शुक्रवार, ३० जून, २०१७

वेलकम टू माय ग्रीन रूम!


सूर्य उगवतो... दररोज...
मावळतोही रोज...
पण दरवेळी उगवताना...
सोबत आणतो एक नित्यनूतन दिवस...
आपलाही प्रत्येक दिवस असतो नवाच..
घडणाऱ्या घटना नव्या... भेटणारी माणसं नवी...
प्रत्येक दिवसाचं तसंच घटनांचं, माणसांचं वैशिष्ट्यही वेगळं अन् नवीन...
हे सारं नावीन्य आपल्याला आवडतं... अन् कधी कधी आवडतंच असंही नाही...

काही घटना, प्रसंग कसे आनंद, समाधान देणारे...
तर काहींच्या आठवणीही नकोशा वाटणाऱ्या...
काही घटना मन हलकं, प्रफुल्लित करणाऱ्या...
तर काही तणाव वाढविणाऱ्या...
काही जण हे ताण झेलतात यशस्वीपणे...
पण काही कोलमडून, उन्मळून पडतात... जगणं असह्य होतं त्यांचं...
या देवदत्त सुंदर आयुष्याचं जगणंच नकोसं होतं त्यांना...
मग हे राहात नाही फक्त त्यांच्यापुरतं...
सहवासातल्या साऱ्यांचंच जीणं बनवून टाकतात ते दुःखकारक...

मानवी जीवनात हे सारं अपरिहार्यच खरं...
सारीच माणसं चांगली अन् सहृदयी असती तर...
जगण्यात मजा तरी काय राहिली असती?...
सारीच जर असती एकसारखीच गुणी, तर...
सारं जीवनच व्यापलं असतं त्याच त्या अन् त्याच त्या रुक्षतेनं...

विविध रंगी या दुनियेत... अटळच त्या भेटी...
कधी आनंदाचे तुषार उडविणाऱ्या तर कधी दुःखाचे ढग बरसविणाऱ्या...
आनंदाचा अन् दुःखाचा... यशाचा अन् अपयशाचा...
पाठशिवणीचा हा खेळ नसता तर...
सुखाच्या क्षणांचा... यशाच्या प्राप्तीचा आनंद लाभला तरी कसा असता?...

कष्टसाध्य यशाचा आनंदच मोठा...
त्यासाठी झेललेले चटकेही रुपांतरतात नंतर...
एका अद्भुत जीवनानंदात...
त्यांना साहण्याचं बळ देतात आपल्याला छंद...
छंद हा नादच... नादावणारा, धुंदवणारा...
नादखुळा बनविणारा... शरीराला, मनाला, आत्म्याला...

तसे छंद, नाद नसतात कुणाला दुखावणारे...
पण त्यांचाही त्रास होणारे... करून घेणारे... असतातच आपल्या आसपास...
एखाद्याला असतो... नेहमी सत्य वदण्याचा छंद...
पण त्या सत्याला नसेल तारतम्याची जोड तर... एखादा जातो दुखावलाही...
एखाद्याच्या सद्वर्तनाचं होतं कौतुक... पण त्याचाही होतो त्रास कित्येकांना...
प्रत्येकाचं वर्तन असतं सापेक्ष... किंबहुना... त्याला अपेक्ष... हेच खरं...

असो कुणाचं काहीही म्हणणं...
नाद, छंद हे आपले सखेच खरे...
रात्री हवीय शांत झोप तर... मन गुंतायला हवं असं कशात तरी...
हे गुंतणंही असावं सकारात्मक... इतरांना त्रास न देणारं...

पुस्तक हे असंच एक गुंतण्याचं महत्त्वाचं ठिकाण...
पावसाच्या बेधुंद आलिंगनानंतर धरित्रीनं पांघरलेला हिरवा शालू पाहून... मन होतं जसं तृप्त, शांत...
तीच तृप्तता, तीच शांतता मिळवून देतात पुस्तकं...
त्या तृषार्त वाचनानंदात चाळवल्या जातात...
आपल्यातल्याही अभिव्यक्तीच्या जाणीवा...
त्या अभिव्यक्तीला हवा असतो योग्य मार्ग...
कधी तो असतो संवादाचा, कधी लेखनाचा... तर कधी रंगीबेरंगी चित्रांचा...

कागदावरची शब्दरुपी अभिव्यक्ती फुलते... या पुस्तकांच्या सान्निध्यातच...
वाचनाचं, लेखनाचं अन् तृप्तीचा आनंद देणाऱ्या..
कोणत्याही अभिव्यक्तीचं समाधान देणारी रुम म्हणजे ग्रीन रुम...
जशा वाचनाला ठाऊक नसतात कोणत्याही सीमा वा बंधनं...
अभिव्यक्तीला तरी त्या कशा असतील?...
किंबहुना, सीमा-बंधनात स्वतःला जखडवणारी... अभिव्यक्ती म्हणावी तरी कशी? ...
ती असते अमर्याद, अनंत... हृदयापासून हृदयापर्यंत पूल बांधणारी... मने जोडणारी...
हेच तर प्रयोजन आहे या ब्लॉगचं... माझ्या ग्रीन रुमचं...

ज्या अभिव्यक्तीतून लाभतं समाधान मला...
तेच तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा आनंद मिळविण्याचा.. हा आहे एक अल्पसा प्रयत्न...
याला नाहीत बंधनं कसलीच... ना मर्यादा कोणत्या...
हो, आहे एकच अट... वय कितीही असलं तरी मनाची टवटवी मात्र ताजी हवी...
या ग्रीन रुममध्ये येणाऱ्या प्रत्येक हिरव्या, तरुण मनाचं इथं स्वागतच आहे...

वेलकम टू माय ग्रीन रुम!!!

८ टिप्पण्या:


 1. असो कुणाचं काहीही म्हणणं...
  नाद, छंद हे आपले सखेच खरे

  एकदम बरोबर

  उत्तर द्याहटवा
 2. खूपच सुंदर लिहिले आहे. अनपेक्षितपणे आनंदाचा सुखद धक्का...तुमच्या ग्रीनरूम मधील स्वागताबद्दल धन्यवाद...

  उत्तर द्याहटवा
 3. Excellent blog , your green room is our greener room .... close to environment...close to heart ... your green is pink took ... intellectual , bright

  उत्तर द्याहटवा