दरवर्षी पावसाळा संपला की टँकरने पाणीपुरवठा सुरू व्हायचा. मागील तीन वर्षापासून जलयुक्त शिवार योजना आणि अन्य स्वयंसेवी संस्था या प्रश्नाला भिडल्या आणि त्यातून पाणी प्रश्न सोडवण्यासाठी एक लोक चळवळ सुरू झाली. तरीही आज महाराष्ट्राच्या उपराजधानीत टँकरच्या दररोज २४०० फेऱ्या होत आहेत. सातारा जिल्ह्यात २९ गावाना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. कोल्हापूरच्या कांही भागातही पाणी टंचाई जाणवू लागली आहे. कोल्हापूरला
२०१५-१६ या वर्षात दुष्काळाने मोठा फटका दिला. प्रथमच एक दिवसाआड पाणी घ्यावे
लागले. कोल्हापूर हा उसाचा जिल्हा. राजर्षि शाहू महाराजांच्या कृपेने पाण्याबाबत
संपन्न झालेला. मात्र या जिल्ह्यातही निसर्ग काय करतो हे आपण अनुभवले. ग्रामीण
भागात बोअरवेलचे पीक वाढत आहे. त्याला आळा नाही घातला तर कोल्हापूरलाही
मराठवाड्याच्या वेदना भोगाव्या लागतील. दैनिक पुण्यनगरीने २०१६च्या पाणी या
विषयावर प्रसिद्ध केलेला लेख त्यांच्या सौजन्याने आपल्यासाठी येथे प्रकाशीत करत
आहे. धन्यवाद ..... व्ही. एन. शिंदे
------------------------------------------------------------------------------------------------
File Photo showing drought situation in Marathwada |
मागील काही वर्षांपासून पावसाळा संपतो न संपतो, तोच ‘मराठवाडा दुष्काळाच्या वाटेवर’अशा आशयाच्या बातम्या यायला सुरुवात होते. प्रत्यक्षात पावसाळा सुरु असतानाही मराठवाडयातील कांही गावात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. या वर्षी तर मराठवाडा भागात ऑक्टोबरमध्येच 27 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे. मागील काही वर्षांतील दरवर्षी दिसणारे संकट दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनू लागले आहे. वारंवार परिस्थिती उद्भवत असतानाही वरवरची मलमपट्टी होते. त्यामुळे मूळ दुखणे न जाता अधिक गंभीरपणे समोर येते.
मराठवाडा हा भाग गोदावरीच्या खो-याचा भाग आहे. तो सुपीक प्रदेश म्हणून ओळखला जावयाचा. पण त्या भागातही आता पाण्याचा प्रश्न दरवर्षी गंभीर होत गेला आणि गोदावरीच्या सुरुवातीस बांधलेल्या पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्हयांतील धरणातून पाणी सोडावे यासाठी आंदोलने होऊ लागली. आंदोलने तीव्र झाल्यावर पाणी सोडलेही जाते. अनेकदा प्रश्न न्यायप्रविष्ट होतात. या वर्षी पडलेल्या पावसाने
कोल्हापूरला प्रथमच तलावातून पिण्याचे पाणी वगळता अन्य कारणांसाठी उपसाबंदी करावी
लागली आणि कोल्हापूरला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. राजर्षी शाहू
महाराजांच्या कर्तृत्वातून उभारलेले राधानगरी धरण नसते, तर कोल्हापूरच्या अनेक
भागांत टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली असती. राधानगरी धरण नसते तर...? कल्पना करा, काय झाले असते!
वारंवार दुष्काळी परिस्थिती उद्भवण्यामागे पारंपरिक कारण वृक्षांची बेसुमार वृक्षतोड हे तर आहेच. मात्र आजच्या पिढीला हे कदाचित न पटेल असे कारण आहे. वृक्षतोडीने कळस गाठला तो ३०-३५ वर्षांपूर्वीच! त्यामुळे कदाचित ही पिढी वृक्ष कुठे कमी झालेत असाही प्रश्न विचारु शकते! मात्र, त्यापेक्षा मोठे कारण जंगलांंची व वृक्षांची संख्या कमी होण्यापाठीमागे आहे, ते म्हणजे जमिनीतील पाण्याचा बेसुमार वापर!आणि त्यामुळे भूस्तरात येणारी शुष्कता!
झाडांच्या पानातून बाष्प बाहेर पडत असते. बाहेर पडणाऱ्या बाष्पाइतके पाणी मुळांद्वारे झाडांमध्ये येणे आवश्यक असते. मात्र या भागात जमिनीतून पाणी उपसा करण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की अनेक ठिकाणी झाडांना पुरेसे पाणी मिळत नाही आणि पर्यायाने झाडे आपोआप वाळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक भागांत पाचशे ते सहाशे फूट खोल बोअरवेल काढण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. मुळात इतक्या खोल पाणी जाण्यासाठी कित्येक वर्षे लागतात. पर्जन्यमान खूप असावे लागते. या भागात अपुरा पाऊस आणि मोठ्या प्रमाणात पाणी उपसा असे व्यस्त गणित असल्याने जमिनीची ओल नष्ट होत आहे आणि पर्यायाने या भागातील हिरवे आच्छादन आणखी विरळ होत आहे.
पाणी उपसा करण्यामागे ऊस आणि फळबागांची मोठया प्रमाणात झालेली वाढ हे महत्वाचे कारण आहे. उसाच्या पिकासाठी २००० मिलीमिटर पाण्याची गरज भासते. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच पिकाला पाणी पुरवल्यास अन्य कारणांसाठी उपलब्ध व्हावयाचे पाणी कमी होते. आपोआपच कमी पर्जन्यमान झाल्यास
जमिनीतील पाण्याचा साठा उपसला जातो; मात्र तो पुन्हा भरण्याची कोणतीही तरतूद अथवा
विचार न करता! दुर्दैवाने कोल्हापूर भागातही अशा घटना घडू लागल्या आहेत.
आजमितीला जलसंपत्तीबाबत असणाऱ्या नैसर्गिक मर्यादा ओळखून कृषी आणि उद्योगधंद्याचा विचार होणे आवश्यक आहे. शेती आणि मानवी वापरासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या साठ्यात घट
होत असताना गरज मात्र वाढत आहे. पाण्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योगांमुळे आणि
त्यापासून होणाऱ्या प्रदुषणामुळे पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. त्यातही या
भागातील अनेक टेकड्यांची खोदाई करून मुरुम, दगड अन्यत्र वापरण्यात येत आहेत.
हिरव्या टेकड्या ओसाड बनत आहेत. पर्यायाने जमिनीतील पाण्याची पातळी घटत आहे. या
वर्षी ती २५ ते ३० इंच खाली गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी हा फार मोठ्या
धोक्याचा इशारा आहे.
या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करुन उपाय योजना करणे गरजेचे आहे. पूर्वीच्या काळी शेतामध्ये मोठे मोठे बांध असायचे. मोठा पाऊस झाला तर शेती क्षेत्रातील पाच/दहा टक्के शेती क्षेत्रात पावसाळी पीक यावयाचे नाही कारण या बांधामुळे शेतात पाणी असायचे आणि ते पाणी शेतात मुरायचे. मोठे बांध असल्याने त्यावर कडूनिंब, चिंच, आंबा, जांभूळ अशी मोठी झाडे वृक्षरुपात असायची आणि त्यामुळे खोलवर पाणी जिरावयास मदत व्हावयाची. जास्तीत जास्त क्षेत्रात उत्पादन घ्यावयाच्या नादामध्ये बांधही गेले, झाडेही नष्ट झाली आणि क्षेत्रात जिरणारे पाणीही वाहून चालले. हे सर्व पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. या क्षेत्रात अनेक मान्यवर कार्यरत आहेत; परंतु अनेक स्तरावरुन यामध्ये प्रयत्नांची भर पडणे आवश्यक आहे.
यासाठी महाविद्यालयीन स्तरावर राबविल्या जाणा-या राष्ट्रीय सेवा योजनेचा उपयोग चांगला होऊ शकतो, हे आटपाडी भागातील प्रयत्नातून दिसून आले आहे. युवकांना जलसाक्षरता अभियानात सहभागी करुन घेतल्यास आणखी चांगले परिणाम दिसून येतील. यासाठी प्रत्येक जिल्हयातील महाविद्यालयांनी एक गाव निवडून त्या गावाला पाण्याबाबत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी तज्ज्ञांसोबत काम करायला हवे. वृक्षलागवड वृक्षसंवर्धन आणि जलसंधारणाची छोटी कामे करुन जमिनीतील पाण्याचा साठा कायम ठेवण्यासाठी सर्व
घटकांनी एकत्रित काम करायला हवे.
त्याचप्रमाणे गावोगावी जलयुक्त शिवार अभियान केवळ
शासकीय पातळीवर न ठेवता गावकऱ्यांचा त्यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग असणे आवश्यक
आहे. सर्वपक्षीय भेद बाजूला ठेवून या योजनेच्या यशस्वितेसाठी सर्वांनी प्रयत्न
करायला हवेत. शासकीय इच्छाशक्तीच्या बरोबरीनेच समाजमनाची तयारी जास्त हवी. जलसंधारणाची साधने व पायाभूत सुविधा असूनही त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होत नाही.
१९७२ च्या दुष्काळामध्ये मराठवाडयातील बहुतांश जिल्हयांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला होता. आता सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असतानाही पाणी टंचाई भीषण होते. आता तर पाऊस कितीही झाला तरी अनेक भागांत दुष्काळ हटण्याचे नाव घेईनासा झाला आहे. पडणारा पाऊस, जिरणारे पाणी आणि लागणारे पाणी, पाण्याचा उपसा हे व्यस्त प्रमाणात आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस कोल्हापूर भागाला आधिकाधिक शुष्क बनवत आहे. वेळीच सावध होऊन सर्वांगांनी प्रयत्न केले गेले नाहीत, तर कोल्हापूरची वाटचाल मराठवाड्याच्या दिशेने सुरु राहील.
बोअरवेल खोदाईवर निर्बंध, वाळू उपसा थांबवणे, ट्रेंच पद्धतीने जिथले पाणी तिथेच जिरवणे, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, अती पाण्याची पिके घेणे थांबवणे, ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर, पाण्याचा अती वापर असणारे उद्योग न वाढवणे, जनजागृती आणि प्रत्यक्ष जनतेचा या कार्यात सहभाग हे सर्व जुळून न आल्यास भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हे थांबवण्यासाठी आताच सावध होऊन प्रत्येकाने आपला वाटा आजच उचलणे आवश्यक आहे.
"कोल्हापुर मराठवाड्याच्या दिशेने " हा आपला लेख वाचल्या नंतर सन १९७१-७२ च्या मी अनुभवलेल्या कोल्हापुरातील भीषण दुष्काळाच्या आठवणी टी व्ही वरील दृश्ये पहावित त्याप्रमाणे दॄष्टिसमोर आल्या। एक घागर पाण्यासाठी आयुष्यभराचे सोबती शेजारी एकमेकांच्या जिवावर उठले होते. तत्कालीन परिस्थितीत शासनव्यवस्था टँकरने पाणी पुरवठा करत नव्हती। पाण्यासाठी दहाही दिष्या अपुऱ्या पडु लागल्या । त्याकाळी कोल्हापुरात जुन्या वाड्यांची संख्या मोट्या प्रमाणत होती आजही त्यापैकी काही वाडे अस्तित्वात आहेत आणि प्रत्येक वाड्यात आड़ असायचाच। असेच आड़ कोल्हापूरच्या बिनखांबी गणपती मंदिर जवळ आहेत मानुसकीच्या भावनेतून तेथील आडावर चाव्या बसवून पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.आज पाणी फॉउण्डेशन, नाम फॉउंडेशन मराठवाड्यात कार्य करते।अभिनेते सयाजी शिंदे माण तालुक्यात कार्य करतात याचा बोध घेवून भविष्यात कोल्हापुरकरानी योग्य पावले उचलली नाहीत तर आपल्या लेखात दिलेल्या इशाऱ्या प्रमाणे कोल्हापुरचा सुद्धा भौगोलिक मराठवाड़ा होण्यास वेळ लागणार नाही।
उत्तर द्याहटवाआपल्या लेखातुन कोल्हापुरकरांना वेळीच सावध करण्याच्या केलेल्या प्रयत्नाबद्दल एक पारंपरिक कोल्हापुरकर म्हणून मनस्वी आभार। पुढील लेखासाठी शुभेछ्या
अनिल नलवडे ,
उपकुलसचिव ,
शिवाजी विद्यापीठ,कोल्हापुर
डोळ्यात अंजन घालणारा लेख, वाचून तो पुढे किमान 10 लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे
उत्तर द्याहटवाResp. Sir
उत्तर द्याहटवाThank you so much for creating an awareness among youths. Really very important and informative article.