__________________________________________________
मराठी साहित्यामध्ये
विज्ञान साहित्याचा प्रवाह, हा अगदी अलिकडचा असल्याचे मानले जाते. असे असले तरी, मराठी साहित्यात विज्ञान नव्हतेच असे नाही. विवेकी समाज घडवण्यासाठी
अनेक संतानी आपल्या साहित्यात, विशेषत: काव्यरचनांमध्ये परखडपणे सत्य सांगून समाजप्रबोधन
करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केल्याचे दिसून येते. निखळ सत्य अनेकांच्या पचनी पडतेच
असेही नाही. असे निखळ सत्य सांगणाऱ्यांना अनेकदा धर्मसत्ता, राजसत्ता आणि काहीवेळा
समाजाच्याही रोषाला बळी पडावे लागले. तरीही विज्ञान सांगण्याचे प्रयत्न सातत्याने होत
राहिले आहेत. महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला संत परंपरा मोठी आहे. अनेक संतांनी आपल्या
साहित्यातून समाज प्रबोधन करताना विज्ञान समाजासमोर मांडले. याचा लौकिकार्थाने विज्ञान
साहित्यात समावेश होत नाही, हे खरे. मात्र हे विज्ञान साहित्यच आहे, असे प्रामाणिकपणे
म्हणावेसे वाटते कारण निखळ, निरपेक्ष सत्य संतांनी अनेक रचनामध्ये मांडले आहे.
विज्ञान म्हणजे ‘सुसंघटीत विशेष ज्ञान’ अशी व्याख्या सर्वमान्य आहे. मात्र मराठी भाषेमध्ये ‘विज्ञान’ आणि ‘शास्त्र’ असे दोन स्वतंत्र शब्द आहेत आणि या शब्दांचे अर्थ भिन्न आहेत. विज्ञान हे शास्त्रच असते, मात्र प्रत्येक शास्त्र हे विज्ञान असेलच असे नाही. शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाची नियमावर आधारीत केलेली मांडणी होय. त्यामुळे राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भाषाशास्त्र अशी अनेक शास्त्रे तयार होतात. विज्ञानातही जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अशी अनेक शास्त्रे आहेत, अगदी अलिकडील या यादीमध्ये समाविष्ट झाले ते माहिती-तंत्रज्ञान शास्त्र. मात्र शास्त्रामधील नियम, ज्यावर आधारीत एखाद्या विषयाची मांडणी केलेली असते, ते स्थल, काल, व्यक्ती निरपेक्ष असतीलच, असे नाही. जेव्हा एखाद्या विषयाची मांडणी स्थल, काल, व्यक्ती निरपेक्ष नियमावर आधारीत करण्यात येते, तेव्हा ते शास्त्र विज्ञान मानले जाते. म्हणूनच विज्ञान हे शास्त्र असते, मात्र प्रत्येक शास्त्र हे विज्ञान असतेच, असे नाही. विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे आज परवलीचे शब्द बनले आहेत.
आज वैज्ञानिक
दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये यावा, यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसतात. वैज्ञानिक
दृष्टिकोन बाळगणारी व्यक्ती ही स्वत: विचार करत असते आणि कालौघात ती विवेकी बनते. असा
समाज निर्माण व्हावा, हे प्रत्येक राष्ट्राचे उद्दिष्ट असते. त्याद्ष्टिने मोठ्या प्रमाणात
प्रयत्न होताना दिसतात. शासन पातळीवरील प्रयत्न, शालेय अभ्यासक्रमांचे उद्दिष्ट यात
याचा समावेश आवर्जून असतो. त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवर अनेक साहित्यिक
यासाठी आपले आयुष्य वेचतात. विज्ञान जनमानसात रूजविण्यासाठी लेखन करतात.
संत साहित्य समाज
प्रबोधनासाठी आणि समाजाचा गाडा सुरळीत चालावा, यासाठी लिहिले गेले. समाजातून अनिष्ट
प्रथा, अंधश्रद्धा दूर व्हाव्यात यासाठी हा प्रयत्न असतो. त्यातून समाजापुढे निखळ सत्य
मांडण्याचे प्रयत्न करण्यात आले. यामध्ये महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात मांडलेले
निसर्गविषयक विचार, संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले पसायदान, संत तुकारामांचे रोकडे
बोल या सर्वांचा समावेश करावा लागेल. मात्र सतराव्या शतकानंतर विशेषत: पहिल्या औद्योगिक
क्रांतीनंतर विज्ञान आणि शास्त्रे वेगळी झाली. तोपर्यंत निसर्गविज्ञानांतर्गत विज्ञान
आणि शास्त्रे यांचा अभ्यास होत असे. त्यामुळेच पाश्चात्य राष्ट्रांमध्ये अनेक संशोधक
हे तत्वज्ञान, कायदा किंवा आज ज्यांचा समावेश शास्त्रामध्ये होतो, त्या विषयांचा अभ्यास
करणारे असल्याचे दिसून येते. तेथून पुढे मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने
होऊ लागली आणि त्याचे प्रतिबिंब साहित्यातही पडू लागले. शोधाचे प्रतिबिंब जसे साहित्यात
पडत होते, त्यासोबत भविष्यात काय घडू शकते, याचाही वेध अनेक लेखक, साहित्यिक घेऊ लागले.
उपलब्ध ज्ञानाच्या आधारे भविष्यातील शोधांचा वेध घेणारे साहित्य प्रामुख्याने विज्ञान
साहित्य मानले जाऊ लागले.
मराठी विश्वकोशानुसार
‘विज्ञान हे ज्याच्या आशयाचे अविभाज्य अधिष्ठान आहे, अशा साहित्यकृती या विज्ञान साहित्यामध्ये
येतात’. त्यातून विज्ञान साहित्यामध्ये निखळ विज्ञान संशोधनाचे लोकांना आकलन होईल,
अशा भाषेमध्ये लेखन, ज्यामध्ये माहितीपर लेखन, वैज्ञानिक तथ्यांना कथा किंवा कादंबरीच्या
रूपात सादर करणे आणि विज्ञान काव्यरूपांमध्ये मांडणे असे प्रमुख प्रकार निर्माण झाले.
यातील संशोधनपर लेखनाचा वाचकवर्ग हा त्या-त्या विषयातील संशोधकांचा असतो. हा वर्ग फारच
मर्यादित असतो. ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकरही या लेखनाला विज्ञान
साहित्य मानत नाहीत. त्यांच्या मते, ‘जे साहित्य विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी
केले जाते ते विज्ञान साहित्य असते.’ माहितीपर लेखनाचा वाचक वर्ग, हा जिज्ञासू
आणि ज्ञानपिपासू असतो. एखाद्या विषयातील माहिती मिळावी, ज्ञान मिळावे, यासाठी त्याचे
वाचन असते. हा वर्ग प्रामुख्याने विज्ञान विषय प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च शिक्षणामध्ये
अध्यापन करणारा किंवा शिकणाऱ्यांचा असतो. केवळ माहिती हवी, म्हणून वाचणारा समाजातील
इतर घटकातील काही वाचकांचा गट यामध्ये समाविष्ट असतो. त्यांची संख्या अत्यल्प असते.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या प्रकारातील लेखन बहुतांश वेळा लालित्यपूर्ण असतेच,
असे नाही.नवख्या वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यामुळे यात असेलच असे नाही. तिसऱ्या
प्रकारात कथा आणि कादंबरी येते. यामध्येही विज्ञान, वैज्ञानिक तत्वे यांना मध्यवर्ती
घेऊन जे लेखन होते, त्याचा समावेश विज्ञान कथा आणि कादंबरी यामध्ये होतो. हा साहित्यातील
अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. यामध्ये विज्ञानाबरोबर भाषिक कौशल्ये असणाऱ्या व्यक्तीकडून
हे लेखन झाले तर या लेखनाचा वाचक वर्ग मोठा व्यापक बनतो. मात्र याला विज्ञान कादंबरी
किंवा कथा संग्रह असे बिरूद लावले की सामान्य वाचक हातातील पुस्तक खाली ठेवतो. यामागे
महत्त्वाचे कारण म्हणजे शालेय जीवनात मोठ्या प्रमाणात गणित आणि विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांच्या
मनात निर्माण होत असलेली नावड किंवा भीती आहे. अशी नावड होण्यामागे विज्ञान सुलभ आणि
रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत न पोहोचणे हे आहे. विज्ञान कथा रंजक असतात आणि इतर
कथा कादंबऱ्याप्रमाणे दहावीनंतर विज्ञानाचा अभ्यास न केलेल्या वाचकाचेही रंजन करू शकतात,
असे अनेकांना विज्ञान साहित्याची प्रत्यक्षात चव न चाखणाऱ्या वाचकांना वाटत असते. जीएंच्या
गुढकथा समजून घ्यायला तो तयार असतो, मात्र ‘राफिणू’ विज्ञान कादंबरी आहे, हे लक्षात
येताच तो ती बाजूला ठेवतो. विज्ञान साहित्य लोकप्रिय करण्यामध्ये मराठी भाषेतील समिक्षकांनीही
जो थोडाफार हातभार लावला आहे तो कथा आणि कादंबऱ्यांसाठीच. इतर लेखनाच्या वाटेला ते
जाताना दिसत नाहीत.
इतर विज्ञान लेख्ननातही रंजकता असते. माहितीपर लेखनही ललितबंधापेक्षा कोठेही कमी असू शकत नाही, असे कदाचित मराठी साहित्यातील समिक्षकांना वाटत नसावे. त्यामुळे विज्ञान साहित्यात कथा, कादंबरी आणि काही प्रमाणात कविता येथपर्यंतच समीक्षक थांबतात. जरी विज्ञान साहित्यिकांना इतर साहित्यिकांप्रमाणे मान, सन्मान आणि धन मिळत नसले तरी अनेक विज्ञान लेखक तपस्व्याप्रमाणे या क्षेत्रात कार्य करत असतात. कदाचित त्यांना यातून आनंद मिळत असावा. म्हणूनच लेखन, त्यांची जिविका बनत असावे. यातील अशाच दोन प्रकारात, म्हणजेच विज्ञान कथा आणि कादंबरी लेखनातून आपली जिविका शोधत, इतरांना त्यांच्या जिविकेचे साधन उपलब्ध करून देणारे लेखक म्हणजे संजय ढोले.
तसे कथा किंवा
कादंबरी लिहिणे माहितीपर लेखनापेक्षा निश्चितच आधिक वेळ घेणारे तसेच कौशल्याचे काम
आहे. अनेकांच्या मनात कथेचे बीज येऊ शकते. येतेही. विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून माझ्यासारख्यालाही
असे कथाबीज सापडते. मात्र त्या बिजाला रूजण्यासाठी योग्य मशागत केलेल्या जमिनीत पेरणे,
त्याच्या वाढीसाठी योग्य वेळी, योग्य पद्धतीने पाणी देणे, तणापासून त्याचे संरक्षण
करणे आवश्यक असते. त्यानंतरच त्या बिजाचे रूपांतर रोपात आणि नंतर झाडात होते. माहितीपर
लेखनात संकल्पना समजणे आणि ती योग्य पद्धतीने लोकांना समजेल, अशा भाषेत मांडणे आवश्यक
असते. या कौशल्यांची कथा लेखनासाठी गरज असतेच. मात्र त्याहीपेक्षा कल्पनाविस्तार करणे
आणि संपूर्ण घटनाक्रम योग्य गुंफणे, हे आवश्यक असते. त्याखेरीज हे लेखन पूर्णत्वास
जात नाही. या सर्व वैशिष्ट्यांचे दर्शन डॉ. संजय ढोले यांच्या लेखनामध्ये घडते.
संजय ढोले हे माझ्यापेक्षा जन्माने तीन वर्षांनी ज्येष्ठ आहेत. माझ्यानंतर कदाचित त्यांनी लेखनाला सुरुवात केली असावी. मात्र पुस्तक लेखनामध्ये त्यांची ज्येष्ठता १७ वर्षे भरते. मी वृत्तपत्रीय लेखन करत होतो, त्याच काळात त्यांच्या कथा नियतकालिकात प्रसिद्ध होत होत्या. या कथा वाचल्याही जात होत्या. मात्र तो काळ जयंत नारळीकरांच्यासारख्या वलयांकीत संशोधकाच्या कौतुकास्पद लेखनाने भारावलेला काळ होता. संजय ढोले सरांनी कोणाचे लक्ष आहे किंवा नाही याचा विचार न करता आपले लेखन सुरू ठेवले. हळूहळू त्यातील गुणवत्तेने एकेकाला त्यांच्याकडे, त्यांच्या लेखनातील गुणवत्तेने लक्ष देण्यास भाग पाडले. ते लिहित गेले आणि त्यातून ते लवकरच डझनभर पुस्तकांचे लेखक बनले. पंडित विद्यासागर, शंकर सारडा यांच्यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप त्यांची ऊर्जा बनली असावी आणि ते लिहित राहिले असावेत.
संजय ढोले यांचा
विषय लौकिकार्थाने भौतिकशास्त्र आहे. अनेक भौतिकशास्त्राचे विद्यार्थी विज्ञानप्रसाराच्या
क्षेत्रात कार्यरत आहेत. भौतिकशास्त्राचा मनापासून अभ्यास करणाऱ्यांना कल्पनाविश्वात
जाण्याची सवय लावून घ्यावीच लागते, तरच भौतिकशास्त्र खऱ्या अर्थाने समजून घेणे शक्य
होते. कदाचित भौतिकशास्त्राचे जास्त अभ्यासक विज्ञान प्रसारकार्यात असण्यामागे हे एक
कारण असावे. उदाहरणार्थ- पदार्थवानशास्त्राच्या विद्यार्थ्याला अणू, अणूतील इलेक्ट्रॉनच्या
कक्षा, विद्युत धारा वाहत असताना इलेक्ट्रॉनचा विरूद्ध दिशेने जाणारा प्रवाह इत्यादी
कल्पनेच्या विश्वात पहावे लागते. दुसरे एक कारण म्हणजे शालेय जीवनात ज्या ग्रह ताऱ्यांचे
आकर्षण असते, त्यांचा अभ्यासही भौतिकशास्त्रातच होतो. विद्यार्थ्यांचे बहुतांश प्रश्न
हे याच विषयांवर असतात. विद्यार्थ्यांच्या बालसुलभ प्रश्नांची उत्तरे देताना या विषयाचे
अभ्यासक यामध्ये रममाण होत, पुढे या सवयीचे ते गुलाम होत असावेत. त्यामुळे विज्ञानप्रसार
करण्याची त्यांना आवड निर्माण होत असावी.
असे असले तरी, संजय ढोले यांच्या लेखनामध्ये भौतिकशास्त्र विषयाची छाप आहे, असे झालेले नाही. त्यांचे लेखन विज्ञानातील सर्वच क्षेत्रात प्रभावी मुशाफिरी करताना दिसते. त्यांनी वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, अंतराळविश्व, रसायनशास्त्र यामधील अनेक तत्वांना कथेमध्ये बांधलेले दिसून येते. यामध्ये अनेक पोलिस शोध कथांचा समावेश आहे. संशोधन, संशोधक, संशोधक विद्यार्थी हे सर्व येतेच. मात्र त्यासोबत समाजातील अनेक घटना प्रसंग, विविध क्षेत्रातील कार्यपद्धती या सर्वांचा समावेश होतो. डॉ. ढोले ज्या विषयाला हात घालतात, त्या क्षेत्रात ते कार्यरत असावेत, असे वाटते. अत्यंत साध्या, मृदू भाषेत त्यांचे लेखन ओघवत्या शैलीत पुढे सरकत राहते. या लेखाच्या निमित्ताने त्यांच्या प्रेमाचा रेणू (२००७), अश्मजीव (२०१०), अंतराळातील मृत्यू (२०१५), संकरित (२०१५), डिंभक (२०२९), खुजाबा (२०२२), हे सहा कथासंग्रह आणि प्लँटोन (२०२२) आणि राफिणू (२०२३) या दोन कादंबऱ्यांचे वाचन झाले. यातील अनेक कथा पूर्वीच वाचल्या होत्या. मात्र त्या पुन्हा वाचताना पूर्वीचाच आनंद लाभला. हीच त्यांच्या लेखनाची खरी ताकत आहे. वैज्ञानिक आशय, जो त्या कथेचा गाभा असतो, तो मांडत असताना, ते सूक्ष्मतिसुक्ष्म तपशिल बारकाईने देतात. त्यांच्या बहुतांश कथा दिर्घ आहेत. मात्र वाचकाला हा विस्तार जाणूनबुजून किंवा ओढूनताणून केला असे कोठेही वाटत नाही. यातच संजय ढोले यांच्यातील लेखकाचे सामर्थ्य सिद्ध होते.
काही कथा वाचताना
खरंच असे घडू शकते का, असा प्रश्न पडतो. मात्र वाचकाचे आत्मसमाधान सकारात्मक उत्तरावर
होते. विज्ञान कथा आकलनासाठी थोडी वैज्ञानिक पार्श्वभूमी असणे आवश्यक असते.
मात्र अशा कथा क्वचित आहेत. बहुतांश कथा वाचताना त्यामध्ये निखळ वाचनानंद मिळत राहतो,
त्याचसोबत विज्ञान विषयाचा अभ्यास न केलेल्यांना निदान असेही घडू शकते, या प्रश्नासोबत
काही तास, काही दिवस विचार करायला भाग पाडते. त्यांनी एकाही कथेचा अतिशयोक्त केलेला
नाही. तो मोह त्यांनी आवर्जून टाळला आहे. त्यांच्या लेखनाचे आकलन करून घेताना काही
मुद्दे ठळकपणे लक्षात घ्यावे लागतात.
तपास कथा किंवा पोलिस कथा-
डॉ. संजय ढोले यांच्या लेखनामध्ये अनेक पोलिस कथा आहेत. या कथा वाचताना अरविंद
इनामदार यांनी ‘दक्षता’ मासिकात लिहिलेल्या तपास कथा आठवाव्यात इतक्या त्या जिवंत झाल्या
आहेत. पोलिस कथामध्ये केवळ गुन्हा आणि प्रश्नोत्तरे यांचा समावेश असून चालत नाही. गुन्ह्याचे
ठिकाण, गुन्ह्यामागचे कारण, गुन्हेगाराची पार्श्वभूमी, त्याच्याशी निगडीत इतर पात्रे,
त्यांचे तपशील व संवाद, या सर्वांचा समावेश होतो. याची तपशिलवार माहिती देण्यासाठी
तुमचे निरीक्षण, आकलन आणि स्मरण या तिन्ही गोष्टींचा सुरेल संगम घडावा लागतो. अन्यथा
वर्णनात सुसंगती आणि गेयता येत नाही. मात्र ढोले यांच्या कथांमध्ये हे सर्व काही दिसून
येते. हे सर्व साध्य करत असताना वैज्ञानिक सूत्र, बीज ते खूबीने पेरतात किंवा मिसळतात.
यातील अपहरण, आगंतुक, साक्षीदार (सर्व खुजाबा), अनामिक प्रयोग, चिरूट, आश्रय, आक्रोश,
स्फोट (सर्व प्रेमाचा रेणू), सोनियाची खाण, पिंजक, सुगावा (सर्व डिंभक),
मोहीम फत्ते, संकरित, विचारवहन (सर्व संकरित), निरपराध, कबुली जबाब, अस्त्र, न्याय (सर्व अश्मजीव) अशा पोलिस तपासकथा त्यांनी लिहिल्या
आहेत. या कथामध्ये असणारा गुन्ह्याचा, गुन्ह्याच्या जागेचा तपशील अगदी पोलिस तपासाप्रमाणे
दिसून येतो. पोलिस कथांचा एक वाचक वर्ग आहे. त्यातही किशोरवयीन युवकांमध्ये पोलिस कथांचा
वाचक असतोच. त्यामुळे युवकांमध्ये पोलिस कथांच्या माध्यमातून विज्ञानाची बीजे पेरणे,
विज्ञानाची आवड निर्माण करणे अत्यंत सोपे होते. त्यामुळे पोलिस तपासाच्या माध्यमातून
विज्ञानकथा लिहिणे हे डॉ. ढोले यांचे अभिनंदनीय कार्य आहे.
सर्व पोलिस कथांमध्ये
ते गुन्ह्याची पूर्ण उकल झाल्याचे आवर्जून दाखवतात. यातून गुन्हा हा कधीच लपत नाही,
हा संदेश वाचकाच्या मनावर कोरण्यात डॉ. ढोले यशस्वी होतात. अत्यंत हुशारीने केलेला
गुन्हाही उघडकीस कसा येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘प्रेमाचा रेणू’ या कथासंग्रहातील
‘चिरूट’ ही कथा आहे. या कथेतील नायक डासांचा हल्ला घडवून खून करतो. मात्र तेथे सापडलेल्या
एका चिरूटाच्या तुकड्यावरून पोलिस, शास्त्रज्ञ असणाऱ्या डॉ. किरण पाटील यांच्यापर्यंत
पोहोचतात. हे वाचताना ही कथा एखाद्या पोलिस अधिकाऱ्याच्या तोंडून ऐकल्याचा आनंद वाचकाला
देण्यात ते यशस्वी होतात. त्याचप्रमाणे अनेकदा गुन्ह्याची चाहूल लागत असते. तो आवाज
ओळखण्यात कमी पडणारा बळी जातो. ‘आक्रोश’ या कथेत अशा प्रकारे धोक्याची चाहूल लागूनही डॉ. तुकाराम
सावध होत नाहीत आणि त्यांचा बळी जातो. पोलिस कथासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींसह
डॉ. ढोले विज्ञान कथा लिहितात. या सर्व वैशिष्ट्यामुळे डॉ. ढोले यांच्या कथा सर्व प्रकारच्या
वाचकांना आवडाव्यात अशा आहेत.
पात्र निवड आणि त्यांच्या
नावातून जवळीक -
डॉ. संजय ढोले यांच्या बहुतांश कथांची सुरुवात महाराष्ट्रातील एखाद्या गावात, शहरात होते. कथातील बहुतांश पात्रांची नावे महाराष्ट्रीय आहेत. त्यातही बहुजन, अभिजन असा भेदभाव न करता, ते सर्वसमावेशकता राखतात. हे तत्व ते कथा आणि कादंबरी दोन्ही प्रकारच्या रचनामध्ये वापरतात. आजही अनेक विज्ञान कथा लेखक आपल्या पात्रांची नावे विदेशी ठेवताना आढळतात. अनेक कथांमध्ये परिसर, प्रयोगशाळा, संशोधन संस्था विदेशातील दाखवतात. त्यामुळे वाचकाला अशा कथा, कादंबऱ्या वाचत असताना, आपण कधीही न पाहिलेल्या परिसराशी एकरूप होणे कठीण जाते. डॉ. ढोले यांचे लेखन वाचताना मात्र खानदेशात कधीही न गेलेला वाचकही खानदेश शब्द वाचताच त्याच्याशी सहज जोडला जातो. निदान त्याने महाराष्ट्राच्या भूगोलात खानदेश कोठे आहे, हे समजून घेतलेले असते. या कथातील वातावरण हे वाचकांच्या आजूबाजूच्या परिसरासारखे असते. त्यामुळे वाचकाला कथेत प्रवेश करणे सोपे जाते. उदाहरणादाखल ‘राफिणू’ या कादंबरीमध्ये त्यांनी नायकाचे नाव राजू फिरके ठेवले आहे. त्याचा मामा किरण हाही वाचकाशी जोडला जातो. या कादंबरीतील कनसाई गाव, गावाचे केलेले वर्णन हे साधारणपणे महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्याला लागू पडते. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र त्यामध्ये नियुक्त डॉक्टरची बेफिकीर वृत्ती, त्याचठिकाणी काम करणाऱ्या परिचारिकेचा सेवाभाव हे सर्व अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वातावरणाशी जुळणारे आहे.
या कादंबरीमध्ये
शाळेचे केलेले वर्णन हे बहुतांश माध्यमिक शाळाना लागू पडते. शिक्षकांमध्ये दिलेला अभ्यासक्रम
कसाबसा पूर्ण करणारे, थोडे प्रश्न विचारले तरी वैतागणारे काही शिक्षक प्रत्येक शाळेमध्ये
असतातच. अशा शिक्षकांनी प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर राग काढणे, हे प्रत्येक
वाचकाच्या परिचयाचे असते. अनेकांचा तो स्वानुभव असतो. संकटसमयी आपले कर्तव्य विसरणारे
डॉक्टरही कोठे ना कोठे भेटलेले असतात. त्यामुळे वाचक कादंबरी वाचायला सुरुवात करताच
कादंबरीतील वातावरणाशी जोडला जातो. स्वभावधर्म, परिसर, पात्रांची नावे, गावांची नावे
सर्व काही परिचित असते. याच पद्धतीने ते ‘प्लँटोन’ या कादंबरीमध्ये किंवा सर्व कथासंग्रहामध्ये
पात्र, परिसर रचना करतात.
धोक्याची जाणीव करून देणारे
लेखन-
आज विज्ञान आणि
तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून मानवाच्या मनात आपण निसर्गाचे एक घटक आहोत ही भावना नष्ट
होऊन आपण या निसर्गाचे मालक असल्याची भावना वाढीस लागली आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती आपल्याला हवी तेव्हा, हवी तशी वापरण्याकडे मानवाचा कल वाढत
चालला आहे. डॉली नावाची पहिली मेंढी जन्माला घालण्यापूर्वी मानवाने निसर्गात किती हस्तक्षेप
करावा, यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. आजही वैज्ञानिक जगतामध्ये या विषयावर
चर्चा होते, मात्र ती जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर
मानवी सुखासाठी करण्याबद्दल ढोले सरांचा आक्षेप नाही, मात्र हा वापर अतिरेकी झाला तर
त्याचे दूरगामी परिणाम होतात आणि ते दुरूस्त करणे अवघड किंवा अशक्य होते. त्यास अनुसरून
कथेचा शेवट करणे समाजाची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाचे असते. त्याबाबत संजय ढोले दक्ष
असतात. नेहमीच कथेमध्ये नायकाचा विजय दाखवणे वाचकाला आवडते. मात्र ढोले सरांनी निसर्गात
हस्तक्षेप होऊन नैसर्गिक प्रक्रिया बदलली जाऊ शकते, अशा अनेक कथांमध्ये नायकांचे मरण
दाखवले आहे. कदाचित यामुळे त्यांच्या कथांचा शेवट नकारात्मक असतो, अशी टिका काही लोक
करतात. मात्र विज्ञान कथाकाराला हे भान राखणे खूप गरजेचे असते.
मागील काही दिवसापासून इलान मस्क नावाचा एक धनाढ्य अशा प्रकारचा निसर्गात ढवळाढवळ करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. त्याचा एक प्रयोग आणि ढोले यांची एक कथा यामध्ये खूप जवळीक आढळून येते. त्याचा विस्ताराने उल्लेख करणे आवश्यक वाटते. प्रेमाचा रेणू या डॉ. ढोले यांच्या कथा संग्रहातील पहिलीच कथा ‘अनामिक प्रयोग’ ही आहे. या कथेमध्ये थोर संशोधक डॉ. परांजपे यांची हत्या यमाजी मालुसरे नावाची सामान्य व्यक्ती करते. अनेक लोकांनी हे पाहिलेले असते. मात्र तपासामध्ये मालुसरे यांने डॉ. परांजपे यांचा खून का केला असावा, हे पोलिसांना समजत नाही. गुन्ह्यामागचे कारण आढळत नाही. पुढे याचा तपास करताना मालुसरेच्या डोक्यात एक इलेक्ट्रोड बसवून त्याचा मेंदू बाहेरून नियंत्रीत करून डॉ. परांजपे यांचा खून घडवून आणल्याचे स्पष्ट होते. डॉ. परांजपे आपल्यापेक्षा प्रत्येक क्षेत्रात श्रेष्ठ ठरत असल्याने डॉ. काळदाते या त्यांच्याच सहकाऱ्याने हे हत्याकांड घडवून आणलेले असते. यामध्ये डॉ. काळदाते यांची पोलिस आधिकाऱ्याकडून हत्या होते.
या कथेमध्ये मालुसरेंच्या डोक्यात इलेक्ट्रोड बसवून मेंदूवर बाह्य नियंत्रण मिळवले
आहे. ही त्यांची कथा २००७ साली प्रकाशीत झालेल्या कथा संग्रहात आहे. २०२३ मध्ये इलान
मस्क यांनी काही माकडांच्या डोक्यात चीप बसवून त्यांच्या मेंदूवर नियंत्रण मिळवले.
या माकडातील एक माकड संगणकावर टंकलेखन करताना, तर एक माकड संगणकावर खेळ खेळत होते.
याचे व्हिडिओ बनवून ते प्रसृत करण्यात आले. यानंतर मी पुण्यनगरी दैनिकातील माझ्या सदरात
‘मस्कची माकडचेष्टा’ या शिर्षकाचा लेख २०२३ मध्ये लिहिला होता. यामध्ये मेंदूवर असे
बाह्य नियंत्रण मिळवल्यास एखाद्या सुसंस्कृत सज्जन, पापभिरू मानवाच्या हातून खून घडवला
जाऊ शकते, असे लिहिले होते. मस्क हे मात्र यामुळे अपघाताने एखादा अवयव निष्क्रीय झालेल्या
मानवाच्या अपंगत्वावर यातून मात करता येईल, असे सांगत होते. मात्र ज्यावेळी माकडाचा
मेंदू असा नियंत्रीत करता येणे शक्य होते, तेव्हा त्याचा चांगल्या आणि वाईट दोन्ही
कारणासाठी उपयोग होऊ शकतोच. मस्क यांनी ज्या माकडांच्या डोक्यात चीप बसवली होती ती
सर्व माकडे मरण पावली. त्यामुळे विज्ञान कथा लेखकांने एखाद्या विज्ञान तत्वाला धरून
कथेची मांडणी करताना समाज भान ठेऊन कथेमध्ये नायकाचा प्रसंगी अंत दाखवणे, तो शोध नायकाबरोबर
संपला, असा शेवट करणे, हे लेखकाचे सामाजिक भान जागे असल्याचे दाखवतात. डॉ. ढोले यांचे
समग्र लेखन वाचत असताना, हे पदोपदी जाणवते. विज्ञान संकल्पनांची मानवी जीवनाशी सांगड
घालताना ती सुसंगत, समाजव्यवस्था जपणारी, नैतिक मूल्ये जपणारी अशी ठेवण्याकडे डॉ. संजय
ढोले यांचा कल दिसून येतो.
नकारात्मक नव्हे तर समाजभान
जपणारे लेखन -
डॉ. ढोले यांच्या लेखनावर ते नकारात्मक असल्याचा अनेकजन आरोप करत असतात. मात्र त्यांचे विज्ञान कथा-कादंबरी लेखन हे कोठेही नकारात्मक नाही. वैज्ञानिक सत्य, सूत्र वाचकाच्या गळी उतरवाताना ते कथा किंवा कादंबरीचे गोड आवरण घेतात. यामध्ये कथा किंवा कादंबरी लेखन म्हटले की नायक येतो. नायकांने कोणतीही गोष्ट केली तर ती माफ, अशी एक समाजधारणा असते. मात्र निसर्गात अवाजवी हस्तक्षेप करणारी घटना, शोध कथेचे सूत्र असल्यास, किंवा नायक मानवहिताच्या समाजविरोधी कृत्यात सहभागी होत असल्याचे कथेमध्ये येत असल्यास ते प्रसंगी नायकाचा मृत्यू दाखवतात. ‘अघटीत’ ही अश्मजीव या कथासंग्रहातील कथा यादृष्टीने महत्त्वाची वाटते. प्रत्येकाला आपण अमर व्हावे, असे वाटते. कधी मरूच नये, असे वाटते. शास्त्रज्ञही याला अपवाद असण्याचे कारण नाही. डॉ. गजानन बारलिंगे हे मृत्यूनंतर जिवंत होण्याचे तंत्र शोधतात. ते अनेकांना असे जिवंत करतात. मात्र अशा पुन्हा जगू लागलेल्या या लोकांना जगण्याचा कंटाळा आला आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या डॉ. सुशांत आणि संजिवनीला पुन्हा मरण येणारे तंत्र शोधण्याची जबाबदारी देतात.
तसेच ‘खुजाबा’ या कथेमध्ये ते संशोधकाने तयार केलेला खुजाबाच निर्मात्याचा जीव
घेताना दिसतो. ‘अंधार गुणिले अंधार’ कथेमध्ये सशक्त डिंभके दहशतवाद्याना विकणारे डॉ.
खराटे आत्महत्या करतात. आक्रोश कथेमध्ये कोळ्यांचा वापर करून सशक्त धागे तयार करतात.
मात्र तो प्रयोग अयशस्वी होतो. नंतर वनस्पतीवर प्रयोग करून ते धागे बनवतात. मात्र शेतातील
फळे त्यांच्यावर हल्ला करतात आणि त्यात त्यांचे निधन होते. ‘प्रेमाचा रेणू या कथेमध्ये
ते प्रेमभावना निर्माण करणारे रसायन शोधले जाते. त्याचा यशस्वी वापरही केला जातो. मात्र
पुढे तेच सातत्य टिकवले जात नाही. त्या जोडप्याचा घटस्फोट होतो.
त्यामुळे डॉ. ढोले यांचे लेखन नकारात्मक असल्याचे काही समिक्षकांचे असणारे मत बरोबर
नाही. याउलट त्यांचे लेखन हे समाजहित पाहणारे, वाचकाला योग्य दृष्टी देणारे आहे. निसर्गात
अवाजवी हस्तक्षेप करू नये. निसर्गाला त्याचे काम करू द्यावे, प्रसंगी मानवी हीत असणारी
गोष्टही निसर्गासाठी घातक असेल तर ती टाळली गेली पाहिजे, असा संदेश देणे हे जागरूक
लेखकाचे लक्षण आहे. कोळी, वटवाघूळ अशा कथांमध्ये ते प्राण्यांचा उपयोग मानवी हितासाठी
करण्याचा प्रयत्न दाखवत असताना अखेर तो शोध समाजासमोर येणार नाही, याची दक्षता घेताना
दिसतात, ते यामुळेच. त्याही पलिकडे त्यांच्या दोन्ही कादंबऱ्यांचा शेवट हा सुखान्त
आहे.
कथांचे विषय-
डॉ. ढोले विज्ञानमय झालेले व्यक्तिमत्व आहे. त्यांना विज्ञानातील सर्व शाखा मान्य
आहेत. अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आंतरविद्याशाखीय व बहुविद्याशाखीय अभ्यासास
प्राधान्य दिलेले आहे. संशोधन अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था बहुसंस्थीय संशोधन प्रकल्पानाच
अर्थसहाय्य करू लागल्या आहेत. डॉ. ढोले यांचे संपूर्ण लेखन या विचारसरणीत चपखल बसते.
त्यांनी विज्ञान कथांचे विषय निवडताना अंतराळ (अज्ञात, संकेत, अनाहुत, अद्भूत प्रवास,
अंतराळातील मृत्यू, वलय, प्रतिघटना, पृथ्वीचा दूत, दुर्गम्य), भौतिकशास्त्र (अपहरण,
खुजाबा, अनामिक प्रयोग, स्फोट, जिद्द, भविष्य, सोनियाची खाण, द डे आफ्टर, सुगावा, झेप,
अविष्कार, अंधारातील तीर, मोहिम फत्ते, अस्तित्व, विचारवहन, महास्फोट, हुतात्मा), रसायनशास्त्र
(प्रेमाचा रेणू, उध्वस्त) वनस्पतीशास्त्र (प्रतिशोध, उत्परिवर्तन, शापीत), प्राणीशास्त्र
(चिरूट, आक्रोश, डिंभक, पिंजक, प्रक्षेपक, कोळिष्टक, मूषक, वटवाघूळ,) वैद्यकशास्त्र
(आगंतुक, साक्षीदार, अपघात, अगम्य, शिखंडी, अंधार गुणिले अंधार, कलाटणी, कालचक्र, ठरते.
डॉ. ढोले यांचे कादंबरी लेखन
डॉ. ढोले यांच्या ‘राफिणू’ आणि ‘प्लँटोन’ या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या दोन्ही कादंबऱ्यांचा पैस, आकार सर्वकाही परस्परविरोधी आहे. राफिणू ही कादंबरी वाचत असताना फास्टर फेणेची आठवण आली. या कादंबरीमध्ये असणारा नायकही किशोरवयीन आहे. किशोरवयीन मुलगा राजू फिरके संकटकाळात कसे जबाबदारीने वागतो हे मांडण्यात आले आहे. या कादंबरीमध्ये कोरोना संकट घेतले आहे. यातून नुकतेच आपण गेलेलो आहोत. त्यामुळे परिस्थिती आपल्या परिचयाची आहे. यातील नायकास भेटलेली पात्रे ही समाजात वावरताना प्रत्येकाला भेटतात. त्यामुळे हे वर्णन, कादंबरी वाचकाला भिडते. काही शिक्षकांना गाव सोडून जावे वाटणे, डॉक्टरचे पळून जाणे, तेथे असलेल्या परिचारिकेने मानवतेची जाण ठेवून सेवा करणे, तिला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कल्पक राजूने वापरलेले ड्रोन युवकांना भावणारे आहे. पुढे परग्रहवासीय, त्यांनी लावलेला वनस्पतीचा कोरोना प्रतिबंधासाठीचा वापर, त्यांचे अनुकरण करणारे ग्रामस्थ आणि त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर राजूने त्याचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यासाठी मामाची आणि मामाने त्याच्या संशोधक मित्रांची घेतलेली मदत मुळात वाचनीय आहे.
डॉ. ढोले यांची प्लँटोन ही दिर्घ कादंबरी आहे. यामध्ये वनस्पतीच्या स्मृतीपटलासंदर्भातील
संशोधन आणि त्यातून होणारी अवैध वृक्षतोड या समस्येवर प्रकाश टाकलेला आहे. यातील नायक
सोनवणे आहे की अमेरिका सोडून भारतात येऊन संशोधन करणारा त्यांचा मित्र असा प्रश्न पडतो.
ओघवत्या भाषेत आलेल्या या कादंबरीत प्रेमकहाण्या आहेत. आदिवासींचे दु:ख आहे, त्यांच्यावरील
अन्याय आहे, गैरप्रकारांना वाचा फोडणाऱ्या पत्रकाराची हत्या आहे, बेमुर्वत वागणारा
राजकारणी, संस्कारानुरूप वागणारा मंत्र्यांचा मुलगा आहे, त्यांना साथ देणारे वनाधिकारी
शिंदे आहेत. अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी संशोधनातून मार्ग शोधलेला दाखवला आहे. यातील
नायकाला त्रास देणारे कसे अखेर पराभूत होतात, हे दाखवत कादंबरी संपते.
या दोन कादंबऱ्यामध्ये प्लँटोन ही ४६२ पानांची कादंबरी आहे. तीमध्ये समाजातील सर्व प्रकारच्या घटना आपणास भेटतात. तर राफिणू ही १२६ पानांची कादंबरी आहे. या कादंबरीतील घटना, पैस हा खूप छोटा आहे. किशोरवयीन मुलांनीही एका बैठकीत संपवावी, अशी तिची रचना आहे. प्लँटोन वाचताना मात्र आपणास वेळ काढून निवांतपणे ती समजून घ्यावी लागते. यातून डॉ. ढोले यांच्या सर्जनशिलतेच्या परिघाचा विस्तार किती मोठा आहे, हे लक्षात येते.
एकूणच डॉ. संजय ढोल यांचे लेखन हे शहरी बाजातून बाहेर पडलेले लेखन आहे. ग्रामीण
जीवन जगणाऱ्या आणि जगलेल्या लोकांशीही नाळ जोडणारे असे हे लेखन आहे. मराठी विज्ञान
साहित्याच्या प्रवाहात ग्रामीण भागाला जोडणारे पहिले सातत्यपूर्ण लेखन असल्याने त्यांनी
मराठी विज्ञान साहित्यात खळखळता ग्रामीण प्रवाह निर्माण केला आहे. डॉ. ढोले यांच्या
लेखनाची वारंवारिता वाढत राहो. त्यांच्या हातून अशा अनेक कथा संग्रहाची निर्मिती व्हावी.
ती वाचकांना वाचनानंद देत राहो. यासाठी त्यांना निरामय दिर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!
संदर्भ –
१.
https://www.esakal.com/maharashtra/science-age-and-science-literature-tmb01
२.
मराठी विज्ञान साहित्याचा इतिहास, जयंत
एरंडे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, २०१८
३.
प्रेमाचा रेणू, डॉ. संजय ढोले, मेहता
पब्लिशिंग हाऊस, २००७
४.
अश्मजीव, डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाऊस, २०१०
५.
अंतराळातील मृत्यू, डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाऊस, २०१५
६.
संकरित, डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाऊस, २०१५
७.
डिंभक, डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाऊस, २०२९
८.
खुजाबा, डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाऊस, २०२२
९.
प्लँटोन, डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाऊस, २०२२
१०.
राफिणू, डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाऊस, २०२३
-०-