सोमवार, १७ जुलै, २०१७

सच्ची ‘ऐश्वर्य’संपन्नता
               गुरूपौर्णिमा, शिक्षक दिन या दिवशी शिक्षण क्षेत्राशी संबंधित काही ना काही उपक्रम होत असतात. या वर्षी रविवारी, ९ जुलैला गुरूपौर्णिमा होती. आजरा तालुक्यातील उत्तूर हे शैक्षणिक क्षेत्रातील लौकिप्राप्त गाव. या गावात 'त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्था' गेल्या १७ वर्षांपासून कार्य करते. संस्थेचे मूळ उद्दिष्ट साहित्य, संगीत आणि कलेचा प्रसार करणे हे आहे. संस्थेने यंदाच्या गुरूपौर्णिमेला शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित केला. या चार शिक्षकांचा सत्कार झाला. पद्मभुषण जे.पी.नाईक यांच्या नावे पुरस्कार देऊन माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांचा सत्कार झाला. दादा नाईक पुरस्काराने राज्य पातळीवरील आदर्श शिक्षकाचा आणि  पू. बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांच्या नावे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही संस्था मागील सतरा वर्षे असे पुरस्कार देते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला.
       राज्यस्तरीय दादा नाईक पुरस्कारप्राप्त भाऊसाहेब शिंदे यांनी 'जॉमेट्री ट‌्युटर' हे भूमिती समजून घेण्यासाठीचे उपयुक्त उपकरण तयार केले. त्याचे त्यांनी पेटंटही घेतले आहे. या कार्याबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. जे. पी. नाईक पुरस्कारासाठी अशोक देसाई यांची प्राथमिक आणि अनुजा बेळगुद्री यांची माध्यमिक शिक्षकांमधून निवड करण्यात आली होती. अनेकांचे दारूच्या व्यसनापायी मोडणारे संसार वाचवणाऱ्या, अनेक विरोधांना झुगारून दारूबंदी चळवळ नेटाने चालवणाऱ्या पी.डी. पाटील सरांना बाबा आमटे आणि साधनाताई आमटे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
      या कार्यक्रमातील सत्कारमूर्तींच्या निवडी या केवळ त्या व्यक्तीच्या कार्यावर झाल्या आहेत. संस्था अर्ज मागवत नाही अथवा नामनिर्देशन करायलाही सांगत नाही. या गुणीजनांचे समाजात दिसणारे प्रतिबिंब खरे आहे का? याची खातरजमा संस्थेचे पदाधिकारी करतात. नंतर एकत्र बैठक घेतात आणि पुरस्कार जाहीर होतात. या शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व असाधारण आहे. आजही गुरूचे गुरूपण जपणाऱ्या या शिक्षकांना आदराने सलाम करणाऱ्या संस्थेचे मोठेपणही यातून दिसून आले. या समारंभात काही गुणी मुलींचाही सत्कार झाला.
      गुरूला गुरू म्हणून मोठेपण मिळते, ते शिष्याच्या कर्तृत्वावर. गुरूच्या मार्गदर्शनाखाली शिष्य मोठा झाला की गुरूची महती आपोआप वाढते. हे जाणणाऱ्या गुरूवर्य श्रीकांत नाईक सरांनी आणि त्यांच्या त्रिवेणी संस्थेच्या संवेदनशील मनाच्या अन्य सदस्यांनी, असाधारण यश संपादन करणाऱ्या सहा विद्यार्थिनींना बोलावले होते. यातील दोन मुलींनी दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा सन्मान प्राप्त केला होता. दोघींनी राज्य पातळीवर शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केले होते. या संपूर्ण समारंभातला माझ्या मनाला भावलेला सत्कार होता तो ऐश्वर्या सुतार हिचा.
दहावीच्या परीक्षेत आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या मुलींमध्ये ऐश्वर्या वेगळी होती. तिची निवड राष्ट्रीय पातळीवर तिने प्राप्त केलेल्या यशासाठी होती. दर वर्षी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर राष्ट्रीय पातळीवर विविध वयोगटासाठी लखनौ येथील संस्था निबंध स्पर्धा आयोजित करते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतरत्न बनलेल्या बाबासाहेबांच्या आयुष्यावर असणारी ही भव्य स्पर्धा दरवर्षी आयाजित केली जाते. देशभरातून अनेक लोक या स्पर्धेत भाग घेतात. शक्यतो या स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान पंतप्रधानांच्या हस्ते केला जातो. या स्पर्धेत माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळविणारी ऐश्वर्या सुतार ही कोल्हापूरची विद्यार्थिनी.
      ऐश्वर्याच‌्या वडीलाना ब्रेन ट्युमर झाला. त्यातचं ते वारले. त्यावेळी ती दुसरीत होती. वडिलांच्या उपचारासाठी वेळोवेळी तिच्या आईने कर्ज घेतले. ऐश्वर्याला लहानपणापासून वाचनाची आवड. दैनंदि वृत्तपत्र वाचायची तिला सवय लागलेली. मात्र घरच्या आर्थिक टंचाईमुळे घरात वृत्तपत्र घेणे बंद झाले. मुलीचा पेपर वाचनात वेळ वाया जा नये, असे आईला वाटायचे. मात्र आईला कळू न देता ऐश्वर्या गुपचूप शेजारी जाऊन वर्तमानपत्र वाचायची. असेच एक दिवस वर्तमानपत्र वाचत असताना ऐश्वर्याची नजर एका जाहिरातीवर गेली. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या लखनौ येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानने विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा जाहीर केली होती. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्यास रू.50,000/- चे पारितोषिक होते. स्पर्धेसाठी राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाबाबत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असा विषय होता.
      वडिलांच्या आजारणासाठी घेतलेले कर्ज फेडताना आणि दोघींचे कसेबसे भागवताना आईचे होणारे हाल ऐश्वर्या पाहात होती. आपण हे बक्षीस मिळवले तर आईच्या कष्टात आपली बक्षीसाची रक्कम खारीचा वाटा बनेल, हे तिने ओळखले. पारितोषिक मिळविण्यासाठी कष्ट घ्यायचे तिने ठरविले. राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा असल्याने कष्टही तसेच घ्यावे लागणार होते. हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच निबंध पाठवायचा होता. स्वत:साठी नाही तर आईला मदत व्हावी, या हेतूने हे पारितोषिक मिळवण्याचा ऐश्वर्याने निर्धार केला आणि ती कामाला लागली.
      शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या नावावर एकच पुस्तक मिळते. ऐश्वर्याने स्वतःसह सात मैत्रिणींच्या नावावर प्रत्येकी एक या प्रमाणे आठ पुस्तके मिळविली. पुस्तकांचे बारकाईने अध्ययन केले आणि त्यानंतर प्रथम 24 पानांचा मराठीतून निबंध तयार केला. या निबंधाचे नंतर हिंदीत भाषांतर केले आणि 'राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाबाबत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार' या विषयावरील आपले लेखन प्रतिष्ठानला विहित मुदतीत सादर केले.
      या निबंधाच्या परीक्षणासाठी परीक्षकांची निवड ही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समिती करते. ते या विषयातील आणि भाषेतील तज्ज्ञ असतात. त्यांच्यामार्फत या निबंधांची काटेकोर तपासणी केली जाते. निबंधातील मुद्द्यांना 50 गुण, मुद्द्यांच्या आकलनासाठी 20 गुण, विषयाची मांडणी, लेखन कौशल्य व सजावट  याला प्रत्येकी 10 गुण असे एकूण 100 गु होते. अशा कठोर परीक्षणासाठी ऐश्वर्याचा निबंध गेला. परीक्षण झाले आणि प्रथम ऐश्वर्याच्या शाळेत म्हणजेच प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या गर्ल्स हायस्कूलमध्ये दूरध्वनी आला. एवढा मोठा निबंध आणि एवढे प्रगल्भ विचार मांडणारी मुलगी खरंच नववीत शिकते का? याची खातरजमा करून घेतली जात होती, तीही पुन्हा-पुन्हा. शेवटी शाळेने विद्यालयाच्या संकेतस्थळावर माहिती तपासायला सांगितले. ती माहिती पाहून प्रतिष्ठानच्या अधिकाऱ्यांचे समाधान झाले.
      सर्वसाधारणपणे पंतप्रधान उपलब्ध असतील तर हा पारितोषिक वितरण कार्यक्रम होतो. अन्यथा बक्षीसाची रक्कम बँक खात्याची माहिती घेऊन खात्यावर जमा केली जाते. ऐश्वर्याने घेतलेल्या प्रामाणिक कष्टाचे चीज झाले. या वर्षी या कार्यक्रमाला पंतप्रधान उपलब्ध होते. त्यानुसार पुरस्कार विजेत्यांना कळविण्यासाठी प्रतिष्ठानच्या अधिकाऱ्यांनी घरी फोन केला. ऐश्वर्या त्यावेळी मावशीकडे गेली होती. ऐश्वर्याच्या आईने फोन उचलला आणि ज्या मातेला आर्थिक सहाय्य व्हावे या उद्देशाने ऐश्वर्याने एवढे कष्ट घेतले होते, स्पर्धेत उतरली होती, त्या तिच्या आईला ऐश्वर्याला पुरस्कार मिळाल्याची ही बातमी समजली. कोण आनंद झाला त्या मातेला! त्याच आनंदाच्या भरात तिने अनवाणी पायाने बहिणीच्या घराकडे ऐश्वर्याला हाका मारतच धाव घेतली.
ईच्या त्या हाका ऐकून काही अनिष्ट घडले की काय, अशी शंका ऐश्वर्याला आली. मात्र आईच्या धावत येण्याचे कारण समजले तेव्हा त्या मायलेकीच्या डोळ‌्यातून घळाघळा आनंदाश्रू वाहू लागले. मातेच्या प्रयत्नाला हातभार लावण्याच्या उद्देशाने घेतलेले कष्ट सार्थकी लागले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला. या यशानंतर कोल्हापूर परिसरातील काही संस्थांनी तिचे कौतुक केले. श्रीकांत नाईक सर आणि उत्तूरच्या त्यांच्या सहकाऱ्यांनाही या मुलीचे कौतुक करावेसे वाटले आणि गुरूपौर्णिमेला ऐश्वर्याचा सत्कार उत्तूर येथे झाला.
      या कार्यक्रमात ऐश्वर्याने आपले मनोगत व्यक्त केले. तिच्या बोलण्यातून मला तिची कहाणी थोडीफार समजली. मात्र जे काही समजले ते अस्वस्थ करून गेले,मनाला स्पर्शून गेले.    डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकले. अनंत संकटांचा सामना करत ते भारतीय घटनेचे शिल्पकार बनले. ऐश्वर्यानेही स्पर्धेत उतरताना आपल्या कुटुंबाच्या प्रतिकूल परिस्थितीची दाहकता कमी करण्याचा हेतू ठेवला. त्यासाठी अपार कष्ट घेतले. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर कोल्हापूरच्या लेकीने राष्ट्रीय पातळीवरील यश संपाद केले. बाबासाहेबांच्या कष्टाचा याखेरीज दुसरा अन्वयार्थ तरी काय?

७ टिप्पण्या:

 1. मनाला भिडणारा...एश्वरायचा प्रवास ., आपले लिखाण्

  उत्तर द्याहटवा
 2. To whom to salute.! whether to "Triveni" for selecting such gems from society and felicitating them without use of traditional method of Nominations.
  Aiahrwya! oh what a brilliant and painstaking champ! her efforts, sense of family responsibility and thorough understanding of Dr. Ambedkar's contribution for uplifting of downtrodden. Her writing skills. I salute.
  Congratulation Aishwarya! Triveni!
  But i must salute the author of the blog narrating all these in lucid and emotional way and touching to the hearts of the readers.
  The triveni- Triveni- Aishwarya-Dr v.n. shinde-congrats and thanks on the behalf of peoples lnown and unknown.
  Prin. Kurlapkar.

  उत्तर द्याहटवा