बुधवार, ९ डिसेंबर, २०२०

… कसा पिसारा फुलला!

लहान असो किंवा थोर, स्त्री असो किंवा पुरुष; मोरपीस कुठे पडलेले दिसले तर ते उचलून न घेणारा माणूस विरळाच. त्याचा नेमका रंग ओळखता येत नाही, अशा रंगांनी रंगलेले मोरपीस. वेगळ्या कोनातून, दिशेतून पाहिले तर रंग बदलणारे मोरपीस. मोरपंखांचे मूळ रंग काहीही असोत, त्याचे सौंदर्य मनमोहक, नजर खिळवून ठेवणारे आहे. मोरपंखांचा मूळ रंग तांबूस असतो. मात्र ते निळा, हिरवा, शेवाळी असे अनेक रंग दाखवते. खरं तर मोरपिस हे निसर्गाच्या रंग विभ्रमाचे विलोभनिय उदाहरण. या मोरपंखाच्या सौंदर्यामागील विज्ञान, मोर आणि लांडोरीविषयी….
__________________________________________________________________

लहान असो किंवा थोर, स्त्री असो किंवा पुरुष; मोरपीस कुठे पडलेले दिसले तर ते उचलून न घेणारा माणूस विरळाच. मोरपीस किंवा मोरपंख आबालवृद्धांना आवडते. नेमका रंग ओळखता येत नाही, अशा रंगांनी रंगलेले मोरपीस. वेगळ्या कोनातून, दिशेतून पाहिले तर रंग बदलणारे मोरपीस. रंग बदलणारी माणसे कोणालाच आवडत नाहीत; मात्र, रंग बदलणारे मोरपीस सर्वांच्या मनात बसलेले असते. मोरपंखाचे रंग आणि रूप आहेच मुळी मनाला भुरळ घालणारे!

मोर. भारत आणि म्यानमार या दोन देशांचा राष्ट्रीय पक्षी. हंस, सारस, ब्राम्हणी बदक या पक्ष्यांना तगडी लढत देऊन २६ जानेवारी १९६३ रोजी मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी बनला. भारतीय दंतकथेनुसार किंवा पुराणातील वर्णनांमध्ये मोर गरूडाच्या पिसांपासून बनला, असे मानले जाते. सुरुवातीला मोराचे पंख इतके आकर्षक नव्हते, असे म्हणतात. एकदा इंद्र आणि रावण यांच्यात घनघोर युद्ध सुरू होते. रावणाच्या रागापुढे इंद्र देवाला जिंकणे कठीण दिसत होते. अशा वेळी मोराने आपला पिसारा फुलवला आणि इंद्राला रावणाच्या नजरेपासून लपवले. इंद्राची रावणाच्या रागापासून सुटका केली. याचे बक्षीस म्हणून इंद्राने मोराचे पंख सुंदर बनवले, अशी आख्यायिका आहे. त्यानंतर इंद्राने आपल्या आसनावरही मयूर पंख बसवले. त्याचे सरस्वतीशीही नाते आहे. सरस्वतीला विद्येची देवता मानली जाते. कदाचित पूर्वी मोरपिसांचा वापर लेखनासाठी केला जात असल्याने हे नाते जोडले गेले असावे. मोराला सरस्वतीचे वाहन मानले जाते. सरस्वतीप्रमाणेच भारतीय पुराणामध्ये मोर गणपतीचे ज्येष्ठ बंधू कार्तिकेय यांचेही वाहन आहे. 

       मोरपंखाला सर्व धर्मांमध्ये पवित्र मानले जाते. मोरपंखांचा संबंध लक्ष्मीशीही आहे. श्रीकृष्णाच्या डोक्यावर कायम मयूरपंख विराजमान असते. श्रीकृष्णाच्या बासरीलाही मोरपंख बसवलेले असते. एकदा श्रीकृष्ण तल्लीन होऊन बासरी वाजवत होते. त्या बासरीच्या वादनाने सर्व सजीव मंत्रमुग्ध झाले, डोलू लागले. हे सुरेल बासरी वादन ऐकल्यानंतर मोराच्या राजाने श्रीकृष्णाच्या डोक्यावर मोरपंख बसवले. मोरपंखाला काळाचे प्रतीक मानले जाते. खेड्यांमधून सुप्रभाती देवाची सुमधूर आवाजात गाणी गात फिरणारे वासुदेव मोरपंखांचे टोप बनवतात, ते डोक्यावर धारण करतात. टोपाच्या खालच्या बाजूला डोळा बाहेरून दिसेलशी मोरपिसे लावलेली असतात. त्याच्या वरती मोरपंखाचा दांड्याच्या गोलाकार रचना केलेली असते. मोरपिसे टोपाला आकर्षक बनवतात. खानदेशातही देवी नाचवणे हा धार्मिक कार्यक्रम असतो.  देवीचे भक्त मोरपंखाचा मुखवटा डोक्यावर धारण करतात. जिभ लाल केली जाते. हातात त्रिशुल घेतलेले असते. देवीच्या मोहक रूपाला मोरपिसांचा मुखवट अधिकच सुंदर बनवतो.  

बौद्ध धर्मामध्ये मोरपंखाला विचारांच्या खुलेपणाचे प्रतीक मानले जाते. जैन धर्मामध्येही मोरपंखाला अनन्य साधारण महत्त्व आहे. मोरपंखापासून पिच्छी किंवा पिंची बनवतात. जैन धर्मियांतील दिगंबर साधूची ओळख ही पिच्छी असते. दीक्षा देताना आचार्य आपल्या शिष्याला पिच्छी देतात. जाताना किंवा एखाद्या ठिकाणी आसन ग्रहण करताना, या पिच्छीने जागा साफ केली जाते, ज्यामुळे तेथे असणारे जीव हळुवारपणे बाजूला जातील आणि त्यांना इजा पोहोचणार नाही. पिच्छी बनवण्यासाठी मोरपंख निवडण्यामागे त्याचा मुलायमपणा आणि सौंदर्यासोबत, त्याचे टिकाऊपण हे महत्त्वाचे कारण आहे. त्याचप्रमाणे मोरपंख कधीही धुळीने मलूल होत नाही, ते घर्मबिंदूंनीही खराब होत नाही, ते नेहमी स्वच्छ दिसतात आणि असतात.  

ग्रीक पुराणकथेनुसार हेरा या देवतेने मोराच्या पंखांमध्ये डोळा निर्माण केला. मोराची शेपटी स्वर्गातील तिजोरीचे प्रतीक, तर, पंखावरील डोळे ताऱ्यांचे प्रतीक मानतात. मोरांची एक जोडी हेरा या देवतेचा रथ ओढत असे. मोरपंख लवकर कुजत नाहीत. त्यामुळे त्याला अमरत्वाचे प्रतीक मानत. ख्रिस्त धर्मीय त्याला अमरत्व आणि अध्यात्मिक शिक्षणाचे प्रतीक मानतात. इस्लाम धर्मीय फकिर आपल्या हातातील पात्रात जळणारा धुप मोरपिसांच्या पंख्याने फुलवून धूर सर्वत्र पसरवतात. लहानपणी आम्ही या फकिराजवळ जाणीवपूर्वक जायचो. त्याच्या थाळीमध्ये पाच पैशाचे नाणे टाकायचो. ते फकिरही प्रेमाने आमच्या तोंडावरून मयूर पंखाचा पंखा फिरवायचे. तो मऊ, मुलायम स्पर्श हवाहवासा वाटायचा. मशिदीमध्ये आशिर्वाद देण्यासाठी मोरपंखांचा बांधलेला गठ्ठा वापरला जातो. यहुदी धर्मीय लोक परमेश्वराचे सात अवतार मानतात. त्यातील मयुरावतार सर्वात शक्तीमान अवतार असल्याची त्यांची धारणा आहे. त्यामुळे मोरांची आणि मोरपंखाची ते पूजा करतात. इजिप्तची न्यायदेवता मॅट ही मोराच्या पंखांचे वजन हृदयासोबत करते, असे मानतात. ‘आपण केलेला न्याय इतका अचूक आणि हळूवार असावा. यासाठी आपले मन तसे असायला हवे’, यासाठी ती आपल्या हृदयाची मयूर पंखाशी तुला करते. सर्वच धर्मामध्ये मोरपंखांचा संबध हा शांती, प्रगती, सधनता आणि अध्यात्माशी जोडण्यात आला आहे. ग्रामीण भागातील लोक मोराच्या अन्न आणि पाण्याची सोय करतात. काही गावात मोराला ईजा पोहोचवणे पाप मानतात. त्यातून त्या गावात मोरांची संख्या खूप वाढली आहे. ‘मोराची चिंचोली’ अशी काही गावांची मोर ही ओळख बनला आहे. भारतात मोराला मारणे, त्याचे मांस खाणे, बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे.

अनेक राजे-रजवाड्यांनी मोरपंखांच्या आणि मोरांच्या मूर्ती उभ्या केल्या. बादशहा शहाजहान याचे आसन मयुरासन म्हणून ओळखले जात असे. अनेक जुन्या मंदिरांवर आणि राजवाड्यांवर मोरांच्या मूर्ती बसवलेल्या आढळून येतात. पाश्चात्य राष्ट्रातील नागरिक मात्र अनेक वर्षे मोरपंखाला दुर्भाग्याचे प्रतीक मानत. आज हा गैरसमज दूर झाला आहे. उलट सौंदर्य आणि उच्चभ्रूपणाचे प्रतीक म्हणून मोर पंखांचे टॅट्यू बनवण्याची ‘फॅशन’ आली आहे.

         मराठी, हिंदी भाषेतील मोर किंवा मयूर, संस्कृतमधील मयूर किंवा मयूर:, इंग्रजीतील पिकॉक, हा एक कुक्कुटवर्गीय पक्षी आहे. मोर हा नर असतो, अन् त्याची जोडीदार लांडोर. तिला इंग्रजीत पीहेन म्हणतात. एक लांडोर वर्षातून एकदा चार ते पाच अंडी घालते. अंडी घालण्यासाठी लांडोर जमिनीवरच घर बनवते. गवत, काड्यांचे ते उथळ घरटे असते. लांडोर ती अंडी अठ्ठावीस दिवस उबवते. त्यानंतर पिल्लं बाहेर येतात. काही लोक रानातील मोरांची अंडी आणतात. ती कोंबडीच्या अंड्यात मिसळून उबवतात आणि मोराची पिल्ले मिळवतात. मात्र असे करणे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. सुरुवातीला नर आणि मादी पिल्ले सारखीच असतात. आठ महिन्यांची होताच पिल्ले आईला सोडून स्वतंत्र राहू लागतात. त्यामुळे दरवर्षी एका लांडोरीपासून चार ते पाच नवे मोर, लांडोर तयार होतात. साधारण अडीच वर्षांनंतर मोर आणि लांडोरीमध्ये फरक दिसायला लागतो. विशेषत: मानेवरील रंग आणि डोक्यावरील तुरा हा फरक स्पष्ट करायला लागतो. मोर पिल्ले यानंतर मोठ्या मोरांप्रमाणे वागायला, नाचायला सुरुवात करतात. मोराची पूर्ण वाढ होऊन त्याला मोरपिसे येण्यास चार वर्षांचा काळ लागतो. त्यानंतर तो स्वतंत्र गट करून राहतो. मोर आणि लांडोर हे कीटक, धान्य आणि गवत, वनस्पतीच्या बिया खातात. मोर हा सापांचा शत्रू मानला जातो.

लांडोर आकाराने लहान असते. तिला शेपटीभोवती पिसारा नसतो. तिची मानही हिरवट रंगाची असते. गळ्यावरील हिरव्या रंगाच्या भागानंतर पोटाचा भाग पांढरा असतो. तिला आकर्षक बनण्याचे कारणही नसते, कारण जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य मोराला नसून, लांडोरीला असते. निसर्गात माणूस वगळता सर्वसाधारणपणे सर्व पशूपक्ष्यांमध्ये नर सुंदर आढळतात. लांडोरीच्या डोक्यावरील तुराही आकर्षक नसतो. त्यामुळे ती मोराइतकी सुंदर नसते. तिच्या शेपटीभोवती मोरासारखे आकर्षक पंखांचे आवरणही नसते. 

       मोराचे वजन चार ते सहा किलो असते. मोराची चोच त्याच्या आकाराच्या मानाने छोटी, पण धारदार असते. त्याच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो. भारतातील मोरपंखांचा डोळा निळा असतो. ब्रम्हदेश आणि इतर काही देशांमध्ये हिरव्या डोळ्यांचे मोर आढळतात. शेपटीभोवतीचे पंख पांढरे असणारे मोरही आढळतात. मात्र ते जनुकीय बदलातून निर्माण झाल्याचे मानले जाते. मानेवर दाट निळ्या रंगाचे केशावरण असते. मोराचे पोटही निळ्या रंगानेच झाकलेले असते. त्याच्या शरीरावरील उडण्याच्या पंखांचे रंग वगळता इतर सर्व रंगांमध्ये एक चमक असते. मोर हा सर्वांग सुंदर असतो. या सौंदर्याला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून की काय मोराचे पाय मात्र साधेच असतात. काळसर करड्या किंवा पिवळ्या, खडबडीत पायाला चारच बोटे असतात. मात्र पायातील काटकपणा लाजवाब असतो. दुसरे या पायाला असणारी चार बोटे आणि त्यावरील नखे अगदी पूर्ण वाढ झालेल्या सापालाही जेरबंद करू शकतील, अशा ताकतीची असतात. 

मोराच्या पाठीवरील पंखांचा रंग तपकिरी किंवा काळा आणि पांढरा असा असतो. या पंखांची लांबी फुट-दीडफुटांपेक्षा जास्त नसते. हे पंख केवळ उडण्यासाठी उपयुक्त असतात. मोर यांचा वापर करून ताशी बारा किलोमीटर वेगाने उडू शकतो. उडताना मोर आपले पाय पोटाजवळ घेतो. उडताना सुरुवातीला तो थोडा धडपडतो, मात्र त्या नंतरचे मार्गक्रमण सफाईने करतो. त्या पंखाच्या खाली निळसर-हिरव्या रंगाची केसाळ पिसे असतात. मात्र ती क्वचित दिसतात. या पंखांचा महत्त्वाचा भाग संपला की काळ्या-पांढऱ्या रंगाच्या पिसांची दीड फुट लांबीची शेपटी असते. या शेपटीवर मोर पिसाऱ्यातील नयनरम्य पंखांचे आवरण असते.

मोराच्या डोक्यावरील तुऱ्यापेक्षाही त्याच्या शेपटीभोवती असणारी डोळेदार पिसे ही खऱ्या अर्थाने आपल्याला प्रिय असतात. या पिसांमुळेच मोर सर्वांना आवडतो. शेपटीवरील आवरणामध्ये तीन प्रकारची पिसे असतात. यातील डोळा असणारी पिसे सर्वाधिक लोकप्रिय असतात. या पिसांची लांबी पाउण फुटांपासून ते पाच फुटापर्यंत असते. ही पिसारा फुलवल्यानंतर विशिष्ट ठिकाणी दिसावीत अशा पद्धतीने ही लांबी बदलते. त्यानंतर ‘तलवार’ पिसे. या पिसांचा आकार तलवारीसारखा असतो. मोराच्या पिसाऱ्याच्या कडेला खालच्या बाजूला ही पिसे असतात. या पिसांच्या दांड्यावर एकाचं बाजूला केसाळ रचना आढळते. या पिसांची लांबीही बदलत असते. लोकप्रियतेत ही दुसऱ्या क्रमांकावर असतात. या तलवार पंखावर कधी कधी अर्धवट विकसित झालेला डोळाही आढळतो. पिसारा फुलवल्यानंतर ही पिसे दोन्ही बाजूला विभागतात आणि सुंदर कडा दिसते. तलवार पंखांचा रंग दोन्ही बाजूला सारखाच असतो. तिसरा प्रकार असतो तो कत्री पिसांचा. यांना ‘चंद्रकोर’ही म्हणतात. इंग्रजीत या पिसांना ‘टी फिदर’ म्हणतात. ही आकाराने डोळा पिसासारखी असतात. यांची लांबी सर्वाधिक असते. पिसाऱ्यात सर्वात वर ही पिसे दिसतात. डोळा पंख आणि कत्री पंख मात्र पुढच्या बाजूला वेगळा आणि मागील बाजूला वेगळा रंग दाखवतात. कत्री पंखांमध्ये डोळ्याचा आकर्षक भाग नसतो. उड्डाण पुलांसाठी बांधल्या जाणाऱ्या खांबांची रचना या पिसाप्रमाणे असते. टी आकाराची पिसे क्वचितच जमवली जातात. याशिवाय अगदी छोटी असंख्य पिसे असतात. त्यांच्या टोकाला मोरपंखी रंग आलेला असतो. अशा प्रकारची पिसे अन्य पक्ष्यानांही असतात. त्यामुळे त्याकडे आपले लक्ष जात नाही. काही उडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पंखानांही मोरपंखी रंगाची लागण होते. मात्र असे पंखही जास्त नसतात. शेपटीभोवती असे साधारण २०० रंगीत पंखांचे आवरण असते. यात डोळा असणाऱ्या पिसांची व तलवार पिसांची संख्या साधारण १७० असते. कत्री पिसे तीसच्या आसपास असतात. कत्री पिसेही डोळा असणारीच असावीत, मात्र त्यांची लांबी सर्वाधिक असल्याने त्यांच्या पुढचा भाग झिजून कत्री बनत असावा. शरीराच्या एकूण लांबीच्या किमान साठ टक्के भाग हा शेपटीभोवतीचा पिसाराच्या असतो.

मोरांचे वास्तव्य हे झाडे-झुडुपे असणाऱ्या भागात असते. विरळ मनुष्य वस्तीतही मोर राहतात. जंगलांची संख्या कमी झाल्याने मोठी जागा आणि विरळ लोकवस्ती, भरपूर झाडे असणाऱ्या भागात ते राहू लागले आहेत. महाराष्ट्राचे राजभवन हे मुंबईसारख्या दाट लोकसंख्येचे शहरात आहे. मात्र राजभवन परिसरात लोकवस्ती कमी आणि भरपूर झाडे असल्याने मोर राहतात. मोर ज्या भागात असतात त्या भागात त्यांचा ‘मियाँव’ असा आवाज सकाळ, संध्याकाळी ऐकावयास मिळतो. मोराच्या या ओरडण्यास ‘केका’ किंवा केकारव असे म्हणतात. कवी मोरोपंतानी ‘केकावली’ लिहिली. मोरोपंत म्हणजे मयूर पंडीत. केका म्हणजे मोराचा आवाज. आवली म्हणजे शृंखला किंवा माळ. मोरापंतांचा आवाज (काव्य शृंखला) म्हणजे केकावली असे मानले जाते. मोर हा अतिशय सावध पक्षी आहे. एखादा सवयीचा नसणारा आवाज झाला किंवा त्यांच्या शत्रूपैकी कोणी दिसले, तरीही मोरांचे ओरडणे ऐकावयास मिळते. हे आपल्या इतर साथीदारांना सावध करण्यासाठी असते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीचे मोरांचे मोठ्याने ओरडणे, हे मात्र प्रियेला साद घालण्यासाठी असतात.

आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली की त्यांचा विणीचा हंगाम सुरू होतो. मोर ओरडू लागतात. मोराला केवळ ओरडून चालत नाही, म्हणून तो पिसारा फुलवायला सुरुवात करतो. मोर हळूहळू पिसारा फुलवतो. पिसांना आपल्या मुख्य शरीराशी काटकोन करेपर्यंत वर नेतो. पिसाऱ्यासोबत त्याची शेपटी पाठीमागे वर जाते. पिसे फुलवताना विशिष्ट असा सळसळ आवाज ऐकायला येतो. पिसे वर गेली की तो एक पाय हलवत नाचू लागतो. नाचताना ‘मियाँव’ असा अधूनमधून आवाज काढतो. मोरामध्ये पिसारा एका सेकंदात सव्वीस वेळा कंप करण्याची क्षमता असते. या कंपनातून तो मानवाला ऐकता न येणारे आवाजही काढतो. जणू ‘मी सुंदर अविष्कार सादर करतोय, खास तुमच्यासाठी. तो पाहायला या, माझ्या कलेला दाद द्या, या, या’, अशी साद समस्त लांडोरींना घालत असतो. यातील मिलनोत्सुक लांडोरी सावकाश तेथे पोहोचतात. मोराचा नाच पाहतात. त्याच्या पिसाऱ्याच्या आकार, पंखातील डोळ्यांचा आकार, हे सारे प्रभावित करणारे असेल, लांडोरीला ते आवडले; तर, ती त्याला पसंत करते. त्याच्याभोवती घुटमळत राहते. तिचे ‘थांबणे’ पाहून मोर ओळखतो की तिने आपल्याला वरले आहे आणि मग त्यांचे मिलन होते. मोराचे मिलनही इतर कुक्कुटवर्गीय पक्ष्याप्रमाणे होते. मोर नाचताना अश्रू ढाळतो, ते अश्रू लांडोर पिते आणि नंतर अंडी घालते. ही निव्वळ कवी कल्पना आहे. ज्यांना यात रमायचे ते रमोत. मात्र यामध्ये कोणतेही वैज्ञानिक सत्य नाही. एका मोराला चार ते पाच लांडोरी पसंत करतात. मात्र एखाद्या मोराला एकही जोडीदार मिळत नाही. त्यामुळे मोराला खूप वेळ नृत्यकला सादर करत बसावे लागते. लांडोरीना साद घालण्यापलिकडे मोराला काहीही आवाज नसतो. सखीला आकर्षित करण्यासाठी नाचताना हा पिसारा मोराच्या कामी येतो. या एका कारणासाठी या सुंदर पिसाऱ्याची निर्मिती झाली आहे. मोरही वर्षभर हा भला मोठा पिसारा केवळ याच कारणासाठी सांभाळत असतो. मोरांचे नाचणे पावसाळाभर सुरू असते.  

       मोराच्या प्रणयाराधनेत महत्त्वाची भूमिका मोरपंख बजावतात. आपले काम झाल्यांनतर शेपटीभोवतीची सर्व पिसे गळायला सुरूवात होते. मोराला वीस ते पंचवीस वर्षांचे आयुष्य लाभते. पहिली चार वर्ष वगळता, दरवर्षी हे घडत असते. महाराष्ट्रातील पावसाळा सप्टेंबरअखेर संपतो. त्यानंतर हे मोरपंख आपोआप गळू लागतात. साधारण नोव्हेंबरपर्यंत शेपटीभोवतीचे सर्व पंख झडतात आणि पुन्हा नवीन पंखांच्या आवरणाने शेपटी संरक्षित केली जाते.

मोरांच्या पंखात मँगेनिज, लोह, तांबे आणि जस्ताचे प्रमाण भरपूर असते. मयूर पंखाच्या राखेमध्ये पाऱ्याचे अंशही आढळतात. मोरपिसांची राख काही आयुर्वेदीक औषधामध्ये वापरली जाते. तसेच मोरपिसांचे टोक ॲक्युप्रेशर उपचार पद्धतीमध्ये वापरता. मोराच्या शेपटीच्या आवरणावर असणारी पिसे मुलत: तांब्याच्या रंगांची असतात. मात्र त्याची रचना ही खूपच सुंदर आणि वेगळी असते. त्या रचनेमुळे मोरपंखाच्या डोळ्याच्या टोकापासून निळा, हिरवा, तपकिरी रंग परावर्तित होतात आणि आपणास सुंदर रंगाविष्कार पाहावयास मिळतो. प्रत्यक्षात केरॅटीन आणि मेलॅनिन या दोन प्रथिनांपासून हे पंख बनलेले असतात. मानवी केसांतही केरॅटीन असते. मात्र माणसाच्या केसांची रचना मोरांसारखी नसते. नाहीतर माणसाचे डोकेही मोरांसारखे रंगीत सुंदर दिसले असते. 

मोरपंख एवढे आकर्षक का, हा सर्वप्रथम चार्ल्स डार्विन यांना पडलेला प्रश्न होता. डार्विन यांचे सारे आयुष्य उत्क्रांतीवादाचा अभ्यास करण्यात गेले. मात्र त्यांना या प्रश्नाचे समर्पक उत्तर मिळाले नाही. त्या नंतर मोरपंखाचे सौंदर्य समजून घेण्याचा मोह रॉबर्ट हूक आणि आयझॅक न्यूटन या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञांना झाला. त्यांनी त्याचा सूक्ष्मदर्शीखाली अभ्यासही केला. त्यातून मोरपंखाची सूक्ष्म रचना ही मानवी किंवा इतर केसापेक्षा वेगळी आहे, एवढेच त्यांना समजले. खरे कारण त्यांनाही सापडले नाही. पुढे त्यांच्या संशोधनानंतर शंभर वर्षांनी थॉम्सन यंग या भौतिकशास्त्रज्ञाने तरंग व्यतिकरणाचा (Wave interferrence) शोध लावला. तोपर्यंत आणखी सूक्ष्म पद्धतीने रचना समजून घेता येतील, असे सूक्ष्मदर्शी निर्माण झाले. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि तरंग व्यतिकरणाच्या सिद्धांतातून खऱ्या अर्थाने मोरपंखाच्या रंगाचे गूढ संशोधकांना समजून घेता आले.

     खरं तर, मोराचे हे आकर्षक पंख वास्तवात आकर्षक नसतात. त्याची रचनाही अनेक विसंगतींनी भरलेली असते. त्याचे सूक्ष्म अवलोकन केले, तर या गोष्टी सहज लक्षात येतात. मात्र त्याला पाहताच माणूस त्याच्या प्रेमात पडतो आणि त्याचे ‘प्रथम दर्शन’ असा प्रभाव टाकते की आपण त्याच्या ‘वरलिया रंगा’स भुलून जातो. असे घडले की त्याच्या तपशिलात जाण्याचे कारणच उरत नाही. मोरांच्या पंखाची भौतिक रचनाच अशी असते की त्यातून प्रकाशिकीचा सुंदर आविष्कार निर्माण व्हावा. पातळ फितीतून होणाऱ्या व्यतीकरण (Thin film interference) प्रक्रियेतून मोरपंखांचे रंग खुलतात. मोरपंखाचा शरीराला जोडलेला भाग म्हणजे दांडा किंवा देठ हा पूर्णत: पांढरा असतो. तो पुढे वाढत निमुळता होत जातो. हा मूळ दांडा काही सेंटीमीटरपासून अगदी पाच फुटांपर्यंत लांबीचा असतो. दांड्याच्या सुरूवातीच्या पाच सेंटीमीटर भागावर पांढरी काळसर केसाळ रचना असते. पिसे जितकी लांब बनतात, तितकी ही केसाळ रचना कमी होत जाते. सहा सात सेंटिमीटरनंतर त्याला मोरपंखात असणाऱ्या केसाळ रचनाप्रमाणे तंतूमय घटक जोडलेले आढळतात. मोराच्या पंखांतील केस अगदी सुरूवातीला दांड्याच्या दोन बाजूला अंतरा-अंतराने आढळतात. ते सुरूवातीला शेपटीशी लंब आणि नंतर विशाल कोनात असतात. पुढे अशा दोन केसांतील अंतर कमी होत जाते. मुख्य दांड्यावर असणारी केसासारख्या रचना गोलाकार नसतात. तसेच त्यांचा आकार सर्वत्र सारखा असतो. त्या केसावर सर्वत्र सूक्ष्म रचना (barbule) बसलेल्या असतात. नंतर ते केस अगदी चिकटून बसतात. त्यातून मोरपंखाच्या डोळ्याचा आकर्षक भाग तयार होतो. ते इतके चिकटून बसलेले असतात की दोन केसाळ तंतूतील अंतर हे पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी असते. 

हा डोळा जेथे सुरू होतो, तिथपर्यंत दांडा दिसतो. या टोकाजवळ असणाऱ्या केसावरील रचना स्फटिक रूपातील पातळ फिती एकावर एक बसून बनलेल्या असतात. अशा प्रत्येक रचनेत वीसपर्यंत खंड असतात. या केसाळ रचनांवर भिन्न अपवर्तनांक असणाऱ्या विविध कोनांत बसलेल्या अनेक स्फटिक फिती असतात. प्रत्यक्षात ही रचना केसाळ काटेरी दिसते. मात्र ती मऊ असल्याने हे काटे टोचत नाहीत. मोरपंखांचा स्पर्श हा सर्वात हळूवार स्पर्श मानतात. या प्रत्येक काटेरी रचनेतील स्फटिक रचना विविध कोनात असतात. त्यामुळे विविध रंगांचे परावर्तन विविध कोनातून होते आणि आपणास ते रंग दिसतात. दोन केसाळ रचनातील अंतर विविध ठिकाणी वेगवेगळे असते. तसेच त्यावर असणारी काटेरी रचनाही वेगवेगळी असते. या सूक्ष्म रचना ज्या पदार्थांच्या बनलेल्या असतात, त्या पदार्थांचा अपवर्तनांक (Refractive Index) हवेपेक्षा वेगळा असतो. तसेच या काही मायक्रॉन जाडी असणाऱ्या फितींचे अपवर्तनांकही वेगवेगळे असतात.

     मूळात आपणास रंगाची अनुभूती मिळते ती प्रकाशामुळे किंवा सूर्यप्रकाशामुळे. आपण ज्या प्रकाशाच्या सहाय्याने दृष्टीसुख घेत असतो, ते सूर्यापासून येणाऱ्या पांढऱ्या प्रकाशामुळे. हा पांढरा प्रकाश सात रंगांच्या प्रकाश तरंगांचा बनलेला असतो. या सात रंगांच्या तरंगांची तरंगलांबी वेगवेगळी असते. हा प्रकाश आपले मार्गक्रमण करताना रस्त्यामध्ये भिन्न अपवर्तनांक असणारा पदार्थ आला तर आपली दिशा आणि वेग बदलतो. शालेय जीवनात आपण प्रिझमच्या सहाय्याने प्रयोगशाळेत इंद्रधनुष्यातील सात रंग मिळवत असतो. निसर्गात प्रकाशाचा असा दिसणारा सुंदर अविष्कार म्हणजे इंद्रधनुष्य होय. इंद्रधनुष्यातही भिन्न अपवर्तनांक असणाऱ्या माध्यमातून (हवा आणि जलबिंदू) परावर्तित होणारा प्रकाश आपले रंग वेगळे करतो आणि आपणास इंद्रधनुष्य पाहावयास मिळते. अगदी तसेच, वातावरणातून सूर्य प्रकाश मोरपंखावर पडला की सूक्ष्म रचनांतील पातळ फितीतून एका विशिष्ट रंगाचे परावर्तन होते आणि तो त्या भागाचा तो रंग आहे, असे आपले डोळे आपल्याला सांगतात. प्रत्येक तंतूवर असणाऱ्या केसाळ रचनेमध्ये नऊ ते बारा स्फटिक रचना असतात. मोरपंखाच्या ज्या भागातून डोळ्याचा गडद निळा रंग दिसतो, त्या भागात प्रत्येक तंतू परस्परांपासून १४० नॅनोमीटर दूर असतात. त्यानंतर त्यातील अंतर वाढत जाते. अंतर वाढल्यानंतर केसाळ रचनांचा रंग आपल्याला हिरवट तांबूस दिसतो.

आपण अनेकदा अगदी अशीच प्रक्रिया घडताना पावसाळ्यातही अनुभवत असतो. पारदर्शक असणारे पेट्रोल किंवा तेल ओल्या रस्त्यावर सांडले तर असाच विविधरंगी आविष्कार पाहावयास मिळतो. तेल किंवा पेट्रोलचा थर आणि मातीवर असणारा पाण्याचा पातळ थर आणि हवेचा अपवर्तनांक हे वेगळे असतात. या रचनेमुळे पांढऱ्या प्रकाशातील रंग वेगळे होऊन त्यातील विशिष्ट कोनातून विशिष्ट रंगांच्या प्रकाश किरणांचे परावर्तन होते आणि आपणास तो रंगाविष्कार पाहावयास मिळतो. त्या ठिकाणी असणारी पेट्रोल किंवा तेल आणि पाण्याच्या पातळ फितींची रचना ही सुसंगत आणि प्रमाणबद्ध नसते. त्यामुळे आपणास तेल जसे पसरते तसे रंगीत आकार दिसतात. मात्र ही प्रमाणबद्धता मोरपंखामध्ये निसर्गाने साधलेली असते आणि म्हणून मोरपंखाकडून असे केले जाणारे प्रकाशाचे परावर्तन चित्ताकर्षक असते. सर्वाना प्रेमात पाडणारे असते.

        या मोरपंखाच्या मध्यभागी असणारा पांढऱ्या रंगाचा दांडा डोळ्याच्या मध्यापर्यंत निमुळता होत जातो. मुख्य पंखाचा खरा आकर्षक भाग सुरू होताच, हा दांडाही तांबूस तपकिरी होत जातो. जेथे दांड्याचा भाग संपतो तेथे डोळ्याला खाच असते. मोरपंखाच्या केंद्रस्थानी हा गडद निळा किंवा जांभळा भाग असतो. त्या बाहेर असणारा विवृत्त (Elliptical) आकाराचा भाग हिरवट निळ्या रंगाचा असतो. या रंगाचे वेगळेपण असल्याने मराठीत या रंगाला मोरपंखी रंग म्हणून ओळखले जातात. हिरव्या आणि निळ्या रंगाचा हा सुंदर एकत्रित आविष्कार मनाला मोहवतो. त्या बाहेरचा भाग तांबूस रंगाचा असतो. त्यानंतर विविध रंगांचे मिश्रण आढळते. त्यापुढे या केसाळ रचनातील अंतर वाढत जाते आणि त्यांचा रंग हिरवा बनतो. पुढील बाजूला अशी रंगांची उधळण होत असताना, पाठीमागचा भाग मात्र तांबूस रंगाचाच असतो. त्यापुढे तांबूस रंगानंतर केसाळ रचनातील अंतर वाढत जाते आणि स्फटिक रचना सर्व बाजूला पसरलेल्या असतात. त्यामुळे आपणास वेगळाच रंग दिसतो. परिणामी, मागील डोळा आणि त्याच्या बाजूचा भाग संपल्यानंतरच्या केसाळ रंचनांचा रंगही पुढच्या बाजूप्रमाणे दिसतो. बारकाईने पाहिल्यानंतर या केसाळ रचनांवर असणाऱ्या काटेरी स्फटिक रचनांची घनता मोर पंखाचे जेथे रंग बदलतात, तेथे बदललेली दिसून येते. २००२ साली एस.सी. बर्जेस या यांत्रिकी अभियंत्याने याचा सखोल अभ्यास केला आणि मोरपंखाच्या सौंदर्यामागील वैज्ञानिक सत्य सांगितले.

       मोराच्या पंखातील हजारो पंखामध्ये एखादेच पंख असे आढळते की ज्यातील गडद निळा डोळा हा मध्यरेषेच्या दोन्ही बाजूला समान असतो. तो साधारणपणे एका बाजूला लहान असतो. त्यानंतरचा मोरपंखी रंगाचा भागही असमान असतो. नंतर त्याला समान आकार मिळतो. मोर पंखाची रचना नियमित किंवा समान नसते, तरीही ते सुंदर असते. मोरपंखाला आकर्षक बनवण्यामध्ये त्याचे दिसणारे चमकदार रंग महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ते सूक्ष्म स्फटिक रचनामुळे साध्य होते. दुसरी मोरपंखांचा आकर्षकपणा वाढवणारी गोष्ट आहे, ती म्हणजे त्याची गुंतागुंतीची रचना. त्याच्या केसाळ रचनेतील बदलत जाणारे अंतर, त्यातील काटेरी स्फटिक फितींची बदलत जाणाऱ्या रचना, यामुळे होणारे विशिष्ट रंगांचे परावर्तन आणि त्यातून मिळणारी अद्भूत चित्ताकर्षक रंगांची अनुभूती मोरपंखाच्या प्रेमात पाडते. मोरपंखातील डोळ्यांखाली असणाऱ्या केसाळ रचना या अंतर वाढवत जातात, त्यामुळेही त्याचे सौंदर्य वृद्धींगत होते. या केसाळ रचनांवरही स्फटिकांच्या पातळ फिती असतात. मात्र त्या एकाच रंगाच्या दिसतात कारण त्यावरील स्फटिक रचना या एकाच प्रकारच्या, आणि दोन्ही बाजूला बसलेल्या असतात. खालच्या भागावर अशा स्फटिक रचना नसतात. अतिशय चिकटून बसलेल्या मूळ पंखाच्या रचनेशी ही रचना पूर्णत: विसंगत आहे. मात्र त्यामुळे डोळ्याचा भाग आणखी आकर्षक बनतो. डोळ्याच्या रचनेनंतर दांडा लुप्त पावतो. तो दांडा शेवटपर्यंत राहिला असता, तर मोरपंखाचे सौंदर्य निश्चितच कमी झाले असते. त्यामुळे मोरपंख दोन भागात विभागल्यासारखे दिसले असते. डोळ्याचा आकार दोन बाजूला सारखा नसल्याने मोरपंखाच्या सौंदर्याला बाधा पोहोचली असती. दांड्याचा निमुळता होत जाणारा आकार आणि त्याला डोळ्याजवळ आलेला त्या, त्या भागाला अनुरूप रंगही मोरपंखाला सुंदर बनवतात. विशेष म्हणजे डोळ्याजवळील भाग वगळता, इतरत्र हा दांडा पांढरा असतो. जसजशी केसाळ रचनातील अंतर कमी होत जाते, तसा हा दांडाही पुढच्या बाजूने केसांचा रंग धारण करतो. केसाळ रचनेवर असणाऱ्या केरॅटिनच्या स्फटिक रचनांची जाडी आणि रचना यामध्ये होत जाणारे बदल प्रकाशातील विशिष्ट रंगाचे परावर्तन घडवतात आणि त्यातून केंद्रभागी निळा, नंतर मोरपंखी, त्यानंतर तपकिरी, पुढे हिरवा शेवाळी रंग असे दिसत राहतात. ही केसाळ रचनांतील जाडी कमी जास्त होत राहते. त्यामुळे अशी गुंतागुंतीची असणारी रचना, सुंदर दिसते.  

मोठ्या मोरपंखाच्या टोकाला अशा शंभर केसाळ रचना असतात. प्रत्येक केसावर असणाऱ्या स्फटिक रचनांची संख्या एक लाख इतकी असते. मुख्य पंखातील केसाळ रचनेमध्ये वीसवेळा स्फटिक रचना बदलते आणि ही बदलणारी रचना मोर पंखांचे सौंदर्य खुलवत ठेवते. भूमितीतील आकृत्या काढताना आपल्या हातून चूक होते, मात्र मोर पंखातील स्फटिक रचना बदलताना अशी कोणतीही अनियमितता झालेली आढळत नाही. किती अंतरावर कोणत्या केसाने रंग बदलण्यासाठी स्फटिक रचना बदलायची आहे, हे अगदी संगणकीय प्रणालीतून उतरावे, तसे उतरलेले असते. मागील बाजूला तांबूस तपकिरी रंग आढळतो. हा रंग मोरपंखांचा मूळ रंग असतो. पुढच्या बाजूच्या रचना विस्कळीत करून त्या पदार्थांचा रंग अभ्यासला तर तो तांबूस तपकिरीच दिसतो.

मोरपंखाबाबत अनेक समज आणि गैरसमज आहेत. घरात मोरपंख ठेवल्याने पाली, साप, डास आणि विषारी जंतू घरात येत नाहीत, असे मानले जाते. घरात मोरपीस ठेवल्यास धन दौलत वाढते, असेही मानतात. दंगेखोर मुले शांत होतात. वास्तूदोष दूर होतात. असे अनेक समज आहेत. कष्ट न करता केवळ मोरपंख घरात ठेवल्याने कधीच संपत्ती वाढू शकत नाही. निसर्गाने मोरपंखाला आकर्षक बनवण्यासाठी एवढे कष्ट घेतले आहेत. केवळ ते घरात ठेवून धन कसे वाढू शकते? ज्यांने हे काही सांगितले असेल, त्यांना कदाचित हेच सांगायचे असावे की ‘कोणतेही काम करताना ते मोरपंखासारखे सुंदर करा. यश आपोआप मिळत जाईल’. मोरपंखाच्या दर्शनाने प्रसन्न वाटते, हे मात्र निश्चित.

 मला मोरपीस भेटले, १९७२ च्या दुष्काळात. त्या भीषण दुष्काळात माणसांप्रमाणे जनावरांचेही हाल सुरू होते. जनावरांना धामणीचा पाला चारा म्हणून दिला जात असे. तर कमी पावसात उगवलेल्या बरबड्याचे दाणे गोळा केले जात. या बरबड्याच्या बियांचे पीठ अन्य धान्याच्या पीठात मिसळून भाकरी केली जात असे. लहान-मोठे सर्वजण जगण्यासाठी अन्न आणि पाणी मिळवण्याच्या मागे असत. एका शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा सुटली. आई-वडिलांबरोबर धामणीचा पाला आणायला बालाघाटच्या डोंगरात गेलो होतो. एका झाडाचा पाला काढताना त्याखाली मोरपीस पडलेले दिसले. तोपर्यंत मोर चित्रातच पाहिला होता. मोरपंखही प्रत्यक्षात पाहिले नव्हते. ते पंख पाहताक्षणी मी त्याच्या प्रेमात पडलो. मी ते हळूवारपणे उचलून घेतले. त्याचा स्पर्श अनुभवला. अत्यंत मुलायम स्पर्श खूप जवळचा वाटला. 

ते सापडलेले मोरपीस अगदी जपून घरी घेऊन आलो. आजही आठवते, ते मोरपीस त्याचा दांडा कापून बालभारतीच्या पुस्तकात ठेवले होते. ते पंख मस्त पिसायचो. पिसल्यानंतर मोरपीस फुलायचे. पिसल्यानंतर त्यामध्ये स्थितीज विद्युत निर्माण होते, हे बी.एस्सी.चा अभ्यास करताना समजले. त्या स्थितीज विद्युतमुळे फुललेले मोर पिस कागदाचे हलके तुकडे अलगद उचलायचे. हा लहानपणीचा, शालेय जीवनातील आवडता खेळ. पुस्तकात ठेवलेल्या मोर पिसाला कुंकू वाहिले, की त्या पुस्तकातील सारे ज्ञान आपल्याला लाभते, असा भ्रम त्या काळी अनेकांच्या मनात असायचा. हे खरे असूच शकत नाही. मात्र त्या पिसाच्या आकर्षणामुळे का होईना, त्या पुस्तकाला अनेक मुलांचा हात लागायचा. 

    ‘पहिले प्रेम कधीच विसरता येत नाही’, असे म्हणतात. माझे मोरपिसाशी असलेले नाते पाहून मला तरी हे पुरते पटते. मोरपंख आणि पर्यायाने मोर, पहिल्या भेटीपासून मला खुणावत राहिले. त्यावेळी मोर पंखाशी जोडलेले नाते आजही अतूट आहे. लहानपणी पुढे अनेक मोर पंखांना पुस्तकात ठेवले. पुढे खूप मोरांचे दर्शन झाले. शिवाजी विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या दोन ठिकाणी  नोकरीनिमित्त राहीलो. या दोन्ही विद्यापीठात भरपूर मोर भेटले. शिवाजी विद्यापीठामध्ये तर हजारो मोर वास्तव्याला आहेत. त्यांना अनेक वर्ष बारकाईने पाहिले. मोराचे राजबिंडे रूप, चालतानाचा त्यांचा डौल आणि रूबाब, उडतानाची सफाई, नाचतानाचे फुललेले सौंदर्य, वर्चस्वावरून होणारी भांडणे, धोक्याची चाहूल होताच ओरडून इतरांना सावध करणे आणि सर्वात महत्त्वाचे त्याचे देहभान विसरून नाचणे. हे सारे पाहताना मी स्वत:ला विसरण्याचा अनेकदा अनुभव घेतला. फ्लॉवर पॉटमध्ये दररोज फुले तोडून ठेवणे माझ्या मनाला पटत नव्हते. मात्र फ्लॉवर पॉट हा एक सजावटीचा भाग. तो हवाच. यावर सुंदर मार्ग दाखवला, तो मोरपिसाने. मध्यम पण विविध उंचीची मोरपिस असलेली फुलदाणी बनवून घरात आणि कार्यालयात ठेवून फुलांना तोडणे निदान माझ्यापुरते थांबवले. हा फ्लॉवर पॉट खूप सुंदर दिसतो. मनाला भुरळ घालतो.

दरवर्षी मोराने टाकून दिलेले पंख गोळा करण्याचे वेड अनेकांना आहे. या पंखांना घर सजवण्यासाठी लोक नेतात. त्याचे रंग पाहतात. आवडीने त्याचे पंखे बनवून हवा घेतात. त्याला गालावरून फिरवून असीम सुखाची अनुभुती घेतात. मात्र निसर्गाने या मोरपंखाला सजवण्यासाठी बनवलेले कौशल्य आपल्या अंगी बाणवत प्रत्येक काम असेच सुंदर करायचा प्रयत्न केला तर… आपले शब्द वापरताना मयूर पंखाचा मुलायमपणा घेतला तर… समोरच्या व्यक्तीचे ‘चुकीचे वागणे’ही मोर पंखाप्रमाणे हलकेपणाने घेऊन सोडले तर… जगणे निश्चितच सुंदर होईल.

      मोरपंखाच्या सौंदर्याने कोणीही वेडे होते. कवी त्याला अपवाद कसे राहतील? मोर आणि मोरपंखाभोवती अनेक कविता तयार झाल्या आहेत. ना.धों. महानोर यांच्या कवितातून मोर प्रसन्न दर्शन देतो. कवी ग्रेस यांचा मोर हा घनकंप, घनसंथ, घननीळ आणि घनदंग आहे. ‘मोरपंख ते माझ्या कान्हाच्या आठवणीत पुस्तकात सजलेलं, जणू ते माझ्याच रंगात रंगलेलं’. असं ऋतुजा जगदाळे म्हणतात. तर मनिषा भगत म्हणतात, ‘तुझ्या माझ्या प्रेमाची मूक साक्ष देतात, जीवनात आलेले क्षण जेव्हा मनाच्या आकाशात आठवणी बनत राहतात, मोरपंख लेवून मुक्तपणे विहरतात’. मोरपंख वजनाने खूप हलके असते. मोरपंखांचा मुलायम स्पर्श हे मानवी भावनांशी जोडून अनेक कवींनी कविता आणि शायरी बनवली आहे. आपले जीवनही मोरपंखाप्रमाणे रंगीत असावे, जेणेकरून जीवनात तणाव राहणार नाहीत. मोराला नाचायला सांगणारे ग.दि. माडगूळकर यांचे ‘देवबाप्पा’ या चित्रपटातील आशाताईंनी गाईलेले बालगीत ‘नाच रे मोरा’ हे तर लहानपणापासून प्रत्येकाचे आवडते. त्याखेरीज अनेक बाल आणि बडबडगीते तयार झाली आहेत. अनेक कवींनी मनातला मोर प्रत्यक्षातील मोराशी जोडला आहे. त्यातूनच आलेले १९६३ मधील ‘मोहित्यांची मंजुळा’ या चित्रपटातील जगदिश खेबूडकरांनी लिहिलेले ‘बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला’ हे गाणे आजही तितकेच ताजे टवटवीत वाटते. असा कोणाच्या मनमोराचा पिसारा फुलत असताना कोणा सखीला साडीच्या ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ असतो. तर कवी चंद्रशेखर सानेकर यांच्या ‘अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटूनी आभाळ आले मेघ बरसू लागले, अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी’ या गीताला अवधूत गुप्ते यांनी आजच्या युवा पिढीला आवडेल असा संगीत साज चढवला आहे. सर्वभाषिक साहित्यात, चित्रपटात आणि इतर कला क्षेत्रात मोराचा मुक्त संचार आहे. अनेक चित्रकारांचेही मोर हा आकर्षणाचा भाग राहिला आहे. 

मोरपंखांचे मूळ रंग काहीही असोत, त्याचे सौंदर्य मनमोहक, नजर खिळवून ठेवणारे आहे. खरं तर हे निसर्गाच्या रंग विभ्रमाचे विलोभनिय उदाहरण आहे. या मोरपंखाची मला दोन रूपे दिसतात. एक रूप दिसते ते त्याच्या रंगातून, रूपातून, पोतातून आणि तेजातून. या सर्वांमुळे ते आकर्षक दिसते; मनाला भावते. मात्र दुसरे रूप असते त्याच्या त्यागाचे. आपल्या हाती येणाऱ्या मोरपिसातला ‘मोर’ विसर्जित झालेला असतो. उरलेले असते ते केवळ पंख! कालपर्यंत एका सजिवाचा घटक असलेले ते पंख आज अलग होऊन पडलेले असते. आता ते धारण करणाऱ्या मोराच्या तालावर नाचणार नसते. वर्षभर अंगावर  सांभाळलेले पिस शरीरापासून अलग होताना मोरालाही वेदना झाल्या असणार! पंखाचे त्या मोराशी रक्ताचे नाते असते. तरीही ते मोरापासून वेगळे होते… ते नव्या पिसांना जागा करून देण्यासाठी. मोराच्या प्रणयाराधनेत या पंखाने मोठी भूमिका बजावलेली असते. ते नवनिर्मितीला सहाय्यकारी ठरलेले असतात. विणीसाठी लांडोरीला राजी करणारे ते पंख मोरापासून अलग होताच निर्जीव होतात. ते रचनेने, मूळ रंगाने आकर्षक नसतात, तरीही ते सुंदर दिसतात. कदाचित पंखाच्या त्यागामुळे आणि सर्जनाचे, नवनिर्मितीचे साक्षीदार असल्याने ते सौंदर्याचे प्रतिक बनत असावे! आपणही मोरपिसावर प्रेम करता, करता मोरपंखासारखे मृदू बोलायला, वागायला लागलो तर..? मोरपंखांचे रंगाविष्कार पाहताना, आपल्या आजूबाजूंच्या लोकांच्या जिवनात रंग भरण्याचा प्रयत्न केला तर..? मोरपंखाचा त्याग समजून घेताना आपल्याजवळचे थोडे गरजूना दिले तर..? तर… निश्चितच आपले जगणे आणि जीवन सुंदर होईल! 


 


छायाचित्र सौजन्य – सुविज मुव्हीज, कोल्हापूर

---०००---







३० टिप्पण्या:

  1. सर हा लेख खूप आवडला
    अत्यंत माहितीपूर्ण रंजक आणि शास्त्रीय माहितीचा संगम आहे
    लिहत राहा .......💐

    उत्तर द्याहटवा
  2. सर मोरांची होणारी कत्तल ही बातमी वाचली आणि मन खूप दुखी झाले. तुमचा हा लेख त्या दुःखावर मोरपीस फिरवून गेला. ही माहिती जर त्या कत्तल करणाऱ्यांना सांगितली तर ती लोक नक्कीच याचा विचार करतील.
    मोर हा सुंदर आहेच, निसर्गाचं लेण आहे. राष्ट्रीय पक्षी आहे, कवीचं हक्काचं स्थान आहे. प्रेमींसाठी प्रतीक आहे. खूप छान लिहिलं आहे सर.

    उत्तर द्याहटवा
  3. छान अभ्यासपूर्वक लेख लिहिला आहे. अधिकची माहिती मिळाली. लिहिते राहा. तुम्हाला शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  4. Sir its informative and an interesting one. I had never thought that a quill of peacock can inspire to write such beautiful piece..amazed ....

    उत्तर द्याहटवा
  5. धन्यवाद सर
    नाविन्यपूर्ण माहिती वाचायला मिळली.शास्त्रीय पद्धतीने लिहलेला लेख खूपच सुंदर आहे. वेगवेगळ्या विषयांवरचे आपले लेख वाचायला मिळतात. ज्ञानात भर घालतात.

    उत्तर द्याहटवा
  6. फिजिक्स चा माणूस मोरावर इतके सुंदर लिहितो, हे पटण अवघड आहे, यातून त्यांचा अभ्यास, चिकाटि , मांडणी तील मोरपीस सारखा देखनेपना प्रतिबिंबित होतो. वाचनाची खोली सोप्या शब्दाची सुंदर शब्दरूपी रांगोली समाधान देऊन गेली. हेच मनापासून वाटते.

    उत्तर द्याहटवा
  7. Very important and interesting information. Some mythological,but you have taken opportunity to share with scientific view. Some things was unknown that I have been read first time. Thanks a lot sir.

    उत्तर द्याहटवा
  8. डौलदार मोरा इतकाच सुरेख, आकर्षक, माहितीपूर्ण, वैज्ञानिक माहितीचा आधार असलेला आणि वाचनीय लेख लिहिला आहे आपण. उत्तम भाषाशैली विस्तृत विवेचन साहित्यिक मांडणी आणि वैज्ञानिक कितीची जोड यामुळे लेख वाचनही तर आहेच, पण संग्रही ठेवावा असा मोरपिसा सारखाच झालेला आहे.

    आपले अभिनंदन बीएल चव्हाण औरंगाबाद.

    उत्तर द्याहटवा
  9. डोलदार मोरासारखी डौलदार, सुरेख लेखन/मांडणी

    .

    उत्तर द्याहटवा
  10. मोर, माणूस , निसर्ग, शास्त्र आणि भावना याची अचूक माहितीपूर्ण गुंफण, छान सर

    उत्तर द्याहटवा
  11. Dr shinde sir the all new information gives the correct idea aboutPeacock. Great.
    Deepak Deshpande.

    उत्तर द्याहटवा
  12. खूप छान माहिती पूर्ण लेख आहे सर, असेच लिहिण्याचे बळ परमेश्वर तुम्हाला देवो हीच प्रार्थना, अभिनंदन सर

    उत्तर द्याहटवा
  13. अतिशय सुंदर लेख.मोरा बद्दल इतकं विस्तृत आणि सर्वांग सुंदर लेखन पहिल्यांदा वाचायला मिळत आहे.सर आपण निसर्गावर ,झाडांवर लिहितात मात्र एका पक्षावर देखील इतकं सर्वांग सुंदर लेखन लिहिणे म्हणजेच आपल्यात एक प्रतिभावंत लेखक दडलेला आहे हे स्पष्टपणे दिसून येते.आपले लेखन खूपच वाचनीय आहे.कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात प्रशासकीय कामे सांभाळून आपण इतका व्यासंग कसा जपला?त्याचे खूप कौतुक वाटते

    उत्तर द्याहटवा
  14. सर,लाजवाब. खरंतर या लेखाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी आपण बोलत होतो. मोराविषयी इतकी इंत्यमभूत माहिती मी पहिल्यांदा वाचली.किती बारकावे तुम्ही उलगडून दाखवले आहेत. मोर,लांडोर यांची एकमेकांची निवड,त्यांची नावे,
    मोरपीसाची माहिती, शांतीचे प्रतिक,शालेय आठवण,त्याचे वजन,पीस गळण्याची प्रक्रिया इत्यादी आनेक गोष्टी प्रस्तुत लेखातून नेमकेपणाने स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे 'मन मोराचा पिसारा फुलला' आणि आजचा शनिवार आनंदात जाईल.इतका महत्त्वाचा लेख तुम्ही लिहिला आहे. त्याबद्दल अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  15. उत्कृष्ट लिखाण सर....💐💐लेख मोठा असल्याने थोडा वेळ लागला पण खूपच आवडल्याने दोन वेळा वाचला. मोरपंखाचे अध्यात्मिक नाते, शास्त्रीय माहिती, मोरासाठीचे महत्व तसेच साहित्यिकाच्या दृष्टीतून केलेले वर्णन खूपच कौतुकास्पद आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रंगसंगती बाबतचे भौतिकाशास्त्रीय विज्ञान जे आपण विश्लेषित केले आहे ते अप्रतिम. मी जीवशास्त्राचा असून याबाबत अज्ञानी होतो, मात्र आता माहीत झाले....आपल्या हातून असेच लिखाण होत राहो आणि ते समजोन्नतीसाठी पूरक ठरो.....आपले अभिनंदन💐💐

    उत्तर द्याहटवा
  16. Sir,
    Superb article.When I was reading this article I was expecting more information about moar (Peacock) but as I proceed reading I realised it is all about moar(मोर) and everything about मोर.I barely knew about such details about peacock.Thank you.

    उत्तर द्याहटवा
  17. रुबाबदार आणि देखण्या मोराचा साजशृंगार लेखात उतरला आहे. शास्त्रीय माहितीपासून ललितबंधापर्यंत सुंदर मांडणी झाली आहे. मोर नेहमीत मनभावन असतो आणि मी मोरांच्या मायणीत राहतो. त्यामुळे मला तो अधिकच प्रिय आहे. पु.शि. रेगे यांच्या 'सावित्री' कादंबरीत लच्छी आणि मोराची सुंदर गोष्ट आली आहे. त्यावर मी खूप वर्षांपूर्वी एक दीर्घ लेख लिहिला होता. शिवाजी विद्यापीठाच्या जर्नल मधून तो प्रकाशित झालेला होता. अजूनही मला मोराच्या मायणीवर लिहायचे आहे. तुमच्या लेखामुळे ही लेखन ऊर्मी पुन्हा उफाळून आली आहे. अभिनंदन आणि धन्यवाद सर!

    उत्तर द्याहटवा
  18. सर या लेखाद्बारे अतिशय महत्वपुर्ण माहिती दिलेली आहे. धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा
  19. Congratulations sir
    Very useful information with good scientific base.
    Dr.A.R.Kulkarni

    उत्तर द्याहटवा
  20. मोराविषयी इतकी अभ्यासपूर्ण माहिती पहिल्यांदाच वाचली..सर आपल्या लेखणीस सलाम..👌💐

    उत्तर द्याहटवा