मराठी ज्ञानभाषा व्हावी, यासाठी सर्वांचे प्रयत्न हवे आहेत. तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे. ती महाराष्ट्राची राजभाषा आहे. मात्र केवळ एवढ्यावर ती वाढेल टिकून राहील असे नाही. त्यासाठी ती ज्ञानभाषा व्हायला हवी. त्यासाठी सर्व विषयाचे मूलभूत ज्ञान या अमृताहुनी गोड असणाऱ्या माझ्या मराठीत यायला हवे... याबाबत माझे विचार आज मराठी भाषा दिनानिमित्त येथे प्रसिद्ध करत आहे.....
__________________________________________________
__________________________________________________
दरवर्षी
२७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने मराठी भाषा,
तिचे अस्तित्व कसे टिकेल याची मोठी चर्चा होते. मराठी भाषा कशी अडचणीत आहे आणि तिला
टिकवण्यासाठी आपण काय काय केले पाहिजे हे अनेकजण सांगतात. गंमत म्हणजे हे सांगणाऱ्या
अनेकांची मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकत असतात किंवा शिकलेली असतात. कोणी कशीही
आणि कितीही काळजी वाहिली तरी मराठी भाषा टिकणार आहे. येथील गोरगरीब ही भाषा टिकवून
ठेवायचे काम व्यवस्थित करतील यात शंका नाही.
योगायोग
म्हणजे मराठी भाषा दिनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान
दिन साजरा केला जातो. हा योगायोग लक्षात घेताना चार-पाचशे वर्षापूर्वी हजारात लोक इंग्रजी
भाषा बोलत असत. ती आता जगाची भाषा बनत आहे. याचे मूळ आपण शोधले पाहिजे. यातील लक्षात
येणारे पहिले कारण पहिले कारण म्हणजे इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांनी जगभरात उभे केलेले
साम्राज्य. त्या माध्यमातून इंग्रजी जगातील अनेक देशापर्यंत पोहोचली. आपला कारभार त्या
भाषेत केला. स्थानिक लोकांना हे कामकाज समजावे म्हणून ती भाषा शिकायला लावले. येथे
शिक्षण संस्था काढताना त्यांनी ही भाषा आवर्जून इंग्रजी भाषा मुले शिकतील हे पाहिले.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे ही भाषा जास्तीत जास्त समृद्ध करण्यामध्ये त्या लोकांनी
जाणिवपूर्वक कष्ट घेतले. त्यासाठी त्यांनी सर्व विषयाचे ज्ञान त्या लोकांनी इंग्रजीमध्ये
आणले. सर्व विषयाचे ज्ञान इंग्रजीत उपलब्ध आहे, हा विश्वास जगभरातील विद्वानामध्ये
निर्माण होईल असे त्यांनी प्रयत्न केले. आज त्यामुळे भारतासह अनेक देशामध्ये विज्ञानासारख्या
विषयाचा अभ्यास इंग्रजीतून करावा लागतो. आधिक ज्ञान मिळवण्यासाठी इंग्रजीतील संदर्भ
ग्रंथाचा आधार घेणे विद्वानाना क्रमप्राप्त झाले. तिसरे कारण म्हणजे इंग्रजी भाषेत
अद्ययावत ज्ञान आणण्यासाठी अनेक नियतकालिके प्रसिद्ध करायला सुरुवात केली. विज्ञानातील
‘नेचर’सारखे नियतकालिक आजही आघाडीचे मानले जाते. त्यात साहित्य प्रसिद्ध करणे म्हणजे
मानाचे पान मानले जाते.
भारताबरोबर
किंवा नंतर स्वतंत्र झालेली राष्ट्रे आज वैज्ञानिक क्षेत्रात आपल्यापुढे गेली आहेत.
मात्र त्या राष्ट्रामध्ये तेथील स्थानिक भाषेला प्राधान्य दिले जाते. चीन, कोरिया,
तैवान असे अनेक देश आहेत जेथे इंग्रजीचा वापर ज्ञान घेण्यासाठी केला जातो. मात्र ज्ञानदानासाठी
ते मातृभाषेचा वापर करतात. दुसऱ्या महायुद्धात जपान पूर्ण बेचिराख झाला होता. मात्र
‘फिनिक्स’ पक्षासारखी भरारी घेत आज हा देश विज्ञान संशोधनात अग्रेसर आहे. त्यासाठी
सर्व विषयांचे ज्ञान त्यांच्या भाषेतून आणले. कोणताही विषय, अद्ययावत संशोधनही आपल्या
भाषेत कसे येईल, हे पाहणारी मोठी यंत्रणा त्या देशामध्ये कार्यरत आहेत. यातून या भाषा
वाढत आहेत.
मराठी
भाषेतून असे कोणते प्रयत्न होतात याचा विचार व्हायला हवा. सत्येंद्रनाथ बोस हे थोर
भौतिकशास्त्रज्ञ. त्यांनी आईनस्टाईनसोबत संख्याशास्त्राची नवी शाखा विकसीत केली. देवकण
म्हणून अलिकडे प्रसिद्ध पावलेले कण त्यांच्या नावावरून बोसॉन म्हणून विज्ञान जगतात
ओळखले जातात. त्यांना मारी क्यूरी यांच्यासमवेत संशोधन करायचे होते. मात्र मारीनी त्यांना
पोलीश भाषा येत नाही म्हटल्यावर आपल्या प्रयोगशाळेत त्यांना काम करू दिले नाही. ही
गोष्ट त्यांच्या मनात खोलवर घर करून गेली आणि परिणामी भारतात परतल्यावर स्वातंत्र्यपूर्व
काळामध्ये ते कलकत्त्यामध्ये एम.एस्सी.च्या वर्गाना भौतिकशास्त्र हा विषय बंगाली भाषेतून
शिकवत असत. मराठी भाषेतून असा प्रयत्न कोणी केल्याचे ऐकिवात नाही. ते बंगाली भाषेत
विज्ञानविषयक लेख लिहीत. बंगाली भाषेतून विज्ञानप्रसारासाठी त्यांनी आणि त्यांच्या
समकालीन शिक्षक आणि वैज्ञानिकांनी मोठे कार्य केले. त्याकाळात कलकत्ता हे विज्ञान संशोधनांचे
मोठे केंद्र बनले होते. विज्ञानातील एकमेव नोबेल पारितोषीक विजेते सर सी.व्ही. रमण
यांचे नोबेल विेजते रमण परिणामाचे संशोधनही कलकत्त्यातच झाले.
कोल्हापूरचे
नागरीक बाळाजी प्रभाकर मोडक (१८४७ - १९०६) यांनी इंग्रजीतील जीवशास्त्र, रसायनशास्त्र,
भूगर्भशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील विज्ञानविषयक ज्ञान मराठीमधून आणले. मात्र आज त्यांची
माहिती माझ्यासारख्या विज्ञानविषयक लेखन करणाऱ्यासही नाही. कोल्हापूरमधील ज्येष्ठ पत्रकार
उदय कुलकर्णी यांच्याशी चर्चा करताना हा संदर्भ मिळाला. त्यानंतर मराठी भाषेत विज्ञानविषयक
लेखन केले आणि लोकामध्ये विज्ञानविषयक वाचनाची आवड निर्माण केली ती ज्येष्ठ वैज्ञानिक
जयंत नारळीकर यांनी. स्वत: खगोलशास्त्रज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख असणाऱ्या
नारळीकरांनी विज्ञानकथा आणि विज्ञानविषयक लेखन मराठीतून केले. अनेक शाळा महाविद्यालयातून
व्याख्याने दिली. त्यासोबत बाळ फोंडके, वि. गो. कुलकर्णी, प्रकाश तुपे, श्री. निवास
पाटील आदि मंडळीनी विज्ञान लेखन केले. लोकांमध्ये त्याची आवड निर्माण केली. एकदोन विज्ञानविषयक
पुस्तके लिहिणारा वर्ग मोठा आहे. यामध्ये गडहिंग्लजमधील डॉ. एस.डी पाटील यांनी दर्जेदार
लेखन केले.
हे
प्रयत्न वाढायला हवेत. मराठीतून शिक्षण घेतल्याने आपले कोणतेच नुकसान झाले नाही असे
आज आंतरराष्ट्रीय पातळीवरचे यशस्वी संशोधक, उद्योगपती सांगतात. त्यामुळे इंग्रजी माध्यमांचा
दुराग्रह का प्रश्न अंतर्मुख करायला लावतो. शासनासह, साहित्य अकादमीने अशा लेखनाला
प्रोत्साहन देण्यासाठी जाणिवपुर्वक आणखी प्रयत्न करायला हवेत. मराठी ज्ञानभाषा बनवायची
असेल तर सर्व प्रकारचे लेखन मराठीत व्हायला हवे. मराठी टिकवण्यासाठी वेगळे काहीच करण्याची
गरज नाही. ‘आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया’ हे पुस्तक इंग्रजीत लिहिण्याचा सल्ला
अनेकांनी दिला होता. मी मात्र ‘मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद
व्हावा’, असा आग्रह धरला. चला यानिमित्ताने हाच निर्धार करू या, मराठी समृद्ध करू या,
ज्ञानभाषा बनवू या!
(वापरलेली प्रतिमा 'लोकमत' समूहाच्या सौजन्याने)
छोटेखानी लेख बरंच कांही सुचवून जातो.लेखाच्या आकारमानाचा लेखाच्या घनतेवर परिणाम होत नसतो हे या लेखावरून दिसुन येते. बाकी मराठी भाषा टिकवून ठेवण्याचे काम हे कधीही थांबू शकत नाही. मराठी चित्रपटांचं यासाठी मोठं योगदान आहे. तसेच आपल्या सारखी विज्ञान क्षेत्रातील मंडळी जोपर्यंत मराठी भाषेत लेख लिहून आपला आपला मोलाचा वाटा उचलतात तोपर्यंत तरी मराठी भाषा समृध्द होत राहील.
उत्तर द्याहटवामराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा.
अतिशय सुंदर लेखन सर....विज्ञान जर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर लेखन मातृभाषेतूनच झाले पाहिजे ...आपल्या कार्यास व लेखनास माझ्या हार्दिक शुभेच्छा
उत्तर द्याहटवाखूपच छान.नेमकी शब्दयोजना आपली भावना ठळकपणे व्यक्त करते.रंजकपणे विषय मांडणी ही आपली हातोटी आहे. शुभेच्छा. पुढील पुस्तकाची प्रतिक्षा.
उत्तर द्याहटवाProf Bhosale C H, SGU
उत्तर द्याहटवामी आपल्या लेखनाचा मनापासून वाचक आहे. मराठी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यावा याबद्दल कुणाचेच दुमत असणार नाहीं.
खूपच छान लेख आहे
उत्तर द्याहटवा