शुक्रवार, १२ जुलै, २०१९

नवसाचं लेकरू


मागील तीन महिन्यापासून मी समाज माध्यमापासून दूर राहिलो. फेसबुकसह ब्लॉगवरही मी कोणतीही नवीन पोष्ट टाकली नव्हती. त्याचे कारण यथावकाश सांगेन. या पोष्टपासून मी परत ब्लॉगवर मी नियमीत लेखन प्रकाशीत करेन. येथे २०१८ च्या 'सह्याद्री दर्पण' या दिपावली अंकात प्रसिद्ध झालेली कथा मी येथे आपल्यासाठी पुन:प्रसिद्ध करत आहे...... धन्यवाद

----------------------------------------------------------------------------------------

       आमचं गावं तसं लहान. गावात दिडेकशे मराठ्यांची घर. तीसेक घराची दलीत वस्ती. मराठ्यांच्या घराला खेटून उभी. एक सुताराचं, एक कोळ्याचं आणि एक नाव्ह्याचं घर. ही घरं मराठ्यांच्या वस्तीत विखुरलेली. याशिवाय वेगळ्या जातीचं गावात घर नव्हत. पुजेअर्चेला भटजीसुद्धा शेजारच्या गावातून यायचा. घरात लागणारा किराणा भुसार माल शेजारच्या गावतून आणला जायचा. हायवेपासून दोनएक किलोमीटर आत असलेल्या गावात एसटीसुद्धा येत नव्हती. गावापासून तीनेकशे मीटरवरून वाहणारा ओढा गावाची पाण्याची गरज बारा महिने पुरवायचा. गावाच्या तीन बाजूला उंच टेकड्या जणू गावाचं रक्षण करायला उभ्या होत्या. गावाच्या पुर्वेला भवानी मातेचं मंदिर, तर, गावाच्या ईशान्येला काळेश्वराचं मंदिर. बाकी तेहतीस कोटी देवातील आणखी कांही देव, गावाच्या वावरात विखुरलेले होते. गावात कधी तंटा नाही, भांडण नाही. त्यामुळे बाजारदिवशी पोलीसस्टेशनच्या गावाला गेल्यावरच पोलीसाची ओळख व्हायची. गाव शांत असल्यान पाटलाला तसं कांही काम नव्हते. गावचा शिवारही मोठा नव्हता. पण होता त्यात गावाला पुरेल एवढे पिकायचे. तिथली माती जशी सुपिक होती, तशी माणसंही हुशार. घरटी चार मुलातील तीघेजण नोकरी करायचे. शक्यतो धाकटा शेती सांभाळायचा. घरटी किमान एकजण सरकारी नोकरीत होता. त्यामुळे पैसा गावात खेळत होता. पण गावाला पैशाचा माज आला नव्हता. शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचं सुरेख मिश्रण दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत दिसायचं. गावात आणि शहरात वाढणाऱ्या मुलांचे कपडे, भाषा, खानपान या निमित्ताने अनुभवायला मिळायचे.
      गावात सुशिक्षीतांचं प्रमाण जास्त. दलीतांची मुलंसुद्धा चाळीस-पंचेचाळीस वर्षापुर्वी शिकून मास्तर झालेली. पन्नास वर्षापुर्वी गावाची सरपंच महिला होती. गावात एकंच पाणवठा आणि त्या पाणवठ्यावर अख्खा गाव पाणी भरायचा. फार पुर्वी आलेल्या एका कुलकर्णी गुरूजीनी जातीपातीच्या साऱ्या भिंती कधीचं गायब करून टाकल्या होत्या. ते स्वत:ही जातपात मानत नव्हते. गावात आलेल्या शिक्षणाच्या गंगेत ही भेदभावाची, जातीपातीची दरी कधीचं वाहून गेली होती. 
      अशा धनाने आणि मनाने संपन्न गावात बारक्या वाढला होता. बारक्या नावाप्रमाणेच बारीक. त्याचं खरं नावं वाघोबा होतं. त्याच्याकडे बघीतल की 'नाव सोनूबाई, अन् हाती कथलाचा वाळा' ही म्हण हटकून आठवायची. पण त्याची अंगकाठी बघून, की कुणाला पुढं तो बारीक राहणार हे कळलं होतं म्हणून, माहित नाही, पण आमच्या जन्माआधीपासून त्याला मोठी माणसं बारक्या म्हणायची. मोठी माणसं जरी बारक्या म्हणायची, तरी आम्ही लहान पोरानी मात्र 'दाजी' म्हणायचं अशी सवय आम्हाला लावलेली.
      बारक्या गावात केसं कापायचा. केसं कापता कापता येणाऱ्या जाणाऱ्यावर त्याची बारीक नजर असायची. पोर काय करतात, काय बोलतात याच्याकडे त्याचं बारीक लक्ष असायचं. कोणी वावगं वागलं तर त्याची माहिती त्या मुलाच्या बापापर्यंत कधी कळायची ते समजायचं नाही. मोबाईलचं काय गावात एकही फोन नसलेल्या जमान्यात मुलगा घरी जायच्या आत, ती बातमी घरात पोहोचलेली असायची. हे काम बारक्यानं केले आहे, याची या कानाची त्या कानाला खबर नसायची. लहान मुलांची केस कापताना बारक्याला वेगळाचं उत्साह आलेला असायचा. प्रत्येक मुलाच्या बापाच्या सूचना लक्षात ठेवून बरोबर त्या पद्धतीने केस कापायचे कसब त्याच्याकडे होते. लहान मुलाना टक्कल करायला आवडत नसे. केस कापायचे म्हटलं, की मुले रडायला सुरूवात करायची. अनेक मुलाना चौघेजण उचलून आणयचे. दोघे पाय पकडायचे आणि दोघे हात पकडून त्या मुलाला बारक्यासमोर हजर केलं जायचे. समोर बसेपर्यंत बारक्या 'तू म्हणतो तशीचं कापतो' म्हणायचा आणि समोर मुलगा बसला की भादरून टाकायचा. हे नेहमीचंच. बरं त्याचं काही सलून वगैरे नव्हते.
      गावाच्या मध्यभागी असलेल्या वडाच्या झाडाखाली एक बस्कर टाकून त्यावर बारक्या बसायचा. त्याच्यापुढे एक बस्कर. त्यावर गिऱ्हाईक बसले, की याचा धंदा सुरू. एक चामड्याची धुकटी त्याच्याकडे असायची. लहानपणापासून ती एकचं धुकटी आम्ही बघत आलो. त्या धुकटीत केस कापायच्या कात्र्या, वस्तरा, मशीन, पाण्यासाठी तांब्या, वाटी, गिऱ्हाइकाच्या अंगावर टाकायचे कापड, ब्लेडचे पाकिट आणि धार लावायला छोटा निशाणाचा दगड. हे सगळ कांही व्यवस्थित ठेवलेलं असायचं. हे कापड आणि सारं साहित्य अत्यंत स्वच्छ ठेवलेलं असायचं. गिऱ्हाईक बघून लागेल तेवढेचं सामान तो बरोबर काढायचा. त्याचं काम झाले की लगेचं सगळ स्वच्छ करायचा. स्वच्छता हा बारक्याचा स्थायीभाव. केस कापताना शक्यतो मुलाना शर्ट काढून बसवायचा. हायस्कुलमध्ये जाणाऱ्या मुलाना सारे केस कापायचे नसायचे. ती मुलं नखरे करायची, पण बारक्या हुशार. तो शेतकरी जसा बैलाला चुचकारत आपलंस करतो, तसं हळूहळू गप्पा मारत, त्या मुलाला केस कापायला राजी करायचा. त्याच्या बोलण्यात तो मुलगा एवढा गुंतलेला असायचा की केस कापून झाल्यावरचं त्याच्या लक्षात यायचं की आपल्या मनाविरूद्ध केस कापले आहेत. पण त्यावेळी दंगा करून काहीच उपयोग नसायचा, कारण कापलेले केस पुन्हा जोडायचं तंत्र काही कुणाला अवगत नव्हत. त्याचा दंगा जास्तचं वाढला तर बारक्या म्हणायचा 'पुढच्या वेळी तुझे केस बारीक नाही कापणार, तुझ्या बाबाला मीचं समजावतो. पोरगं आता मोठं झालय ते.' या वाक्यावर नाराज असलेला मुलगा निघून जायचा. पुन्हा महिन्या दिड महिन्यात हाचं अध्याय रंगायचा.
       हे बारक्या भलतेचं कळकुटं. गावात त्याच्या वयाच्या लोकापासून सर्व लहान मुले त्याच्या चिडवण्याच्या तडाख्यातून सुटायची नाहीत. चिडवायला त्याला कारण शोधावे लागत नसे. मुलांच्या कोणत्याही गोष्टीचे विचित्र वर्णन करायचा. त्याला सगळी मुलं हसतील, अशी चिड पाडायचा. दोन चार वेळा त्याला उद्देशून चार चौघात बोलले की पुढचा चिडायला लागायचा. केस कापता कापता त्याचा हा नित्याचा उद्योग. गावातल्या मुलीदेखील त्याला दाजी म्हणायच्या. बारक्यासुद्धा मेव्हण्याच्या नात्यानं सगळ्या मुलीना चिडवायचा, पण एका मर्यादेत. मुलाना मात्र रडेपर्यंत चिडवत राहायचा. मुलगा रडत घरी गेला तर त्यालाचं समजावलं जायच. 'दाजी हाय ना त्यो, चिडवायचाच. आपण लक्ष नसतं द्यायचं' पण बालवयात ही समज कुठून येणार. केस कापता कापता दररोज अशी चार दोन मुलाना रडवणे हा  बारक्याचा जोडधंदा.
      गावातले तात्याराव गुरूजी नुकतेचं गावाजवळ बदलून आले. पुर्वी लांब गावात नोकरी असल्याने बाहेरगावी राहात. आता ते गावात राहायला आले. त्यांचा धाकटा चिरंजिव लक्ष्मण आमच्या वर्गात होता. त्याला आम्ही लक्ष्या म्हणायचो. एकदा हा लक्ष्या आपल्या ताईला दहावीत चांगली मार्क पडले म्हणून बाबानं किलोभर पेढे वाटले होते, हे आम्हाला सांगत होता. हे बारक्याने ऐकले. लगेचं दाजीबानं विचारले 'लक्ष्या एका किलोत किती पेढे बसत्यात?' आता हा आकडा आमच्यातल्या कुणालाचं सांगता येत नव्हता. मुळात किलोभर पेढे कुणाच्याच हातात आले नव्हते. दाजीबानं लगेच सुरू केलं, 'ढील सोडतंय बघा रं पोरानू. लक्ष्या, येडाई वाट पेढं वाट'. गावाबाहेर स्मशान भुमीकडं जाणारी येडाई वाट, तिचा आणि पेढे वाटण्याचा काहीच संबध नव्हता. पण दाजीबानं लक्ष्या दिसला की 'येडाई वाट, पेढं वाट' एवढंच म्हणत त्याची पुरती वाट लावली. लक्ष्या चिडत होता आणि दाजीबा त्याला चिडवत होता. लक्ष्या वैतागला. त्याने रागाने दाजीबाला दगड मारायला सुरूवात केली. दाजीबा चिडवायचा आणि लक्ष्या दगड मारायचा. पण दाजीबाचं नशीबचं चांगलं. नेमकं त्याचंवेळी तात्याराव मास्तर आले. अन् दाजीबानं दगड खायच्याऐवजी, लक्ष्याला धपाटे मिळाले. तात्याराव मास्तरनी लक्ष्याला 'मोठ्या माणसाला दगड मारतोस' म्हणत बीनसाबणाचा चांगलाचं धुतला. पुढे लक्ष्या नेहमी दात ओठ खावून दाजीबाकडे बघायचा. पण कांहीही करू शकत नव्हता. गावातल्या सगळ्या मुलांची हीच अवस्था. अकरावीनंतर कॉलेजला जाणाऱ्या पोराना मात्र दाजीबा चिडवायचा नाही. शेती करणाऱ्याना मात्र चिडवण सुरूचं असायचं, ते त्या पोरांच लग्न होइपर्यंत. लग्न होवून गावात आलेल्या सुना या त्याच्या बहिणी असायच्या. त्याना मात्र दाजीबाचा कसलाचं त्रास नसायचा.    
      आम्ही मुले त्याचं चिडवण बघून चिडायचो. खुप राग यायचा. अनेकजणानी त्याला उलट चिडवायचा प्रयत्न केला. पण काहीही म्हणलं तरी त्याच्यावर फरक पडत नव्हता. दाजीबा चिडायचा नाही.  लहान मुलं तोंडावर चिडवायला गेली आणि आमचे नाव त्याने घरातील मोठ्याना सांगीतले, तर, पाठीचं सालटे निघायची भिती होती. म्हणून आम्ही लपून लढायचा मार्ग काढला. आम्ही खुप विचार केला आणि आम्ही बारक्याला चिडवायचं ठरवलं. बारक्यानं शाळेचं तोंड बघितलेलं नव्हतं. आम्ही त्यावेळेस तिसरीत शिकत होतो. मास्तरनी शाळेत वाघाची माहिती सांगीतली आणि आमच्या डोक्यात बारक्या दाजीला चिडवायचं घोळायला लागलं. आम्ही सगळयानी ठरवलं, लपून बसायचं अन बारक्या दाजी दिसला रं दिसला की 'ये बीनशेपटीचा वाघ' म्हणायचं. एकाचे ऐकले की पुढच्या घरातल्याने म्हणायचे आणि लपून बसायचे. आम्ही हा प्रयोग सुरू केला. बारक्या दाजीनं ऐकून पहिल्यांदा आवाजाच्या दिशेनं बघीतले आणि तसाचं पुढं निघून गेला. आमचा अपेक्षाभंग झाला. पहिला दिवस व्यर्थ्य गेला. मात्र पुन्हा पुन्हा चिडवल्यावर दाजीबा चिडेल म्हणून आम्ही आमचा प्रयत्न सुरू ठेवला.
      तिसऱ्या दिवशी आम्ही लपून बसलो. बारक्या दाजी दिसताचं 'ये बीनशेपटीचा वाघ' म्हणलो. दोघांच चिडवून झाले. तो आता पाटलाच्या घरासमोर गेला. पाटलाच्या राम्याने चिडवले आणि पाठोपाठ राम्या 'आयोव' म्हणत बाहेर पळत आला. काय झालं म्हणून आम्ही बाहेर आलो, तर पाटील हातात चाबूक घेवून राम्याला बोलावत होते. पाटलानी आपला मोहरा आमच्याकडे वळवला. अन् म्हणले 'मोठ्या माणसाला चिडवताव. त्यो काय तुमच्या शिनपाकचा हाय. त्याला पुन्हा चिडवताना दिसलाव तर शाळेत येवून, दरवाजा लावून, मी अन मास्तर दोघं मिळून फोकलून काढू. कळ्ळ कारं ए बेण्यानू'. आमच्या बारक्या दाजीला जेरीला आणायच्या प्लॅनची अशी मस्त वाट लागली. आम्ही पाटलाना हे कुणी सांगीतल याचा शोध घेतला. बारक्या दाजीनं दोन दिवस आमची ही चेष्टा दुर्लक्षित केली. मात्र हे बंड त्याला मोडून काढायचं होते. कारण ते तसंच फोफावण त्याच्या गावातील साम्राज्याला शह देणारे होते. त्यानी फक्त पाटलाना एवढचं सांगीतल की 'पोरं एकमेकात सभ्य शब्दात बोलत नाहीत'. म्हणजे काय? हे बारक्यान सांगीतलं नव्हत. 'पण बाराच्या दरम्यान मी गावाकडून काम उरकून येताना पोरांची चाललेली चर्चा बरी वाटत नाही, ऐकायला. म्हणून आपलं कानावर घातल'. पुन्हा 'मला माहित असताना मी तुम्हाला सांगितले नाही, तर, तुम्ही माझ्यावर चिडचालं' अशी मखलाशी पण मारली. पाटलाना नेमकी वेळ कळली होती.
      त्यामुळे पाटील नेमके त्या वेळेस आवाज न करता येवून बाहेर बसले. राम्याला किंवा आम्हाला कांहीचं माहित नव्हते. 'बिन शेपटीचा वाघ' हे बारक्याला उद्देशून आम्ही म्हणत आहोत, हे पाटलानी लगेच ओळखले. दाजीबाने आम्ही टाकलेल्या जाळ्यात आम्हाला अडकवले. दुसऱ्या दिवसापासून आमच्या झालेल्या फजितीवर बारक्या दाजीनं चिडवून आम्हाला बेजार केलं. घरात तक्रार करून उपयोग नव्हता. सर्वसाधारण दरवर्षी अशा प्रकारचा अनुभव घेत गावातील पोर लहानाची मोठी व्हायची. मी त्या मानानं सुदैवी होतो. गावाच्या कडेला आमचं घर होतं. त्यामुळं बारक्या दाजीच्या नजरेला कमी पडायचो. तो यायच्या जायच्या वेळेस त्याला दिसू नये, म्हणून बाहेर पडायचो नाही. पण दिसलो की दाजीबा चिडवायला सुरूवात करायचा. दर दोन तीन दिवसाला आपलं टार्गेट बदलायचा. मोठी माणसं विशेषत: पाटील, मास्तर यांच्यासमोर तो चिडवायचा नाही.
      आमचं गाव लहान असल्यामुळं निव्वळ गावातल्या पोरांची दाढी-केस कापून बारक्याचा संसार चालणं शक्य नव्हतं. मग बारक्यानं हुशारी केली. आजूबाजूच्या काही गावात केस कापायला कारागीर नव्हता. अशी चार पाच गाव त्याने निवडली. त्या गावाना वार ठरवून दिले. पाच सहा किलोमीटरच्या परिघातील या गावात बारक्या सकाळी सहालाचं जायला निघायचा. त्या गावातल्या लोकाची कामं उरकून बारापर्यंत गावात परत असायचा. आम्ही अर्ध्या चड्डीत होतो तेंव्हापासून बारक्याचा उर्फ दाजीबाचा दिनक्रम असाचं असायचा. बारक्या तेंव्हा दिसायचा तसाचं आजही दिसतो. केसं काळ्याची पांढरी झाली एवढा फरक सोडला, तर, त्याच्या अंगकाठीत, चेहऱ्यात काडीचासुद्धा फरक पडलेला नव्हता.
      आजूबाजूच्या गावात धंद्याच्या निमित्ताने दाजीबाचे जाणे येणे असल्याने सगळ्या गावातील लोकाना तो नावानिशी ओळखायचा. गावातील नातेसंबंधही पंचक्रोशीतचं. त्यामुळे सुखदुख:चे निरोप देण्याचे कामही दाजीबाकडेचं आले. दाजीबाही कोणतेही शुल्क न आकारता हे काम करत असे. त्याबदल्यात दिवाळीला घरातल्या प्रत्येक पुरूषासाठी दोन मिटरचे करदोड्याचे तुकडे दिल्यानंतर दाजीबाचा सन्मानाने सत्कार व्हायचा. गावातील माहेरवाशीणीच्या बाळाचे जावळ मामाच्या मांडीवर बसवून काढले जायचे. त्यावेळी दाजीबाला भरपेहरावाचा आहेर करून, नेहमीपेक्षा चौपट रक्कम दिली जायची. त्यामुळे गावातील माहेरवाशीणीची निरोपाची देवाणघेवाण, हा त्याच्या आनंदाचा भाग होता. मात्र गावच्या एखाद्या लेकीला सासरी त्रास होतो हे कळालं, तर, बापाच्या आधी दाजीबाचा जीव कळवळायचा. मग, गावातली कामं उरकंत, त्या घरातील बित्तंबातमी काढायचा. पोरीच्या बापाला 'पोरीला त्रास होतो' एवढंच न सांगता पाहुण्याचे कान कोणी उपटले तर पाहुणा सरळ होईल, हे पण सांगायचा. त्यामुळे गावाच्या लेकींच्या सुखी संसाराला बारक्याचा छान आधार असायचा. निरोपाच्या निमित्ताने गेलेल्या घरी त्याचं चहापाणी व्हायचं. त्याला कुठेही पैसे द्यावे लागत नसत. त्या गावातील मुलगी बारक्याच्या गावात सून म्हणून गेलेली असायची. त्या मुलीचा बाप बारक्याबरोबर भाजीपाला, कांही वस्तू पाठवायचा. त्यात बारक्याला स्वतंत्र पिशवी असायची.
      आम्हाला कळायच्या आतचं या दाजीबाचं लग्न झालं होतं. त्याची बायको आपले घर आणि संसार नेटकेपणाने सांभाळणारी भेटली. सर्वांशी मिळून मिसळून वागायची. अनेक वर्ष त्याला मुलंबाळ झाले नाही. अनेक नवस सायास झाले आणि त्याना दिर्घ प्रतिक्षेनंतर मुलगी झाली. मुलगा व्हावा म्हणून आशा वाढली. पुन्हा नवस सुरू झाले. काळेश्वराला 'मला पोरगं झाल तर त्याचं नाव काळेश्वर ठेवीन अन तुझा जप करीन' असा नवस दाजीबा बोलला. पण त्याच्या घरचा पाळणाचं जड असावा. दाजीबाची इच्छा कांही पुर्ण होत नव्हती. मुलगी शेवंता वयात आली, तरी, घरात दुसऱ्यांदा पाळणा कांही हालला नाही. शेवटी दाजीबानं या मुलीचे लग्न करायचं ठरवले. आपल्याला मुलगा नाही, म्हणून त्यानी घरजावई व्हायला तयार असलेला मुलगा शोधला. शेवंताचं हात पिवळे केले. शेवंताचा नवरा राम खुपचं चांगला होता. आईबापाची काळजी घ्यावी, तसा तो दाजीबाची आणि त्याच्या बायकोची काळजी घ्यायचा. गावातली सगळी कामं तो करायचा. शेजारच्या गावात पण त्यानं चांगलाचं जम बसवला. चार पैसे जास्तीचे येवू लागले आणि त्यानी दोन एकर शेताचा तुकडा विकत घेतला. आता दाजीबानं शेतातं बस्तान बसवलं. आजूबाजूची गावं जावई सांभाळायचा आणि गावातील गिऱ्हाईके सांभाळून दाजीबा शेतात जायचा. असे त्यांचे सुखाचे जगणे सुरू होते. अशात दाजीबाला आपण आजोबा होणार, ही बातमी लागली. दाजीबाला मोठा आनंद झाला. त्याचं वेळी आपल्या बायकोलापण पुन्हा दिवस गेल्याचे लक्षात आले.
      लेक जावयाच्या बरोबरीनं दाजीबाचा पाळणा दुसऱ्यांदा हालला आणि दाजीबा आजोबा आणि बाबा आठ दिवसाच्या फरकानं झाला. दाजीबाने एवढ्या वर्षानंतर मुलगा झाला, म्हणून त्याचं नाव ग्रामदैवत काळेश्वराचं ठेवलं. दाजीबाचा काळेश्वर आणि रामचा निळकंठ हे मामा आणि भाचा एकाचं वयाचे. एकत्र खेळत वाढू लागले. काळेश्वर शिक्षणात हुशार निघाला. निळकंठने सातवीतचं शाळा सोडली. तो आजोबाबरोबर शेतात जायला लागला. तोही आता घराला हातभार लावू लागला. शिकणाऱ्या मामाला पैसा कमी पडत नव्हता. काळेश्वरही मनापासून शिकत होता. चौथीला त्याला शिष्यवृत्ती मिळाल्यावर रामने गावाला पेढे वाटले. पैसा हाताशी आला, तरी, परंपरागत व्यवसाय मात्र त्यानी सुरूचं ठेवला. गावाला त्यांची गरज होती आणि ती गरज आपण भागवली पाहिजे, या भावनेने राम आणि निळकंठ वागत होते.
      काळेश्वर शिकून सर्वांचे पांग फेडणार, अशी अख्ख्या गावाची खात्री होती. काळेश्वर शिकला, पदवीधर झाला. पुढे स्पर्धा परीक्षा द्यायला लागला आणि नशिबाने त्यालापण चांगली सरकारी नोकरी मिळाली. त्यांच्या अख्ख्या खानदानात राम सोडून कोणाला वाचतापण येत नव्हते. काळेश्वराचे हे यश पुर्ण गावाने साजरे केले. शाळेत त्याचा सत्कार केला. सत्कारासाठी गावातलेच जिल्हाधिकारी पाटीलसाहेब मुद्दाम आले. कांही दिवसानंतर काळेश्वरची गडचिरोलीला नियुक्ती झाली. गावच्या रितीने स्वत:ला लागतील तेवढे पैसे ठेवून सर्व पैसे तो गावाकडे पाठवू लागला. गावात आता दाजीबानं चांगले घर बांधले. बघत बघत तीन वर्ष गेली आणि तो जिल्ह्यात बदली होवून आला. जिल्ह्याच्या ठिकाणी त्याला नियुक्ती मिळाली. आता सुट्टी लागली की तोही गावाकडे यायचा. मुलगा नोकरीला लागला स्थिरस्थावर झाला की त्याच्या लग्नाचं बघायला सुरूवात होते. काळेश्वर आणि निळकंठ दोघालाही मुली सांगून येऊ लागल्या. लवकरचं निळकंठचं लग्न जमले. पण काळेश्वरच्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या. त्याला सांगून आलेल्या मुलीतली एकही मुलगी पंसंत पडत नव्हती.  
      आपल्या खात्यात आपल्या जातीचा बीन लग्नाचा कोणी आहे का? हे मुलींचे बाप बरोबर शोधत असतात. उपजिल्हाधिकारी काळे साहेब असेचं मुलगी सुमनसाठी मुलगा शोधत होते. मुंबईची हवा लागलेल्या मुलीसाठी काळेश्वर उत्तम असल्याचे त्यानी हेरले होते. त्यानी आपल्या घरी त्याला जेवायला बोलावले. सर्वजण एकाचं टेबलवर जेवायला बसले. काळेश्वरने जेवताजेवता सुमनला पाहिले. केसाचा बॉब कट, लिपस्टिक लावलेले ओठ आणि एकूण चित्रपटातील नायीकेसारखे तीचे रूप पाहून त्याला एकदम माधूरी दिक्षित आठवली. मनातल्या मनात 'एक...दोन...तीन...' हे गाणेपण सुरू झाले. मात्र वरवर शांतपणे जेवत राहीला. शेवटी ती त्याच्या साहेबांची मुलगी होती. गावाकडची माहिती इकडचे तिकडचे बोलणे होत जेवण आटोपले. अनेक वर्षाचा महसूल विभागातील अनुभव असणाऱ्या साहेबांच्या लक्षात आले की काळेश्वर आपल्या जाळ्यात फसला आहे.
      दुसऱ्या दिवशी साहेबानी काळेश्वरला बोलावले आणि थेट विषयाला हात घालत विचारले 'कशी वाटली सुमन?' काळेश्वरनेही आढेवेढे न घेता 'खुपचं छान' म्हटले. पुढे साहेब काळेश्वरच्या वडिलाना भेटायला गावाकडे गेले. आपला लेक एवढ्या मोठ्या घरचा जावई होणार, हे ऐकूनचं दाजीबा भारावला. लवकरचं त्यांचे लग्न झाले. काळेश्वर आपल्या स्वप्नातील माधूरीला घेवून गावात आला. गावात तोपर्यंत बॉबकटवाली नवरी आलेली नव्हती. गावातील लग्नात नवरा नवरी बोलतही नसायचे. गावातले सगळे आश्चर्याने बघतचं राहिले. जुन्या बायकांच्यादृष्टीने 'हे आक्रित होते', पण 'कलयुगात असंच व्हायचं' म्हणायच्या आणि विषय सोडून द्यायच्या. नव्याचे नऊ दिवस संपले. तो पुन्हा बायको सुमनबरोबर नोकरीच्या ठिकाणी निघून गेला. काळेश्वरच्या संसाराचा गाडा सांभाळणारी आली होती. सुमनने हळूहळू त्याच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायला सुरूवात केली. काळेश्वरने गावाकडे पैसे पाठवलेले सुमनला आवडत नव्हते. तीने ते हळूहळू बंद करायला लावले. लग्न झाल आहे, खर्च वाढला म्हणून सर्वानी समजून घेतले. दाजीबाची मुलगी शेवंताला मात्र हे खटकत होते, पण तसही तिला काही कमी पडत नसल्यान काही बोलत नव्हती. हळूहळू काळेश्वरचे गावाकडे येणेही कमी झाले. पुढे काळेश्वरला एक मुलगा आणि मुलगी झाले. गावाकडे एकदा सर्वजण जावून देवाच्या गोष्टी उरकून आले. त्यावेळी दाजीबा, त्याची बायको, शेवंता, राम आणि निळकंठ सर्वजण तीला आणि काळेश्वरला सांगत राहिले की 'दिवाळीला तरी गावी येत जा'. 'हो, हो' म्हणत सर्वजण निघाले. जाताना त्यांच्या गाडीत पोतभर ज्वारी निळकंठने कांही न बोलता ठेवली होती. मात्र सुमनने या गावंढळ लोकामध्ये पुन्हा यायचे नाही, असे पक्के ठरवून टाकले होते.
      पुढे महिने, वर्ष लोटले काळेश्वर आला नाही. वर्षामागून वर्ष चालली तशी दाजीबाची तगमग वाढू लागली. लेकाला बघाव, नातवंड बघावीत, असे त्याला वाटायचे. दाजीबाने कधीचं पंचक्रोशी ओलांडली नव्हती. त्याला लेकाकडे जावे, असे खुप वाटायचे. तो त्याची इच्छा बोलून दाखवायचा. पण शेवंता बापाला समजावायची. निळकंठची लेकर तर पणतवंड आहेत त्याना खेळवा म्हणायची. खरतर, तिला वहिनीची भिती वाटायची. बाप गेला आणि त्याला वहिनीने नीट नाही वागवले, तर, तो कोलमडेल, अशी भिती तीच्या मनात होती. मग दाजीबाने नवा मार्ग काढला. गावातील कोणाकडून तरी तो पत्र लिहून घ्यायचा आणि  काळेश्वरला पाठवायचा. मात्र सुमन ही पत्र काळेश्वरला दिसू द्यायची नाही. हळूहळू तीने गावातील आठवणींचा भाग काळेश्वरच्या मनातून पुर्ण झाकून टाकला आणि गावी जाणे, तीथे राहणे हे आपल्या मुलांच्या वाढीसाठी कसे अयोग्य आहे, हे पटवून दिले. बायकोच्या दिसण्याला भुललेल्या काळेश्वरला, अंतर्मनाचा आवाज ऐकायची संधीचं मिळणार नाही, याची सुमन पुर्ण काळजी घेत होती.
      अशी वर्षामागून वर्ष गेली. आता दाजीबा पुर्ण थकला होता. त्याला चालणही अशक्य झाले. त्याला काळेश्वरची आणि नातवाची सारखी आठवण यायची. त्या काळात फोनसुद्धा गावात आलेले नव्हते. त्यामुळे आजच्यासारखा संपर्क शक्य नव्हता. राम आणि शेवंताला काळेश्वरच्या वागण्याने अनंत यातना होत होत्या. त्याला या अवस्थेत दाजीबाला घेवून जाणे योग्य नाही, हे लक्षात येत होते. त्यापेक्षा तिथे गेल्यावर ते कसे वागतील या भितीने काळेश्वरला भेटायला जायला शेवंता तयार नव्हती. दाजीबाच्या हालचाली कमी होत चालल्या, तशी त्यानी एक बाज दारातल्या पिंपरणीच्या झाडाखाली टाकायला लावली. आजोबाकडे लक्ष देता यावे म्हणून निळकंठने पिंपरणीच्या झाडाखालीचं व्यवसाय सुरू केला. तिथेच  लोकांचे केस, दाढी कापत राहायचा. दाजीबा दिवसभर बाजेवर असायचा. येणाऱ्या जाणाऱ्याला बोलत दिवस ढकलायचा. आता त्याचं चिडवणे पुर्ण थांबले होते. केस कापण्यासाठी येणारे गिऱ्हाईकही दाजीबाशी दोन शब्द बोलून जायचे. एखाद्याच्या बोलण्यातून काळेश्वरचा विषय निघाला की दाजीबा हळवा व्हायचा. त्याचे पुर्वीचे खट्याळ वागणे बंद झालेले पाहून आमच्यासारख्या सुट्टीसाठी गेलेल्या नोकरदाराना चुकल्यासारखे व्हायचे. येणाऱ्या प्रत्येकाने आपल्याशी बोलावे असे दाजीबाला वाटायचे. सुट्टीसाठी येणारी शहरातील माणसेही मग आवर्जून पाच दहा मिनिटे त्याच्याशी गप्पा मारायची. कोणी नसले की मात्र तो आपल्याचं विचारात मग्न असायचा. कोणाचीही गाडी आली की 'काळेश्वर आला काय?' म्हणून विचारायचा. निळकंठेश्वर त्याला कोण आलंय, ते पडल्या बाजेवर ऐकायला जाईल, अशा आवाजात सांगायचा. दाजीबाचा जीव काळेश्वरसाठी तीळतीळ तुटत होता आणि काळेश्वर मात्र मूळ कुटुंबापासून दूर दूर जात होता. त्याच्यापर्यंत दाजीबाचा आवाज पोहोचत नव्हता किंवा पोहोचू दिला जात नव्हता. दाजीबाला काय म्हणायचे हे समजून घेत निळकंठ सार त्याच्या मनाप्रमाणे करायचा. तरीही गावात येणाऱ्या प्रत्येक मोटारीचा आवाज ऐकून त्याचे कान टवकारायचे आणि कोण आले याची विचारपूस होत राहायची.
      असे बरेचं दिवस निघून गेले. दिवंसेदिवस दाजीबा खंगत चालला होता. अंगातील ताकत कमी होत चालली. त्याला आता बाजेवरून उठणे फिरणेही अशक्य झाले. त्याच्या हालचाली जवळजवळ थांबत चालल्या होत्या. त्याची सेवा लेक, जावई आणि नातू मिळून करत होते. कोणतीही उणिव राहू देत नव्हते. आपण एवढे करूनही हा काळेश्वरचा का विचार करतोय असा विचार त्या तिघांच्याही मनाला खटकत नव्हता. शेवंताला बापाची ही अवस्था बघवत नव्हती, मात्र दाजीबाची सेवा करण्यापलीकडे तीच्या हातातही कांही नव्हते.
      असाचं एक दिवस पडला असताना, अचानक दाजीबा उठून बाजेवर बसला. सकाळी दहाची वेळ होती. दरम्यान तो बसलेला बघून राम पळत गेला. दाजीबाच्या अंगात एवढी ताकत आली कशी? याचा तो विचार करत होता. तेवढ्यात दाजीबाने रामला हाक मारली. चढ्या आवाजात त्यानी पाटलाला बोलावून आणायला सांगीतले. रामने निळकंठला पळवले. निळकंठ पाटलाला घेवूनचं आला. दाजीबाला बसलेला बघून पाटील म्हणले 'काय दाजीबा, प्रकृती सुधारली वाटत? हो, हो, लवकर बरा हो.' तसा दाजीबा चवताळून म्हणाला 'प्रकृती कसली डोंबलाची सुधारतेय?.... पाटील, मी... मी ... चाललो.... पण एक करा. तेवढं... मला पाणी राम पाजलं. पेटवलंबी त्योचं... मला काळयाचं तोंड बघायचं नाही.' अन् पाटलाकडे आशेन बघत दाजीबाने मान टाकली.

६ टिप्पण्या:

  1. सुंदर लेखनी डाॅ शिंदे मास्तर

    उत्तर द्याहटवा
  2. मानवी भावनांचे खूप छान विश्लेषण आणि शब्दांकन केले आहे सर !

    उत्तर द्याहटवा