सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

धवल क्रांतीकारक : वर्गीस कुरियन

  
(शेती प्रगती अंकाने  मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या   दिवाळी अंकातही लिखाणाची संधी दिली. धवल क्रांतीकारक : वर्गीस कुरियनया विषयावर लिहीण्यास सांगण्यात आले. दूध आणि धवल क्रांतीकारक वर्गीस कुरिअन यांचे या देशावर अनंत उपकार आहेत. ते शब्दबद्ध करण्याचा मी प्रयत्न केला. ते प्रसिद्ध झाले. तो लेख इथं आपल्यासाठी शेती प्रगतीच्या सौजन्यानं प्रकाशित करत आहे. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)
------------------------------------------------------------------------------------------------------------
नंद! सर्वांना हवाहवासा वाटणारा शब्द! गुुजरातमधील असेच सर्वप्रिय आनंदपूर नावाचे गाव! पुढे त्याचे नामकरण अाणंद असे झाले अाणि हे गावही सर्वाना आणंद देणारे ठरले. सर्वांचे पोषण व्हावे या हेतूने एका प्रयोगाचा पाया रचणारे गाव. हे गाव सर्व आबाल वृध्दांना माहित झाले आहे. ते अमुल दूध आणि दुग्धजन्य पदार्थामुळे. आज भारतात सर्वांना पुरेसे दूध उपलब्ध आहे. एकेकाळी दुधाचा तुटवडा असणाऱ्या भारताने दूध उत्पादनात अमेरिकेलाही मागे टाकले आहे. हे घडले ते मात्र आपोआप नाही. त्यामागे अविरत प्रयत्न, कष्ट आणि कल्पकता यांना बुध्दीमत्तेची जोड देणारी माणसं एकत्र आली. त्यानी भारताला दुधाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचे स्वप्न पाहिले. त्या दिशेने प्रयत्न केले आणि भारताला दूध संकटातून बाहेर काढले. दूधाच्या या कथेला खरे तर सुरूवात झाली एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि भारताला दूधाबाबत स्वयंपूर्ण बनवणाऱ्या कथेचे नायक होते वर्गीस कुरियन!
      गुजरातमधील कैरा जिल्हयात डेअरी व्यवसायाला सुरूवात झाली ती १८९० मध्ये. तेथील काही व्यावसायिकांनी दूध संकलन आणि वितरण व्यवस्था सुरू केली. खेडयातून दूध गोळा करायचे. विकत घ्यायचे. त्याचा मोबदला शेतकऱ्याना द्यायचा आणि जास्त किंमतीला ते जवळच्या शहरात विकायचे असे या व्यवसायाचे स्वरूप होते. मिळणारा नफा पाहून १९१० मध्ये आणखी कांही डेअरी व्यावसायिक यात उतरले. दूधाचा हा व्यवसाय चांगलाच किफायती होता. हा नफा पाहून एक पारशी बाबूही या व्यवसायात उतरले. पेस्तनजी एदूलजी हे त्यांचे नाव. हे गृहस्थ फार चतूर होते. व्यवसाय करताना सर्व छक्केपंजे वापरत. त्यांनी पोल्सनया नावाने हा व्यवसाय सुरू केला. कैरा जिल्हयात दूध संकलन करून ब्रिटीश लष्कराला दूध पुरवण्यास सुरूवात केली. उर्वरित दूध इतर व्यावसायिकाप्रमाणे नजीकच्या शहरात पुरवत. दूधाचा दर्जा चांगला राखल्याने पोल्सन हे नाव सर्वतोमुखी झाले. मागणी वाढल्याने पेस्तनजीनी १९३० मध्ये आणंद येथे मोठी डेअरी सुरू केली.
                दरम्यान पेस्तनजीना मुंबईला दूध पुरवठा करण्याबाबत बाँबे मिल्क स्किमकडून विचारणा झाली. आणंदपासून मुंबई ३५० किलोमीटरवर. इतक्या अंतरावर दूध पोहोचवण्याची घटना यापूर्वी घडली नव्हती. मात्र पेस्तनजी संधी सोडणाऱ्यापैकी नव्हते. ते पक्के संधीसाधू होते. त्यांनी पाश्चराझेशन प्रक्रिया केलेले दूध मोठया कॅनमध्ये भरले. पोत्याच्या जाड कापडानी ती कॅन लपेटून घेतली. झाकलेल्या कॅनवर बर्फाचे थंड पाणी पडत राहील अशी व्यवस्था केली आणि ते दूध मुंबईला पाठवले. मुंबईला दूध व्यवस्थित पोहोचले. पेस्तनजीना आता मोठी बाजारपेठ मिळाली. दुधाची जास्त गरज निर्माण झाली. कैरा जिल्हयातील शेतकऱ्याकडील दूध अन्य व्यावसायिकही विकत घेत. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा करण्यास पेस्तनजींना पुरेसे दूध मिळत नव्हते. त्यांनी ब्रिटीश आर्मीला बटर आणि चीज पुरवताना निर्माण झालेल्या संबंधाचा फायदा घेतला. कैरा जिल्ह‌्यात निर्माण होणारे दूध पोल्सनखेरीज अन्य दूध व्यावसायिकांना विकण्यास प्रतिबंध करणारा आदेश ब्रिटीश प्रशासनाला काढायला लावला. आता पोल्सनचा एकछत्री अंमल सुरू झाला.
       हळूहळू पेस्तनजींनी आपली नखे बाहेर काढायला सुरूवात केली. त्यांनी ब्रिटीश प्रशासनामार्फत खरेदी केले जाणारे पदार्थ माफक दरात पुरवले. मात्र इतर ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या दूध आणि इतर पदार्थाचे दर मोठया प्रमाणात वाढवले. दुसरीकडे शेतकऱ्याना आणि दूध उत्पादकांना 'दूधाचा दर्जा चांगला नाही' असे सांगत कमी दराने खरेदी सुरू केली. शेतकऱ्यांचे मोठ‌्या प्रमाणात शोषण होत होते. एकिकडे १९४५ मध्ये पोल्सन डेअरीचा व्यवसाय उत्कर्षाला पोहोचला होता. मात्र त्यांच्या अशा धोरणामुळे पोल्सनविरूद्ध असंतोषाची बीजे मूळ धरू लागली.
      गुजरातचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांना हा असंतोष जाणवत होता. शेतकऱ्यांच्या या शोषणावर सहकार चळवळच उत्तर देवू शकते, हे त्यांनी ओळखले. त्यांनी आपले सहकारी मोरारजीभाई देसाई यांना या प्रश्नात लक्ष घालण्यास सांगीतले. मोरारजीनी कैरा जिल्हा काॅंग्रेस समितीचे उपाध्यक्ष आणि स्वातंत्र्य सेनानी त्रिभुवनदास पटेल यांच्याकडे या चळवळीची सुत्रे सोपवली. त्रिभुवनदास यांच्या पुढाकाराने कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ स्थापन झाला. त्या संघामार्फत पोल्सनला दुध विकू लागले. तरीही पोल्सन 'दूधाचा दर्जा चांगला नाही' असे सांगत दर कमी देत असे. त्रिभूवनदास यांनी पटेल यांना 'जोपर्यंत शेतकरी स्वतःची डेअरी काढून पोल्सनला हद्दपार करणार नाहीत, तोपर्यंत हे शोषण टाळणे कठिण असल्याचे सांगीतले'. त्याचबरोबर या सहकारी डेअरीचे दूध मुंबईत प्रसिध्द होणे आणि बाजारपेठेवर ताबा मिळवणे महत्वाचे असल्याची जाणीव करून दिली. त्याप्रमाणे जूनी मशीनरी खरेदी करून डेअरी सुरू केली.
   
   मुंबईच्या बाँबे मिल्क स्किमच्या अधिकाऱ्याकडे सहकारी संघाने दूध विकत घेण्याची विनंती केली. मात्र पेस्तनजींनी अधिकाऱ्यावर दबाव आणला. बाँबे मिल्क स्किमने विनंती नाकारली. मुंबई दूध योजनेचा निर्णय विरूध्द जाताच शेतकऱ्यानी सत्याग्रहाचे शस्त्र उगारले. इतिहासात या आंदोलनाला कैरा स्ट्राईक म्हणून ओळखले जाते. पोल्सनला एक थेंबही दूध विकायचे नाही असा निर्धार केला. दूध रस्त्यावर ओतले गेले. पोल्सनला दूध मिळेनासे झाले. परिणामी मुंबईचा दुध पुरवठा घटला. सलग पंधरा दिवस हा लढा सुरू होता. त्यानंतर आधिकाऱ्यांचे डोळे उघडले. त्यानी सहकारी संघाकडून दूध घेण्याचे मान्य केले. या काळात त्रिभूवनदास यांनी पूर्ण कैरा जिल्हा पालथा घातला. शेतकऱ्याना सहकारी चळवळीचे महत्व पटवून दिले. अंतिमतः १९४६ मध्ये कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची डेअरी सुरू झाली. त्यानी जुन्या डेअरीची यंत्रे विकत घेतली होतीचं. त्यांच्या सहाय्याने आणंद येथे काम सुरू केले. अशा पार्श्वभूमीवर १३ मे, १९४९ रोजी वर्गीस कुरिअन आणंदला आले.
      वर्गीस यांना आज 'दूध मानव' म्हणून आपण ओळखतो. त्याना धवल क्रांतीचे जनकही म्हटले जाते. मुळात त्यांचा आणि गुजरातचा कांही संबंध नव्हता. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर, १९२१ रोजी केरळमधील कलीकत शहरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण गोबीचेट्टीपलायम येथील डायमंड ज्युबिली स्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील नामांकित शल्यविशारद होते. ते सरकारी दवाखान्यात नोकरी करत. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी लाॅला काॅलेज, चेन्नई येथे प्रवेश घेतला. १९४० मध्ये त्यांनी भौतिकशास्त्र विषयातील पदवी प्राप्त केली. त्यानंतर यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) मधील पदवी, काॅलेज फ इंजिनिअरिंग, गिंडी, चेन्नई येथून प्राप्त केली. त्या काळातील सर्वात कमी वयात पदवी प्राप्त करणारे ते अभियंता होते. वयाच्या बाविसाव्या वर्षी आईच्या आग्रहाखातर टाटा स्टील टेक्नीकल इन्स्टिट‌्यू, जमशेदपूर येथे जायचे ठरवले. टाटा समूहामध्ये संचालक असणाऱ्या काकांच्या शिफारसीमुळे त्याना प्रवेश मिळाला. तेथून १९४६ मध्ये त्यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला. आपल्या गुणवत्तेवर आपण पुढे जायला हवे असे त्याना वाटे. पदवी प्राप्त झाल्यानंतरही आपण काकाच्या कुबड‌्या घेवून जगतोय याची त्यांना जाणीव व्हायची.
      काकाच्या ओझ्याखालून बाहेर पडण्यासाठी त्यांनी भारत सरकारच्या अमेरिके शिक्षण घेण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अध्ययनवृत्तीसाठी अर्ज केला. परतल्यावर तीन वर्ष शासकीय नोकरी करण्याच्या अटीवर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ही अध्ययनवृत्ती त्याना मंजूर झाली. त्यांनी १९४८ मध्ये मिशिगन विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम धातूशास्त्र हा मुख्य विषय आणि न्युक्लिअर सायन्स हा उपविषय घेवून पूर्ण केला. खरेतर वर्गीस यांना डेअरी सायन्सच्या अभ्यासक्रमासाठी पाठविण्यात आले होते. मात्र त्यानी हा अभ्यासक्रम घेतलाच नव्हता. अमेरिकेतील शिक्षण संपताच ते भारतात परतले.
      भारतात परतल्यानंतर करारानुसार वर्गीस यांना १९४९ मध्ये आणंद येथे शासकिय डेअरीमध्ये पाठविण्यात आले. ते नाईलाजाने त्या ठिकाणी गेले. केवळ मान्य केलेली अट पूर्ण करायची म्हणून ते हजर झाले. त्यांची खेड्यात राहायची आजिबात इच्छा नव्हती.र्ध्यावरच ही नोकरी सोडून द्यावी असे विचार वारंवार त्यांच्या मनात येत. मात्र त्याबदल्यात भरावी लागणारी रक्कम मोठी होती. त्यामुळे नाइलाजाने आले दिवस ढकलत होते. याचं काळात सहकार चळवळीत कार्यरत त्रिभूवनदास पटेल त्यांच्या सहवासात आले. वर्गीस हे त्रिभूवनदास यांचे कार्य पाहात होते. त्रिभूवदास यांनी शेतकऱ्यांचा उभारलेला लढा, त्यांच्या उन्नतीसाठी चाललेली धडपड याचे ते साक्षीदार होते. दुसरीकडे त्रिभूवनदास यांना वर्गीस यांच्यातील क्षमता लक्षात आली होती. हा तरूण आता जरी नाईलाजाने काम करत असला तरी तो या क्षेत्रात मोठे योगदान देवू शकतो हे त्यानी ओळखले होते. दिवस सरत होते आणि वर्गीस आपली बाँडच्या बंधनातून सुटका होणार या आनंदात होते.
      त्यांची तीन वर्षाची शासकीय सेवा संपत आली आणि ते आणंद सोडणार, त्याचवेळी त्रिभूवनदास यांनी वर्गीस यांना गाठले. कैरा जिल्ह‌्यात शेतकरी जो प्रयत्न करत आहेत. सहकार चळवळीच्या माध्यमातून दूध व्यवसाय उभारू पाहत आहेत. त्यामध्ये सहभागी होण्याची विनंती केली. वर्गीस यांना पोल्सन विरूध्द शेतकऱ्यानी उभारलेला लढा माहित होता. त्रिभूवनदास यांना ते जवळून ओळखत होते. त्यांची प्रामाणिक, निस्पृह धडपड ते जाणून होते. शेतकऱ्यामध्ये जिद्द निर्माण करण्यात त्रिभूवनदास यशस्वी झाले होते. शेतकरी दूध उत्पादक कष्टाळू होते. जिल्हयात सहकार चळवळीचे बीज अंकूरले होते. मात्र त्या रोपट‌्याची वाढ चांगली होत नव्हती कारण त्यांच्याकडे चांगल्या तंत्रज्ञाची कमी होती. कांही दिवस राहून आपण त्याना मदत करावी असे वर्गीस यानी ठरवले. वर्गीस यांना या कार्याचे महत्व समजले होते. ही चळवळ सशक्त झाली तर एक नवी दिशा मिळणार होती. शासकीय सेवा संपवून ते त्रिभूवनदास यांच्यासह पूर्णवेळ कार्य करू लागले. यापूर्वीही वर्गीस हे चळवळीला मदत करत होते. वर्गीस राहीले तर तंत्रज्ञाची कमी भरून निघेल हे ओळखूनच त्रिभूवनदास पटेल यांनी वर्गीस यांना विनंती केली होती.
      वर्गीस यांनी त्रिभूवनदास यांच्याप्रमाणेच आहोरात्र या चळवळीसाठी कार्य करायला सुरूवात केली. त्यांनी सर्वप्रथम दूध संकलनाचे व्यवस्थापन या विषयावर आपले लक्ष केंद्रित केले. दूधाची नासाडी न होता जास्तीत जास्त दूध डेअरीमध्ये सुरक्षित आणण्यासाठी त्यांनी वाहनाच्या मार्गाचे आणि वेळेचे काटेकोर नियोजन केले. त्यामुळे दुधाची नासाडी थांबली. शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित झाले. त्याचवेळी जुनी यंत्रणा मोडीत काढून नवी मशिनरी खरेदी करण्यास सुचविले. त्रिभूवनदास यांना या युवकाची कल्पकता आणि हुशारीची पूर्ण खात्री होती. त्यांनी त्वरीत नवीन यंत्रे खरेदी केली. १९५१ मध्ये लार्सन आणि टुब्रो कंपनीची नवी यंत्रे डेअरीमध्ये कार्यान्वीत झाली. सहकारी तत्वावरील डेअरीचे ते जनरल मॅनेजर बनले. १९४८ मध्ये ज्या डेअरीत प्रती दिन २०० लिटर दूधावर प्रक्रिया होत असे. त्याचं डेअरीत नव्या मशीनने १९५२ मध्ये रोज २०००० लिटरवर प्रक्रिया होवू लागली. हळूहळू कामाचा व्याप वाढू लागला. दूध संकलनही चांगले होवू लागले. दुधाचा दर्जा चांगला असल्याने आणंद येथील या प्रयोगाची किर्ती हळूहळू पसरू लागली. शेतकऱ्याना चांगला मोबदला मिळत असल्याने जिल्ह‌्याबाहेरही चर्चा सुरू झाली. ती किर्ती दिल्लीमध्ये सरकार दरबारी पोहोचली.
      दरम्यान वर्गीस न्यूझीलंडला या व्यवसायाचा अभ्यास रण्यासाठी कांही दिवस गेले. तेथून परतल्यावर ते एका वेगळ‌्याच प्रयत्नात गुुंतले. परदेशात संकरीत गायी मोठ‌्या प्रमाणात दूध देता. त्यांच्यापासून मिळणाऱ्या अतिरिक्त दूधाची पावडर बनवली जात असे. पावसाळ‌्यात ओला चारा असल्याने भारतात पावसाळ‌्यात जास्त दूध मिळायचे. तर कडक उन्हाळ‌्यात दूधाचे प्रमाण मोठ‌्या प्रमाणात घटत असे. परदेशात गायीच्या अधिकच्या दूधाचे भुकटीत रूपांतर करण्यात येई आणि ही दूध पावडर धातूच्या डब्यात हवाबंद स्वरूपात साठवण्यात येत असे. परदेशात विकसीत झालेली पध्दत भारतात राबवायचे ठरवले. मात्र ही पद्धत गायीच्या दूधाबाबत उपयुक्त होती. भारतात मिळणाऱ्या दूधात म्हशीच्या दूधाचे प्रमाणे जास्त होते. मात्र भारतात म्हशींचे दुध मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. म्हशीच्या दूधाचे पावडरीमध्ये रूपांतर करण्याचे तंत्र उपलब्ध नव्हते. वर्गीस यांनी त्यांचे मित्र व कर्मचारी दलाया यांना ही संकल्पना सांगीतली. दलाया आणि त्यांच्या सहकाऱ्यानी अनेक प्रयोग केले आणि अखेर म्हशीच्या दूधाची पावडर बनवण्यात यश मिळवले. त्यामुळे पुढे या चळवळीला अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना यशस्वीपणे टक्कर देता आली. जागतिक पातळीवर म्हशीच्या दूधाची पावडर शकत नाही ही दृढ झालेली समजूत खोटी ठरवली. हे तंत्र सापडताच जगातील पहिला म्हशीच्या दूधापासून पावडर बनवायचा प्रकल्प उभा करण्याचा त्यांनी संकल्प सोडला.
      १५ नोव्हेंबर, १९५४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डाॅ. राजेंद्र प्रसाद यांनी या प्रकल्पाचे भूमीपजून केले. हा प्रकल्प एक वर्षात उभारला जाणार याची वर्गीस यांना पूर्ण खात्री होती. त्यामुळे या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना बोलावण्याचे निश्चित केले. ३१ क्टोबर, १९५५ रोजी या प्रकल्पाचे पंडीतजींनी उद्घाटन केले. या उद्घाटन समारंभाला परदेशी तंत्रज्ञांनाही बोलविण्यात आले होते. जगाने जे शक्य नाही असे सांगीतले होते ते या भारतीय वीरांनी शक्य केले होते. या कर्तृत्वाचे प्रतिबिंब पंडितजींच्या भाषणातही उमटले. साहजिकच सर्वांचा काम करण्याचा उत्साह वाढला. या प्रकल्पातून सहकार चळवळीची अनेक उत्पादने निघू लागली. ती गुणवत्तेमुळे लोकांना आवडू लागली. त्यामुळे त्या उत्पादनांना ब्रॅंड नावाची गरज भासू लागली.
      विक्री व्यवस्थापनात उत्पादन खपवण्यामध्ये ब्रॅंड अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. खूप मोठी चर्चा झाल्यानंतर व्यवस्थापनाने या सहकारी चळवळीत तयार होणाऱ्या दूधाच्या पदार्थासाठी अमूलहे नाव स्विकारले. हे नाव रसायन प्रयोगशाळेतील गटाने सुचविले होते. या नावाला दुहेरी महत्व होते. संस्कृतमध्ये अमूल्य म्हणजे ज्याची किंमत करता येत नाही असे. या अर्थाने अमूल नावाला महत्व होतेच. पण ते इंग्रजीमध्ये लिहिताना AMUL असे लिहिले जाते हे आणंद मिल्क युनियन लिमिटेडचे संक्षिप्त किंवा लघुरूपही होते. या ब्रॅंडच्या जाहिरातीसाठी एक छोटी फ्राॅक घातलेली मुलगी आणि 'अटरली बटरली डेलीशियस' ही टॅगलाईन घेण्यात आली. १९५७ मध्ये हे नाव नोंदणी करण्यात आले आणि आज हे नाव घराघरात पोहोचले. या वर्षातच वर्गीस यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. अमूल आणि वर्गीसकन्या निर्मला १९५७ मध्ये जन्मले. आता या उद्योगाला खऱ्या अर्थाने व्यावसायिक स्वरूप येवू लागले. अमूल हे नाव सर्वदूर पसरू लागले. उत्पादनाचा खप चांगलाच वाढत होता. अशातच चीनच्या आक्रमणाचे ढग जमू लागले.
      भारताला स्वातंत्र्य मिळून एक तप उलटले होते. १९६२ चा तो काळ. चीनसोबत युध्दाचे ढग दाट होवू लागले. पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून अमूलकडे मदतीची विनंती करण्यात आली. भारतीय सेनेला आवश्यक असणारी दूध पावडर पुरवावी असे कळविण्यात आले. २७५० टन इतकी दूध पावडर सहा महिन्यात पुरवायची होती. एकट‌्या अमूल डेअरीकडून ही पूर्तता होणे शक्य नव्हते. वर्गीस यांनी राजकोट डेअरीची मदत घ्यावयाचे ठरविले. जनतेला होणारा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा कांही काळासाठी थांबविण्यात आला आणि हे आव्हान पेलण्यात आले. सैन्यदलाची गरज भागवली. या बदल्यात अमूलला काय हवे अशी विचारणा करण्यात आली. वर्गीस यांनी या कार्याचे मोल करण्याचे टाळले आणि काहीही नाहीअसे कळविले. या काळात जनतेला दूध आणि दूग्धजन्य पदार्थाच्या किंमती वाढवून पोल्सनने फायदा उचलायचा प्रयत्न केला. पण मिनू पोल्सनला म्हणजेच पेस्तनजीच्या मुलाला त्यात अपयश आले. मात्र ही बाब लक्षात येताच वर्गीस यांनी शासनाच्या मदतीने पोल्सनवर बंदी घातली.
      अमूलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना अमुलने केलेली मदत माहित होती. सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त ते गुजरातला येणार होते. त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री बळवंतराव मेहता यांना अनपेक्षित मागणी केली. ते कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर गुजरातला येणार होते. त्याना आणंद येथील अमूल प्रकल्पाला भेट द्यायची होती. मात्र त्या अगोदर एक दिवस छोट‌्या खेड‌्यात शेतकऱ्याच्या घरी राहायचे होते. या कार्यक्रमाची कोणाला माहिती होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक होते. पंतप्रधान सामान्य नागरीक म्हणून राहणार होते. शेतकऱ्याशी गप्पा मारणार होते. अमूलच्या यशाबद्दल त्यांना शेतकऱ्यांचे मन जाणून घ्यायचे होते. अमूल सहकार चळवळ कशी चालते हे पहायचे होते.
      बळवंतराय प्रचंड तणावाखाली आले. त्यांनी वर्गीस यांना याची माहिती कळविली. कार्यक्रमाची तारीख जवळ आली. वर्गीस यांनी अत्यंत गोपनीय आखणी केली. त्यांनी आणंदपासून दहा किलोमिटर अंतरावरील अजरापूरा गावाची निवड केली. तेथील दूध उत्पादक रमणभाई यांना एक महत्वाचे पाहुणे तुमच्याकडे राहायला येणार असल्याचे कळवले. पंतप्रधानांच्या सुरक्षा वाहनांना थेट आणंदला आणले आणि पंतप्रधान थेट रमणभाईंच्या घरी गेले. रात्रभर शास्त्रीजी तेथे राहिले. मोकळेपणाने गावभर फिरले. शेतकऱ्याना विविध प्रश्न विचारले. अमूल पूर्वीचे जीवन आणि सध्याचे जीवन यातील फरक समजून घेतला. अमूल आणि सहकारी चळवळीमुळे झालेला बदल जाणून घेताना शास्त्रीजी उद्याच्या भाषणाचे मुद्दे तयार करत असावेत. दुसऱ्या दिवशीच्या भाषणात त्यांनी अमूलचे केलेले कौतुक पूर्ण सहकार चळवळीसाठी प्रेरणादायी ठरले. दुसऱ्या दिवशी शास्त्रीजी वर्गीस यांच्यासह राहीले. कैरापेक्षा अन्य जिल्ह‌्यात आणि राज्यात दूध उत्पादनासाठी अनुकुल परिस्थिती होती. मात्र अमूलने कैरा जिल्ह‌्यात जे साध्य केले ते इतरत्र का नाही? या शास्त्रीजींच्या प्रश्नाचे उत्तर शेतकऱ्यांची सहकारी चळवळ असल्याचे वर्गीस यांनी नम्रपणे सांगितले. अमूलचे माल शेतकरी आहेत आणि मी केवळ नोकर आहेहे वर्गीस यांचे उत्तर शास्त्रीजींच्या मनात घर करून राहिले.
                शास्त्रीजींनी वर्गीस यांना आणंदसारखे प्रकल्प अन्य जिल्ह‌्यात सुरू करण्याबाबत सुचविले. कैराप्रमाणेच अन्य जिल्ह‌्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आल्याचे चित्र वर्गीस यांना दिसू लागले. काम मोठे कठिण होते. मात्र वर्गीस यांना जणू आव्हाने पेलण्याची सवयच जडली होती. देशभरात कैराप्रमाणे दूधाची यंत्रणा कशी राबविता येईल याचा ते विचार करू लागले. १९६५ साली आणखी एक महत्वाची घटना घडली. मिशिगन विद्यापीठाने आपल्या या अनोख्या विद्यार्थ्याच्या कार्याची दखल घेत त्यांना मानद डाॅक्टरेट ही पदवी प्रदान केली. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर आणंदसारखे प्रकल्प प्रत्येक जिल्ह‌्यात राबवण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची स्थापना करण्यात आली. त्यांनी हाॅरवर्ड विद्यापीठातील अन्न आणि कृषी विषयातील तज्ज्ञ मायकेल हेल्स यांची मदत घेतली. इंडियन इन्स्टिट‌्यूफ मॅनेजमेंटमधील व्यवस्थापन तज्ज्ञ, वर्गीस यांचे सहकारी दलाया आणि हेल्स यांनी पूर्ण अभ्यासानंतर या योजनेला ६५० कोटी रूपयांच्या निधी आवश्यक असल्याचे सांगितले. या प्रकल्पाचे राज्य सरकारपुढे सादरीकरण झाले. मात्र अनेक राज्यांनी ही योजना नाकारली. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्या काळात दूध उद्योगावर मालकी सरकारची मालकी होती. सरकारी बाबूंचे नियंत्रण होते. या उद्योगाची मालकी शेतकऱ्याना द्यायला ते तयार नव्हते. त्यामध्ये मिळणारे लोणी सोडायला अनेक बोके तयार नव्हते.
      वर्गीस यांनी शासनाकडे जमा होणारे अधिकचे दूध देण्याबाबत विनंती केली. मात्र तीही नाकारली. हा प्रकल्प गुंडाळावा लाणार अशी चिन्हे दिसत होती. मात्र ही योजना यशस्वी व्हावी असे वाटणारेही कांही अधिकारी होते. त्यावेळी गृह खात्याचे सचिव एल.पी. सिंग होते. त्यांचा या योजनेशी कांहीही संबंध नव्हता. त्यांनी वर्गीस यांना एक वेगळी कल्पना सांगीतली. युरोपात दूधाचे उत्पादन मोठ‌्या प्रमाणात होते. वर्गीस यांनी ते युरोपातील अतिरिक्त दूध मिळवण्याचा प्रयत्न करावा असे सुचविले. शूरवीरांना नियती नेहमीच साथ देते, असे म्हणतात. तसेच काहीसे घडले. १९६८ मध्ये रोम येथे वर्ल्ड फूड प्रोग्रामची बैठक होणार होती. क्टोबरमध्ये वर्गीस आणि कृषी सचिव बी.आर. पटेल रोमला या बैठकीसाठी गेले.
      वर्गीस यांनी या परिषदेत आपली योजना सादर केली. युरोपमध्ये अतिरिक्त दूध उत्पादन आहे, तर भारतात दूधाची कमतरता आहे. भारतात दूधाची स्वयंपूर्णता येवू शकते. मात्र त्यासाठी विशेष योजना राबवावी लागणार आहे. या योजनेचा खर्च मोठा आहे. युरोपिअन देशांनी हे अतिरिक्त दूध भारताला उपलब्ध करून द्यावे. हवे तर विकत द्यावे. त्यावर १० टक्‍के नफा द्यायची तयारीही दर्शविली. मात्र यातून मिळणारा अतिरिक्त नफा हा या योजनेसाठी वापरला जाईल, असे सांगितले. समितीचे सर्व सदस्य या सादरीकरणाने प्रभावित झाले. त्यातील अनेक सदस्यानी या योजनेस स्विकारण्यास अनुकुलता दर्शवली. मार्च १९७० मध्ये भारत सरकारशी वर्ल्ड फूड प्रोग्रामअंतर्गत करार झाला आणि दूधाचा महापूर किंवा परेशन फ्लड प्रकल्पाला मोठे बळ मिळाले.
      या योजनेची अंमलबजावणी तीन टप्प्यात सुरू झाली. वर्गीस यांच्या सादरीकरणानंतर युरोपमधून मोठ‌्या प्रमाणात दूध आणि दूग्धजन्य पदार्थ मोफत मिळाले. या प्राप्त झालेल्या पदार्थांची पुनर्रचना करण्यात आली. मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नई या शहरात हे पदार्थ पुरवण्यात आले. यातून या पदार्थांचा विक्रीमध्ये वाटा वाढविणे किंवा मार्केट कॅप्चर करणे हा हेतू होता. मिळालेल्या नफ्यातून शहरात व आजूबाजूच्या परिसरातील जनावरांच्या पालनपोषण करण्यात आले. आधिक दूध देणारे जनावरांच्या निर्मितीसाठी संकर घडवून आणणेसाठीही खर्च करण्यात आला. त्यातून शेतकऱ्याना मोठ‌्या प्रमाणात दूध देणारी जनावरे उपलब्ध होणार होती. १९७० ते १९८० च्या दशकातील प्रयत्न हे दूधाच्या शाश्वत उपलब्धतेसाठी करण्यात येत होते.
      दूधाचा महापूर योजनेचा दूसरा टप्पा हा पाच वर्षांचा होता. १९८१ ते १९८५ या कालखंडात जागतिक बॅंकेने दूधाचा महापूर योजनेला २०० कोटी रूपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले. या टप्प्यात नव्या दूध डेअरीची बांधणी करण्यात आली. विक्रेत्यांची संख्या वाढविण्यात आली. या टप्प्याच्या अखेरीस भारतातील ४३००० गावात सव्वा चार कोटी दूध उत्पादक तयार झाले. भारताच्या कानाकोपऱ्यात सहकारी चळवळ पोहोचली. लोकांना या योजनेचे महत्त्व समजले. लोकांचा या योजनेत सहभाग वाढला.
      तिसरा टप्पा हा १९८५ ते १९९६ या कालखंडात राबविण्यात आला. देशभरात पूर्वीचे ४२००० दूध उत्पादक संघ होते. त्यांच्या डेअरी होत्या. या तिसऱ्या टप्प्यात डेअरींची संख्या ३०००० ने वाढली. या कालखंडात महिलांनी अनेक सहकारी संस्था स्थापन केल्या. महिलांचा सहभाग लक्षणीयरित्या वाढला होता. या टप्प्यात विविध सहकारी संस्थांना दूध संकलन आणि विक्रीसाठी विशेष सहाय्य करण्यात आले. जनावरांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी दवाखाने उभारण्यात आले. पशुखाद्य निर्मितीचे प्रकल्पही उभारले गेले. त्याचबरोबर पशूसंशोधन आणि पोषण यावर मोठ‌्‌या प्रमाणात लक्ष केंद्रीत करण्यात आले.
      दरम्यान वर्गीस यांनी ग्रामिण विकासाचे उद्दिष्ट ठेवत इन्स्टिट‌यूफ रूरल मॅनेजमेंटची आणंद येथे १९७९ मध्ये स्थापना केली. ही संस्था आज भारतातील अग्रगण्य संस्था आहे. १९९८ पर्यंत वर्गीस यांनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. तरीही ते गुजरात को- ऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सन २००६ मध्ये नवीन संचालकांशी मतभेद होताच त्यांनी तात्काळ राजीनामा दिला. अमूलच्या यशोगाथेवर शाम बेनेगल यांनी मंथन हा चित्रपट काढला. हा चित्रपट काढण्यासाठी शेतकऱ्यानी निधी जमा केला. जगातील अशा शेतकरी फायनान्सर असलेला हा पहिला चित्रपट असावा. आर्ट फिल्मच्या धर्तीवर असलेला हा चित्रपट चालणार का अशी शंका होती. मात्र हा चित्रपट खूप चालला. त्याला अनेक राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. वर्गीस यांच्या जिवनावर २०१३ मध्ये अमर चित्र कथा मालिकेत अब्ज लिटर दूधाच्या संकल्पनेचा माणूसही चित्रपुस्तिका प्रसिध्द झाली.
      वर्गीस यांना अनेक पुरस्कार मिळाले. १९६३ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार, १९६५ मध्ये पद्मश्री, १९६६ मध्ये पद्मभूषण, १९८६ मध्ये कृषी रत्न, त्याचवर्षी वाॅटलर पीस अॅवार्ड, १९८९ मध्ये वर्ल्ड फूड प्राईज, १९९३ मध्ये डेअरी व्यवसायातील इंटरनॅशनल पर्सन ऑफ द इयर, १९९७ मध्ये फ्रांस सरकारचे र्डर फ अॅग्रीकल्चरल मेरिट, १९९९ मध्ये पद्मविभूषण हे त्यातील ठळक पुरस्कार. या पारितोषिकांपेक्षा त्यांना शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादकांच्या मनात मिळालेले स्थान फार मोठे आहे. वर्गीस यानी ९ सप्टेंबर, २०१२ रोजी या जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या या धवल क्रांतीची पुढील वाटचाल आजही तशीच सुरू आहे.
      वर्गीस कुरिअन एक अफलातून व्यक्तिमत्व होते. त्यांना अनेक भाषा येत असत. पण एखाद्या राज्यात गेल्यावर, स्थानिक भाषेत ते कधीच संभाषण करत नसत. त्यांना भारतातील धवलक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. भारतातील जनतेला दूध मुबलक प्रमाणात मिळावे म्हणून ते आयुष्यभर कार्यरत राहीले. दूधाला परिपूर्ण आहार मानले जाते. मुलांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी दूध हे उत्तर ठरू शकते, हे ओळखून त्यासाठी कार्य करणाऱ्या या अवलीयाने स्वतः मात्र दूध कधीच पिले नाही. मात्र आपल्याला 'अटरली बटरली डेलीशियस' सांगत दुधाकडे ते आजही आकर्षित करत आहेत. अमुल अमर आहे असे सांगत आहेत.
(सौजन्य : शेती प्रगती दिवाळी अंक २०१७)

----०----

१५ टिप्पण्या:

  1. सर, डॉ कुरियन सारख्या महान व्यक्तिमत्वावर एक उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण लेख लिहून तुम्ही एक प्रकारे विस्मृतीत चाललेल्या युगपुरुषांना आदरांजली वाहिलेली आहे, बी एस सी च्या इंग्रजी पुस्तकामधील त्यांच्यावरील धडा, आजोबांचे नातवास पत्र मी खूप उत्साहाने शिकवत असे, आनंद मधील प्लांट ला भेट दिली आहे, तिथला फ्लोरा आणि फाऊंना उत्कृष्ट आहे, नेहरूंपासूनची जुनी छायाचित्रे पाहणे हा अवर्णनीय आनंद आह,अशा साहित्याला शिकवताना असा त्या महान व्यक्तीने उभ्या केलेल्या कार्या ला देऊन, आपले अनुभव वर्गात जिवंतपणे विद्यार्थ्यांसमोर उभे करणे हे भाषा शिक्षकाचे खरे काम आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते, तथापि असा शिक्षक त्याची माहिती काही मानवनिर्मित अडथळ्यांमुळे विद्यापीठापर्यंत पोचवू शकला नाही तर त्याला भाषा विषय शिकवण्यासाठी असे प्रयोग करणे,अवांतर पुस्तके विकत घेऊन वाचणे, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे इ गोष्टी अभ्यासक्रमातून इतर ज्युनिअर शिक्षकांना करावयास लावणे , हे सगळे होऊ शकत नाही, पण एक गोष्ट होते, ती म्हणजे अमेरिकेतला मोठा लठ्ठ पगाराचा जॉब सोडून गुजरातच्या शेतकरयाकडून एवढा अद्वितीय सहकारी प्रयोग ते करू शकले, तो त्यांचा जो त्याग आहे तो त्याग केल्याचा आनंद अशा शिक्षकाला मिळू शकतो , व तो आनंद तो त्याच्या विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यांना सहभागी करून घेऊ शकतो : डॉ आर वाय शिंदे, इंग्रजी विभाग प्रमुख, (मार्च 2005 पासून ) , किसन वीर महाविद्यालय , वाई , 27 नव्हेंबर , 2017

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. It is written by Dr V N Shinde from Shivaji University Kolhapur. The article is very inspiring and thought provoking.

      हटवा
    2. अतिशय सहज सुंदर आणि माहितीपूर्ण लेख. कित्येक गोष्टी नव्याने कळल्या उदा म्हशीच्या दुधाची भुकटी ही प्रत्येक भारतियास अभिमानाने मिरवावी अशी घटना आणि पं. नेहरु,शास्त्रीजी विषयक आणंद प्रकल्पासंदर्भात अफलातून घडामोडीची माहिती (त्यावेळी उदो उदोउदो करुन घ्यायला आणि करायला सोशल नेटवर्किंग नव्हते).

      हटवा
    3. Thank you Sir for your detailed comment. Now I personally feel that, stories of these great peoples should be placed before youth. My small contribution.

      हटवा
  2. साहेब छान लेख आहे....
    डॉ. विजय कुंभार, डी जी कॉलेज,सातारा

    उत्तर द्याहटवा
  3. Thank you So much Sir for this informative blog.This is really inspiring for youth like us

    उत्तर द्याहटवा