मी त्यावेळी सोलापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या
उपकेंद्रात पदार्थविज्ञानशास्त्राचा
सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत होतो.
उन्हाळयाचे दिवस होते. शैक्षणिक सत्र संपल्याने सुट्टया सुरू होत्या. शेतात
आंबे उतरण्याचे काम सुरू होते. शेताच्या वाटण्या झाल्या असल्या तरी आंब्याची झाडे
सामाईक ठेवली होती. ही कल्पना वडिलांचीच होती. आंब्याची फळे सर्व भावांच्या
मुलांना मिळावीत हा हेतू. आम्ही सर्व सख्खी-चुलत भावंड त्यामुळे त्या दिवशी शेतात होतो. झाडं भलं मोठ. तिघांनी हात जोडून
साखळी केली तरी बुंधा हातात मावत नसे. झाडाला फळे भरपूर यायची. चांगला पाड लागल्यानंतरच
फळ उतरलं जायचं. त्यामुळे पाडाचे आंबे भरपूर निघायचे. सर्व लहान भावंडे त्यावर
लक्ष ठेवून होती. झाडाच्या एका कडेला आम्ही मोठी भावंडे पेपर वाचत
होताे, गप्पाही सुरू होत्या.
त्यावेळी
पेपर तेलगीच्या बातम्यांनी भरलेले असायचे. आमच्यात त्या बातम्यावर चर्चा व्हायची
तेवढयात आबांनी विचारले ^तुमचे काय मत आहे तेलगीबदद़लॽ* आमच्याकडून एकापेक्षा
एक भडक उत्तरे निघायला लागली. कोणी देशद्रोही म्हणाले त्याला फाशीचं दिली पाहिजे. त्याने देशाचे अतोनात नुकसान
केले अशा
प्रतिक्रिया उमटल्या. यावर ^ते खरंय रे, पण त्याच्यापासून काय शिकायला मिळतंॽ तुम्हाला चांगले
काय दिसतंयॽ* आबांचा पुन्हा प्रश्न. ‘देशद्रोही
कसा असतो ते दिसले त्याच्याकडे कुठे काय चांगले आहे’. मी उत्तर दिले त्यावर आबा म्हणाले ‘भारत देशाची बुध्दीवंतांची
फळी म्हणजे भारतीय प्रशासन सेवेतील आधिकारी. त्यांच्या लक्षात येणार नाही इतके हुबेहुब नकली मुद्रांक
तेलगीने तयार केले. नक्कल करायची वेळ
आली तर इतकी हुबेहुब नक्कल करता आली पाहीजे. जर
आपल्याला एखादी गोष्ट काॅपी करायची वेळ आली तर ती इतकी उत्कृष्ट असली पाहिजे की मूळ
कोणती आणि नक्कल कोणती हा प्रश्न पडावा. प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतात.
त्यातली वाईट बाजू सोडून दयायची असते आणि चांगल्या बाजुचा
आपण विचार करायचा असतो. संचय करायचा असतो. तेलगीने जे केले ते वाईटच आहे. त्याचे कोणालाच
समर्थन करता येणार नाही. त्याची त्याला शिक्षा मिळाली पण नक्कल करण्याची त्याची कला आपण लक्षात ठेवली
पाहिजे’.
प्रत्येक
गोष्टीत चांगले शोधा, असं सांगणारे आबा म्हणजे माझे वडील नेताजी पंढरीनाथ शिंदे गुरूजी. ते प्राथमिक शिक्षक होते.
मात्र औपचारिक शाळेत त्यांच्याकडून आम्हाला वर्गात बसून शिकता आले नाही.
माझी मुले माझ्या हाताखाली शिकायला नकोत. माझी मुले माझ्या वर्गात असतील तर माझे त्यांच्याकडे
जास्त लक्ष राहील. म्हणून त्यांनी
गावात कधीच बदली करून घेतली नाही. मात्र चार भितींच्या आत, घरात ते कायम शिक्षकचं
असत. शाळेला सुट्टी असली की आमची स्वारी, त्यांच्यासह शेतात असायची. मात्र काम करत असतानाही ते
आम्हाला गणित घालायचे आणि आम्ही ती तोंडी सोडवून उत्तर सांगत असू. कविता म्हणून दाखवाव्या लागत. शेतातील दगडे
उचलताना पाढेही म्हणावे लागत. घरी अभ्यास घेताना अक्षर कसे काढले जाते, याकडे त्यांचा
कटाक्ष असे. अक्षर विशिष्ट
पद्धतीनेचं काढावे लागायचे. जरा चुकले तरी ओरडा बसायचा. अक्षर चांगले होण्याचे
सारे श्रेय त्यानाचं द्यावे लागेल.
लहाणपणी आम्ही
लहान मुले मोठ्यांच्या अगोदर जेवायचो. वडिलधा-यांच्या जेवणाच्या वेळी
चिमणी (राॅकेलचा
दिवा) किंवा कंदीलाच्या उजेडात आळीपाळीने
मोठयाने वाचन चालत असे. थोडा उच्चार चुकला
तरी योग्य उच्चाराची उजळणी व्हायची. एकदा
बहिणीने ‘खळ्यात तिवडे रोविले’ ऐवजी ‘खळ्यात चिवडे रोविले’ असे वाचले. तेवढा
उच्चारही ‘चिवडे नाही तिवडे, अजून दिवाळी दूर आहे’ अशा शब्दात ऐकवून सुधारायला
लावला. असे बालपण सुरू असताना माझ्याकडून
एक मोठी चूक झाली.
त्यावेळी मी तिसरीत
शिकत होतो. शालेय अभ्यासक्रमात
महाभारतासंबधी एक धडा होता. त्यामध्ये जंगलाला लागलेल्या आगीचे वर्णन होते. तो धडा
शिकवताना गुरूजींनी वणव्याचे वर्णन असे काही केले की वणवा कसा असतो हे पाहायची
इच्छा निर्माण झाली. शाळेत येताना गुपचूप काडीपेटी खिशात आणली. त्याकाळी शाळा अकरा ते एक आणि दुपारी दोन ते पाच अशी दोन सत्रात भरायची. मध्ये एक तास सुट्टी. या सुट्टीत डबा खायचो, खेळायचो. त्या दिवशी माझे लक्ष कशातच नव्हते. डब्बा खाल्ला आणि शाळेजवळच्या टेकडीजवळ जावून गुपचूप
काडीने गवत पेटवले. वारे वाहत होते
आणि गवतही वाळलेले असल्यामुळे
थोड्याचं वेळात मोठी आग पसरली.
बघता बघता आग वाढली आणि शेकडो एकर गवत जळून गेले. आग विझवण्याचा कोणी प्रयत्न
करण्याचा प्रश्नच नव्हता. सुट्टी संपून दुस-या सत्राची शाळा भरली. गुरूजी वर्गात येतानाच
छडी घेवून आले होते. जाम घाबरलो होतो. पण चेहरा निर्विकार ठेवायचा प्रयत्न करत होतो.
गुरूजींनी खडा सवाल केला ‘आग
कोणी लावली’ॽ कांहीजणांनी हळुच माझ्याकडे पाहिले. उभा
राहण्यावाचून पर्याय नव्हता. दोन्ही हातावर निरगुडीच्या फोकाचा मार खाल्ला.
संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी आलो. वडिलांना कळल तर पुन्हा मार पडणार. त्यामुळे लपून
अभ्यास करत बसलो. मात्र आमचा पराक्रम त्यांना गावच्या वेशीवरच कळला होता. सात वाजता ‘राजा कुठाय’ॽ वडिलांनी आईला विचारले. भित भितच बाहेर आलो. पुन्हा वडिलांच्या हातचा मार
खाल्ला. गवताची आग विझली होती, पण घरात वणवा पेटला होता.
जेवणाची
इच्छा राहीली नव्हती. दोन वेळा भरपूर मार मिळाला होता, त्यानेच पोट भरले होते. वडिलांचे त्या आगीमुळे काय काय नुकसान झाले असेल याचे
स्वगत व्याख्यान सुरू होते. ‘सशांचा विणीचा हंगाम असतो .... त्यांच्या
पिलांचा मारेकरी कोणॽ .... पावसाने झाडे
वाढीला लागली होती ... त्या झाडांची वाढ खुंटली .... जनावरांचा यावर्षीचा एवढा मोठा चारा नष्ट केला .... आगीमुळे प्रदुषण झाले ते वेगळेचं .... कांही झाडे मुळापासून मरणार .... अनेक जीव जळून
गेले असतील .... त्याचं पाप डोक्यावर घेवून बसला .... अजून काही झाडांना
फळे होती ..... ती कोणाच्या तरी तोंडात जाणार होती .... जाळून टाकली.... झाडापासून ऑक्सीजन मिळतो .... तो मिळतो
म्हणून आपण जिवंत आहोत .... झाडाच्या मुळ्या पाणी जमिनीत नेतात .... म्हणून विहीरीत
पाणी येते ..... म्हणून
उन्हाळ्यात शेती करता येते .... आपण पाणी पिवू शकतो .... झाडापासून फळे मिळतात .... सगळं जाळून
किती जिवांचे नुकसान केले .... कि ती पाप
घेतलेस डोक्यावर .....’ आणि बरचं कांही.
प्रत्येक
कानावर पडणारा शब्द मी केलेल्या कृत्याची भिषणता सांगत होता, कृत्याची जाणिव करून देत होता. त्यावेळी हे ऐकलेले स्वगत आणि त्यानंतर ते करत असलेले
झाडांची सेवा पाहून पुन्हा कोणत्याही निसर्ग निर्मितीला हानी पोहोचवण्याचे विचार माझ्या मनातही येवू शकले नाहीत.
त्या दिवशीच्या
माराचे वळ राहीले नाहीत. पण मनाला वळण मात्र लावून गेले. त्या दिवसापासून मी त्यांच्या कृती
आणखी सूक्ष्मपणे निरखून लक्षात ठेवू लागलो. निसर्गाने निर्मिलेली कोणतीही गोष्ट निष्कारण नाही. तिच्यामागे
निश्चित उद्दीष्ट आहे आणि त्यात व्यत्यय आणण्याचा मला अधिकार नाही, हे हळूहळू पटायला
लागले. त्याना वनौषधीचीही उत्तम जाण होती. कोणीही झाडे तोडले की ते हळहळत. आबा
मात्र खिशात विविध झाडांच्या बिया एकत्र
करून आणत. त्यामध्ये कडूनिंब
आणि चिंच प्रामुख्याने असत. शेताच्या बांधावर
योग्य जागा निवडून बिया लावत. खिशातला अडकित्ता काढून वाढलेल्या झाडांच्या फांदया साळत.
हे सर्व पाहत असताना झाडाबाबतचे ज्ञान वाढत गेले. लौकिकार्थाने भौतिकशास्त्र विषयाचे शिक्षण घेतले
तरी लहानपणी झाडाबद्दल झालेले हे संस्कार कधीच धुसरदेखील झाले नाहीत. प्रशासकीय
सेवेत आल्यानंतर
ज्या ज्या ठिकाणी आणि जेंव्हा जेंव्हा वृक्ष लागवड त्यांचे संगोपन करण्याची संधी
मिळाली तेंव्हा तेंव्हा मी या उपक्रमात हिरीरीने आणि मनापासून सहभागी
झालो.
या
सर्व घटना आणि वडिलांच्या आठवणी पुन्हा समोर आल्या त्याला एक कारण घडले.
कांही
दिवसापूर्वी एका चॅनेलवर बातमी पाहिली. एका विमान वाहतुक कंपनीने प्रामाणिकपणाबद्दल एका
कर्मचाऱ्याला पदोन्नती दिली. चांगल्या माणसाचे कौतुक झाल्याची खरे तर ही चांगली बातमी. पण ही बातमी पाहिली आणि
एकदम अस्वस्थ झालो मनात आले
प्रामाकिपणा इतका दुर्मिळ झलाआहे का की त्याच्याबद्दल पदोन्नती द्यावी लागावी आणि तो प्रसंग आठवला.
जून, २००४ मध्ये आबांचे निधन झाले त्या अगोदर एकच
दिवस मी त्यांना भेटून आलेा होतो. निधनानंतर अनेकजण भेटायला आले. त्यात
त्यांच्याबरोबर काम केलेले एक शिक्षक होते. बसल्यानंतर जुन्या आठवणी निघाल्या. बोलता-बोलता त्यांनी सांगितले की ‘ते नवीनच नोकरीला
लागले होते. त्यावेळी शिक्षकांचा पगार रोखीने होत असे. प्राथमिक शिक्षकांच्या पगाराने तीन आकडे गाठलेले नव्हते असा तो काळ होता. त्याकाळात एका
महिन्याचा पगार गुरूजींनी आणला. महिन्याच्या
पहिल्या शनीवारी पांगरीच्या केंद्रशाळेत
सर्वांचा पगार वाटला. पगार
मिळाल्याच्या सह्या घेतल्या. लवकर पगार घेवून बरेच शिक्षक निघून गेले. सर्वात शेवटी स्वतःचा पगार घेताना त्यामध्ये आबाना शिल्लक रक्कमेत पन्नास रूपये जास्त असल्याचे लक्षात आले. शाळेत उपस्थित शिक्षकाकडे त्यांनी
विचारणा केली. सर्वांनी पगार बरोबर
मिळाला असल्याचे सांगीतले. सहयांचे कागद
तपासले.
कागदावर सर्वांचा पगार बरोबर झाला होता. ज्या ज्या शाळांतील शिक्षक सुरवातीला घेवून गेले
होते त्यांना विचारायचे राहिले होते. आजच्यासारखा त्याकाळी
दुचाकींचा सुळसुळाट झालेला नव्हता आणि सर्वच गावाला बससेवा उपलब्ध नव्हती. आबाना सायकलही येत नव्हती. त्या
काळी आबानी शक्य तेंव्हा बसने नाहीतर चालत सर्व शाळांना भेटी दिल्या. सर्वांना पगगार बरोबर मिळाला का हे विचारले मात्र प्रत्येकाने आपला पगार बरोबर मिळाल्याचे
सांगितले.
शेवटी
ते तालुक्याच्या गावी, बार्शीला आले. ज्या रोखपाल मॅडमनी पगाराचे पैसे दिले होते त्यांना
हिशोब जुळला काॽ हे विचारले. त्या मॅडमनीही आपला हिशोब जुळला असून आपण तो कार्यालयाला सादर केला असल्याचे सांगितले. त्या पन्नास रूपयांचा मालक निश्चित झालाच नाही. आबा
परत आले. मात्र
हे पन्नास रूपये आपले नाहीत ते
आपल्या संसारात वापरायचे नाहीत असे त्यानी ठरवले. शेवटी दारातल्या नरसोबासाठी पार
बांधायचे ठरवले. त्या पन्नास रूपयात
दगड काढण्यासह सर्व खर्च करून हा देवाचा पार बांधला. ज्यावर आपण बसलाे आहोत. गुरूजींचे
बोलणे संपताच गावातील गवंडयाने या घटनेला दुजोरा दिला.
ही
घटना आठवली आणि प्रश्न पडला त्या काळी प्रामाणिकपणाचे कौतुक करायचे असते तर
कोणाकोणाचे करावे लागले असते. रोखपाल मॅडम, सर्व
शाळातील शिक्षक, कोणाला कमी पैसे गेले ते शोधण्यासाठी पायपीट
करणारे माझे वडील. ही सर्वच प्रामाणिक लोकांची पिढी डोळयासमोर उभी राहीली. आज भ्रष्टाचार, अनीती, वाईट
घटना सगळया वृत्तपत्रांची पाने भरतात तेंव्हा मन उदास होते. मात्र अप्रामाणिकपणा, अनैतिकता यांच्या कथा वारंवार ऐकताना
अवचित येणारी बातमीमध्ये आशेचा किरण दिसतो. जगात आजही चांगले आहे, याची खात्री पटते
आणि चांगल्यातला एक घटक राहण्याचे समाधान
मिळते. स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्ग संपवायला
निघालेले पाहून मन खिन्न होत नाही तर दुप्पट
उमेदीने आपण काहीतरी सुंदर करायला हवे या विचाराने हात
पुढे सरसावतात. जग सुंदरच आहे आपण ते आणखी सुंदर बनवू या असा विश्वास देतात आणि पावले
आपोआपच त्या वाटेवर चालू लागतात.
छान लेख आहे
उत्तर द्याहटवाछान लेख आहे साहेब
उत्तर द्याहटवाThat's why you made greenzone at nanded University and i saw honesty too .....virasat me mila hai aapako ....kids never follow instructions they follow parents ....
उत्तर द्याहटवाVery nice sir
उत्तर द्याहटवाGreat sir,. Inherited.. bravo
उत्तर द्याहटवाvery nice article sir..
उत्तर द्याहटवाखुपच छान....
उत्तर द्याहटवा