बुधवार, १६ मे, २०१८

सांगड श्रम अन् ज्ञानार्जनाची, अभिनव योजना शिवाजी विद्यापीठाची!



(शेती प्रगती अंकाचा जूनमध्ये शिक्षण विशेषांक प्रसिद्ध झाला. गरीबी ही शिक्षणातील आणि प्रगतीतील अडसर बनत नाही. ती एक संधी बनते. या संधीचा लाभ घेणारे मन, मनगट आणि मेंदू बळकट बनवत आयुष्याची परीक्षा उत्तीर्ण होतात. अशा मनाने, मनगटाने आणि मेंदूने बळकट झालेल्या अनेकांचा काही काळाचा आसरा बनलेली ही अप्पसाहेब पवार विद्यार्थी भवनद्वारा सुरू असलेली 'कमवा आणि शिका योजना' योजना आजही गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यासाठी एक वरदान रूपात कार्यरत आहे. 'कमवा आणि शिका' योजनेवर प्रसिद्ध झालेला मूळ लेख येथे आपल्यासाठी प्रकाशीत करत आहे. धन्यवाद.....डॉ. व्ही.एन. शिंदे)
---------------------------------------------------------------------------------------------


विसाव्या शतकाच्या प्रारंभी शिक्षणाचा प्रसार वाढू लागला. मात्र शिक्षण देणारी केंद्रे मर्यादित होती. त्यासाठी गावात सोय उपलब्ध नव्हती. गाव सोडायचा तर पैसा पाहिजे. गरीबाकडे तो नव्हता. स्वाभाविकच गरीबानी शिकायचं का नाही? असा प्रश्न उभा राहीला होता. गरीबाना शिक्षण परवडत नव्हते.  त्या काळात संपर्कात येणाऱ्या हुशार आणि होतकरू विद्यार्थ्याना काही श्रीमंत मंडळी मदत करत असत. त्यांच्या शिक्षणाची सोय करत. मात्र अशा मदतकर्त्याच्या ओझ्याखाली हे विद्यार्थी आयुष्यभर राहत. स्वातंत्र्योत्तर काळातही अशीच परिस्थिती होती. अशा त्या कालखंडात कर्मवीर भाउराव पाटील यानी 'कमवा आणि शिका' ही योजना आणली. या योजनेत प्रवेश घेणारा विद्यार्थी हा स्वत: कमवत होता, खात होता आणि शिकत होता. येथे उपकार असतील तर ते संस्थेचे होते, त्या योजनेचे होते. कर्मवीरानी ही योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी शिकले, मोठे झाले, अगदी कुलगुरू पदापर्यंत पोहोचले. रयत शिक्षण संस्था ज्या सामाजिक वातावरणात कार्य करत होती, त्याचं वातावरणामध्ये शिवाजी विद्यापीठ १८ नोव्हेंबर १९६२ रोजी स्थापन झाले.
      ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी शिवाजी विद्यापीठ सुरूवातीपासून कार्यरत आहे. मुलींच्या शिक्षणासाठी तर विद्यापीठाने अनेक योजना राबवल्या आणि आजही राबवत आहे. गरीब आणि होतकरू मुलांसाठी अशीचं एक योजना १९६७मध्ये आकार धरू लागली. संलग्नीत कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि रत्नागीरी पाचही जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक विद्यापीठात झाली. परीक्षा संपल्यानंतर या महाविद्यालयातील विद्यार्थी श्रमदानासाठी विद्यापीठात पाठवावेत असे ठरले. मेघनाथ नागेशकर यांनी विद्यार्थ्यानी श्रमदानातून आपल्यासाठी वास्तू उभी करण्याची संकल्पना मांडली. पुढे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांच्या सहाय्याने शहा सरानी आराखडा तयार करून घेतला. विद्यार्थ्याना पाठवण्याचा आणि परत नेण्याचा खर्च महाविद्यालयानी करायचा तर विद्यापीठातील रहाण्याची आणि भोजनाची सोय विद्यापीठाने करायची. अशा पद्धतीने विद्यार्थी आले आणि ८ एप्रिल ते १२ जून १९६८ या कालखंडात अवघ्या दोन महिने चार दिवसाच्या कालावधीत १८ खोल्यासाठी पिलर्स उभे करून निम्मा स्लॅब टाकण्याचे काम या श्रमदानातून झाले. उर्वरीत स्लॅब १५० विद्यार्थ्यांच्या तुकडीने ४ ऑगष्ट १९६८ रोजी एका दिवसात पुर्ण केला. २९ सप्टेंबरला स्वंयपाक घराचा स्लॅब पुर्ण झाला. केवळ विद्यार्थ्यांच्या श्रामदानातून उभा राहिलेली ही वास्तू अपूर्व अशी आहे. विद्यार्थ्यांच्या घामाचा वास आजही तिथे दरवळतो आहे. हे नवनिर्माण सहज घडत नसते. त्यासाठी तशीचं थोर प्रेरणा देणारे नेतृत्त्व हवे असते आणि ते नेतृत्त्व होते प्रथम कुलगुरू अप्पासाहेब पवार यांचे. ही प्रेरणा देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचे महत्त्व जाणणाऱ्या प्रथम कुलगुरू अप्पासाहेब पवार यांचेच नाव पुढे या वास्तुला देण्यात आले.
      या वास्तुच्या निर्मितीसाठी श्रमदान करायला आलेल्या विद्यार्थ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये
'कमवा आणि शिका' योजनेत शिक्षण घेणारे विद्यार्थीही होते. त्यातील काही विद्यार्थ्यानी अप्पासाहेब पवार यांची भेट घेऊन साताऱ्याप्रमाणे येथेही शिकता येईल का? याची विचारणा केली आणि विद्यापीठात कमवा आणि शिका योजनेची मुहुर्तमेढ रोवली गेली. या योजनेमध्ये पहिल्या वर्षी बावीस विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. अगदी सुरूवातीला विद्यार्थ्याना शेतीमध्ये काम द्यावयाचे निश्चित झाले. त्यासाठी आताच्या प्रेसभोवतीची आणि पतसंस्थेसमारील पंधरा एकर जागा देण्यात आली. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानी या जमिनीत पहिले पावसाळी भुईमुगाचे पिक घेतले. 'ही शिकणारी पोर काय शेती करणार?' म्हणून अनेकजण या प्रयोगाला नावे ठेवत. मात्र पिक जोमाने वाढू लागले आणि नाके मुरडणारांची बोटे तोंडात गेली.
      पुढच्या वर्षी आणखी पंचेवीस विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात आला आणि आणखी शेतीची गरज निर्माण झाली. सुतार विहीर परिसरातील आणखी सव्वाशे एकर क्षेत्र शेतीसाठी विकसीत करण्यात आले. मुले उन, पाऊस, चिखल कशाचीही पर्वा न करता काम करत होती आणि सोने पिकवत होती. शंभर सव्वाशे पोती भुईमूग या मुलानी पिकवला. ऊस लावला. भाताची शेती केली. या सर्व प्रयोगात माती-जमीन अन्नधान्य देत होती. या काळात मुले सकाळी सहा ते दहा या चार तासात काम करत होती. त्या बदल्यात ज्या मुलाला रेल्वे फाटकापासून विद्यापीठात येण्यासाठी पंचेवीस पैसे उपलब्ध नव्हते त्याला कोणताही खर्च न करता ज्ञानसमृद्ध होता येत होते. ही मुले अशा परिस्थितीतून आलेली असायची की त्याना शहरात पाणी नळाने येते, हे ही माहित नसायचे. फोन कानाला कसा धरतात याची माहिती नसायची. अशा या मुलांच्या सहाय्याने कमीत कमी बाहेरील मजूर वापरून ही कामे पार पाडली जात होती. त्या मुलाना श्रमाची सवय होती आणि त्यांचा मेंदू तल्लख होता. मुलांचे हात राकट होते. दणकट होते. मनगटात ताकत होती आणि ही मुलामधील ताकत नवनिर्माणासाठी खऱ्या अर्थाने वापरली जात होती. बाबा आमटे म्हणाले होते की 'हात उगारण्यासाठी नाही, तर उभारण्यासाठी असतात'. विद्यापीठाने नेमके या योजनेतून विद्यार्थ्यांचे हात त्यांच्याचं उभारणीसाठी वापरायला शिकवले आणि यातून अनेक प्राध्यापक घडले, शिक्षक घडले, प्रशासकीय अधिकारी घडले. यातूनंच चंद्रकांत कुंभार हे पोलीस अधिकारी आणि एस्. एन्. पठाण, एस.एच. पवार यांच्यासारखी  गरीबीची पार्श्वभूमी असणारी मुले कुलगुरूपदाला गवसणी घालू शकली. या योजनेची दखल विद्यापीठ अनुदान आयोग, नॅक या संस्थानी वेळोवेळी घेतली आहे.
      सुरूवातीला शेतीचा प्रयोग सुरू झाला. त्यानंतर जसजसे विद्यार्थी वाढू लागले तसतसे कामाची गरज वाढू लागली. विद्यापीठाचा प्रारंभीचा काळ होता. बांधकामे जोरात सुरू होती. त्यासाठी विटांची गरज मोठी होती. या विटा विद्यापीठात तयार करण्यासाठी विटभट्टी उभारण्यात आली. त्यानंतर आजच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कार्यालयाच्या जागेत हायवे कँटीन सुरू करण्यात आले. या हायवे कँटीनमधील पदार्थांची चव आजही ज्येष्ठ मंडळीना आठवते. विशेषत: मिसळ. अगदी हायवेवरून जाणारे प्रवासीही खास गाडी थांबवून या पदार्थांचा आस्वाद घ्यावयाचे. त्यानंतर पिठाची गिरणी सुरू करण्यात आली. ग्रंथालय पुरेसा वेळ चालू ठेवताना आवश्यक मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी ग्रंथालयातील वाचन कक्ष चालवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. यातील काळाच्या ओघात कामे बदलत गेली आणि नंतर टेलीफोन बुथ, फोटोकॉपी मशीन चालवणे, विद्यापीठ उद्यानात काम करणे, कार्यालयात आणि अधिविभागात प्रशासनास सहाय्यकारी कार्य करणे अशी कामे देण्यात येऊ लागली. विशेषत: जागतिकीकरणानंतर मुलांच्या कामाच्या स्वरूपाबाबत प्रदिर्घ काळ विचारमंथन होऊन शेती हळूहळू बंद झाली. त्यानंतर हायवे कँटीन बंद झाले. पुढे २००५-०६ नंतर पिठाची गिरणीही बंद झाली. मात्र आजही ही योजना नव्या कामासह आपले महत्त्वाचे उद्दिष्ट साध्य करत आहे. आजही या योजनेत दरवर्षी ५० विद्यार्थ्याना आणि २५ विद्यार्थीनीना प्रवेश दिला जातो.
      या योजनेअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळणे आणि त्याने विद्यापीठातील कोणत्या ना कोणत्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे आवश्यक आहे. त्याने गावचे सरपंच किंवा अन्य दोन व्यक्तीचे वर्तनासाठीचे दाखले आणि उत्पन्न अडीच लाख रूपये प्रतीवर्ष यापेक्षा कमी असल्याचा दाखला सादर करावा लागतो. त्यानंतर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन प्रवेश निश्चित केले जातात. प्रवेश घेतलेल्या मुलावर तो अभ्यासक्रम उत्तमरितीने पुर्ण करण्याचे बंधन राहते. विद्यार्थ्याला शैक्षणिक शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, ग्रंथालय शुल्क, परीक्षा फी किंवा अन्य कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. विद्यापीठ या खर्चाची प्रतीपुर्ती करते. विद्यार्थ्यांच्या भोजनाची आणि राहण्याची सोय मोफत होते. याबदल्यात विद्यार्थ्याला दररोज नेमून दिलेल्या ठिकाणी प्रती दिन तीन तास श्रमदान करावे लागते. परीक्षेच्या कालावधीत यामध्ये सूट असते मात्र ही सुट उन्हाळी आणि दिवाळी सुट्टीत तेवढे दिवस काम करून भरून काढणे आवश्यक असते. दिपावली आणि उन्हाळी सुट्टी त्यासाठी मर्यादित केली जाते. विद्यार्थी कोणत्याही कारणाने पुर्वपरवानगीने गैरहजर राहणार असेल तर तेवढे तास त्याला भरून काढणे आवश्यक असते.
      या योजनेचा लाभ घेत शिक्षण पुर्ण करणारी आणि आयुष्यात यशस्वी होणारी अनेक व्यक्तीमत्त्वे आज आपणास भेटतात. त्यांच्या बोलण्यातून एकंच सूर निघतो 'आज मी जो आहे तो या अप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनमुळे'. त्यातील अनेकजण या वास्तूला आवर्जून भेट देतात. काहीजण वर्षातून एकदा भेट देतात आणि सध्याच्या विद्यार्थ्यासोबत कांही क्षण घालवतात. जुन्या आठवणीत रमतात. आजही लोकाकडे पैसा येत असला तरी विद्यार्थी भवनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही. मुलांच्या निवासस्थानावर तिसरा मजला बांधण्यात आला आहे. कालानुरूप मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण जसे वाढू लागले तसतशी या योजनेत येणाऱ्या मुलींची संख्याही वाढू लागली. विद्यापीठाने यासाठी 'कमवा आणि शिका' योजनेत काम करणाऱ्या मुलीसाठी स्वतंत्र वसतीगृहाची इमारत बांधली आहे. गरीबी ही शिक्षणातील आणि प्रगतीतील अडसर बनत नाही. ती एक संधी बनते. या संधीचा लाभ घेणारे मन, मनगट आणि मेंदू बळकट बनवत आयुष्याची परीक्षा उत्तीर्ण होतात. अशा मनाने, मनगटाने आणि मेंदूने बळकट झालेल्या अनेकांचा काही काळाचा आसरा बनलेली ही अप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनद्वारा सुरू असलेली 'कमवा आणि शिका' योजना आजही गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यासाठी एक वरदान रूपात कार्यरत आहे. नव्या विद्यार्थ्याना घडवत आहे.

५ टिप्पण्या: