मंगळवार, १९ डिसेंबर, २०१७

अशी ही साहित्य संमेलने.....

मराठी साहित्य संमलने या विषयाचा धावता आढावा घेण्याची संधी साहित्य सुधा मंच निमशिरगाव यांनी २१व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनानिमित्त प्रसिद्ध होणाऱ्या साहित्य सुधा या स्मरणिकेच्या निमित्ताने मिळाली. त्यानिमित्ताने मराठी साहित्य संमेलनाची नोंदी उपलब्ध असलेली संख्या ३४० असल्याचे समजले. तो लेख 'साहित्य सुधा मंच, निमशिरगाव' आणि 'साहित्य सुधा'च्या सौजन्याने येथे प्रसिद्ध करत आहे.... 


      मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास तसा दीशेर्षांचा आहे. सर्वप्रथम महादेव गोविंद रानडे यांनी १८६५ साली मराठी भाशेत प्रसिध्द झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतला आहे, असे मानले जाते. रानडे हे व्यवसायाने न्यायाधी. त्यांची महाराष्ट्राला एक थोर समाजसुधारक, धर्मसुधारक आणि साहित्यिक म्हणून ओळख आहे. त्यांना त्यावेळी ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची मराठी भाषेत निर्मिती झाल्याचे आढळले. त्यांनी ग्रंथ प्रसाराला चालना देण्याच्या हेतूने १८७८ च्या मे महिन्यात साहित्यिकांना एकत्र आणण्याचे ठरविले. याकामी त्यांना लोकहितवादी यांनी सहकार्य केले. दिनांक फेब्रुवारी, १८७८ रोजीच्या ज्ञान प्रकाशमध्ये जाहीर आवाहन प्रसिध्द केले. त्यानुसार ११ मे, १८७८ रोजी पुण्याच्या हिरा बागेत सर्व साहित्यिक एकत्र जमा झाले. हेच पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मानले जाते. अर्थातच या संमेलनाचे अध्यक्षपद न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी भूविले.
                त्यानंतर दुसरे संमेलनही १८८५ साली पुण्यातच भरले. या संमेलनाला पहिल्या संमेलनापेक्षा उपस्थितांची संख्या वाढली. सात वर्शांनंतर झालेल्या या संमेलनाला सव्वाषे साहित्यिक उपस्थित होते. या नंतर तिसरे संमेलन १९०५ च्या मे महिन्यात प्रथमच पुण्याबाहेर सातारा येथे भरले. साताऱ्यातील सुप्रसिध्द वकील र.पां.करंदीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. चैथे संमेलन पुणे येथे २७-२८ मे, १९०६ रोजी भरले. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा जास्त यशस्वी झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिध्द कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर होते. अनेक मान्यवर साहित्यिक मंडळी संमेलनासाठी एकत्र आले होते. निबंध वाचन, भाणे, ठराव यामुळे संमेलन गाजले. त्यानंतर अधून मधून पडणारा खंड वगळता सातत्याने सदर संमेलने भरत आहेत.
                फेब्रुवारी १६ ते १८, २०१८ मध्ये बडोदा येथे ९१ वे तीनदिवसीय साहित्य संमेलन भरत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यप्रेमी जनतेचा एक आनंदाचा उत्सव मानला जातो. अनेक साहित्यिक, लेखक आणि ग्रंथप्रेमी यांच्यासह विविध कलाकारांच्या सहभागाने संमेलन स्थळ फुलून उठते. त्या भागात साहित्य कला आणि संस्कतीचे दर्शन घडते. असे असले तरी आजवरच्या या संमेलनातील एकूण कार्यक्रम, अध्यक्ष निवड पध्दती आणि इतर गोष्टीमुळे अनेक साहित्यिक नाराज होते. शिक्षणाचा प्रसार जसजसा वाढत गेला तसतसे विविध घटकांतील लेखक लिहिते झाले. त्यांच्या लिखाणातून त्यांच्या जगण्यातून निर्माण झालेल्या जाणिवा येऊ लागल्या. त्या सर्व स्पंदनाचे प्रतिबिंब या संमेलनात पडावे ही अपेक्षा या संमेलनातून पूर्ण होऊ शकली नाही. अभिजात साहित्य प्रकार म्हणून सुरूवातीस कादंबरी, कथा, कविता, ललित लेख आणि नाटक हे प्रकार मानले जात असत. पुढे दीर्घ कथा दीर्घ काव्य, एकांकिका, नाट्यछटा, भाषांतर, बाल साहित्य हे साहित्य हे साहित्य प्रकार त्यात समाविष्ट झाले. त्यानंतर पुढे साहित्याचे स्त्री साहित्य, दलित साहित्य, कृषी साहित्य, विज्ञान साहित्य, संत साहित्य, जल साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य, विद्रोही साहित्य असे प्रकार वाढत राहिले. धार्मिक स्वरूपावरूनही साहित्याचे प्रकार पाडले गेले. जैन साहित्य, बसवेश्वर साहित्य, बौध्द साहित्य असे साहित्याचे विविध कारणाने वर्गीकरण वाढत गेले.

                अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत अनेक साहित्यिकांची नाराजी उघडपणे दरवर्षी चर्चेत येते. तेच तेच मुद्दे पुन्हा चर्चेला घेतले जातात. त्यातील काही मुद्दे पुन्हा चर्चेला घेतले जातात. त्यातील काही मुद्दे महत्वाचे आहेत. संबंधित सहित्य संस्थेकडून या मुद्द्याबाबत कारवाई होत नाही. तसेच त्या दिशेने प्रयत्न करताना दिसत नसत. नुकतीच विभागीय साहित्य संस्थांना संलग्नीकरण देण्याची साहित्य परिदेने जाहीर केलेली भूमिका ही याबाबत सर्वात महत्त्वाचे सकारात्मक पाऊल आहे. मात्र हे पहिले पाऊल आहे. यापूर्वी अशा प्रकारची सकारात्मकता दिसून न आल्याने अनेक गट, साहित्य सेवेतील घटक नाराज होते. सर्वात महत्वाचा मुद्दा होता आणि आहे तो अध्यक्षपदाची निवडणूक. नामांकित साहित्यिक, कवी विद्यमान पध्दतीमुळे अध्यक्षपदी बसू शकत नाहीत, असे अनेकांचे याबाबत म्हणणे आहे. ही संमेलनाध्यक्ष निवडण्याची पध्दत आणि प्रक्रिया पुरेशी प्रातिनिधीक नसल्याचा महत्वाचा आरोप होतो.
       साहित्याशी ज्यांचा दुरान्वयानेदेखील संबंध नाही, शा सेलिब्रिटीजचा साहित्य संमेलनातील सहभाग हाही मत आणि मनभेदाचा मुद्दा आहे. सेलिब्रिटीजनी संमेलनांना उपस्थित राहू नये, असे कोणाचेच मत नाही. मात्र साहित्य संमेलनात, संमेलनाध्यक्ष आणि इतर मान्यवर साहित्यिक यांना आमंत्रित सेलिब्रेटिजयांच्या तुलनेत गौणस्थान प्राप्त होते. साहित्य संमेलन हा लेखकांचा आणि ग्रंथप्रमींचा सोहळा. त्यामध्ये घडणाऱ्याशा प्रसंगामुळेही अनेकांनी या संमेलनाकडे पाठ फिरवली आणि स्वतःची वेगळी चूल मांडली. गेल्या काही वर्षापासून विश्व साहित्य संमेलनभरविण्यात येत आहे. घाटकोपरच्या रेल्वे पुलाच्या पायऱ्यावरील सूचना वाचली तरी महाराष्ट्रातील मराठीची दुरवस्था लक्षात येते. अर्थात अभ्यासापेक्षा गुगल ट्रांसलेटरवर भर दिल्याने हे घडते. तरीही महाराष्ट्रात ही स्थिती असताना परदेशात मराठी भाषेचा प्रसार करण्याच्या हेतूने हे संमेलन आयोजित करण्यात येते. साहित्य संमेलनातून स्फूर्ती, प्रेरणा घेऊन नवे लेखक, कवी घडले पाहिजेत पूर्वीच्या संमेलनात यासाठी आवश्यक बाळकडू मिळत असे. नावलौकिक मिळविलेल्या अनेक विख्यात मराठी साहित्यिकांना या संमेलनांनी प्रोत्साहन दिले. आजच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते सामर्थ्य नाही.
      त्यातही बदललेल्या विविध साहित्य प्रकारची मांडणी, हाताळणी आणि त्याबाबतचे एकूण विचारमंथन या संमेलनात घडते असे नाही. संमेलनाध्यक्षांच्या यादीवर नजर टाकली तरी आजवर किती महिलांना अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला, हे लक्षात येते. महिलांप्रमाणेच अन्य नव्याने साहित्याच्या विविध प्रकारात आपले कार्य बजावणाऱ्या साहित्यिकांची अवस्था आहे. अशा विविध कारणांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून दुरावलेल्या मंडळींनी आपली आपली विभागीय किंवा क्षेत्रीय साहित्य संमेलने सुरू केली. कोकण साहित्य परि, मराठवाडा साहित्य परि, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा इत्यादी क्षेत्रीय संघटनांची स्थापन झाली. त्याचप्रमाणे त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात उद्दीष्टानुरूप साहित्य संमेलने घ्यावयास सुरूवात केली. तरीही साहित्य प्रकारांची व्याप्ती आणि ग्रंथ संख्या वाढत असल्याने वेगवेगळ्या विचारधारांवर आधरित साहित्य संमेलने आयोजित करण्याची गरज भासू लागली आणि तशी ती आयोजित झाल्याने साहित्य चळवळीचा मोठा फायदा झाला, असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात दरवर्षी गावोगावी जी विभागी, प्रादेशिक आणि अन्य छोटी संमेलने भरतात ती नवीन लेखक, कवी घडविण्याच्या दृश्टीने अधिक उपयुक्त, फलदायी ठरत आहेत, यात शंका नाही. ती केवळ अभिजात साहित्य प्रकारातील संमेलने आहेत अशातील भाग नाही.
      समाजातील सामाजिकदृश्ट्या वंचीत घटकांसाठी आयोजित होणारी साहित्य संमेलने ही अत्यंत महत्त्वाची आहेत. अपंग साहित्य संमेलन, अंध-अपंग मराठी साहित्य संमेलन अशा संमेलनातून शारीरिक कमजोरीवर मात करून साहित्याची भूक भागवू पाहणाऱ्या घटकासाठी साहित्य निर्मिती आणि त्यांच्यासाठी निर्माण झालेल्या साहित्यावर चिंतन होते. त्याचप्रमाणे अंधांचे कवी संमेलनही आयोजित होते. महिला साहित्य संमेलनेही मोठ्या प्रमाणात आयोजित केली जातात. महिला साहित्य संमेलनापासून ते महिला वकिल साहित्य संमेलनापर्यंत विविध क्षेत्रातील महिला लेखिकांची संमेलने गोवा ते नागपूरपर्यंत विविध भागात भरतात. संदर्भामध्ये अशा एकूण पंधरा संमेलनांच्या नोंदी दिसून येतात. आंबेडकरी चळवळ, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारावर आधारित साहित्य संमेलनानी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि त्यातून मोठी वैचारिक घुसळण होत आहे. या संमेलनातून अनेक नव्या वक्त्यांना आणि साहित्यिकांना प्रोत्साहन मिळते. या विचारावर आधारित अशी साहित्य संमेलने विविध नावांनी भरतात. महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन हे स्वतःचे वेगळे अस्तित्व टिकवून आहे. आंबेडकरी विचारांतून पुढे विचारवेध साहित्य संमेलने सुरू झाली. ही संमेलनेही विविध नावांनी भरतात. आदिवासी विचारवेध, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन, दलित साहित्य विचारवेध संमेलन, राजर्षि शाहू विचारवेध संमेलन आणि तसेच केवळ विचारवेध संमेलनही त्यांची काही नावे आहेत. ही संमेलने भरविणाऱ्या संस्था अनेक आहेत. त्यामुळे एकाच नावाची दोन-तीन संमेलनही विविध ठिकाणी भरतात.
      स्वतःची आणखी वेगळी ओळख सांगणारी आणि जपणारी आणखी काही साहित्य संमेलने आहेत. अहिराणी साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, गोमंतक साहित्य संमेलन ही प्रादेशिक संमेलने भरतात. आचार्य अत्रे, कुसुमाग्रज, आचार्य भानुकवी, बालकवी, औदुंबर, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, का.स.वाणी, बसवेश्व, चक्रधर स्वामी, संत तुकाराम, नरहर कुरूंदकर इत्यादी साहित्यिकांच्या नावाने वेगवेगळ्या गावी संमेलने भरवली जातात. दलित साहित्य संमेलन, जैन साहित्य संमेलन, स्वकुळ साळी मराठी साहित्य संमेलन ही आणखी सामाजिक घटाकांच्या विविध गटाद्वारे आयोजित केली जाणारी संमेलने आहेत. प्रस्थापित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे प्रस्थापितांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या उदात्तीकरण करणारे व शोषि, दुबळ्या, वंचित वर्गांना बेदखल करणार आहे. अशा भावनेने पंधरा वीस वर्षांपूर्वी प्रस्थापीतांची साहित्य क्षेत्रातील तथाकथित दादागिरी, बडेजावपणा मोडीत काढण्याच्या हेतूने आणि उपेक्षितांच्या परिवर्तनवादी साहित्याचा जागर मांडण्यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळ स्थापन झाली. त्या माध्यमातून स्वतंत्र विद्रोही साहित्य संमेलने विविध ठिकाणी भरविण्यास सुरूवात झाली.
      साहित्य हे वेगवेगळ्या वयोगटासाठी लिहिले जाते. त्यावरून त्यांची विभागणी झाली आहे. बाल साहित्य, कुमार साहित्य, महाविद्यालयीन साहित्य आणि त्यानंतर ज्येष्ठांचे साहित्य असे प्रकार मानले जातात. त्यामध्ये परवा परवा आणखी एक प्रकार ऐकिवात आला आणि त्याला सिनिअर सिटीझन्ससाठीचे साहित्य असे संबोधले गेले. याखेरीज, रेल्वे साहित्य, योग साहित्य, विज्ञान साहित्य, ग्रामीण विज्ञान साहित्य, वारकरी साहित्य, संविधान चिंतन साहित्य संमेलन ही आणखी कांही संमेलनांची नावे आहेत. या सर्व प्रकारांची स्वतंत्र साहित्य संमेलने आयोजित केली जातात. मात्र आता साहित्याचे स्वरूप केवळ छापील राहिलेले नाही.
    तंत्रज्ञानानुरूप साहित्याचे रूप बदलू लागले आहे. कांही मंडळी छापील पुस्तकरूपात साहित्य न आणता थेट आपले साहित्य नलाईन ई-स्वरूपात उपलब्ध करून देत आहेत. त्यामध्ये कथा, कादंबरी हे प्रकार सर्वात जास्त प्रमाणात आहेत. काही मंडळी आपले साहित्य ब्लाॅगच्या स्वरूपात प्रसिध्द करतात. अशा मंडळीचीही आता स्वतंत्र संमेलने होऊ लागली आहेत. ई-साहित्य संमेलन, ट्वीटर साहित्य संमेलन ही काही मोजकी उदाहरणे. यामध्ये आणखी महत्वाचा घटक आहे, तो ग्रामीण साहित्य संमेलनांचा.
      महाराष्ट्रातील शेकडो ठिकाणी ग्रामीण साहित्य संमेलने भरवली जातात. या साहित्य संमेलनांची सुरूवात ही त्या त्या भागातील साहित्याच्या जाणकार मंडळींनी आपापल्या भागात साहित्य संस्कृती वाढावी, वाचन संस्कृती वृध्दींगत व्हावी या हेतूने सुरू केली. यामध्ये निव्वळ त्या भागातील जनतेमध्ये ग्रंथप्रेम वाढावे, हा हेतू होता. ग्रामीण साहित्य संमेलनापैकी नांदेडच्या लोहा तालुक्यातील कंधार येथे भरणारे गुराखी साहित्य संमेलन हे खूपच वेगळे आहे. प्राणी आणि पशूंच्या प्रत्यक्ष सहभागाने होणारे हे साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने लोकसाहित्यावर मंथन करते. अपार उत्साहाने सहभागी मंडळी कंधारच्या माळावर जमतात. अत्यंत कमी खर्चामध्ये होणारे हे संमेलन दरवर्षी २६ ते ३० जानेवारी या कालावधीत १९९२ पासून आयोजित केले जाते. गुराख्यांच्या मुखातून जनावरे राखताना निर्माण होणाऱ्या साहित्यापासून विविध भटक्या आणि विमुक्त समाजातील वासुदेव, गोंधळी, मसणजोगी, फासेपारधी, वडार, तुडबुडके, फकीर, गारूडी, पोराज, चाळणीवाले, मनकवडे अशा विविध समुदायातील लोकांच्या साहित्याचा या संमेलनात जागर होतो. अशा प्रकारे भरणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनांची संख्याही शेकड्यांत आहे.

      महाराष्ट्रा, मराठी साहित्य संमेलने अशा प्रकारे वेगवेगळ्या नावाने आणि हेतूने भरवली जातात. या संमेलनांची संख्या उपलब्ध माहितीनुसार ३५० च्या घरात आहे. निमशिरगाव येथेही असेच ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले जाते. यावर्षीचे हे २१ वे संमेलन आहे. हे संमेलन १० डिसेंबर रोजी झाले. साहित्यसुधा कला, क्रिडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंच आणि ग्रामस्थांच्या द्वारा या संमेलनाचे आयोजन केले जाते. ग्रामीण साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी हा अविभाज्य भाग असून संमेलनाच्या उद्दिष्टानुरूप ग्रंथांची निवड केली जाते. उद्घाटन, पुरस्कार वितरण, परिसंवाद, कथाकथन, काव्यमैफल किंवा काव्यवाचन असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन या संमेलनात केले जाते. पूर्ण गाव या संमेलनाकडे एक सोहळा म्हणून पाहते. मनापासून सहभागी होते आणि साहित्याच्या रंगी रंगून जाते, यातच अशा संमेलनांचे यश आहे.
---०---
     
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा