('कर्मणेवाधिकारस्ते
मां फलेशु कदाचन' भगवद्गीतेतील हा उपदेश 'कर्म करीत राहा,
फळाची अपेक्षा धरू नका' असे सांगतो. काही व्यक्ती या उक्तीनुसार वागतातही; मात्र
त्यांच्या कार्याचे, कर्माचे फळ कोणी दुसराचं स्वत:च्या पदरात पाडून घेतात. तरीही
सामाजिक भावनेने प्रेरित झालेले 'अर्जून' त्याची खंत, खेद न बाळगता, लक्ष्यापासून
विचलित न होता सकारात्मक कर्म करीतचं राहतात. आजच्या काळातले कृषी क्षेत्रातले असेचं
एक अर्जून होते, दादाजी खोब्रागडे. दादाजींचा हा थक्क करणारा जीवनप्रवास खास
आपल्यासाठी. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)
-------------------------------------------------------------------------------------------
आम्ही लहान
होतो, तेंव्हा आई, वडील, गुरूजी गोष्ट सांगायचे. गोष्टीमधील नायक शक्यतो नावडत्या
राणीचा मुलगा असायचा. त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागे. तो सद्गुणी असायचा. तो
अनेक संकटावर मात करत शेवटी राजा व्हायचा. गोष्ट ऐकत आम्ही झोपायचो. पुढे अनेक
बिकट परिस्थितीत हे सगळे बकवास असते, असे वाटायचे, पण लहानपणी त्या कथानी केलेले
संस्कार जात नसायचे. दादाजी खोब्रागडे यांच्या निधनाची बातमी कळली आणि मनात सर्व
कथांचा शेवट सुखांत नसतो, असे वाटायला लागले.
नांदेड.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील एक छोटेसे गाव. त्या गावात रामजी
खोब्रागडे हे अल्पभूधारक शेतकरी. पाच एकर शेती. मात्र ती मनापासून कसायचे. त्यांचे
लग्न झाले आणि त्यांच्या सासरी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील खुटाळा या
गावी १० जुलै १९३९ रोजी त्यांच्या पोटी पुत्र जन्मला. वडिलाना शेती करताना पहात हे
बाळ मोठे होऊ लागले. वडीलांची शेती करण्याची पद्धत शिकू लागले. त्या बाळाचे नाव
दादाजी असे ठेवले. पुढे त्याला शाळेत घातले. तिसरीपर्यंत शाळा पुर्ण केली आणि शेतात
मदत करण्यासाठी शिक्षण थांबले. दादाजी आता पुर्णवेळ शेतीतील कामे करू लागले. वडील
बियाणासाठी भात निवडताना लोंब्या हातावर घेवून त्या मळत, आतील तांदूळ तुटतो का? तो किती लांबीचा आहे? याचे सूक्ष्म निरीक्षण करत.
वडिलांची ही सवय दादाजीवर नकळत संस्कार करत होती. वडील गेले आणि दादाजी शेती
सांभाळू लागले.
दादाजी सकाळी लवकर
उठत. फक्त चहा घेवून ते शेतात जात. खांद्यावर एक कापडाची पिशवी. हातात काठी. एवढे
साहित्य घेवून स्वारी शेतात जायची. शेत हेचं सर्वस्व मानायचे. शेतातील काडीन
काडीची माहिती घ्यायचे. वाढणाऱ्या पिकांचे निरीक्षण करत, वाढत्या पिकाची देखभाल करायचे.
शेती जंगलाजवळ असल्याने पिकाभोवती काटेरी कुंपण करायचे. आवश्यक तेवढेच पाणी शेतात
राहील याची काळजी घ्यायचे. पिकात अन्य तण वाढू देत नसत. दहा वाजले की दादाजी परत
फिरायचे. गावातील चहाच्या टपरीवर येवून चहा प्यायचा. पेपर वाचायचा. गावातील
लोकांशी गप्पा मारायच्या आणि नंतर घरी यायचे. उन असो, थंडी असो वा पाऊस, दादाजींचा
दिनक्रम ठरलेला. धो धो पाऊस पडत असतानाही दादाजी दिनक्रम बदलत नसत. कोणी विचारले
तर ते आपल्या परीने शेतात जाणे कसे आवश्यक आहे ते सांगत. त्यांचे म्हणणे लोकांच्या
डोक्यावरून जायचे. आपल्याला एखाद्याचे म्हणणे पटले नाही की लोक त्याला अतिशहाणा
म्हणून विषय सोडून देतात. दादाजीना असे काहीसे उपहासात्मक 'डोकेवाले' हे नाव
गावाने प्रदान केले. त्यांचे डोके गावाला समजण्यापलिकडचे होते म्हणून कदाचित
त्याना हे नाव दिले असावे. पण या डोकेवाल्या दादाजींचे डोके खरंच कोणत्याही
प्रशिक्षीत कृषीसंशोधकापेक्षा जास्त चालत होते.
दादाजींच्या
शेतात अनेक वर्षापासून भात लावला जात असे. १९८१ पासून दादाजीनी आपल्या शेतात 'पटेल-३'
हे भाताचे संकरीत वाण लावत. त्यावेळी इतर वाणापेक्षा हा वाण आधिक प्रसिद्ध झाला
होता. पिक कापणीला आले असताना त्यातील कांही भाताच्या रोपाच्या लोंब्या या इतर
वाणापेक्षा लांब आणि भरपूर दाणे असणाऱ्या दिसल्या. त्यानी त्या लोंब्या
काळजीपुर्वक बाजूला काढल्या. पुढील वर्षी त्या वेगळया ठेवलेल्या लांब्यातील भाताचे
बी काढून त्यांची वेगळी लागवड केली. शंभर चौरस फुट जागेत लावलेल्या या वाणाचे पिक
'पटेल-३' वाणापेक्षा कितीतरी जास्त होते. त्यातील कांही भात त्यानी सडला.
त्यापासून मिळालेला तांदूळ शिजवला. हा भात आधिक चवदार असल्याचे त्यांच्या लक्षात
आले. पुढे त्यानी आपल्या संपूर्ण शेतात हे वाण पेरले आणि उत्पादनात मोठी वाढ झाली.
तीन चार वर्षात दादाजींचे प्रतिएकर भाताचे उत्पादन इतरापेक्षा जास्त निघते याची
चर्चा सर्वत्र होऊ लागली. आजूबाजूचे शेतकरी त्यांच्याकडे बियाणे मागू लागले.
यापैकीचं एक शेतकरी होते भिमराव शिंदे. ते दादाजींचे मेहुणे. त्यानी दादाजीकडून
नव्वद किलो बियाणे नेले आणि ते चार एकरात लावले. त्यातून त्याना नव्वद पोती भाताचे
उत्पादन मिळाले. शिंदे यानी हा भात विकायला अडत दुकानात नेला.
या वाणाचे
वेगळेपण ओळखून व्यापाऱ्याने शिंदे यांना वाणाचे नाव विचारले. त्यानी नाव तुम्हीच
लिहा, असे सांगीतले. त्या काळात एचएमटी घड्याळे प्रसिद्ध होती. त्या व्यापाऱ्याने
कांही दिवसापूर्वीच एचएमटी कंपनीचे नवे घड्याळ विकत घेतले होते. त्याने भाताच्या
या वाणाचे नाव एचएमटी असे लिहिले. हे भाताचे वाण सर्वत्र एचएमटी या नावाने लावले
जाऊ लागले. सर्वत्र या वाणाची चर्चा होऊ लागली. आपण विकसीत केलेला वाणचं एचएमटी
नावाने लोक लावतात, हे लक्षात आल्यावरही दादाजीना त्याचे ना कौतुक ना अहंभाव. आपले
वाण लावतात याचा अभिमानही त्यांच्या बोलण्यात नसे. दादाजीनी एचएमटी वाण तयार
करताना आपल्या शेतातील विशिष्ट वाणांचाच संकर या जास्त लांबीच्या आणि भरपूर व घट्ट
दाणे असणाऱ्या वाणाशी होवू दिला होता. हे प्रयोग सलग चार पाच वर्ष करून त्याना यश
मिळाले होते. त्याचप्रमाणे या यशामूळे नवा वाण तयार होतो, याची त्याना खात्री
पटली. त्यानंतर त्यानी आपले प्रयोग सातत्याने सुरू केले आणि नवे वाण शोधत राहीले.
एचएमटी सर्वात
यशस्वी वाण हा १९८३ पासून लावला जात होता. त्यानंतर चारचं वर्षात ठेंगू चिनोर
किंवा नांदेड चिनोर हा वाण लागवडीसाठी उपलब्ध झाला. पुढच्या पाच वर्षात म्हणजेचं
१९९२ मध्ये नांदेड-९२ हा भाताचा नवा वाण तयार केला. पुढच्या सहा वर्षात आणखी चार
वाण त्यानी तयार केले. नांदेड हिरा (१९९४), विजय नांदेड (१९९६), दिपक
रत्ना (१९९७), डीआरके (१९९८) या वाणांचे बियाणे लावण्यासाठी दादाजीनी उपलब्ध करून दिले. हे वाण
सर्वत्र लावले जावू लागले. हे बियाणे कोणत्याही शासकीय यंत्रणेने किंवा कंपनीने
लागवडीसाठी उपलब्ध करून दिलेले नव्हते. तरीही हळहळू विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड
आणि ओरिसा राज्यात या वाणांची लागवड होऊ लागली.
पुढे हा एवढा
प्रसिद्ध झालेला वाण कोणी विकसीत केला? याचा शोध काही लोकानी
घेतला. दादाजींचा नागभीड तालुक्यात सत्कार झाला. तेथील गट विकास अधिकाऱ्यानीही
त्यांचा सत्कार केला. त्याच्या वर्तमानपत्रातील बातम्या पाहून चंद्रपूरच्या
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यानी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाच्या कुलगुरूंशी संपर्क
साधला. तत्कालीन कुलगुरू डॉ. मोघे आणि नागभीड तालुक्यातील विद्यापीठाच्या भात
संशोधन केंद्राचे डॉ. देशमुख हे दादाजींच्या घरी गेले. त्यांच्याकडून १९९४च्या जून
महिन्यात एचएमटी वाणांचे पाच किलो बियाणे घेतले. तसेचं ठेंगू चिनोर आणि नांदेड-९२
या वाणांचेही बियाणे घेतले. त्यानी आपण या बियाण्याला शास्त्रीयदृष्ट्या लोकार्यंत
पोहोचवू असे सांगण्यात आले. मात्र डॉ. मोघे यांचे दिडवर्षात दुर्दैवी निधन झाले.
त्यानंतर दादाजीना विद्यापीठाने काहीही न कळवता आपले वाण म्हणून पीकेव्ही-एचएमटी
हा वाण नोंदवला आणि तो बाजारातही बियाणे रूपात आणला.
दादाजींचे वाण
शोधणे सुरू असताना त्यांचा मुलगा मित्रजीत आजारी पडला. अनेक उपचारानंतरही तो बरा
होत नव्हता. मुलाला त्यानी बियाणे कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिले होते. मुलगा
महत्त्वाचा म्हणत त्याच्या उपचारासाठी दादाजीना आपली काही जमीन विकावी लागली. पुढे
मुलाच्या सासऱ्यानी त्याना दिड एकर शेती घेऊन दिली. शेती स्थिरस्थावर होते तोर्यंत
दादाजींच्या अर्धांगीनी राईबाई यांचे निधन झाले आणि दादाजीना मोठा धक्का बसला.
पुढे २००५ मध्ये दादाजीना नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर
दादाजीना पेटंट, रॉयल्टीबाबत कळाले. २०१० मध्ये शेतात काम करत असताना प्रसिद्धी
माध्यमांच्या प्रतिनिधीनी त्याना फोर्ब्ज मासीकाने तुमची दखल घेतल्याचे सांगीतले.
महाराष्ट्र शासनाने कृषीभुषण पुरस्कार देऊन गौरव केला. त्यानंतर दादाजीनी आपल्या
प्रयोगासाठी आणखी शेती मिळावी, अशी मागणी केली. मात्र त्याना दिड एकर शेती देण्यात
आली. त्याना सव्वाशेपेक्षा जास्त पुरस्कार देण्यात आले आहेत. मात्र त्यानी वीस एकर
शेतीची केलेली मागणी मात्र अखेरपर्यंत पुर्ण झाली नाही. तरीही ते अखेरपर्यंत नव्या
वाणांच्या शोधात मग्न राहीले.
त्यानी आपल्या
बियाण्यांच्या हक्कासाठी कायदेशीर लढाई लढावी म्हणून खुप लोक आग्रही राहीले.
त्यानी तसे प्रयत्न केले. मात्र त्यांच्या हाती तुटपुंजी रक्कम आली. मे २०१८ मध्ये
त्यांची प्रकृती आणखी खालावली. उपचारासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यातचं
त्यांचे ४ जून २०१८ रोजी निधन झाले. हे एका खऱ्या 'डोकेवाल्या' कृषी संशोधकाचे
निधन होते. ही साठा उत्तराची कहाणी संपली. मात्र त्यांच्या निधनानंतर का होईना
एचएमटी भाताचा बाप आम्हाला कळला. धनसंपत्तीचे नाही पण आमच्यासारख्या अनेकांच्या
मनावर दादाजी खोब्रागडे हे नाव कायम कोरले गेले. दादाजी तुम्ही गेल्यावर तुमचे
महत्त्व आम्हाला कळले.
Khup chan!
उत्तर द्याहटवाExcrExcel information sir congratulations for informative article
उत्तर द्याहटवाअप्रतिम।
उत्तर द्याहटवाडोकेवाल्याची कहानी डोक्याला चालना देनारी आहे
उत्तर द्याहटवाVery excellent and salute to to the real innovation.
उत्तर द्याहटवा--Dr. Shivaji mundhM
कृतार्थ हाताचा सिद्धहस्त शेतकरी
उत्तर द्याहटवाSir!
उत्तर द्याहटवाVery nice Information.
Very Nice Article
उत्तर द्याहटवाHMT rice lekh nawyane mahiti milali khup upyogi lekh sir
उत्तर द्याहटवामाणसांच्या खाणीतील एक हिरा शोधून सर्वांच्या समोर आणल्याबद्दल आभार...
उत्तर द्याहटवाHatts off dadaji !
उत्तर द्याहटवा