गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

शिकायला शिकवणारे : आर.एन. पाटील सर

                                                                                                शिक्षक दिन विशेष -६ 


    सरांनी किती पुस्तके वाचली त्यांनाच माहीत. कदाचित त्यांच्याही लक्षात नसेल. मात्र सर बोलताना प्रकांड पंडिताचे भाष्य ऐकत असल्याची जाणीव व्हायची. सरांचे भौतिकशास्त्रावरचे भाष्य विषयाची भिती दूर घालवायचे. एकदा कुलगुरू रजेवर गेले असताना त्यांच्याकडे कुलगुरू पदाचा कार्यभार आला होता. ते स्वत: सहज एखाद्या विद्यापीठात कुलगुरू झाले असते. मात्र कधी सरानी त्या पदाची अपेक्षा ठेवली, प्रयत्न केले असे आठवत नाही. मात्र शिक्षक म्हणून सतत विद्यार्थी घडवत राहिले. शिकवत राहिले…मुलांना स्वत:ला शिकायला… असे माझे गुरू आर.एन. पाटील सरांविषयी....
_________________________________________________________

‘न केलेल्या पापाचे माप’ अनेकांच्या पदरात पडत असते. चूक केलेली नसताना जेव्हा असे काही घडते, तेव्हा ती शिक्षा भोगणाराच्या मनावर मोठा आघात होत असतो. विद्यार्थी दशेत तर हा आघात खूपच मोठा असतो. अनेक विद्यार्थी हा आघात सहन न होऊन आत्महत्येस प्रवृत्त होतात. अनेकांचे आयुष्य उध्वस्त होत असते. मात्र जर चांगले शिक्षक असतील तर ते खरा चूक करणारा शोधून काढतात. निरपराधावर अन्याय होऊ देत नाहीत. ते भाग्य विल्यम राँटजन यांच्या वाट्याला आले नाही. १८६२ मध्ये विल्यम राँटजेन नावाचा एक विद्यार्थी युट्रेच टेक्निकल स्कूलमध्ये शिकत होता. तो त्याच शाळेतील गिनिंग नावाच्या शिक्षकाच्या घरी राहात होता. गिनिंग रसायनशास्त्र शिकवत, संशोधन करत. त्यांच्यामुळेच विल्यम यांना विज्ञानाची आवड निर्माण झाली होती. विल्यम यांच्या वर्गात जशी हुशार मुले होती तशीच काही आडदांड, गुंड प्रवृत्तीची मुले होती. या मुलातील एका मुलाने वर्गात दोन तासांच्या मध्ये शिक्षक यायला जो वेळ लागतो, त्या वेळेत पुढच्या तासाला येणाऱ्या शिक्षकाचे कार्टून काढले. चित्र काढणारा मुलगा आपल्या जागेवर बसला. मात्र शिक्षक वर्गात येत असताना विल्यम बाहेरून वर्गात येत होता.

शिक्षक जेव्हा दरवाज्यातून आत येत होते, नेमके तेव्हा विल्यम फळ्याच्या अगदी जवळ होते. शिक्षकांनी फळ्यावरील आपले काढलेले चित्र पाहिले आणि त्यांचा पारा चढला. त्यांना विल्यमवर संशय आला. ते साहजिकही होते. त्यांनी विल्यमला, आपण चित्र काढल्याचे कबूल करावयास सांगितले. मात्र विल्यम यांनी आपण चित्र काढले नसल्याचे सांगितले. ‘तू काढले नाहीस, तर कोणी काढले, ते सांग’, असे विचारले. विल्यम यांनी आपण चित्र काढले नसल्याचेच वारंवार सांगितले. विल्यम चित्र काढले असल्याचे कबूल करत नाहीत आणि कोणी काढले हे सांगतही नसल्याचे पाहून सरांचा पारा आणखी चढला. अखेर विल्यम यांना मुख्याध्यापकाकडे नेण्यात आले. मात्र विल्यम यांचे उत्तर तेच होते. जर त्यांनी चित्र काढणाऱ्या मुलाचे नाव सांगितले असते, तर बेदम मारहाणीची, भांडणाची भिती होती. वर्गातील अनेक मुलांनी ते चित्र कोणी काढले आहे, ते पाहिले होते. मात्र तेही विल्यम यांच्या बाजूने बोलायला तयार नव्हते. विल्यम यांनी काढले नाही, असेही कोणी सांगू शकत नव्हते. कारण त्यांनी काढले नाही असे सांगितले तर, कोणी काढले ते सांग असा प्रश्न आला असता. शेवटी चित्र काढल्याचा आरोप विल्यम राँटजन यांच्यावर निश्चित करण्यात आला आणि त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले.

आपण दोषी नसताना, आपल्याला शाळेतून काढून टाकल्याची खंत विल्यम यांच्या मनात होती. मात्र विल्यम यांनी तो आघात पचवला. शिक्षणाची कास सोडली नाही. त्यांनी बाहेरून अभ्यास करून युट्रेच विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा दिली. उत्तम गुणांनी ते ती परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रत्यक्षात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन विद्यार्थ्याचा कोणत्या विषयाकडे कल आहे हे तपासले जात असे. या मुलाखतीसाठी विल्यम मुलाखत कक्षात गेले. तर मुलाखत घेणाऱ्यामध्ये ज्या शिक्षकाचे चित्र काढण्याच्या खोट्या आरोपावरून त्यांना शाळा सोडावी लागली होती, तेच शिक्षक मुलाखत घ्यायला होते. अर्थातच विल्यम यांना प्रवेश नाकारण्यात आला. अखेर नव्याने सुरू झालेल्या झुरीच विद्यापीठात विल्यम यांनी प्रवेश घेतला, खूप अभ्यास केला. त्यांचे संशोधन समस्त मानवजातीला वरदान मानले जाते. त्यांनी क्ष-किरण शोधले आणि आपले नाव विज्ञान जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यास भाग पाडले.

…विल्यम राँटजन यांच्या चरित्रातील हा भाग वाचताना, मला माझे विद्यार्थी जीवन आठवले आणि वाटू लागले, ‘माझे नशीब चांगले, मला राँटजनच्या शिक्षकांसारखे शिक्षक नाही मिळाले. नाहीतर माझे शिक्षण तेथेच थांबले असते. माझ्याही आयुष्यात न केलेल्या चूकीचे फळ भोगण्याची वेळ आली होती. त्यावेळी पदार्थविज्ञानशास्त्र विभागाचे विभागप्रमुख असेच वागले असते, तर माझे काय झाले असते. मी शिक्षणाच्या प्रवाहातून कदाचित बाहेर पडलो असतो. इतर एखाद्या विषयात पदव्युत्तर पदवी घेतलीही असती. मात्र भौतिकशास्त्र विषयात शिक्षण घेतले नसते. त्याचं झाले असे होते की…

    मी भौतिकशास्त्र विषयातील एम.एस्सी. अभ्यासक्रमाला शिवाजी विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊन तीन-चार महिने उलटले होते. दयानंद महाविद्यालयातून मला एकट्यालाच प्रवेश मिहाला होता. मी दयानंद महाविद्यालयाचे संस्कार घेऊन आलो होतो. यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज कराड, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ यायन्स सातारा, मुधोजी कॉलेज फलटण यांच्यापेक्षाही जास्त दरारा दयानंदमधून येणाऱ्या मुलांचा होता. अस्मादिकांच्या स्वभावामुळे सर्वांशी परिचय लगेच झाला होता. दयानंदमध्ये झालेल्या संस्कारामुळे कठीण वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास अगोदर सुरू केला होता. स्वत:च्या नोटस काढायला सुरुवातही केली होती. ग्रंथालयातील पुस्तकांची सातत्याने मी देवघेव करत होतो. सांस्कृतिक स्पर्धांपासून फारकत घेऊन मी पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत केले होते. दिवस तसे मजेत आणि भविष्याच्यादृष्टिने चांगले चाललेले होते.

अशात एक दिवस आमच्या वर्गाच्या प्रमुखानी बोलावून घेतले आणि सांगितले, ‘स्पेक्ट्रोस्कोपीचे पुस्तक तुम्ही घेतले होते का?मी लगेच ‘हो’ म्हटलो. सरांच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले. मी म्हटलं, ‘काय झाले? सर’. सरांनी सारवासारव केली आणि म्हणाले, ‘तुम्ही विभागप्रमुखांना भेटा.’ मला नेमके काय झाले आहे लक्षात येत नव्हते. सरांनी फक्त पुस्तक घेतले होते का असे का विचारले असावे, या प्रश्नाने विचारांचे काहूर उठले होते. मनात भिती होती, काय झाले असावे, उत्तर मिळत नव्हते. अखेर विभागप्रमुखांना भेटायला गेलो.

पदार्थविज्ञानशास्त्र अधिविभागाचे त्यावेळी प्रमुख होते, प्रा. आर.एन. पाटील सर. उंच, धिप्पाड, गोरे, अगदी कोणीही पाहिले तरी त्याच्या मनात आदरयुक्त भिती निर्माण व्हावी. सरांच्या ज्ञानाबद्दल मनात एक संकल्पना तयार झाली होती. आम्ही त्यांच्या कक्षात कधीच गेलो नव्हतो. मात्र खिडकीतून कधीकधी डोकावयाचो. ते कायम एखाद्या पुस्तकातील मजकूर वाचत असायचे. त्यांना असे वाचत बसलेले किंवा क्वचित सहकाऱ्यांशी कायम चर्चा करत प्रवेशद्वाराजवळ उभा असलेले आम्ही पाहिले होते. आज अज्ञात कारणासाठी मला त्यांच्याकडे जावे लागणार होते. मनातील भितीने पोटात गोळा आणला होता. मात्र त्यांचयाकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

मी मनातून घाबरलेल्या अवस्थेतच सरांच्या कक्षाच्या दरवाज्याजवळ गेलो. कोर्ट यार्डच्या कडेने गेले की पुढच्या बाजूला जिन्याच्या कडेला पहिल्यांदा ऑफिस आणि त्याच्या शेजारी सॉलिड स्टेट फिजिक्स, मटेरियल सायन्स प्रयोगशाळेशेजारी सर बसलेले असायचे. आजही विभागप्रमुखांची तीच खोली  आहे. ‘मे आय कम इन सर,’ विचारले. आत वाचत बसलेले सर, ‘या’ म्हणाले. आत गेलो. सरांच्यापुढे नेहमीप्रमाणे पुस्तक होतेच. मात्र शेजारीच स्पेक्ट्रोस्कोपीचे, त्याच लेखकाचे पुस्तक होते. मी उभाच होतो. सरांनी स्पेक्ट्रोस्कोपीचे ‘ॲटोमिक अँड मोलॅक्युलर स्पेट्रोस्कोपी’चे पुस्तक उचलले. काही पाने चाळली. मला जवळ बोलावले. पुस्तकातील एक पान दाखवत मला विचारले. ‘हे कोणी लिहिले’. मी अक्षर बारकाईने निरखून पाहिले. ते अक्षर सुंदर होते यात शंकाच नव्हती. मात्र ते माझे नव्हते. माझेही अक्षर सुंदर असल्यामुळेच माझ्यावर आरोप आला होता. अक्षर सुंदर आहे, हाच मोठा अपराध ठरला होता.

मला ते सर्व पाहून धक्का बसला. मूळात ज्या रंगाच्या शाईमध्ये लिहिले गेले होते, तशा प्रकारची शाई मी ‘अक्षरमंच’ची सजावट करण्यासाठीही वापरली नव्हती. आमच्याच वर्गातील दोन मुलींबद्दल तो मजकूर होता, त्यामुळे आपोआपच ती बाब गंभीर बनली होते. ज्या प्रकारे लिहिले होते, ते माझे हस्ताक्षर नाही हे मी स्पष्ट सांगू शकत होतो. मात्र ते कोणीच मान्य करणार नव्हते. सर मात्र शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर तटस्थतेचे भाव होते. त्यांनी मला स्पष्टच सांगितले, ‘हे पहा शिंदे, तुम्हीच ते लिहिले आहे असं त्या मुलींपैकी एका मुलीचे मत आहे. आता जबाबदारी तुमची आहे. तुम्ही लिहिलेले नाही, हे तुम्हीच सिद्ध करायचे आहे. जास्तीत जास्त आठ दिवसात, नाही तर तुमचा प्रवेश रद्द होईल.’ मी अगदी काकुळतीला येऊन म्हटले, ‘सर हे मी लिहिलेले नाही, शप्पथ, माझं हे अक्षर नाही. पण मी कसं सिद्ध करायचं, की मी ते लिहिलेले नाही.’ सरांनी सांगितले, ‘ते तुम्ही बघा. नाहीतर आठ दिवसानी तुम्ही रस्टिकेट व्हाल.’ कानात कोणीतरी शिशाचा रस ओतावा असे होत होते. माझा चेहरा पडला. ती बाब इतकी भयंकर होती की माझा प्रवेश रद्द झाल्याची स्वप्न पडू लागली. मी दयानंदमध्ये माझे जर्नल जपून ठेवले होते, माझा प्रवेश रद्द झाला तर मला दयानंद महाविद्यालयात मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. धायगुडे सर, मॅडम यांचा मानसपुत्र सर्वजन समजत. या कारणाने माझा प्रवेश रद्द झाला तर माझ्यामुळे त्यांनाही त्रास होणार होता.

पुढचे दोन-तीन दिवस मी विमनस्क अवस्थेत वर्गात जात होतो. काहीजनाना ते समजले होते, म्हणजे सर्वांना समजल्यातच जमा होते. माझ्याकडे काहीजनानी तिरस्कारयुक्त नजरा टाकायला सुरुवात केली होती. काहीजन, ‘शिंदे असा असेल वाटत नव्हतं,’ अशा अविर्भावात पहात असायचे. मधुकर पाटील नावाचा जळगावकडचा विद्यार्थी आणि तानाजी मानेच माझ्याशी नीट वागत होते. नेमके त्यांना माहीत होते की नव्हते, माहीत नाही. कदाचित मी भितीने तसा विचार करत असेन. माहीत नाही. असाच एकेक दिवस जात होता. चार-पाच दिवसानी परत पाटील सर बाहेर जाताना दिसले. त्यांनीच मला बोलावले. मला म्हणाले, ‘तुम्ही लिहिलेले नाही हे मला पटते. मात्र ते तुम्हालाच पहावे लागेल. तुम्ही सर्वांची अक्षरे पाहिली का?असा शेवटी प्रश्न केला. मी ‘नाही’ म्हटले. मात्र त्या प्रश्नाने माझ्या मनात एक कल्पना आली. मी परत फिरलो. आमच्याच महाविद्यालयाचे विद्यार्थी असलेले दोन शिक्षक होते. त्यापैकी एका सरांच्या केबीनमध्ये परवानगी विचारत चक्क घुसलोच. सर काहीतरी तपासत बसले होते. मी घाईघाईत म्हणालो, ‘सर मला सर्व विद्यार्थ्यांच्या असाईनमेंट पाहिजेत.’ हा खरं तर परीक्षेचा भाग होता. सर किती सहकार्य देणार माहीत नव्हते. सरांना हा सर्व प्रकार माहीत होता. त्यांनी पहिल्यांदा नकार दिला. मात्र मी जेव्हा तुम्ही सहकार्य केले नाही तर माझी काहीच चूक नसताना माझा प्रवेश रद्द होईल. माझे शिक्षण थांबेल हे सांगितले, तेव्हा त्यांनी टेबलच्या खालच्या खणातून एक गठ्ठा काढून दिला. त्यामध्ये आमच्या वर्गातील सर्व सदतीस मुलांच्या असाईनमेंट होत्या. सर असाईनमेंटबाबत खूपच कडक असल्याने प्रत्येकाने आपल्या हस्ताक्षरातच लिहिल्या होत्या.

प्रत्येकाचे हस्ताक्षर पहात पुढे चाळत होतो. सहा सात असाईनमेंट तपासताच आलेल्या शाईच्या रंगाने माझ्या चेहऱ्यावर हास्य पसरले. तोच शाईचा रंग, एम. आणि एन. ही अक्षरे इंग्रजीतून लिहिताना पहिल्या उभ्या रेषेला दिलेला तोच बाक. मी एकदम ‘सापडले’ असे म्हटलो. आर्किमिडीजला एखादी वस्तू द्रवात बुडवल्यावर त्याच्या आकारमानाइतका द्रव विस्थापित होतो. हा शोध लागल्यावर तो आंघोळ करता-करता तसाच पळत सुटला होता म्हणे. त्याला जितका आनंद झाला असेल, त्याच्यापेक्षाही जास्त मला आनंद झाला होता. आता मी सिद्ध करू शकत होतो की ते घाणेरडे कृत्य मी केलेले नाही. मात्र तोपर्यंत सात वाजत आलेले होते. मात्र डोक्यावरचे सगळे टेंशन गेले होते. 

    पाटील सर विभागात नव्हते. त्यांना कधी एकदा मी हे सर्व सांगेन असे झाले होते. सर विद्यापीठ परिसरातच मुलींच्या वसतीगृहाच्या शेजारच्या (आजचे लोकविकास केंद्र) प्राध्यापक निवाससानात राहायचे. मात्र माझे एकट्याने त्यांच्या घरी जायचे धाडस होत नव्हते. मधूकरला बरोबर घ्यायला हवे असे वाटले. मधुकर जळगावकडचा असल्याने, तो पाटील सरांचा गाववाला असे सर्व वर्गाचे मत होते आणि माझे आणि त्याचे चांगले जमायचेही. त्यासाठी त्याला होस्टेलवरच गाठायचे म्हणून पटपट होस्टेलवर आलो. तोपर्यंत पोटातील कावळ्यांची कावकाव चांगलीच सुरू झाली होती. टेंशनने बांधून ठेवलेले कावळेपण आज मोकळे झाले असावेत. सकाळी साडेनऊला पोटात अन्न ढकलले होते. मेसचे जेवण जास्त खाऊ वाटत नसायचे, मात्र आज मनापासून जेवावेसे वाटत होते. आमच्या अगोदरच्या विद्यार्थ्यांनी मेसबाबत केलेल्या आंदोलनामुळे होस्टेलला मेस नव्हत्या. मी आणि लउळचा राजा तीन नंबर होस्टेलच्या रूम नंबर ४१ मध्ये राहायचो. सायबर चौकातील आवटी मावशीच्या मेसला मी जेवायला जायचो. तर तानाजी माने आणि मधूकर पाटील तिथेच दुसऱ्या मेसला जेवायचे. मी मधूकर पाटलाला होस्टेलवर गाठायचे ठरवले. मात्र तो आणि तानाजी माने लवकर गेले होते. दोघे अनेकदा राजारामपुरीत जनता बझारपर्यंत पायगाडीने जात आणि येताना जेवण करून येत. मी आठच्या दरम्यान जायचो. आज भूक लागल्याची जाणीव लवकर झाली. मीपण लगेच जेवायला निघालो. मी मेसवर गेलो, तेव्हा ते दोघे आलेले नव्हते. त्यामुळे मी निर्धास्त झालो. मी घाईघाईने जेवण आटोपले आणि त्यांची वाट पहात चौकात थांबलो. ते दोघे जेवून येताच मधूकरला हातानेच खुणावले. त्याला ‘आपल्याला पाटील सरांच्या घरी जायचे आहे’ असे सांगितले. त्यांने ‘का’ असे विचारताच ‘आल्यावर सांगतो. लवकर जेऊन ये’ असे सांगून मी तिथेच वाट पहात उभा राहिलो. मिनिट मिनिट तासासारखा वाटत होता. घड्याळ त्याच वेगाने चालत होते, मात्र आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताची मला साक्ष पटत होती. प्रेयसीची वाट पहाताना पाच मिनिटेही तास वाटतात, तर ती सोबत असताना तास गेला तरी पाच मिनिटेच झाली असे वाटतात. मलाही ही प्रतिक्षा असह्य होत होती. वेळ पटकन जात नाही म्हणतात, ते अनुभवत होतो.

अखेर ते दोघे जेवण करून आले. आम्ही तिघे गप्पा मारत क्रीडासंकूल ओलांडून ॲम्पिथिएटरपर्यंत आलो. भवनच्या शेजारचा चढ चढताना मी तानाजीला सांगितले, ‘आम्ही पाटील सरांकडे चाललो आहोत. तू येणार का?’ त्याच्याकडून अपेक्षित ‘नाही’ हे उत्तर आले. मी आणि मधूकर तसेच मग हेल्थ सेंटरवरून पुढे आलो आणि लेडिज होस्टेलच्या मार्गावर आलो. कोपऱ्यावर पाटील सरांचे घर आले. जाताना रस्त्यात मधूकरने कशासाठी भेटायचे, हे विचारून घेतले होते. घराच्या गेटजवळ आल्यानंतर माझी थोडी धडधड वाढली होती. सर घरात येऊ देतील का, नीट बोलतील का, असे अनेक प्रश्न होते. मधूकरने गेट उघडले. दोघे आत गेलो. मी दरवाज्याबाहेरच उभा राहिलो होतो. मधूकरने आम्ही दोघे आल्याचे सांगितले आणि सरांनी बाहेर येऊन मलाही आत बोलावले.

आत गेल्यानंतर बसायला लावले. कसे काय आलात हे विचारले. मी अक्षर कोणाचे हे सापडल्याचे पटकन सांगून टाकले. मी ते लिहिणाऱ्यापर्यंत कसा पोहोचलो तेही सांगितले. तुम्ही उद्या कोणाकडूनही त्या उत्तरपत्रिका मागवून पहा. ते अक्षर आणि शाई माझी नाही. ती कोणाची आहे, हे सांगायचे धाडस केले नाही कारण मधूकरचे त्याच्याशीही चांगले जमायचे. सर म्हणाले, ‘बरं झाले सापडले ते. तुम्ही लिहिलेले नाही हे कळत होते. मात्र नाईलाज होता’. असे म्हणून त्यांनी विषय संपवला. पुढे अभ्यासाविषयी बोलत राहिले. गप्पा रंगात आलेल्या असताना ‘मॅडम दवाखान्यातून आल्या. त्या डॉक्टर होत्या तसेच मुलींच्या वसतीगृहाच्या प्रमुखही होत्या. त्यांचे विजय बेकरीच्या इमारतीत ओपीडी होती. मग नको म्हणत असतानाही चहा झाला आणि त्यानंतर आम्ही निर्धास्त मनाने निघालो. अनेक दिवसानंतर मी आज शांत झोपणार होतो. डोक्यावरचे संपूर्ण टेंशन नाहीसे झाले होते. आता माझा प्रवेश रद्द होणार नव्हता. सरांच्या ‘सर्वांची अक्षरे तपासली का? या एका प्रश्नाने मला माझ्यासमोरील संकटाची किल्ली मिळाली होती. सर्वांची अक्षरे कोठे मिळतील याबाबतची कल्पना मला त्यानंतर आली होती. दुसरी गोष्ट म्हणजे सरांनी मला निर्दोष मानले होते आणि आठ दिवसाची मदत दिली होती. मी बोललो नाही तरी सर स्वत:हून माझ्याशी बोलत होते. सरांनी नंतर त्याची खातरजमा केली. त्या विद्यार्थ्याचे नाव मला आणि सरांनाच समजले. नंतर एकदा सरांशी बोलताना, ‘माझा प्रवेश रद्द करणार होता, सर मग त्या विद्यार्थ्यांवर का कारवाई केली नाही’, असे विचारले. सरांनी सांगितले, ‘मुलींचा गैरसमज दूर झाला. तुम्ही लिहिलेले नाही, हे त्यांना पटलयं. मी ज्याने लिहिले, त्याला समज दिली आहे. तो दलित समाजातील आहे. त्याच्या घरातील तो पहिलाच शिकणारा आहे. त्याच्या एका चूकीमुळे शिक्षणाची त्याच्या दारात पोहोचलेली गंगा आटेल. तेव्हा त्याला एकवेळ माफ केले आहे. या वयात चूका होतात. तो पुन्हा चूक करणार नाही. तुम्हीही हा प्रसंग विसरून वर्गात मिसळून रहा. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा.’ असे सांगितले. वर्गातील वातावरण खरेच बदलले. आम्ही खूप आनंदाने पुढील दोन वर्षे घालवली. सरांनी नेमके काय केले माहीत नाही, मात्र या घटनेचा उल्लेख कोणाकडूनच झाला नाही.

असे हे प्रा.रामकृष्ण नेमा पाटी सर. मी १९८९ च्या जुलैमध्ये पदार्थविज्ञानशास्त्र विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख होते. उंच, धिप्पाड, गोरेपान असे पाटील सर चालतच विभागात यायचे. पाचशेक मीटर अंतरावर राहायचे. त्यांच्याकडे स्कूटर होती. मात्र गावात जातानाच तिचा वापर व्हायचा. सर खूप सावकाश पावले टाकत चालत. आपल्याच विचारात ते चालत येताना पाहिले तरी त्यांच्या विद्वत्तेची कल्पना यायची. आम्हाला त्यांनी तसे शिकवले नाही. मात्र पदवी परीक्षेत मिळालेल्या भरपूर गुणांमुळे आमच्या वर्गाची चर्चा विद्यापीठातील भौतिकशास्त्र जगतात सर्वत्र होती. त्यामुळे आमची सेमिनार त्यांनी स्वत: घ्यायची असे ठरवले होते. दर शनिवारी ते आमचे प्रॅक्टिकल संपले की प्रयोगशाळेत सर्व विद्यार्थ्सांना १२ वाजता बोलावत आणि आमच्यातील कोणीतरी दोघे सेमिनार देत. त्यावेळी त्यांनी विचारलेले प्रश्न आमच्यासाठी गुगली असायचे आणि बहुतेकांची बहुतेकवेळा विकेट पडायची. या संपूर्ण प्रक्रियेत एखाद्या विषयाचे आकलन करून घेण्यासाठी त्या विषयाचा विचार कसा करावा याचे आम्हाला जणू प्रशिक्षण मिळत होते. त्यावेळी नोटस कशा काढाव्यात, कोणत्या पुस्तकात सेमिनारचा टॉपिक चांगला दिला आहे, हे कोणतेही पुस्तक हातात नसताना ते सांगायचे. त्या काळात विषय आकलनाचे झालेले प्रशिक्षण मला वाचनातून लेखनापर्यंत नेताना महत्त्वाचे ठरले अशी माझी नम्र भावना आहे. नाहीतर भौतिकशास्त्राच्या एका छोट्या खेड्यातून आलेल्या विद्यार्थ्याला वनस्पती लेखनापर्यंत जाता आले नसते.


आमचा प्रवेश झाला तेव्हा विभागात सॉलिड स्टेट फिजिक्स, मटेरियल सायन्स, स्पेक्ट्रोस्कोपी, एनर्जी स्टडीज आणि थिअरॉटिकल फिजिक्स या पाच विषयात अध्यापनाची सुविधा होती. मात्र कमी विद्यार्थी प्रवेशीत झाल्याने त्यातील सॉलिड स्टेट फिजिक्सकडे विद्यार्थ्यांचा ओढा असायचा. मलाही तेच स्पेशलायझेशन घ्यायचे होते. मात्र अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेत खूपच जास्त गुण दिल्याने गुणवत्ता यादीत आम्ही खूप खाली होतो. मला थिअरॉटिकल फिजिक्स् किंवा स्पेक्ट्रोस्कोपी मिळाले असते. सरांना जाऊन आम्ही बी.एस्सीच्या मार्कावर दुसऱ्या वर्षाचे स्पेशलायझेशन हा अन्याय असल्याचे मत व्यक्त केले. यावर सरांनी ‘हा नियम असल्याचे आणि तो बदलायचा असेल तर कुलगुरुना तुम्हीच भेटून विनंती करावी लागेल’, असे सांगितले. त्यांच्या सांगण्यात संपूर्ण प्रक्रिया होती. आम्ही कुलगुरूना भेटून विनंती करायची आहे, हे सांगणे होते, शिकवण होती. आम्ही तत्कालिन कुलगुरू प्रा. के.बी. पोवार सरांना भेटलो. त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे सर्व शांतपणे ऐकून घेतले. पी.जी. प्रवेश विभागाचे त्यावेळचे उपकुलसचिव जाधव यांना बोलावून घेतले. विद्या परिषदेसमोर विषय ठेवून त्यास मान्यताही घेतली. आमच्या बॅचपासून एम.एस्सी.च्या पहिल्या वर्षाच्या गुणावर स्पेशलायझेशन ठरू लागले.

माझे एम.एस्सी. शिक्षण संपले. सरांनी बोलावून पुढे काय करणार विचारले. मी पीएच.डी. करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी हमखास फेलोशिप मिळवून देणारे मार्गदर्शक फक्त एस.एच. पवार होते. मी त्यांच्याकडे पीएच.डी. करायचा विचार बोलून दाखवला. सरांनी मला दुसरा विषय स्पेस सायन्स सुरू होणार असल्याची माहिती दिली. त्यामध्ये भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्याकडे फेलोशिप लगेच मिळणार नसल्याचेही सांगितले. मी अखेर एस.एच. पवार सरांच्याकडे त्यावेळी चर्चेत असलेल्या सुवाहकता या विषयावर पीएच.डी करायचा निर्णय घेतला. संशोधन कार्य करत असतानाही अनेक गोष्टीबाबत मला सरांच्याकडून अनमोल मार्गदर्शन मिळाले. मी तसा विभागातील सर्वच शिक्षकांशी चांगले संबंध ठवून होतो. मला क्ष-किरण पंक्तींचे विश्लेषण कसे करायचे, हे समजत नव्हते, तेव्हा सरांनी ते समजावून सांगितले. तसेच आणखी काही शिकायचे असेल तर डॉ. एस.ए. पाटील सरांना भेटायला सांगितले. आपल्यापेक्षा दुसरा एखादा शिक्षक एखाद्या विषयातील तज्ज्ञ असेल तर ते मोठेपणा मान्य करत.

आणखी एक गोष्ट सरांच्याकडून मला समजून घेता आली. ती म्हणजे, प्रश्न कसे तयार करायचे. झाले असे होते, बार्शीचे श्री. दिलीप रेवडकर हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक फिजिक्स एज्युकेशन या विषयावर सरांकडे संशोधन करणार होते. मी गावाकडे जाताना त्यांनी माझ्याकडे दोनशेक पानाचा गठ्ठा सुपुर्त केला. मी तो रेवडकर सरांना द्यावा अशी त्यांची इच्छा होती. मी तो नेण्यासाठी घेतला. काय आहे ते पाहिले. त्यात प्रश्न कसे तयार करावेत याबद्दलच्या साहित्याच्या छायांकित प्रती होत्या. मी सरांना हे कशासाठी असे विचारले. सरांनी मला सर्व इतिहास सांगितला. मात्र रेवडकर सरांनी ते घेतले नाहीत. तसेच संशोधन करण्याचा विचार सोडून दिला असल्याचे सांगितले. त्या प्रती घेऊन मी परत सरांना द्यायला गेलो, तर सरांनी माझ्याकडेच ठेवायला सांगितले. मी पुन्हा खोलीवर तो गठ्ठा घेऊन आलो. मी वाचला. स्टेम, ऑब्जेक्ट सर्व संकल्पना सरांशी बोलून समजून घेतल्या. एखादा प्रश्न इतिहासासाठी योग्य असला तरी विज्ञानाच्यादृष्टीने अयोग्य कसा असतो. सर्वकाही सोदाहरण सर समजून सांगत होते. यामध्ये किती वेळ गेला माहीत नाही. मात्र सरांनी बोलत राहावे आणि आपण ऐकत राहावे, असेच त्यावेळी वाटत होते. सरांसोबतची प्रत्येक भेट ही काही ना काही शिकवत असे. शिकण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी माझ्यासाठी पाटील सरांचा हा सहवास खूप महत्त्वाचा आहे.

सर किती वाचत होते. सरांनी किती पुस्तके वाचली हे केवळ त्यांनाच माहीत असेल. कदाचित त्यांच्याही लक्षात नसेल. मात्र सर बोलताना प्रकांड पंडिताचे भाष्य ऐकत असल्याची जाणीव होत असायची. सरांचे भौतिकशास्त्रावरचे भाष्य विषयाची भिती दूर घालवायचे. त्यामुळेच एकदा कुलगुरू रजेवर गेले असताना त्यांच्याकडे कुलगुरू पदाचा कार्यभार आला होता. ते स्वत: सहज एखाद्या विद्यापीठात कुलगुरू झाले असते. मात्र कधी सरानी त्या पदाची अपेक्षा ठेवली, प्रयत्न केले असे आठवत नाही. सरांचा सहवास पाच वर्षे मिळाला. नंतर मी बारामतीला रूजू झालो. त्यानंतर विभागातही रूजू झालो. मात्र लगेच माझी सोलापूरच्या पदव्युत्तर केंद्रात नियुक्ती झाली आणि माझे त्यांच्याशी असणारे संवाद कमी होत गेले. सरांचे शिक्षण पुणे विद्यापीठातील. त्यांचा अनुभव इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर येथील होता. मनात आणले असते तर ते विदेशात जाऊ शकले असते. मात्र १९७० ला ते नव्याने स्थापन झालेल्या शिवाजी विद्यापीठात रूजू झाले आणि कोल्हापूरचे झाले. पुण्यात शिकूनही येथील पहिल्या पिढीच्या शिक्षणाची काळजी घेत राहिले. सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांना घडवत राहिले. माझ्यासारख्या बंडखोर विचाराच्या मुलाला योग्य मार्गदर्शन करत घडवत राहिले. आज त्यांच्याबाबतच्या अनेक आठवणी येतात. त्या सर्व शब्दांकित करता येतीलही. मात्र लेखन खूप मोठे होईल आणि लेखनाचा हेतू सरांचे संस्कार कार्य सांगण्याचा असल्याने, तो मोह टाळणेच योग्य आहे. मात्र त्यांनी कायम कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेत राहिले.

अशा या शिक्षकास, गुरूस विनम्र प्रणाम!

सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

पाणीच पर्यावरणाचं मूळ!


 पाणी हे संपूर्ण जीवसृष्टीचे मूळ आहे. पाण्यापासूनच जीवसृष्टी निर्माण झाली. नद्या मानवासाठी जिवनदायिन्या बनल्या. मात्र आज याच नद्या मृत्यूदायिन्या बनल्या आहेत. कोल्हापूरमध्ये ज्या पंचगंगेचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते, त्याच पंचगंगेच्या पाण्यात इचलकरंजीमध्ये पायही धुवायला नको वाटते. अशी नद्यांची, पाण्याची अवस्था झाली आहे. पाण्यावर केसरी सांगलीने २०२४चा वर्धापन दिन विशेषांक 16 जुलै रोजी प्रसिद्ध केला. त्यामध्ये माझाही लेख प्रसिद्ध झाला. तो लेख आपल्यासाठी केसरीच्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करत आहे…

______________________________________________________

        आमचे मूळ गाव बार्शी तालुक्यातील चिंचोली. मराठवाड्याच्या उंबरठ्यावर. आमच्या बालपणीही हा भाग कमी पावसाचा होता. पण पाऊस यायचा तो अगदी वेळेवर यायचा. त्या काळात प्रदूषण हा शब्द खेड्यापाड्यात पोहोचला नव्हता. त्यामुळे शेतात जाताना बाटलीतून पाणी नेण्याची संस्कृती नव्हती. शेतात वाहणारे पावसाचे पाणी पिताना त्यावेळी संसर्गाची, आजारी पडण्याची भिती नसायची. पावसाळ्यात लहानमोठे सर्वजन बिनधास्त नदीचे, ओढ्याचे किंवा वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी प्यायचे. आमच्या मालकीची कोरडवाहू मुरमाड जमीन होती. त्या कोरडवाहू शेतीमध्ये वडिलांनी पावसाळा संपल्यावरही पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून एक खड्डा खोदायला घेतला. तेथे एक-दोन फुटाचा मातीचा थर होता. त्याखाली लगेच शिळांसारखा मुरमाड भाग लागला. वडिलांनी हळहळू तो फोडायला सुरुवात केली आणि वीस फूट लांब पंधरा फूट रुंद आणि सात-आठ फूट खोलीचा एक खड्डा तयार झाला. त्यामध्ये पुढे संक्रांतीपर्यंत पाणी टिकू लागले.

हा खड्डा खोदल्यानंतर त्यात पहिल्या पावसाचे पाणी साठले. शाळा असल्याने आठवडाभर तिकडे जाता आले नव्हते. रविवारी कुतुहलापोटी तेथे पाणी कसे साठले, हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही गेलो. त्या पाणवठ्यावर चिमण्या, साळुंखी, होला असे काही पक्षी पाणी पिण्यासाठी आलेले होते. त्या खड्ड्याभोवती असणाऱ्या मातीत उगवलेले गवत, इतर भागातील गवताच्या तुलनेने थोडे जास्तच उंच वाढलेले होते. इतर पक्षीही आपली तहान भागवत असणार, मात्र त्यांच्या पाणी पिण्याच्या वेळी आपण तेथे नसणार, हे लक्षात आले. एक दिवस सकाळी लवकरच तिकडे चक्कर टाकली, तर हरणांचा कळप पाणी पिण्यासाठी आलेला. या सर्व पक्षी आणि प्राण्यांना या पाणीसाठ्याचा सांगावा कोणी दिला होता, कोणास ठाऊक? मात्र आमच्या सोयीसाठी केलेला पाणवठा निसर्गातील अनेक घटकांच्या उपयोगाला येत होता.

त्यावेळी फार काही समजले नव्हते. पुढे डार्विनचा उत्क्रांतीवाद अभ्यासासाठी आला. त्यात समजले की संपूर्ण जीवसृष्टीची निर्मिती पाण्यापासून सुरू झाली. अर्थात पहिला जीव एकपेशीय अमिबा कसा तयार झाला, याचे नेमके उत्तर अद्याप कोणीच देऊ शकले नाही. काही तरी अज्ञात रासायनिक अभिक्रिया घडली आणि त्या अभिक्रियेतून एकपेशीय अमिबा जन्माला आला, असेच आजही शिकवण्यात येते. त्यातून पुढे जलचर अस्तित्वात आले. त्याचबरोबर शैवाल जन्माला आले. त्यापासून पुढे वेली तयार झाल्या. वेलीतून पुढे झुडपे आणि वृक्ष बनले. तर दुसरीकडे उभयचरांपासून प्राणी आणि पुढे पक्षी उत्क्रांत पावले. या प्राण्यातील माकडांपासून मानव उत्क्रांत पावला, असे डार्विनचा सिद्धांत सांगतो. आजही तोच प्रमाण मानला जातो. थोडक्यात संपूर्ण जीवसृष्टीची निर्मिती ही पाण्यापासून झाली. जीवसृष्टीचे मूळ पाण्यात आहे, असे विज्ञानही मान्य करते.  

सजीवांच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. सजिवांमध्ये सर्वात कमी म्हटले तरी ६० टक्केपेक्षा जास्त पाणी असते. वनस्पतींमध्ये सरासरी ६० ते ९८ टक्के पाणी असते. कमी पाण्याचे प्रमाण असणाऱ्या वनस्पती या झुडुपवर्गीय काटक, पातळ सालीच्या आणि छोटी फळे येणाऱ्या असतात. यामध्ये तुरीसारखी पिके मध्यम पाण्याचे प्रमाण धारण करतात. पांढरफळीसारख्या वनस्पतींमध्ये हे प्रमाण ६० टक्केच्या आसपास असते. पावसाळ्यात या झाडांतील पाण्याचे प्रमाण वाढते. तर संपूर्ण उन्हाळा या झाडाला पानेच नसल्याने त्यांना अत्यल्प पाण्याची गरज असते. टॉमॅटोसारख्या वनस्पतीमध्ये पाण्याचे प्रमाण ९८ टक्के इतके असते. या वनस्पतींचे खोड आणि फळे सर्वच मांसल असते. या वनस्पतींमध्ये थोडाही टणकपणा नसतो. मोठ्या वनस्पतींमध्ये पाण्याचे प्रमाण हे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार बदलत जाते. मात्र तरीही पाण्याने बहुतांश भाग व्यापलेला असतो.

प्राण्यांमध्ये पाण्याचे प्रमाण हे ६८ टक्के इतके असते. त्यातही वेगवेगळ्या भागात पाण्याचे प्रमाण हे बदलत जाते. पिल्लांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. मेंदू, हृदय अशा भागात पाण्याचे प्रमाण जास्त असते. तर हाडांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते. असे असले तरी शरीराच्या एकूण वजनाच्या तुलनेमध्ये पाण्याचे प्रमाण इतर सर्व घटकांच्या तुलनेत जास्त असते. सर्व सजिवांच्या क्रियांमध्ये पाणी आपली भूमिका पार पाडते. वनस्पती श्वसन आणि प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी पाण्याचा निरंतर वापर करत असते. प्राण्यांच्या तर अनेक गोष्टीसाठी पाणी लागते. झाडे आंघोळ करतात, ती केवळ पाऊस पडत असताना. मात्र जमिनीवरील प्राणी, पक्षी हे केव्हा ना केव्हा आंघोळ करतातच. म्हणजे स्वच्छतेसाठी पाण्याची गरज पडते. ही तशी दुय्यम तरीही आवश्यक गरज आहे.

मात्र पिण्यासाठी पाणी ही तशी मूलभूत गरज आहे. सर्व जिवांचा वावर हा पाण्याभोवती आहे. मानवाने वस्ती करायला सुरुवात केली, तिही नदीच्या किनाऱ्यावर, म्हणजेच पाण्याच्या जवळ. प्राण्यांच्या शरीरातील प्रत्येक स्रावामध्ये पाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. शरीराचे तापमान सुयोग्य ठेवण्याचे कामही घामाच्या रूपात शरीरातून बाहेर पडणारे पाणीच करत असते. त्यासोबत आपल्या शरीराला अपायकारक असणारे घटकही बाहेर टाकत असते. म्हणजे पाणी आपल्या शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही उपयुक्त असते. मूत्रावाटे पाणी बाहेर पडणारे पाणीही असेच कार्य करत असते. शरीराला आवश्यक असणारे पाणी हे आहारातून तसेच थेट पाणी प्राशन करून घेतले जाते. मानवापुरते बोलायचे झाले तर माणूस पाणी न पिता सात दिवसांपेक्षा जास्त काळ जगू शकत नाही. त्यामुळे पाणी ही सजिवांची अत्यंत मूलभूत गरज आहे.  

तरीही आपण पाणी हे मानवाची मूलभूत गरज म्हणून शिकवत नाही, मानत नाही. पाण्याचे महत्त्व बालवयात मुलांच्या मनावर बिंबवत नाही. परिणामी पाण्याचा वापर गरजेपेक्षा जास्त होतो. इतर सजिवांना त्याचा मोठा फटका बसत आहे. निसर्गाचे चक्र बदलावे इतके मानवाचे पाण्यावर अत्याचार सुरू आहेत. पाण्याच्या चक्रामध्ये केलेल्या हस्तक्षेपामुळे संपूर्ण पर्यावरण बदलत आहे. मानवाने वस्ती करताना सुरुवातीला नदीच्या काठावर केली. त्यासोबत मानवाने आपल्या बुद्धीचा वापर आपल्या भौतिक सुखासाठी करायला सुरुवात केली. त्यातून मानवाचे आरोग्य सुधारले. त्यामुळे मनुष्य प्राण्यांची संख्या इतर सजिवांच्या तुलनेत वेगाने वाढू लागली. वाढत्या लोकसंख्येमुळे केवळ पाण्याचीच नाही तर अन्नाचीही गरज वाढली. अन्नाची गरज भागविण्यासाठी शेतीचे क्षेत्र वाढवणे क्रमप्राप्त ठरले. त्यासाठी जंगलांची कत्तल सुरू झाली.

जंगलाची कत्तल केवळ शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठीच नाही तर, इतर कारणांसाठी म्हणजेच इमारत बांधकाम, फर्निचर, अवजारांसाठी, पॅकिंगसाठी होऊ लागली. जंगलांचे क्षेत्र कमी झाले तसे जमिनीत पाणी नेणारे मार्ग कमी होत गेले. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून तलावांबरोबर विहिरी आणि त्यानंतर कुपनलिकांचे तंत्रज्ञान विकसीत झाले. त्यातून आपली पाण्याची तहान भागविण्यासाठी या तंत्रांचा अविचारी वापर सुरू झाला. याचा परिणाम किती मोठा झाला आहे, हे अजून सर्वांपर्यंत पोहोचलेले नाही. जमिनीत पाणी नेणारे मार्ग झाडांसोबत संपुष्टात येतात. त्यातच महाराष्ट्रातील जमिनीमध्ये खाली बेसॉल्ट खडक असल्याने पाणी पाझरण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अशा परिस्थितीत कुपन‍लिकांच्या खोलीपर्यंत पाणी जाण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. शेकडो वर्षांपूर्वी त्याठिकाणी पोहोचलेले पाणी कुपनलिकातून उपसले जात असते. मात्र हे पाणी उपसताना याचा परिणाम काय होणार याचा कधीच विचार होताना दिसून येत नाही. अर्थात भारतात प्रामुख्याने कुपनलिकांचे तंत्रज्ञान पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने अनेक वर्षे वापरले जात होते.

लवकरच या तंत्राचा वापर शेतीला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सुरू झाला. त्यातून भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा करण्यात येऊ लागला. भूगर्भातील पाणी मर्यादित आहे. त्याचे पुनर्भरण ज्या वेगाने आपण पाणी उपसतो, त्या वेगाने होत नाही. हे लक्षात यायला अनेक वर्षांचा काळ जावा लागला. शासनाने हे लक्षात येताच नियम बनवले. त्यानुसार २०० फुटांपेक्षा जास्त खोलीची कुपनलिका खोदता येत नाही. तसेच दोन कुपनलिकांतील अंतर हे २०० मीटरपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन होऊ लागले. हे तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे एका एकरात चार-पाच कुपनलिका खोदल्या गेल्या. अजूनही लोक खोदत आहेत. कुपनलिकांची खोली हा तर संशोधनाचा विषय ठरावा. आजवर पाण्यासाठी खोदल्या गेलेल्या कुपनलिकातील एका कुपनलिकेची १८०० फूटापर्यंत खोली नेल्याचे एका अहवालात पहावयास मिळते. शहरामध्ये तर ‘आपले स्वत:चे बोअर असावे’, अशा मानसिकतेतून प्रत्येक बंगल्याच्या आवारात कुपनलिका खोदली जाते. अनेक महाभाग बांधकामास सुरुवात करण्याअगोदरच कुपनलिका खोदतात आणि मगच बांधकामाला सुरुवात करतात. एकट्या बेंगलोर शहरात स्थानिक प्रशासनाने कडक धोरण अवलंबल्यानंतर कुपनलिकांची नोंदणी करण्यात येऊ लागली. या एका शहरात २०१६ मध्ये नोंदणी झालेल्या कुपनलिकांची संख्या ३,१९,२११ इतकी आढळून आली. आज हा भूभाग भूजलाच्या अतिरेकी वापराने शुष्क झाला आहे. जगातील पाण्याचे सर्वाधिक दुर्भिक्ष झालेला भाग, केपटाऊन शहराचा आहे. १४ एप्रिल २०२४ पासून शहराला पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याचे तेथील स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. भारतातील बेंगलोर, मद्रास, पुणे ही शहरे याच मार्गावर आहेत. जून मध्यावर आला असताना मुंबई शहर पाणी कपातीला सामोरे जात आहे.

पाण्यापासून जीवन सुरू होते, पाण्याला जीवन असेच म्हणतात. हे पाणी उपलब्ध होते ते पावसापासून. जगाच्या (४१ इंच) तुलनेत भारतात (४३ इंच) आणि भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात (४८ इंच) सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. हे पावसाचे पाणी त्याच्या जलचक्राच्या नियमाने आकाशातून जमिनीवर आले की जमिनीत शक्य असेल तेवढे मुरते. उरलेले पाणी उताराच्या दिशेने वाहत जाते. महाराष्ट्रातील पावसापासून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा विचार केला तर ६७ टक्के पाणी आजही आपल्या भागातून नदी-नाल्यातून वाहत जाऊन समुद्रास मिळते. पावसापासून उपलब्ध झालेल्या पाण्यातील १७ टक्के पाण्याची वाफ होते. केवळ दहा टक्के पाणीच जमिनीत मुरते. पावसापासून उपलब्ध झालेल्या पाण्यातील सहा टक्के पाणी हे तलावातून आणि जलसाठ्यातून साठवले जाते. तर नदी वाहत असताना त्यातील दहा टक्के पाणी हे शेती आणि उद्योगासाठी वापरले जाते. अशा प्रकारे जे उपलब्ध होते त्यातील ६७ टक्के पाणी समुद्राला थेट जाऊन मिळत असताना मानवाच्या गरजा वाढल्याने लागणारे ७० टक्के पाणी आपण जमिनीतून उपसा करून घेतले जाते. केवळ तीस टक्के पाणीच नद्या आणि तलावातून उपलब्ध होते.

कूपनलिकांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होऊ लागला. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली. त्यामुळे दोनशे फूट खोलीपर्यंत कूपनलिका खोदण्याचा शासनाचा नियम असताना पाचशे, सहाशे फुट गाठत, हजाराच्यापुढे खोदल्या जाऊ लागल्या. चार-पाच वर्षांपूर्वी नांदेडमध्ये अशीच एक कुपनलिका खोदली जात होती. हजारपेक्षा जास्त खोल जाऊनही पाणी लागले नाही. मालकाने आणखी खोल जाण्याचा आग्रह धरला. अखेर त्या बोअरमधून उष्ण द्रव पदार्थ बाहेर पडला आणि त्यामध्ये कूपनलिका खोदणाऱ्या मशिनचे मोठे नुकसान झाले. तरीही माणसाचा हव्यास काही सूटला नाही. आजही खोल कुपनलिका खोदण्याचे प्रमाण काही कमी होत नाही.

दुसरीकडे चीन १०,००० मीटर खोल जमिनीत छिद्र खोदण्याचा प्रयत्न करत आहे. पृथ्वीच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास करण्यासाठी, हे ३०,००० फूट खोलीची कूपनलिका खोदत असल्याचे चीन सांगतो. असे अनेक प्रयोगाच्या नावाखाली उपदव्याप मानवाकडून सुरू आहेत. कुपनलिकातून अधिकचा पाणी उपसा झाल्यामुळे भूजल पातळी खाली जाणे, हा तत्काळ होणारा परिणाम. मात्र भूजल पातळी खाली गेल्यामुळे खोलवर मुळ्या असणाऱ्या झाडांना जमिनीतून पाण्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पिंपळ, कडुनिंब अशी झाडे सुकतात आणि अंतिमत: मरून जातात. हा दुसरा फटका. एक झाड मरणे म्हणजे एक गाव उध्वस्त होण्यासारखेच आहे, हे कधी आपण लक्षात घेणार, हा खरा प्रश्न आहे. झाडे वाळल्यानंतर त्यांच्या मुळ्या मृत होतात. या मुळ्या जमिनीतून झाडाला जगवण्यासाठी जसे जमिनीतून पाणी घेतात, त्यापेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडताना, पाणी जमिनीत नेण्याचे कार्य करतात. तेही थांबते. भूजल पुनर्भरण होत नाही. हा तिसरा दुष्परिणाम. याचा आणखी पुढे काही परिणाम होत असेल, असे कोणाच्या मनातही येत नाही. कुपनलिकांच्या माध्यमातून शेकडो वर्षांपूर्वी जमिनीत जाऊन स्थिरावलेले पाणी मोठ्या प्रमाणात उपसल्याने आणि त्याचे पुनर्भरण झाल्याने पृथ्वीवरील जीवसृष्टीला मोठा फटका बसू शकेल, असा शोध संशोधकांना लागला आहे.

मागील काही वर्षांत पृथ्वीचा अक्ष ८० सेंटिमीटर पूर्वेकडे सरकल्याचे संशोधकांच्या लक्षात आले आहे. यामागे भारत आणि उत्तर अमेरिकेतील भूजल पातळी खाली गेल्याचे कारण संशोधकांनी जाहीर केले. भारत आणि उत्तर अमेरिकेत मागील तीस वर्षांत २१८० गिगाटन पाणी उपसले गेले आहे. त्यामुळे दरवर्षी पृथ्वीचा अक्ष ४.३६ सेंटिमीटरने १९९३ ते २०१० या काळात सरकला आहे. यामुळे हवामानाचे अंदाज बदलू शकतात. जेवढे जमिनीतून पाणी उपसले ते जर समुद्रात पसरले तर समुद्राची पातळी ०.२४ इंचाने वाढेल. त्याचा अनेक गावांना फटका बसू शकतो. आपण निसर्गात कसलाही हस्तक्षेप करताना त्याचा पुन्हापुन्हा विचार करायला हवा.

त्यातही मानवाने अनेक प्रकारांनी पाण्याच्या चक्रात हस्तक्षेप केला आहे. सुरुवातीला नद्यांवर अडथळे निर्माण केले. तलाव बांधले. नद्यातून पाणी मोठ्या प्रमाणात उपसले जाते. यापेक्षा महत्त्वाचा भाग ठरला तो म्हणजे बांधकामाच्या आधुनिक तंत्राचा वापर करताना नद्यातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होऊ लागला. नद्यांच्या कडेला असणाऱ्या नैसर्ग‍िकरित्या वाढलेल्या झाडांची तोड हाही महत्त्वाचा भाग बनला. त्यामुळे त्या झाडावर राहणाऱ्या पक्षांचा, खारूताई, सरडे अशा प्राण्यांचा आणि मुंगळे, मुंग्या अशा किटकांचा अधिवास नष्ट करण्यात आला. त्यामुळे तेथील पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले. गाळ येऊन नद्यांची पात्रे उथळ झाली. नद्यांचे जिवंतपण संपले. त्या मृत झाल्या, होत आहेत. पुराचे पाणी सर्वदूर पसरू लागले. नद्यावर बांधण्यात येणारे पूल आणि नद्यांवरून बांधले जाणारे रस्ते हा आणखी एका मोठ्या संशोधनाचा विषय ठरावा. यात भर टाकली ती नद्यांमध्ये वापरलेले घाण पाणी सोडण्याने. प्रदूषीत पाणी नद्यांमध्ये सोडल्याने जिवनदायिन्या या मृत्यूवाहिन्या बनल्या. नद्यातील पाणी प्रदूषीत झाल्याने ते वापरण्यायोग्य न राहिल्याने नदीच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांना पाणी असूनही पाण्याची टंचाई जाणवू लागली.

त्यातच पाण्यामध्ये अनेक विदेशी वाणांच्या प्रजाती आणून येथील पाण्याला स्वच्छ ठेवण्याचे कार्य करणाऱ्या स्थानिक वाणांच्या माशांचे अस्तित्व आपण धोक्यात आणले आहे. चिलापी किंवा टिलापी ही अशीच प्रजाती. ती आपण मोठ्या प्रमाणात वाढवल्याने उजनीसारख्या महाकाय धरणात आढळणाऱ्या स्थानिक प्रजातींचे मासे आता मिळेनासे झाले आहेत. इतर जलचरांनाही या प्रजातीनी धोका निर्माण केला आहे.

सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे आजही एखाद्या ठिकाणी पाणवठा तयार झाला तर तेथे पशू, पक्षी आणि हिरवळ आपोआप येते. एक पर्यावरणीय संस्था निर्माण होते. मात्र त्यासाठी पाण्याचे साठे आहे तसे जतन करायला हवेत. स्वच्छ पाण्यात अशुद्ध पाणी मिसळू देता कामा नये. अनेक आजार प्रदूषीत पायामुळे होतात. पाण्यावर संपूर्ण जीवसृष्टीचा अधिकार आहे, हे आपण मान्य करायला हवे. सुयोग्य पाणी सर्वांना मिळावे यासाठी स्वच्छ पाण्यात प्रदूषीत पाणी मिसळू न देण्याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी. नाहीतर पर्यावरणाचे मूळ असणारे पाणी मानवाच्या मुळावर उठल्याशिवाय राहणार नाही.