शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

अल्पविराम


जून २०१४ पासून शेतीप्रगती या मासिकामध्ये मी ‘हिरव्या बोटांचे किमयागार’ या सदराचे लेखन केले. सलग सहा वर्ष ही लेखमाला लिहिली. यानंतर थोडीशी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. संपादकांनी तो मान्य केला. कृषी संशोधकांबाबत एवढा मोठा काळ लेखन केल्यानंतर मला या संशोधकांना आपणही उपेक्षित ठेवले असेच जाणवत राहिले. त्याबाबत मी जुलै २०२० च्या अंकात व्यक्त झालो. तो लेख येथे पुनर्प्रकाशित करत आहे........ 

--------------------------------------------------------------------------------------------

     ‘शेतीप्रगती’ या मासिकातून जून २०१४ पासून ‘हिरव्या बोटांचे किमयागार’ या सदराचे लेखन करण्याची संधी मला मिळाली. या लेखामध्ये ज्यांनी शेती आणि एकूणच वनस्पतींबाबत अनोखे संशोधन केले, वृक्षवल्लींमध्ये आपले जीवन व्यतीत केले आणि या क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिले, अशा संशोधकांचा, व्यक्तींचा परिचय करून देण्यात आला. नेमक्या शब्दात सांगायचे तर जल, जंगल आणि जमीन यांचा समतोल साधण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या संशोधकांचा, व्यक्तींचा परिचय यात करून देण्यात आला. या लोकांच्या कार्याने मनुष्य जीवन निश्चितच सुखकर बनले. त्यांचे अखिल सजीव सृष्टीवर अनंत उपकार आहेत. त्यांच्यामुळेच आजही हे जग सुंदर आहे.

माझा विषय भौतिकशास्त्र. यातील ज्या संशोधकांची नावे भौतिक राशींच्या मापनात एकक म्हणून निश्चित केली, अशा एकवीस संशोधकांची चरित्रे थोडक्यात सांगणारे ‘एककांचे मानकरी’ हे पुस्तक मी लिहिले. ते कसे झाले आहे, हे तपासण्यासाठी डॉ. आलोक जत्राटकर यांच्याकडे दिले. त्यांनी ते वाचले. मौलिक सूचना केल्या आणि त्याचबरोबर ‘शेतीप्रगती’ मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी यांना कृषी संशोधकांच्या जीवनावर एक लेखमाला सुरू करावी, असे सुचविले. लेखक म्हणून परस्पर माझ्यावर ही जबाबदारी देण्याचे त्यांनी ठरवले. तोपर्यंत रावसाहेब पुजारी यांचा परिचय मला नव्हता. मे २०१४ मध्ये ते मला भेटले. विषय सांगितला. मी आणि डॉ. जत्राटकर जेव्हा या लेखनासाठी संशोधकांची यादी बनवू लागलो, तेव्हा कार्व्हर, जगदिशचंद्र बोस, नॉर्मन बोरलॉग, एम.एस. स्वामीनाथन, बिरबल साहनी अशा पाच-सहा नावांच्यापलिकडे आमची गाडी जात नव्हती. शेवटी, वर्षाखेरपर्यंत एवढेच भाग लिहू या, असा आम्ही विचार केला.

लेखमाला सुरू झाली. पुढे एक-एक नाव वाढू लागले. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, जगदिशचंद्र बोस असे संशोधक अभ्यासताना आणखी भारतीय आणि परदेशी संशोधक मिळू लागले. यामध्ये कार्व्हरसारख्या संशोधकांने दिलेले योगदान लिहिताना वीणा गवाणकर यांनी लिहिलेले चरित्र पुन्हा अभ्यासले. कृषी संशोधकांच्या जीवनावर त्यांनीच लिहिलेली भगीरथाचे वारस (विलासराव साळुंखे), नाही चिरा.. (डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे), आदिवासींचा तारणहार (डॉ. जयंत पाटील) ही तीन-चार कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींची चरित्रे मिळाली. त्याखेरीज मराठीमध्ये का.कृ. क्षीरसागर यांनी देशोदेशीचे कृषी शास्त्रज्ञ हे पुस्तक लिहिले आहे. तेही अभ्यासता आले. मात्र या बोटावर मोजण्याएवढ्या पुस्तकांखेरीज मराठीमध्ये कृषी संशोधकांच्या जीवनावर लेखन आढळून आले नाही. इंग्रजीमध्ये केलेले लेखन आंतरजालावरील अनेक संकेतस्थळांवर उपलब्ध होते. मराठीमध्ये मात्र क्वचित एखाद्या वर्तमानपत्रात कोणाला या संशोधकांची त्यांनी केलेल्या कार्याची आठवण आलेली दिसत होती. ही बाब मला खटकू लागली.

एक दिवस विचार आला. समजा, अत्यंत चांगले घर आहे. सुंदर आणि सुसज्ज शयनगृहात उच्च दर्जाचा दूरचित्रवाणी संच आहे. त्यावर खूप वर्षांपासून पाहावयाचा असलेला चित्रपट लागला आहे. मात्र  चित्रपट पाहण्याची इच्छा असणारा हा प्रेक्षक दोन दिवसांपासून उपाशी आहे. तर, तो त्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकेल का? निश्चितच नाही. ही वस्तुस्थिती असतानाही कृषी संशोधकांच्या चरित्र लेखनाबाबतची उदासिनता अधिकच खटकू लागली. कोणत्याही विद्यार्थ्याला, सुशिक्षित व्यक्तीला दोन, चार संशोधकांची, शास्त्रज्ञांची नावे विचारली, तर त्यामध्ये भौतिक सुखसोयींच्या शोधांचे जनक आठवतात. कृषी शास्त्रज्ञांची नावे क्वचितच ऐकायला मिळतील. मराठीमध्ये नसले तरी इंग्रजीमध्ये अनेक संशोधकांच्या कार्यावर साहित्य उपलब्ध आहे. डॉ. आलोक जत्राटकर यांनी, ‘या विषयाला न्याय देण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लेखन करावे. शक्य तेवढ्या संशोधकांवर लेखन करावे’, असा आग्रह धरला. त्यानंतर हा शोध अव्याहत सुरू राहिला. मीही या विषयात रमलो आणि गुंतलोही. सुरुवातीला, लेखमाला सुरू करताना ती पाच सहा भागात संपेल, असे वाटत होते. मात्र लेखन वाढत गेले आणि बघता बघता सहा वर्षे झाली.

हे लेखन करताना जानकी अम्मल यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि भारतीय ऊसाला गोडवा

आणणाऱ्या संशोधिका भेटल्या. कमला सोहनी यांच्यासारख्या महीला हक्कासाठी, ग्राहक हितासाठी लढणाऱ्या आहार तज्ज्ञ संशोधिकेचा परिचय झाला. जमीन नांगरणे म्हणजे पाप, असे समजल्या जाणाऱ्या कालखंडात आधुनिक शेतीचा प्रारंभ करणारे जेथ्रो टुल भेटले. शास्त्रीय संशोधनासाठी नीटनेटक्या वर्गीकरणाची मोठी गरज असते. या वर्गीकरणाचा पाया घालणारे विक्षिप्त; पण, मैत्र जपणारे कार्ल लिनिअस भेटले. भारतातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती शिकवण्यासाठी आलेले आणि इथल्या शेतकऱ्यांना ‘माय बेस्ट प्रोफेसर्स’ असे संबोधत आधुनिक सेंद्रिय शेतीचा पाया घालणाऱ्या अल्बर्ट हॉवर्ड यांची ओळख झाली. क्रांतीकारक होण्यासाठी भारत सोडणारे आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे डॉ. खानखोजे मेक्सिकोचे अन्नदाता कसे बनले, हे समजले. शेतात पिकवलेली चारशे टन गाजरे बाजारात नाकारली गेल्यानंतर, रडत न बसता ‘बनी कॅरट’चा शोध लावणाऱ्या माईक युरोसेकची प्रेरणादायी कथा समजून घेता आली. मंत्र्याचा मुलगा असूनही जंगलातील आदिवासींच्या शेतात प्रगती घडवून आणण्यासाठी आयुष्य वेचणारे जयंत पाटील भेटले. ‘कल्याण सोना’ गहू आणि ‘एचएमटी’ तांदूळ भोजनासाठी वापरत होतो; मात्र यांचे जनक डॉ. दिलबागसिंग अठवाल आणि दादाजी खोब्रागडे हे या लेखमालेमुळे समजले. गंमत म्हणजे एक वाण उच्च विद्याविभुषित संशोधकाने, तर दुसरा खेड्यातील अल्पशिक्षित अल्पभूधारक शेतकऱ्याने शोधला. दोघांचे कार्य जगाची भूक भागवणारे आहे. एकाला जगन्मान्यता लाभली, तर दुसरा अखेरपर्यंत दारिद्र्यात राहिला. या हृदयद्रावक भेदभावाची जाणीव तीव्र झाली. दादाजींबद्दल मनात प्रचंड आदर वाढला. त्यांच्यावरील माझे लेखन शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए.भाग तीनच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले. हे या लेखमालेमुळेच शक्य झाले. सरकारी नोकरी सोडून सेंद्रिय शेतीचा प्रसार करणारे गोविंदस्वामी नमलवार यांना नमन करता आले. एक महिला म्हणून कायम दुय्यम वागणूक सहन करूनही मक्याचे संकरित वाण शोधणारी बार्बरा मॅकक्लिन्टॉक, बियाणे उद्योगाचे जनक बद्रिनारायण बारवाले, संकरित वाणांचे बादशहा कृष्णस्वामी रामय्या, कृषी संशोधनाचा पाया घालणारे बी.पी. पाल, भारताला खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्ण बनवणारे एम.व्ही. राव, जगाला भुकेच्या तावडीतून सोडवून शांतता प्रस्थापित करणारे नॉर्मन बोरलॉग आणि तोच कित्ता भारतात गिरवणारे एम. व्ही. स्वामीनाथन, जेनिटीकली मॉडीफाईड किंवा ‘जीएम’ बियाण्यांचे तंत्र विकसित करणारी मेरी डेल शिल्टन, सीताफळ शेतीला प्रतिष्ठा मिळवून देणारे नवनाथ कस्पटे, देशी वाणांची पेढी तयार करणाऱ्या राहीबाई पोपेरे अशा अनेक संशोधकांचा, व्यक्तींचा जीवन प्रवास अनुभवण्याचे भाग्य या लेखमालेमुळे मिळाले.

संशोधकांनी केवळ कृषी उत्पादन वाढावे, यासाठीच नाही; तर, शेतकऱ्यांचे काम सोपे व्हावे,

यासाठीही प्रयत्न केले आहेत. अशा संशोधकांना कल्पना कशा सुचल्या, याच्या गंमती समजून घेताना मनापासून आनंद होत होता. हे सर्व मराठी वाचकांना उपलब्ध करून देण्याची संधी या लेखमालेमुळे मिळाली. यामध्ये मांजरीने कोंबडीची शिकार करताना झालेली झोंबाझोंबी पाहून एली व्हिटनीने कापसापासून सरकी वेगळी करणारे यंत्र तयार केले. तर अब्दुल करीमसारख्या व्यक्तीमत्त्वाने आपल्याला केवळ झाडांच्या मध्ये घर बांधायचे, हे स्वप्न बाळगून झाडांची लागवड केली. त्यातून तीस एकरांचे जंगल निर्माण केले आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये पाणी आले. कलिमउल्लाह खान यांच्यासारख्या अवलियाने एकाच झाडावर साडेतीनशे प्रकारच्या आंब्याची कलमे बांधली. जादव पायेंग यांनी ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात नवी सृष्टी निर्माण केली. त्यासाठी गावकऱ्यांचा रोष पत्करला. अशा व्यक्तीमत्वांमुळे ही वसुंधरा अजून टिकून आहे.   

ही लेखमाला सुरू झाली आणि  ‘कोल्हापूर लोकमत’चे संपादक वसंत भोसले सरांच्या निदर्शनास आली. त्यांनी मला लोकमतच्या ‘कृषी मंचद्य या साप्ताहिक पानामध्ये याच धर्तीवर; पण कमी शब्दांचे ‘कृषी क्रांतीचे शिलेदार’ हे सदर लिहिण्यास भाग पाडले. दोन नियतकालिकांत एकाच विषयावर दोन लेखमाला सुरू राहिल्या. या निमित्ताने आणखी संशोधकांची भेट होत गेली. एकूण सत्तरपेक्षा अधिक कृषी संशोधकांच्या जीवनाचा पट शब्दांकित करता आला. ‘शेतीप्रगती’ मासिकातील पंचेवीस संशोधकांवरील लेखांचा संग्रह एकत्र करून ‘हिरव्या बोटांचे किमयागार’ हे पुस्तक डिसेंबर २०१८ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आपण ही लेखमाला स्वीकारलीत. त्याबाबतच्या सूचना लिखित रूपात फारच कमी आल्या. मात्र प्रत्यक्ष भेटीमध्ये अनेकजणांकडून प्रतिक्रिया मिळत असे. काही मंडळी भ्रमणध्वनीवरून त्याबाबत कळवत. आपले सर्वांचे मन:पूर्वक आभार. या लेखमालेत सत्तर लेख झाले, तरीही माझा शोध चालू आहे.

कृषी हे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे. शेतकऱ्याने शेती केली नाही, तर खाणार काय? हा मोठा प्रश्न आहे. अन्न प्रक्रियेच्या असंख्य पद्धती निघाल्या. मात्र मुळात अन्नधान्याला पर्याय नाही. असे असतानाही हे क्षेत्र मात्र दुर्लक्षित आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडेही आपण असेच दुर्लक्ष करतो आहोत. या क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनपटांचा शोध घेणारी ही लेखमाला सुरू ठेवण्याचा डॉ. आलोक आणि रावसाहेब पुजारी यांचा आग्रह आहे. सलग सहा वर्षे लेखमाला चालवल्यानंतर मलाही थोडा बदल हवा होता. या संशोधकांची सहज भेटही होत नव्हती. त्यामुळे थोडी विश्रांती घ्यावी आणि नंतर उर्वरित संशोधकांबद्दल लिहावे, असा मानस आहे. त्यामुळे ही भेट सध्या थांबली असली तरी हा पूर्णविराम नक्कीच नाही. हा अल्पविराम असेल. माझा शोध मी थांबवणार नाही. या दुर्लक्षित क्षेत्रातील संशोधकांना मराठी भाषेत शब्दबद्ध करून काही कालावधीनंतर पुन्हा आपण भेटूच. तो पर्यंत नमस्कार!

८ टिप्पण्या:

  1. सर अप्रतिम लेख आहेत शेती व शेतकरी हा कायम दूरलक्षित विषय तसेच शेती संशोधक हा तर सर्वासाठी अनाकलनीय पण या शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या संशोधकांना माझा सलाम व आपण हे सर्व वाचकापर्यंत पोचवल्याबद्दल आपले आभार आपण असेच लिहित रहा.विविध ज्ञात अज्ञात व्यक्तींची ओळख अशी होत रहावी. धन्यवाद सर शुभेच्छा सरजी.

    उत्तर द्याहटवा
  2. आदरणीय डॉक्टर शिंदे सर आपण अत्यंत सुंदर लिहिता अनेक लेख मी आपले पारायण याप्रमाणे वाचलेल्या आहेत वारंवार वाचलेले आहेत त्यातली शेकडो उदाहरणे लोकांना दिलेली आहेत आणि त्यामुळे आत्ता जरी आपण टाकती विश्रांती घेतली असली तरी आपण पुन्हा लिहायला सुरुवात करावी अनेक वेगवेगळ्या विषयांवर आपण लिहू शकता ते कौशल्य आपल्याकडे आहे आणि आपलं लिखाण लोकांना वारंवार आपल्याकडे आकर्षित करणार आहे म्हणून विनंती करतो की पुन्हा लिहायला लागला नव्या दमाने नव्या विषयांवर लिहा धन्यवाद दिपक देशपांडे

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम आणि सुंदर लेखन सर...
    आपल्यामुळे शेतीच्या प्रगतीसाठी कार्य केलेल्या महान शास्त्रज्ञांची ओळख होत आहे. असेच कार्य आपल्या हातून पुढेही घडावे, यासाठी खूप खूप सदिच्छा...
    धन्यवाद सरजी...!!!!!

    गोविंद हंबर्डे,
    स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.

    उत्तर द्याहटवा