रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

रातराणीचा गंध, करी बेधुंद

 

रातराणी. ‘Beauty with Aroma’ बनलेली. कधी कधी वाटतं निसर्गात फुले नसती, तर माणसाला सुगंध तरी कळला असता का? फुलांच्या दर्शनाने, त्याच्या सुगंधाने मनावरचा ताण, मनातील संताप दूर होतो. मन प्रसन्न होते. मात्र रातराणी, राणी असूनही तिचे वर्तन एखाद्या निर्मोही साधूसारखे. जे, जे आहे ते इतरांना देणारे आणि स्वत:साठी काहीही न राखून ठेवणारे. रातराणीचा सुगंध आवडत नाही असा माणूस विरळाच. ही रातराणी आपल्या सुगंधाने केवळ प्रफुल्लित करते असे नाही तर सकारात्मक ऊर्जाही देते, असे मानतात. या रातराणीपासून आपणही काही घ्यायला हवे… पण काय?

रातराणी या वनस्पतीबद्दल आणि या झाडाबद्दलच्या माझ्या आठवणीबद्दलचा लेख.......

_________________________________________________________

ढगाळ वातावरणामुळे दिवस कसा आळसावल्यासारखा गेला होता. संध्याकाळचे साडेसात वाजले तरी वातावरण तसेच होते. आकाशात असणाऱ्या बिनपावसाच्या ढगांनी जसे वातावरण कुंद झाले होते. तसंच मनावरही मळभ आले होते. कंटाळा आल्याचे जाणवत होते. पण हा कंटाळा कामामुळे नव्हता. हा केवळ वातावरणाचाच परिणाम होता. अशा वातावरणात कार्यालयातून बाहेर पडलो. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात येताच वाऱ्याची एक झुळूक आली आणि मन प्रसन्न करून गेली. सारा कंटाळा, थकवा, मनावरचे मळभ कुठल्या कुठे दूर पळून गेले. मन प्रसन्न झाले कारण तो वारा एकटा आला नव्हता, तर, सोबत रातराणीचा गंध घेऊन आला होता.

रातराणी. सुगंधी फुल येणारी ही एक झुडुपवर्गीय वनस्पती. सोलॅनेसी कुलातील.‍ या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सेस्ट्रम नॉक्टर्नम आहे. रातराणी ही तशी दक्षिण अमेरिका, वेस्ट इंडिज या भागातून जगातील सर्व उष्ण कटिबंधीय देशात पसरली. या वनस्पतीच्या दोनशेपेक्षा जास्त प्रजाती असल्या तरी भारतात केवळ आठ जाती आढळतात. हे सदाहरित झुडूप दहा बारा फुट उंच वाढते. मात्र चांगला आधार मिळाला, तर, या झाडाच्या फांद्या चांगल्या तीस फुटापर्यंत वाढतात. स्वतंत्रपणे मात्र अशी रातराणीची वाढ होत नाही. जरा जोराचा वारा आला तरी उंचावरील फांद्या मोडतात. राजारामपूरीतील भाजीमंडईच्या कोपऱ्यावरील म्हसोबा मंदिरासमोर या झुडुपाला स्वस्तिकच्या झाडाचा चांगला आधार मिळाला आहे. तेथे रातराणी चांगली झाडासारखी वाढली आहे. फुलते पण छान. नेहमी रातराणीची जमिनीलगत फुले पाहायची सवय असणाऱ्या लोकांना त्या परिसरात दरवळणारा सुगंध कोठून येतो, हे लवकर समजत नाही.

रातराणी ही खूप नाजूक वनस्पती आहे. वनस्पतीना तो, ती, ते मध्ये वर्गीकरण करणाऱ्यानी काय आधार घेतला माहीत नाही. मात्र मोगरा ‘तो’ असतो, तर रातराणी, जाई, जुई, चमेली या ‘ती’ असतात. कदाचित या वनस्पती खूपच नाजूक असल्याने आणि त्यांना खूप सांभाळावे लागत असल्याने त्यांचा समावेश ‘ती’ गटात केला असावा. मोगरा एकदा रूजल्यानंतर पुढे हेळसांड झाली तरी मरत नाही, म्हणून ‘तो’ मोगरा झाला असावा. रातराणीची मात्र चांगली काळजी घ्यावी लागते. रात्री फुलल्यानंतर सुगंध पसरवणाऱ्या निशिगंध, जाई, जुई, चमेली, मोगरा, कवठी चाफा, पारिजातक, मधुमालती अशा अनेक वनस्पती असल्या तरी रातराणीची सर यापैकी कोणालाच नाही. म्हणूनच तर ती रातराणी आहे. 

रातराणी सदाहरित वनस्पती आहे. तिला एकाआड एक पोपटी पाने येतात. तिच्या फांद्या या नाजूक आणि पातळ असतात. या झाडाच्या फांदीपासून सहज रोपे तयार होतात. अंगठ्याच्या आकाराचे आठ नऊ इंचाचे खोड घेतले आणि मऊ मातीत रोवले, त्याला पाणी दिले की ते फुटतेच. सुरुवातीला फांद्याचा रंगही हिरवा असतो. उलट तो पानांपेक्षाही गडद असतो. पुढे खोड वाढल्यानंतर ते पांढरा रंग धारण करते. पाने साधी आणि पातळ असतात. पानाच्या मध्ये असणारी शीर ही खूपच उठावदार असते. पाने दहा ते बारा सेंटिमीटर लांबीची असतात. ती पुढच्या टोकाला निमुळती होत जातात. ती जून झाली की गळतात. मात्र सर्व पाने एकावेळी झडत नाहीत. झाडाला पाणी, खत आणि हवा मिळाली की झाड सुसाट वेगाने वाढायला सुरुवात होते. याच्या फांद्यांना आणखी फांद्या फुटतात आणि झुडुप डेरेदार व्हायला लागते. ही झाडे चांगले वातावरण मिळताच इतकी वेगाने वाढतात की शेजारच्या झाडावर अतिक्रमण करतात. हे झाड बहुवर्षीय आहे. या झाडाच्या फांद्या कापल्या तर लगेच त्याला फांद्या फुटून वाढायला सुरुवात करतात. या कापलेल्या फांद्यांचा उपयोग नवी रोपे तयार करण्यासाठी करता येतो. 

पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत, कुंडीत हे झाड वाढते. रातराणी प्रामुख्याने बागांमध्ये लावले जाते. गैरसमजामुळे काही लोक घराशेजारी हे झाड लावणे टाळत. रातराणीच्या सुगंधाने साप या झाडाजवळ येतात, असा अनेकांच्या मनात गैरसमज होता. मात्र विज्ञानाच्या दृष्ट‍िकोनातून हे पूर्णत: चूक आहे. मात्र आता लोकांमध्ये जागरूकता आली आहे. आता ते अनेकांच्या बागांमध्येही दिसू लागले आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी झाड बिनधास्त लावावे, या झाडामुळे साप येत नाहीत. 

झाड थोडे मोठे झाले की पानाच्या बेचक्यातून कळ्यांचे घोस बाहेर पडायला सुरुवात होते. नीट निगा राखलेल्या झाडाला अगदी वर्षाच्या आतच कळ्या येतात. या कळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात असतात की झाडाला पाने कमी आणि कळ्या जास्त असे चित्र निर्माण होते. या कळ्या लांब फिकट पिवळ्या रंगाच्या असतात. कळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात येतात की फांद्या ओझ्याने खाली वाकतात. रातराणीच्या कळ्या रात्री उमलतात आणि संपूर्ण परिसरात सुगंधाची पखरण करतात. सूर्य मावळल्यानंतर तासाभरांने सुगंध पसरायला सुरूवात होते. रात्र जशी वाढत जाते तसा हा सुगंध तीव्र होत जातो. या गंधीत वातावरणात कसालाही कंटाळा असो, थकवा असो कुठल्या कुठे पळून जातो. त्याचा मंद सुगंध मनाला मोहित करतो. ही सुगंधाची उधळण केवळ रात्रीच होते. त्यामुळेच याला अत्यंत समर्पक रातराणी, नाईट क्वीन, नाईट जस्मिन या नावाने ओळखले जाते. रातराणीच्या फुलांच्या पाकळ्या चांदणीप्रमाणे दिसतात, त्यामुळे त्याला चांदणीचे झाडही म्हणतात. रात्री निर्धास्तपणे फुलणारी रातराणी सूर्याला परके मानत असावी. झुंजूमुंजू होताच, सूर्याच्या उगवण्याची चाहूल लागताच या कळ्या मिटू लागतात. या कळ्या चार पाच रात्र फुलतात आणि नंतर बहुतांश कळ्या गळून जातात. कळ्या खालून वर उमलत जात असल्याने हा ‘गंध सोहळा’ दहा ते पंधरा दिवस सुरू असतो. अपवादात्मक कळ्यांचे फळात रूपांतर होते. झाडांना खरा बहर उन्हाळा आणि पावसाळ्यात येतो. मात्र झाडाची निगा नीट राखलेली असेल आणि त्याची छाटणी व्यवस्थित केली तर वर्षातून चार-पाच वेळा फुलते. रातराणीच्या फुलांचे दलपुंज खाली नळीसारखे येते. रातराणीच्या फुलांना पाच लहान पाकळ्या असतात. चांदणीचा आकार तयार करतात. त्या अंडाकृती, उभट आणि टोकाला बोथट असतात. रातराणीच्या काही फुलांच्या परागीभवनातून हिरवी फळे तयार होतात. त्यामध्ये अनेक लहान बिया असतात. मात्र रातराणीचे पुनरूत्पादन बियांपासून क्वचितच होते.

राततराणीच्या फुलांपासून अत्तर बनवले जाते. काही महिला रातराणीच्या फुलांचे गजरेही बनवतात. क्वचित असे गजरे विकलेही जातात. याच कुळातील दिवसा फुलणारे सेस्ट्रम डाययुर्नम या झाडाला डे जस्मिन किंवा ‘दिन का राजा’ असे म्हणतात. मात्र हा दिन का राजा ‘दिल का राजा’ बनू शकत नाही. रातराणीची जागा त्याला घेता येणे शक्य नाही. त्याचा सुगंध आणि सौंदर्य रातराणीच्या जवळही पोहोचत नाही.

कधी कधी वाटतं निसर्गात फुले नसती, तर माणसाला सुगंध तरी कळला असता का? फुलांच्या दर्शनाने,


त्याच्या सुगंधाने मनावरचा ताण, मनातील संताप दूर होतो. मन प्रसन्न होते. रातराणीचा सुगंध मनाला सकारात्मक विचार करायला भाग पाडतो. याच विचाराने विद्यापीठातील एफ-४ निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन रातराणीची रोपे लावली होती. आंब्याजवळही एक रोप लावले होते. आंब्याजवळचे रोप आंब्याच्या आधाराने चांगले पंचवीस फूट उंच झाले होते. या रातराणीचा वास अतिथीगृहापर्यंत पसरत असे. ही झाडे फुलली की दहा पंधरा रात्री संपूर्ण घर सुगंधीत झालेले असे. नऊ वर्षाच्या वास्तव्यानंतर मी निवासस्थान सोडून अपार्टमेंटमध्ये गेलो. निवासस्थान सोडले तरी रातराणीची आठवण जात नव्हती. शेवटी आम्ही कुंडीत रातराणी लावली आणि ती छान फुलायची. माझ्यानंतर त्या निवासस्थानात राहणाऱ्या अधिकाऱ्याने साप येतात या गैरसमजातून त्या झाडाची बेसुमार कत्तल केली. मात्र त्याला पूर्ण नामशेष होऊ दिले नव्हते.

शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. फुलांची झाडेही आहेत. मात्र एक उणीव कायम जाणवत असे. ती म्हणजे या परिसरात सुगंधी फुलांच्या वनस्पती नाहीत. प्रशासकीय काम पाहताना अनेकदा कर्मचारी, अधिकारी संध्याकाळी उशिरांने घरी जातात. दिवसभरात कधीकधी तणावाचे प्रसंगही आलेले असतात. तो तणाव घरी घेऊन जाणे कुटुंब स्वास्थ्यावर परिणाम करते. अशावेळी मन प्रसन्न करणाऱ्या रातराणीचा सुगंध पसरलेला असेल तर… हाच विचार घेऊन उद्यान विभागामार्फत मुख्य इमारतीच्या पुढे असणाऱ्या दोन्ही त्रिकोणाच्या तीन कोपऱ्यावर रातराणीची झाडे लावली. ही झाडे लावण्यासाठी रोपे विकत आणण्याऐवजी एफ-४ निवासस्थानाबाहेर असणाऱ्या झाडाच्या फांद्या आणून रोपे बनवली आणि ती रोपे लावली. काही दिवसातच विद्यापीठातील कर्मचारी, विद्यार्थी आणि फिरायला येणाऱ्या लोकांचे हे दोन्ही त्रिकोण आकर्षणाचे केंद्र बनले.

त्याचा पुढचा टप्पा म्हणून अनेक ठिकाणी ही रातराणीची रोपे बनवून लावली आहेत. विद्यापीठातील अनेक रस्त्याच्या कडेला रातराणी लावली आहे. रातराणी अनेक कवी, लेखकांच्या आवडीची आहे. कविता आणि गद्यातही रातराणीला मोठे स्थान मिळालेले आहे. विवेक पुराणिक या कवीने ‘रातराणी’ या कवितेत म्हटले आहे,

‘बहरली रातराणी अन् बहरून येई चंद्र,

गारव्यात प्रीतिच्या उभय जाहली मुग्ध बेधुंद

त्या धुंदितच रातराणी लाल गुलाबी स्वप्नी रंगते’

रातराणीला पाच मदन बाणातील एक असेही म्हटले जाते. रातराणीचा संदर्भ कथा, कादंबऱ्यात आणि कवितामध्ये या अनुषंगानेच आला आहे. प्रेमकथा आणि कवितामध्ये रातराणी राणीसारखी विराजमान झालेली दिसते. रातराणीचा खूप सुंदर वापर १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘अमर प्रेम’ या चित्रपटात केला आहे. शर्मिला टागौर (पुष्पा), राजेश खन्ना (आनंद) यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटात रातराणीचे वर्णन करणारे सुंदर संवाद राजेश खन्नाच्या मुखातून ऐकायला मिळतात.

मात्र, रातराणीचा फुललेला फुलोरा, फुलल्यानंतर आसमंत सुगंधीत करणे आणि सुगंध पसरवून झाल्यानंतर गळणे पाहिल्यानंतर मनात विचार येतात यातून झाडाला काय मिळते? काहीच नाही. रातराणीची फुले फुलून त्यातून परागीभवनही अपवादानेच घडते. त्यामुळे प्रजननाचाही भाग नाही. रातराणीचे झाड वाढते ते इतराना ऑक्सिजन देण्यासाठी, झाड फुलते इतरांना सौंदर्यसुख देण्यासाठी, झाड फुलते ते इतरांना सुगंध देण्यासाठी, फुलल्यानंतर त्याच्या कळ्या गळून जातात. या झाडापासून काय शिकावे तर दातृत्व. कोणत्याही अपेक्षेशिवाय. स्वत:साठी काहीही न मिळवणाऱ्या, या झाडांच्या कळ्यांही निर्माल्य होऊन मातीत मिसळतात. सर्व काही देणाऱ्या या दानशूर वनस्पतीला त्यामुळेही ‘रातराणी’ हे नाव खऱ्या अर्थाने शोभून दिसते. रातराणीच्या नावात राणीपण असले तरी तिचे वागणे एखाद्या निर्मोही साधकाप्रमाणे! म्हणूनच हे झाड सर्वांना प्रिय असावे. फुललेल्या झाडाचे सौंदर्य आणि सुगंध या झाडाला ‘Beauty with Aroma’ बनवते हे मात्र निश्चित!

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०

रस्ता : संगम सप्तपर्णी आणि पिचकारीचा

 जुना पुणे-बेंगलोर रस्ता. गत तीस वर्ष या रस्त्याला पाहात आहे. वीस वर्षापूर्वी वडाच्या सावलीने झाकलेला होता. रूंदीकरणात ही झाडे कापली गेली. रस्ता रूंद झाला आणि आता त्या रस्त्याकडेला सप्तपर्णी आणि पिचकारीची झाडे लावली आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही दोन्ही झाडे एकाचवेळी फुलतात. या रस्त्याला सुंदर बनवतात. या दोन झाडाविषयी आणि एकूणच रस्त्याविषयच्या भावना या लेखात मांडल्या आहेत. 

_________________________________________________________

ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा. संध्याकाळची वेळ. सूर्य पश्चिमेच्या क्षितीजाला टेकलेला. शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागापासून सिंथेटीक ट्रॅककडे जाणारा रस्ता. सूर्याला थांब’ म्हणून विनवायला वारा धावत होता. त्या मंद वाऱ्याने सूर्याला भेट देण्यासाठी सोबत अत्तराची कुपी घेतली होती. त्यातील थोडे अत्तर बाहेर सांडावे आणि त्याचा गंध हवेत पसरावा, असा सुगंध त्या हवेत पसरला होता. त्या वाऱ्याबरोबर आलेल्या सुगंधाने मन धुंद झाले. त्या रस्त्यावर फिरताना यापूर्वी असा गंध कधीच जाणवला नव्हता. हा सुगंध कशाचा हे लक्षात येत नव्हते. हायड्रोजन सल्फाईडचा नकोसा गंध ही रसायनशास्त्र प्रयोगशाळेची ओळख. सुगंधाचे या प्रयोगशाळेला वावडे. बरं, संध्याकाळची वेळ असल्याने प्रयोगशाळेतील गंधाची शक्यता शून्य. त्या निर्जन भागात तो गंध एखाद्या वृक्ष-वेलीच्या फुलांखेरीज अन्य कशाचा असण्याची सुतराम शक्यता नव्हती. येणारा हा दरवळ कुतुहल वाढवत होता. मात्र संधीप्रकाशात तो कशाचा हे शोधणे शक्य नव्हते. 

रात्र उलटली. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या सुगंधाचे कारण शोधण्याची मोहीम सुरू केली. अर्थात हा शोध जुन्या पुणे-बेंगलोर रस्त्यावर. हा रस्ता शिवाजी विद्यापीठाला पूर्व आणि पश्चिम भागात दुभागतो. हा रस्ता गत तीस सालात कसा बदलत गेला, याचा मी एक साक्षीदार. रस्ता रूंदीकरणात जुन्या रस्त्याकडेची पारंब्याची कमान करणारी वडाची झाडे इतिहासजमा झाली आहेत. या झाडांच्या पारंब्यांची कमान येणाऱ्यांचे जणू स्वागत करायची. त्याचप्रमाणे जाणाऱ्याला वाकून नम्रपणे ‘पुन्हा या’ असे अगत्याने सांगायची. दोन्ही बाजूला विद्यापीठ असल्याने घरे नव्हती. नाक्याच्या परिसरात आज असणारी वस्तीही नव्हती. विद्यापीठातील मुलांमुलींचा त्या रस्त्यावर कायम वावर असायचा. ही वडाची झाडे तोडल्यापासून मन घट्ट करूनच त्या रस्त्यावरून जातो. त्या रस्त्यावर गेले की मन उदास व्हायचे. विद्यापीठातील पाण्याच्या कामासाठी एकदोन वेळा सोडले, तर, त्या रस्त्यावर अशात चाललो नाही. ते चालणेही ‘पाणी केंद्रीत’ होते. त्यामुळे रस्त्यावरील नव्या घडामोडीकडे पूर्ण दुर्लक्षच होते. मात्र या सुगंधाचा शोध घेत रस्त्यावर गेलो. फार वेळ शोध घ्यावा लागला नाही. काही क्षणांत अत्यंत मनोहर चित्र समोर आले. सुगंधाच्या शोधाच्या नादात दोन शोध लागले. पहिला म्हणजे तो सुगंध सप्तपर्णीच्या फुलांचा. दुसरा असा की वडाची सर घेणारा नसेल पण आज हा रस्ता खूपच सुंदर झाला आहे. रस्त्याला सौंदर्य लाभले आहे ते सप्तपर्णी आणि पिचकारीच्या झाडांचे. एकाआड एक लावलेली आणि एकमेकांशी स्पर्धा करत फुललेली ही दोन प्रकारची झाडे रस्त्याला एक सौंदर्य प्रदान करत आहेत.

सप्तपर्णी हे मूळ भारतीय झाड असले तरी पूर्वी क्वचितच दिसायचे. आज मात्र त्याच्या सुंदर रूपामुळे उद्यानात, रस्त्याकडेला, काहींच्या वैयक्तिक बागांमध्ये हे झाड लावलेले दिसते. पक्ष्यातील सातभाई जसे सातजण एकत्र दिसतात, तशी या झाडाला एकाच ठिकाणी सात पाने येतात. त्यावरूनच त्याचे नाव सप्तपर्णी पडले. त्याला सातवीणही म्हणतात. संस्कृतमध्ये सप्तपर्ण:, विशालमच्छदा, विशालत्वक, सारदा या नावाने ते ओळखले जाते. हिंदीमध्ये सटवन, चाटीवन, चितवन या नावाने ओळखले जाते. बंगालीमध्ये चट्टीम, असामीमध्ये सोटीयाना, गुजरातीत सतुपर्णी, उर्दूमध्ये कशीम, तमिळमध्ये इलाई पिल्लाई, मुकुमपिलाई, कन्नडमध्ये अलेले हाले, बंताले, दोड्डापला, मंगलापल्ला, अशा विविध नावाने ओळखले जाते. त्याला सटवीन, शैतान का पेड, सैतान, डेव्हिल्स ट्री अशी नावे मिळालेली आहेत. अर्थात ही नावे त्याच्या विषारी गुणधर्मामुळे मिळाली आहेत. त्याच्या शेंगा लागल्यानंतरच्या रूपामुळे त्याला चेटकिणीचे झाड म्हणत असावेत. एकिकडे त्याला अशी असुरी नावे दिली असताना त्याला ‘स्कॉलर ट्री’ असेही म्हणतात. शाळेची सुरुवात पाटीपासून होते. या पाट्या बनवण्यासाठी या झाडाचे लाकूड वापरले जाते. शाळेतील बोर्डही यापासून बनवत. त्यामुळे त्याला हे नाव मिळाले. त्याला स्कॉलर ट्री म्हणत असल्याने काहीजण असेही सांगतात की, त्याखाली बसून अभ्यास केला तर स्मरणशक्ती वाढते. मात्र याला शास्त्रीय आधार नाही. वनस्पतीशास्त्रात त्याला ‘अल्स्टोनिया स्कॉलरिस’ या नावाने ओळखले जाते. अपोसायनेशी कुळातील हे झाड आहे. त्याच्या नावात अल्स्टोनिया हे नामवंत वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. सी. अल्स्टोन यांच्या सन्मानार्थ घेण्यात आले आहे. तर स्कॉलरॅसिस हे या झाडापासून पाटया बनवत असल्याने आले.

त्याला ब्लॅक बोर्ड ट्री, इंडियन डेव्हील ट्री, डीटा बार्क ट्री, मिल्कवूड पाईन ट्री, व्हाईट चेस वूड ट्री, पुलाई इत्यादी नावानेही इंग्रजीत ओळखले जाते. सुरुवातीला शांतीनिकेतन विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी या झाडाची फांदी देत. पदवीधरानांही पदवीसोबत या झाडाची फांदी देण्याची पद्धत शांतिनिकेतन विद्यापीठाचे संस्थापक कविवर्य रविंद्रनाथ टागोर यांनी सुरू केली. आज पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून या झाडाचे एक पान दिले जाते. या झाडाला पश्चिम बंगालच्या राज्यवृक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

हा वृक्ष उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधात आढळतो. याचे मूळ भारतीय उपखंडातील. भारत, जपान, श्रीलंका, बांग्लादेश, ब्रम्हदेश, मलेशिया, तसेच ऑस्ट्रेलियातील जंगलात आढळतो. हा निमसदाहरित वृक्ष आहे. या झाडांची उंची साठ मीटरपर्यंत वाढते. झाडाच्या बुंध्याचा व्यासही सहा फुटांपर्यंत वाढतो. जास्त पाऊस असणाऱ्या आणि आर्द्रता जास्त असणाऱ्या भागात हा वृक्ष जोमाने वाढतो. मात्र त्याला जमीनही चांगली असावी लागते. खडकाळ माळरानावर हा वृक्ष म्हणावा तसा वाढत नाही. त्याच्या सुंदर आकारामुळे हल्ली त्याला बागांमध्ये आणि रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात लावले जाते. अर्थात पोषक जमीन आणि भरपूर आर्द्रता असेल तर तो १२०० फूट उंचीवरही वाढतो.

या झाडाची रोपे बियांपासून बनवली जातात. उन्हाळ्यात या झाडांच्या बिया फळ फुटण्यापूर्वी गोळा केल्या जातात. या झाडांच्या शेंगामध्ये बारीक केसाळ बिया असतात. पंख असल्यासारख्या बिया असल्या तरी त्या अशा प्रकारच्या इतर बियांप्रमाणे वाऱ्याबरोबर दूरवर जाऊ शकत नाहीत. या झाडांची रोपे वर आल्यानंतर सात पाने एकाच ठिकाणी येतात. त्यामुळे त्याला सप्तपर्णी म्हणत असले तरी कधी कधी ही पानांची संख्या कमी जास्त होते. काही वेळा तर अगदी दहा पानेसुद्धा असतात. कालिदासाच्या ‘रघुवंशा’मध्ये या झाडाचे वर्णन करणारा छान श्लोक आहे.

‘सप्तच्छद क्षीरकटुप्रवाहमासह्यमाघ्राय मदं तदीयमl

म्हणजेच सात पाने असणाऱ्या सप्तपर्णी या झाडाचा पांढरा कडू चीक असतो, त्याचा दर्प रानटी मदमस्त हत्तीच्या मदासारखा असतो. महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र, बृहतसंहिता, किरातार्जुनिय इत्यादी ग्रंथात याचा उल्लेख आढळतो. चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांच्या ग्रंथातही सप्तपर्णीच्या औषधी गुणधर्मांचे वर्णन केले आहे.

    या झाडाची रोपे थोडी मोठी होताच त्याला फांद्या यायला सुरुवात होते. सर्व बाजूंनी या फांद्या गोलाकार वाढत जातात. त्यातील मुख्य भाग आकाशाकडे तोंड करून वाढत जातो. मात्र त्यापेक्षा या झाडाचा भर आपला आडवा आकार वाढवण्यावर असतो. तो जसा वर जाईल, तशी फांद्यांची संख्याही वाढत जाते. फांद्या ठराविक अंतरावर येतात. या स्वत:ला नियमात बांधून वाढण्याच्या गुणामुळे याचे सौंदर्य वाढते. फुले नसलेले झाडही त्यामुळेच सुंदर दिसते. या फांद्यांना चमकदार पोपटी रंगांची पाने असतात. पानांचा आकार आंब्याच्या किंवा जांभळीच्या पानासारखी असतात. मात्र पुढच्या टोकाला ती टोकदार न बनता गोलाकार असतात. पानांची लांबी दहा ते वीस सेंटीमीटर तर रूंदी तीन ते पाच सेंटीमीटर असते. पाने खालच्या बाजूला पांढरट असतात. पानांवरील शीरा स्पष्ट दिसतात. त्या पानांचे सौंदर्य वाढवतात. कवी मनाचे रविंद्रनाथ टागोर कदाचित या सौंदर्यामुळेच सप्तपर्णीच्या प्रेमात पडले असावेत. झाडाला आकार देण्यासाठी खालील फांद्या काढून टाकल्या जातात. खोड हे खडबडीत करड्या पांढरट रंगाचे असते. या झाडाच्या कोणत्याही भागाला जखम केली, पान तोडले तर त्यातून दुधासारखा चिक बाहेर पडतो. हा चिक त्यात असणाऱ्या अल्कोलॉईड्समुळे विषारी असतो.  
     
चार ते पाच वर्षांची झाडे दहा-पंधरा फूट उंच झाल्यानंतर त्याला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कळ्या येतात. कळ्या झुपकेदार आणि जमिनीकडे झुकलेल्या असतात. झाडाच्या फांद्यांवर कळ्यांची इतकी गर्दी झालेली असते की त्या ओझ्याने फांद्या जमिनीकडे झुकतात. जणू काही साजशृंगार केलेली नववधूच. तिने आपले मुखकमल पदराने झाकावे, तशी सर्व पर्णसंपदा या कळ्या आणि फुलांआड लपलेली असते. पांढऱ्या-ऑफ व्हाईटच्या जवळ जाणाऱ्या रंगांची बारीक नाजूक फुले असतात. फुलाला पाच पाकळ्या असतात. ही फुले पारिजातकाच्या फुलांसारखी असतात. पारिजातकासारखा लाल देठ मात्र नसतो. सप्तपर्णीच्या काही वाणांना पिवळी, गुलाबी किंवा हिरव्या रंगाची फुले येतात. आपल्याकडे मात्र बहुतांश झाडे पांढऱ्या रंगात न्हाऊन निघतात. त्यांचा आकार लहान असल्याने आणि त्यांनी केलेल्या गर्दीमुळे जवळ जाऊन बारकाईने पाहिल्याखेरीज हे लक्षात येत नाही. ही झाडे फुलली की त्यापासून मादक सुगंध येतो. सप्तपर्णीचे एक झाड फुलले तरी त्याचा सुगंध एक किलोमीटर दूर पसरतो. झाड जितके सुंदर तितकीच ही फुलेही सुंदर आहेत. ही फुललेली झाडे पानांनाही झाकून टाकतात त्यामुळे श्रीलंकन लोकांना या झाडात विग घातलेला माणूस दिसतो. म्हणून श्रीलंकेत त्याला ‘विग बनियन ट्री’ असेही ओळखले जाते.

    फुलांपासून काही दिवसात शेंगा तयार व्हायला सुरूवात होते. काही काही झाडांना चांगल्या फुटभर लांबीच्या शेंगा येतात. पोपटी रंगाच्या शेगा या झाडाचे रूपडेच बदलून टाकतात. या शेंगा झाडांच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. वडाच्या पारंब्यासारख्या मात्र सर्व एकाच आकाराच्या शेंगा जमिनीकडे झुकलेल्या असतात. साधारण मार्च-एप्रिलमध्ये या शेंगा पक्व होतात. पक्व शेंगांचा रंग तपकिरी होतो. त्यानंतर उन्हाचा तडाखा सुरू झाला की त्या फुटतात आणि चपट्या तपकिरी बिया खाली गळतात. बिया चार ते पाच मिलीमीटर लांबीच्या असतात. या बियांना सात ते तेरा सेंटीमीटर लांबीचे केस किंवा पंख असतात. मात्र या बिया आळश्यासारख्या वागतात. सुंदर पंख असूनही त्या दूरवर जात नाहीत. त्यामुळे भरपूर फुले, फळे आणि बिया येत असल्या तरी या झाडाचे पुनरूत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही. जाणीवपूर्वक बिया गोळा करून रूजवल्या, तर मात्र त्या सहज रूजतात. आज बियांपासून रोपे तयार करून मोठ्या प्रमाणात लावली जात आहेत. हे झाड त्याच्या सौंदर्यामुळे अनेक ठिकाणी लावले जाते. मात्र या झाडाचे सर्वच भाग सौम्य ते तीव्र विषारी आहेत.

या झाडांचे लाकूड खूपच मऊ असले तरी टिकाऊ असते. आतून लाकडाचा रंग पिवळसर पांढरा असतो. त्यामुळे या झाडाच्या लाकडाचा उपयोग टिकाऊ गोष्टी बनवण्यासाठी केला जातो. शाळेतील फळे, पाट्या, पॅकिंगसाठीची खोकी, सप्तपर्णीच्या लाकडापासून बनवली जातात. त्याच्या सालीचा औषधी उपयोग केला जातो. ताप आणि अतिसारावर साल उपयोगाला येते. दातदुखी, मलेरिया, स्नायुदूखी, घसाविकार, खोकला, सर्पदंशावरही सप्तपर्णीच्या सालीपासून औषध बनवले जाते. मात्र याचे प्रमाण जास्त झाल्यास घातक ठरते. त्यामुळे या झाडाला सैतानाचे झाड असे म्हणतात. भारतातील पश्चिम घाटातील आदिवासी लोक यामुळे या झाडाखाली झोपत नाहीत. या झाडाखाली ती बसतसुद्धा नाहीत किंवा या झाडांची सावली अंगावर पडू देत नाहीत. सुंदर गोष्टींचे सौंदर्य ओरबडण्याची आपली सवय. या झाडाला त्याचा त्रास होऊ नये आणि माणसापासून सर्वांना दूर ठेवण्यासाठी निसर्गाने केलेली रचना असावी. सप्तपर्णीचे झाड म्हणजे ‘शापीत सौंदर्या’चे उत्तम उदाहरण. काही असो, या ‘सैतानाच्या झाडा’ला आपण ‘स्कॉलरली’ समजून घेत जगवायला पाहिजे, हे मात्र निश्चित.

जुन्या पुणे - बेंगलोर रस्त्यावरील सौंदर्यात सप्तपर्णीच्या बरोबरीने भर घालत होते ते आफ्रिकन टयुलिप ट्री. एकाआड एक अशी सप्तपर्णी आणि आफ्रिकन ट्युलीपची झाडे लावली आहेत. सप्तपर्णीच्या बरोबर उलटे वागणारे हे झाड, मात्र, दोघांचाही फुलण्याचा काळ एकच. त्यात ही दोन्ही झाडे या रस्त्यावर कल्पकतेने लावली आहेत. ही फुललेली झाडे पाहताना शिवाजी विद्यापीठ परिसराला लाल पांढऱ्या फुलांचा हार घातल्यासारखे सुंदर चित्र दिसत होते.

आफ्रिकन ट्युलिप ट्री़. मराठीत याला पातरी किंवा पिचकारी म्हणून ओळखतात. याला येणाऱ्या कळ्यांमध्ये पाणी असते. त्या पाण्याची पिचकारी उडते, म्हणून त्याचे नाव पिचकारी किंवा फाउंटन ट्री पडले. लहान मुले याला बोटीचे झाडही म्हणतात. याचे फळ फुटल्यानंतर रिकामे फळाचे कवच पाण्यात छान तरंगते. त्याचा आकारही वल्हवायच्या बोटीसारखा. म्हणून हे बारसे. हा वृक्ष दक्षिण आफ्रिकेतील अंगोला प्रांतातून जगभर पसरला आहे. भारतातही अनेक राज्यात रस्त्याकडेला याला शोभिवंत वृक्ष म्हणून लावलेले आढळते. या झाडाचे कुळ बायग्नोनियासी आहे. याचे वनस्पतीशास्त्रीय नाव स्पॅथेडिया कम्पॅनुलाटा असे आहे. याच्या कळ्यांचा गुच्छ येताना ढालीसारखा येतो. ढालीला ग्रीक भाषेत स्पॅथ म्हणतात. त्यावरून स्पॅथेडिया. तर त्याची फुले ही घंटापात्राच्या आकाराची असल्याने कम्पॅनुलाटा याच्या नावात घेण्यात आले.

    हे झाड अगदी ऐंशी-पंच्याऐंशी फुटांची उंची गाठते. याची मुळे मात्र वरवरच असतात. त्यामुळे वादळात मोठी झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचा प्रसार वेगाने होत असल्याने त्याला आक्रमक वृक्षांच्या यादीत घातले आहे. या झाडांच्या बिया मातीत कोठेही ओलावा मिळताच रूजतात. तसेच फांदी आणि मुळापासूनच्या फुटव्यापासूनही रोपे बनवली जातात. त्याची वेगाने वाढ सुरू होते आणि काही महिन्यांत चार पाच फुटांची उंची गाठते. हा सदाहरित वृक्ष आहे. याला संयुक्त पाने येतात. एका पानावर पाच ते वीस मोठ्या आकाराच्या पर्णिका असतात. अंडाकृती पर्णिकांची लांबी अगदी १५ सेंटीमीटरपर्यंत असते. पानांचा रंग गर्द हिरवा असतो. पाने दाट असल्याने त्याची सावली गर्द असते. खोड कोवळे असताना पिवळसर पांढरे असते. नंतर ते किरमिजी रंग धारण करते. मूळ रोपांची उंची दहा ते पंधरा फूट झाल्यावर त्याला फांद्या यायला सुरुवात होते. या फांद्या जशा वाढत जातात, तसा त्याचा आकारही वाढतो. मात्र त्याची उंची जास्त वेगाने वाढते.

पिचकारीच्या फांद्या जाड असतात. जरासे वादळ आले तरी मोडतात. मात्र सुस्थितीत असलेल्या झाडांचा विस्तार चाळीस फुटापर्यंत वाढतो. त्यांच्यावर गोलाकार पांढरे ठिपके येतात. कोवळ्या फांद्यावर लव असावी, तसे चमकदार तपकिरी केस असतात. मात्र खोड जाड होताना हे केस गळून जातात. पर्णिंकांच्या देठाजवळही असे केस असतात. या झाडाचे लाकूड हलके असल्याने त्याच्या तुटलेल्या फांद्याच्या ठिकाणी छिद्रे तयार होते. अशा ठिकाणी पक्षी आपली घरे तयार करतात. या झाडांची पुरेशी वाढ झाल्यानंतर पावसाळ्याच्या अखेरीस सप्टेंबर–ऑक्टोबरमध्ये कळ्या यायला सुरुवात होते. टोकाला अनेक कळ्यांचा गुच्छ ढालीसारखा येतो. तांब्यासारखा लालसर, तपकिरी रंगांचा हा गुच्छ जसा वाढत जातो, तशा कळ्या म्हशीच्या शिंगाचा आकार धारण करतात. या कळ्यांमध्ये पाणी असते. या पाण्याची लहान मुले पिचकारी उडवत खेळतात. हे पाणी कपड्यावर पडले तर पिवळसर डाग पडतात. या कळ्यांवरही केस असतात. हे कळ्यांचे गुच्छ टोकाला सुरुवातीला येतात आणि नंतर ते खालच्या फांद्याकडे यायला सुरूवात होते. गुच्छातील कळ्या बाहेरून आत फुलत जातात.

कडेच्या कळ्या वाढतात आणि त्याचे फूल बनते. फुलांचा रंग नारंगी शेंद्री असतो. टोकाला आलेली फुले खूप आकर्षक असतात. गडद हिरव्या रंगावर लाल ठिपके खुलून दिसतात. फुलांचा घंटेसारखा आकार असतो. आतमध्ये असणारे पुंकेसर-स्त्रीकेसर कायम ओलसर असतात. फुले कायम वरच्या दिशेला तोंड करून फुलतात. यामुळे पाऊस, दवामुळे या फुलात पाण्याचे थेंब जमा होतात. हे चाखण्यासाठी पक्षी त्या फुलाजवळ जातात आणि नकळत परागीभवनही घडत जाते. विशेषत: हमिंगबर्डचे हे आवडते काम. मधमाशा मात्र या फुलाकडे फिरकत नाहीत. यातील मध हा त्यांच्यासाठी विषारी असतो. या फुलांचा आकार ट्युलिपच्या फुलांची आठवण करून देतो, म्हणून त्याचे सुरुवातीपासून आफ्रिकन ट्युलिप ट्री असे बारसे झाले आहे. फुलाबाहेर असणारा लाल रंगाचा भाग हा सात-आठ सेंटीमीटर लांबीचा असतो. आत पिवळ्या सुदंर रेषा असतात. फुले तीन दिवस फुललेली असतात. तशी ही झाडे वर्षभर फुलत असतात. मात्र खरा बहर असतो तो पावसाळ्याच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये.

फुलांचे परागीभवन झाल्यानंतर हिरवी शेंगेसारखी फळे तयार होतात. ही फळेही वर तोंड करूनच वाढतात. टोकाला आलेली ही फळे खिलाऱ्या बैलांच्या शिंगासारखी सरळ आणि पुढे टोक असणारी असतात. इतर कोणताही नवा भाग तयार होताना असणारी केसाळ रचना या फळांपासून मात्र दूर असते. पानांच्या तुलनेत फळाचा रंग फिकट असतो. फळे हिरवी असताना आतील भाग पांढरट असतो. फळे पक्व झाल्यानंतर वरचे आवरण तपकिरी रंग धारण करते. मात्र त्याला चमक नसते. हे फळ उन्हाळ्यात फुलते आणि आतून बिया बाहेर पडतात. हे आवरण एका बाजूला जोडलेलेच राहते. त्याला आपोआप बोटीचा आकार आलेली असतो. ही फळे विषारी असतात. आफ्रिकन शिकारी बाणांना विषारी बनवण्यासाठी फळे उकळून त्यामध्ये बाणांचे टोक बुडवतात. पाण्यात फळांचे आवरण छान तरंगत राहते. आतील बिया सोनेरी रंगाच्या चपट्या असतात. एका फळामध्ये पाचशेपर्यंत बिया असतात. आफ्रिकेत या बिया खाण्यासाठी वापरल्या जात असल्याचे संदर्भ मिळतात. त्यांना पांढरे पंख असतात. या पंखामुळे वाऱ्याबरोबर उडत त्या दूरवर जातात आणि योग्य वातावरण मिळताच रूजतात.

हे झाडही तसे औषधी आहे. याच्या पानाचा आणि सालीचा काढा कातडीवरील चट्टे घालवण्यासाठी वापरतात. आपल्याकडे दगडी पाला लावतात, तशी फुले कुस्करून जखमावर लावली जातात. तोंडामध्ये जर आल्यास सालीचा वापर केला जातो. मधुमेह, एड्स, पचनसंस्थेतील दोष, मूत्रविकारासाठी या झाडाच्या सालीचा, पानांचा आणि फुलांचा वापर केला जातो. कळ्यांतील पाणी हे भूखवर्धक मानले जाते. हे झाड पन्नास ते दीडशे वर्षांपर्यंत जगू शकते.

शोभेचे झाड म्हणून आज पिचकारीचे झाड मोठ्या प्रमाणात लावले जाते. मात्र याचे लाकूड मातीशी संपर्क येताच लगेच कुजते. त्यामुळे जळणाखेरीज त्याचा फारसा उपयोग होत नाही. जंगलाचे प्रमाण वाढावे यासाठी या झाडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. चांगल्या जमिनीत हे झाड चांगले वाढते. मात्र खडकाळ जमिनीवर ही झाडे जगत नाहीत. या झाडाची पाने आणि फुले माती सुपीक बनवण्याचे काम करतात. अतिपर्जन्यमान असणाऱ्या भागांतही ही झाडे चांगली वाढतात. मात्र या झाडाला सूर्यप्रकाश भरपूर मिळावा लागतो. झाडाचे वय जसे वाढेल, तसे फांद्या कमकुवत होत जातात आणि अखेर मोडतात. मात्र त्यावर आलेली फुले माणसाची नजर खिळवून ठेवतात.

अशी ही दोन झाडे. सप्तपर्णी भारतीय, तर पिचकारी विदेशी. सप्तपर्णीची पाने पोपटी, तर पिचकारीची गर्द हिरवी. सप्तपर्णी खालून वर फुलत जाते, तर पिचकारी वरून खाली. सप्तपर्णीची फुले आणि फळे जमिनीकडे झुकलेली, तर पिचकारीची आकाशाकडे तोंड करून बसलेली. सप्तपर्णीची फुले शांत पांढरी, तर पिचकारीची फुले नारंगी लालसर अगदी आग लागल्यासारखी. सप्तपर्णीच्या बिया केस असूनही वाऱ्याबरोबर न उडणाऱ्या, तर पिचकारीच्या बिया वाऱ्याशी स्पर्धा करत पसरणाऱ्या. सप्तपर्णीचा गंध मनाला मोहवून टाकणारा, तर पिचकारीचा गंध शोधूनही न मिळणारा. सप्तपर्णीची नाजूक लहान फुले, तर त्यापेक्षा शेकडो पटीने मोठी भडकरंगी पिचकारीची फुले. सप्तपर्णी विषारी गुणधर्माने डेव्हिल्स ट्री बनलेले, तर पिचकारी ट्युलिपची आठवण करून देणारे. सप्तपर्णीखाली माणूस बसायलाही जात नाही, तर पिचकारीखाली आनंदाला उधाण येते. सप्तपर्णीचा देशी बाणा, तर पिचकारीला विदेशी ताठरपणा. सप्तपर्णीच्या शेंगाही नाजूक चवळीच्या शेंगेसारख्या, तर पिचकारीची फळे शेंड्याबुडख्याला निमुळत्या आणि मध्ये फुगलेल्या.

दोन झाडात कोणताच मेळ नाही. कसलेच साम्य नाही. सर्वच विसंगत. मात्र या विसंगतीचा सुंदर मिलाफ त्याच्या फुलण्याच्या एकाच कालावधीमुळे जुळून येणारा. दोन्ही झाडांचा आरोग्यासाठी औषधे बनवण्यासाठी मात्र वापर केला जातो. या रस्त्यावर पंधरा २००५-०६ पर्यंत असणाऱ्या वडाच्या जागेवर ही दोन्ही झाडे लावलेली आहेत. ही झाडे पर्यावरणाच्या दृष्टीने वडांच्या झाडांची जागा घेऊ शकत नाहीत. मात्र अनेकदा विकासासाठी अशी किंमत मोजावी लागते. ही फुललेली झाडे पाहताना मन फुलून गेले.

खरंच रस्ता सुंदर दिसत होता. बालसुलभ संस्कारातून याला कोणाची नजर लागू नये, असा विचारही मनात तरळून गेला. नजर लागते की नाही माहीत नाही. मात्र दुसऱ्या दिवशी या रस्त्याच्या पश्चिम बाजूस नको ते घडले. त्या बाजूने, रस्त्याच्या कडेने विद्युत वाहक तारा नेण्यात आल्या आहेत. या ताराखालीच ही दोन प्रकारची झाडे सौंदर्याची उधळण करत उभी होती. विद्युत कर्मचाऱ्यांची नजर या तारेपर्यंत वाढलेल्या झाडावर पडली. या कर्तव्यकठोर कर्मचाऱ्यांनी निष्ठूरपणे या झाडावर कुऱ्हाड चालवली आणि ही सुंदर रचना विस्कटली. ही झाडे अशी तोडली हाेती की पाहवत नाही. या कर्मचाऱ्यांनी विचारपूर्वक आवश्यक तेवढयाच फांद्या कापायला हव्या होत्या, असे वाटत होते. मात्र पोष्टमन जर पाकिटाचा रंग पाहून गुलाबी पाकिटावर हळूवारपणे शिक्का मारायचा, विचार करू लागला तर त्याचे काम उरकणार नाही. तसेच हे कर्मचारी सौंदर्यदृष्टी सांभाळत फांद्या कापू लागले तर काम संपणार नाही… त्यापेक्षा ही विद्युत वाहिनी जमिनीखालून नेली तर… मात्र हे अधिकाऱ्याने, व्यवस्थेने ठरवायला हवे… अन्यथा, दरवर्षी हे असेच घडत राहणार… झाड फुलणार आणि त्यावर कुऱ्हाडही चालणार!