बुधवार, २९ जुलै, २०२०

ड्रायव्हिंग अवे कोरोना

कोरोनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. वाहन चालवताना जशी अपघाताची भिती असते, तशीच दररोजचे व्यवहार पार पाडताना कोरोनाची लागण होण्याची भिती आहे. आपण अपघात होईल म्हणून वाहन चालवणे सोडू शकत नाही. तसेच कोरोनाच्या भितीने सर्व व्यवहार अनंत काळासाठी बंदही ठेवू शकत नाही. वाहन चालवताना अपघात होऊ नये म्हणून वाहतुकीचे नियम पाळतो, तसेच कोरोनाची बाधा होऊ नये म्‍हणून शासनाने आणि तज्ज्ञांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करायलाच हवे…

_______________________________________________________


मित्रहो,

या वर्षाच्या प्रारंभापासून कोविड-१९ या आजाराची चर्चा सुरू झाली. हा आजार कोरोना व्हायरसमुळे होतो, हे ही समजले. त्यानंतर तो आपल्याकडे येणार नाही, अशी चर्चा सुरू झाली. उच्च तापमानाला हा विषाणू टिकत नाही, अशा बातम्या येत होत्या. या बातम्यामुळे सोलापूर, जळगावकडील मंडळी इतरांपेक्षा जरा जास्त खुश होती. आपल्याकडे तापमान जास्त असते, त्याचा कधीतरी फायदा झाला असा सकारात्मक विचारही काही मंडळींच्या डोक्यात होता. बीसीजी लस ज्या देशात दिली जाते, तेथे कोरोनाचा प्रादुभर्ज्ञव कमी होतो, अशी बातमी आली आणि आम्ही आणखी निर्धास्त झालो. कारण भारतात ही लस न घतलेला माणूस मिळणे तसे दूर्मिळ. आम्ही (परदेशाच्या तुलनेत) अस्वच्छ वातातवरणात राहतो. आम्ही आरोग्याची काळजी घेत नाही, त्यामुळे आमची रोग प्रतिकारकशक्ती चांगली आहे आणि आमच्यापुढे कोरोना टिकणार नाही. अशा अनेक रणा भीमदेवी संकल्पना, विचार, मते आमच्या डोक्यात असताना साधारण मार्च २०२० मध्ये त्यांने भारतात प्रवेश केला. इतर आजार शक्यतो गरिबांच्या घरात प्रथम सुरूवात करतात. मात्र कोराना विमानातून आला.

प्रवेश केला, तरीही आपण सर्वजण आपल्याकडे तो येणार नाही, असेच मानत होतो. त्याला अनेक लोकांची मते कारणीभूत होती. सर्वचजण सर्वच विषयांच्या मूळाशी जाऊन अभ्यास करू शकत नाहीत. त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची मते प्रमाण मानून हे सर्व चालले होते. अनेक अशा वार्ता खोट्या ठरवत हा विषाणू भारताच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला. सर्वात प्रथम त्यांने चीनमध्ये आपले अस्तित्व दाखवले. त्यानंतर इटलीमध्ये कहर केला. पुढे जगातील सर्वात बलाढ्य अशा अमेरिकेला याचा इंगा दाखवायला सुरुवात केली. याच देशाला सर्वात मोठा फटका बसला. भारत आज लागण होण्याचे प्रमाण लक्षात घेता तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाश्चिमात्य सर्व प्रगत राष्ट्रे या आजाराने बाधित झालेली आहेत.

या आजाराने होणाऱ्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सारे काही थांबवले. माणसाच्या पायाला कुलूप लावले लॉकडाऊन केले. जोडीला थाळ्या वाजवल्या. बॅटऱ्या आणि मेणबत्त्या पेटवल्या. तरीही हा आजार सर्वांना खोटे ठरवत सर्वत्र पसरत राहिला. यात सर्वात जास्त हाल झाले ते गरीबांचे. हातावर पोट असणारांचे. लॉकडाउन- वन, टू, थ्री… वाढत राहीले. सर्वत्र एकच नियम न राहता तेही बदलत राहिले लोकांना हा त्रास असह्य झाला. तरीही भारतातील विविधता लक्षात घेता, काही अपवाद वगळता, लोकांनी तसे आजवर खुपच समजूतीने घेतले. लोक सकारात्मक वागले असेच म्हटले पाहिजे. डॉक्टर, नर्स, सर्व वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, औषध विक्रेते यांचे या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नातील योगदान वादातीत आहे. त्याचबरोबर पोलिस यंत्रणेवर आलेला ताण आणि त्यातूनही त्यांनी आपले कर्तव्य बजावण्यासाठी घेतलेले कष्ट हे कौतुकास्पद आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत असणारे कर्मचारी, पाणी पुरवठा यंत्रणेतील कर्मचारी यांनी लॉकडाउनमध्ये इतरांना असणारी सवलत आणि घरी बसून मिळणारे वेतन याचा विचार न करता आपले कर्तव्य पार पाडले. सर्व प्रसारमाध्यमांनी याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. समाजातील प्रत्येक घटक आपल्या हाताशी असणाऱ्या साधनाने या विषाणूशी मुकाबला करत आहे. आजही अफवांचे पिक मोठे येते. समाजमाध्यमातून ते वाऱ्यासारखे पसरते. आजही अनेक मंडळी आम्हाला काही होणारच नाही, अशा भ्रमात वावरत असतात. कोणतीही काळजी न घेता बिनधास्त असतात. त्यांनी असे वागणे म्हणजे अपघात करण्यास कारण होण्यासारखे आहे. कारण कोरोनाचा बाधित कदाचित कोणतीही लक्षणे दाखवत नसेल, मात्र तो कोरोनाचा वाहक म्हणून काम करू शकतो. तो इतराना बाधा होण्यास कारणीभूत ठरू शकतो, याचा आम्ही विचारच करत नाही. अशी बाधा होणारा जर कमकुवत असेल त्याची रोग प्रतिकारशक्ती चांगली नसेल तर त्याच्या जीवावरही बेतू शकते. शासन आणि समाजातील या विषयाचे अभ्यासक वारंवार ‘घरातच थांबा, घराबाहेर पडू नका’ असे वारंवार सांगत असूनही अनेक लोक निष्कारण बाहेर पडतात. जया बच्चन यांना मोटार सायकल रेस करून पळवणाऱ्यांचा त्रास थांबवण्यासाठी पोलिस यंत्रणेचे सहाय्य घ्यावे लागते. हे चित्र आपल्यातील दोन विसंगतींचे आहे.

एकिकडे कोरोनाच्या भितीने ग्रासलेला वर्ग, बाहेर न पडले तर खायचे काय याची भ्रांत असलेला वर्ग, दररोज आपली सेवा, ही अत्यावश्यक सेवा असल्याने बाहेर पडावा लागणारा वर्ग आहे, तर दुसरीकडे आम्हाला काय होते असा दुराग्रह मनात ठेवून शासन निर्देशांचे उघड उल्लंघन करणारा, मास्क न घालणारा, गर्दी करणारा वर्ग. यांना कोणी नियम पाळा असे सांगितले, तरी ते त्याच्या अंगावार चाल करून जातात. अशा परिस्थितीत काय करावे हे कळत नाही. कोणाचे खरे समजावे असा प्रश्न पडतो. या आजाराबाबत येणाऱ्या बातम्या नित्यनियमाने मी वाचतो. किती रूग्ण सापडले आणि कोठे सापडले या बातम्यात रूची नव्हती आणि नाही. या प्रश्नाकडे वैज्ञानिक भूमिकेतून पाहताना अनेक विसंगती आढळतात. त्यात आश्चर्यही वाटत नाही, कारण विज्ञान हा एकच प्रांत असे आहे की जो निखळ सत्य समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आपली चूक उघडपणे मान्य करतो. सुरुवातीला सॅनिटायजर हे वरदान म्हणून सांगण्यात येत होते. नंतर मलाच एका ब्रँडच्या सॅनिटायजरची ॲलर्जी असल्याचे लक्षात आले. तोपर्यंत अतिवापरही योग्य नव्हे हे सांगण्यात येऊ लागले. अशा परिस्थितीत कोरोनापासून दूर तर राहायला पाहिजे आणि बाहेरही पडणे आवश्यक आहे. आज कोरोनामुळे निर्माण झालेली भिती ही एखाद्या नवख्या चालकाला रस्त्यावर वाहन चालवण्याबद्दल वाटणाऱ्या भितीसारखी वाटू लागली.

आपण वाहन घेतो. अगदी वाहनांचे अपघात होतात आणि अशा अपघातात दरवर्षी लक्षावधी लोक मृत्यूमुखी पडतात, हे माहित असूनही आपण वाहन घेतो. तसेच आपला व्यवसाय, नोकरी ही आपल्या जगण्यासाठी पोट भरायचे असल्याने आपण करत असतो. वाहन चालवताना आपल्याला रस्त्यावर जावे लागते. त्या रस्त्यावर अनेक वाहने असतात. आपण आजच्या काळात बाहेर पडल्यानंतर अनेक लोक भेटणे अपरिहार्य असते. आपल्या वाहनाचा अपघात होऊ नये, यासाठी आपण शासनाने किंवा परिवहन विभागाने सांगितलेले, आखून दिलेले सर्व नियम पाळतो. ते नियम पाळले नाहीत, तर अपघात होण्याची शक्यता वाढते. तसेच कोरोनाची बाधा होऊ नये, म्हणून घालून दिलेले नियम पाळले नाहीत, तर बाधा होते. रस्त्यावर असणारा मोठा खड्डा, अचानक चाक पंक्चर होणे, असे आपण नियम पाळूनही काही अपघाताचे क्षण येतात. या अपघातात आपले मोठे नुकसान होऊ नये, आपल्या जीवावर बेतू नये, यासाठी वाहनाचा वेग मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. तसेच आपण तीचा कोणी वापर केला हे माहीत नसताना, एखाद्या बाधीत वस्तूला स्पर्श करणे, धडधाकट दिसणाऱ्या मात्र कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीने तुमचा मोबाईल, भ्रमणध्वनी वापरणे, खूर्चीत अगोदर बसून जाणे, यातूनही बाधा होण्याची शक्यता असते. मात्र यावर आपण कसे वागले पाहीजे याबाबतची मार्गदर्शक तत्वे यापूर्वीच आपल्याला सांगण्यात आली आहेत. कितीही जवळचा मित्र असला तरी जवळीक कामाची नाही हे आज समजून घेण्याची आणि तसे वागण्याची गरज आहे.

आपले वाहन वाहतुकीचे सर्व नियम पाळून मर्यादित वेगाने चालवले तर अपघाताची शक्यता टाळली जाते. अपघात झाला तरी जीवावर बेतत नाही. वे कमी ठेउन आपण अपघाताची शक्यता कमी करत असतो. तसेच कोरोनापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञानी सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क वापरला पाहिजे. अनेकजन मास्क घालतात आणि बोलताना तोंडाच्या खाली ओढतात, हे पूर्णत: चूकीचे आहे. समोर त्रयस्थ असताना मास्क असलाच पाहिजे. दोन व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर (दो गज दूरी) असलेच पाहिजे. एकमेकांच्या हातावर टाळ्या देणारी मंडळी भेटतात, त्यांच्या हातावर टाळी देण आपण होउन अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. आपला कितीही जवळचा मित्र असला आणि तो आपल्या दोघांच्या गाड्या ठोकू असे म्हटला तर आपण ते करतो का?  हा प्रश्न स्वत:शी विचारण्याची आज गरज आहे. अनोळखी किंवा ती वस्तू पूर्वी कोणी हाताळली याची माहिती नसेल अशा ठिकाणी स्पर्श झाल्यास साबणाने हात स्वच्छ धुतले पाहिजेत. साबण उपलब्ध नसेल किंवा तशी सुविधा नसेल अशा ठिकाणी सॅनिटायजरने हात स्वचछ करणे आवश्यक आहे. अनेकदा अपघातात आपल्या नसली तरी इतरांच्या जीविताला धोकादायक परिस्थिती निर्माण होत असते. त्याचप्रमाणे कोरोनाचा आपल्याला काही त्रास झाला नसला तरी इतरांना हानी किंवा बाधा आपल्यामुळे होऊ शकते, हे लक्षात घेवून मला कोठे कोरोना झालाय अशा भ्रमात राहण्याचे दिवस आज नाहीत.

आपण आपले आणि आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करायचे आहे. आपल्या बरोबरच्या लोकांना या आजारापासून वाचवायचे आहे. आपण अपघात करायचा नाही आणि इतरांच्या अपघाताला बळीही पडायचे नाही. तसेच आपल्याला कोरोनाची बाधा होऊ द्यायची नाही आणि आपल्यामुळे इतरांना कोरोना होणार नाही याची दक्षता घेऊ या. कोरोनाला पळवून लावू या! त्यासाठी सर्व सूचनांचे पालन करू या. कुटुंब वाचवू या, देश वाचवू या!    

       

                                                    -   एक नागरीक

 

 



 


३५ टिप्पण्या:

  1. अप्रतिम!
    काळजी घेवू.. नियम पाळू .. सुरक्षित राहू..

    उत्तर द्याहटवा
  2. सर खुप छान आहे आपण सर्वांनी काळजी घेऊ व शासनाने घालून दिलेले नियम पाळू व सुरक्षित राहू

    उत्तर द्याहटवा
  3. सर खूपच छान उदाहरणांसह पत्र लिहिले आहे सर्वांनी खबरदारी घेतली तर कोरोनाला आपण नक्की हरवू शकतो.

    उत्तर द्याहटवा
  4. Very nicely correlated with driving, care must be taken in present situation

    उत्तर द्याहटवा
  5. हो,एकदम बरोबर .छान लिहले आहे पण शेवटी एक नागरिक असे का लिहले आहे,तुमचे नाव लिहायला पाहिजे ,असे वाटते .

    उत्तर द्याहटवा
  6. अतिशय सुरेख लेख... पत्र... आपलेपणाने समजाऊन सांगणारे.... नियम पाळू...

    उत्तर द्याहटवा
  7. शिंदे सर
    फारच छान प्रकारे आपण कोरोना परिस्थिती मध्ये सुरक्षित राहून नियमित कामे कशी करता येतील हे सांगितले आहे.
    .
    हीच आता न्यू नॉर्मल परिस्थिती असेल असे समजून सगळ्यांनी नियम पाळूया , आनंदात राहूया
    .
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  8. हो सर नक्की त्या प्रमाणे राहूं. Thanks sir

    उत्तर द्याहटवा
  9. सर सहमत आहे आपल्या सर्व मुद्द्यांशी. वाहन चालवताना घ्यायची काळजी कोरोना शी दोन हात करताना घ्यावी लागेल हे सोदाहरण स्पष्ट केले आहे. आईन्स्टाईन ने म्हटल्याप्रमाणं आयुष्याच्या तोल राखण्यासाठी तुम्हाला पुढे जावंच लागणार आहे. साथ आहे म्हणून घरात किती दिवस राहणार? काळजी घेण हा सर्वोत्तम उपचार.

    उत्तर द्याहटवा
  10. सर्व मुद्दे पटले..काळजी घेणे आवश्यक आहे

    उत्तर द्याहटवा
  11. सर आपण प्रशासनात असुनही अनेकदा वेळ काढून लिहिता. हे खूप प्रशंसनीय बाब आहे. आपले अभिनंदन. या लेखात आपण वस्तुस्थिती मांडली आहे. याप्रमाणे जर प्रत्येक जण वागला तर लवकरच हीलढाई आपण जिंकणार यात शंका नाही.

    उत्तर द्याहटवा
  12. सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त माहिती आपण दिलीत सर, धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा
  13. अत्यंत सुंदर आणि उपयुक्त विवेचन आहे. धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  14. सर अतिशय सुंदर,या पत्रातून आपण सर्वांनाच स्वतःच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. सर्वांनीच कोरोना संदर्भातील नियम व सूचनांचे पालन करूया व कोरोनाशी लढा जिंकूया...!,अभिनंदन सर

    उत्तर द्याहटवा
  15. सर सुंदर लेख आहे लोकासाठी उपयुक्त

    उत्तर द्याहटवा
  16. माहीतीने ओतप्रोत भरलेला लेख

    उत्तर द्याहटवा
  17. कोरोनाग्रस्त वास्तव व त्याला सुरक्षितपणे सामोरं कसं जावं यावर उत्तम भाष्य.

    उत्तर द्याहटवा
  18. चांगला संदेश दिला आहे. सगळेच या संकटातून जात आहेत

    उत्तर द्याहटवा
  19. परिचित माहितीची मांडणी वाचनीय करणे यात आपला हातकंडा आहे हे आपण पुन्हा सिद्ध केलेत.

    उत्तर द्याहटवा
  20. खूप मार्गदर्शनपर व दिशादर्शक लेख लिहून आत्ताच्या परिस्थितीत हे मानसिक व बौध्दिक आधार देण्याचे महत्वपूर्ण काम काम केले आहे, धन्यवाद सर

    उत्तर द्याहटवा