बुधवार, १२ जुलै, २०२३

प्रयोगशील विज्ञानाचा प्रणेता : गॅलिलिओ गॅलिली

‘एककांचे मानकरी’ या माझ्या पहिल्या पुस्तकामध्ये भौतिकराशींच्या एमकेएस पद्धतीतील एककांना (units) ज्या संशोधकांची नावे देण्यात आली आहेत त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्यावर लेखन केले होते. या पुस्तकाची प्रस्तावना २०१५ मध्ये प्रा. माणिकराव साळुंखे यांनी माझ्याकडून अशाच स्वरूपाचे सीजीएस आणि इतर एककांना ज्या संशोधकांची नावे दिली आहेत त्यांच्या कार्याबद्दल पुस्तक लिहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याला आत आठ वर्ष होत आहेत. लवकरच ‘एककांचे इतर मानकरी’ हे पुस्तक आपल्या भेटीला येत आहे. या पुस्तकातील प्रयोगशील संशोधक ज्यांचे नाव गुरूत्वीय त्वरणाच्या सीजीएस पद्धतीच्या एककास देण्यात आले ते म्हणजे गॅलिलिओ गॅलिली यांच्या जीवनावरील संपादित लेख अंधश्रद्धा निर्मुलन पत्रिकेच्या फेब्रुवारी २०२३ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. तो लेख आणि मूळ पुस्तकातील लेख आपल्यासाठी येथे प्रसिद्ध करत आहे… 

____________________________________________________

कुसुमाग्रजांच्या अनेक लोकप्रिय कवितामधील एक कविता म्हणजे ‘पृथ्वीचे प्रेमगीत’. ही कविता चिरतरूण आहे. आजही वाचली तरी ती ताजी वाटते. ती अनेक अंगानी महत्त्वाची आहे. मानवी भावनांचा, अत्युत्कृष्ट अविष्कार म्हणजे ही कविता.

‘परी दिव्य ते तेज पाहून पूजून

घेऊ गळ्याशी कसे काजवे

नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा

तूझी दूरता त्याहूनी साहवे’

या ओळीतून प्रेम कोणावर करावे आणि कसे करावे याचे सुंदर दर्शन होते. ज्या व्यक्तीवर प्रेम करते, तीचे प्रेम प्राप्त झाले नाही तर तडजोड करायला ही प्रेयसी तयार नाही. दुसऱ्या कोणाची होण्यापेक्षा, आपल्या प्रियकराच्या आठवणीत विरह सहन करायची तिची तयारी आहे. प्रेम कसे असते हे उलगडून सांगणारी ही कविता. शेवटच्या कडव्यात आणखी उंच होते. प्रेमातील नाते मित्रत्वाच्या पातळीवर घेऊन जाते. ती आपल्या प्रियकराला शेवटी म्हणते, ‘अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन, मला ज्ञात मी एक धुलि:कण’. ती आपल्या प्रियकराला मित्र मानत असताना त्याचे मोइेपण सांगते. स्वत:ला कमीपणा घेत धुलि:कण मानते. प्रेमात हेच तर आवश्यक असते. जोडीदाराचे मोठेपण दोघांनीही स्विकारले की आपोआप मित्रत्त्वाचे नाते येते. त्यामुळेच ही कविता सर्वांना भावते.

   एकिकडे मानवी भावनांचा उत्कृष्ट अविष्कार असणारी ही कविता दुसरीकडे वैज्ञानिक सत्यांची मांडणी करते. ही कविता म्हणजे कविकल्पनेला दिलेले निव्वळ शब्दरूप नव्हे. तर चंद्र हा सूर्याचाच प्रकाश घेतो, आणि फुकटचा भाव खाऊन जातो. केवळ सूर्याकडे स्वत:चा प्रकाश आहे. ध्रुव तारा उत्तरेला स्वत:ची जागा न बदलता बसलेला आहे. मंगळ लाल रंगाचा दिसतो. तर शुक्र पहाटे दर्शन देतो, अशा अनेक वैज्ञानिक सत्यांना प्रेम भावनेबरोबर गुंफून तयार झालेले हे सुंदर काव्य.

मात्र मनामध्ये नेहमी प्रश्न पडतो पूर्वीच्या धर्मसंकल्पनाच आजही कायम असत्या तर कुसुमाग्रजांचे हे नितांत सुदर काव्य तयार झाले असते का? अनेक वर्ष पृथ्वी सपाट आहे. तिच्याभोवती सूर्यासह इतर सर्वजण फिरतात, अशा संकल्पना पाश्चात्य राष्ट्रात होत्या. त्या धर्मसत्तेने स्विकारल्या होत्या. अरिस्टॉटल आणि टोलेमी या तत्त्वज्ञांनी त्या मान्य केल्या होत्या. त्यांचा दरारा इतका होता की अनेक देशात अरिस्टॉटल यांच्याविरोधात भाष्य करणे धर्मसत्तेला सोडा, अनेक विद्यापीठातील प्राध्यापकांनाही मान्य नव्हते. अशा त्या कालखंडात निकोलस कोपर्निकस आणि विल्यम गिल्बर्ट यांनी या कल्पनांना छेद देणारे कार्य केले. गिल्बर्ट यांना धर्मसत्तेचा त्रास झाला नाही. तसे ते सुदैवी. तसेच त्यांचे मुख्य कार्य हे चुंबकावर होते. तेच जास्त चर्चेत राहिले. त्यांनी आपल्या लेखनात धर्मसत्ता, धार्म‍िक संकल्पना यावर भाष्‍ केले नाही. त्यांना उलट राजसत्तेने भरपूर सहकार्य केले. कोपर्निकस हे चतुर होते. त्यांनी आपले लिखाण आणि कार्य धर्मसत्तेला रूचणार नाही हे लक्षात येताच आपले पुस्तक पोप पॉल तृतिय यांना अर्पण केले. त्यामुळे ते शिक्षेचे धनी झाले नाहीत. मात्र त्यांच्या पुस्तकावर बंदी आलीच. सूर्य, पृथ्वी आणि ग्रहताऱ्यांच्या या संकल्पना आजही तशाच असत्या, तर, कुसुमाग्रजांचे हे काव्य असे उतरू शकले असते का? कुसुमाग्रजांनी या कवितेत मानवी भावभावना आणि विज्ञान यांचा जो सुरेख मेळ घातला आहे, त्याला तोड नाही.

या सर्व संकल्पना, वैज्ञानि‍क सत्यांना उलगडून दाखवण्याचे कार्य एका संशोधकांने केले. अरिस्टॉटलचे म्हणणे आणि धर्मग्रंथात लिहिलेले चूकीचे आहे. मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो ते पाहा आणि खात्री करा, असे सांगणारा एक संशोधक जन्मला. मात्र ऐकता कोण? धर्मसत्तेने त्याच्या या कार्यावर आक्षेप घेतला. पुस्तकावर बंदी घातली. त्याला कैदेत टाकले. जीवन संपवून टाकणारी शिक्षा भोगण्याऐवजी माफीचे नाटक केले. तरीही याला नजरकैद भोगावी लागली. या नजरकैदेतही आपले संशोधन करत राहिला. सुंदर ग्रंथाची निर्मिती करून ते गुचचूप बाहेर पाठवले. लोकांच्या मनात प्रायेागिक विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. न्यूटनच्या संशोधनासाठी सुपिक जमीन तयार करून दिली. असा आद्य संशोधक म्हणजे गॅलिलिओ गॅलिली.

गॅलिलिओ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी इटलीतील पिसा या शहरामध्ये झाला. विन्सेन्झो गॅलिली यांना एकूण सात मुले होते. यातील गॅलिलिओ सर्वात मोठे. विन्सेन्झो हे बंडखोर विचाराचे संगितकार होते. तंतूवाद्यांच्या तारावरील ताण आणि आवाज यावर त्यांनी गॅलिलिओ यांच्यासमवेत त्यांनी काही प्रयोगही केले होते. बंडखोर वृत्तीची देणगी गॅलिलिओ यांना वडिलाकडूनच मिळाली होती. वडिलाप्रमाणे गॅलिलिओ सतारीसारखे ‘ल्यूट’ हे तंतूवाद्य वाजवायला शिकले होते. विन्सेन्झो यांचा लोकरीचा आणि कापडाचा व्यवसायही होता. गॅलिलिओ यांनीही या व्यवसायात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. विन्सेन्झो यांनी फ्लॉरेन्स येथे कुटुंब स्थलांतरीत केले. तेथून जवळच असलेल्या वॅलोमब्रोसा येथील धार्म‍िक शाळेमध्ये गॅलिलिओ शिक्षण घेऊ लागले. या शाळेत ते थोडे जास्तच रमले. मठातील शिक्षण ते पूर्णपणे आचरणात आणू लागले. ते भिक्षाही मागत. फावल्या वेळात चर्चची कामे करत. त्यांची वाटचाल धर्मगुरू होण्याकडे सुरू होती. आपल्या चिरंजिवाचे लक्षण ठिक नाही, हे विन्सेन्झो यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच त्यांची शाळा बदलली.  त्यांना आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचे होते.

विन्सेन्झो यांनी मोठे प्रयत्न करून गॅलिलिओना पिसा विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. त्यांनी मॅट्रीकची परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण केली आणि वैद्यक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. मात्र त्यांचे या अभ्यासक्रमामध्ये मन रमत नव्हते. ते गणिताच्या तासाला जाऊन बसत. शेवटी त्यांनी वडिलांच्या इच्छेविरूद्ध गणिताच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. अभ्यास नीट सुरू होता. मात्र, कुटुंबाची आर्थ‍िक परिस्थिती बिघडली होती. त्यामुळे पदवी न घेताच त्यांनी १५८५ मध्ये विद्यापीठ सोडले. गॅलिलिओ यांना लहानपणापासून यांत्रिकीचीही आवड होती. एखादे यंत्र दिसले की ते खोलायचे आणि पुन्हा जोडायचे. ते कसे चालते हे समजून घ्यायचे, हा त्यांचा आवडता छंद. गणित हा तर त्यांचा आवडता विषय. शिक्षण बंद करून ते पुन्हा फ्लॉरेन्सला आल्यानंतर, आर्थिक अडचण सोडवण्यासाठी गावातील श्रीमंत मुलांच्या शिकवण्या घेऊ लागले. शिकवण्यामुळे त्यांना जसा पैसा मिळाला तशाच शहरातील प्रतिष्ठित आणि श्रीमंत लोकांच्या ओळखीही झाल्या.

असे म्हटले जाते की ते सतरा वर्षाचे असताना एकदा चर्चमध्ये गेले होते. प्रवचन ऐकताना त्यांना कंटाळा आला म्हणून ते वर लावलेल्या झुंबराकडे पहात होते. ते झुंबर हवेने हलत होते. त्याचे ते दोलन त्यांच्या मनात एक प्रयोगाचे बीज सोडत होते. ते घरी आल्या आल्या प्रयोग करू लागले. त्यांनी लंबक (पेंडूलम) तयार केला. लंबकाला झोका जास्त दिला काय किंवा कमी दिला काय लंबकाला एक आवर्तन पूर्ण करण्यास लागणारा कालावधी सारखाच असतो. लंबकाला खाली कमी किंवा जास्त वजन ठेवले तरी लंबकाचा आवर्तन काल तोच राहतो. मात्र, लंबकाची लांबी बदलली तर आवर्तन कालावधी बदलते. याच लंबकाचा वापर करून त्यांनी गतीचे नियम मांडले. तर ह्युजेन्सने लंबकाचे घड्याळ बनवले. गॅलिलिओंच्या या प्रयोगावेळी घड्याळ निर्माण झाले नव्हते. म्हणून वेळ मोजण्यासाठी त्यांनी आपल्या नाडीचा उपयोग केला. त्या चर्चमध्ये आजही एक जूना दिवा आहे आणि त्याला ‘गॅलिलिओचा दिवा’ म्हणून ओळखले जाते.

      विद्यार्थी असताना त्यांना अरिस्टॉटलच्या विचारांचा अभ्यास करावा लागला होता. त्यांना स्वत:लाही हे तत्त्वज्ञान शिकवावे लागत होते. त्यांना अनेक गोष्टी खटकत असत. मुलांना अभ्यासक्रमाप्रमाणे शिकवावे लागले, तरी, त्यांच्या मनात याबाबतचे विचार सुरू असत. फ्लोरेंस आणि सिएना भागात त्यांचे हे अध्यापन चालत असे. या कालखंडात त्यांनी पदार्थांचे वजन करण्यासाठी द्रवस्थितीक तुला (हायड्रोस्टॅटिक बॅलन्स) तयार केला. १५८६ मध्ये त्यांनी यावर ‘ला बिलान्सेटा’ म्हणजेच ‘छोटा तराजू’ ही पुस्तिका प्रकाशीत केली. तसेच त्यांनी बोलोना विद्यापीठामध्ये गणिताच्या प्राध्यापक पदासाठी अर्ज केला. मात्र त्यांची निवड झाली नाही. द्रवस्थितीक तुलेमुळे मात्र त्यांना लोक ओळखू लागले. त्याचवेळी गतीच्या नियमावर कार्य सुरू केले. पुढे वीस वर्ष ते या विषयावर कार्य करत होते. दरम्यान त्यांना फ्लोरेन्टाईन ॲकेडमीने ‘जगाची रचना’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी बोलावले. त्यांच्या अभ्यासाने आणि वक्तृत्वाने श्रोते फारच प्रभावित झाले. तसेच त्यांनी स्वत: गुरूत्वाकर्षण केंद्राबाबत काही गणितीय सिद्धांत एका पुस्तीकेत मांडले होते. यामुळे अनेक गणितज्ञ त्यांना ओळखू लागले होते. या कार्यामुळे प्रभावित झालेले गिडाबाल्डो डी मोंटे या विद्वान गणितज्ज्ञ आणि तंत्रज्ञाच्या शिफारशीवरून गॅलिलिओ यांना पिसा विद्यापीठामध्ये १५८९ मध्ये गणित अध्यापकाची नोकरी मिळाली.

      पगार कमी असला तरी आता स्थैर्य प्राप्त झाले होते. आता आपण अध्यापन करत असलेल्या अरिस्टॉटलच्या विचाराबद्दल त्यांच्या मनात विचार सुरू झाले. त्यांनी प्रयोगाच्या माध्यमातून त्यांची पडताळणी करायचे ठरवले. असाच अरिस्टॉटलचा सिद्धांत होता की उंचावरून एक जड आणि एक हलकी वस्तू खाली सोडली तर जड वस्तू लवकर पोहोचेल. गॅलिलिओ यांना हे पटत नव्हते. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यासह प्रत्यक्ष पिसाचा झुकता मनोरा गाठला. तेथे वर जाऊन दोन एकाच आकाराचे मात्र वेगवेगळ्या वजनाचे चेंडू वरून खाली टाकले. ते चेंडू एकाच वेळी खाली आले. अरिस्टॉटलच्या प्रसिद्ध तत्त्वापैकी एका तत्वाला गॅलिलिओ यांनी प्रयोगातून खोटे ठरवले. पदार्थ्यांच्या गतीवर त्यांनी ‘डी मोटू’ म्हणजेच गतीविषयक ही माहितीपुस्तीका प्रसिद्ध केली. त्यांनी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पिसा विद्यापीठात गॅलिलिओ स्वत:ला अरिस्टॉटलपेक्षा श्रेष्ठ मानतात अशी वंदता पसरली. त्यांचे अनेक सहकारी प्राध्यापकही नाराज झाले. दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. पिसा विद्यापीठातील त्यांचे नोकरीचे कंत्राट १५९२ सालच्या पुढे सुरू ठेवण्यास विद्यापीठाने नकार दिला.

      पिसा विद्यापीठातील नोकरी गेली तरी त्यांना लगेच पडुआ विद्यापीठामध्ये नोकरी मिळाली. पिसा विद्यापीठापेक्षा येथे वेतनही जास्त होते. या विद्यापीठात ते १६१० पर्यंत अध्यापन करत होते. विद्यापीठाकडून मिळणारे वेतन जास्त असले तरी कुटुंबाच्या वाढत्या जबाबदाऱ्याना ती रक्कम पुरेशी होत नव्हती. त्यांनी पुन्हा शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वत: रचना केलेले कंपास आणि भौमितीक साहित्य विक्री करायलाही सुरुवात केली. हे साहित्य जमीन मोजणीसाठी अत्यंत उपयुक्त होते. साहित्य बनवण्यासाठी त्यांनी एक कारागीर नियुक्त केला होता. तो त्यांच्या घरीच हे काम करत असे. त्यांनी लग्न केले नाही. मात्र ते व्हेनिसच्या मारीना गाम्बा यांच्यासह रहात. त्यांना व्हर्जिनिया आणि लिव्ह‍िया या दोन मुली आणि व्हिन्सेन्झ‍ियो हा मुलगा अशी अपत्ये होती. मुले लहान असतानाच गांबा यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी मुलांचे संगोपन स्वत:च केले.

त्यांनी गतीविषयक आपले संशोधन नेटाने पुढे नेले. एखादी वस्तू फेकली असता ती अन्वस्तीय (पॅराबोलीक) आकाराचा मार्ग क्रमण करते. त्या वस्तूने क्रमण केलेले अंतर हे वस्तूने तेथपर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेल्या वेळेचा वर्गाच्या प्रमाणात असते. हे दोन्ही निष्कर्ष पुन्हा अरिस्टॉटलच्या सिद्धांतांच्या विरूद्ध होते. वैद्यकिय शाखेच्या विद्यार्थ्याना खगोलशास्त्र शिकवताना टोलेमीच्या साहित्याचा अभ्यास करावा लागत असे. याचकाळात केपलर यांनी कोपर्निकसचे प्रकाशीत केलेले पुस्तक पडले. या पुस्तकात पृथ्वी स्वत:भोवती चोवीस तासात एक तर सूर्याभोवती एका वर्षात एक परिक्रमा पूर्ण करते असे लिहिले होते. हे पुस्तक वाचून त्यांनी केपलरना एक गुप्त पत्र पाठवले. त्यात लिहिले होते की, ‘असे असेल तर माझी खगोलशास्त्रीय समीकरणे याच्याशी तंतोतंत जूळत आहेत’. 

      सारे काही बरे चाललेले असताना, १६०९ मध्ये गॅलिलिओ यांच्या आयुष्यात वेगळेच वळण आले. ‘हॉलंड/नेदरलँडसच्या काही लोकांनी असे काही उपकरण तयार केले आहे की त्यातून पाहिल्यावर खूप दूरवर असणाऱ्या गोष्टी अगदी जवळ दिसतात’ अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. गॅलिलिओ यांनी लवकरच ते उपकरण मिळवले. त्यांनी सवयीप्रमाणे ते खोलले आणि त्याचे गुपीत समजून घेतले. यामध्ये साध्या भिंगांचा वापर करण्यात आला होता. याचा वापर प्रामुख्याने सैनिकी कारणासाठी केला जात असे. शत्रू सैन्याच्या हालचाली पाहण्यासाठी हे उपकरण छानच होते. गॅलिलिओ यांनी हे जमिनीवरील निरीक्षणासाठी वापरले जाणारे उपकरण आकाशाकडे वळवले. त्यातून ते आकाशातील ग्रह, तारे यांचे निरीक्षण करू लागले. त्या दुर्बिणी फक्त दुप्पट-तिप्पट मोठी प्रतिमा दाखवत होत्या. आज खेळण्यात मिळणाऱ्या दुर्बिणी यापेक्षा जास्त शक्तीमान असतात. तरीही त्याकाळी या दुर्बिणी सर्वत्र चर्चेचा विषय बनल्या होत्या.

एकिकडे आकाशाचे निरीक्षण सुरू असताना या उपकरणात दुरूस्ती कशी करता येईल याचे विचार गॅलिलिओ यांच्या मनात सुरू होते. बहिर्गोल आणि अंतर्गोल भिंगांच्या विविध प्रकारे रचना करून दुर्ब‍िणीची शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला त्यांनी आठ पट मोठी प्रतिमा दाखवणारी दुर्बिण तयार केली. व्हेनेटियन पार्लमेंटमध्ये या दुर्ब‍िणीचे प्रात्यक्ष‍िक दाखवले. या दुर्बिणीमुळे गॅलिलिओ यांना मोठा सन्मान मिळाला. त्याना विद्यापीठात आजीवन प्राध्यापक पद मिळाले. तसेच त्यांचे वेतन दुप्पट करण्यात आले. गॅलिलिओ विद्यापीठातील सर्वोच्च वेतन घेणारे प्राध्यापक बनले. त्यांनी सुरूवातीला या उपकरणाचा शोध हा शत्रूच्या हालचाली टिपण्यासाठी असाच केला होता. त्यांनी सैन्यदलाला त्याप्रमाणे सहाय्य केलेही. मात्र त्यांचे चित्त अवकाशाकडे लागले होते. त्यांनी भिंगांना आकार देण्याची कलाही आत्मसात केली. विविध प्रयोग करून त्यांनी वीसपट मोठी प्रतीमा दिसणारी दुर्बिण बनवली. तरीही ते दुर्बिणीची क्षमता आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी त्यांनी बत्तीस पट मोठी प्रतिमा दाखवणारी दुर्ब‍िण बनवली.

गॅलिलिओ यांनी आकाशातील ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण सुरू करेपर्यंत अरिस्टॉटल यांच्या म्हणण्यानुसार सर्व काही लोक मानत होते. पृथ्वी सपाट आहे. पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि तिच्याभोवती सर्व अवकाशातील ग्रह तारे प्रदक्षिणा घालत असतात. पृथ्वी ही विश्वाचा मध्य आहे. मनुष्यप्राणी हा सर्वात महत्त्वाचा प्राणी आहे. तो ईश्वराचा सर्वात आवडता आहे. माणसासाठीच विश्वाची निर्म‍िती झाली आहे. पृथ्वीच्या खाली नरक आहे तर वरती स्वर्ग आहे. अशा अनेक भन्नाट कल्पना होत्या.

अरिस्टॉटलने इसवी सन पूर्व चवथ्या शतकात जी विचारसरणी मांडली ती जनमानसांच्या मनात इतकी घट्ट झाली होती की त्याविरूद्ध कोणी बोलले तर त्याला वेडा ठरवले जात असे. पुढे टोलेमी या महाशयानी याला धर्माची सांगड घालत व्यवस्थित रचले. त्यानंतर तर हे विश्व जणू अरिस्टॉटल आणि  टोलेमी यांनी आखून दिलेल्या नियमानुसार चालते, अशी सर्वांची समजूत झाली. हे सारे ख्र‍िश्चन धर्मग्रंथानुसार होते. त्यामुळे त्याकाळात पोप यांची सत्ता निरंतर चालणार अशी सर्वत्र धारणा झाली होती. पोप यांचा निर्णय सर्वोच्च असे. या सर्व संकल्पनातून ग्रह-ताऱ्यांच्या गतीची गणिते सुटत नव्हती. त्यामुळे काही विद्वानानी याला छेद देणाऱ्या भूमिका मांडल्याही. अरिस्टार्कस या खगोल शास्त्रज्ञाने तिसऱ्या शतकात पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे कोणीही ऐकले नाही. त्यानंतर गिल्बर्ट आणि कोपर्निकस यांनी या विषयावर काम केले. गिल्बर्ट यांनी पृथ्वी सपाट नाही, ती गोल आहे, हे सांगीतले. त्याकाळातील दळणवळणाच्या सुविधा मर्यादित असल्याने त्यांचे विचार रोममधील धर्म पीठापर्यंत कदाचित पोहोचले नसावेत.

कोपर्निकस यांना आपल्या संशोधनावर विश्वास होता. मात्र, धर्मसत्तेचा रोष नको असल्याने त्यांनी सरळ आपले पुस्तक पोपनाच अर्पण केले. त्यानंतरही या पुस्तकातील विचार हे अरिस्टॉटल-टोलेमी यांच्या तत्त्वाविरूद्ध आहेत, हे लक्षात आल्यानंतर ‘त्यामध्ये सुधारणा करेपर्यंत त्या पुस्तकावर बंदी घालण्यात आली’. मात्र तोपर्यंत हे पुस्तक अनेकापर्यंत पोहोचले होते. या पुस्तकामध्ये ग्रहताऱ्याबद्दल त्यांनी अनेक सिद्धांत मांडले होते. सामान्य माणसाला पृथ्वी फिरते, हे पटणार नाही पण विद्वानांना गणिताच्या आधारे हे पटवून देता येईल, अशी त्यांची धारणा होती. त्या काळात कॅलेंडरमध्ये अनेक त्रुटी होत्या. त्या कोपर्निकसच्या सिद्धांतानुसार दुरूस्त करता येत होत्या. त्यानुसार कोपर्निकसचे सिद्धांतांचा दिनदर्शिकेतील त्रुटी काढण्यासाठी वापर सुरू ठेवण्यात आला. मात्र त्यांच्या पुस्तकावर बंदी कायम राहिली.

या सर्व संकल्पना वाद विवादावर शेवटचा घाव गॅलिलिओ यांनी घातला. त्यांनी कोपर्निकसचे सिद्धांत सिद्ध केले असे नाही तर अरिस्टॉटल आणि टोलेमीचे म्हणणे चूकीचे आहे हे सिद्ध केले. त्यांनी आपली दुर्ब‍िण आकाशाकडे वळवली आणि चंद्राच्या कलांचा अभ्यास केला. चंद्राचा पृष्ठभाग पाहिला. चंद्रावरील खडक, दऱ्याखेऱ्यांचे दर्शन घेतले. चंद्राला स्वत:चा प्रकाश नाही. चंद्र हा ही पृथ्वीप्रमाणे दगड मातीचा असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी आपले निरीक्षण चंदा्रपुरते मर्यादित ठेवले नाही. गुरू या ग्रहाभोवती चंद्राप्रमाणे चार उप्रग्रह आहेत. केवळ डोळ्यांना न दिसणारे असंख्य तारे अवकाशात आहेत. शनीचा अवतार इतरापेक्षा वेगळा असल्याचे पडुआ विद्यापीठात त्यांच्या लक्षात आले होते. मात्र फ्लोरेंस येथे आल्यानंतर शनीभोवती कडे असल्याचे त्यांनी शोधून काढले. चंद्राप्रमाणच शुक्रालाही कला असतात, या कलांचे निरीक्षण करणारे गॅलिलिओ हे पहिले मानव. या सर्व निरीक्षणावर त्यांनी ‘दी स्टोरी मेसेंजर’ नावाचे पुस्तक लिहिले. त्यांच्या लेखनावर आणि संशोधनावर निर्माण होणारे वाद लक्षात घेऊन ते परत फ्लोरेन्सला परतले. फ्लोरेन्स विद्यापीठात ते अध्यापन करू लागले.

दरम्यान केपलर यांनीही अशाच प्रकारचे सिद्धांत मांडले होते. त्यांनी गॅलिलिओ यांना एक दुर्ब‍िण द्यावी, अशी विनंती केली. मात्र गॅलिलिओ यांनी अशी दुर्ब‍िण आपल्याकडे शिल्लक नसल्याचे व नवी बनवण्यासाठी वेळ नसल्याचे कळवले. त्यावेळी निरीक्षण आणि दुसरीकडे पुस्तके प्रकाशनाचे काम जोरात सुरू होते. दरम्यान १६१३ मध्ये त्यांचे सौर डागासंदर्भातील निरीक्षणावर ‘लेट्टर्स ऑन सनस्पॉट’ हे पुसतक प्रकाशीत झाले. त्यांच्या कार्याने त्यांना अनेक शत्रू निर्माण झाले होते. गॅलिलिओ अरिस्टॉटल-टोलेमी यांच्या सिद्धांताना विरोध करतात आणि कोपर्निकसच्या सिद्धातांची पाठराखण करतात अशा तक्रारी चर्चकडे गेल्या. त्या तक्रारीनंतर १६१६ मध्ये गॅलिलिओ यांना ‘कोपर्निकसच्या सिद्धांताना मानू नये, शिकवू नये आणि त्याचा प्रसार करू नये’ अशी सक्त ताकित देण्यात आली. त्यांनी त्यांच्या आयुष्यात आठ पुसतकांचे लेखन केले. गॅलिलिओ आपले विचार आणि निरीक्षणे प्रकाशीत करत. एवढेच नाही तर प्रत्यक्ष लोकांना दुर्ब‍िणीतून दाखवत. त्यामुळे लोकांचा त्यावर विश्वास बसू लागला. यावर त्यांच्या हितशत्रूनी गॅलिलिओ लोकांना जादूटोणा करून भ्रमीत करतात. यातून धर्माला धोका निर्माण झाला आहे. अशा तक्रारी पुन्हा होऊ लागल्या.

या तक्रारी सुरू असतानाच त्यांचे मित्र आणि त्याकाळातील प्रसिद्ध गणितज्ञ मफिओ बार्बेरिनी हे पोप झाले. गॅलिलिओना आता पुन्हा मुक्तपणे संशोधन करता येईल असे वाटत होते. ते पोप झाल्यानंतर गॅलिलिओ त्यांना भेटले. तसे ते स्वत: वैज्ञानिक असल्याने गॅलिलिओ यांचे कार्य आणि त्याचे महत्त्व ओळखून होते. त्यांनी गॅलिलिओंना मानाने वागवले. तसेच कोपर्निकसच्या कार्यावर संशोधन करण्यासही अनुमती दिली.

मात्र अनेक लोक गॅलिलिओंच्या विरोधात तक्रारी करतच होते. पोप यांच्यावर दबाव वाढत होता. तरीही पोप यांनी गॅलिलिओ यांना विश्वाबद्दल लेखन करण्यास सशर्त परवानगी दिली. त्यांना अट घालण्यात आली होती की त्यांनी कोपर्निकसच्या सिद्धांतांचे उदात्तीकरण करू नये. उलट कोपर्निकसचे कार्य हे केवळ काल्पनिक असल्याचे सांगावे. १६३० मध्ये त्यांनी कोपर्निकस आणि टोलेमी यांच्या संकल्पनावर आधारीत पुस्तक तयार केले आणि पोप यांच्या मान्यतेसाठी रोमला पाठवले. मात्र त्याचकाळात उद्भवलेल्या प्लेगच्या साथीने त्यांना रोमवरून प्रतिसाद मिळू शकला नाही. शेवटी त्यांनी फ्लोरेन्स येथेच त्या लिखाणाची पडताळणी व्हावी असा आग्रह धरला. रोममधून त्यांच्या लेखणावर मोठे आक्षेप घेण्यात आले होते. शेवटी १६३२ मध्ये हे लेखन काल्पनिक असल्याचे नमूद करून फ्लोरेन्समध्ये पुस्तक प्रकाशीत झाले.     

त्यांच्याविरूद्धच्या तक्रारी लक्षात घेऊन त्यांना रोमला चौकशीसाठी बोलावण्यात आले. १६३२ मध्ये त्यांची चौकशी सुरू झाली. गॅलिलिओना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येत होती. मात्र पोप वगळता अन्य सदस्य ‘गॅलिलिओ, धर्म बुडवायला निघाला आहे’, असे म्हणत त्याची बाजू ऐकायला तयार नव्हते. गॅलिलिओ उपकरणाच्या सहाय्याने निरीक्षण करायची विनंती करत होते. तीही मानत नव्हते. अखेर त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, असे अध्यक्षांनी सूचविले. अन्य सदस्यही त्याच मताचे होते. मात्र पोप यांनी रदबदली करून त्यांनी माफी मागीतली तर नजरकैदेची शिक्षा द्यावी, असे सूचवले. त्यानुसार गॅलिलिओ यांनी ‘मी गॅलिलिओ, फ्लॉरेन्स विद्यापीठातील गणित व वास्तवशास्त्राचा प्राध्यापक असे जाहिरपणे कबूल करतो की माझी मते चूकीची आहेत. सूर्य हा विश्वाचे केंद्र व पृथ्वी त्याभोवती फिरते, हे माझे मत चूकीचे आहे. ते मी मागे घेतो. तसेच पवित्र चर्चच्या विरूद्ध जे जे आहे. त्या सर्व मतांचा मी मन:पुर्वक आणि दृढतेने, श्रद्धेने त्याग करतो’ असे निवेदन केले. त्यामुळे त्यांची फाशी टळली. सुरुवातीला शासनाने ठरवलेल्या वाड्यात आणि नंतर त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवले. विशेषत: तीन मित्रांच्या अरिस्टॉटल, कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांच्या सिद्धांतावर गप्पा असणारा ‘दि डायलॉग’ हा ग्रंथ धर्मपीठाच्या रागाचे कारण होता. या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. मात्र तोपर्यंत त्याच्या अनेक प्रती विदेशात पोहोचल्या होत्या.

या माफीनाम्यानंतर गॅलिलिओ फ्लॉरेन्स जवळच्या खेडे गावात नजरकैदेत राहण्यासाठी गेले. तेथे प्रत्यक्ष घरात जाण्यापूर्वी त्यांनी ‘इप्पर सी मूव्हज’ असे मातीत लिहिले होते असे म्हटले जाते. चर्चबाहेर की घराबाहेर हे निश्चित नाही. मात्र लिहिले हे निश्चित. या इटालियन भाषेतील वाक्याचा अर्थ होतो, ‘तरीही तीच फिरते’. मी माफी मागीतली तरी सत्य बदलत नाही. सूर्य नाही तर पृथ्वीच फिरते, असे ते सूचवत होते.  १९११ मध्ये गॅलिलिओ यांच्या निधनानंतर एकदोन वर्षात काढलेले एक चित्र प्रकाशीत झाले. गॅलिलिओ यांनाही चित्रकलेची आवड होती. त्यांच्या समकालीन चित्रकाराने काढलेल्या गॅलिलिओच्या चित्रावर ही अक्षरे लिहिलेली आढळली. गॅलिलिओ यांच्या निधनापूर्वी या वाक्याचा प्रसार अनेक देशात आणि विशेषत: इटलीमध्ये झाला होता. गॅलिलिओंच्या प्रथम चरित्रात या वाक्याचा उल्लेख नसला तरी इंग्रजी पुस्तकात हे वाक्य आलेले आहे.

आर्थ‍िक चणचणीमुळे त्यांना मुलींच्या लग्नामध्ये हुंडा देणे परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी मुलींना धार्मिक शिक्षण दिले. यातील धाकटी कन्या लिव्हिया नन झाली. मोठी कन्या व्हर्जिनिया मात्र त्यांच्यासमवेत रहात असे. तिने आपल्या पित्याची अखेरपर्यंत सेवा केली. गॅलिलिओ यांनी माफी मागीतल्याने त्यांचा शिष्यवर्ग नाराज झालेला असतो. अँड्री सार्टी हा असाच त्यांचा एक आवडता शिष्य होता. मात्र मोठ्या कष्टाने सिद्ध केलेली वैज्ञानिक सत्य स्वत:च नाकारल्याने, तो खुप निराश झाला होता. त्यांने इटलीमध्ये झालेली विज्ञानाची पिछेहाट पाहून हॉलंडला जावयाचे ठरवले. इटली सोडण्यापूर्वी एकदा गुरूला भेटायचे म्हणून तो गॅलिलिओ यांना भेटायला येतो. त्या दोघामध्ये चर्चा सुरू असताना गॅलिलिओ त्याला ‘मेकॅनिक्स अँड लॉज ऑफ फॉलींग बॉडीज’ या ग्रंथाचे हस्तलिखित पृथ्वीच्या गोलातून काढून दिले. या ग्रंथाची मूळ प्रत सैनिकांनी जप्त केलेली होती. ते हस्तलिखित पाहून अँड्री यांना मोठे आश्चर्य वाटते. आपल्या गुरूने माफी मागून युरोपमधील विज्ञान संपवले, असे आजवर त्यांना वाटायचे. मात्र माफी मागीतली नसती तर त्यांना फाशी झाली असती. गॅलिलिओ यांचे कार्य थांबले असते. उलट त्यांनी माफी मागून विज्ञान न थांबू देता, ते वाढवले याची त्यांना खात्री पटली. गॅलिलिओ यांनी आपल्या चरित्राला माफीचा डाग लागू दिला. पण विज्ञानाचीच सेवा केली, विज्ञान वाढवले हे पाहून त्याच्या मनात गॅलिलिओबद्दलच आदर वाढला.

हे पुस्तक अँड्री सार्टी यांना आपल्या जबाबदारीवर न्यायचे होते. पुस्तक त्यांच्याजवळ सापडले असते तर सार्टी यांना शिक्षा झाली असती. त्यामुळे सार्टी यांनी आपल्या इतर पुस्तकात हे हस्तलिखित मिसळले. ज्यावेळी अँड्री इटलीच्या सीमेवरून हॉलंडला जात होता. तेंव्हा त्यांच्या सामानाची झडती झाली. त्यामध्ये बावीस पुस्तके आणि खाली हे हस्तलिखित होते. पोलीसांनी पुस्तके नेमकी कशाची आहेत हे तपासले नाही आणि गॅलिलिओ यांचे हे हस्तलिखित पुस्तक इटलीच्या बाहेर गेले. हे पुस्तक पुढे १६३८ मध्ये इटलीच्या बाहेर प्रसिद्ध झाले.

गॅलिलिओ यांची सर्व काळजी त्यांची मोठी कन्या व्हर्जिनिया घेत होती. गॅलिलिओना हळूहळू अंधत्व येऊ लागले होते. त्यातच १६३४ मध्ये व्हर्जिनियाचे अकाली निधन झाले. त्यांनंतर त्यांची काळजी त्यांचा एक तरूण विद्यार्थी विन्सेन्झो विवियांनी घेत होता. कन्येच्या निधनानंतर ते खचले होते. दुर्ब‍िणीचा वापर पूर्ण थांबला होता. मात्र सळीला वाकवणे, तिची ताकत तपासणे हे त्यांचे प्रयोग सुरूच होते. त्यांनी गतीविषयक प्रयोगही सुरू होते. पूर्ण अंधत्व आले तरी हे प्रयोग विवियांनी यांच्यासमवेत सुरू होते. अखेर नजरकैदेत असताना दिनांक ८ जानेवारी १६४२ रोजी त्यांचे निधन झाले.  

गॅलिलिओ यांच्या इच्छेनुसार त्यांचे दफन अन्य कुटुंबियांच्या दफन स्थळाजवळ करण्यात आले. ते थोर संशोधक होते. त्यांच्या कार्याचे मोठेपण जाणणाऱ्या विवियानी यांनी त्यांचे दफन सन्मानाने थोरांच्या दफन स्थळाजवळ व्हावे असे प्रयत्न आयुष्यभर केले. मात्र त्यांचय प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी विवियांनी यांचे निधन झाले आणि त्यांचे शवही गुरू गॅलिलिओ यांच्याशेजारी दफन करण्यात आले. गॅलिलिओच्या निधनानंतर एक वर्षातच ४ जानेवारी १६४३ मध्ये न्यूटनचा जन्म झाला. कोपर्निकस, केपलर आणि गॅलिलिओच्या खांद्यावर न्यूटन यांचे संशोधन उभे राहीले. त्यानंतर गॅलिलिओच्या कार्याचे महत्त्व लोकांच्या लक्षात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने औद्योगिक क्रांतीची सुरूवात झाल्यानंतर १७३७ मध्ये खास तयार करण्यात आलेल्या ठिकाणी गॅलिलिओ यांचे शव पुन्हा दफन करण्यात आले. तरीही धर्म सत्तेने त्यांच्यावर घातलेली बंधने तशीच कायम होती. सतराव्या शतकात टाकलेला हा बहिष्कार विसाव्या शतकापर्यंत कायम होता.

विज्ञानातील प्रगतीने मानवाने चंद्रावर पाऊल टाकले. पृथ्वी आणि सौर मालेबद्दलच्या अरिस्टॉटल आणि टोलेमीच्या संकल्पना पूर्ण चूकीच्या आहेत हे जगाने मान्य केले. तरीही ही बंदी विसाव्या शतकाच्या अखेर कायम होती. शेवटी हे बहिष्कार प्रकरण फारच हास्यास्पद ठरू लागले. तेंव्हा १९९० मध्ये पोप जॉन पॉल यांनी गॅलिलिओच्या चौकशी प्रकरणाची सर्व कागदपत्रे शोधून काढली. त्या सर्व कागदपत्राचे अवलोकन करून १९९२ मध्ये व्हॅटकिनने गॅलिलिओ यांना पावन करून घेतल्याचे आणि त्यांच्यावरील बहिष्कार उठवल्याचे जाहिर केले. मात्र त्याअगोदर तीन वर्ष गॅलिलिओ नावाचे यान गुरू ग्रहाच्या दिशेने अवकाशात झेपावले होते. ही खऱ्या अर्थाने गॅलिलिओ यांना दिलेली मानवंदना होती. 

१९७८ मध्ये गॅलिलिओ यांच्या सन्मानार्थ सेंटीमीटर-ग्रॅम-सेकंद या एककांच्यामध्ये गुरूत्वीय त्वरण मापनाचे एकक म्हणून गॅल (Gal) या एककास मान्यता दिली. एक गॅल म्हणजे ०.०१ मीटर प्रती वर्ग सेकंद (1Gal = 0.01m/s2) असते. पृथ्वीचे गुरूत्वाकर्षण हे ९७६ ते ९८३ गॅल इतके भरते. ध्रुवावर ते जास्त असते. तर विषुववृत्तावर ते कमी असते. एककाचे नाव लिहिताना gal असे तर एकक म्हणून Gal असे लिहिले जाते. गॅलि‍लिओ यांनी सर्वप्रथम गुरूत्वीय त्वरण मोजले होते. यामुळे त्यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले आहे. प्रामुख्याने भूकंपावेळी गुरूत्वीय त्वरणामध्ये होणारे बदल मोजताना हे एकक वापरले जाते. या एककाला गॅलिलिओ असेही उच्चारले जाते.  


५ टिप्पण्या:

  1. गॅलिलिओच्या चरित्रावर आधारित डॉक्टर शिंदे सरांचा लेख आज दिनांक 13 जुलै 2023 रोजी सकाळी सव्वा सात वाजता समाज माध्यमाद्वारे वाचण्यात आला . सकाळी सव्वा सात ते सव्वा आठ या एक तासांमध्ये शांतपणे वाचला. तसा हा लेख पंधरा मिनिटात सुद्धा वाचून संपवता आला असता , पण प्रत्येक वाक्य वाचून लक्षात ठेवणे गॅलेलियो बद्दल यापूर्वी जे ऐकलं आणि वाचलं होतं त्या माहितीशी शिंदे सरांनी लिहिलेला मजकूर ताडून पाहणे तसेच आतापर्यंत मी माझ्या खगोलीय स्लाईड शो कार्यक्रमांमध्ये गॅलिलिओबद्दलच जे सांगत होतो हे सुद्धा ताडून पहात वाचत गेलो म्हणून पंधरा मिनिटाच्या वाचनाला एक तास लागला. या लेखाच्या आधारे भविष्यात जेव्हा मी विज्ञानाचा इतिहास सांगण्याचा कार्यक्रम करत राहीन, तेव्हा अचूक माहिती मला जनसामान्यापर्यंत पोहोचवता येईल , माझ्या आवडत्या विषयातील ज्ञानात भर टाकल्याबद्दल मी व्ही. एन. शिंदे सरांचे आभार मानतो,.

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर लिखाण. गॅलीलियो ची संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे सर्व विज्ञान चाहत्यांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल खरंतर आपल कौतुक करावं तेवढं कमीच. एक विज्ञानाचा शिक्षक म्हणून मला आपलं लिखाण खूप आवडलं. फार बारीक आणि मोलाच्य गोष्टी आपण लेखांमध्ये समाविष्ट करून घेतलेल्या आहेत. असेच लिखाण करत रहा. आपले आभार आणि धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. Very informative and inspirational blog. In spite of your busy schedule, you take the time to write blogs and share versatile information on various topics. This is truly motivating for us.

    उत्तर द्याहटवा