सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

वर्तुळ

 (गार्डन्स क्लब, कोल्हापूर दरवर्षी पुष्प प्रदर्शन भरवते. त्यानिमित्त 'रोजेट' हा विशेषांक  प्रसिद्ध करण्यात येतो. यंदाच्या अंकात मला लिखाणाची संधी दिली. आयुष्यात झालेली पहिली फुलांची ओळख ही पारिजातक किंवा प्राजक्तांच्या फुलांची होती. माझ्या मुलीला योगायोगाने याचं फुलाची मी ओळख कशी आणि का करून दिली याबाबत मनात आलेले विचार यात मी मांडले. ते प्रसिद्ध झाले. तो लेख इथं आपल्यासाठी 'रोजेट' आणि गार्डन क्लब कोल्हापूरच्या  सौजन्यानं प्रकाशित करत आहे. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)

------------------------------------------------------------------------------------------------
बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी सलेले गाव, चिंचोली. आजही गुगल नकाशावर न दिसणारे. गावाच्या हद्दीत बालाघाट डोंगराचा भाग असलेल्या एक टेकडीच्या पायथ्याशी निळकंठेश्वराचे मंदिर. बार्शी-लातूर रस्त्यावर, बार्शीपासून वीस किलोमीटर अंतरावरचं. रस्ता ओलांडला की नीलकंठा नदी. ती फक्त डिसेंबरपर्यंत वाहायची. प्राथमिक शाळेत शिकत असताना गावातल्या सर्व लहान मुलांचा एक सामुहिक कार्यक्रम असायचा. श्रावणात आम्ही सर्व मुले लहान कळशी किंवा चरवी घेन पहाटेच बाहेर पडायचो. नदीत आंघोळ करायची. नदीच्या वरच्या पात्रात कळशी वाळूने स्वच्छ घासून पाण्याने भरून घ्यायची. मंदिराती पिंडीला जलाभिषेक घालायचा आणि बाहेर येवून मंदिराच्या आवारातील प्राजक्त आणि चाफ्याची झाडाखाली पडलेली फुले गोळा करून पिंडीवर वाहायची. ही आमची निसर्गाशी झालेली पहिली ओळख होती, असे आज जाणवते. नदीच्या वाहणाऱ्या पाण्यात स्वच्छंद डुंबताना पाण्याचा गारवा जाणवायचा नाही. नदीतल्या बारीक मातीमिश्रीत वाळूने कळशी घसताना पाण्यात कोणतेही रसायन मिसळले जात नव्हते. मंदिरातून बाहेर येणारे पाणी विविध झाडांच्या मुळाशी पोहोचत होते आणि झाडांची न ओरबडता खाली पडणारी फुले गोळा करताना फुलांचा गंध, रंग मनाला त्यांच्याबद्दलची ओढ वाढवत होता. आजही त्या वयातली प्राजक्तांच्या फुलांच्या बाबतीतली एक आठवण आहे.
   
         मला पारिजातक र्फ प्राजक्ताची फुले खूप आवडायची. श्रावणात सकाळी झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असायचा. पांढऱ्या पाकळ‌्या, लाल देठ, पाकळ‌्यांच्या मध्ये परागकणामुळे आलेला पिवळसर रंग आणि मंद सुवास. सगळंच नादावणारं असायचं. त्या काळी ते प्रसन्न वातावरण मी अनुभवायचो. ती फुलं आवडायची म्हणून एक दिवस रूमालात गोळा करून घरी घेन आलो. रूमाल ओला होता. घरी आल्यावर रूमाल उघडला तर आतील फुलांच्या पाकळयांचे पाणी झालेले. फक्त लाल देठ राहिलेला. मला रडूच कोसळलं. रडवेला चेहरा पाहून आईनं विचारलं, 'काय झालं?' मी रूमाल दाखवला. आई म्हणाली, 'अरे, ही फुलं खूपच नाजूक. त्यांचे आयुष्य खूप कमी. ती जेवढी सुंदर तेवढीच अल्पायुषी'. त्यावेळी यातलं फार काही कळलं नसलं तरी आज मनात असा प्रश्न येतो की, साने गुरूजीनी 'जे आवडते सर्वांना, तेच आवडते देवाला' असं या फुलांना पाहून तर म्हटले नसेल ना?
            त्या काळात खरी ओळख या दोन देवप्रिय फुलांची झाली. पुढे रानात फिरताना एक लक्षात आले की, फूल कोणतेही असो, ते मनाला भुरळ घालते. विविध पिकांची फुले, गवताची फुले, झाडांना येणारी फुले पाहायची आणि मनात साठवून ठेवायची सवयच लागून गेली. महाराष्ट्रातील विविध सण आणि त्या त्या सणाला असणारे विशिष्ट फुलांचे, पानांचे आणि पिकांचे महत्त्व वेळोवेळी पटत गेले. यामध्ये सणावाराचा हातभार मोठा होता. पिंपळाच्या झाडाला बोधीवृक्ष का म्हणायचे, याचा अर्थ त्या काळात ज्येष्ठ मंडळींनी सांगितला. त्याचप्रमाणे वड, पिंपळ आणि पिंपरण ही तीन झाडे प्रत्येक गावात असायचीच. त्याचे कारण म्हणजे ही तीन झाडेच अशी आहेत की ज्यांच्या मुळाशी पाणी जास्त आले किंवा मुळे पाण्यात राहिली, तरी ती मरत नाहीत किंवा मुळे सडत नाहीत. हे आणि वृक्षाविषयक असे बरेचसे ज्ञान वाढत्या वयासोबत वाढत गेले. त्याचप्रमाणे, उंबराचे फुल, पिंपळाचे फुल पाहिल्याच्या अफवाही यायच्या आणि आम्ही लहान मुलेच नाही तर मोठी माणसेही हे नसलेले फुल शोधत राहायची.
            असे हे फुलांचे विश्व वाढतच गेले. रानावनात भटकताना विविध गवत फुले पाहायला मिळायची. मला सर्वच फुले आवडायची. एकदा आवडले म्हणून धोतऱ्याचे फुल तोडून आणले. यावर मोठा गदारोळ झाला होता. कितीतरी वेळ मला हात धुवत बसावे लागले. त्या वयात आम्ही एक क्रूरपणाही करायचो. दगडी पाल्याची फुले लांब दांड‌्याची असतात. त्याचा देठ लांब आणि उंच असतो. आम्ही ही फुले तोडायचो आणि एका हाताने फुलाजवळचे देठ पकडून दुसऱ्या हाताच्या बोटाने ते फुल उडवायचो. त्याला आम्ही रावणाचे मुंडके उडवणे म्हणून खेळायचो. आज मात्र झाडावरचे फुल देवाला अर्पण करायलाही तोडू नये, असे वाटते.
            फुले किती प्रकारची आहेत, हे आम्ही जंगलात शोधायचो. मला फुले न येणाऱ्या वनस्पती आवडायच्या नाहीत. रानशेवंती, जंगली लीली, केना, चिगळ, सराटा यांच्याबरोबर हरभरा, करडी, जवस, सूर्यफूल ही पिकांची फुलेही मन आकर्षित करून घ्यायची. या विविध फुलांच्या आकारातील रंगातील, सुवासातील वैविध्य साठवत बालपण कसे गेले, कळलेच नाही. झाडं दिसली की त्याला फुल येते का आणि येत असल्यास कसले, कसे दिसते, हे प्रश्न पडायचेच. आमचा आणि एकूण जीवशास्त्राचा संबंध बारावीपर्यंतच आला. वर्गात शिकलेले वनस्पतीशास्त्र फारसे आठवत नसले तरी दैनंदिन जीवनात ज्या जीवसृष्टीचा सहवास लाभतो, त्यांच्या सान्निध्यात निसर्गाचा अभ्यास करण्याची ओढ मात्र आजही असोशीने कायम आहे.
            यातूनच रातराणी नाव का आलं असावं? याचे उत्तर पुस्तकात शोधण्यापेक्षा सुगंध यायला लागला की बॅटरीच्या प्रकाशात त्या झाडाचे निरीक्षण करत मिळवणे आवडू लागले. रात्री उमलणारी बहुतांश फुले ही पांढरी असतात कारण ती किटकांना सहज दिसू शकतात. रात्रीच्या अंधारातही पांढरा रंग स्पष्ट दिसतो, हे तर भौतिकी तत्त्व. पण ते वनस्पतीनी किती सहज आत्मसात केले आहे,से वाटायचे. गुलाब, त्याचे विविध प्रकार, आकार, त्यांचा गंध हा टिनएजमधला एक वेगळाच कप्पा. त्या फुलाकडे आकर्षित न होणारा तरूण विरळाच. शालेय विद्यार्थी असताना आम्ही वहीत मोरपिस ठेवत असू. पुढे वहीत, पुस्तकात फुले ठेवायला लागलो. वर्षभर असे फुलं जतन करायचो. अर्थात वह्‌यांची देवघेव होत नसल्याने त्याला वेगळा अर्थ असण्याचं कारण नव्हते. या गुलाब फुले आघाडीवर होती. मात्र देशी गुलाबांचा सुगंध हा संकरित गुलाबांच्या आकारास आणि रंगास मा देत असे. बार्शीच्या पार्श्वनाथ चाैकात सकाळी फुलांचा लिलाव होताना, फुलांचे ढीग डोळ‌्यात साठवण्याचा आनंद मोफत घ्यायचो.
            मोगरा, गुलाब, कमळ, जाई, जुई, सोनचाफा, बकुळ या फुलांच्या प्रेमात माणूस पडतोच; मात्र त्यांचे औषधी गुणही तितकेच महत्वाचे आहेत. बकुळ फुले ही खोकल्यासाठी आणि हिरड‌्यांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहेत. सोनचाफा रक्तदोषावर उपकार ठरतो. जुईच्या कळ‌्या नेत्ररोग, त्वचारोगावर उपयुक्त आहेत. हृदय सशक्त ठेवण्यासाठी कमळाचा वापर केला जातो. विविध जंगलांत आढळणाऱ्या वनस्पतींच्या फुलांचेही असे औषधी उपयोग आहेत. जास्वंद, पळस, मेंदी, शेवगा, आंब्यांचा मोहोर या सर्वांचा विविध आजारांवर, दोषांवर उपचारांसाठी वापर करता येतो, असे अनेक आयुर्वेदाचार्य सांगतात. मोहफुलांची तर गोष्टच वेगळी.....
            अशी विविध फुलांची माहिती घेत वाढत होतो. फुलांचे आकर्षण मात्र कायम होते. पुढे लग्न झाले. लग्नानंतर दारात माेगऱ्याचा वेल लावला. वेल वाढू लागला. वेलीला फुले आली. संसारवेलीवरही फुल उमलले. घरातील ते लहान बाळ वाढू लागले. वेलीवरचे फुल नखरे - नटखटपणा करत नव्हते आणि घरातले बाळ शांत राहात नव्हते. माझी मुलगी वैष्णवी तशी शांत होती; मात्र खाताना शंभर नखरे. तिला लहान असताना चमच्याने किंवा ग्लासने दूध प्यावयाला लावणे एक दिव्य कार्य होते. ती तोंडात दूध साठवायची आणि दोन तीन चमच्यानंतर सगळे बाहेर टाकायची. असे काही दिवस झाल्यानंतर काय करावे, याचा विचार करून एक प्रयोग केला. तिला कडेवर घेवून अंगणात यायचे. एक एक घोट करत तिला पाजत राहायचे. हा माझा खेळ तास – दी तास चालत असे आणि या खेळात ती चिमुरडी मला दमवत असे. तोंडात दुध साठवून अधूनमधून मला अभिषेक घालायची. काय करावे हा प्रश्न होता. हळूहळू दिवस सरले आणि श्रावण आला.
            श्रावणात शेजारच्यांच्या दारातला पारिजातक बहरला. तिला दूध पाजताना झाडावरची पांढरी फुले रात्रीच्या अंधारात उठून दिसत होती. मी माझ्या चिमणीला कडेवर घेवून रस्त्यावर आलो. तिला दुधाचा घोट पाजताना सांगू लागलो, 'ते बघ चांदोमामाचे दूध पिन झाले'. ती 'हूं' करायची. त्याबरोबर तोंडातील घोट पोटात जायचा. पारिजातकाच्या झाडाकडे बोट दाखवत फुलांचा पांढरा रंग म्हणजे चांदोमामाने दूध पिताना सांडलेल्या दुधाचा रंग असे चित्र रंगवत राहायचो आणि माझे म्हणणे ऐकत फुलाकडे एकटक पाहत हळूहळू ती दूध प्यायची. शेवटी मुलीला दूध पाजतानाही पारिजातक मदतीला आला होता. लहानपणी फुलाची झालेली पहिली ओळख प्राजक्ताच्या फुलांची होती. मी माझ्या मुलीला तिच्या न कळत्या वयात ओळख करून दिलेले पहिले फुल होते तेही पारिजातक. माझ्या मनातला प्राजक्त हा पारिजातक झाला आणि पुुढील पिढीला फुलांची ओळख करून देत एक वर्तुळ पूर्ण झाले.

----००----

२४ टिप्पण्या:

  1. Dr Shinde devotes to study the matter of subject, Understand the situations, then applyes mind rightly for Creative writing. Congratulations.

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार सर, आपण लिहिलेले लेख वाचण्याचा आनंद अवर्णनीय आहे.आपली विषयज्ञानाबरोबर निसर्गाच्या व मराठी भाषेच्या सौंदर्याशी जोडलेली नाळ पाहून मी थक्क झाले.लेख सुंदर आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. नमस्कार सर, आपण लिहिलेले लेख वाचण्याचा आनंद अवर्णनीय आहे.आपली विषयज्ञानाबरोबर निसर्गाच्या व मराठी भाषेच्या सौंदर्याशी जोडलेली नाळ पाहून मी थक्क झाले.लेख सुंदर आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. नमस्कार सर, आपण लिहिलेले लेख वाचण्याचा आनंद अवर्णनीय आहे.आपली विषयज्ञानाबरोबर निसर्गाच्या व मराठी भाषेच्या सौंदर्याशी जोडलेली नाळ पाहून मी थक्क झाले.लेख सुंदर आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. खूपच छान ..
    निसर्गाचं जतन-संवर्धन-हस्तांतरण एका पिढीकडून पुढल्या पिढीकडे-पारिजातकाच्या रुपात आणि आपल्या खास शैलीमधे ...

    उत्तर द्याहटवा
  6. Sir khupch sundar lihita tumhi. Science barobarach nisarga baddalchi avad kharach vilakshan grushti ahe. Scienc la marathi sahityacha sugandh. Sir you are really great.

    उत्तर द्याहटवा
  7. माझं परम भाग्य की आपल्या पारिजातकाच्या सहवासात काही क्षण काल अनुभवता आले आणि त्यांचं पाणी कधीच होणार नाही , काही लोकांना यामुळे रडू कोसळले तरीही ! Wordsworth's Sounding Cataract Haunted me like a passion किंवा she was like a violet by a mossy stone half hidden from the eye किंवा they (daffodils) flash before inward eye which is a bliss of solitude इ कवितांची सहज आठवण यावी आणि आजच्या युगात रोमँटिक कवी प्रशासनात आहेत , याच संवेदनशीलतेने प्रश्न सोडवतात , हे सर्व स्वप्न आहे की सत्य , पण सत्यच आहे आणि खूप भुरळ पाडणारे आहे .. मला लगेच त्या नीळकंठेश्वर मंदिरात जावेसे वाटले, त्याचप्रमाणे खूप पूर्वी एका प्राचीन महादेव मंदिराबाबत तुम्ही लिहिले होते ते आठवले ।।। ते पुन्हा लिहा ब्लॉग वर , मनापासून धन्यवाद ! : डॉ आर वाय शिंदे , वाई

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Dear Shinde Sir, Thank you for detailed comment. One should really see the facts behind the act of any person. i was surprised to read that peoples at that time had done such type of agitation and Shastriji went to farmers house to stay whole night without security.

      हटवा