बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१९

सारे बदलले तरी…


 गेल्या रविवारीउरी' हा चित्रपट पाहिला! थिएटरमध्ये जाऊन -  अनेक वर्षानंतर. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला, त्याला वीस-बावीस वर्ष तरी उलटली. या दोन तपाच्या कालखंडात चित्रपट पाहिले, पण टीव्हीवर. एवढ्या मोठ्या कालखंडानंतर पुन्हा चित्रपटगृहात गेलो आणि माझ्या आयुष्यातील चित्रपटांच्या आठवणीचा पट डोळ्यांसमोर तरंगू लागला. तोच आपल्यासाठी येथे मांडला आहे.  धन्यवाद ..... व्ही. एन. शिंदे
------------------------------------------------------------------------------------ 



गेल्या रविवारीउरी' हा चित्रपट पाहिला. थिएटरमध्ये जाऊन -  अनेक वर्षानंतर! चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला, त्याला वीस-बावीस वर्ष तरी उलटली. या दोन तपाच्या कालखंडात चित्रपट पाहिले, पण टीव्हीवर. एवढ्या मोठ्या कालखंडानंतर पुन्हा चित्रपटगृहात गेलो आणि माझ्या आयुष्यातील चित्रपटांच्या आठवणीचा पट डोळ्यांसमोर तरंगू लागला.
लहानपणी आम्हाला चित्रपट हा प्रकारच माहित नव्हता. गाव अगदी छोटे. आमच्या गावात एस.टी. आजही येत नाही. एक किलोमीटर चालत गेल्यावर बस जाते त्या रस्त्याला आम्ही पोहोचतो. शाळा गावातच. अशा आडवळणी गावात वर्तमानपत्रं यायची, ती पण चार पाच घरांत. जवळच्या गावात शिक्षक म्हणून नोकरी करणारे काही शिक्षक ती आणायचे. वर्तमानपत्र बातम्यांसाठी वाचायचे असते, अशी सर्वांची ठाम समजूत. पुढे सातवीत गेल्यावर वर्तमानपत्र आम्हाला स्वतंत्ररित्या वाचायला मिळू लागले.  वर्तमानपत्रात बातम्यांखेरीज आणखी बरेच काही असते, हे लक्षात आले.
त्यात चित्रपट या शब्दाची पहिल्यांदा ओळख झाली. त्या काळी म्हणजे ४० वर्षांपूर्वी साधारण एक पानभर चित्रपटांच्या व नाटकांच्या जाहिराती असायच्या. त्या पाहून 'सामान्यज्ञान' वाढवण्यासाठी आम्ही थेट गुरूजींना प्रश्न विचारला, ‘चित्रपट म्हणजे काय?’ प्रश्न विचारून पूर्ण व्हायच्या आत आमचे गाल लाले लाल झाले. 'चित्रपट म्हणजे अत्यंत वाईट गोष्ट. त्यामुळे अनेक घरे बरबाद होतात. संसार उघड्यावर येतात. त्याचा नाद फार वाईट'. हे आणि असे बरेच काही ऐकून घ्यावे लागले. 'चित्रपट ही वाईट गोष्ट असते', असा आम्ही बोध घेतला आणि विषय सोडून दिला.
आठवीला पांगरीच्या शाळेत गेलो. त्यावेळच्या विज्ञान प्रदर्शनात मी उपकरण तयार करून ठेवले. गेलेल्या बल्बपासून होल्डर ॲडॉप्टर तयार केला होता. ते १९८१ साल होते. प्रदर्शन तालुक्याच्या गावी बार्शीत भरले होते. आम्ही आठ नऊजण त्यासाठी सरांसोबत बार्शीला आलो होतो. आमचे गाव वीस किलोमीटरवर. मात्र त्याकाळी दररोज ये जा करण्यापेक्षा शाळेतच मुक्काम करायचे, ठरले होते. भगवंत मंदिराशेजारील मॉडेल हायस्कूल हे प्रदर्शनाचे ठिकाण. दोन-तीन दिवस ते प्रदर्शन चालणार होते. दोन मुक्काम होते. पहिला दिवस सर्व ठिकठाक लावण्यात गेला. दुसऱ्या दिवशी परीक्षण झाले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.
आमच्याबरोबर आलेल्या विज्ञानाच्या सरांनी संध्याकाळी चित्रपट बघायला जायचे ठरवले. मला एकदम भिती वाटायला लागली. वर्षभरापूर्वीची गालावरची 'लालिमा' गेली असली तरी चित्रपट वाईट असतो, हे संस्कार कायम होते. सरांना मी पटकन बोललो. 'मी येणार नाही. सिनेमा वाईट असतो'. बाकीची मुले अगोदरच घोड्यावर बसून तयार होती. सरांनी समजूत काढली. 'एकटाच कसा राहणार' असा प्रश्न विचारला. रात्री मी एकटा शाळेत राहणे अवघड होते. पानगाव, वैरागच्या शाळेची मुलेपण सिनेमाला जाणार होती. शाळेशेजारी भगवंत मैदान. अगोदरच्या रात्री उशिराने तेथे वर्दळ दिसली नव्हती.  गावातील मी एकटाच होतो. आमच्या वर्गातील पण कोणी आलेले नव्हते. मी सांगितल्याखेरीज कोणालाही चित्रपट पाहिल्याचे कळण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे मी शेवटी तयार झालो. संध्याकाळी ९ ते १२च्या खेळाला जायचे होते. बुरूड गल्लीजवळ लता चित्रमंदिर. तेथेजानी दुश्मननावाचा चित्रपट लागला होता. अनेक कलाकार असलेला हा गाजलेला सिनेमा. १९७९मध्ये प्रदर्शित झालेला. दोन वर्षानंतर बार्शीत आलेला. बार्शीतही तो हाऊसफुल्ल चालला होता. सरांनी कोठून काय माहित, पण सर्वांसाठी तिकीटे मिळवली. आम्ही सर्वजण गेलो आणि आयुष्यात पहिल्यांदा मी चित्रपट पाहिला, तोही 'जानी दुश्मन'. शत्रुघ्न सिन्हा, सुनिल दत्त, संजीव कुमार असे अनेक नट होते. मला त्यांची ओळखही नव्हती. मात्र पुढे हळूहळू सर्वच परिचयाचे झाले. काही आपले वाटू लागले.
त्यानंतर पुढच्या वर्षी मी मुंबईत शिकायला गेलो. तेथे मुलुंडला ज्या इमारतीत आम्ही रहात होतो. त्या इमारतीतील गायकवाडाच्या घरी टीव्ही आला होता. १९८२ साली एशियाड भारतात भरले होते. त्यामुळे टीव्हीचा मोठा प्रसार झाला होता. त्या काळात सह्याद्री वाहिनीवर शनिवारी मराठी आणि रविवारी हिंदी सिनेमा असायचा. आम्ही सर्व अपार्टमेंटवासी त्याचा एकत्र आनंद घ्यायचो. त्या एका वर्षात पाहिलेले हिंदी चित्रपट आठवत नाहीत. मात्र 'कन्हैय्या' चित्रपट आणि त्यातील राजकपूरचे 'रूक जा ओ जानेवाली रूक जा' हे गाणे मात्र कायम लक्षात राहिले; का ते माहित नाही. मात्र मराठीतील गोष्ट एका लाखाची, भालू असे अनेक चित्रपट त्या काळात पाहिले. त्यातले काही निवडक लक्षात राहिले. दहावीला परत बार्शीला आलो. बार्शीत अधून मधून चित्रपट पाहायला लागलो. बार्शीमध्ये त्यावेळी लता, आशा, चित्रा आणि उदय ही चार चित्रपटगृहे होती. या सर्व चित्रपटगृहांत मी अनेकदा गेलो. मात्र त्याची घरात कोणाला माहिती  नसे. बोलणी आणि मार खाण्याचा प्रश्नच नव्हता. तसेच चित्रपट वाईट असतात, हा विचार निघून गेला. एनटीएस परीक्षेसाठी मी सोलापूरला गेलो. परीक्षा संपल्यानंतर जॅकी श्रॉफचा 'हिरो' पाहिला. त्यातील गाण्यांनी सर्वाना वेड लावले होते. मला 'डिंगडाँग' पेक्षा 'लंबी जुदाई' हे गाणे लक्षात राहिले.
केवळ मनोरंजनासाठीच तयार केल्या जाणाऱ्या चित्रपटांमध्ये जितेंद्रचे अनेक चित्रपट होते. त्याचे तोहफा, हिम्मतवाला, मवाली असे अनेक चित्रपट पाहिले. केवळ तीन तास डोकं रिकाम करण्यासाठी चित्रपट पाहायचे असतात, असे त्यावेळी वाटायचे. पण व्ही. शांताराम यांचा 'पिंजरा' पाहिला आणि प्रत्येक चित्रपटात काही बोध आहे का, हे शोधायला लागलो. मास्तरच्या तोंडात शेवटी असणारेव्यक्ती मेल्या तरी चालतील, पण आदर्श टिकले पाहिजेत, हे वाक्य त्याला कारण ठरले. त्यानंतर मी चित्रपट वेगळ्या भूमिकेतून पाहू लागलो. अकरावी बारावीमध्ये हा सिलसिला असाच चालू राहिला.

बंडखोरीचं ते वय. साम्यवादी विचारांचा प्रभाव आपोआप येत असे. मनोजकुमारचे देशभक्तीने भरलेले चित्रपट भारावून टाकत. निव्वळ मसालापटही मित्रांमुळे पाहावे लागत होते. मला ते आवडत नव्हते, असे नाही. मात्र चांगले चित्रपट पाहावेत, असे वाटायचे. नवा चित्रपट पाहण्याअगोदर विविध वृत्तपत्रांतील समीक्षण वाचत असे. त्यातून चांगले वाईट असे बरेच काही समजत असे. त्या परीक्षणामुळे अनेकदा चित्रपट पाहायचो. पण मर्यादित स्वरूपात.
पुढे बी.एस्सीसाठी सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याठिकाणी अनेक गोष्टी वेगळ्या होत्या. प्रथमच घरातील कोणाचे माझ्यावर बंधन नव्हते. त्यातच  एक अर्थार्जनाचे साधन मिळाले. घरातून येणारे आणि आपण कमावलेले पैसे. त्यामुळे पैसा हा प्रश्न नव्हता. मात्र वसतीगृहाचे नियम कडक होते. नऊच्या आत वसतीगृहात परत यावे लागत असे. रात्रीचाशोबधण्याची सोय नव्हती. त्यामुळे दर रविवारी चित्रपट पाहायला जाऊ लागलो.
त्यातचं होस्टेलवर एक कलंदर मित्र भेटला. रामहरी. दोन देवाचे नाव एकत्र घेऊन मिरवणारा हा पठ्ठ्या चित्रपटांचा जबरा शौकिन. त्याला जुने चित्रपट आवडत असत. सोलापुरात त्यावेळी भागवत चित्र मंदिरातच चार टॉकिज होत्या. त्याठिकाणी नवे चित्रपट येत असत. आम्हाला तर जुने चित्रपट हवे असत. जुने चित्रपट आणणारे एकच चित्रपटगृह होते. ते म्हणजे सरस्वती. साधारण आठवड्याला ते जुना चित्रपट बदलत. क्वचितच दोन आठवडे असायचा. या रामहरीने एक नवी शक्कल काढली. गावाहून मनी ऑर्डर आली की कॉलेजच्या पोष्ट ऑफिसमध्ये जाऊन पंधरा रूपयाची शंभर पोष्ट कार्ड आणायचा. ती आम्हा सहा सात मित्रांत वाटत असे. रविवारी कोणता चित्रपट पाहायचा, हे तो ठरवत असे. सर्वांना तो त्यांच्या अक्षरात आणि शब्दांत टॉकिजच्या व्यवस्थापकांना पत्र लिहायला लावत असे. पत्रातला साधारण मजकूर असा असायचा
मा. व्यवस्थापक, सरस्वती चित्र मंदिर, सोलापूर. आपण आपल्या चित्रपटगृहात जुने गाजलेले चित्रपट लावता. हे करून आपण चित्रसृष्टीची एक प्रकारे सेवा करत आहात. केवळ तुमच्यामुळे आम्हाला जुने, दर्जेदार आणि चांगले चित्रपट पाहायला मिळतात. आपल्या सेवेमुळे लोकांची अभिरूची टिकून राहण्यात मोठी मदत होत आहे. आपण असेच जुने चित्रपट दाखवावेत आणि आम्हा रसिकांची भूक भागवावी. मला ..… (जो चित्रपट पाहायचा त्याचे नाव) हा चित्रपट पाहायचा आहे. मात्र तो अनेक दिवस, कोठे लागला नाही. आपण तो लावलात तर फार बरे होईल. आपल्या हातून अशीच कलेची सेवा घडत राहो. आपणास उदंड आरोग्य आणि आयुष्य लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. कळावे आपला कृपाभिलाषी सिने चाहताआणि खाली मस्त सही ठोकायची. अशा प्रकारे अनेक पत्रे पाठवून रामहरीने अनेक उत्तम जुने चित्रपट सरस्वती चित्रमंदिरच्या व्यवस्थापकांना लावायला भाग पाडले.
या पद्धतीने मेरा नाम जोकर, मधुमती, हरियाली और रास्ता, दो आँखे बारह हाथ, निलकमल, सिलसिला, अभिमान, कभीकभी, पत्थर के सनम, दो रास्ते, आनंद, गाईड, आवारा, मदर इंडिया, गोलमाल, दिवार, चोरी चोरी, कागज के फुल, दो बिघा जमीन, आराधना, अमर प्रेम असे अनेक चित्रपट पाहिले. या सर्व प्रकारात व्यवस्थापकाला फसवण्याचा हेतू नव्हता. आम्हाला चांगले चित्रपट पाहायला मिळावेत, हा शुद्ध हेतू होता. ती तीन वर्षे मस्त मजेत गेली. चित्रपट पाहण्याचा खरा आनंद त्यावेळी घेतला.

एम.एस्सी.ला शिवाजी विद्यापीठात आल्यानंतर आमची मोठी अडचण झाली. सर्व चित्रपटगृहे गावात. त्यात संध्याकाळी दहाला शेवटची बस असायची. त्यामुळे रात्रीचा शो बघायची अडचण झाली. तरीही आम्ही रविवारी मस्त फिस्टचे जेवण जेवायचो आणि पिक्चर बघायला जायचो. क्वचित पन्हाळा दौरा असायचा. पण फिरण्यापेक्षा पिक्चरला जाणे आवडायचे. इंग्रजी चित्रपट क्वचितच बघितले. द ब्लॉब, टिचर असे चार पाच पिक्चर वगळता इंग्रजी चित्रपट पाहणे नाही. हिंदी आणि मराठी पिक्चर मात्र क्वचितच सुटायचे. त्यावेळी आजच्यासारखे भरमसाठ पिक्चरही येत नव्हते. पिक्चर बघून आल्यानंतर अभ्यासासाठी नाईट मारायची. मुड कसा अगदी फ्रेश झालेला असायचा. त्यावेळी आलेल्या चित्रपटातले अनेक पिक्चर अनेकदा बघितले.
त्याकाळात एकदा रात्री मोठी अडचण झाली. विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी म्हणून एस.के. पाटील काम पहायचे. कडक शिस्तीचा माणूस. एरवी कधी न दिसणारा. एम.एस्सी. भाग एकमध्ये असताना एकदा रात्री ९ ते बाराचा शो बघायला आम्ही गेलो. शो संपला. चालत अयोध्या थिएटरपासून विद्यापीठात आलो. आठ नंबर गेटमधून थेट रस्ता होता. आम्ही मजेत गप्पा मारत चाललो होतो. तेवढ्यात झाडाच्या सावलीतून पाटील साहेब पुढे आले आणि सर्वांची ओळखपत्रे मागितली. पाकिट मारतात म्हणून आम्ही ती नेली नव्हती. एकाकडेच ते होते. ते त्याला जाऊ द्यायला तयार होते, मात्र बाकीच्यांना सोडायला तयार नव्हते. शेवटी त्याने सर्वांच्या किल्ल्या घेऊन जावे आणि सर्वांची ओळखपत्रे आणावीत, तोपर्यंत आम्ही पाच सहा जणांनी तेथेच थांबायचे, असे ठरले. रात्रीचा दीड वाजत आला होता. तो आमचा मित्र गेला. सर्वांच्या रूम उघडून ओळखपत्रे घेऊन येईपर्यंत अडीच वाजत आले होते. झोपेचे पार खोबरे झाले होते. पिक्चरचा आनंद पुरता गेला होता. त्यावेळी दोन पेपरमध्ये दोन-तीन दिवसाची सुट्टी आली तरी आम्ही पिक्चरला जायचो.
पुढे पीएच.डी.ला विद्यापीठातच प्रवेश घेतला. त्यावेळी हनिफ सोबतीला आला. हा हनिफही वल्ली होता. त्याला माधुरी फार आवडायची. तो मिरजेचा. बोलण्याची त्याची एक स्टाईल होती. माधुरी आवडती हिरॉइन आणि तेजाब त्याचा आवडता चित्रपट. माधुरीचा उच्चार तो ‘महादुरी’ असा करायचा. ‘काय भयंकर दिसते महादुरी’ हा त्याचा पेटंट डायलॉग. त्या अडीच वर्षात किमान हजारवेळा ऐकावा लागला असेल. 'भयंकर' म्हणजे 'सुंदर' असा अर्थ कळायला, अनेक दिवस गेले. त्याच्या माधुरी प्रेमामुळे तेजाब हा पिक्चर सहा सात वेळा तरी पहावा लागला होता. त्याचा आवडता अभिनेता सनी देओल. त्याच्यासाठी ‘घायल’ हा चित्रपट डझनभर वेळा तरी पाहिला असेल. त्यातले डायलॉग मलाही पाठ झाले होते. स्वर्ग, आशिकी, अग्नीपथ, सौदागर, साजन, मैने प्यार किया, हम है राही प्यार के, दिल असे अनेक चित्रपट त्या काळात पाहिले.
त्यानंतर शिक्षक म्हणून बारामतीला रूजू झालो आणि चित्रपटापासून दुरावलो. बारामतीच्या एका वर्षात दोन तीन सिनेमे पाहिले असतील. पुढे लग्न झाले आणि संसारात पडलो. आता पिक्चर पाहायला वेळ मिळत नव्हता. बायकोबरोबर दोन तीन चित्रपट पाहिले. नाना पाटेकर मला आवडायचा. दमदार आवाजातले त्याचे डायलॉग ऐकत राहावे वाटायचे. त्याचा 'यशवंत' बार्शीच्या आशा चित्रपटगृहात पाहिला. मला एकदम त्या चित्रपटगृहाची अवस्था खटकली. हिरो आला की लोकांच्या शिट्टया वाजवणे. जागोजागी लोकांनी लाल केलेल्या भिंती. कचरा पडलेला. लोकानी खाऊनी टाकलेले कागद. सगळे वातावरण बेसूर वाटू लागले. घाण वाटू लागले. त्यानंतर थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघावा, असे वाटेनाच! मला कितीही, कोणीही आग्रह केला तरी पिक्चरला जात नसे. १९९६ नंतर बाहेर जाऊन पिक्चर बघणे पूर्ण बंदच झाले.
दूरदर्शनवर शुक्रवारी रात्री पिक्चर असे. मी तो आवर्जून पाहात असे. त्यावरून अनेकदा घरातील भांड्यांचा आवाजही झाला. मात्र रात्रीचा तो पिक्चर मी पहात असे. पुढे सोलापूर, कोल्हापूरच्या वास्तव्यात अधूनमधून पिक्चर पहायला लागलो, पण ते टीव्हीवर. थिएटरला जाणे टाळतच राहिलो. पुढे दोन वर्षे नांदेडला गेलो. तेथे एकटाच रहात होतो. तोपर्यंत वाहिन्याचा सुळसुळाट झाला होता. घरी केबल असल्याने अनेक उत्तम चित्रपट पाहिले. बसमधून येता-जाता काही नवे चित्रपट पाहायला मिळत होते. त्या काळात किमान पन्नास साठ चित्रपट तरी पाहिले. तानी, देऊळ असे काही मराठी पिक्चर पाहिल्यावर मराठी सिनेमा बदलतोय हे जाणवत होते. मात्र हे चित्रपट पाहाणे घरातच होते. आता, अलिकडे तर मी पिक्चर पाहायला थिएटरमध्ये जायचे असते, हेच विसरून गेलो होतो. घरच्यांनीही 'हा अरसिक' असा शिक्का मारून, मला आग्रह करणेही सोडून दिले. मला त्याचे काही वाटत नव्हते.
मात्र मागच्या आठवड्यात कन्येने आग्रह धरला, 'मलाउरीबघायचाय, तोही तुमच्यासोबत'. मी नेहमीप्रमाणे टाळण्याचा प्रयत्न केला. तिनेही नकार स्वीकारला. मात्रउरीबद्दल अनेक लोकांकडून चांगले ऐकायला मिळाले होते. मीही पुन्हा विचार केला. मुलीचा बाकी कसलाच हट्ट पुरवत नाही. जाऊ या तीन तास तिच्यासोबत सिनेमाला. तिच्या जन्मापासून मी पहिल्यांदाच तिच्यासोबत पिक्चरला गेलो. खरं तर मी चित्रपट दाखवायला तिला न्यायला हवे होते. मात्र आता ती मला घेऊन गेलेली होती. हो, तीच नेत होती. कारण आजच्या जगातले चित्रपटगृहाचे बदललेले रूप मला कुठे माहित होते! शेवटी 'मी 'उरी' पाहायला येतो' म्हटल्यावर तिने लगेच ऑनलाईन दोन तिकिटे बुक केली. पूर्वीसारखे लवकर जाणे नाही. तिकीटांच्या रांगेत उभे राहणे नाही. पाकिट कोणी मारेल का, याची काळजी नाही. हाऊसफुल्ल झाला म्हणून ब्लॅकवाल्याचा शोध नाही. गाजलेल्या पिक्चरची तिकीटे मिळाल्यावर विजयी वीराचा आनंद नाही. दोन मिनिटात तिने सांगितले. रिलायन्स आयनॉक्सची तिकीटे आहेत. मला हे सारेच नवीन होते.
अडीचच्या शोसाठी आम्ही दोन वाजता निघालो. तिची किरकोळ खरेदी करून आम्ही वेळेत पोहोचलो. मोबाईलमधील तिकिटे दाखवून प्रवेश झाला. इथेही चुकल्यासारखे वाटले. डोअर किपरने तिकीटे फाडण्याची पद्धत आढळली नाही. आत सर्वत्र भिंती स्वच्छ होत्या. पिक्चर सुरू असताना फेरीवाले कडमडत नव्हते. तो विक्रेता मधल्या रिकाम्या जागेतून शांतपणे जात होता. गर्दी नव्हती. पिक्चर सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी सारे उठून उभा राहिले. सारे काही शिस्तबद्ध. लेकीने सुरूवातीलाच मोबाईल सायलेंट मोडवर टाकायला सांगितले. राष्ट्रगीत, जाहिराती झाल्यावर सिनेमा सुरू झाला. एक चांगला चित्रपट पहायला मिळाला. मात्र हिरोच्या एंट्रीनंतर कोणीही शिट्ट्या मारल्या नाहीत. कसलाच दंगा नाही. त्या दिवशी भारत-न्युझीलंड वन डे सुरू होती. मॅचचे काय होते? याची मला चिंता लागून राहिली होती. मी अधूनमधून मोबाईलवर स्कोअर पहात होतो. तेवढेही चिमणीला आवडत नव्हते. तिने मोबाईल काढून घ्यायची धमकी देण्यापूर्वीच भारत जिंकला, हे बरे झाले. नाहीतर मी मॅचचे काय होते, या काळजीत चित्रपट पाहिला असता. हिरोच्या मेव्हण्याचे आतंकवादी हल्ल्यात निधन होते. त्याची मुलगी वडिलांचे अंत्यदर्शन घेते आणि मामाला बिलगते. या क्षणाला अख्ख्या चित्रपटगृहातील लोकांचे हात स्वत:चे ओले डोळे पुसण्यासाठी गेले होते. म्हणजे माणसातील भावना त्याच होत्या. माझ्याही डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या.

सारे काही बदलले आहे. चित्रपटाचे तंत्रज्ञान, चित्रपटगृहे, माणसाची शिस्त, स्वच्छता…. सारे काही. मात्र माणसाच्या भावना आजही त्याच आहेत, जिवंत आहेत. हा अनुभव दिल्याबद्दल मी माझ्या कन्येचे आभारच मानायला हवेत. एका पिढीच्या अंतराने मी हे सारे अनुभवले.  सारे बदलले असले तरी माणसाचे मन तसेच आहे, हळवे. हे पाहून मनापासून आनंद झाला. पुन्हा आपण सिनेमागृहात जायला काही हरकत नाही.... असे वाटायला लागले. चित्रपट पाहाण्याचा जोश शून्यावरून एकदम 'हाय' झालाय. चला, येताय का माझ्यासोबत?

२३ टिप्पण्या:

  1. अप्रतिम सर, चित्रपट पाहण्याचा आक्खा प्रवास उलगडून दाखवला.👍

    उत्तर द्याहटवा
  2. बालपण ते आजवर अनेक सिनेमे कसे पाहिले याचे सुंदर वर्णन आणि पहण्या पाठीमागे काय उद्देश तसेच काय शिकलो हे हि महत्वाचे आहे. सर तुमचे सर्व लेख अतिशय छान व तसेच काहीतरी शिकण्यासारखे असतात.मी ही माझ्या भूतकाळात गेलो लेख वाचताना. धन्यवाद राजेंद्र मोरे, मुंबई.

    उत्तर द्याहटवा
  3. प्रिय सर,
    आपल्या 'उरी' असे अनेक अनुभव, प्रसंग आहेत. ब्लॉगच्या माध्यमातून अशाच प्रकारे त्यांचा अनुभव पुन्हा पुन्हा आम्हाला घडो.

    उत्तर द्याहटवा
  4. Sir you have in detail talked about your educational journey and development of interest in movies. Great nostalgic experience. Though you are man of science but good writing skill. Heartily congratulation sir.

    उत्तर द्याहटवा
  5. मलाही इच्छा होते आहे , मीही 20 ते 21 वर्षे गेलोलो नाही

    उत्तर द्याहटवा
  6. Uri and Manikarmika has great inspiration to the present generation. Your blog reminds me and rewinds our past. Great Sir. I wish to bring few issues , where your brain and pen cordinates to the future of our children of our nation.

    उत्तर द्याहटवा
  7. सर,आपल्या 'जानी दुश्मन' पासून 'उरी' पर्यंतचा संपूर्ण चित्रपट डोळ्यांसमोर जसाच्या-तसा उभा राहिला..आम्ही पाहिलेले.. जगलेले चित्रपट नव्याने जिवंत झाले..लेख खूपच आवडला..'भयानक'लेखन..

    उत्तर द्याहटवा
  8. चित्रपट प्रवासातील सुवर्ण जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद सर

    उत्तर द्याहटवा