शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

या... हो... दूधकट्ट्याची साद

         
 (कोल्हापूर एक वेगळेचं गाव आहे. कोल्हापूरच्या प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा आहे. हा वेगळेपणा खाण्यापिण्यातही आहे. झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, मिसळ, बटाटेवडा, भेळ प्रसिद्ध आहेतच, पण त्यापेक्षाही वेगळी गोष्ट आहे, ती म्हणजे दुधाची, म्हणजे दुधकट्ट्यांची. येथे घुमणारी 'है या...' ही साद कोल्हापूरकराना साद घालत आहे. कोल्हापूर पुण्यनगरीच्या वर्धापन  दिन पुरवणीमध्ये दि. १९ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला दूध कट्टा या विषयावरील लेख आपल्यासाठी येथे प्रकाशीत करत आहे. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)
-------------------------------------------------------------------------------------
पिण्यासाठी दूध विकणारे ठेले किंवा दुकाने अनेक शहरात आहेत. सोलापूरला नवी पेठमध्ये रस्त्यावर दूध उकळत बसलेले दुकानदार, गरमागरम दूध विकतात. थोडीशी साखर आणि बदाम-पिस्त्याचे तुकडे घातलेले दूध, थंडीच्या दिवसात पिताना एक वेगळाच आनंद मिळतो. पुण्यात कोजागिरीचे दूध असते तसे आटवलेले मसाला दूध मिळते. मुंबईत एकाच ठिकाणी मसाला दूध, ड्रायफ्रुटचे तुकडे घातलेले दूध आणि फक्त साखर घातलेले दूध ग्राहकांच्या इच्छेनुसार प्यायला मिळते. नागपूरलाही दुधाची विक्री करणारी मंडळी रस्त्यावर दूध तापवत बसलेली असतात.
मात्र, रस्त‌्याकडेला प्रत्यक्ष्‍ा म्हैस बांधून, तुमच्यासमोर काढलेले दूध ग्लासमध्ये भरून, प्यायला देणारे फक्त कोल्हापूरातच भेटतात. कोल्हापूरात धारोष्ण दूध प्यायला मिळते. अशा पद्धतीने फक्त कोल्हापूरातच दूध पिता येते आणि अशा या ठिकाणांना "दूधकट्टा" म्हणतात. कोल्हापूरात असे एकूण सहा दूधकट्टे आहेत. कोल्हापूरचे पैलवान पूर्वी प्रसिद्ध होते. मल्लविद्या शिकण्यासाठी अन्य राज्यांतून पैलवान येत असत. या मल्लांच्या आहारातील महत्वाचा घटक म्हणजे दूध. या भागाला निसर्गाची साथ असल्याने पशुपालन आणि दुग्ध व्यवसायासाठी अनुकूल परिस्थिती. त्यात मल्लविद्येमुळे ग्राहकही चांगला. या मल्लांना सहज, चांगले दूध उपलब्ध व्हावे, यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी दगडी बांधकाम करून दूध कट्ट्यांची निर्मिती केली.
गंगावेस, मिरजकर तिकटी, महानगरपालिकेजवळ, शिवाजी पुतळा, पापाची तिकटी, शिवाजी पेठेमध्ये बलभीम बँकेजवळ आणि बीटी कॉलेजजवळ हे दूधकट्टे आहेत. या सर्व कट्ट्यांचे बांधकाम दगडांच्या सहाय्याने करण्यात आले आहे. या ठिकाणी गवळी किंवा म्हशीचे मालक आपली दुभती जनावरे घेऊन येतात. त्यांना त्या ठिकाणी चारा दिला जातो.
जनावरांचे दूध काढणे हे मोठ्या कौशल्याचे काम आहे. उघड्या जागेत दूध काढण्यासाठी त्या जनावरांचा विश्वास संपादन करावा लागतो. या सहा कट्ट्यांवर दररोज तीनशे ते साडेतीनशे म्हशी आणल्या जातात. पूर्वी हा आकडा हजारात होता. पापाची तिकटी वगळता इतर कट्ट्यांवर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस हा व्यवसाय चालतो. म्हशी आणणे, त्यांना चारा घालणे, त्यांचे दूध काढणे, गिऱ्हाईकांना दूध देणे, त्यांचे पैसे घेणे, त्यांचे शेण वेळी काढून स्वच्छता करणे, हे सर्व करण्यासाठी किमान दोन माणसांची गरज असते. आज साठ ते सत्तर रूपये लिटर दराने या ठिकाणी दुधाची विक्री होते.
या दूधकट्ट्यामुळे पैलवानांना शुद्ध आणि ताजे दूध उपलब्ध होते. मल्लाप्रमाणे काही नागरिकही त्याठिकाणी शुद्ध‍ दुधाचा आस्वाद घेतात. काहीजण दररोज त्या ठिकाणी जाऊन घरगुती वापरासाठी दूध घेऊन येतात. आरोग्यासाठीची जागरूकता या ठिकाणी येणाऱ्या गिऱ्हाईकांमध्ये जाणवते. एका म्हशीचे दूध पिण्यासाठी दहा ते पंधराजणांना पुरते. या दुधाचे माप घालताना ते अंदाजे वीस टक्के कमी भरते, कारण या धारोष्ण दुधामध्येे फेस तयार झालेला असतो. ग्राहकालाही हे माहित असते. त्या फेसासह दुधाचा दर ठरलेला असतो आणि ग्राहक तो दर गुणवत्तेची हमी असल्याने आनंदाने द्यायला तयार असतो.
मात्र कोल्हापूरच्या दूध कट्ट‌यांची संस्कृती नष्ट होते की काय ? अशी भीती वाटते. या व्यवसायात पुढे उतरायला तरूण पिढी तयार नाही. शहरात म्हशीसारखे प्राणी पाळणे आणि त्यांचे उत्तम संगोपन करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येने आणखी समस्या निर्माण होत आहेत. दुधाचा हा व्यवसाय प्रतिष्ठेचा मानायला तरूण पिढीतील अनेकजण तयार नाहीत. ग्राहक मात्र या व्यवसायाबद्दल आणि त्याठिकाणी मिळणाऱ्या दुधाच्या दर्जाबाबत पूर्ण समाधानी दिसतात. पूर्वी हा व्यवसाय सकाळी सहा-सात तास चालत असे. आता तो वेळही कमी होत चालला आहे. ग्राहकांच्या आणि दूध विक्रेत्यांच्या वेळा ठरलेल्या असतात. दूधवाला, म्हशी आणि ग्राहकांत एक नाते निर्माण झालेले असते. कांही म्हशी तर सवयीचे गिऱ्हाइक दिसताचं पान्हा सोडतात.  या व्यवसायात सुट्टी नाही, रजा नाही, आदर नाही, प्रतिष्ठा नाही, म्हणावा तसा पैसा नाही, मात्र अतूट प्रेमाचे नाते जुळले गेले आहे आणि हे नातेच या व्यवसायाला टिकवून ठेवणारे मुख्य कारण आहे. या व्यवसायात त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. दुधाचा दर, कमी नफा आणि समाजात प्रतिष्ठा नाही, असा समज, यामुळे अनेक दूध विक्रेते काही दिवसांत हा व्यवसाय बंद करण्याचा विचार बोलून दाखवतात.
म्हशींची किंमत, तिला द्यावा लागणारा चारा, खुराक, निगा राखण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ या सर्वांचा विचार करता दूध विक्रीतून मिळणारे पैसे हे तोंडमिळवणी करणारे ठरतात. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या दूध विक्रेत्यांचे म्हणणे पटते. डॉ..एम. गुरव या शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य विभागातील प्राध्यापक महोदयानी दूधकट्टा या विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी प्रत्यक्ष दूध विक्रत्यांशी ग्राहकांशी २०१२ मध्ये संवाद साधून आपले निष्कर्ष काढले आणि या व्यवसायात व्यावसायिक दृष्टीने नफा मिळत नसल्याचे सिद्ध केले आहे.

तरीही दूधकट्टा संस्कृती कोल्हापूरने टिकवून ठेवली आहे. परवाच या लेखाच्या निमित्ताने मी प्रत्यक्ष दूधकट्ट्याला भेट दिली. आजही रू.६०/- प्रति लिटर दराने दूधाची विक्री होत आहे. हा व्यवसाय कोल्हापूरची पाऊलखूण म्हणून टिकून राहणे गरजेचे आहे. नियमित दूध कट्ट्याला भेट देणारे ५० टक्के ग्राहक आहेत. उर्वरित ५० टक्के ग्राहक नवे असतात. मात्र दूध कट्ट्याला भेट देऊन तेथील धारोष्ण, भेसळमुक्त फेसाळलेले दूध पिण्यात मिळणारा आनंद वेगळा आहे. तरूण पिढीने या दूधकट्टयाकडे पावले वळवायला हवीत. पिझ्झा, बर्गरसारखे पदार्थ खाल्ल्यावर, कोल्ड्रींकसारखे शरीराला हानी पोहोचवणारे पेय प्राशन करण्यापेक्षा दहा रूपयात शरीराला पोषणमूल्य देणारे दूध प्यायला सुरूवात केली, तर हा व्यवसाय निश्चितच ऊर्जितावस्थेत येईल आणि कोल्हापूरची ही वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जतन होईल, यात शंका नाही.

१४ टिप्पण्या:

  1. सुंदर लेख. दूधकट्ट्याबद्दल थोडी माहिती होती. त्यात चांगली भर पडली.
    दूध कट्ट्यावरच्या व्यावसायिकांच्या समस्या सोडवल्या तर ही परंपरा कायम राहील. पण हे करणार कोण?
    कोल्हापूरच्या प्रत्येक वैशिष्ट्याचे योग्य प्रकारे व सातत्याने मार्केटिंग केले तर जगाच्या पर्यटन नकाशावर कोल्हापूरचे नाव ठळक होईल. पण त्याआधी पायाभूत सुविधा सुधारायला हव्यात आणि संबंधित व्यावसायिकांना विचारात घेऊन विकासाच्या योजना राबवल्या पाहिजेत. दुर्दैवाने ते घडताना दिसत नाही. असो.
    शिंदे सर सुंदर लेखाबद्दल पुन्हा अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  2. शिंदे सर मी कायम आपला ब्लाॅग पाहतो, आपली लेखणी खुपच मार्मिक व वास्तव्याला धरून असते त्यामुळे खुपच आवडते

    उत्तर द्याहटवा
  3. आम्ही लहानपणी शिवाजी पेठेजवळ रहायचो तेव्हा बऱ्याचदा वडिलांबरोबर असे धारोश्ण दुध प्यायला जायचोंत्यावेळी आठ आणे माप होते दुधती आठवण आली.
    लेख नेहमीप्रमाणेच सुंदर.

    उत्तर द्याहटवा
  4. Nice Article Sir.Very informative.Expecting Articles on more information on Kop Chappals,Kop Saj,Rankala and more.

    उत्तर द्याहटवा
  5. Sir khupch sunder. This is a real identity of Kolhapur very informative for young generation.

    उत्तर द्याहटवा
  6. आदरणीय शिंदे सर,
    माझ्यासारख्या मूळ कोल्हापूर निवासी व्यक्तीला हा लेख खूपच नावीन्यपूर्ण वाटला.
    पुढच्या कोल्हापूर भेटीत या कट्ट्यावर जाऊन आठवणीने धारोष्ण दूध पिणार.
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  7. दुधकट्टा ही कोल्हापूरची खासीयत आहेच . शिवाय कोल्हापूरचं व्यक्तिमत्त्व खुलविण्यात या कट्टयांचा वाटा मोठा आहे . तुम्ही नव्या पिढीला हे ज्ञात करून दिलात , हेही महत्वाचे आहे . अभिनंदन !

    उत्तर द्याहटवा
  8. भन्नाट..
    करवीर नगरीची श्रीमंती काही न्यारीच..

    दूधकट्टयासाठी खूप खूप धन्यवाद..

    उत्तर द्याहटवा