मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

ध्यास कृषी तंत्रज्ञानाचा - गिरीष बद्रागोंड

              दरवर्षी गणपती आले की चर्चा, वाद विवाद सुरू होतात. डॉल्बी हवा, डॉल्बी नको हा महत्त्वाचा आणि कळीचा मुद‌्दा बनतो. पोलीस प्रशासन हे न्यायालयाचा निकाल असल्याने डॉल्बी नको म्हणते. तर तरूणाईला डॉल्बी हवा असतो. यातून गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणात तणाव निर्माण होतो. डॉल्बीच्या प्रश्नावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्तर मिळाले, तर हा तणाव टाळता येवू शकेल. नेमके हेच ओळखून कोल्हापूरच्या पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी घोणा केली की, मोबाईल जामरप्रमाणे डॉल्बी जामर जर कोणी तयार केला तर त्याला रूपये दहा लाखाचे बक्षीस देण्यात येईल. ही घोणा वृत्तपत्रातून ठळकपणे प्रसिध्द झाली आणि ही बातमी वाचत असताना बेंगलोरचे युवा उद्योगपती गिरीश बद्रागोंड डोळयासमोर आले.
 
                भारत हा कृषीप्रधान देश असला तरी शेतीसमोरील समस्या अनेक आहेत. अनेक छोटया छोटया समस्यांचे समाधान मिळाले तर शेती उद्योगास मदत होवू शकते. यासाठी या प्रश्नाकडे क्षमता प्रधान युवकांनी लक्ष दयायला हवे. त्यासाठी कोणीतरी या प्रश्नाना सोडविण्यासाठी आवाहन करायला हवे. त्यातून युवक निश्चितच पुढे येतील. अन्यथा त्या परिस्थितीचे भयानक चटके सहन केलेल्‌या युवकांनी या प्रश्नावर चिंतन करून उत्तरे शोधायला हवीत. अशाच परिस्थितीचे चटके सहन केलेल्या एका युवकाने भारताला कृषी क्षेत्रात क्रमांक एकचा देश बनवायचे स्वप्न पहायला सुरूवात केली. त्यासाठी सर्व प्रतिकुल परिस्थितीवर मात करत शेतकऱ्याना त्यांचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करायला सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे तंत्रज्ञान शेतकऱ्याला परवडेल अशा माफक किंमतीत उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी स्थापन केली. शिक्षण माफक असूनही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या व अफाट कल्पनाशक्तीच्या जोरावर कृषी क्षेत्राच्या क्षितीजावर उगवलेला हा नवा तारा म्हणजे गिरी बद्रागाेंंड.
                कर्नाटकातील महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या विजापूर जिल्हयातील विजयपुरा गावात गिरी यांचा जन्म १९८४ मध्ये झाला. गावातील शाळेत शक्य होते तेवढे म्हणजे दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यांचे वडील कष्टाळू शेतकरी होते. शेतात वापरली जाणारी उपकरणे दुरूस्त करण्याचे कसब त्यांनी शिकून घेतले हाेते. त्या भागातील ते नामांकित मेकॅनिक होते. त्यांना एकूण पाच अपत्ये त्यातील गिरी सर्वात धाकटे. कुटुंबाकडे शेती असली तरी त्या भागात नेहमीच कमी पाऊस पडतो आणि त्याचा परिणाम नेहमी शेतीवर होतो. जोपर्यंत शक्य होते तेवढे मोठ्या मुलाना वडिलानी शिकवले होते. त्यामुळे मोठ‌्या भावांचे शिक्षण बऱ्यापैकी झालेले होते. त्यामुळे घरात आधुनिक उपकरणे असायची. थोरले शिकले शेतीकडे पहायला कोणीतरी असावे म्हणूनही गिरीष यांच्या शिक्षणाकडे कोणी जास्त लक्ष दिले नाही. मात्र जात्याच हुशार असणाऱ्या गिरी यांनी सर्व उपकरणे वापरण्याचे ज्ञान आत्मसात केले.
                गिरीष यांनी शिक्षण बंद झाल्यानंतर वडिलांबरोबर शेती करायला सुरूवात केली. त्याचंवेळी या युवकाने विविध उपकरणांचे निरीक्षण करत एकलव्याप्रमाणे ज्ञानसाधना सुरू ठेवली होती. ना कोणी गुरू होता ना कोणते ग्रंथालय. जे दिसते ते कसे घडते हे समजून घेत ज्ञान वाढवत होते. एक दिवस घरात असलेले भावाचे घडयाळ गिरीष यानी पूर्णपणे खोलले. घड्याळाचे सर्व भाग सुटे केले आणि ते पुन्हा आहे तसे जोडले. घडयाळ व्यवस्थित सुरू झाले, हे पाहून गिरीष यांचा आत्मविश्वास वाढला. आता त्यांनी गावातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना काही जीवनोपयोगी उपकरणे आणि प्रकल्प तयार करून विकायला सुरुवात केली. लहानपणापासून यंत्राशी खेळायचा त्यांना छंद होता. तो छंद पुढे लेक्ट्राॅॅनिक्स यंत्राकडे वळत गेला. गावात इनव्हर्टर, पाॅवर सप्लाय, स्टॅबिलायझर तयार करून ते विकत असत. त्यातून त्यांना कांही पैसे मिळत. असे प्रयोग सुरू असताना 'मीचं माझा गुरू' या उक्तीप्रमाणे त्यांची ज्ञान साधनाही सुरू होती.
                अशातचं एक दिवस त्यांच्या दोन मोठ्या भावाना सरकारी नोकरीसाठी अर्ज करायचा होता. नेहमी खेडयात असते तशीच परिस्थिती विजयपूरातही होती. गावात इंटरनेट सुविधा व्यवस्थित नव्हती. गिरी यांच्याकडे इंटरनेट सुविधेसह सोनी इरिक्सनचा मोबाईल होता. लॅपटाॅपही होता. मात्र करायचे काय? हा प्रश्न होता. गिरी यांनी सोनी मोबाईलचे ब्लूटूथ सुरू केले. तो वीस फुट उंचीच्या काठीच्या टोकाला बांधला. ती काठी घराच्या छतावर बांधली. लॅपटाॅपचे ब्लूटुथ सुरू करून त्यावर नलाईन अॅप्लीकेशन सुरू केले. अर्ध्या तासात दोन्ही भावांचे अर्ज भरून झाले. आज त्यांचे हे दोन्ही भाऊ सरकारी सेवेत आहेत. या घटनेने गिरी यांचा आत्मविश्वास वाढला.
                त्यानंतर गिरी यांनी कांही मित्रांच्या समवेत एक नवी कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी रस्त्यावर असणाऱ्या पदपथ दिव्यासाठी उर्जा बचत करणारे उपकरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांच्या मित्रांनी आर्थिक सहकार्य करण्याचे मान्य केले होते. प्रकल्प यशस्वीतेच्या जवळ पोहोचला. अशा परिस्थितीत मित्रानी आर्थिक सहकार्य नाकारले. गिरी यांना मोठा धक्का बसला. मित्रानी सहकार्य नाकारल्याची बातमी दुकानदारांना समजली. त्यांनी 'उधारीचे पैसे द्यावेत' असा तगादा लावला. दुकानदारांची कटकट वाढली. गिरीष यानी लॅपटाॅ, मोबाईल आणि राऊटर एवढे साहित्य सोडून सर्व साहित्य विकले. दुकानदारांची सर्व देणी भागवली. पहिल्याच प्रयत्नात ठेच लागली. मात्र हा अयशस्वी प्रयोगच त्यांना पुढे नेणारा ठरला.
                त्यांनी गाव सोडायचे ठरवले. जेथे पत राहीली नाही तेथे राहून उपयोग नाही असा त्यानी विचार केला.  त्यांनी २००६ मध्ये बेंगलोर गाठले. एक लॅपटाॅ, वायरलेस राऊटर आणि मोबाईल घेवून वयाच्या बाविसाव्या वर्षी ते बेंगलोरला आले. खिशात परत जाण्यासाठीही पैसे नव्हते. बेंगलोरमध्ये रहायला घर नाही, खिशात पैसे नाहीत. जगायचे कसे? हा प्रश्न पडला. त्यांनी हाॅटेलमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांच्या दृष्टीने कोणतेही काम हलके नव्हते. मात्र जगण्यासाठी हाॅटेलमध्ये काम करणे ही काळाची गरज होती. त्याकाळातही त्यांचे लक्ष तंत्रज्ञान निर्मितीवर होते. त्यांना मुळात शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान निर्माण करावयाचे होते. त्यासाठी स्वतःचे भांडवल हवे होते. थोडे पैसे जमा होताच त्यांनी डीटीएच सेवा पुरवायला सुरूवात केली. दहा किलोमीटर क्षेत्राती चॅनेलसेवा पुरवत असत. काही दिवस ते पॅरासाइट बनून मित्राबरेाबर राहात. लवकरच त्यांनी भागीदारीत खोली भाडयाने घेतली. अवांतर खर्च टाळून पैसा जमा करायला सुरूवात केली. डीटीएच सेवा पुरविण्यासाठी त्यांनी जुना अॅंटेना खरेदी केला. त्याची दुरूस्ती स्वतःच केली. या धंद्यात चांगलाच जम बसला होता. पैसेही चांगले मिळत होते. मात्र त्याना शेती आणि शेतकऱ्यासाठी कार्य करायचे होते. त्यानी डीटीएच सेवेसाठी खरेदी केलेली सर्व उपकरणे आणि व्यवसाय विकला. त्यातून त्यांना थोडे फार पैसे मिळाले.
                अल्प वयातच त्यांना सर्व प्रकारचे अनुभव मिळाले होते. त्यांना पुरेसे तांत्रिक ज्ञान प्राप्त झाले होते. या ज्ञानाच्या जोरावर आपण नवे तंत्रज्ञान विकसित करू हा त्यांना आत्मविश्वास होता. असे तंत्रज्ञान निर्माण केल्यावर काय होवू शकते याचा त्यांना अंदाज होता. ज्या ज्या वेळी एखादा नवा शोध लागतो. नवे उपकरण शोधले जाते, तेंव्हा शोध लावणाऱ्या संशोधकाला थोडी फार रक्कम दिली जाते. त्याचे स्वामित्व हक्क खरेदी केले जातात. नंतर हक्क विकत घेणारे उद्योजक त्या उपकरणाचे उत्पादन करून भरमसाठ नफा कमावतात. ज्यांच्या गरजा भागवण्यासाठी, ज्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा शोध लावलेला असतो. त्यांच्याकडे या नव्या उपकरणासाठी भरमसाठ पैसे आकारले जातात. त्यामुळे हे तंत्रज्ञान खऱ्या गरजवंताची गरज पूर्ण करू शकत नाही आणि खरा संशोधकही धनवान होत नाही. लोणी मध्येच बोका खातो. हे लक्षात घेवून त्यांनी प्रथम उद्योगाची रचना समजून घ्यायचे ठरवले. त्यासाठी कोणत्याही बिझनेस स्कुलची वाट त्यांनी शोधली नाही. त्यांनी एका फर्ममध्ये टेक्निकल डायरेक्टर म्हणून नोकरी स्विकारली.
                नोकरी हे निमित्त होते.ऱ्या अर्थाने ते त्या कंपनीत विद्यार्थी म्हणून शिकत होते. उद्योगाची रचना कशी असते. तेथील उत्पादन खपविण्यासाठी कशा प्रकारचे व्यवस्थापन केले जाते. आर्थिक व्यवहार कसे सांभाळले जातात हे गिरीष शिकत होते. लोकांना सांभाळण्याचे, प्रोत्साहित करण्याचे कौशल्य शिकत होते. व्यवसायासाठी आवश्यक परवानग्या, त्यांचे नियम व अटींची माहिती करून घेत दोन वर्ष त्यांनी नोकरी केली. शेवटी त्यांनी नाबार्ड आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनकडे अर्थसहाय्य आणि मदतीची मागणी केली. त्यांच्या सहकार्याने संतिप सिस्टीम्स ही कंपनी काही निवडक मित्रांसमवेत स्थापन केली. या कंपनीचे मूळ ‍ उद्दिष्ट शेतीतील छोटया छोटया अडचणींवर उत्तर शोधणे हे होते.
                गिरी यांचा शेतीत सुधारणा करण्यासाठी काय करावे? यावर विचार सुरू होता. त्याकाळात शेतकरी पाण्यासाठी कुपनलिका खोदत त्यात किती पाणी आहे याची खातरजमा करण्यापूर्वीच विद्युत जोडणी घेत. पंप बसवत आणि थोड‌्याच दिवसात कुपननलिकेती पाणी संपायचे. खर्च वाया जायचा यासाठी नेमके कुपननलिकेत पाणी किती आहे? याची चाचणी करणारा पृथ्वी नावाचा बोअरवेल स्कॅनर तयार केला. या उपकरणात हाय डेफिनेशन रिझोल्‌युुशन म्हणजेच एचडीआर कॅमेरा वापरला. तो कॅमेरा १८० डिग्रीमध्ये फिरतो. त्याच्या मदतीने कुपननलिकेतील छायाचित्रे घेतली जातात. त्याआधारे कुपननलिकेत नेमके पाणी काेठूू येते? किती येते? याची चाचणी केली जाते. ही चाचणी खूपच विश्वासार्ह ठरली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा खर्च वाया जात नाही. त्याचप्रमाणे कोरड‌्या कुपनलिका शोधून त्या बुजवल्या जावू लागल्या. कुपनलीकामध्ये बालक पडल्याच्या अनेक घटना घडतात. अशा कुपनलीका बुजविल्यामुळे त्यामध्ये लहान मुले पडण्याचा धोका नष्ट होतो. या उपकरणाला जीपीएस यंत्रणा कार्यान्वित आहे. अत्याधुनिक तंत्र वापरलेले दिड किलो वजनाचे हे उपकरण ६०० फुटापर्यंतच्या पाण्याचा शोध घेते. या उपकरणाला आठवे नॅशनल ग्रासरूट इनोव्हेटर्स अॅवाॅर्ड देवून २०१५ मध्ये सन्मानित केले आहे. तसेच २०१७ च्या चवथ्या इनोव्हेशन स्काॅलर्सच्या बॅचमध्ये राष्ट्रपती भवनात सहभागी होण्याची व राहण्याची संधी देण्यात आली.
                पाण्याची चाचणी करून पाणी उपलब्ध झाले तरी त्याचा वापर काटकसरीने व योग्य पध्दतीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी पुढचे उपकरण सुक्ष्म सिंचन पध्दती हे विकसित केले. ठिबक सिंचन प्रक्रियेतही पाणी वाया जाते. प्रत्यक्षात झाडाना पाणी आवश्यक असो किंवा नसो ठिबक सिंचन पंप जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत पाणी पडत जाते. यात पाणी वाया जाते. हे ओळखून गिरीष यानी सोलर सेंसर्स असलेले हे उपकरण बसवले. जमिन प्रमाणापेक्षा जास्त शुष्क होताच विद्युत पंप आपोआप सुरू होतो. आवश्यक ओलावा निर्माण झाला की विद्युत पंप आपोआप बंद होतो. या एका उपकरणासह सिंचन पध्दती बसवायला १० एकर क्षेत्राला दिडलाख रूपये खर्च येतो. तर बाकी यंत्रणा असल्यास साधे उपकरण बसवायला फक्त २५००० रूपये खर्च येतो.
      या प्रमाणेच घरात किंवा टेरेसवर तयार केलेल्या बागेची सिंचन पध्दती त्यांनी विकसित केली आहे. घराच्या बागेसाठीची ही यंत्रणा खुपच उपयुक्त ठरत आहे. दारात, परसात झाडे असावीत असे सर्वानाच वाटते. मात्र कुठे बाहेरगावी जायचे असेल तर त्या झाडांची काळजी लागून राहते. विशेषतः कुंडयातील झाडे असतील तर आणखी कठिण परिस्थिती असते. आठ-दहा दिवसच नाही तर अगदी चार पाच दिवस पाणी नाही मिळाले तर अनेक झाडे जळतात. मात्र गिरी यांनी प्रश्नावर उत्तर शोधले आहे. स्वयंचलित पध्दतीने हे उपकरण कार्यान्वित होते आणि झाडाना आवश्यक पाणी पुरवते. या उपकरणाचा खर्च केवळ ५००० रूपये इतका आहे. ज्या लाेकांना नेहमी बाहेरगावी जावे लागते त्या लोकांसाठी हे उपकरण वरदान ठरले आहे.
                गिरी यांना शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्यांची जाण आहे. त्यामुळे त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नेमके तंत्र ते शोधून काढतात. शेतात ज्वारी, बाजरी सारख्या पिकांच्या कणसात दाणे भरू लागले की पक्षी ते खायला येतात. या काळात एक मोठे काम लहान मुलांना लावले जाते. पिकातील दाणे खाण्यासाठी येणारे पक्षी हुसकावून लावण्याची जबाबदारी या मुलावर येते. लहानपणी गोफणीमध्ये दगड ठेवायचा आणि ती गोफण फिरवत पक्ष्यांच्या थव्याकडे भिरकावयाचे कसब आम्हीसुद्धा आत्मसात केले होते. मात्र त्यामध्ये अनेक लहान मुलांची शाळा बुडायची. यावरही गिरी यांनी उत्तर शोधले आहे. बर्ड रिपेलंट नावाचे उपकरण त्यानी बनवले आहे.
                आठ स्पिकर असणारे एक इलेक्ट्राॅनिक उपकरण पक्षाना त्रासदायक वाटणाऱ्या तरंग लांबीच्या ध्वनीलहरी प्रक्षेपित करतात. या लहरींचा मानवास कोणताही त्रास होत नाही. मात्र या ध्वनीलहरी जेथपर्यंत पोहोचतात तेवढया क्षेत्रात पक्षी येत नाहीत. या उपकरणाची बॅटरी एकदा चार्ज केली तर तीन दिवस चालते. तसेच हे उपकरण सकाळी आणि संध्याकाळी सुरू ठेवायचे आहे. त्यामुळे गावातून पक्ष्यांचे निर्मूलन होत नाही, मात्र पिकांचे रक्षण होते.
                असे वेगळी वाट चोखळत भारताला कृषी क्षेत्रात अग्रेसर बनवण्यासाठी गिरी त्यांच्या मित्रासह कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याचा फायदा देशभरातील शेतकरी घेत आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात यश प्राप्त होवो आणि भारताला कृषी क्षेत्रात अग्रेसर बनवण्याचे त्यांचे स्वप्न लवकरात लवकर साकार होवो हीच शुभेच्छा.


               (पूर्वप्रसिद्‌धी - बदलते जग, दिवाळी अंक २०१७)

९ टिप्पण्या:

  1. Life is full of surprises and challenges too. The innovator has identified the key challenges and managed to solve the problems by finding the perfect answers. Good article. Thanks for inspiring the innovative minds.

    उत्तर द्याहटवा
  2. Sir it's really a very motivational article. This article will definitely inspire the creative minds of the youths

    उत्तर द्याहटवा
  3. Sir its really a very motivational article. This article will definitely inspire the creative mind of the rural youths.

    उत्तर द्याहटवा
  4. Inspiring! Great work done by him, and hats off your work too as you are introducing such people to us. Thank you very much sir.

    उत्तर द्याहटवा