शनिवार, ३० एप्रिल, २०२२

आक्का नावाचे झाड…



आक्का… माझी आई. मी कोल्हापूरात… ती बार्शीत. तिच्या सहवासात मला फार काळ राहता आले नाही. मात्र जो काही सहवास लाभला, त्यातील तिच्या आठवणी. रविवार दिनांक १७ एप्रिल २०२२ रोजी लौकिकार्थाने इहलोकीची यात्रा तिने संपवली. मात्र संस्कारांच्या रूपात ती चिरंतन सोबत असायची आणि असेल…


____________________________________________________________

लहानपणापासून…
तुला मी पाहात आलो
ते कायम काम करताना…
तुझे हात राबत असायचे…
एकत्र कुटुंब असतानाचे दिवस
मला फारसे आठवत नाहीत…
पण कुटुंबे वेगळी झाली…
ती १९७२ च्या ऐन दुष्काळात…
दुष्काळात बालाघाटच्या डोंगरातून
जनावरांसाठी धामणीचा पाला आणायचीस
शेतातील बरबडा उपटण्याचे,
शाळेनंतर आमचे काम असायचे…
तू डोंगरातून भलेमोठे ओझे आणलेले असताना
बरबडा उपटून माझे लाल झालेले
हात पाहायचीस…
 
त्या दुष्काळात फक्त कोट्यावरच्या
विहिरीत पाणी होते…
ते पाणी मिळवण्यासाठी सात पुरूष खोल विहिरीत
आम्ही उतरून वाटीने घागर भरायचो…
ती घागर घेऊन तू वर यायचीस…
त्यावेळी आमचीच काळजी तुझ्या डोळ्यात असायची…
घराकडे जाताना…
आमच्या हातातील चरवीचे ओझेही तुला
जास्त वाटत असायचे…
स्वत:च्या डोक्यावर घागर असताना…
आमच्या हातच्या चरवीला…
तू आधार द्यायचीस…
 
त्याच दुष्काळात…
पाणी कोठेतरी मिळायचे
पण अन्नाचा तुटवडा होता…
सरकारने रेशनिंगला इलोमिलो पुरवला होता…
इतरांच्या घरातील पांढरीशुभ्र भाकरी पाहून
मी सत्याग्रह सुरू केला…
इलोमिलोची लाल भाकरी खाणे बंद केले…
मी ‘ज्वारीच्या भाकरीचा जोसरा’ काढला होता
असे पुढे तू सांगायचीस…
त्या बालवयात केलेल्या सत्याग्रहात…
मी काहीतरी खावे म्हणून, तू कासावीस व्हायचीस…
शेवटी वडिलांनी कोठून तरी ज्वारी मिळवली…
आणि माझा सत्याग्रह संपवला…
त्यावेळी तू ते पीठ जपून वापरलेस…
दुष्काळ संपेपर्यंत मला भरवलेस…
 
गावाकडची होळी…
मुलांसाठी आनंदाचा सण असायचा…
होळी पेटवण्यासाठी लाकडे चोरायला…
आणि होळीभोवती बोंब मारायला,
तू जाऊ द्यायची नाहीस…
मात्र होळीच्या दुसऱ्या दिवशी
तू पहाटेच आम्हाला होळीकडे जायला सांगायचीस…
होळीची राख आणून तू बनवलेल्या आळ्यात
ती पसरायला लावायचीस…
राख पसरल्यावर त्यात
कारले आणि दोडक्याच्या बिया
लावायला सांगायचीस…
माझ्या हाताने लावलेल्या बिया
चांगल्या रूजतात, हा तुझा समज…
मी आजही जपतोय… जमेल तसा…
जमेल तेथे बिया रूजवून…
झाडे लावून…
हा संस्कार तूच तर दिलास…
 
त्या वाढणाऱ्या वेलांचे, रोपांचे…
माझ्यापेक्षा तुलाच जास्त कौतुक असायचे…
त्याला लागलेल्या फळांची भाजी करताना
ते ओसंडून वाहायचे…
खाणाऱ्याला ‘राजाने लावलेल्या वेलाची भाजी’
असे न चुकता सांगायचीस…
ते वेल माझ्या हातापेक्षा तुझ्या मशागतीने
आणि त्याहीपेक्षा तुझ्या मायेच्या नजरेने…
चांगले वाढत असावेत…
तरीही…
त्या वेलांकडे कौतुकाने पाहणाऱ्याला…
‘राजाने वेल लावलेत’
असे अभिमानाने सांगायचीस…
 
तू केवळ आमच्याच काळजीत असायचीस, असे नाही…
तुझ्या सावलीत येणाऱ्या प्रत्येकाची
काळजी तुला असायची…
आठ लेकरांची माय तू…
त्यातील सातजणांना तू वाढवलेस…
त्यातही एक बहीण कायम आजारी…
तुझा जीव तिच्यासाठी कळवळत असायचा…
तिला त्रास होताना तुझा चेहरा दु:खी व्हायचा…
काही असले तरी तू काम करत असायची…
तिच्याकडे लक्ष देताना,
इतरांकडेही तुझे लक्ष असायचे…
तुला शांत बसलेले कधी मी पाहिलेच नाही..
कायम तुझे हात राबत असायचे…
जनावरांचे दाणापाणी
लेकरांइतकेच निगुतीने तू करायचीस…
आम्ही जनावरांना मारलेले तुला चालायचे नाही…
काळ्या तिखटापासून सारे काही…
तुला स्वत: बनवलेले हवे असायचे…
तुझा शांत न बसण्याचा संस्कार,
तू नकळत करत असायचीस…
 
संध्याकाळी रानातील कामे संपवून घरी परतल्यावर…
चिमणी… कंदिलाच्या…
किंवा चुलीतील आगीच्या उजेडात
तू स्वयंपाक करत असायचीस…
त्यावेळी आठवणीने आम्हाला
वाचायला लावायचीस… तेही मोठ्याने…
तू फारशी शिकलेली नव्हतीस…
पण आम्ही वाचताना…
तू लक्ष देऊन ऐकायचीस…
आमचा उच्चार चुकला तर, तेथूनच सांगायचीस…
‘स्वत: शाळा शिकलेली नसताना
तुला हे कसे कळते’ हा प्रश्न
त्या वेळीही मनात असायचा…
त्या तुझ्या प्रयोगानेच
माझे वाचन चांगले झाले…
 
माझे ते वाचन ऐकून
गावच्या पोथी वाचनाचे मला निमंत्रण आले…
गावात हरिविजय, रामविजय, नवनाथाची
पोथी सुरू असायची…
तू कधी जायची नाहीस ते ऐकायला…
कारण कामच तुझ्यासाठी देव असावा…
पण…
मी पोथी वाचू लागलो आणि
ते ऐकायला मात्र तू यायला लागलीस…
माझ्या पोथी वाचनाचे,
माझ्यासमोर क्वचितच कौतुक करायचीस…
मात्र इतरांनी केलेले कौतुक तुला सुखवायचे…
तुझ्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसायचे…
 
मला पोहायलाही तूच शिकवलेस…
खोल पाण्याची मला फार भिती वाटायची…
मी पोहायला जायचो नाही…
तू शेवरीची लाकडे मिळवलास…
बिंडा बांधून घेतलास…
बेसावध असताना माझ्या पाठीला बांधून
पाण्यात ढकललेस…
काही दिवस कमरेला कासरा बांधून तर…
काही दिवस भोपळ्याचा बिंडा बांधून…
मी ओरडायचो… गोंधळ घालायचो…
तुला पळवायचो…
पण तू काही हट्ट सोडला नाहीस…
मला पोहायला शिकवलेसच…
स्वतंत्रपणे पोहायला शिकलो तरी…
तुझे लक्ष आमच्या खोड्याकडे असायचे…
आम्ही चांगले तेवढेच घ्यावे…
असा तुझा आग्रह असायचा…
 
माझ्या पाठोपाठ धाकटा भाऊ जन्मला…
‘त्याच्याकडे लक्ष देताना माझ्याकडे
दुर्लक्ष झाले’, असे तू म्हणायचीस…
पण तुला सर्वांसाठी इतके राबताना पाहून
माझ्या मनाला ते कधीच पटले नाही…
तुझ्या कायम कामात असणाऱ्या हातांनी
कधीच कोणाकडे दुर्लक्ष केले नाही…
मग माझ्याकडे तुझे दुर्लक्ष झाले…
हे तुझे म्हणणे मला पटणार कसे…
 
१९८२च्या रामनवमीचा दिवस
शेतात ज्वारीचे खळे होते…
तुला मजुरांसह सर्वांचा स्वयंपाक करायचा होता…
त्याचेच दळण आणायला आम्ही गेलो…
वेळ असल्याने, कट्ट्यावर बसलो
खालच्या पट्ट्याला चुकून अंगठा लागला…
गंमत वाटली…
म्हणून पुन्हापुन्हा धावत्या पट्ट्याला
पायाचे बोट लावत राहिलो…
आणि…
गिरणीच्या पट्ट्यात सापडलो…
त्यातून वाचलो,
पण…
सगळे अंग सोलून निघाले…
अंगावर जखम नाही, असा भाग नव्हता…
त्यावेळी त्या जखमांच्या माझ्यापेक्षा
तुलाच जास्त वेदना होत असाव्यात…
त्यावेळी जखमांवर मलम लावतानाचा तुझा स्पर्श…
आजही स्पष्ट जाणवतो…
 
पारिजातकाची फुले मला फार आवडायची
निळकंठेश्वराच्या मंदिरातील झाडाची फुले…
ओल्या रूमालातून, घरी आणायचा प्रयत्न केला…
घरी येईपर्यंत सर्व फुलांचे पाणी झालेले…
ते पाहून मी रडू लागल्यावर…
‘जितकी फुले नाजूक, सुंदर…
तितकीच ती अल्पायुषी’
हे किती सहज समजावले होतेस तू…
 
कोणाविरूद्ध राग धरायचा नाही,
खोटे कधी बोलायचे नाही,
कोणाला नावे ठेवायची नाहीत,
आपले काम करत राहायचे…
नावे ठेवणाराचे तोंड काम बंद करते…
माणूस बोलण्याने नाही,
तर, कामाने मोठा होतो…
लोकांचा विचार करत बसलं तर…
वेळही वाया जातो…
आपलेही विचार वाईट बनतात…
कामात मन गुंतवले
की वेळ सत्कारणी लागतो…
कामही आणखी शिकवत जातं…
माणूस घडत जातो… चौरंगी चिऱ्यासारखा…
कोणत्याही अंगाने तो भिंतीत बसवता येतो…
ही शिकवणही तुझीच…
नावे ठेवणाऱ्यांना आपले कामच उत्तर देते…
किती मोठे तत्त्वज्ञान, सहज सांगायचीस…
 
चार सुनांची सासू तू…
पण त्यांचीही आई होण्याकडे तुझा कल…
शहरात राहणाऱ्या सुनांना…
मुलीसारखे जपायचा,
तुझा प्रयत्न असायचा…
सुनांबद्दल त्यांच्यासमोरच नाही
तर पाठीमागेही कधी वावगे बोलली नाहीस…
सुना घरात आहेत म्हणून
तुझे हात कधी थांबले नाहीत…
काम सुरूच असायचे…
अंगमेहनतीची कामे स्वत: करताना
‘गावाकडचे काम पोरींना कस जमणार’ म्हणत
स्वत:च राबत असायचीस…
 
माझा पाय मोडल्यामुळे
२०१६मध्ये दिवाळीला गावी आलो नाही
तर, तू किती कासावीस झालीस…
मी यावे… तुला भेटावे एवढीच तुझी अपेक्षा…
पाय मोडल्याचं मुद्दामच तुला सांगितलं नव्हतं…
पण सेरिकल्चरच्या कार्यशाळेला आलेल्या
भाच्याकडून ही बातमी तुला समजली…
तू सारखी आठवण काढू लागल्याच समजल्यावर…
मी भेटायला आलो…
तेव्हा मोडलेल्या पायावरून अलवार
फिरलेला तुझा हात…
तसाच आहे, असं आजही जाणवतं…
 
कोणाकडून तुझी कसलीच अपेक्षा नव्हती…
स्वत: होऊन काही आणलंच तर…
‘कशाला खर्च केला?’ असे विचारायचीस…
आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये
हाच तुझा प्रयत्न असायचा…
तू येणाऱ्यांचे मात्र निगुतीने करायचीस…
तुझ्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाची तू सावली व्हायचीस…
तुला त्रास देणाऱ्या… नावे ठेवणाऱ्यांसाठीही…
कोणताही भेदभाव न करता…
कोणतीही कुरकूर न करता…
सारे काही प्रेमाने करत असायचीस…
झाडही असेच असते ना…
स्वत:चे दु:खही कधीच न सांगता…
फुलांचा गंध देते…
भुकेलेल्यांना फळे देते…
वाटसरूला सावली देते…
तूही अगदी तशीच होतीस…
स्वत:साठी काहीही न मागता…
सर्वांना सारं काही देणारी…
अगदी झाडासारखी…!


२१ टिप्पण्या:

  1. एवढे दिवस आईच्या सावलीत रहाण्याचा योग हे सुद्धा आपले भाग्य आहे. आता उन्हात उभे राहण्याची वेळ आपली आहे. ध्रद्धांनजली

    उत्तर द्याहटवा
  2. कोणतीही संवेदनशील व्यक्ती पाहिली की आईने चांगले संस्कार केले आहेत असा आईचा उद्धार होतो. आज 'आक्का' वाचल्यावर याची पुन्हा प्रचिती येते आहे. आक्कांना भावपूर्ण श्रद्धांजली..🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  3. सर,आईच्या आठवणी या झंझावातासारख्या असतात. त्या कधीही आणि कुठूनही येतात.आपण आईच्या आठवणी अगदी भावनिकपणे सांगितल्या आहेत. साऱ्या जगण्याचं सार आई असते.झाडाची उपमा देवून सारं दुसऱ्यासाठी करणारी आई चित्रीत केलीय.एकांतात वाचताना गहिवरुन येतय...

    उत्तर द्याहटवा
  4. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. आई ही आयुष्यभराची न संपणारी शिदोरी असते. तुम्ही खूप अंतकरणापासून व्यक्त झाला आहात. खूप हृदयस्पर्शी लिहिले आहे. माझी खालील कविता आक्का नावाच्या झाडाच्या सावलीत समर्पित करीत आहे.
    🙏🏻💐💐💐💐💐🙏🏻

    तीच अखेरीस देव झाली
    --------0--------
    आई लांबच्या शेतात जायची,
    चालत बहूतेकदा अनवाणी.
    शेतात कष्ट उपसताना,
    प्यायलाही मिळायचे नाही पाणी.

    आम्हा चिल्या पिल्यांच करताना,
    थकायची नाही चिडायचीही नाही.
    सर्व जगातली अवघी ममता,
    एकवटली होती तिच्या ठायी.

    आम्हासाठी कोंड्याचा मांडा रांधताना,
    चुलीतल्या लाकडासम जळायची.
    तिची तेंव्हाची ती तगमग,
    माझ्या इवल्या जीवालाही कळायची.

    आणि ठरवलं होत मी तेंव्हाच,
    तिच्या वृधत्वाची व्हायच मी काठी.
    ध्येय घेउन चालत होतो मी पुढे,
    ती मात्र निघून गेली पाठच्या पाठी.

    तिर्थ यात्रेला गेली नाही कधी,
    स्वर्गच आणला होता तिने खाली.
    आमच्यातच देव शोधता शोधता,
    तीच अखेरीस देव झाली.
    -------***-------
    कवी:- जे.डी. भुसारे.

    उत्तर द्याहटवा
  6. ती अखेरीस देव झाली!! 🌹🌹
    आईना विनम्र वंदन!! भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
    खूप सुंदर व्यक्त झाला आहात सर ! मन भरून आलं!!!

    उत्तर द्याहटवा
  7. भावनांचा कल्लोळ.......
    अक्षरशः माझी आई समोर दिसत होती....
    आज मी ही आई विना पोरका आहे...
    खरंच किती निस्वार्थी प्रेम असतं आपल्या आईचं...
    विनम्र अभिवादन....

    उत्तर द्याहटवा
  8. सर, तुम्ही साक्षात आक्कांनाच आमच्या समोर उभा केलंत.. विनम्र अभिवादन...

    उत्तर द्याहटवा
  9. खूपच छान लिखाण. मला माझ्या आईची आठवण झाली.

    उत्तर द्याहटवा
  10. आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. लौकीक अर्थाने या जगात येण्याआधीच आई आपल्या रक्तामांसाने आपले भरण पोषण करते, नंतर जग दाखवते. मातृदिनानिमित्त विनम्र अभिवादन

    उत्तर द्याहटवा
  11. आई झाडाची सावली. मातृदिन निमित्ताने सर्वांच्याच भावना आपण शब्दात व्यक्त केल्या आहेत. विनम्र अभिवादन

    उत्तर द्याहटवा
  12. विनम्र आदरांजली. शब्द चित्र प्रत्यक्ष तुमच्या आईचे दर्शन घडविते.

    उत्तर द्याहटवा
  13. सर
    किती सुंदर भावना नी आठवणी सांगितल्यात तुम्ही वाचताना डोळ्यातून पाणी आल आपण कितीही वयाने मोठे झालो तरीही त्या माउलीला आपलं मुलं अजूनही खूप लहानच आहे असच वाटत. तिच्या आठवणीत रमताना आपण खरंच बरंच काही गमावलं ही भावना तीव्र होते. आईबद्दल कितीजरी लिहायचं बोलायचं म्हणतो तेव्हा शब्द अपुरेच पडतात. खूप सुंदर लिहिलंय सर तुम्ही. तुमचे नेहमीचे लेख वाचताना त्याबद्दल खूप काही सांगावस वाटत पण मात्र हा लेख वाचताना खूप वाईट वाटल.

    उत्तर द्याहटवा
  14. सर,
    खरोखर तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला अशी आई नव्हे माऊली लाभली.त्यांनी केलेल्या कष्टाला सलाम. सर हा माऊलीने दिलेला ठेवा कादंबरी स्वरूपात सर्वांसमोर यावा. कारण तुमचे लेखन समोर चित्र निर्माण करते. म्हणजे आम्ही पण त्यावेळेचे साक्षीदार आहोत असे वाटायला लागते.आणि साक्षातकार सर्वांना होऊदे. माऊलीला आदरांजली

    उत्तर द्याहटवा
  15. प्रिय डॉ. व्ही. एन्. ,
    1906 मधे माक्सिम गॉर्कीच्या 'आई' ही कादंबरी ला तत्कालीन सोविएत शासनाने 'समाजवादी वास्तववाद' आणणारी पहिली कादंबरी म्हणून गौरविले. नंतर 1932 मधे श्रेष्ठ जर्मन नाटककार बर्तोल्त ब्रेख्त ने त्या कादंबरीवर आधारित 'मदर करेज' नावाचे नाटक लिहीले. (त्याच्या 'कॉकेशियन चॉक सर्कल' चे चिं. त्र्यं. खानोलकर यांनी 'अजब न्याय वर्तुळाचा' असे रूपांतर केले. पु. लं. नी त्याच्या 'थ्री पेनी ऑपेरा' चे 'तीन पैशांचा' तमाशा केले). रशियन सामाजिक क्रांती 'आई' मुळे झाली असे मानतात.
    साने गूरूजींवर देखील 'आई' चा प्रभाव होता. माधव ज्यूलियनांची कविता 'प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधु आई, बोलावुं तूज आता मी कोणत्या उपायी' ही सर्वज्ञात आहे कारण स्व लता दीदींनी ती गायली आहे.
    हे सर्व इथे सांगायचे कारण तुमचे आईवरील हे भाव काव्य या साहित्य कृतींची आठवण करून देणारे आहे. सोपानदेव चौधरींनी त्यांच्या आईची म्हणजे बहिणाबाईंची गाणी लिहून काढली नसती तर जनाबाईंनंतरची महान कवयित्री जगासमोर आलीच नसती. तुम्ही हे लिहीले नसते तर जगासमोर अक्कासारखी महान कर्तबगार स्त्री आलीच नसती.
    देवाने स्वत:ची प्रतिमा म्हणून माणूस तयार केला असे बायबल सांगते. त्याप्रमाणे अक्कांची प्रतिमा म्हणजे तुम्ही आहात.मला वर्ड फाइल पाठवा या कवितेची.
    भाषा अध्ययन, अध्यापन हे ज्यांचे काम आहे असे माझ्यासारखे लोक ए पी आय , पगार वाढ यांपुरते संकलित आणि फुटकळ लेखन सोडून काहीही लिहीत नाहीत असे असताना प्रशासकीय कामातून आपण एवढे अर्थगर्भ तसेच भावनेला साद घालणारे लेखन करीत आहात ही गोष्ट खूपच स्पृहणीय आहे. तीच खरी आणि माझे हे चार शब्द हीच खरी स्व अक्कांना श्रद्धांजली

    उत्तर द्याहटवा
  16. आपल्या आईविषयीचा आवेग या कवितेत अंत:करणापासून व्यक्त झाला आहे. आईविषयी आजवर अनेकांनी आपल्या भावना कवितेच्या रूपाने व्यक्त केल्या आहेत; पण गद्य पद्य मिश्रित कवितेचा उत्कृष्ट नमुना म्हणून या कवितेकडे पाहता येईल.
    आईचं आपल्या जीवनात असणं हे जीवनाला उभारी येण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. तिचं असणं हीच आपल्या कर्तृत्वाची खरी प्रेरणा आहे. ह्या बरोबर आपल्या मुलांच्या मोठेपणासाठी तिच्या जिवाचा होणारा आटापिटा, गरिबीला झाकून आपल्या मुलावर संस्कार करणारी आई, संसारी जीवनात तितकीच राकट आणि स्वाभिमानी आहे याचा दाखला या कवितेतून मिळतो.

    उत्तर द्याहटवा
  17. सर आई विषयी छान माहिती सांगितली आहे

    उत्तर द्याहटवा
  18. सर, आई विषयी खूप छान शब्दकांन, कविता वाचताना माझ्या आईच्या स्मृती जाग्या झाल्या

    उत्तर द्याहटवा
  19. विनम्र आदरांजली.....
    (एकांतात वाचताना गहिवरुन येईल इतकं आईविषयी व त्यांच्या सहवासातील क्षणांचे प्रभावी शब्दांकन)🙏

    उत्तर द्याहटवा