढे सातत्याने पालन होत होते. अनेक जबाबदा व्यक्तींना हा दंड भरावा लागला. मात्र २०१२ चे व्यसनमुक्तीसाठीचे पारितोषिक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास मिळाले. ष्ट २०१२ मध्ये मी परत शिवाजी विद्यापीठातील मूळ पदावर रूजू झालो. नांदेड येथील कालखंडात स्वच्छतेच्या आणि परिसर सौंदर्यीकरणासाठीच्या संकल्पना विस्तारल्या होत्या.
शिवाजी विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची परिसरात शिबीरे आयोजित केली जात असत. या शिबीराच्या श्रमदानाचे नियोजन करायला आम्ही सुरूवात केली. रा.से. योजनेचे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यानी सक्रीय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सकाळच्या सत्रातील कामामध्ये रस्त्यालगतचे गवत आणि कचरा काढायला सुरूवात केली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या स्वयंसेवकाच्या सहकार्याने विद्यापीठाचे चित्रच बदलत होते. यात सर्वांचा सहभाग हवा असे वाटायचे. मात्र एवढी व्यापक मोहिम कशी राबवायची? हा प्रश्न होता. त्यावर्षीच्या गांधी जयंतीच्या दिवशी व्याख्यान होते. या व्याख्यानाला लोक उपस्थित कसे राहतील? असा प्रश्न होता.  यातून त्यादिवशी स्वच्छता मोहिम सर्वांच्या श्रमदानाने राबवावी अशी संकल्पना आली आणि ते निश्चित झाले. सर्व प्रशासकिय कर्मचाऱ्याना ठिकाणे वाटून देण्यात आली. विभागातील विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी विभागाची इमारत आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा असे ठरले. नियोजनाप्रमाणे आस्थापना विभागामार्फत परिपत्रक काढण्यात आले. मी नेहमी राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमदानाच्या वेळेत विद्यार्थ्याना भेटून सूचना देत होतो. हे सर्व कर्मचाऱ्यांना माहित होते. दोन क्टोबरचा कार्यक्रमदेखील मीच आयोजित केला, असे समजून अनेकजणांनी मला आशिर्वाद दिले. मात्र अखेर सर्वांनी या उपक्रमात मोठ‌्या प्रमाणात योगदान दिले आणि हा उपक्रम यशस्वी झाला. त्यानंतर केंद्रात सत्तांतर झाले. देशाच्या नव्या नेतृत्वाने महात्माजींचा स्वच्छतेचा आदेश क्टोबर, २०१४ पासून अंमलात आणायचा आदेश दिला आणि मला खूप आनंद झाला. जो उपक्रम विद्यापीठाने वर्षभरापूर्वी सुरू केला होता, तसाच उपक्रम देशाच्या पंतप्रधानांनी राबवायला सुरूवात केली. मला मिळणारे आशिर्वाद यामुळे थांबले.
हा उपक्रम विद्यापीठात आता सवयीचा भाग बनला आहे. विद्यापीठात फिरायला येणारे अनेकजण प्लॅस्टिक कचरा वेचून कचराकुंडीत टाकण्याचे कार्य करतात. नियमित फिरायला येणाऱ्‍यापैकी एकजण तर लोखंडी गजाला वाकवून त्या गजाला कचऱ्याला हातही न लावता प्लॅस्टिक गोळा करून कचराकुंडीत टाकतात. यातचं एक चाॅॅलेटवाले आजोबा भेटले. ते विद्यापीठात दररोज फिरायला येतात. येताना खिशात चॉकलेट आणायचे. ती भेटेल त्याला वाटतात. अनेकजण ती खायचे आणि त्याभोवतीचे प्लॅस्टिक रस्त्यावर टाकायचे. सुरूवातीला त्यांनी आम्हाला पण चाॅकलेट्स दिली होती. आम्ही कचरा खिशातून घरी आणला होता. विद्यापीठाच्या स्वच्छ परिसरात हा कचरा उठून दिसू लागला. त्यावर खूप चर्चा झाली. शेवटी सुरक्षा रक्षकांना सूचना देण्यात आल्या की त्यांना चकलेट वाटायला मनाई करावी. यावर त्यांनी 'कचरा उचलायला विद्यार्थी भवनची मुले नेमावीत. मी त्यांचा खर्च देईन,' असे सुचवले. प्रशासनाने या गोष्टीला नकार दिला. त्याना चाॅकलेटऐवजी काजू, बदाम वाटा असे सुचवले. रॅपर नसलेल्या गोळ‌्या वाटा म्हणूनही सुचवले. पण चाॅकलेटवाल्या आजोबाला चाॅकलेट वाटल्यावर म्हणे लोकांच्या चेहऱ्‍यावरचा आनंद पाहायचा असायचा. त्यामुळे आपण चाॅकलेट वाटणारच असा त्यांचा हट्ट होता. सुरक्षा रक्षकामार्फत शेवटी त्यांची गाडी आत घेणे बंद केले. मात्र हे साहेब गाडी बाहेर लावून पॅंटच्या खिशात चाॅकलेट आणून वाटत. शेवटी त्यांच्या मागे रक्षक ठेवून प्रतिबंध करावा लागला.

माझी आणि या चाॅकलेटवाल्या बाबांची भेट होत नसे. ते लवकर म्हणजे सहाच्या आत विद्यापीठात असत. आम्ही मात्र साडेसात आठच्या दरम्यान जायचो. मध्यंतरी एक दिवस ते विद्यापीठात दिसले. मला तसे ते ओळखत नव्हते आणि नाहीत. माझ्यासह आमचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकरही होते. आम्ही त्यांच्या हालचालीवर नजर ठेवून होतो. त्यांनी भाषा भवनच्या कोपऱ्‍यावर बसलेल्या कांही मंडळींना चाॅकलेट दिली. मात्र हरी ओमचा गजर करत कलेट दिली आणि दिल्यांनतर चाॅकलेटची रॅपर डस्टबीनमध्ये टाकायची सूचना केली. मला धन्य वाटले. ज्या माणसाला लोकांना चाॅकलेट वाटूनच आनंद मिळवायचा होता, स्वच्छतेचे काही देणे घेणे नव्हते. तोच आजोबा आज घेतला वसा पाळत असताना स्वच्छतेचा संदेश देत होता. हा बदल खूप सकारात्मक आहे. 'देश बदल रहा है' ची साक्ष देत आहे.

१५ टिप्पण्या:

  1. Sir This is very very idealistic. Positive thinking definitely make very good change. This is very right beginning and of course all credit goes to you Sir

    उत्तर द्याहटवा
  2. वैज्ञानिक प्रयोग यशस्वी केल्याबद्दल मनापासून अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  3. दोन दिवस वक्तृत्व स्पर्धेत व्यस्त होतो, आज फोन घरी विसरलो, त्यामुळे प्रतिक्रियेसाठी उशीर झाला. I think Gandhi said "Cleanliness is next to Godliness ' so you have reached our university to the divine level. I have seen your devotion to Cleanliness with my eyes .. hearty Congratulations for your achievement in these difficult times. Really it's a great sacrifice that you chose to become the administrator rather than a teacher which was easy choice ... Your choice has borne these fruits ... I'm proud to be your friend

    उत्तर द्याहटवा
  4. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. नांदेड विद्यापीठातील यशाबद्दल विशेष अभिनंदन. कोणत्याही बदलास लोकांच पाठबळ लागतं हे निश्चित. माजी उपमुख्यमंत्री कै. आर.आर.पाटील (आबा) यांच्या दूरदृष्टीची या निमित्ताने आठवण झाली. आपले कार्य आणि मार्गदर्शन असेच सुरू राहो ही सदिच्छा.

    उत्तर द्याहटवा
  6. नांदेड विद्यापीठातील यशाबद्दल विशेष अभिनंदन. कोणत्याही बदलास लोकांच पाठबळ लागतं हे निश्चित. माजी उपमुख्यमंत्री कै. आर.आर.पाटील (आबा) यांच्या दूरदृष्टीची या निमित्ताने आठवण झाली. आपले कार्य आणि मार्गदर्शन असेच सुरू राहो ही सदिच्छा.

    उत्तर द्याहटवा
  7. नांदेड विद्यापीठातील वारिष्ट अधिकारी म्हणून व शिवाजी विद्यापीठातील वैयक्तिक पातळीवरील प्रयत्नाचे मनापासून स्वागत तथापि लेखाच्या शेवटी "देश बदल राहा है " हे विधान मोठे धाडसाचे वाटते कारण स्वच्छतेच्या बाबतीत माझा देश ज्या देशात विश्वस्तरीय महात्मा जन्मास आला त्यान्चा स्वच्छेतेचा संदेश जगाने स्वीकारला व त्यांचे देश स्वच्छतेच्या बाबतीत भारताच्या कित्येक वर्ष पुढे गेले मात्र आपण भारतीय अद्याप स्वच्छता कशास म्हणतात हेच समजू शकलो नाही.

    संत गाडगेबाबाना विसरून बाबारहीम सारखे बाबा भारतात श्रद्धास्थानी बसतात अश्या देशात स्वच्छतेसाठी आपल्या घरातील कचरा कुंड सकाळी सार्वजनिक कचराकुंडात जातो व शासकीय यंत्रणा शहरातील कचराकुंड शहराबाहेरील पर्यावरणपूरक ग्रामीण भागा जवळ स्वाहा करते.

    हातात झाडू धरून फोटो काढून देश स्वच्छेतेच्या दिशेने बदलणार नाही तर त्यासाठी ज्यांचा हातात अधीकार आहेत त्यांनी देश स्वच्छ राहण्याकरीता तातडीने खालील काही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे
    १) पान तंबाखुजन्य उत्पादनावर कायम स्वरूपी बंदी करावी.
    २) प्लास्टिक वर बंदी आणावी लागेल
    ३) कचरा रिसायकलिंग करणारे प्रोजेक्ट उभे करणे आवश्यक.
    ४) वेस्टवॉटर ट्रीटमेंट प्लांट सुरु करणे आवश्यक.

    अश्या प्राथमिक व्यवस्था भारतात सुरु होतील तेंव्हा "देश बदल राहा है " असं म्हणता येईल सध्या आपल्या देशात या पैकी कशाचीही साधी कल्पनाही मांडली जात नाही किंवा त्या संबंधी काहीही विचार कोणत्याही पातळीवर केले जातात असे दिसत नाही.

    "मी माझ्या पातळीवर काय करू शकलो ! तर बाजारामध्ये जाताना शक्यतो कापडी पिशव्या बरोबर घेऊन जातो घरात काही कारणाने आलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा पुन्हापुन्हा वापर करतो त्यामुळे महिन्यात किमान दहा प्लास्टिक पिशव्यांची तरी बचत होते .हा एक अतिशय छोटासा प्रयत्न आहे पण कुठूनतरी सुरुवात होणे आवश्यक आहे ."

    प्रिय मित्र डॉ. विलास शिंदे,
    जर आपणास कधी आपल्या विद्यापीठात स्वच्छते सबंधी काही करण्याची शक्ती प्रदान झाल्यास आपण विद्यापीठ उपहारगृहात कोणत्याही प्रकारे प्लास्टिक कचरा होईल अश्या वस्तूवर बंदी आणावी. तसेच विद्यापीठातील कचरा जाळून नष्ट करण्यास मनाई करावी व विद्यापीठातील कचऱ्याचे रिसायकलिंग विद्यापीठात होईल यासाठी प्रयत्न करावेत.

    आपल्या स्वच्छतेच्या प्रयोगास माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून शुभेच्छा. आपले कार्य असेच सुरु राहो हि सदिच्छा . धन्यवाद

    From-
    A.S. NALAVADE
    DY.REGISTRAR
    Spcial cell,
    ☎ (0231) 2609230 9226076541

    उत्तर द्याहटवा
  8. नांदेड विद्यापीठातील वारिष्ट अधिकारी म्हणून व शिवाजी विद्यापीठातील वैयक्तिक पातळीवरील प्रयत्नाचे मनापासून स्वागत तथापि लेखाच्या शेवटी "देश बदल राहा है " हे विधान मोठे धाडसाचे वाटते कारण स्वच्छतेच्या बाबतीत माझा देश ज्या देशात विश्वस्तरीय महात्मा जन्मास आला त्यान्चा स्वच्छेतेचा संदेश जगाने स्वीकारला व त्यांचे देश स्वच्छतेच्या बाबतीत भारताच्या कित्येक वर्ष पुढे गेले मात्र आपण भारतीय अद्याप स्वच्छता कशास म्हणतात हेच समजू शकलो नाही.

    संत गाडगेबाबाना विसरून बाबारहीम सारखे बाबा भारतात श्रद्धास्थानी बसतात अश्या देशात स्वच्छतेसाठी आपल्या घरातील कचरा कुंड सकाळी सार्वजनिक कचराकुंडात जातो व शासकीय यंत्रणा शहरातील कचराकुंड शहराबाहेरील पर्यावरणपूरक ग्रामीण भागा जवळ स्वाहा करते.

    हातात झाडू धरून फोटो काढून देश स्वच्छेतेच्या दिशेने बदलणार नाही तर त्यासाठी ज्यांचा हातात अधीकार आहेत त्यांनी देश स्वच्छ राहण्याकरीता तातडीने खालील काही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे
    १) पान तंबाखुजन्य उत्पादनावर कायम स्वरूपी बंदी करावी.
    २) प्लास्टिक वर बंदी आणावी लागेल
    ३) कचरा रिसायकलिंग करणारे प्रोजेक्ट उभे करणे आवश्यक.
    ४) वेस्टवॉटर ट्रीटमेंट प्लांट सुरु करणे आवश्यक.

    अश्या प्राथमिक व्यवस्था भारतात सुरु होतील तेंव्हा "देश बदल राहा है " असं म्हणता येईल सध्या आपल्या देशात या पैकी कशाचीही साधी कल्पनाही मांडली जात नाही किंवा त्या संबंधी काहीही विचार कोणत्याही पातळीवर केले जातात असे दिसत नाही.

    "मी माझ्या पातळीवर काय करू शकलो ! तर बाजारामध्ये जाताना शक्यतो कापडी पिशव्या बरोबर घेऊन जातो घरात काही कारणाने आलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा पुन्हापुन्हा वापर करतो त्यामुळे महिन्यात किमान दहा प्लास्टिक पिशव्यांची तरी बचत होते .हा एक अतिशय छोटासा प्रयत्न आहे पण कुठूनतरी सुरुवात होणे आवश्यक आहे ."

    प्रिय मित्र डॉ. विलास शिंदे,
    जर आपणास कधी आपल्या विद्यापीठात स्वच्छते सबंधी काही करण्याची शक्ती प्रदान झाल्यास आपण विद्यापीठ उपहारगृहात कोणत्याही प्रकारे प्लास्टिक कचरा होईल अश्या वस्तूवर बंदी आणावी. तसेच विद्यापीठातील कचरा जाळून नष्ट करण्यास मनाई करावी व विद्यापीठातील कचऱ्याचे रिसायकलिंग विद्यापीठात होईल यासाठी प्रयत्न करावेत.

    आपल्या स्वच्छतेच्या प्रयोगास माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून शुभेच्छा. आपले कार्य असेच सुरु राहो हि सदिच्छा . धन्यवाद

    From-
    A.S. NALAVADE
    DY.REGISTRAR
    Spcial cell,
    ☎ (0231) 2609230 9226076541

    उत्तर द्याहटवा